M’Cheyne Bible Reading Plan
टोळांची पीडा
10 परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू फारोकडे जा. त्याचे व त्याच्या सेवकांची मने मी कठीण केली आहेत. मी हे यासाठी केले आहे की मला त्यांना माझ्या चमत्कारांचे सामर्थ्य दाखवावयाचे होते. 2 तसेच तुम्ही तुमच्या मुलांना व नातवंडांना मी मिसरमध्ये केलेल्या चमत्कारांचे व अद्भुत गोष्टींचे वर्णन सांगावे. मग तुम्हा सर्वांना कळेल की मी परमेश्वर आहे.”
3 मग मोशे व अहरोन फारोकडे गेले. त्यांनी त्याला सांगितले, “इस्राएल लोकांचा देव परमेश्वर म्हणतो, ‘अजून किती दिवस तू माझे ऐकणार नाहीस? माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांना जाऊ दे. 4 जर तू माझ्या लोकांना जाऊ देण्याचे नाकारशील तर उद्या मी तुझ्या देशावर टोळ धाड आणिन. 5 ते टोळ सर्व जमीन झाकून टाकतील. ते इतके असतील कि तुला जमीन दिसणार नाही. गारा व पावसाच्या तडाख्यातून जे काही वाचले असेल त्याला टोळ खाऊन टाकतील. शेतातील सर्व झाडांचा पाला ते खाऊन फस्त करतील. 6 ते टोळ तुझा वाडा, तुझ्या सेवकांची घरे, व मिसरमधील घरे, वाडे या सर्वात भरून जातील. तुझ्या वाडवडीलांनी आज पर्यंत पाहिले असतील त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक ते असतील. मिसरमध्ये लोकवस्ती होऊ लागली त्या काळापासून आता पर्यंत कधीही नव्हते, तेवढे अधिक ते टोळ असतील.’” नंतर फारो समोरून मोशे निघून गेला.
7 फारोच्या सेवकांनी फारोला विचारले, “कोठवर आम्ही ह्या इस्राएल लोकांच्या सापळयात अडकून राहावे? त्यांना आपल्या देव परमेश्वराची उपासना करण्याकरिता जाऊ द्यावे जर आपण त्यांना जाऊ देणार नाही तर मग आपणास समजण्यापूर्वी मिसर देशाचा नाश होईल.”
8 तेव्हा फारोने मोशे व अहरोन यांना पुन्हा बोलावून आणण्यास आपल्या काही सेवाकांना सांगितले. फारो त्यांना म्हणाला, “जा व तुमचा देव परमेश्वर याची उपासना करा. परंतु नक्की कोण कोण जाणार आहे ते मला सांगा.”
9 मोशेने उत्तर दिले, “आमची तरूण व म्हातारी मंडळी यांना तसेच आम्ही आमची मुलं, आमच्या मुली, आमची शेरडेमेंढरे व गाईगुरे यांनाही आमच्या बरोबर घेऊन जाऊ; आम्ही झाडून सर्वजण जाऊ कारण परमेश्वराचा उत्सव सर्वाकरिता आहे.”
10 फारो त्यांना म्हणाला, “तुम्ही व तुमची मुलेबाळे यांना मिसरमधून जाऊ देण्यापूर्वी खरेच परमेश्वर मजपासून तुमचे रक्षण करो! हे पाहा, तुम्ही काही तरी वाईट असा कट करीत आहात. 11 तुमच्यातील पुरुषांनी तुमच्या परमेश्वराची उपासना करावयास जावे. आणि हीच तर तुम्ही मला विंनती केली होती. तेव्हा तुम्हा सर्वाना मी जाऊ देणार नाही.” त्यानंतर फारोने मोशे व अहरोन यांना घालवून दिले.
12 मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “आपली काठी मिसर देशावर उगार म्हणजे मग मिसरवर टोळ धाड येईल! ते टोळ मिसर देशभर पसरतील आणि पाऊस व गारा यांच्या सपाट्यातून वाचलेल्या वनस्पती खाऊन टाकतील.”
13 मग मोशेने आपल्या हातातील काठी मिसर देशावर उगारली तेव्हा परमेश्वराने एक दिवसभर व रात्रभर पूर्वेकडून वारा वाहविला, तेव्हा सकाळी वाऱ्याबरोबर टोळच टोळ आले. 14 ते उडत आले व अवघ्या मिसर देशभर जमिनीवर पसरले. इतके टोळ ह्यापूर्वी मिसर देशावर कधी आले नव्हते व इतके येथून पुढेही कधी येणार नाहीत. 15 त्या टोळांनी सर्व जमीन झाकून टाकली, आणि त्यांच्या आकाशात उडण्यामुळे सर्व देशभर अंधार पडला. गारांच्या तडाख्यातून वाचलेल्या वनस्पती आणि झाडावरील वाचलेली फळे त्यांनी खाऊन फस्त केली; आणि मिसरमधील कुठल्याच झाडांझुडपांवर एकही पान राहिले नाही.
16 फारोने तातडीने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले. तो म्हणाला, “मी तुमचा देव परमेश्वर ह्याच्या विरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. 17 तेव्हा ह्या वेळी माझ्या पापंबद्दल मला क्षमा करा आणि हे मरण (टोळ) माझ्यापासून दूर करण्याकरिता परमेश्वराकडे प्रार्थना करा.”
18 मोशे फारोसमोरून निघून गेला व त्याने परमेश्वराची प्रार्थना केली. 19 तेव्हा परमेश्वराने वाऱ्यात बदल केला. त्याने पश्चिमेकडून जोराचा वारा वाहविला तेव्हा त्या वाऱ्याने सर्व टोळ वाहवून तांबड्या समुद्रात टाकले. मिसरमध्ये एकही टोळ राहिला नाही. 20 तरी परंतु परमेश्वराने फारोचे मन पुन्हा कठीण केले आणि त्याने इस्राएल लोकांना जाऊ दिले नाही.
अंधाराची पीडा
21 मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आपला हात आकाशात उंच कर म्हणजे अवघा मिसर देश अंधारात गडप होईल तो अंधार इतका दाट असेल की तुम्हाला चाचपडत जावे लागेल.”
22 तेव्हा मोशेने तसे कले आणि अंधाऱ्याढगाने अवघ्या मिसरदेशाला तीन दिवस गडप केले. 23 कोणालाही दुसरे काहीही दिसेना आणि म्हणून कोणीही उठून तीन दिवस कोठेह गेले नाही; परंतु इस्राएल लोक जेथे राहात होते त्या सर्व भागावर म्हणजे गोशेन प्रांतात सर्वत्र भरपूर प्रकाश होता.
24 तेव्हा पुन्हा फारोने मोशेला बोलावले. तो म्हणाला, “तुम्ही जा व तुमच्या परमेश्वराची उपासना करा. तुम्ही तुमची मुलेबाळेही बरोबर न्या. परंतु तुमची शेरडेमेंढरे व गुरेढोरे येथेच राहिली पाहिजेत.”
25 मोशे म्हणाला, “आमचेच पशू नव्हे तर तू देखील आम्हांस यज्ञपशू व होमबळी देशील; आणि त्यांचा आम्ही आमचा देव परमेश्वर ह्याला अर्पणासाठी उपयोग करु! 26 यज्ञ व होमार्पणासाठी आम्ही आमचे पशूही आमच्या बरोबर नेऊ. जनावराचा एक खूरही आम्ही मागे ठेवणार नाही. आमच्या परमेश्वराला यज्ञ व होमार्पणासाठी काय लागेल हे आता येथून आम्हाला सांगता येणार नाही; परंतु तेथे गेल्यावरच आम्हाला काय हवे व काय नको हे समजेल. म्हणून ह्या सर्वगोष्टी आम्हाला आमच्या सोबत नेल्याच पाहिजेत.”
27 परमेश्वराने फारोचे मन पुन्हा कठीण केले. तेव्हा फारो इस्राएली लोकांना जाऊ देईना! 28 मग फारो मोशेवर ओरडला व म्हणाला, “तू येथून चालता हो! आपले तोंड मला पुन्हा दाखवू नकोस! यानंतर तू आपले तोंड मला दाखवशील त्या दिवशी तू मरशील!”
29 मोशे म्हणाला, “तू एक गोष्ट बरोबर बोललास, मी तुझे तोंड पुन्हा कधीही पाहणार नाही!”
तुमची अंतःकरणे बदला
13 त्यावेळी तेथे काही लोक उपस्थित होते. त्यांनी येशूला गालीलातील त्या लोकांविषयी सांगितले, ज्यांचे रक्त पिलाताने [a] आधीच असलेल्या यज्ञपशूंच्या रक्तात मिसळले होते. 2 त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हांला वाटते का की, ह्या गालीलकरांनी जे भोगले त्यावरुन ते इतर गालीलकरांपेक्षा जास्त पापी होते? 3 नाही, मी तुम्हांस सांगतो, जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर ते जसे मेले तसे तुम्हीही मराल. 4 किंवा त्या अठरा जणांचे काय? ज्यांच्यावर शिलोहाचा बुरुज पडला व ते मारले गेले? तुम्हांला वाटते का की, यरुशलेम येथे राहणाऱ्या सर्व लोकांपेक्षा ते अधिक दोषी होते? 5 नाही, मी तुम्हांला सांगतो जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्ही सर्व जण त्यांच्यासारखे मराल.”
निरुपयोगी झाड
6 नंतर त्याने ही बोधकथा सांगितली, “एका माणसाने त्याच्या बागेत अंजिराचे झाड लावले होते, त्यावर फळ असेल म्हणून तो पाहावयास आला परंतु त्याला काहीही आढळले नाही. 7 म्हणून तो माळयाला म्हणाला, ‘पाहा, या अंजिराच्या झाडावर फळ पाहण्यासाठी मी गेल्या तीन वर्षांपासून येत आहे, परंतु मला त्यावर काहीही आढळले नाही. तेव्हा ते तोडून टाक. त्याचा उगीच भुईला भार कशाला?’ 8 माळयाने उत्तर दिले, ‘मालक, या एका वर्षासाठी ते राहू द्या. मग मी त्याच्याभोवती खणून त्याला खत घालीन. 9 मग येत्या वर्षात फळ आले तर छानच! जर आले नाही तर मग आपण ते तोडून टाकावे.’”
येशू एका स्त्रीला शब्बाथ दिवशी बरे करतो
10 शब्बाथ दिवशी येशू एका सभास्थानात शिकवीत होता. 11 तेथे एक स्त्री होती, तिला अशुद्ध आत्म्याने अठरा वर्षे पांगळे केले होते. ती कुबडी होती व तिला सरळ उभे राहता येत नव्हते. 12 येशूने तिला पाहिले, त्याने तिला बोलावले आणि तो तिला म्हणाला, “बाई, तुझ्या आजारापासून तू मुक्त झाली आहेस!” 13 नंतर त्याने आपले हात तिच्यावर ठेवले आणि ती तत्काळ सरळ झाली. आणि ती देवाची स्तुति करु लागली.
14 नंतर सभास्थानाचा अधिकारी रागावला, कारण येशूने शब्बाथ दिवशी तिला बरे केले होते. तो लोकांना म्हणाला, “काम करण्यासाठी सहा दिवस आहेत म्हणून या सहा दिवसांमध्ये या व बरे व्हा. पण शब्बाथ दिवशी येऊन बरे होऊ नका.”
15 येशूने त्याला उत्तर दिले, आणि म्हणाला. “ढोंग्यांनो, तुम्हांपैकी प्रत्येक जण त्याच्या बैलाला वा गाढवाला शब्बाथ दिवशी त्याच्या ठिकाणाहून सोडून पाणी पाजायला घेऊन जात नाही का? 16 ही तर अब्राहामाची कन्या आहे. सैतानाने हिला अठरा वर्षे बांधून ठेवले होते. ज्या बंधनात ती होती त्यापासून तिला शब्बाथ दिवशी सोडविणे चूक होते काय?” 17 तो असे म्हणाल्यावर जे त्याचा विरोध करीत होते त्यांना लाज वाटली व त्याने ज्या अद्भुत गोष्टी केल्या होत्या त्यामुळे सगळा समुदाय आनंद करु लागला.
देवाचे राज्य कशासारखे आहे?(A)
18 मग तो म्हणाला, “देवाचे राज्य कशासारखे आहे? आणि मी त्याची कशाबरोबर तुलना करु 19 देवाचे राज्य एका मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो मोहरीचा दाणा एका मनुष्याने घेतला व आपल्या बागेत लावला, तो वाढला आणि त्याचे झाडे झाले. आकाशातील पाखरांनी त्याच्या फांद्यांवर घरटी बांधली.”
20 तो पुन्हा म्हणाला, “मी देवाच्या राज्याची तुलना कोणाबरोबर करु 21 ते खमिरासारखे आहे. एका स्त्रीने तीन मापे पिठात खमिर मिसळले आणि ते सर्व खमिरामुळे फुगले.”
अरुंद दरवाजा(B)
22 येशू गावागावांतून आणि खेड्यापाड्यांतून जात असता व यरुशलेमाच्या दिशेने वाटचाल करीत असता तो लोकांना शिकवीत होता. 23 कोणीतरी त्याला विचारले, “प्रभु, फक्त थोड्या लोकांचेच तारण होईल का?”
तो त्यांना म्हणाला, 24 “अरुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करा, कारण मी तुम्हांला सांगतो की, पुष्कळ जण आत येण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना ते शक्य होणार नाही. 25 जेव्हा घराचा मालक उठून दार बंद करील, तेव्हा तुम्ही बाहेर उभे राहाल व दार ठोठवाल. आणि म्हणाल, ‘प्रभु, आम्हांसाठी दार उघडा!’ परंतु तो तुम्हांला उत्तर देईल, ‘तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही.’ 26 नंतर तुम्ही म्हणाल, ‘आम्ही तुमच्याबरोबर जेवलो, आम्ही तुमच्याबरोबर प्यालो, आमच्या रस्त्यावर तुम्ही शिक्षण दिले!’ 27 आणि तो तुम्हांला म्हणेल, ‘तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही, जे तुम्ही दुष्टपणा करता ते सर्व माझ्यापासून निघून जा.’
28 “तेथे रडणे व दात खाणे चालेल, तेव्हा तुम्ही अब्राहामाला, आणि इसहाकाला आणि याकोबाला आणि सर्व संदेष्ट्यांना देवाच्या राज्यामध्ये पाहाल, पण तुम्ही स्वतः मात्र बाहेर फेकलेले असाल. 29 आणि लोक पूर्वेकडून, पश्चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून येतील व देवाच्या राज्यात मेजासभोवती आपापल्या जागेवर बसतील. 30 लक्षात ठेवा की, जे शेवटचे आहेत ते पहिले होतील, व जे पहिले आहेत ते शेवटचे होतील.”
येशू यरुशलेमामध्ये मरण पावेल(C)
31 त्यावेळी काही परुशी येशूकडे आले. आणि ते त्याला म्हणाले, “येथून निघा व दुसरीकडे कुठे तरी जा, कारण हेरोद तुम्हांला ठार मारणार आहे.”
32 येशू त्यांना म्हणाला, “जा आणि त्या कोल्ह्याला सांगा, ‘ऐक, मी लोकांतून भुते काढीन, आज व उद्या रोग बरे करीन आणि तिसऱ्या दिवशी माझे काम संपवीन.’ 33 तरीही आज, उद्या आणि परवा मला पुढे गेले पाहिजे कारण संदेष्टयांनी यरुशलेमाबाहेर मरणे ह्याचा विचार करणे चूक आहे.
34 “यरुशलेमे, यरुशलेमे, जी तू संदेष्टयांना मारतेस व देवाने पाठविलेल्यांवर दगडमार करतेस! कितीतरी वेळा कोंबडी जशी पिलांना आपल्या पंखाखाली एकवटते तसे तुम्हा लोकांना एकवटण्याची माझी इच्छा होती, पण तुमची तशी इच्छा नव्हती. 35 पाहा, देवाने तुमच्या घराचा त्याग केला आहे. मी तुम्हांला सांगतो, ‘देवाच्या नावाने येणारा धन्यवादित असो [b] असे म्हणण्याची वेळ येईपर्यंत तुम्ही मला पाहणार नाही.’”
28 “लोकांना जेथून चांदी मिळते अशा खाणी असतात
आणि लोक जेथे सोने वितळवतात आणि ते शुध्द करतात अशा जागा असतात.
2 लोक जमिनीतून लोखंड काढतात.
दगडांमधून तांबे वितळवले जाते.
3 मजूर गुहेत दिवा नेतात.
ते गुहेत अगदी खोलवर शोध घेतात.
ते अगदी खोल अंधारात दगडांचा शोध घेतात.
4 ते अशुध्द धातूचा शोध घेत घेत अगदी खोलवर जातात.
लोकांच्या राहाण्याच्या जागेपासून ते खूप लांबवर आणि खोलवर जातात.
जिथे आजपर्यंत कोणीही गेला नसेल तिथे ते जातात.
ते दोरीला लोंबकळत इतरांपेक्षा खूप खोल जातात.
5 वरच्या जमिनीत धान्य उगवते.
परंतु जमिनीच्या खाली काही वेगळेच असते,
धातू शुध्द असतो अगदी अग्नीत वितळवल्यासारखा.
6 जमिनीच्या खाली इंद्रनील मणी
आणि शुध्द सोन्याचे दाणे असतात.
7 रानटी पक्ष्यांना भूपृष्ठाखालील वाटांविषयी काही माहिती नसते.
कुठल्याही बहिरी ससाण्याने त्या अंधारवाटा पाहिलेल्या नसतात.
8 रानटी जनावरे त्या वाटांवरुन गेलेली नसतात.
सिंहही त्या वाटेने गेलेला नसतो.
9 मजूर अगदी कठीण खडक खोदतात.
ते मजूर डोंगर पोखरतात आणि त्यांना बोडके करतात.
10 मजूर खडकातून बोगदा खणतात
आणि खडकातला खजिना बघतात.
11 पाणी अडवण्यासाठी मजूर धरण बांधतात.
ते दडलेल्या वस्तू बाहेर प्रकाशात आणतात.
12 “पण माणसाला शहाणपण कुठे मिळेल?
समजूतदारपणा शोधण्यासाठी आपल्याला कुठे जावे लागेल?
13 शहाणपण किती मोलाचे आहे ते आपल्याला कळत नाही.
पृथ्वीवरचे लोक जमीन खणून शहाणपण शोधू शकत नाहीत.
14 महासागर म्हणतो, ‘माझ्याजवळ शहाणपण नाही.’
सागर म्हणतो, ‘माझ्याजवळही ते नाही.’
15 तुम्ही शुध्द सोने देऊन शहाणपण विकत घेऊ शकत नाही.
ते विकत घेण्यासाठी जगात तेवढी चांदी नाही.
16 तुम्ही ओफिरच्या सोन्याने किंवा मौल्यवान शोहमच्या खड्याने
वा नीलमण्याने शहाणपण विकत घेऊ शकत नाही.
17 शहाणपण सोन्यापेक्षा किंवा स्फटिकापेक्षा मौल्यवान असते.
सोन्यात जडवलेले मौल्यवान खडेही शहाणपण विकत घेऊ शकत नाही.
18 शहाणपण पोवळ्यापेक्षा वा स्फटिकापेक्षाही मौल्यवान आहे.
माणकापेक्षा ही त्याचे मोल अधिक आहे.
19 इथिओपियातले पीत स्फटिक शहाणपणापेक्षा अधिक मौल्यवान नाहीत.
शुध्द सोन्याने तुम्ही तो विकत घेऊ शकत नाही.
20 “मग शहाणपणा कुठून येतो?
समजूतदारपणा आपल्याला कुठे मिळेल?
21 पृथ्वीवरील सर्व जिवंत प्राण्यापासून शहाणपण लपवून ठेवले आहे.
आकाशातले पक्षीसुध्दा ते बघू शकत नाहीत.
22 मृत्यू आणि विनाश [a] म्हणतात,
‘आम्हाला शहाणपण सापडले नाही.
आम्ही त्याबद्दलच्या फक्त अफवाच ऐकल्या आहेत.’
23 “फक्त देवालाच शहाणपणाकडे नेणारा मार्ग माहीत आहे.
फक्त देवालाच तो कुठे आहे ते माहीत आहे.
24 देवाला पृथ्वीचे अगदी शेवटचे टोकसुध्दा दिसू शकते.
त्याला आकाशाखालचे सर्व काही दिसते.
25 देवाने वाऱ्याला त्यांची शक्ती दिली.
सागराला किती मोठे करायचे ते त्यानेच ठरवले.
26 पावसाला कोठे पाठवायचे ते त्यानेच ठरवले
आणि वादळाने कुठे जायचे तेही त्यानेच ठरवले.
27 त्याच वेळी देवाला शहाणपण दिसले आणि त्याने त्याचा विचार केला.
शहाणपणाचे मूल्य किती आहे ते त्याने जोखले आणि त्या शहाणपणाला संमती दिली.
28 आणि देव लोकांना म्हणाला,
‘परमेश्वराची भीती बाळगा व त्याला मान द्या तेच शहाणपण आहे.
वाईट गोष्टी करु नका तोच समजूतदारपणा आहे.’”
मंडळीला मदत करण्यासाठी आध्यात्मिक दाने वापरा
14 प्रीतीसाठी प्रयत्न करा. आणि आध्यात्मिक दानांची विशेषतः तुम्हांला संदेश देता यावा याची मनापासून इच्छा बाळगा. 2 ज्याला इतर भाषांमध्ये बोलण्याचे दान आहे तो खरे पाहता माणसांबरोबर बोलत नाही तर देवाबरोबर बोलतो. कारण तो काय बोलतो हे कोणालाही कळत नाही. आत्म्याच्या द्वारे तो गुढ गोष्टी बोलतो. 3 परंतु जो संदेश देतो तो लोकांशी बोध, उन्नती, उपदेश याविषयी बोलतो, 4 ज्याला दुसऱ्या भाषेत बोलण्याचे दान आहे, तो स्वतःचीच आध्यात्मिकदृष्ट्या उन्नती करुन घेतो, पण ज्याला संदेश देण्याचे (देवासाठी बोलण्याचे) दान आहे तो संपूर्ण मंडळीची उन्नती करतो.
5 आता तुम्ही सर्वांनी भाषांमध्ये बोलावे अशी माझी इच्छा आहे, परंतु त्याहीपेक्षा जर तुम्हांला संदेश देता आले तर मला अधिक आवडेल. जो संदेश देतो, (देवासाठी बोलतो) तो भाषा बोलणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, पण भाषा बोलणारा हा संदेश देणाऱ्यासारखाच (देवासाठी बोलणाऱ्यासारखाच) आहे, जर त्याने जी भाषा तो बोलतो तिचा अर्थ सांगितला तर, त्याद्वारे संपूर्ण मंडळी आध्यात्मिकदृष्ट्या बळकट होते.
6 आता, बंधूनो, जर मी तुमच्याकडे अन्य भाषा बोलण्यासाठी आलो तर तुमचा कसा फायदा होईल? तुमचा फायदा होण्यासाठी मी तुमच्याकडे प्रकटीकरण, दैवी ज्ञान, देवाकडून संदेश किंवा शिकवणूक आणायला नको का? 7 हे निर्जीव वस्तू उदा. बासरी, वीणा यासारखे आवाज काढण्यासारखे आहे: जर ते वाद्य ते निर्माण करीत असलेल्या वेगवेगळ्या आवाजातील फरक स्पष्ट करीत नाही, तर एखाद्याला बासरीवर किंवा वीणेवर कोणते संगीत वाजवले जात आहे ते कसे कळेल? 8 आणि जर कर्णा अस्पष्ट आवाज काढील तर लढाईसाठी कोण तयार होईल?
9 त्याचप्रमाणे सहज समजेल अशा भाषेतून बोलल्याशिवाय तुम्ही काय बोलला हे कोणाला कसे समजेल? कारण तुम्ही हवेत बोलल्यासारखे होईल. 10 नि:संशय, जगात पुष्कळ प्रकारच्या भाषा आहेत, व कोणतीही अर्थविरहीत नाही. 11 म्हणून जर मला भाषेचा अर्थ समजला नाही तर जो बोलत आहे त्याच्यासाठी मी विदेशी ठरेन व जो बोलणारा आहे तो माझ्यासाठी विदेशी होईल. 12 नेमके तेच तुम्हांलाही लागू पडते जर तुम्ही आध्यात्मिक दाने मिळवीत म्हणून उत्सुक आहात तर मंडळीच्या उन्नतीसाठी, मंडळीला आध्यत्मिक मजबूती येण्यासाठी जोरदार प्रयत्न करा.
13 म्हणून, जो दुसऱ्या भाषेत बोलतो त्याने तो जे बोलला आहे त्याचा अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी. 14 कारण जर मी दुसऱ्या भाषेतून प्रार्थना केली तर माझा आत्माही प्रार्थना करतो पण माझे मन रिकामे राहते. 15 मग काय केले पाहिजे? मी माझ्या आत्म्याने प्रार्थना करीन पण त्याचप्रमाणे मी माझ्या बुद्धिनेही प्रार्थना करीन. 16 कारण जर तू तुझ्या आत्म्याने देवाचे धन्यवाद करशील तर जो फक्त ऐकणारा सामान्य तेथे बसला असेल तर तो तुझ्या उपकारस्तुतीच्या प्रार्थनेत “आमेन” कसे म्हणेल? कारण तू काय म्हणतोस ते त्याला कळत नाही. 17 आता तू धन्यवाद देत असलास हे जरी चांगले असले तरी दुसरी व्यक्ति आध्यात्मिकदृष्ट्या बलवान झालेली नसते.
18 मी देवाचे उपकार मानतो, कारण मी तुम्हा सर्वांपेक्षा अधिक भाषा बोलू शकतो ज्याचे दान मला आहे, 19 परंतु सभेत इतरांनाही बोध करता यावा म्हणून इतर भाषेत दहा हजार शब्द बोलण्यापेक्षा माझ्या मनाप्रमाणे पाच शब्द सांगणे मी पसंत करतो.
20 बंधूनो, तुमच्या विचार करण्यात मुलासारखे असू नका. त्याऐवजी दुष्टतेच्या बाबतीत लहान बाळासारखे निरागस परंतु आपल्या विचारात प्रौढ व्हा. 21 नियमशास्त्र म्हणते,
“इतर भाषा बोलणाऱ्याचा
उपयोग करुन,
मी या लोकांशी बोलेन
तरीसुद्धा ते माझे ऐकणार नाहीत.” (A)
हे असे प्रभु म्हणतो.
22 म्हणून इतर भाषांमध्ये बोलण्याचे दान हे विश्वासणाऱ्यांसाठी नसून अविश्वासणाऱ्यांसाठी आहे. 23 म्हणून जर संपूर्ण मंडळी एकत्र येते व प्रत्येकजण दुसऱ्या भाषेत बोलत असेल (आणि) जर एखादा बाहेरचा किंवा अविश्वासणारा आत आला, तर तुम्ही वेडे आहात असे ते तुम्हाला म्हणणार नाही का? 24 परंतु जर प्रत्येक जण संदेश देऊ लागला आणि जर अविश्वासणारा किंवा बाहेरचा आत आला, तर सर्वजण जे बोलत असतील त्यामुळे त्या ऐकणाऱ्याला त्याच्या पापाची जाणीव होते, ते सर्व त्याचा न्याय करतात; 25 त्याच्या अंतःकरणातील गुपिते माहीत होतात. आणि मग तो पालथा पडतो आणि देवाची उपासना करतो व म्हणतो “खरोखर देव तुमच्यामध्ये आहे!”
तुमच्या भेटींनी मंडळीला मदत व्हावी
26 बंधूनो, मग काय करावे? जेव्हा तुम्ही एकत्र येता, प्रत्येकाकडे गाण्यासाठी स्तोत्र असते कोणाकडे शिक्षण असते. कोणाकडे प्रकटीकरण असते. कोणी दुसऱ्या भाषेत बोलतो, कोणी त्या भाषेचा अर्थ सांगतो, प्रत्येक गोष्ट मंडळीच्या वाढीसाठी केली गेली पाहिजे. 27 जर कोणी दुसऱ्या भाषेत बोलणार असेल तर दोघांनी किंवा जास्तीत जास्त तिघांनी बोलावे, एका वेळी एकानेच बोलावे, आणि एका व्यक्तीने त्या बोलण्याचा अर्थ सांगावा. 28 जर मंडळीत अर्थ सांगणारा कोणी नसेल तर भाषा बोलणाऱ्याने सभेत गप्प बसावे, व स्वतःशी व देवाशी बोलावे.
29 दोघा किंवा तिघांनी संदेश द्यावा व इतरांनीही ते काय बोलतात याची परीक्षा करावी. 30 बसलेल्यांपैकी एखाद्या व्यक्तीला जर काही प्रकट झाले तर पहिल्या संदेश देणाऱ्याने गप्प बसावे. 31 जर तुम्हा सर्वांना संदेश देता येत असेल, तर एका वेळी एकानेच बोलावे, यासाठी की सर्वजण शिकतील, सर्वांना बोधपर मार्गदर्शन मिळेल. 32 जे आत्मे भविष्यवाद्यांना प्रेरणा देतात, ते त्या संदेष्ट्यांच्या स्वाधीन असतात. 33 कारण देव हा बेशिस्तपणा आणणारा नसून, शांति आणणारा देव आहे. जशा सर्व मंडळ्या देवाच्या पवित्र लोकांच्या बनलेल्या असतात,
34 स्त्रियांनी सभेत गप्प बसावे, कारण त्यांच्यासाठी सभेत बोलण्याची परवानगी देण्यात आलेली नाही, कारण नियमशास्त्रसुद्धा असेच म्हणते, 35 त्यांना जर काही शिकायचे असेल, तर त्यांनी स्वतःच्या पतीला घरी विचारावे. कारण स्त्रीने सभेत बोलणे हे तिला लज्जास्पद आहे.
36 तुमच्याकडूनच देवाचा संदेश बाहेर गेला होता काय? किंवा ते फक्त तुमच्यापर्यंतच आले आहे? 37 एखादा जर स्वतःला संदेष्टा समजत असेल किंवा जर तो धार्मिक मनुष्य असेल तर त्याने हे ओळखले पाहिजे की, जे मी तुम्हाला लिहित आहे ती देवाकडून देण्यात आलेली आज्ञा आहे. 38 म्हणून जर कोणी ती मानत नसेल, तर त्यालाही मानण्यात येणार नाही.
39 म्हणून माझ्या बंधूनो, देवासाठी संदेश देण्यासाठी उत्सुक असा, दुसऱ्या भाषेत बोलणाऱ्याला मना करु नका. 40 तर सर्व गोष्टी योग्य रीतीने आणि व्यवस्थित असाव्यात.
2006 by World Bible Translation Center