Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
निर्गम 12:22-51

22 मग एजोब झाडाच्या पानांच्या जुड्या घेऊन त्या पात्रातील कोकराच्या रक्तात बुचकाळाव्या आणि त्याचे रक्त दाराच्या दोन्ही बाजूंच्या चौकटींना व कपाळ पट्ट्यांवर लावावे. आणि सकाळपर्यंत कोणीही घराबाहेर जाऊ नये. 23 कारण त्यावेळी परमेश्वर मिसरमधील प्रथम जन्मलेल्यांना ठार मारण्यासाठी फिरणार आहे; तो जेव्हा घराच्या दारावरील कपाळ पट्टीवर व दाराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूला लावलेले रक्त पाहील तेव्हा तो त्या घराचे संरक्षण करील; नाश करणाऱ्याला तुमच्या घरात प्रवेश करु देणार नाही, व तुम्हाला काही अपाय होऊ देणार नाही. 24 तुम्ही या आज्ञेची आठवण ठेवली पाहिजे की तुम्ही व तुमचे वंशज यानी पाळावयासाठी हा नियम कायमचा नियम आहे. 25 परमेश्वर त्याच्या वचनानुसार जो देश तुम्हाला देणार आहे त्यात तुम्ही गेला तर तेथेही तुम्ही हा नियम पाळण्याची आठवण ठेवावी. 26 जेव्हा तुमची मुलेबाळे तुम्हाला विचारतील की ‘हा विधी आपण का करीत आहोत?’ 27 तेव्हा तुम्ही त्यांना सांगा, ‘हा परमेश्वराच्या वल्हांडणाचा यज्ञ आहे; कारण आम्ही जेव्हा मिसरमध्ये होतो तेव्हा या दिवशी परमेश्वराने मिसरच्या लोकांना मारले परंतु इस्राएल लोक राहात असलेली घरे ओलाडूंन तो पुढे गेला व त्या घरातील आम्हा सर्वाना त्याने वाचवले त्यानंतर इस्राएल लोकांनी परमेश्वरापुढे नतमस्तक होऊन त्याची उपासना केली.’”

28 परमेश्वाने मोशे व अहरोन यांना आज्ञा दिली होती म्हणून इस्राएल लोकांनी त्यांच्या सांगण्याप्रमाणे केले.

29 मध्यरात्री परमेश्वराने मिसरमधील सर्व प्रथम जन्मलेले मुलगे. म्हणजे मिसरदेशाचा राजा फारो याच्या थोरल्या मुलापासून तर तुरुंगात पडलेल्या कैद्याच्या थोरल्या मुलापर्यत सर्व मुलांना तसेच पशूंच्या प्रथम जन्मलेल्या सर्व नरांना मारून टाकले. 30 त्या रात्री अवघ्या मिसर देशातील अगदी प्रत्येक घरातून एक ना एकजण तरी मरण पावला. फारो राजा, त्याचे सेवक आणि मिसरचे लोक मोठमोठ्याने रडून शोक करु लागले.

इस्राएल लोक मिसर देश सोडून जातात

31 तेव्हा रात्रीच्या रात्रीच फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले, फारो त्यांना म्हणाला, “आता उठा आणि आमचे लोक सोडून निघा, तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही व तुमचे लोक निघून जा आणि तुमच्या परमेश्वराची उपासना करा. 32 आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे तुमची शेरमेंढरे, व गुरेढोरे ही तुमच्या बरोबर घेऊन जा. येथून निघा! आणि जाताना मलाही आशीर्वाद द्या!” 33 मिसरच्या लोकांनी सुद्धा इस्राएल लोकांना घाईकरून लवकर निघून जाण्यास सांगितले; कारण ते म्हणाले, “तुम्ही जर येथून निघून जाणार नाही तर आम्ही सर्वजण मरून जाऊ!”

34 इस्राएल लोकांना आपल्या भाकरीच्या पिठात खमीर घालण्यास बिलकुल वेळ मिळाला नाही म्हणून त्यांनी मळलेल्या पिठाच्या काथवटी कापडात गुंडाळल्या आणि त्या आपल्या खांद्यावर टाकून ते घेऊन गेले. 35 इस्राएल लोकांनी मोशेने त्यांना सांगितल्याप्रमाणे आपल्या मिसरच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे जाऊन भारी भारी कपडे. सोन्याचांदीचे दागदागिने मागून घेतले होते. 36 मिसरच्या लोकांनी इस्राएल लोकांना त्या त्या वस्तू दयाव्यात म्हणून त्यांच्या मनात परमेश्वराने इस्राएल लोकांविषयी दया निर्माण केली आणि म्हणून मिसरच्या लोकांनी इस्राएल लोकांना मौल्यवान वस्तू दिल्या.

37 तेव्हा इस्राएल लोक मिसरमधून निघून रामसेस येथून प्रवास करीत सुक्कोथ येथे गेले. मुलेबाळे सोडून ते सर्वजण मिळून सुमारे सहा लाख होते. 38 त्यांच्या सोबत पुष्कळ शेरडेमेंढरे व गुरेढोरे होती. अनेक प्रकारचे लोक त्यांच्याबरोबर प्रवास करीत होते, ते इस्राएली नव्हते परंतु त्यांनी त्याच्या बरोबर मिसर देश सोडला. 39 इस्राएल लोकांस आपल्या भाकरीच्या पिठात खमीर घालण्यास अजिबात वेळ मिळाला नाही. तसेच आपल्याबरोबर प्रवासाकरिता खावयास काही विशेष जेवण करता आले नाही; म्हणून त्यांना बेखमीर भाकरीच भाजाव्या लागल्या.

40 इस्राएली लोक मिसरमध्ये चारशेतीस वर्षे राहिले होते. 41 मग चारशे तीसव्या वर्षातील अगदी शेवटच्या दिवसापर्यंत राहिल्यानंतर परमेश्वराच्या सर्व सेना म्हणजे सर्व इस्राएल लोक मिसर देशातून निघाले. 42 म्हणून ज्या रात्री त्यांनी मिसरदेश सोडला त्या रात्री परमेश्वराने त्यांच्या करिता काय केले त्याविषयी त्या विशेष रात्रीची त्यांना आठवण राहील. सर्व इस्राएल लोकांनी त्या रात्रीची आठवण अगदी पिढ्यान् पिढ्या ठेवावी.

43 परमेश्वराने मोशे व अहरोन यांना सांगितले, “वल्हांडण सण पाळण्याविषयीचे नियम असे आहेत. कोणाही परदेशी माणसाने वल्हांडणाचे भोजन खाऊ नये. 44 परंतु जर कोणी एखादा गुलाम विकत घेतला असेल आणि त्याची सुंता त्याने करवून घेतली असेल तर मग त्या गुलामाने वल्हांडणाचे भोजन खावे; 45 परंतु केवळ तुमच्या देशात राहणारा उपरा माणूस किंवा मोलकरी ह्यापैकी कोणीही ते खाऊ नये. (कारण वल्हांडण सण फक्त इस्राएल लोकांसाठीच आहे.)

46 “प्रत्येक इस्राएली कुटुंबाने आपले वल्हांडण सणाचे भोजन एकाच घरात खाल्ले पाहिजे; ते भोजन घराबाहेर नेऊ नये. यज्ञपशूचे कोणतेही हाड मोडू नये. 47 सर्व इस्राएल लोकांनी हा सण पाळलाच पाहिजे. 48 इस्राएली नसलेला कोणी एक जण तुम्हांबरोबर राहात असेल व जर त्याला परमेश्वराच्या वल्हांडण सणाच्या भोजनात सहभागी होण्याची इच्छा असेल तर त्याने सुंता करून घेतलीच पाहिजे. म्हणजे मग तो इस्राएल लोकांसारखा रहिवासी होईल. मग त्याने वल्हांडण सणाच्या भोजनात सहभागी व्हावे; परंतु त्याने सुंताकरून घेतली नाही तर त्याला वल्हांडण सणाच्या भोजनात सहभागी होता येणार नाही. 49 हे नियम सर्वासाठी सारखेच आहेत, मग तो इस्राएली असो किंवा तुमच्या देशात राहणारा इस्राएली नसलेला कोणी परदेशी असो. प्रत्येकासाठी सारखेच नियम आहेत.”

50 तेव्हा परमेश्वराने मोशे व अहरोन यांना ज्या आज्ञा दिल्या त्या सर्व इस्राएली लोकांनी पाळल्या. 51 अशा रीतीने त्याच दिवशी परमेश्वराने सर्व इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर नेले व ते गटगटांनी गेले.

लूक 15

स्वर्गातील आनंद(A)

15 सर्व पापी लोक त्याचे ऐकायला त्याच्याकडे येत होते. तेव्हा परुशी व नियमशास्त्राचे शिक्षक कुरकुर करु लागले. ते म्हणू लागले, “हा पाप्यांचे स्वागत करतो आणि त्यांच्याबरोबर जेवतो!”

मग येशूने त्यांना ही गोष्टी सांगितली. “जर तुमच्यापैकी कोणा एकाजवळ शंभर मेंढरे असून त्यातील एक हरवले, तर तो नव्याण्णव रानांत सोडून हरवलेल्या मेंढरामागे ते सापडेपर्यंत जाणार नाही काय? आणि जेव्हा त्याला ते सापडते तेव्हा तो आनंदाने ते खांद्यांवर घेतो. आणि घरी येतो, तेव्हा मित्रांना आणि शेजाऱ्याना एकत्र करुन म्हणतो, ‘माझ्याबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले मेंढरु सापडले आहे.’ मी तुम्हांस सांगतो, त्याचप्रमाणे ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांपेक्षा पश्चात्ताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल.

“समजा एका बाईजवळ चांदीची दहा नाणी आहेत. जर तिचे एक नाणे हरवले तर ती दिवा लावून घर झाडून ते मिळेपर्यंत काळजीपूर्वक शोधणार नाही काय? आणि जेव्हा तिला ते नाणे सापडते तेव्हा ती मैत्रिणींना आणि शेजाऱ्याना बोलाविते आणि म्हणते, ‘माझ्याबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले नाणे सापडले आहे.’ 10 त्याचप्रमाणे पश्चात्ताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल देवाच्या दूतासमोर आनंद होतो हे मी तुम्हांस सांगतो.”

घर सोडून गेलेला मुलगा

11 मग येशू म्हणाला, “एका मनुष्याला दोन मुलगे होते. 12 त्यापैकी धाकटा म्हणाला, ‘बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या.’ आणि वडिलांनी आपली संपत्ती दोघा मुलांमध्ये विभागली.

13 “नंतर फार दिवस झाले नाहीत तोच धाकट्या मुलाने आपले सर्व गोळा केले आणि तो दूरदेशी निघून गेला. तेथे त्याने सर्व संपत्ती चैनीचे जीवन जगून उधळून टाकली. 14 त्याने सर्व पैसे खर्च केल्यावर, त्या देशांत भयंकर दुष्काळ पडला व त्याला गरज भासू लागली. 15 मग तो गेला आणि त्या देशातील एका नागरिकाजवळ नोकरी करु लागला. त्या नागरिकाने त्याला डुकरे चारावयास पाठविले. 16 तेव्हा डुकरे खातात त्या शेंगा तरी खाव्यात अशी त्याला इच्छा होई, पण कोणी त्याला काहीही दिले नाही.

17 “नंतर तो शुद्धीवर आला आणि म्हणाला, ‘माझ्या पित्याच्या घरी किती तरी मजुरांना पुरुन उरेल इतके अन्न आहे आणि येथे मी भुकेने मरतो आहे! 18 मी उठून आपल्या वडिलांकडे जाईन आणि त्यांना म्हणेन, बाबा, मी स्वार्गाविरुद्ध (देवाविरुद्ध) आणि तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. 19 तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही. मला आपल्या रोजंदारीवरील मजुरांसारखे ठेवा.’ 20 मग तो उठला आणि आपल्या पित्याकडे गेला.

मुलगा परततो

“तो दूर असतानाच पित्याने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला. वडील पळत गेले आणि त्याच्या गळ्यात पडले आणि त्याचे मुके घेतले. 21 मुलगा त्यांना म्हणाला, ‘बाबा, मी स्वार्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही.’

22 “परंतु वडील आपल्या नोकरांस म्हणाले, ‘त्वरा करा, चांगला झगा आणून त्याला घाला. त्याच्या हातात अंगठी आणि पायात जोडे घाला. 23 आणि पुष्ट वासरु आणून कापा, आपण खाऊ आणि आनंद करु! 24 कारण हा माझा मुलगा मेला होता पण जिवंत झाला आहे! तो हरवला होता, पण आता सापडला आहे.’ व ते आनंद करु लागले.

मोठा मुलगा येतो

25 “त्याचा मोठा मुलगा शेतात होता. तो घराकडे निघाला. जेव्हा तो घराजवळ आला, तेव्हा त्याने गायनवादन व नाचण्याचा आवाज ऐकला. 26 त्याने एका नोकराला बोलावून विचारले, ‘हे सर्व काय चालले आहे?’ 27 तो नोकर त्याला म्हणाला. ‘तुमचा भाऊ आला आहे. तो सुखरुप आला म्हणून तुमच्या वडिलांनी पुष्ट वासरु कापले आहे.’

28 “मोठा मुलगा रागावला त्याला आत जाण्याची इच्छा होईना. तेव्हा वडिलांनी येऊन त्याची समजूत काढली. 29 परंतु त्याने वडिलांना उत्तर दिले, ‘पाहा, इतकी वर्षे मी तुमचीसेवा केली आहे व कधीही तुमची आज्ञा मोडली नाही! मित्रांबरोबर आनंद करण्यासाठी तुम्ही मला कधी बकरीसुद्धा दिली नाही. 30 ज्याने तुमची सर्व संपत्ती वेश्यांसाठी उधळली तो तुमचा मुलगा परत आला तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरु कापले!’

31 “वडील त्याला म्हणाले, ‘माझ्या मुला, तू नेहमीच माझ्याबरोबर आहेस आणि जे माझे आहे ते सर्व तुझे आहे. 32 आपण आनंद आणि उत्सव केला पाहिजे कारण हा तुझा भाऊ मेला होता तो जिवंत झाला आहे. तो हरवला होता, तो सापडला आहे.’”

ईयोब 30

30 “परंतु आता माझ्यापेक्षा लहान माणसे देखील माझी थट्टा करत आहेत.
    आणि त्याचे पूर्वज इतके कवडी मोलाचे होते की मी त्यांना माझ्या मेंढ्यांची राखण करणाऱ्या कुत्र्यांमध्ये देखील ठेवले नसते.
त्या तरुणांचे वडील मला मदत करण्याच्या दृष्टीने अगदीच कुचकामाचे आहेत.
    ते म्हातारे झाले आहेत आणि दमले आहेत.
    आता त्यांचे स्नायू टणक आणि जोमदार राहिलेले नाहीत.
ते मृतप्राय झाले आहेत.
    खायला नसल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे व म्हणून ते वाळवटांतील धूळ खात आहेत.
ते वाळवटांतील क्षार-झुडपे उपटून घेतात.
    रतम नावाच्या झाडाची मुळे खातात.
त्यांना दुसऱ्या माणसांपासून दूर ठेवण्यात येते.
    ते चोर दरोडेखोर असल्याप्रमाणे लोक त्यांच्यावर ओरडत असतात.
त्यांना नदीच्या कोरड्या पात्रात, डोंगराळ भागातील गुहेत
    किंवा जमिनीतील विवरात राहावे लागते.
ते झाडाझुडपात आक्रोश करतात.
    काटेरी झुडपात एकमेकांच्या आश्रयाने राहातात.
ते काडी इतकेही मोल नसलेले लोक आहेत.
    काहीही नाव नसलेल्या या लोकांना त्यांच्या देशातून हाकलून दिले आहे.

“अशा लोकांची मुले माझी चेष्टा करणारी गाणी गातात.
    त्यांच्या दृष्टीने माझे नाव म्हणजे एक शिवी आहे.
10 ते तरुण माझा तिरस्कार करतात ते माझ्यापासून लांब उभे राहातात.
    ते माझ्यापेक्षा उच्च आहेत असे त्यांना वाटते.
    ते माझ्या तोंडावर थुंकतात सुध्दा.
11 देवाने माझ्या धनुष्याची प्रत्यंचा काढून घेतली आणि मला दुबळा बनवले.
    ती तरुण माणसे स्वतःला न थोपविता रागाने माझ्याविरुध्द वागतात.
12 ते माझ्या उजव्या भागावर वार करतात.
    ते माझ्या पायावर वकरुन पाडतात.
एखाद्या शहरावर सैन्याने चालून जावे तसे मला वाटते.
    माझ्यावर हल्ला करुन माझा नाश करण्यासाठी माझ्या तटबंदीला मातीचे चढाव बांधतात.
13 मी पळून जाऊ नये म्हणून ते रस्त्यावर पहारा देतात.
    माझा नाश करण्यात त्यांना यश मिळते.
    कुणाच्या मदतीची त्यांना गरज नसते.
14 ते भिंतीला भोक पाडतात.
    ते त्यातून आत घुसतात आणि माझ्यावर दरडी कोसळतात.
15 भीतीने माझा थरकाप झाला आहे.
    वाऱ्याने सगळे काही उडून जावे त्याप्रमाणे त्यांनी माझी प्रतिष्ठा उडवून लावली आहे.
    माझी सुरक्षितता ढगांप्रमाणे नाहीशी झाली आहे.

16 “माझे आयुष्य आता गेल्यातच जमा आहे आणि मी लवकरच मरणार आहे.
    दु:खानी भरलेल्या दिवसांनी मला वेढून टाकले आहे.
17 माझी सगळी हाडे रात्री दुखतात.
    वेदना मला कुरतडणे थांबवत नाहीत.
18 देवाने माझ्या कोटाची कॉलर खेचून
    माझे कपडे आकारहीन केले आहेत.
19 देवाने मला चिखलात फेकून दिले
    आणि माझी राख व कचरा झाला.

20 “देवा मी मदतीसाठी तुझी याचना करतो
    पण तू उत्तर देत नाहीस.
मी उभा राहातो व तुझी प्रार्थना करतो
    पण तू माझ्याकडे लक्ष देत नाहीस.
21 देवा तू माझ्याशी फार नीचपणे वागतोस.
    तू तुझ्या बळाचा उपयोग मला दु:ख देण्यासाठी करतोस.
22 देवा तू सोसाट्याच्या वाऱ्याने मला उडवून लावतोस.
    देवा तू मला वादळात फेकून देतोस.
23 तू मला माझ्या मृत्यूकडे नेत आहेस हे मला माहीत आहे.
    प्रत्येक जिवंत माणसाला मरावे हे लागतेच.

24 “परंतु जो आधीच दु:खाने पोळला आहे आणि मदतीची याचना करीत आहे
    त्याला कुणी अधिक दु:ख देणार नाही.
25 देवा, मी संकटात सापडलेल्यांसाठी मदतीची याचना केली होती हे तुला माहीत आहे.
    गरीबांसाठी माझे हृदय तीळ तीळ तुटत होते हे ही तुला माहीत आहे.
26 परंतु मी जेव्हा चांगल्याची अपेक्षा करीत होतो तेव्हा माझ्या वाट्याला वाईट गोष्टी आल्या.
    मला उजेड हवा होता तेव्हा अंधार मिळाला.
27 मी आतून अगदी मोडून गेलो आहे.
    माझ्या वेदना कधीच थांबत नाहीत आणि वेदना आणखी येणारच आहेत.
28 मी सदैव दु:खी असतो, पण मला स्वास्थ्य लाभत नाही.
    मी लोकांच्यात उभा राहून मदतीसाठी ओरडतो.
29     रानटी कुत्र्यांसारखा व वाळवंटातील शहामृगासारखा मी एकटा आहे.
30 माझी कातडी काळी पडली आहे
    आणि शरीर तापाने फणफणले आहे.
31 माझे वाद्य दु:खी गाणे गाण्यासाठीच लावले गेले आहे.
    माझ्या बासरीतून रडण्याचेच सूर उमटत आहेत.

1 करिंथकरांस 16

इतर विश्वासणाऱ्यांसाठी वर्गणी

16 आता, देवाच्या लोकांकरीता वर्गणी गोळा करण्यविषयी, जसे मी गलतीयातील मंडळ्यांना आज्ञा केली त्याप्रमाणे तुम्हीही तसे करावे. प्रत्येक रविवारी तुम्हांतील प्रत्येकाने आपल्या घरी, जो काही त्याला नफा मिळाला असेल त्यातून काढून ठेवावे आणि बचत करावी. मी येईन तेव्हा ज्या माणसांना तुम्ही मान्यता द्याल त्यांना मी ओळखपत्रे देऊन तुमच्या देणग्या यरुशलेमला नेण्यासाठी पाठवीन. आणि जर माझेसुद्धा जाणे योग्य असेल तर ते माझ्याबरोबर येतील.

पौलाच्या योजना

मी मासेदोनियातून जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन कारण मासेदोनियातून जाण्याची माझी योजना आहे. परंतु कदाचित शक्यतो मी तुमच्याबरोबर काही काळ घालवीन किंवा हिवाळासुद्धा तुमच्यात घालवीन. यासाठी की मी जिकडे जाणार आहे तिकडे तुम्ही मला पाठवावे. जाता जाता तुम्हांला भेटण्याची माझी इच्छा नाही. कारण जर देवाची इच्छा असेल तर तुमच्यासमवेत काही काळ घालवावा अशी इच्छा मी धरतो. पन्नासाव्या दिवसाच्या सणापर्यंत मी इफिसात राहीन कारण माझ्यासाठी मोठे आणि परिणामकारक दार उघडले आहे. आणि असे अनेक आहेत जे मला विरोध करतात.

10 जर तीमथ्य आला तर तो तुमच्याजवळ निर्भयपणे कसा राहील याकडे लक्ष द्या. कारण तोही माझ्यासारखेच प्रभूचे कार्य करीत आहे. 11 यास्तव कोणीही त्याला तुच्छ मानू नये. तर मग त्याने माझ्याकडे यावे म्हणून त्याला शांतीने पाठवा. कारण इतर बंधूंबरोबर त्याच्या येण्याची मी वाट पाहत आहे.

12 आता आपला बंधु अपुल्लोविषयी, इतर बंधूंबरोबर त्याने तुमच्याकडे यावे म्हणून मी त्याला भरपूर उत्तेजन दिले. परंतु आताच त्याने तुमच्याकडे यावे अशी देवाची इच्छा नव्हती. त्याला संधी मिळाल्यावर तो येईल.

पौल आपले पत्र संपवितो

13 सावध असा, तुमच्या विश्वासात बळकट राहा. 14 धैर्यशील व्हा. सशक्त व्हा. प्रत्येक गोष्ट जी तुम्ही कराल ती प्रीतीत करा.

15 बंधूंनो, मी तुम्हांला बोध करतो तुम्हांला स्तेफनच्या घराची माहिती आहे आणि जाणीवही आहे की ते अखयाचे प्रथम फळ आहे. त्यांनी स्वतः संतांची सेवा करण्याचे ठरविले आहे. 16 प्रत्येक जण जो या कार्यात सामील होतो व प्रभुसाठी श्रम करतो अशा लोकांच्या तुम्हीसुद्धा अधीन व्हा.

17 स्तेफन, फर्तुतात आणि अखायिक हे आल्याने मला आनंद झाला. कारण तुम्ही माझ्यासाठी जे केले ते तुम्ही करु शकला नसता. 18 कारण त्यांनी माझा व तुमचा आत्मा प्रफुल्लीत केला आहे. अशा लोकांना मान्यता द्या.

19 आशियातील मंडळ्या तुम्हांला सलाम सांगतात. अक्विला, प्रिस्कील्ला व जी मंडळी त्यांच्या घरात जमते, ती प्रभूमध्ये तुम्हांला फार सलाम सांगतात, 20 सर्व बंधु तुम्हांला सलाम सांगतात, पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा.

21 मी, पौल स्वतः माझ्या स्वतःच्या हाताने हा सलाम लिहीत आहे.

22 जर कोणी प्रभूवर प्रीति करीत नाही, तर तो शापित होवो.

“मारानाथा; हे प्रभु ये”

23 प्रभु येशूची कृपा तुम्हांबरोबर असो!

24 ख्रिस्त येशूमध्ये माझी प्रीति तुम्हां सर्वांबरोबर असो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center