M’Cheyne Bible Reading Plan
प्रथम जन्मलेल्यांचे मरण
11 मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “मी फारोवर व मिसर देशावर आणखी एक पीडा आणणार आहे. ह्या पीडेनंतर मात्र फारो तुम्हाला मिसरमधून जाऊ देईल; खरे म्हणजे तो तुम्हाला मिसर देशातून बाहेर घालवून देईल. 2 तू माझा हा निरोप इस्राएल लोकांना सांग, ‘तुम्ही पुरुष व स्त्रिया यांनी आपल्या मिसरच्या रहिवासी शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून सोन्याचांदीच्या वस्तू मागून घ्याव्यात. 3 मिसरच्या लोकांनी तुम्हाशी दयाळूपणे वागावे व तुम्हाला त्या वस्तू द्याव्यात अशी परमेश्वर त्यांची मने वळवील. मिसरचे सर्व लोक आणि फारोचे सेवक देखील मोशे महान माणूस असल्याचे अगोदर पासून मानीत होते.’”
4 मोशे लोकांना म्हणाला, “परमेश्वर म्हणतो ‘आज रात्री मी मिसर देशातून फिरेन 5 आणि मिसरमधील प्रत्येक प्रथम जन्मलेला मुलगा मरण पावेल. (मिसर देशाचा राजा) फारो याचा प्रथम जन्मलेला मुलगा याच्यापासून तर दळण दळणाऱ्या दासीच्या प्रथम जन्मलेल्या मुलापर्यंत सर्व मुलगे मरण पावतील. प्रथम जन्मलेले पशू देखील मरतील. 6 मिसर देशभर पूर्वी कधीही झाला नव्हता एवढा आणि भविष्यात कधीही होणार नाही एवढा धायमोकलून रडण्याचा आक्रोश होईल. 7 परंतु इस्राएल लोकांना किवा त्यांच्या जनावरांना काहीच अपाय होणार नाही. कुत्रा देखील त्यांच्यावर भुंकणार नाही यावरून मी इस्राएली लोकात व मिसरच्या लोकात कसा भेद ठेवलेला आहे हे तुम्हास कळून येईल. 8 मग हे सर्व तुमचे दास (म्हणजे मिसरचे लोक) माझ्या पाया पडून माझी उपासना करतील. ते म्हणतील, “तुम्ही तुमच्या सर्व लोकांसह व परिवारासह येथून निघून जा.” मग (मी) त्यानंतर रागाने संतप्त होऊन मोशे फारोला सोडून निघून गेला.’”
9 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “फारोने तुझे ऐकले नाही. का? ते तुला माहीत आहे का? कारण की मी त्याला मिसरमध्ये माझे महान सामर्थ्य दाखवावे.” 10 आणि म्हणूनच मोशे व अहरोन यांनी फारोपुढे अद्भुत चिन्हें केली; आणि म्हणूनच परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने मिसरमधून इस्राएल लोकांना जाऊ दिले नाही.
वल्हांडण
12 मोशे व अहरोन अद्याप मिसरमध्ये असताना परमेश्वर त्यांच्याशी बोलला. तो म्हणाला, 2 “हा तुमच्या वर्षाचा पहिला महिना असे. [a] 3 ही आज्ञा इस्राएलच्या सर्व जनसमूहासाठी आहे; ह्या महिन्याच्या दहाव्या दिवशी प्रत्येक माणसाने आपल्या कुटुंबातील माणसाकरिता एक कोकरा घ्यावा. 4 जर तो संपूर्ण कोकरा, घरातील माणसांना सरणार नसेल तर त्याने आपल्या भोजनात वाटेकरी होण्यासाठी आपल्या शेजाऱ्यापाजाऱ्यांना निमंत्रण द्यावे. 5 तो कोकरा, एक वर्षाचा नर असावा व तो पूर्णपणे निरोगी असावा तो कोकरा मेंढ्यातला किंवा बकऱ्यातला असावा. 6 ह्या पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसापर्यंत त्या मेढ्याची किंवा बकऱ्याची निगा राखावी व त्यावर लक्ष ठेवावे. चौदाव्या दिवशी सर्व इस्राएल लोकांनी कातरवेळी म्हणजे सूर्य मावळल्यानंतर व अंधार पडण्यापूर्वी आपापल्या मेंढ्याचा किंवा बकऱ्याचा वध करावा. 7 त्यांचे रक्त गोळा करून ते ज्या घरात त्याचे मांस खाणार आहेत त्याच्या दाराच्या कपाळ पट्ट्यांवर व दोन्ही बाजूंच्या चौकटींना लावावे.
8 “त्याच रात्री तो मेंढा किंवा बकरा विस्तावावर भाजावा आणि कडू भाजी व बेखमीर भाकरी बरोबर त्याचे सर्व मांस खाऊन टाकावे; 9 तुम्ही त्याचे मांस कच्चे किंवा पाण्यात शिजवून खाऊ नये तर विस्तवावर भाजून खावे; त्याची मुंडी, पाय व आतंडी ही सुद्धा भाजून खावीत. 10 त्या रात्रीच ते सर्व मांस खावे; त्यातले काहीही सकाळपर्यंत ठेवू नये आणि जर काही उरलेच तर ते आगीत जाळून टाकावे.”
11 ते खाण्या अगोदर तुम्ही प्रवासास जाण्याच्या तयारीने अंगावर कपडे घालावेत, पायात जोडे घालावेत आणि हातात काठी घ्यावी आणि मग घाईघाईने ते मांस खावे; कारण हा परमेश्वराचा वल्हांडण सण आहे.
12 “आज रात्री मी मिसर देशभर फिरेन आणि त्यातील प्रथम जन्मलेल्या मुलांना व जनावरांतील नरांना मी मारून टाकीन, आणि मिसरमधील सर्व दैवतांना धडा शिकवून दाखवीन की मी परमेश्वर आहे. 13 परंतु तुमच्या घरांच्या दारावरील रक्त ही एक विशेष खूण असेल. मी जेव्हा ती पाहीन तेव्हा ते घर ओलांडून मी पुढे जाईन. मी मिसरच्या लोकांना मारीन तेव्हा कोणतीही विनाशकारी पीडा तुम्हांवर येणार नाही व तुम्हाला अपाय करणार नाही.
14 “अशा रीतीने आजची रात्र कायमची तुमच्या आठवणीत राहील. हा दिवस तुम्हासाठी विशेष उत्सवाचा म्हणजे सणाचा दिवस असेल. तुमच्या वंशजांनी येथून पुढे हा सण पिढ्यानपिढ्या कायमचा नियम म्हणून पाळावा. 15 तसेच सणाच्या दिवासांत तुम्ही सात दिवस खमीर न घातलेली भाकर खावी; ह्या सणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने आपल्या घरातील सर्व खमीर काढून टाकावे व पूर्ण सात दिवस तुम्ही खमीर न घातलेली भाकर खावी. तुम्हातील जर कोणी खमीर घातलेली भाकर खाईल तर त्याला तुम्ही इस्राएल लोकांमधून बाहेर टाकावे. 16 या सणाच्या पहिल्या व शेवटल्या म्हणजे सातव्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; ह्या दोन्ही दिवशी स्वयंपाकाच्या कामाशिवाय इतर कोणतेही काम करु नये. 17 बेखमीर भाकरीच्या सणाची तुम्ही आठवण ठेवावी कारण याच दिवशी मी तुम्हा सर्वाना गटगटांनी मिसरदेशातून बाहेर काढून नेले म्हणून तुमच्या सर्व वंशाजांनी हा दिवस पिढ्यान्पिढ्या कायमचा नियम म्हणून पाळावा. 18 तेव्हा पहिल्या महिन्यातील (निसान महिन्यातील) चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळपासून ते त्या महिन्याच्या एकविसाव्या दिवसाच्या संध्याकाळपर्यत तुम्ही बेखमीर भाकरी खाव्या. 19 ह्या सात दिवसात तुमच्या घरात खमीर नसावे; कारण जो कोणी एखादी खमीराची वस्तू खाईल मग तो परदेशी असो किंवा स्वदेशी असो त्याला इस्राएल लोकांमधून बाहेर टाकावे. 20 या दिवशी कोणीही खमीर खाऊ नये; तर तुम्ही कोठेही राहात असला तरी बेखमीर भाकरच खावी.”
21 म्हणून मग मोशेने इस्राएली लोकांच्या सर्व वडीलधाऱ्यां लोकांना एकत्र बोलावले. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपापल्या घराण्याप्रमाणे एकएक कोकरू घ्यावे; आणि वल्हांडण सणाच्या यज्ञाकरिता त्याचा वध करावा.
शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय?
14 एका शब्बाथ दिवशी तो प्रमुख परुश्यांपैकी एकाच्या घरी जेवावयास गेला, तेव्हा तेथे असणारे लोक येशूवर बारकाईने नजर ठेवीत होते. 2 आणि तेथे त्याच्यासमोर जलोदर झालेला एक मनुष्य होता. 3 येशूने नियमशास्त्राच्या शिक्षकांना व परुश्यांना विचारले, “शब्बाथ दिवशी बरे करणे नियमशास्त्राला धरुन आहे की कसे?” 4 पण ते गप्प राहिले. तेव्हा येशूने त्या आजारी माणसाला धरुन त्याला बरे केले व त्याला पाठवून दिले. 5 मग तो त्यांना म्हणाला, “जर तुमच्यापैकी एखाद्याला एक मुलगा किंवा एक बैल आहे व तो विहीरीत पडला, तर शब्बाथ दिवशी तुम्ही त्याला ताबडतोब बाहेर काढणार नाही काय?” 6 आणि ह्या प्रश्नाला उत्तर देणे त्यांना जमले नाही.
स्वतःला महत्त्व देऊ नका
7 मग त्याने पाहुण्यांना एक बोधकथा सांगितली, कारण त्याने पाहिले की, ते त्यांच्यासाठी मानाच्या जागा शोधीत होते. तो त्यांना म्हणाला, 8 “जेव्हा एखादा तुम्हांला लग्नाच्या मेजवानीला आमंत्रित करील, तेव्हा मानाच्या आसनावर बसू नका. कारण तुमच्यापेक्षा अधिक महत्त्वाच्या माणसाला त्याने कदाचित आमंत्रण दिले असेल. 9 मग ज्याने तुम्हा दोघांना आमंत्रित केले आहे तो येईल, आणि तुम्हांला म्हणेल, ‘या माणसाला तुझी जागा दे.’ मग खजील होऊन तुम्हांला खालच्या जागी बसावे लागेल.
10 “पण जेव्हा तुम्हांला आमंत्रित केलेले असेल, तेव्हा जा आणि अगदी खालच्या (शेवटच्या) जागी जाऊन बसा. यासाठी की, जेव्हा यजमान येईल, तेव्हा तो तुम्हांला म्हणेल, ‘मित्रा, वरच्या आसनावर येऊन बैस.’ तेव्हा तुझ्या पाहुण्यांसमोर तुझा मान होईल. 11 कारण जो कोणी स्वतःला उच्च करितो त्याला लीन केले जाईल व जो स्वतःला लीन करील त्याला उच्च केले जाईल.”
तुम्हांला बक्षीस दिले जाईल
12 मग ज्याने आमंत्रण दिले होते त्याला तो म्हणाला, “तू जेव्हा दुपारी किंवा संध्याकाळी भोजनास बोलावशील तेव्हा तुझ्या मित्रांना, भावांना, किंवा तुझ्या नातेवाईकांना वा श्रीमंत शेजाऱ्यांना बोलावू नको, कारण तेही तुला परत आमंत्रण देतील व अशा रीतीने तुझ्या आमंत्रणाची परतफेड केली जाईल. 13 पण जेव्हा तू मेजवानी देशील, तेव्हा गरीब, लंगडे, पांगळे, आंधळे यांना आमंत्रण दे. 14 आणि तुला आशीर्वाद मिळतील, कारण तुझी परतफेड करण्यासाठी त्यांच्याकडे काहीही असणार नाही. कारण नीतीमानांच्या पुनरुत्थानाच्या वेळी तुझी परतफेड होईल.”
मोठ्या मेजवानीविषयीची गोष्ट(A)
15 आता जेव्हा मेजाभोवती बसलेल्यांपैकी एकाने हे ऐकले, तेव्हा तो येशूला म्हणाला, “देवाच्या राज्यात जेवतो, तो प्रत्येक जण धन्य!”
16 मग येशू त्याला म्हणाला, “एक मनुष्य एका मोठ्या मेजवानीची तयारी करीत होता. त्याने पुष्कळ लोकांना आमंत्रण दिले. 17 भोजनाच्या वेळी ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना ‘या, कारण सर्व तयार आहे’ हे सांगण्यासाठी नोकराला पाठविले. 18 ते सर्वजण सबब सांगू लागले. पहिला त्याला म्हणाला, ‘मी शेत विकत घेतले आहे आणि मला जाऊन ते पाहिले पाहिजे. कृपा करुन मला क्षमा कर.’ 19 दुसरा म्हणाला, ‘मी बैलाच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहेत व त्या कशा आहेत हे बघण्यासाठी मी चाललो आहे, कृपा करुन मला क्षमा कर.’ 20 आणखी तिसरा म्हणाला, ‘मी लग्न केले आहे, व त्यामुळे मी येऊ शकणार नाही.’
21 “म्हणून जेव्हा तो नोकर परत आला, तेव्हा त्याने आपल्या मालकाला या गोष्टी सांगितल्या. मग घराचा मालक रागावला आणि नोकराला म्हणाला, ‘लवकर बाहेर रस्त्यावर आणि नगारातल्या गल्ल्यांमध्ये जा व गरीब, आंधळे, असहाय्य, लंगडे यांना घेऊन इकडे ये!’
22 “नोकर म्हणाला, ‘आपल्या आज्ञेप्रमाणे केले आहे. आणि तरीही जागा आहे.’ 23 मालक नोकराला म्हणाला, ‘रस्त्यावर जा, कुंपणाजवळ जा आणि तेथे असलेल्या लोकांना आग्रहाने आत येण्यास सांग म्हणजे माझे घर भरुन जाईल. 24 कारण मी तुम्हांस सांगतो की, त्या आमंत्रित केलेल्या कोणालाही माझ्या मेजवानीतली चव पाहायला मिळणार नाही.’”
प्रथम तुम्ही योजना आखा(B)
25 मोठ्या संख्येने लोक येशूबरोबर चालत होते. तो त्यांच्याकडे वळाला व म्हणाला, 26 “जर कोणी माझ्याकडे येतो आणि आपले वडील, आई, पत्नी, मुले, भाऊ, बहिणी एवढेच नव्हे, तर स्वतःच्या जिवाचासुद्धा द्धेष करीत नाही, तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही. 27 जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येणार नाही, तो माझा शिष्य होऊ शकणार नाही.
28 “जर तुम्हांपैकी कोणाला बुरुज बांधायचा असेल तर तो अगोदर बसून खर्चाचा अंदाज करुन तो पूर्ण करावयास त्याच्याजवळ पुरेसे आहे की नाही हे पाहणार नाही काय? 29 नाहीतर कदाचित तो पाया घालील आणि पूर्ण करु शकणार नाही. आणि जे पाहणारे आहेत ते त्याची थट्टा करतील आणि म्हणतील, 30 ‘या मनुष्याने बांधण्यास सुरुवात केली पण पूर्ण करु शकला नाही!’
31 “किंवा एक राजा दुसऱ्या राजाबरोबर लढाई करण्यास निघाला, तर तो अगोदर बसून याचा विचार करणार नाही का की, त्याच्या दहा हजार मनुष्यांनिशी त्याच्या शत्रूशी, जो वीस हजार सैन्यानिशी चालून येत आहे, त्याला मुकाबला करता येणे शक्य आहे काय? 32 जर तो त्याला तोंड देऊ शकणार नसेल, तर त्याचा शत्रु दूर अंतरावर असतानाच तो शिष्टमंडळ पाठवून शांततेसाठी तहअटींची विचारणा करील.
33 “त्याच प्रकारे तुमच्यापैकी जो कोणी सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्याला माझा शिष्य होता येणार नाही.
तुमचा प्रभाव गमावू नका(C)
34 “मीठ चांगले आहे, पण मिठाची जर चव गेली, तर त्याला खारटपणा कशाने येईल? 35 ते पूर्णपणे निरुपयोगी ठरेल व लोक ते फेकून देतील.
“ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको!”
ईयोब त्याचे बोलणे चालू ठेवतो
29 ईयोबाने बोलणे सुरु ठेवले तो म्हणाला:
2 “काही महिन्यांपूर्वी देव जसा माझ्यावर लक्ष ठेवून होता आणि माझी काळजी घेत होता,
तसेच माझे आयुष्य आताही असते तर किती बरे झाले असते.
3 तेव्हा देवाचा प्रकाश माझ्यावर प्रकाशत होता आणि मला अंधारातून चालताना प्रकाश दाखवत होता.
तसेच आताही असायला हवे होते असे मला वाटते.
4 मी जेव्हा यशस्वी होतो आणि देव माझा मित्र होता त्या दिवसांची मी आशा करतो.
त्या दिवसात माझ्यावर देवाचे कृपाछत्र होते.
5 जेव्हा सर्वशक्तिमान देव माझ्याबरोबर होता
आणि माझी मुले माझ्या जवळ होती त्या दिवसांची मी आशा धरतो.
6 त्या दिवसांत माझे आयुष्य अतिशय चांगले होते.
मी माझे पाय मलईत धूत असे.
माझ्याकडे उत्तम प्रकारची पुष्कळ तेले होती.
7 “त्या दिवसांत मी नगराच्या वेशीपर्यंत जात असे
आणि नगरातल्या वृध्दांबरोबर सार्वजनिक ठिकाणी बसत असे.
8 सगळे लोक मला मान देत.
मला येताना बघून तरुण माझ्या वाटेतून बाजूला होत आणि वृध्द उठून उभे राहात.
मला आदर देण्यासाठी ते उठून उभे राहात असत.
9 लोकप्रमुख बोलणे थांबवीत
आणि इतरांना शांत राहाण्याची सूचना देण्यासाठी तोंडावर बोट ठेवीत.
10 महत्वाचे लोक सुध्दा बोलताना त्यांचा आवाज लहान करीत.
होय, तेव्हा त्यांची जीभ टाळूला चिकटण्यासाखी वाटे.
11 लोक माझ्या बोलण्याकडे लक्ष देत.
आणि माझ्याबद्दल चांगले बोलत असत.
मला भेटणारा प्रत्येकजण माझी स्तुती करी.
12 का? कारण जेव्हा एखादा गरीब मदतीची याचना करायचा तेव्हा मी त्याला मदत करीत असे
आणि पोरक्या मुलाकडे लक्ष द्यायला कुणी नसले तर मी मदत करीत असे.
13 मृत्युपंथाला लागलेला माणूस मला आशीर्वाद देत असे.
मी गरजू विधवांना मदत करीत असे.
14 सत्याने जगणे म्हणजे जणू माझे वस्त्र होते.
माझे योग्य वागणे म्हणजे माझा अंगरखा आणि डोक्यावरची पगडी होती.
15 मी आंधळ्यांची दृष्टी होतो. त्यांना जिथे जायचे असेल तिथे मी नेत असे.
मी अपंगांचे पाय होतो त्यांना हवे तिथे मी उचलून नेत असे.
16 गरीब लोकांना मी वडिलांसारखा वाटत असे.
मला माहीत नसलेल्या लोकांनादेखील मी मदत करीत असे.
मी कोर्टात न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करीत असे.
17 मी दुष्ट लोकांचे सामर्थ्य नष्ट केले.
मी निरपराध लोकांचा त्यांच्यापासून बचाव केला.
18 “मला नेहमी वाटायचे मी खूप वर्षे जगेन,
मला स्वतःच्या घरातच मृत्यू येईल.
19 मी खूप पाणी शोषून घेऊ शकणारी मुळे असलेल्या व ज्याच्या फांद्या दवाने ओल्या झालेल्या आहेत
अशा झाडासारखा असेन, असे मला वाटत असे.
20 मला रोज नवतरुण झाल्यासारखे वाटत असे.
रोज नवीन बाण सोडण्याइतकी शक्ती आपल्यात आहे असे मला वाटत असे.
21 “पूर्वी लोक माझे ऐकत असत
माझ्या उपदेशाची वाट पाहात ते शांत बसत.
22 मी माझे बोलणे संपवल्यानंतर ऐकणाऱ्यांना आणखी काही बोलायचे नसे.
माझे शब्द त्यांच्या कानावर हळूवारपणे पडत.
23 पावसाची वाट पाहिल्यासारखी ते माझ्या बोलण्याची वाट पाहात.
वसंतातल्या पावसासारखे ते माझे शब्द पिऊन टाकत.
24 काही लोकांनी आशा सोडून दिली होती.
त्यांचे धैर्य खचले होते.
परंतु मी त्यांच्याबरोबर हसलो.
माझ्या हास्याने त्यांना बरे वाटले.
25 मी त्यांचा प्रमुख असूनही त्यांच्याबरोबर राहाण्याचे ठरवले.
आपल्या सैन्याबरोबर तळ ठोकून बसलेल्या राजासारखा दु:खी असलेल्यांचे सांत्वन करणाऱ्या राजासारखा मी होतो.
ख्रिस्ताविषयीची सुवार्ता
15 आता बंधूंनो, मला तुम्हाला आठवण करुन द्यावीशी वाटते, की ज्या सुवार्तेविषयी मी तुम्हाला उपदेश केला व जी तुम्हीसुद्धा स्वीकारलीत व जिच्यात तुम्ही बळकट आहात. 2 आणि जिच्यामुळे तुमचे तारण झाले आहे. ज्या वचनाने मी तुम्हांस सुवार्ता सांगितली ते तुम्ही दृढ धरता तर तुम्ही विश्वास धरल्याशिवाय काही उपयोग नाही, नाहीतर तुमची स्वीकृती व्यर्थ आहे.
3 कारण मलासुद्धा पहिल्यांदा जे मिळाले ते मी तुमच्या स्वाधीन केले: ते हे की ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावला, हे जे वचनात लिहिले आहे. 4 व त्याला पुरण्यात आले. व तिसऱ्या दिवशी त्याला उठविण्यात आले. 5 व तो पेत्राला दिसला, नंतर बारा प्रेषितांना, 6 नंतर तो एकाच वेळी पाचशे हून अधिक बांधवांना दिसला. त्यांच्यापैकी बहुसंख्य अजूनही जिवंत आहेत, तर काही मेले आहेत. 7 नंतर तो याकोबाला दिसला, मग पुन्हा तो सर्व प्रेषितांना दिसला. 8 आणि शेवटी मी जो अवेळी जन्मलो, त्या मलासुद्धा तो दिसला.
9 कारण प्रेषितांमध्ये मी कनिष्ठ आहे, मी प्रेषित म्हणून घेण्याच्यासुद्धा योग्यतेचा नाही, कारण देवाच्या मंडळीचा मी छळ केला. 10 पण देवाच्या दयेने मी जो आहे तो मी (प्रेषित) आहे. आणि त्याची माझ्यावरची कृपा व्यर्थ गेली नाही, उलट त्या सर्वांपेक्षा अधिक काम मी केले आहे, करणारा मी नव्हतो, तर देवाची दया जी माझ्याबरोबर होती, ती करीत होती. 11 म्हणून, जरी मी तुम्हांला उपदेश केला किंवा त्यांनी उपदेश केला, तरी आम्ही सर्व हाच उपदेश करु, आणि तुम्ही यावरच विश्वास ठेवला.
आम्हांला मेलेल्यांतून उठविण्यात येईल
12 पण जर आम्ही ख्रिस्त मेलेल्यांतून उठविला गेला आहे अशी सुवार्ता गाजवितो, तर मृतांचे पुनरुत्थान नाही असे तुमच्यातील काहीजण म्हणतात हे कसे? 13 जर मृतांचे पुनरुत्थान नाही, तर ख्रिस्त मरणातून उठविला गेला नाही, 14 आणि जर ख्रिस्त मरणातून उठविला गेला नाही तर आमचा संदेश व्यर्थ आहे आणि तुमचा विश्वासही व्यर्थ आहे. 15 आणि आम्हीसुद्धा देवाविषयीचे खोटे साक्षीदार ठरु कारण आम्ही देवासमोर शपथपूर्वक साक्ष दिली आहे की, ख्रिस्ताला मेलेल्यांतून त्याने उठविले, पण जसे ते म्हणतात त्याप्रमाणे जर देवाने ख्रिस्ताला उठविले नाही, तर मेलेले मरणातून उठविले जात नाहीत. 16 आणि जर मृतांना उठविले जात नाही, तर ख्रिस्ताला मरणातून उठविण्यात आले नाही. 17 आणि जर ख्रिस्त मरणातून उठविला गेला नाही, तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे; तुम्ही अजूनसुद्धा पापातच आहात; 18 होय, आणि जे ख्रिस्तात मेलेले आहेत, त्यांचा नाश झाला आहे. 19 जर ख्रिस्तावर असलेली आमची आशा ही, फक्त या पृथ्वीवरील जीवनासाठीच असली, तर सर्व मनुष्यात आम्ही दयनीय असे आहोत.
20 परंतु आता प्रत्यक्षात ख्रिस्त मरणातून उठविला गेला आहे. जे मेलेले आहेत त्यांच्यातील तो प्रथम फळ आहे. 21 कारण ज्याअर्थी मनुष्याद्वारे मरण आले त्याप्रमणे मृतांचे पुनरुत्थानसुद्धा मनुष्याद्वारेच आले. 22 कारण जसे आदामाद्वारे सर्व मरण पावतात तसेच सर्वजण ख्रिस्ताद्वारे जिवंत केले जातील. 23 पण प्रत्येक जण त्याच्या क्रमानुसार, ख्रिस्त जो प्रथम फळ आहे, आणि मग ख्रिस्त येण्याच्या वेळी त्याचे असलेले, 24 मग शेवट येईल प्रत्येक अधिपती, प्रत्येक सत्ता, व प्रत्येक सामर्थ्य जेव्हा ख्रिस्त नाहीसे करील, तेव्हा ख्रिस्त देवपित्याला राज्य देईल.
25 कारण देवाने ख्रिस्ताचे शत्रू ख्रिस्ताच्या पायाखाली ठेवीपर्यंत ख्रिस्ताने राज्य केले पाहिजे. 26 शेवटचा शत्रू असल्यासारखा मृत्यूचा नाश केला पाहिजे. 27 कारण “देवाने सर्व काही त्याच्या अधिकारात ठेवले आहे.” आता जेव्हा पवित्र शास्त्र म्हणते की, “सर्व गोष्टी” अंकीत केल्या आहेत तेव्हा सर्व स्पष्ट आहे की, ज्याने सर्व गोष्टी त्याच्या अंकीत केल्या आहेत, तो देव सोडून इतर सर्व गोष्टी त्याच्या अधिकार क्षेत्रात आहेत. 28 आणि सर्व गोष्टी जेव्हा स्वाधीन केलेल्या आहेत, तेव्हा पुत्रसुद्धा देवाच्या, ज्याने सर्व गोष्टी स्वाधीन केल्या आहेत, स्वतः स्वाधीन केला जाईल यासाठी की, देव सर्वांवर संपूर्णपणे अधिपती असावा.
29 नाहीतर, मेलेल्यांसाठी व त्यांची पुन्हा भेट होईल या आशेने ज्यांनी बाप्तिस्मा घेलला आहे ते काय करतील? जर मेलेले उठविले जात नाहीत तर त्यांच्यासाठी लोक बाप्तिस्मा का घेतात?
30 आम्हीसुद्धा प्रत्येक घटकेला धोक्याला का तोंड देतो? 31 बंधूजनहो, मी शपथपूर्वक सांगतो की, ख्रिस्त येशूमध्ये माझा तुमच्याविषयी अभिमान आहे, मी दररोज मरतो 32 इफिसात मी रानटी प्राण्याबरोबर लढलो, तर मी काय मिळविले? जर मेलेले उठविले जात नाहीत तर “आपण खाऊ पिऊ, कारण आपण उद्या मरुन जाऊ!”
33 फसू नका, “वाईट सोबती चांगल्या सवयी बिघडवितात.” 34 शुद्धीवर या. जसे तुम्ही यायला पाहिजे आणि पाप करीत जाऊ नका. कारण तुम्हांपैकी काहीजण देवाविषयी अज्ञानी आहेत. हे मी तुम्हांस लाजविण्यासाठी बोलतो.
आपले शरीर कोणत्या प्रकारचे असेल?
35 परंतु कोणीतरी म्हणेल? “मेलेले कसे उठविले जातात? कोणत्या प्रकारच्या शरीराने ते येतात?” 36 तू किती मूर्ख आहेस? तू जे पेरतोस ते प्रथम मेल्याशिवाय जिवंत होत नाही. 37 आणि तू लावतोस (पेरतोस) त्यासंबंधी तू जे जमिनीत पेरतोस ते वाढलेले रोपटे नसून जे वाढतच राहणार आहे, ते नव्हे तर फक्त धान्य (दाणा). तो गव्हाचा किंवा इतर कोठला तरी असेल. 38 आणि मग देवाने निवडल्याप्रमाणे तो त्याला आकार देतो. तो प्रत्येक दाण्याला त्याचे स्वतःचे “शरीर” देतो. 39 जिवंत प्राणीमात्रांचे सर्वांचे देह सारखेच नसतात. त्याऐवजी मनुष्याचे शरीर एक प्रकारचे असते. प्राण्यांचे शरीर दुसऱ्या प्रकारचे असते, पक्ष्यांचे वेगळ्या प्रकारचे असते; आणि माशांचे आणखी वेगळ्या प्रकारचे असते. 40 तसेच स्वर्गीय शरीरे आहेत आणि पृथ्वीवरील शरीरे आहेत, पण स्वर्गीय शरीराचे वैभव एक प्रकारचे असते, तर जगिक शरीराला दुसरे असते. 41 सूर्याचे तेज वेगळ्या प्रकारचे तर चंद्राचे तेज वेगळ्या प्रकाचे असते. ताऱ्याचे तेज वेगळ्या प्रकारचे असते. आणि तेजाबाबत एक तारा दुसऱ्या ताऱ्यांहून निराळा असतो.
42 म्हणून मृतांच्या पुनरुत्थानाबाबत असे असेल, शरीर जे जमिनीत पुरले गेले आहे ते नाश पावणारे आहे, जे शरीर उठविण्यात येते ते आविनाशी आहे. 43 जे शरीर जमिनीत पुरले आहे, ते अपमानात पुरलेले असते. ते अशक्त असते पण उठविले जाते ते सशक्त शरीर असते 44 जे जमिनीत पुरले जाते ते नैसर्गिक शरीर आहे जे उठविले जाते ते आध्यात्मिक शरीर आहे.
जर नैसर्गिक शरीरे आहेत तर आध्यात्मिक शरीरेसुद्धा असतात. 45 आणि तेच पवित्र शास्त्र सांगते, “पाहिला मनुष्य, आदाम हा जिवंत प्राणी झाला,” पण ख्रिस्त जो शेवटचा आदाम झाला तो जीवन देणारा आत्मा झाला. 46 परंतु जे आध्यात्मिक ते प्रथम नाही, जे जगिक ते प्रथम, मग जे आध्यात्मिक आहे ते. 47 पाहिला मनुष्य मातीतून आला म्हणजे तो धुळीपासून बनविला गेला, तर दुसरा मनुष्य स्वर्गातून आला. 48 ज्याप्रमाणे तो मनुष्य मातीपासून बनविला गेला, त्याप्रमाणे लोकसुद्धा मातीपासूनच बनविले गेले आणि त्या स्वर्गीय मनुष्याप्रमाणे स्वर्गीय लोकही तसेच आहेत. 49 ज्याप्रमाणे तयार केलेल्या माणसाची प्रतिमा आपण धारण केली आहे, तशी आपणसुद्धा स्वर्गीय माणसाची प्रतिमा धारण करु.
50 बंधूनो, मी तुम्हांला सांगतो, आपल्या मांस व रक्त असलेल्या जगिक शरीराला देवाच्या राज्यात वाटा मिळू शकत नाही. तसेव विनाशीपण अविनाशीपणाचा वारसा मिळवू शकत नाही. 51 पाहा! मी तुम्हांला एक रहस्यमय सत्य सांगत आहे. आपण सर्व मरणार नाही. आपण सर्व बदलून जाऊ.
52 क्षणात, डोळ्यांची उघडझाप होते इतक्या लवकर, जेव्हा शेवटचा कर्णा वाजेल, कारण कर्णा वाजेल आणि मेलेले अविनाशीपणात उठविले जातील आणि आपण जे अजूनही जिवंत आहोत ते बदलून जाऊ. 53 कारण या विनाशी शरीराने अविनाशीपण धारण करावे आणि या मर्त्य शरीराने अमरत्व धारण केलेच पाहिजे. 54 जेव्हा हे विनाशी शरीर अविनाशीपण धारण करील व हे मर्त्य शरीर अमरत्व धारण करील, तेव्हा पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे होईल.
“विजयात मरण गिळले गेले आहे.” (A)
55 “अरे मरणा तुझा विजय कोठे आहे?
मरण, तुझी नांगी कोठे आहे?” (B)
56 मरणाची नांगी पाप आहे आणि पापाचे सामर्थ्य नियमाशास्त्रापासून येते. 57 पण देवाला धन्यावाद असो, जो प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला विजय देतो!
58 म्हणून माझ्या प्रिय बंधूनो, स्थिर आणि अचल राहा. नेहमी स्वतःला प्रभूच्या कार्यसाठी वाहून घ्या. कारण तुम्ही जाणता की प्रभुमध्ये तुमचे काम व्यर्थ नाही.
2006 by World Bible Translation Center