M’Cheyne Bible Reading Plan
मोशेचे गीत
15 नंतर मोशे व इस्राएल लोक परमेश्वराला हे गीत गाऊ लागले:
“मी परमेश्वराला गीत गाईन
कारण त्याने महान कृत्ये केली आहेत;
घोडा व स्वार यांना
त्याने समुद्रात फेकून दिले आहे.
2 परमेश्वर माझे सामर्थ्य आहे.
तो माझे रक्षण करितो.
मी त्याची स्तुतिस्तोत्रे गाईन; [a]
परमेश्वर माझा देव आहे;
तो माझ्या पूर्वजाचा देव आहे;
मी त्याचे गौरव करीन.
3 परमेश्वर महान योद्धा आहे;
त्याचे नांव याव्हे आहे.
4 त्याने फारोचे रथ व स्वार यांना
समुद्रात फेकून दिले;
त्याने फारोचे उत्तम लष्करी
अधिकारी तांबड्या समुद्रात बुडविले.
5 खोल पाण्याने त्यांना बुडविले;
ते खोल पाण्यात दगडाप्रमाणे तळापर्यंत बुडाले.
6 “हे परमेश्वर तुझा उजवा हात आश्चर्यकारकरीत्या बलशाली आहे;
त्या हाताने तू शत्रूंचा चुराडा करून टाकलास.
7 तुझ्या वैभवशाली सामर्थ्याने तू तुझ्याविरुद्ध बंड करून
उठणाऱ्यांचा नाश करतोस;
अग्नीने वाळलेल्या गवताच्या काड्या जाळाव्या तसे
तू त्यांना तुझ्या रागाने जाळून भस्म करतोस.
8 तू वाहविलेल्या जोराच्या वाऱ्याने
पाणी राशी सारखे उंच उभे राहिले
व जोराने वाहणाऱ्या पाण्याची टणक भिंत झाली;
समुद्राचे पाणी अगदी खोलवर घट्ट टणक बनले.
9 “शत्रु म्हणाला,
‘मी त्यांचा पाठलाग करीन, त्यांना गाठीन,
मी त्यांची सर्व संपत्ती लुटून घेईन; त्यामुळे माझा जीव तृप्त होईल.
माझ्या तलवारीने त्यांचे सर्व काही हिरावून घेईन;
माझ्या हातांनी त्यांचे सर्वकाही मी स्वतः करिता घेईन.’
10 परंतु तू त्यांच्यावर फुंकर वायु सोडलास
आणि समुद्राच्या पाण्याने त्यांना गडप केले;
ते शिशाप्रमाणे समुद्रात खोल
पाण्यात तळापर्यंत बुडाले.
11 “परमेश्वरासारखा, देवतांमध्ये कोण देव आहे का?
नाही! परमेश्वरा तुझ्या समान कोणी देव नाही;
तू आश्चर्यकारक, अति पवित्र देव आहेस!
तुझे सामर्थ्य आश्चर्यकारक आहे!
तू महान चमत्कार करतोस!
12 तू तुझा उजवा हात उगारला पृथ्वीने
त्यांना गिळून टाकले.
13 तू उद्धारिलेल्या लोकांना
तू तुझ्या दयाळूपणाने चालविले आहेस;
तुझ्या सामर्थ्याने तू त्यांना तुझ्या पवित्र
आणि आनंददायी प्रदेशात नेले आहेस.
14 “इतर राष्ट्रे ही गोष्ट
ऐकून भयभीत होतील;
पलिष्टी लोक भीतीने थरथरा कांपतील.
15 मग अदोमाची कुटुंबे व मवाबाचे बलवान लोक
भीतीने थरथरा कांपतील
आणि कनानी लोकांचे धैर्य पावेल.
16 तुझे सामर्थ्य पाहून ते लोक घाबरतील,
आणि परमेश्वराचे लोक म्हणजे तू तारलेले लोक निघून पार जाईपर्यंत
ते तुझ्या लोकांना काहीही न करता,
दगडासारखे एकाच जागी उभे राहतील;
17 तू तुझ्या लोकांना
तुझ्या वतनाच्या पर्वतावर घेऊन जाशील;
हे परमेश्वरा, तू त्यांना तुझ्या सिहांसनासाठी तयार केलेल्या ठिकाणाजवळ राहू देशील,
व तू हे परमेश्वरा तू तुझे मंदिर बांधशील.
18 “परमेश्वर सदासर्वदा राज्य करो!”
19 फारोचे घोडे, घोडेस्वार व रथ समुद्रात गेले आणि परमेश्वराने त्यांना समुद्राच्या पाण्यात गडप केले; परंतु इस्राएल लोक भरसमुद्रातून कोरड्या जमिनीवरून चालत पार गेले.
20 त्यानंतर अहरोनाची बहीण मिर्याम संदेष्टी हिने डफ घेतला आणि ती व इतर स्त्रिया गाऊ व नाचू लागल्या. मिर्याम हे गीत पुन्हा पुन्हा गात होती;
21 “परमेश्वराला गीत गा;
कारण त्याने महान कृत्ये केली आहेत.
त्याने घोडा व घोडेस्वार यांना
समुद्रात फेकून दिले आहे....”
22 मोशे इस्राएल लोकांना तांबड्या समुद्रापासून पुढे घेऊन गेला. ते लोक शूरच्या रानात गेले; त्यांनी तीन दिवस रानातून प्रवास केला; पण त्यांना पाणी मिळाले नाही. 23 तीन दिवस प्रवास केल्यानांतर ते लोक मारा नांवाच्या ठिकाणी पोहोंचले; तेथे पाणी होते परंतु ते फार कडू असल्यामुळे लोकांना ते पिववेना, (म्हणूनच त्या ठिकाणाचे नांव मारा पडले).
24 लोक मोशेकडे कुरकुर करीत म्हणाले, “आता आम्ही काय प्यावे?”
25 मोशेने परमेश्वराचा धावा केला तेव्हा परमेश्वराने त्याला एक झाड दाखवले. मोशेने ते झाड पाण्यात टाकले तेव्हा ते पाणी गोड म्हणजे पिण्यालायक झाले.
त्यावेळी परमेश्वराने इस्राएल लोकांना विधी व नियम लावून दिला; तसेच त्याने त्यांच्या विश्वासाची कसोटी घेतली. 26 परमेश्वर म्हणाला, “तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळा; ज्या गोष्टी चांगल्या आहेत असे तो म्हणतो त्या तुम्ही करा; जर तुम्ही तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा व विधी पाळाल तर तुम्हाला मिसरच्या लोकांप्रमाणे पीडा भोगाव्या लागणार नाहीत आणि मी जो परमेश्वर त्या मी मिसरच्या लोकांवर जे रोग पाठवले ते तुम्हांवर पाठविणार नाही; मी परमेश्वर आहे; तुम्हाला बरे करणारा मीच आहे.”
27 मग इस्राएल लोक प्रवास करीत एलीम या ठिकाणी गेले; तेथे पाण्याचे बारा झरे होते व सत्तर खजुरीची झाडे होती; तेव्हा लोकांनी तेथे पाण्याजवळ तळ दिला.
देव त्याच्या लोकांना उत्तर देईल
18 त्यांनी नेहमी आशा न सोडता प्रार्थना करावी व ती करण्याचे कधीच सोडू नये हे शिकविण्यासाठी त्याने त्यांना एक बोधकथा सांगितली. 2 तो म्हणाला, “एका नगरात एक न्यायाधीश होता. तो देवाला भीत नसे लोकांना मानही देत नसे. 3 त्या नगरात एक विधवा होती. ती वारंवार येत असे व न्यायाधीशाला म्हणत असे, ‘माझ्या विरोधकांविरुद्ध मला न्याय मिळेल असे बघा!’ 4 काही काळ त्याची इच्छा नव्हती पण शेवटी तो स्वतःशीच म्हणाला, ‘मी जरी देवाला भीत नाही व लोकांना मान देत नाही. 5 तरीही ती विधवा मला त्रास देत असल्याने तिला न्याय मिळेल असे मी करतो, यासाठी की ती वारंवार येऊन मला बेजार करणार नाही.’”
6 मग प्रभु म्हणाला, “अनीतिमान न्यायाधीश काय म्हणाला त्याकडे लक्ष द्या. 7 आणि मग जे देवाचे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? तो त्यांना मदत करावयास वेळ लावील काय? 8 मी तुम्हांस सांगतो, तो त्यांना न्याय देईल. तरीही जेव्हा मनुष्याचा पुत्र येतो, तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?”
देवाबरोबर योग्य ते संबंध असणे
9 अशा लोकांना जे स्वतःनीतिमान असल्याचा अभिमान बाळगत होते व इतरांना कमी लेखत होते, अशा लोकांसाठी येशूने ही गोष्ट सांगितली. 10 “दोघे जण प्रार्थना करावयास वर मंदिरात गेले. एक परुशी होता व दुसरा जकातदार होता. 11 परुशी उभा राहिला व त्याने अशी प्रार्थना केली, ‘हे देवा, मी तुझे उपकार मानतो कारण, इतर लोकांसारखा म्हणजे चोर, फसविणारा, व्यभिचारी व या जकातदारासरखा मी नाही. 12 उलट मी आठवड्यातून दोनदा उपास करतो, व माझ्या सर्व उत्पन्नाचा दहावा भाग देतो.’
13 “परंतु जकातदार दूर अंतरावर उभा राहिला व आपले डोळे स्वर्गाकडे वर न उचलता आपली छाती बडवीत म्हणाला, ‘हे देवा, मज पापी माणसावर दया कर!’ 14 मी तुम्हांला सांगतो हा मनुष्य, त्या दुसऱ्या माणसापेक्षा नितीमान ठरुन घरी गेला. कारण जो कोणी स्वतःला उंच करतो त्याला नीच केले जाईल आणि जो कोणी स्वतःला नीच करतो त्याला उंच केले जाईल.”
देवाच्या राज्यात कोण प्रवेश करील?(A)
15 आणि ते आपल्या बालकांनादेखील त्याच्याकडे आणीत यासाठी की त्याने त्यांना स्पर्श करावा. पण जेव्हा शिष्यांनी हे पाहिले तेव्हा ते त्यांना दटावू लागले. 16 पण येशूने बाळकांना त्याच्याकडे बोलाविले आणि म्हणाला, “बालकांना मजकडे येऊ द्या. त्यांना अडवू नका. कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. 17 मी खरोखर तुम्हांला सांगतो, जो कोणी देवाच्या राज्याचा बालकासारखा स्वीकार करीत नाही. त्याचा स्वर्गात प्रवेश होणार नाही.”
एक श्रीमंत मनुष्य येशूला प्रश्न विचारतो(B)
18 एका यहूदी पुढाऱ्याने त्याला विचारले, “उत्तम गुरुजी, अनंतकाळचे जीवन मिळविण्यासाठी मी काय करु?”
19 येशू त्याला म्हणाला, “मला उत्तम का म्हणतोस? देवाशिवाय कोणीही उत्तम नाही. 20 तुला आज्ञा माहीत आहेतः ‘व्यभिचार करु नको, खून करु नको, चोरी करु नको, खोटी साक्ष देऊ नको, तुझ्या आईवडिलांचा मान राख.’” [a]
21 तो पुढारी म्हणाला, “या सर्व आज्ञा मी माझ्या तरुणपणापासून पाळल्या आहेत.”
22 जेव्हा येशूने हे ऐकले, तेव्हा तो त्याला म्हणाला, “तुझ्यामध्ये अजून एका गोष्टीची उणीव आहे: तुझ्याजवळचे सर्व काही विकून ते गरिबांना वाट, म्हणजे स्वर्गात तुला संपत्ती मिळेल. मग ये. माझ्या मागे चल.” 23 पण जेव्हा त्या पुढाऱ्याने हे ऐकले तेव्हा तो फार दु:खी झाला, कारण तो फार श्रीमंत होता.
24 जेव्हा येशूने पाहिले की, तो दु:खी झाला आहे, तो म्हणाला, “ज्यांच्याजवळ धन आहे, त्या लोकांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे! 25 होय, श्रीमंत माणसाचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा उंटाने सुईच्या छिद्रातून जाणे सोपे आहे.”
कोणाचे तारण होईल?
26 नंतर ज्या लोकांनी हे ऐकले, ते म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होईल?”
27 येशू म्हणाला, “ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत.”
28 मग पेत्र म्हणाला, “पाहा, आमच्याकडे जे होते, ते सर्व सोडून आम्ही तुमच्यामागे आलो आहोत.”
29 येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांस खरे सांगतो, असा कोणीही नाही की ज्याने देवाच्या राज्यासाठी आपले घर किंवा पत्नी कींवा भाऊ, किंवा आईवडील सोडले आहेत, त्यांस या काळात व 30 येणाऱ्या काळातील अनंतकाळात याच्यापेक्षा कित्येक पटींनी मिळाले नाही.”
येशू मरणातून उठेल(C)
31 येशूने बारा प्रेषितांना बाजूला घेतले आणि त्यांना म्हणाला, “ऐका! आपण वर यरुशलेमास जात आहोत आणि भविष्यवाद्यांनी मनुष्याच्या पुत्राविषयी जे काही लिहिले होते ते पूर्ण होईल. 32 होय, त्याला विदेश्यांच्या हाती धरुन देण्यात येईल, त्याची कुचेष्टा होईल, त्याची निंदा करतील, त्याच्यावर थुंकतील. 33 ते त्याला चाबकाचे फटके मारुन रक्तबंबाळ करुन ठार करतील. आणि तो तिसऱ्या दिवशी मरणातून उठेल.” 34 शिष्यांना यातील काहीही कळाले नाही. कारण हे वचन त्यांच्यापासून लपवून ठेवण्यात आले होते. आणि तो कशाविषयी बोलत आहे हे त्यांना माहीत नव्हते.
येशू एका आंधळ्यास बरे करतो(D)
35 येशू यरीहोजवळ येत असताना एक आंधळा रस्त्यावर बसून भीक मागत होता. 36 जेव्हा त्या आंधळ्या मनुष्याने जवळून जाणाऱ्या समुदायाचा आवाज ऐकला तेव्हा त्याने विचारले हे काय चालले आहे.
37 त्यांनी त्याला सांगितले की, “नासरेथकर येशू जात आहे.”
38 तो मोठ्याने ओरडून म्हणाला, “येशू दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर!”
39 जे पुढे चालले होते त्यांनी त्याला गप्प राहण्यास सांगितले. परंतु तो आणखी मोठ्याने ओरडून म्हणाला, “दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा!”
40 येशू थांबला, आणि त्याने आंधळ्याला आपणांकडे आणण्याची आज्ञा केली, जेव्हा आंधळा जवळ आला, तेव्हा येशूने त्याला विचारले, 41 “तुला काय हवे?”
आंधळा मनुष्य म्हणाला, “प्रभु, मला परत दृष्टी प्राप्त व्हावी.”
42 येशू त्याला म्हणाला, “तुला दृष्टि येवो: तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”
43 तत्काळ त्याला दृष्टि आली आणि देवाचे गौरव करीत तो येशूच्या मागे गेला. सर्व लोकांनी हे पाहिले आणि देवाची स्तुति केली.
33 “ईयोबा, आता माझ्याकडे लक्ष दे.
मी काय म्हणतो ते लक्षपूर्वक ऐक.
2 मी आता बोलायला तयार झालो आहे.
3 माझे अंतःकरण प्रामाणिक आहे.
म्हणून मी प्रामाणिक शब्दच बोलेन.
मला जे माहीत आहे त्याबद्दल मी सत्य तेच सांगेन.
4 देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले.
मला सर्वशक्तिमान देवाकडून जीवन मिळाले.
5 ईयोबा, माझे बोलणे ऐक आणि तुला शक्य झाले तर मला उत्तर दे.
माझ्याशी वाद घालण्याकरता तुझी उत्तरे तयार ठेव.
6 देवासमोर तू आणि मी सारखेच आहोत.
आपल्याला निर्माण करण्यासाठी देवाने माती वापरली.
7 ईयोबा, माझी भीती बाळगू नकोस.
मी तुझ्याशी कडक वागणार नाही.
8 “पण ईयोबा, तू जे बोललास ते मी ऐकले.
9 तू म्हणालास, ‘मी शुध्द आहे, मी निरपराध आहे,
मी काहीही चूक केली नाही.
मी अपराधी नाही.
10 मी काही चूक केली नाही तरीही देव माझ्याविरुध्द आहे.
देवाने मला शत्रूप्रमाणे वागवले आहे.
11 देवाने माझ्या पायला साखळदंड बांधले.
देव माझी प्रत्येक हालचाल बघतो.’
12 “परंतु ईयोबा, तू या बाबतीत चुकतो आहेस.
आणि तुझी चूक मी सिध्द करुन दाखवेन.
का? कारण देवाला कोणत्याही माणसापेक्षा अधिक माहिती असते. [a]
13 ईयोबा, तू देवाशी वाद घालत आहेस.
देवाने तुला सर्व काही नीट सांगावे असे तुला वाटते.
14 परंतु देव जे काही करतो ते खरोखरच स्पष्ट करुन सांगत असेल.
कदाचित् देव निराळ्या रीतीने बोलत असेल आणि लोकांना ते समजत नसेल.
15-16 देव कदाचित् लोकांशी रात्री ते झोपेत असताना स्वप्नात
किंवा दृष्टांतात बोलत असेल
आणि तेव्हा देवाची ताकीद ऐकून
ते खूप भयभीत होत असतील.
17 देव लोकांना चुकीच्या गोष्टी करणे बंद करण्याची ताकीद देतो
आणि गर्व न करण्याचेही सांगतो.
18 देव लोकांना मृत्युलोकात जाण्यापासून वाचविण्यासाठी ताकीद देत असतो.
देव हे सारे माणसाला नष्ट होण्यापासून वाचविण्यासाठी करतो.
19 “किंवा एखाद्याला देवाचा आवाज तेव्हा ऐकू येईल जेव्हा तो देवाने केलेल्या शिक्षेमुळे अंथरुणात पडून दु:ख भोगत असेल.
देव त्याला दु:ख देऊन ताकीद देत असतो.
तो माणूस वेदनेने इतका तळमळत असतो की त्याची सगळी हाडे दुखतात.
20 नंतर तो माणूस खाऊ शकत नाही.
तो वेदनेने इतका तळमळतो की चांगल्या अन्नाचासुध्दा त्याला तिरस्कार वाटतो.
21 त्याचे शरीर इतके क्षीण होते की तो जवळ जवळ दिसेनासा होतो.
त्याची सगळी हाडे दिसतात.
22 तो मृत्यूलोकांजवळ येऊन ठेपतो
आणि त्याचे जीवन मरणपंथाला लागलेले असते.
23 “देवाजवळ हजारो देवदूत असतात.
कदाचित् त्यांच्याच पैकी एखादा त्या माणसावर लक्ष ठेवून असेल.
तोच देवदूत त्याच्याबद्दल बोलेल
आणि त्याच्या चांगल्या कृत्यांबद्दल सांगेल.
24 देवदूत त्याच्याशी देयेने वागेल.
कदाचित् देवदूत देवाला सांगेल.
‘या माणसाला मृत्युलोकात जाण्यापासून वाचव.
त्याच्या पापाची किंमत मोजण्याचा दुसरा एक मार्ग मला सापडला आहे.’
25 नंतर त्या माणसाचे शरीर पुनः तरुण आणि जोमदार बनेल.
तो तरुणपणी जसा होता तसाच पुन्हा होईल.
26 तो देवाची प्रार्थना करेल आणि देव त्याला उत्तर देईल.
तो माणूस आनंदाने ओरडेल आणि देवाची भक्ती करेल.
नंतर तो मनुष्य पुन्हा चांगले जीवन जगायला लागेल.
27 नंतर तो लोकांना कबुली देईल.
तो म्हणेल, ‘मी पापकर्म केले.
मी चांगल्याचे वाईट केले.
पण देवाने मला जितकी वाईट शिक्षा करायला हवी
होती तितकी केली नाही.
28 देवाने माझ्या आत्म्याला मृत्युलोकात जाण्यापासून वाचवले.
आता मी पुन्हा आयुष्य उपभोगू शकतो.’
29 “देव त्या माणसासाठी या गोष्टी पुन्हा पुन्हा करतो.
30 का? त्या माणसाला ताकीद देण्यासाठी
आणि त्याच्या आत्म्याला मृत्युलोकात जाण्यापासून वाचवण्यासाठी
देव असे करतो असे केल्यामुळे
तो त्याचे आयुष्य उपभोगू शकेल.
31 “ईयोबा, मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे.
माझे ऐक! तू गप्प रहा आणि मला बोलू दे.
32 पण ईयोब, जर तुला माझे बोलणे पटत नसेल तर तू खुशाल बोल.
मला तुझे मुद्दे सांग.
कारण मला तुझे बोलणे सुधारायचे आहे.
33 परंतु ईयोब, तुइयाजवळ बोलण्यासारखे काही नसेल तर माझे ऐक.
तू गप्प रहा आणि मी तुला शहाणपण शिकवेन.”
देवाच्या नव्या कराराचे सेवक
3 पुन्हा, आम्ही आमची प्रशंसा करायला लागलो काय? किंवा आम्हांला काही लोकांसारखी तुमच्याकडे येण्यास किंवा तुमच्याकडून येण्यास शिफारसपत्रांची आवश्यकता आहे काय? 2 तुम्ही स्वतःच आमची शिफारसपत्रे आहात. आमच्या अंतःकरणावर लिहिलेले, प्रत्येकाने वाचलेले व प्रत्येकाला माहीत असलेले. 3 तुम्ही दाखवून देता की, तुम्ही ख्रिस्ताकडून आलेले पत्र आहात, आणि ते आमच्या सेवेचा परिणाम शाईने लिहिलेले पत्र नव्हे, तर जिवंत देवाच्या आत्म्याने लिहिलेले, दगडी पाट्यावर नव्हे तर मानवी हृदयाच्या पाट्यांवर लिहिलेले आहात.
4 देवासमोर ख्रिस्ताद्धारे अशा प्रकारचा आमचा विश्वास आहे. 5 असे नाही की आम्ही स्वतःहून आमच्यासाठी सर्वकाही करण्यास समर्य आहोत, तर आमचे सामर्थ्य देवापासून येते. 6 त्याने आम्हांला नव्या कराराचे सेवक म्हणून समर्थ बनविले आहे- पत्राने नव्हे तर आत्म्याने, कारण पत्र मारुन टाकते, पण आत्मा जीवन देतो.
नवा करार महान गौरव आणतो
7 आता जर सेवेमुळे मरण येते, जी दगडावर अक्षरांनी कोरलेली होती आणि जर ती सेवा गौरवाने आली, यासाठी की, इस्राएल लोकांना मोशेच्या चेहऱ्याचे तेजोवलय पाहता येऊ नये, जरी ते तेज कमी होत चालले होते. 8 तर आत्म्याची सेवा त्यापेक्षा गौरवी होणार नाही काय? 9 कारण जर सेवा जी माणसाचा निषेध करते ती गौरवी असेल, तर तिच्यापेक्षा कितीतरी गौरवी ती सेवा असेल जी नीतिमत्व आणते! 10 त्यात गौरव होते, पण जेव्हा त्यापेक्षा महान गौरवासमोर तुलना केली जाते, तेव्हा ते कमी होते. 11 आणि जर ते निस्तेज होत जाणारे गौरवाने आले तर जे टिकते त्याचे गौरव किती महान असेल!
12 म्हणून आम्हांला अशी आशा असल्यामुळे, आम्ही फार धीट आहोत. 13 आम्ही मोशेप्रमाणे नाही, ज्याने तोंडावर आवरण घेऊन त्याच्या चेहऱ्याच्या तेजामुळे (इस्राएली लोकांचे डोळे दिपून जाऊ नयेत) त्याचा चेहरा लोकांना दिसणार नाही म्हणून तोंड झाकून घेतले, जरी त्या वेळेला त्याचे तेज कमी होत चालले होते. 14 पण त्यांची मने मंद करण्यात आली होती. कारण आजपर्यंत तोच पडदा (आवरण) राहतो, जेव्हा जुना करार वाचला जातो. तो हटवण्यात आलेला नाही. कारण केवळ ख्रिस्तामध्येच तो बाजूला घेतला जाईल. 15 तरी आजपर्यंत जेव्हा मोशेचे ग्रंथ वाचतात तेव्हा त्यांच्या मनावर आच्छादन राहते. 16 पण जेव्हा केव्हा कोणी प्रभूकडे वळतो तेव्हा ते आवरण काढून घेतले जाते. 17 प्रभु आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळेपणा आहे. 18 तर आपण सर्वजण आवरण नसलेल्या चेहऱ्याने प्रभुचे गौरव आरशात पाहिल्याप्रमाणे पाहत असता, प्रभु जो आत्मा याच्यापासून गौरवातून गौरवात असे त्याच्या प्रतिरुपात रुपांतरीत होत जातो.
2006 by World Bible Translation Center