M’Cheyne Bible Reading Plan
13 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, 2 “इस्राएलाचा प्रत्येक प्रथम जन्मलेला म्हणजे मातेच्या उदरातून बाहेर आलेला मुलगा, त्याच प्रमाणे पशूंतला प्रथम जन्मलेला नर ह्यांना माझ्यासाठी पवित्र म्हणून वेगळे ठेव. ते माझे आहेत.”
3 मोशे लोकांना म्हणाला, “आजच्या दिवसाची आठवण ठेवा. तुम्ही मिसर देशात गुलाम म्हणून होता; परंतु ह्या दिवशी परमेश्वराने आपल्या महान सामर्थ्याने तुम्हांस गुलामगिरीतून सोडवून बाहेर आणले म्हणून तुम्ही खमीर घातलेली भाकर खाऊ नये. 4 आज अबीब महिन्यात तुम्ही मिसर सोडून निघत आहात. 5 परमेश्वराने तुमच्या पूर्वजांशी विशेष करार केला होता की कनानी, हित्ती, अमोरी, हिव्वी व यबूसी या लोकांचा देश मी तुम्हाला देईन; [a] त्यामुळे त्या देशात नेल्यानंतर तुम्ही या दिवसाची आठवण ठेवलीच पाहिजे; तुम्ही प्रत्येक वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या ह्या दिवशी परमेश्वराची उपासना करण्यासाठी हा सण पाळला पाहिजे.
6 “या सात दिवसात तुम्ही बेखमीर भाकर खावी. सातव्या दिवशी मोठी मेजवानी करून तुम्ही हा सण पाळावा; 7 ह्या सात दिवसात तुम्ही खमीर घातलेली भाकर खाऊ नये. तुमच्या देशाच्या हद्दीत कोठे ही खमीर घातलेली भाकर नसावी. 8 ह्या दिवशी परमेश्वराने आम्हाला मिसर देशातून बाहेर आणले म्हणून आम्ही हा सण पाळीत आहोत असे तुम्ही आपल्या मुलाबाळांना सांगावे.
9 “हा सणाचा दिवस म्हणजे जणू काय तुम्हाला आठवण देण्याकरिता तुमच्या हाताला बांधलेल्या दोऱ्यासारखा होईल, तो तुम्हाला डोळ्यांच्या दरम्यान चिन्ह असा होईल. [b] त्याच्यामुळे तुम्हाला परमेश्वराच्या शिकवणुकीची आठवण होईल. तसेच परमेश्वराने आपल्या सामर्थ्याने तुम्हाला मिसरमधून बाहेर आणले याची आठवण करण्यास तो तुम्हाला मदत करील. 10 म्हणून प्रत्येक वर्षी योग्य वेळी म्हणजे ह्या सणाच्यावेळी ह्या दिवसाची तुम्ही आठवण ठेवा.
11 “परमेश्वराने तुमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे तो तुम्हाला आता कनानी लोक राहात असलेल्या देशात घेऊन जाईल व तो देश तुम्हाला देईल. तो दिल्यानंतर 12 तुम्ही परमेश्वराला तुमचा प्रथम जन्मलेला मुलगा व पशूंमधील प्रथम जन्मलेला नर देण्याची आठवण ठेवलीच पाहिजे. 13 गाढवाच्या प्रथम जन्मलेल्या शिंगराला एक कोकरू देऊन परमेश्वराकडून सोडवून घेता येईल; परंतु तुम्हाला ते शिगंरु तसे सोडवायचे नसेल तर त्याचा वध करावा. तो परमेश्वराला यज्ञ होईल तुम्ही त्याची मान मोडावी प्रत्येक प्रथम जन्मलेला मुलगा सुध्दा मोबदला देऊन सोडवून घ्यावा.
14 “पुढील काळीं तुमची मुले बाळे विचारतील की तुम्ही असे का करिता म्हणजे हा सण का पाळिता? ते म्हणतील, ‘या सर्वाचा अर्थ काय?’ तेव्हा तुम्ही उत्तर द्यावे, ‘आम्ही मिसरमध्ये गुलामगिरीत होतो परंतु परमेश्वराने आपल्या महान सामर्थ्याने आम्हाला मिसरमधून सोडवून येथे आणले. 15 मिसरचा राजा फारो ह्याने आम्हांस मिसर सोडून जाऊ देण्याचे नाकारले; परंतु परमेश्वराने मिसरमधील प्रथम जन्मलेली मुले व पशुंमधील प्रथम जन्मलेले नर मारून टाकले; आणि म्हणूनच आम्ही पशूंमधील प्रथम जन्मलेले नर परमेश्वराला देऊन टाकतो आणि प्रथम जन्मलेली मुले आम्ही परमेश्वराकडून सोडवून घेतो.’ 16 हा सण म्हणजे जणू काय आठवणीसाठी हाताला बांधलेल्या दोरीच्या खुणे सारखा व डोळ्यांच्या दरम्यानच्या कपाळपट्टी सारखा आहे. परमेश्वराने आपल्या महान सामर्थ्याने आम्हाला मिसर देशातून बाहेर आणले त्याची आठवण देण्यास हा दिवस मदत करतो.”
मिसरपासून बाहेर प्रवास
17 फारोने इस्राएल लोकांना मिसर सोडून जाऊ दिले, परंतु परमेश्वराने लोकांना पलिष्टी लोकांच्या देशातून जवळची वाट असताना देखील त्यातून जाऊ दिले नाही; कारण परमेश्वर म्हणाला, “त्यांना त्यातून जाताना लढावे लागेल आणि मग त्यामुळे आपल्या मनातले विचार बदलून ते लोक माघारे वळून मिसर देशाला परत जातील.” 18 म्हणून परमेश्वराने त्यांना दुसऱ्या मार्गाने तांबड्या समुद्राजवळील रानातून नेले. इस्राएल लोक मिसरमधून सशस्त्र होऊन निघाले होते.
योसेफाच्या अस्थी वचन दिलेल्या देशात नेल्या जातात
19 मोशेने योसेफाच्या अस्थी आपल्याबरोबर घेतल्या (कारण मरण्यापूर्वी योसेफाने आपणांकरिता इस्राएली पुत्रांकडून वचन घेतले होते. तो म्हणाला होता, “परमेश्वर जेव्हा तुम्हाला मिसरमधून सोडवील तेव्हा माझ्या अस्थी मिसरमधून घेऊन जाण्याची आठवण ठेवा.”)
परमेश्वर आपल्या लोकांना घेऊन जातो
20 इस्राएल लोकांनी सुक्कोथ हे ठिकाण सोडले व रानाजवळील एथाम या ठिकाणी त्यांनी तळ दिला. 21 दिवसा त्यांना मार्ग दाखविण्यासाठी उंच ढगाची व रात्री उंच अग्निस्तंभाची योजना करून परमेश्वर त्यांच्या पुढे चालत असे. लोकांना रात्रीही प्रवास करता यावा यासाठी तो ढग त्यांना रात्री प्रकाश देत असे. 22 दिवसा तो उंच ढग व रात्री तो अग्निस्तंभ सतत त्या लोकांबरोबर असत.
खरी संपत्ती
16 येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “एक श्रीमंत मनुष्य होता. त्याचा एक कारभारी होता. हा कारभारी तुमचे पैसे उधळतो. असे त्या श्रीमंत माणसाला सांगण्यात आले. 2 म्हणून त्या श्रीमंत मनुष्याने कारभाऱ्याला आत बोलावले आणि म्हणाला, ‘हे मी तुझ्याविषयी काय ऐकत आहे तुझ्या कारभाराचा हिशेब दे, कारण यापुढे कारभारी म्हणून तुला राहता येणार नाही.’
3 “तेव्हा कारभारी स्वतःशी म्हणाला, ‘मी काय करु? माझे मालक माझे कारभाऱ्याचे काम काढून घेत आहेत. शेतात कष्ट करण्याइतका मी बळकट नाही व भीक मागण्याची मला लाज वाटते. 4 मी काय करावे हे मला माहीत आहे. यासाठी की जेव्हा मला कारभाऱ्याच्या कामावरुन काढून टाकतील, लोक मला त्यांच्या घरांमध्ये घेतील.’
5 “मग त्याने त्याच्या मालकाच्या प्रत्येक कर्जदाराला बोलावले. पहिल्याला तो म्हणाला, ‘तू माइया मालकाचे किती देणे लागतोस?’ 6 तो म्हणाला, ‘चार हजार लीटर जैतून तेल.’ मग तो त्याला म्हणाला, ‘तुझी पावती घे बघू, खाली बस आणि लवकर त्यावर दोन हजार लीटर लिही.’
7 “मग दुसऱ्याला तो म्हणाला, ‘आणि तुझे किती देणे आहे?’ तो म्हणाला, ‘तीस हजार किलो गहू.’ तो त्याला म्हणाला, ‘तुझी हिशेबाची पावती घे व त्यावर पंचवीस हजार किलो लिही.’
8 “आणि मालकाने त्या अप्रामाणिक कारभाऱ्याची प्रशंसा केली. कारण तो धूर्तपणे वागला होता. या जगाचे पुत्र त्यांच्यासारख्यांशी वागताना प्रकाशाच्या पुत्रांपेक्षा अधिक धूर्ततेने वागतात.
9 “मी तुम्हांस सांगतो, तुमच्यासाठी तुमच्या ऐहिक संपत्तीने मित्र मिळवा. यासाठी की, जेव्हा ते संपेल तेव्हा ते तुमचे अनंतकाळच्या घरात स्वागत करतील. 10 ज्या कोणावर थोडा विश्वास ठेवणे शक्य आहे त्याच्यावर जास्त विश्वास ठेवला जाण्याची शक्यता आहे. व जो कोणी थोडक्याविषयी अविश्वासू आहे तो अधिकाविषयीसुद्धा अविश्वासू आहे. 11 “म्हणून जर तुम्ही ऐहिक संपत्तीविषयी विश्वासू नाही, तर मग खऱ्या संपत्तीविषयी तुमच्यावर कोण विश्वास ठेवील? 12 जे दुसऱ्याचे आहे त्याविषयी तुम्ही विश्वासू नसाल तर जे तुमचे आहे ते तुम्हांस कोण देईल?
13 “कोणत्याही नोकराला दोन मालकांची सेवा करता येत नाही. एकाचा तो द्वेष करील व दुसऱ्यावर तो प्रेम करील किंवा एकाशी तो प्रामाणिक राहील व दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्ही एकाच वेळी देवाची व पैशाची सेवा करु शकणार नाही.”
देवाचे नियमशास्त्र बदलणे शक्य नाही(A)
14 मग जे परुशी धनलोभी होते, त्यांनी हे सर्व ऐकले व त्यांनी त्याचा उपहास केला. 15 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही स्वतःला लोकांसमोर नीतिमान म्हणून मिरवता दाखविता, पण देव तुमची अंतःकरणे ओळखतो. जे लोकांना महत्त्वाचे वाटते ते देवाच्या दृष्टीने टाकावू आहे.
16 “नियमशास्त्र व संदेष्टे योहानापर्यंत होते, तेव्हापासून देवाच्या राज्याची सुवार्ता गाजविली जात आहे. व प्रत्येक जण त्यात घुसण्याचा जोरदार प्रयत्न करीत आहे. 17 एकवेळ आकाश व पृथ्वी नाहीशी होणे शक्य होईल पण नियमशास्त्राचा एक काना मात्राही नाहीसा होणार नाही.
घटस्फोट आणि पुनर्विवाह
18 “जो कोणी आपल्या पत्नीस सूटपत्र देतो व दुसरीबरोबर लग्न करतो तो व्याभिचार करतो आणि जो कोणी एखाद्या स्त्रीशी- जिला तिच्या पतीने टाकलेले आहे तिच्याशी लग्न करतो तो व्यभिचार करतो.”
श्रीमंत मनुष्य व लाजार
19 “एक मनुष्य होता. तो श्रीमंत होता. तो जांभळी आणि तलम वस्त्रे घालीत असे. प्रत्येक दिवस तो ऐषारामात घालवीत असे. 20 त्याच्या फाटकाजवळ लाजार नावाचा एक गरीब मनुष्य पडून होता. त्याच्या अंगावर फोड भरलेले होते. 21 त्या श्रीमंत मनुष्याच्या टेबलावरुन खाली पडलेले असेल ते खाण्याची तो आतुरतेने वाट पाही. कुत्रीदेखील येऊन त्याचे फोड चाटीत असत.
22 “मग असे झाले की, तो गरीब मनुष्य मरण पावला, व देवदूतांनी त्याला अब्राहामाच्या उराशी नेऊन ठेवले. नंतर श्रीमंत मनुष्यही मरण पावला व त्याला पुरले गेले. 23 आणि अधोलोकात. जेथे तो (श्रीमंत मनुष्य) यातना भोगीत होता, तेथून त्याने वर पाहीले, व दूरवर असलेल्या अब्राहामाला पाहिले आणि लाजाराला त्याच्या शेजारी पाहिले, 24 तो मोठ्याने ओरडला, ‘पित्या अब्राहामा, माझ्यावर दया कर आणि लाजाराला पाठव यासाठी की तो बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करील, कारण या अग्नीत मी भयंकर वेदना सहन करीत आहे.!’
25 “परंतु अब्राहाम म्हणाला, ‘माझ्या मुला, लक्षात ठेव की तुझ्या जीवनात जशा तुला चांगल्या गोष्टी मिळाल्या, तशा लाजाराला वाईट गोष्टी मिळाल्या. पण आता येथे तो समाधानात आहे व तू दू:खात आहेस. 26 आणि या सगळ्याशिवाय, तुमच्या व आमच्यामध्ये एक मोठी दरी ठेवलेली आहे, यासाठी की, येथून तुमच्याकडे ज्यांना जायचे आहे त्यांना जाता येऊ नये व तुमच्याकडून कोणालाही आमच्याकडे येता येऊ नये.’
27 “तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, ‘मग तुला मी विनंति करतो की पित्या, लाजाराला माझ्या पित्याच्या घरी पाठव, 28 कारण मला पाच भाऊ आहेत. त्याला त्यांना तरी सावध करु दे. म्हणजे ते तरी या यातनेच्या ठिकाणी येणार नाहीत.’
29 “पण अब्राहाम म्हणाला, ‘त्यांच्याजवळ मोशे आणि संदेष्टये आहेत, त्यांचे त्यांनी ऐकावे.’
30 “तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, ‘नाही, पित्या अब्राहामा, मेलेल्यातील कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चात्ताप करतील.’
31 “अब्राहाम त्याला म्हणाला, ‘जर ते मोशेचे आणि संदेष्टयांचे ऐकत नाहीत तर मेलेल्यांतून जर कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही.’”
31 “रस्त्यातल्या मुलीकडे अभिलाषेने
न बघण्याचा करार मी माझ्या डोळ्यांशी केला आहे.
2 तो सर्वशाक्तिमान देव लोकांना काय करतो?
तो त्याच्या स्वर्गातील घरातून लोकांची परतफेड कशी करतो?
3 देव दुष्टासाठी संकटे आणि विनाश पाठवतो.
आणि जे चुका करतात त्यांच्यासाठी अरिष्टे पाठवतो.
4 मी जे काही करतो ते देवाला दिसते.
माझी प्रत्येक हालचाल तो बघतो.
5 “मी खोटे बोललो नाही
व लोकांना फसविण्याचा प्रयत्न केलेला नाही.
6 जर देव योग्य तागडी वापरेल
तर त्याला समजेल की मी निरपराध आहे.
7 मी जर योग्य मार्गापासून दूर गेलो असेन
आणि माझ्या डोळ्यांनी जर माझ्या मनाला वाईटाकडे वळवले असेल
किंवा माझे हात पापांनी बरबटलेले असतील.
8 तर इतरांना मी पेरलेले धान्य खाऊ दे.
आणि माझे पीक उपटून घेऊ दे.
9 “माझ्या मनात स्त्रियांबद्दल लंपट भावना उत्पन्न झाली असेल
किंवा शेजाऱ्याच्या बायको बरोबर व्यभिचार करण्यासाठी त्याच्या घराचे दार उघडण्याची मी वाट पहात असेन.
10 तर माझ्या बायकोला दुसऱ्याचे अन्न शिजवू दे
आणि दुसऱ्यांना तिची शय्यासोबत करु दे.
11 का? कारण लैंगिक पाप लज्जास्पद आहे.
या पापाला शिक्षा झालीच पाहिजे.
12 लैंगिक पाप माझ्या सर्वस्वाचा नाश करील.
सर्वस्वाचा होम करणारी ती आग आहे.
13 “माझे गुलाम माझ्या विरुध्द तक्रार करतात
तेव्हा मी न्यायाने वागण्याचे मान्य केले नाही,
14 तर मी जेव्हा देवासमोर जाईन तेव्हा मी काय करु?
देवाने माझ्या वागण्याचा जाब विचारला तर मी काय उत्तर देऊ?
15 देवाने मला माझ्या आईच्या शरीरात निर्माण केले आणि त्यानेच माझ्या गुलामांनाही घडवले.
देवाने आपल्या सर्वांचीच आईच्या पोटात निर्मिती केली आहे.
16 “मी गरीबांना मदत करणे कधीच अमान्य केले नाही.
मी विधवांना नेहमीच त्यांना ज्याची गरज असते ते दिले.
17 मी माझ्या अन्नाविषयी कधीच स्वार्थी नव्हतो.
मी पोरक्यांना नेहमी अन्न दिले आहे.
18 मी जन्मभर पोरक्यांचा बाप बनलो.
मी विधवांची काळजी वाहिली.
19 जेव्हा जेव्हा मला कपडे नाहीत म्हणून दु:खी होणारे लोक दिसले
किंवा कोट नसलेले गरीब लोक दिसले.
20 त्यांना मी नेहमी कपडे दिले.
मी माझ्या मेंढ्यांची लोकर त्यांना उबदार ठेवण्यासाठी वापरली
आणि त्यांनी अंतःकरणापासून मला आशीर्वाद दिले.
21 माझ्या दाराजवळ एखादा पोरका मुलगा मदतीसाठी आलेला मला दिसला
तर मी त्याच्यावर कधीही हात उगारला नाही. [a]
22 मी जर कधी असे केले तर माझा हात माझ्या खांद्यांपासून निखळून पडो मी जर कधी असे केले
तर माझा हात माझ्या खांद्याच्या सांध्यातून तुटून पडो.
23 परंतु यापैकी कुठलीही वाईट गोष्ट मी केली नाही.
मला देवाच्या शिक्षेची भीती वाटते.
परमेश्वराच्या महतीला मी [b] घाबरतो.
24 “मला माझ्या श्रीमंतीचा कधीच भरंवसा वाटला नाही.
देव मला मदत करेल याचा मला नेहमीच विश्वास वाटला.
‘तू माझी आशा आहेस असे’ मी शुध्द सोन्याला कधीच म्हटले नाही.
25 मी श्रीमंत होतो पण मला त्याचा अभिमान नव्हता.
मी खूप पैसे कमावले पण मी सुखी झालो नाही.
26 मी चकाकत्या सूर्यांची सुंदर चंद्राची कधीच पूजा केली नाही.
27 सूर्य, चंद्राची पूजा करण्याइतका मूर्ख मी कधीच नव्हतो.
28 ते सुध्दा शिक्षा करण्यासारखेच पाप आहे.
मी जर त्या गोष्टींची पूजा केली असती तर सर्वशक्तिमान देवाचा विश्वासघात केल्यासारखे झाले असते.
29 “माझ्या शत्रूंचा पाडाव झाल्याचा
मला कधीच आनंद वाटला नाही.
माझ्या शत्रूंवर संकट कोसळल्यामुळे
मी त्यांना कधी हसलो नाही.
30 माझ्या शत्रूंना शाप देऊन आणि त्यांच्या मरणाची इच्छा करुन
मी माझ्या तोंडाला कधी पाप करायला लावले नाही.
31 मी अपरिचितांना अन्न देतो हे
माझ्या घरातील सर्वाना माहीत आहे.
32 परदेशी लोकांना रात्रीच्या वेळी रस्त्यावर झोपायला लागू नये
म्हणून मी त्यांना माझ्या घरी बोलावतो.
33 इतर लोक त्यांचे पाप लपवायचा प्रयत्न करतात
परंतु मी माझा अपराध लपवायचा कधीच प्रयत्न केला नाही.
34 लोक काय म्हणतील याची भीती मी कधीच बाळगली नाही.
मी भीतीपोटी कधीच गप्प बसलो नाही.
भीतीमुळे मी बाहेर पडायला कचरलो नाही.
मला लोकांच्या तिरस्काराची भीती वाटत नाही.
35 “माझे कुणीतरी ऐकावे असे मला वाटते.
मला माझी बाजू मांडू द्या.
सर्वशक्तिमान देवाने मला उत्तर द्यावे अशी माझी इच्छा आहे.
त्याच्या दृष्टीने मी काय चूक केली ती त्याने लिहून काढावी असे मला वाटते.
36 नंतर मी ती खूण माझ्या गळ्याभोवती घालेन.
मी ती राजमुकुटाप्रमाणे माझ्या मस्तकावर ठेवेन.
37 देवाने जर असे केले तर मी जे काही केले त्याचे स्पष्टीकरण देऊ शकेन.
एखाद्या पुढाऱ्याप्रमाणे माझे मस्तक उंच करुन मी देवाकडे येऊ शकेन.
38 “मी दुसऱ्याकडून त्याची जमीन हिसकावून घेतली नाही.
माझी जमीन चोरुन घेतली आहे असा आरोप माझ्यावर कुणीही करु शकणार नाही.
39 मी शेतकऱ्यांना माझ्या शेतातून मिळणाऱ्या धान्याबद्दल नेहमी मोबदला दिला आहे.
आणि जे जमिनीचे मालक आहेत त्यांच्याकडून जमीन घेण्याचा प्रयत्न मी कधीही केला नाही.
40 मी यापैकी कुठलीही वाईट गोष्ट केली असेल तर माझ्या शेतात गहू
आणि सातू या ऐवजी काटे आणि गवत उगवू दे!”
ईयोबाचे शब्द इथे संपले.
1 देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रषित झालेला पौल याजकडून, तसेच आपला बंधु तीमथ्य याजकडून, देवाची करिंथ येथील मंडळी आणि अखयातील संपूर्ण प्रदेशातील देवाच्या लोकांना 2 देव आपला पिता आणि प्रभु येशू ख्रिस्त याजकडून कृपा व शांति असो.
पौल देवाचे उपकार मानतो
3 आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता, करुणायुक्त देवपिता. तो सांत्वन करणारा देव आहे. 4 तो आमच्या सर्व कठीण काळात आमचे सांत्वन करतो; यासाठी की, आम्ही इतर लोकांचे त्यांच्या अडचणीत सांत्वन करु शकू. देव जे सांत्वन आम्हाला देतो त्याच सांत्वनाने आम्ही इतरांचे सांत्वन करु शकतो. 5 आणि ख्रिस्ताच्या पुष्कळ दु:खामध्ये सहभागी होतो, त्याच प्रकारे ख्रिस्ताद्वारे आम्हांला पुष्कळ सांत्वन मिळते 6 जर आमच्यावर संकटे येतात तर ती संकटे तुमच्या सांत्वनासाठी आणि तारणासाठी आहेत, जर आमच्याकडे सांत्वन आहे तर ते तुमच्या सांत्वनासाठी आहे. यामुळे आम्हाला जे दु:ख आहे तशाच प्रकारचे दु:ख सहन करायला, धीराने सहन करायला मदत होते. 7 आमची तुमच्याविषयीची आशा बळकट आहे. कारण आम्हांला ठाऊक आहे की, जसे तुम्ही दु:खाचे भागीदार आहात तसे सांत्वनाचेही भागीदार आहात.
8 बंधूंनो, आशिया प्रांतात जो त्रास आम्ही सहन केला त्याविषयी तुम्ही अंधारात असावे अशी आमची इच्छा नाही. आम्हांला तेथे मोठे ओझे होते. आमच्या शक्तिपलीकडचे ते ओझे होते. आम्ही जीवनाविषयीची आशासुद्धा सोडून दिली होती. 9 खरोखर आम्हांला वाटत होते की, आम्ही मरु, पण आम्ही आपल्या स्वतःवर भरंवसा ठेवू नये, यासाठी हे घडले. हे यासाठी घडले की, जो मनुष्यांना मरणातून उठवितो त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा. 10 देवाने आम्हांला मरणाच्या मोठ्या संकटातून वाचविले. आणि देव आम्हांला पुढेदेखील वाचवील. आम्ही त्याच्यावर आमची आशा ठेवली आहे. यासाठी की, तो यापुढे ही आम्हांस सोडवील. 11 तुम्ही प्रार्थना करण्याने आम्हांला मदत करावी. मग पुष्कळ लोक आमच्यासाठी उपकार मानतील की त्यांच्या पुष्कळ प्रार्थनांमुळे देवाने आम्हाला आशीर्वादित केले आहे.
पौलाच्या योजनेत बदल
12 कारण आम्हाला अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सद्सद्विवेकबुद्धीची साक्ष होय. ती अशी की आम्ही मानवी ज्ञानाने नव्हे तर देवाच्या कृपेने, देवाच्या पवित्रतेने व प्रामणिकपणे जगात व विशेषकरुन तुमच्याजवळ वागलो. 13 कारण ज्या गोष्टी तुम्ही वाचता किंवा मान्य करता, त्याशिवाय दुसऱ्या गोष्टी आम्ही तुम्हांस लिहित नाही. आणि शेवटपर्यंत तुम्ही नीट जाणून घ्याल अशी आशा धरतो. 14 आणि त्याप्रमाणे तुम्ही आम्हांस काही अंशी जाणता की प्रभु येशूच्या दिवशी जसे आम्ही तुमच्याविषयी अभिमान बाळगतो तसे तुम्हीही आमच्याविषयी अभिमान बाळगता.
15 मला याविषयीची खात्री असल्याने तुम्हांला पहिल्याने भेटण्याची योजना केली, यासाठी की तुम्हांला फायदा व्हावा. 16 मी मासेदोनियाला जाताना तुम्हांला भेटण्याची योजना केली आणि मासेदोनियाहून परत येताना तुमच्याकडे येण्याचे ठरविले आणि त्यानंतर तुम्ही मला यहूदीयाला जाण्यासाठी मदत करावी. 17 जेव्हा मी असा बेत केला, तेव्हा तो मी गंभीरपणे विचार न करता केला काय? किंवा मी माझ्या योजना जगाच्या रीतीप्रमाणे करतो काय, म्हणजे मी एकाच वेळेला “होय, होय” आणि “नाही, नाही” असे म्हणतो काय?
18 पण देव खात्रीने विश्वासपात्र आहे, म्हणून तुम्हांजवळ आम्ही तुम्हांला होय किंवा नाही म्हणून असे वचन दिलेले नाही, असे नाही. 19 कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त जो आम्हांकडून, म्हणजे मी, सिल्वान व तीमथ्य यांजकडून तुम्हांमध्ये गाजविला गेला, तो होय किंवा नाही असा झाला नाही, तर तो फक्त होकारार्थीच आहे. 20 कारण देवाची वचने कितीही असली तरी ती त्याच्यामध्ये होकारार्थी आहेत, यामुळे त्याच्याद्वारे आम्हांकडून देवाचे गौरव व्हावे म्हणून त्याच्याद्वारे विशेष आशीर्वाद आहे (आमेन). 21 आता जो तुम्हांसहित आम्हांस ख्रिस्तामध्ये स्थिर करतो व ज्याने आम्हांस अभिषेक केला तो देव आहे. 22 मालकीपणाचा शिक्का आमच्यावर मारला व जो येणार आहे त्याबद्दलची खात्री म्हणून आपला आत्मा आमच्या अंतरंगात ठेव म्हणून ठेवला.
23 मी देवाला साक्षी होण्यासाठी हाक मारुन आपल्या जिवाची शपथ घेऊन सांगतो की तुमच्याशी कठोर व्यवहार करु नये म्हणून मी करिंथला आलो नाही. 24 आम्ही तुमच्या विश्वासावर स्वामित्व करतो असे नाही, पण तुमच्या आनंदासाठी आम्ही तुमच्याबरोबर काम करतो. कारण विश्वासाने तुम्ही स्थिर राहता.
2006 by World Bible Translation Center