Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
निर्गम 4

मोशेकरिता पुरावा

मग मोशे देवाला म्हणला, “तू मला पाठवले आहेस असे मी इस्राएल लोकांना सांगेन तेव्हा ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत; ते म्हणतील, ‘परमेश्वराने तुला दर्शन दिले नाही.’”

परंतु देव मोशेला म्हणाला, “तुझ्या हातात ते काय आहे?”

मोशेने उत्तर दिले, “ती माझी काठी आहे.”

मग देव म्हणाला, “तुझ्या हातातली तुझी काठी जमिनीवर टाक.”

तेव्हा मोशेन तसे केले; आणि त्या काठीचा साप झाला. तेव्हा मोशे घाबरला व त्यापासून बाजूला पळाला. परंतु परमेश्वर मोशेला म्हणला, “तुझा हात पुढे कर व त्या सापाची शेपटी धर.”

तेव्हा मोशेने तसे केल्यावर त्या सापाची पुन्हा काठी झाली. मग देव म्हणाला, “ह्याप्रमाणे तुझ्या काठीचा उपयोग कर म्हणजे मग तू इस्राएली पूर्वजांच्या परमेश्वराला म्हणजेच अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव. याला भेटलास असा ते लोक विश्वास धरतील.”

मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी तुला आणखी एक चिन्ह किंवा पुरावा देतो. तू तुझा हात झग्याच्या आत तुझ्या छातीवर ठेव”

तेव्हा मोशेने आपला हात झाग्याच्या आत आपल्या छातीवर ठेवला; मग त्याने आपला हात बाहेर काढला तेव्हा त्यावर बफर्सारखे पांढरे डाग दिसले; [a] असा त्याचा हात बदलून गेला.

मग देव म्हणाला, “आता पुन्हा तुझा हात झग्याच्या आत तुझ्या छातीवर ठेव.” तेव्हा मोशेने तसे केले. मग त्याने आपला हात तेथून काढला तेव्हा त्याच्यात बदल होऊन तो पुन्हा पूर्वी सारखा चांगला झाला.

मग देव बोलला, “तू तुझ्या काठीचा चमत्कार दाखवल्यावरही जर त्या लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. तर मग हा हाताचा चमत्कार दाखवल्यावर ते तुझ्यावर विश्वास ठेवतील. हे दोन्ही चमत्कार दाखवल्यावरही त्यांनी जर तुझ्यावर विश्वास ठेवला नाही तर मग नाईल नदीचे थोडे पाणी घे आणि ते जमिनीवर ओत; ओतल्याबरोबर त्याचे रक्त होईल.”

10 परंतु मोशे परमेश्वराला म्हणाला, “परंतु परमेश्वरा मी तुला खरे ते सांगतो; मी काही चांगला वक्ता नाही; मला लोकांसमोर कधीही नीट बोलता आलेले नाही. आणि आता तुझ्याबरोबर बोलल्यानंतरही नाही. तुला माहीत आहे की मी सावकाश व अडखळत बोलतो आणि बोलताना मला योग्य, परिणामकारक शब्द सापडत नाहीत;”

11 मग परमेश्वर त्याला म्हणाला, “माणसाचे तोंड कोणी केले? माणसाला बहिरा, मुका, आंधळा किंवा डोळस कोण करतो? मीच की नाही? मी ‘याव्हे’ आहे! होय ना? 12 तेव्हा मी सांगतो, तू आता जा. तू बोलत असताना मी तुझ्याबरोबर असेन. मी योग्य शब्द तुझ्या मुखात घालीन.”

13 परंतु मोशे म्हणाला, “माझ्या परमेश्वरा! मी तुला कळकळीची विनंती करतो की तू दुसऱ्या कोणाला पाठव. मला नको.”

14 परमेश्वर मोशेवर रागावला! परमेश्वर म्हणाला, “मी तुला आणखी मदत देतो. लेवी कुटुंबातील तुझा भाऊ अहरोन याचा मी उपयोग करतो. तो पटाईत वक्ता आहे. तो अगोदरच तुझ्याकडे येण्यास निघाला आहे. तुला भेटल्यावर त्याला आनंद होईल. 15 तो तुझ्याबरोबर फारोकडे येईल. तू काय बोलावेस ते मी तुला सांगेन: मग ते तू अहरोनाला सांग, आणि मग अहरोन योग्य शब्दात फारोशी बोलेल. 16 आणि अहरोन तुझ्या तर्फे लोकांशी बोलेल; तो तुझे मुख होईल आणि त्याने काय बोलावे हे सांगणारा तू त्याला देवासारखा होशील. 17 तर आता जा! तुझी काठी तुझ्या सोबत घे. मी तुझ्याबरोबर आहे हे लोकांना दाखवण्यासाठी त्या काठीचा व इतर चमत्कारांचा उपयोग कर!”

मोशे मिसरला परत जातो

18 मग मोशे आपला सासरा इथ्रो याच्याकडे परत गेला. तो इथ्रोला म्हणाला, “मला मिसरला माझ्या भाऊबंदाकडे जाऊ द्या. ते अद्याप जिवंत आहेत की नाहीत ते मला पाहू द्या.”

इथ्रो म्हणाला, “तू शांततेने जा.”

19 तेव्हा मोशे अद्याप मिद्यानात असताना देव त्याला म्हणाला, “आता मिसरला परत जाणे तुझ्यासाठी सुरक्षिततेचे आहे. जे लोक तुला ठार मारु पाहात होते ते आता मरण पावले आहेत.”

20 तेव्हा मोशेने आपली बायको व आपल्या मुलांना गाढवांवर बसवले व त्यांना घेऊन तो मिसरला माघारी गेला. त्यांने देवाच्या सामर्थ्याने भरलेली आपली काठी बरोबर नेली.

21 मोशे मिसरचा प्रवास करत आसताना देव त्याच्याबरोबर बोलला, देव म्हणाला, “तू फारोशी बोलताना मी तुला जे चमत्कार करण्याची शक्ती दिली आहे त्यायोगे ते चमत्कार त्याला दाखवण्याची आठवण ठेव. परंतु मी फारोचे मन अतिशय कठीण करीन; तो तुम्हाला जाऊ देणार नाही. 22 मग तू फारोला सांग की 23 परमेश्वर म्हणतो, ‘इस्राएल माझा मोठा मुलगा [b] आहे. आणि मी तुला सांगत आहे की तू माझ्या थोरल्या मुलाला माझी उपासना करण्याकरिता जाऊ दे! जर तू माझ्या प्रथम जन्मलेल्या मुलास म्हणजे माझ्या इस्राएल लोकांस जाऊ देण्याचे नाकारशील तर मी तुझ्या प्रथम जन्मलेल्या म्हणजे थोरल्या मुलास ठार मारीन.’”

मोशेच्या मुलाची सुंता होते

24 मोशे मिसरच्या प्रवासात असताना एके ठिकाणी मुक्कामासाठी थांबला. तेव्हा परमेश्वराने मोशेला त्या ठिकाणी गाठून त्याला ठार मारण्याचा [c] प्रयत्न केला. 25 परंतु सिप्पोराने एक गारगोटीची धारदार सुरी घेतली व तिने आपल्या मुलाची सुंता केली. मग तिने मुलाची अग्रत्वचा घेतली आणि ती मोशेच्या पायावर ठेवून ती त्याला म्हणाली, “तू माझा रक्ताने मिळवलेला नवरा आहेस.” 26 सिप्पोरा असे म्हणाली कारण तिला आपल्या मुलाची सुंता करावी लागली. तेव्हा देवाने मोशेला क्षमा केली व त्याला ठार मारले नाही.

देवासमोर मोशे व अहरोन

27 परमेश्वराने अहरोनाला सांगितले होते, “तू वाळवंटात जाऊन मोशेला भेट,” म्हणून अहरोन देवाच्या डोंगरावर म्हणजे होरेब किंवा सिनाय डोंगरावर जाऊन मोशेला भेटला. मोशे भेटल्यावर अहरोनाने त्याचे चुंबन घेतले. 28 परमेश्वराने मोशेला सांगितलेल्या सर्व गोष्टी मोशेने अहरोनाला सांगितल्या व देवाने त्याला का पाठवले तेही सांगितले; तसेच परमेश्वराने मोशेला जे चमत्कार करून दाखवावयाची आज्ञा दिली होती त्याविषयीही त्याने अहरोनाला सांगितले.

29 मग मोशे व अहरोन यांनी जाऊन इस्राएली वंशजाचे सर्व वडीलधारी एकत्र जमवले. 30 नंतर परमेश्वराने मोशेला सांगितलेल्या सर्व गोष्टी अहरोनाने लोकांस कळवल्या; त्यानंतर मोशेने लोकांसमक्ष चमत्कार करून दाखवले. 31 तेव्हा देवानेच मोशेला पाठवले असल्याबद्दल त्यांची खात्री झाली. देवाने त्यांच्या हालअपेष्टा पाहिल्या आहेत व तो त्यांना भेटण्यास आला आहे हे त्यांना माहीत झाले. तेव्हा त्यांनी नमन करून देवाची उपासना केली.

लूक 7

येशू एका नोकराला बरे करतो(A)

ज्या बोधकथा लोकांनी ऐकाव्यात असे त्याला वाटत होते त्या सांगण्याचे संपविल्यावर तो कफर्णहूमास गेला. तेथे एक रोमी शताधिपती होता. त्याचा गुलाम इतका आजारी होता की, तो मरावयास टेकला होता. हा गुलाम त्या शताधिपतीचा फार आवडता होता. जेव्हा शताधिपतीने येशूविषयी ऐकले तेव्हा त्याने काही यहूदी वडील जनांना त्याच्याकडे पाठविले, व अशी विनंति केली की, त्याने येऊन त्याच्या गुलामाला वाचवावे. जेव्हा ते येशूकडे आले तेव्हा त्यांनी मनःपूर्वक विनंति केली, ते म्हणाले, “तू त्याच्यासाठी हे करावेस कारण तो त्या योग्यतेचा आहे. कारण तो आमच्या लोकांवर प्रेम करतो, त्याने आमचे सभास्थान आम्हांला बाधून दिले.”

म्हणून येशू त्यांच्याबरोबर गेला. तो घरापासून दूर नव्हता, तोच शताधिपतीने मित्रांना असे सांगण्यासाठी पाठविले की, “प्रभु, आपण त्रास करुन घेऊ नका, कारण आपण माझ्या घरी यावे इतकी माझी योग्यता नाही. यासाठी मी स्वतः आपणाकडे येऊ नये असा विचार केला होता. परंतु तुम्ही फक्त शब्द बोला, म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार असून माझ्या अधिपत्याखाली शिपाई आहेत. मी एखाद्याला, ‘जा’ असे म्हणतो, आणि तो जातो, दुसऱ्याला ‘ये’ म्हणतो आणि तो येतो. मी माझ्या गुलामाला म्हणतो, ‘हे कर!’ आणि तो ते करतो.”

जेव्हा येशूने हे ऐकले तेव्हा त्याला त्याच्याविषयी (शताधिपतीविषयी) आश्चर्य वाटले. तो त्याच्यामागे येणाऱ्या जमावाकडे वळून म्हणाला, “मी तुम्हांला सांगतो, असा विश्वास मला इस्राएलात देखील आढळला नाही.”

10 ज्यांना पाठविले होते, ते घराकडे परतले, तेव्हा त्यांना आढळून आले की, तो सेवक बरा झाला आहे.

येशू एका मेलेल्या माणसाला जिवंत करतो

11 नंतर असे झाले की, येशू नाईन नावाच्या गावाला गेला. त्याच्याबरोबर त्याचे शिष्य व मोठा समुदाय होता. 12 तो गावाच्या वेशीजवळ आला असता, एका मेलेल्या माणसाला अंत्यविधीकरीता नेले जात होते. तो त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा होता. आणि ती विधवा होती. आणि गावातील बरेच लोक तिच्याबरोबर होते. 13 जेव्हा प्रभुने तिला पाहिले, त्याला तिची अनुकंपा वाटली व तो तीला म्हणाला, “रडू नकोस.” 14 नंतर तो पुढे तिरडीजवळ गेला व तिला स्पर्श केला. जे लोक तिरडी वाहून नेत होते, ते थांबले. 15 तेव्हा येशू म्हणाला, “तरुणा, मी तुला सांगतो, ऊठ!” आणि तो मृत मनुष्य उठून बसला व बोलू लागला. मग येशूने त्याला त्याच्या आईकडे दिले.

16 ते सर्व भयचकित झाले, त्यांनी देवाचे गौरव केले; ते म्हणाले, “आमच्यामध्ये एक महान संदेष्टा प्रगट झाला आहे.” आणि म्हणाले, “देव त्याच्या लोकांना मदत करण्यास आला आहे!”

17 येशूविषयीची ही बातमी सर्व यहूदीयात आणि सभोवतालच्या परिसरात पसरली.

योहान प्रश्न विचारतो(B)

18 योहानाच्या शिष्यांनी योहानाला जाऊन हे सर्व सांगितले, नंतर योहानाने आपल्या दोन शिष्यांना बोलाविले 19 आणि त्याने त्यांना प्रभुकडे हे विचारण्यासाठी पाठविले की, “जो येणारा तो तूच आहेस की, आम्ही दुसऱ्या कोणाची तरी अपेक्षा करावी?”

20 जेव्हा लोक त्याच्याकडे आले, ते म्हणाले, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने आम्हांला तुमच्याकडे हे विचारण्यास पाठविले आहे की, ‘जो येणारा तो तूच आहेस की आम्ही दुसऱ्या कोणाची अपेक्षा करावी?’”

21 त्यावेळी येशूने अनेक लोकांचे रोग, आजार बरे केले, पुष्कळांमधील भुते काढली, आंधळ्यांना दृष्टी दिली. 22 येशूने त्यांना उत्तर दिले, “जा आणि तुम्ही जे ऐकले व पाहिले आहे ते योहानाला सांगा: आंधळे पाहतात, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले जिवंत केले जातात आणि गरीब लोक सुवार्ता ऐकतात. 23 जो मला अनमान न करता स्वीकारतो, तो धन्य.”

24 योहानाचे निरोपे गेल्यावर येशू समुदायाबरोबर योहानाविषयी बोलू लागला: “वाळवंटात तुम्ही काय पाहण्यासाठी गेला होता? वाऱ्याने वाकलेल बोरु? 25 नाही, मग काय पाहण्यासाठी तुम्ही गेला होता? कपडे घातलेला मनुष्य? नाही. तलम कपडे घालणारे आणि ऐषारामात राहणारे लोक राजवाड्यात राहतात. 26 पण तुम्ही बाहेर काय पाहण्यासाठी गोला होता? संदेष्टा? होय, मी तुम्हांला सांगतो, तुम्ही संदेष्ट्यापेक्षा काही तरी अधिक पाहिले आहे! 27 हाच तो ज्याच्याविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे,

‘पाहा, मी माझ्या संदेशवाहकाला माझ्यापुढे पाठवीत आहे.
    तो तुमच्यापुढे मार्ग तयार करील.’ (C)

28 मी तुम्हांला सांगतो, जे स्त्रियांपासून जन्मले त्यात योहानापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. तरीही देवाच्या राज्यातील अगदी सामान्य माणूस सुध्दा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे.”

29 (जेव्हा लोकांनी हे ऐकले, तेव्हा त्यांनी मान्य केले की, देवाची शिकवण चांगली आहे. जकातदारसुद्धा सहमत झाले. या लोकांना योहानाने अगोदरच बाप्तिस्मा दिला होता. 30 पण परुशी व नियमाशास्त्राच्या शिक्षकांनी देवाची त्यांच्याविषयी असलेली योजना नाकारली. त्यांनी योहानाला त्यांचा बाप्तिस्मा करु दिला नाही.)

31 “मग मी या पिढीची कोणाशी तुलना करु? ते कोणासारखे आहेत? 32 ते उनाड मुलांसारखे आहेत, ते बाजारात बसतात, ते एकमेकाला म्हणतात,

‘आम्ही तुमच्यासाठी पावा वाजविला
    पण तुम्ही नाचला नाही.
आम्ही तुमच्यासाठी शोकगीत गाईले
    पण तुम्ही रडला नाही.’

33 बाप्तिस्मा करणारा योहान हा भाकर किंवा द्राक्षारस खात किंवा पीत आला नाही. पण तुम्ही म्हणता, ‘त्याला भूत लागले आहे.’ 34 मनुष्याचा पुत्र खात पीत आला आणि तुम्ही म्हणता, ‘पाहा, तो खादाड, मद्यपी, जकातदारांचा आणि पाप्यांचा मित्र आहे.’ 35 ज्ञान तेव्हा योग्य ठरते, जेव्हा त्याचा वापर केल्याने झालेल्या गोष्टी योग्य असतात.”

शिमोन परुशी

36 कोणा एका परुश्याने येशूला त्याच्याबरोबर जेवणाचे आमंत्रण दिले, म्हणून तो परुश्याच्या घरी गेला व मेजासभोवती आपल्या जागेवर बसला.

37 तेथे त्या गावात एक स्त्री होती, ती पापी होती, जेव्हा तिला समजले की, येशू परुश्याच्या घरी जेवत आहे, तेव्हा तिने सुगंधी तेलाचे एक अलावास्त्र भांडे आणले. 38 ती त्याच्या पाठीमागे पायाशी उभी राहून रडत होती, ती आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली. नंतर तिने ते आपल्या केसांनी पुसले, त्याच्या पायाचे मुके घेतले व त्यावर सुगंधी तेल ओतले.

39 ज्या परुश्याने हे आमंत्रण दिले होते त्याने ते पाहिले आणि तो स्वतःशी म्हणाला, “जर हा मनुष्य संदेष्टा असता, तर ही कोण व कशा प्रकारची स्त्री आपल्या पायाला स्पर्श करीत आहे, हे त्याला कळले असते!”

40 येशू त्याला म्हणाला, “शिमोना, मला तुला काही सांगायचे आहे.”

त्याने उत्तर दिले, “सांगा गुरुजी.”

41 येशू म्हणाला, “एका सावकाराचे दोन कर्जदार होते. एकाकडे पाचशे चांदीची नाणी आणि दुसऱ्याकडे पन्नास चांदीची नाणी असे कर्ज होते. 42 ते कर्ज फेडू शकत नसल्याने सावकाराने दोघांचीही कर्ज माफ केली, आता त्यांच्यापैकी कोण त्याच्यावर अधिक प्रेम करील?”

43 शिमोनाने उत्तर दिले, “मला वाटते, ज्याचे कर्ज जास्त होते तो.”

येशू त्याला म्हणाला, “तू बरोबर ओळखलेस.” 44 तो स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हणाला, “तू ही स्त्री पाहतोस काय? मी तुझ्या घरी आलो तेव्हा माझे पाय धुण्यास तू मला पाणी दिले नाहीस. परंतु हिने माझे पाय अंश्रूंनी ओले केले. ते तिने केसांनी पुसले. 45 तू मला साधे शुभेच्छालिंगन सुध्दा दिले नाहीस, पण मी आत आल्यापासून तिने माझ्या पायाचे मुके घेण्याचे थांबवले नाही. 46 तू माझ्या डोक्याला तेल लावले नाही, परंतु तिने माझ्या पायावर सुगंधी तेल ओतले. 47 यासाठी मी तुला सांगतो की तिच्या अनेक पापांची क्षमा झाली आहे. हे स्पष्ट आहे कारण तिने विपुल प्रेम दाखविले आहे. परंतु ज्याला कमी माफ केले आहे तो कमी प्रेम करतो.”

48 तेव्हा तो तिला म्हणाला, “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”

49 नंतर जे त्यांच्याबरोबर जेवत होते ते स्वतःशीच म्हणू लागले, “हा कोण आहे, जो पापांचीसुद्धा क्षमा करतो?”

50 पण तो स्त्रीला म्हणाला, “तुझ्या विश्वासाने तुला वाचविले आहे, शांतिने जा.”

ईयोब 21

ईयोब उत्तर देतो

21 नंतर ईयोबाने उत्तर दिले:

“मी काय म्हणतो ते ऐक.
    माझे सांत्वन करण्याची ती तुझी पध्दत असू दे.
मी बोलेन तेव्हा तू थोडा धीर धर.
    माझे बोलणे संपल्यावर तू माझी थट्टा करु शकतोस.

“मी लोकांविरुध्द तक्रार करीत नाही.
    मी अधीर झालो आहे त्याला काही कारण आहे.
माझ्याकडे बघितल्यावर तुला धक्का बसेल.
    तुझे हात तोंडावर ठेव आणि माझ्याकडे अचंब्याने बघत रहा.
माझ्यावर आलेल्या प्रसंगांचा विचार करायला लागलो म्हणजे मला भीती वाटते
    आणि माझ्या शरीराचा थरकाप होतो.
दुष्ट माणसांना जास्त आयुष्य का असते?
    ते वृध्द आणि यशस्वी का होतात?
दुष्ट माणसे आपली मुले बाळे मोठी होत असलेली बघतात.
    आपली नातवंडे बघायला ती जिवंत राहतात.
त्यांची घरे सुरक्षित असतात आणि त्यांना भय नसते.
    दुष्टांना शिक्षा करण्यासाठी देव आपली छडी वापरीत नाही.
10 त्यांचे बैल प्रजोत्पादनात असफल होत नाही.
    त्यांच्या गायींना वासरे होतात आणि वासरे जन्मतःच मृत्युमुखी पडत नाहीत.
11 दुष्ट लोक आपल्या मुलांना कोकरा प्रमाणे बाहेर खेळायला पाठवतात.
    त्यांची मुले सभोवती नाचत असतात.
12 ते तंतुवाद्याच्या आणि वीणेच्या आवाजावर गातात आणि नाचतात.
13 दुष्ट लोक त्यांच्या आयुष्यात यशाचे सुख अनुभवतात.
    नंतर ते मरतात आणि दु:खी न होता थडग्यात जातात.
14 परंतु दुष्ट लोक ‘आम्हाला एकटे सोड.
    तू आम्हाला जे करायला सांगतोस त्याची आम्हाला पर्वा नाही’ असे देवाला सांगतात.
15 आणि दुष्ट लोक म्हणतात, ‘सर्वशक्तिमान देव कोण आहे?
    आम्हाला त्याची चाकरी करण्याची गरज नाही.
    त्याची प्रार्थना करण्यात काही अर्थ नाही.’

16 “दुष्ट लोकांचा त्यांच्या यशात स्वतःचा काही वाटा नसतो हे खरे आहे.
    मी त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागू शकत नाही.
17 परंतु देव दुष्ट माणसांचा प्रकाश किती वेळा मालवू शकतो?
    किती वेळा त्यांच्यावर संकटे कोसळतात?
    देव त्यांच्यावर रागावून त्यांना शिक्षा करतो का?
18 देव दुष्ट लोकांना वाऱ्यावर गवत
    किंवा धान्याची टरफले उडवून देतो का?
19 पण तू म्हणतोस ‘देव वडिलांच्या पापाबद्दल मुलाला शिक्षा करतो.’
    नाही देवाने दुष्टालाच शिक्षा करायला हवी.
    तेव्हाच त्या दुष्टाला कळेल की त्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळत आहे.
20 पापी माणसाला शिक्षा भोगू दे.
    त्याला सर्वशक्तिमान देवाच्या रागाचा अनुभव घेऊ दे.
21 दुष्टाचे आयुष्य संपल्यावर तो मरतो.
    तो मागे राहिलेल्या कुटुंबाची पर्वा करीत नाही.

22 “देवाला कुणीही ज्ञान शिकवू शकत नाही.
    देव मोठ्या पदावर असलेल्या लोकांचाही न्यायनिवाडा करतो.
23 एखादा माणूस संपूर्ण आणि यशस्वी जीवन जगल्यानंतर मरतो.
    त्याने अत्यंत सुरक्षित आणि स्वास्थ्यपूर्ण जीवन जगलेले असते.
24 त्याचे शरीर चांगले पोसलेले होते
    आणि त्याची हाडे मजबूत होती.
25 परंतु दुसरा माणूस अत्यंत हालाखीचे जीवन जगतो व मरतो.
    त्यांचे अंतःकरण कडवट झालेले असते.
    त्याने काहीही चांगले भोगलेले नसते.
26 शेवटी हे दोघेही बरोबरच मातीत जातील.
    किडे त्यांना झाकून टाकतील.

27 “पण तू कसला विचार करीत आहेस ते मला माहीत आहे.
    कोणत्या डावपेचांनी मला दु:ख द्यायची तुझी इच्छा आहे हे मला माहीत आहे.
28 तू कदाचित् म्हणशील ‘मला चांगल्या माणसाचे घर दाखव.
    आता मला दुष्ट माणसे कोठे राहतात ते दाखव.’

29 “तू प्रवाशांबरोबरच बोलला असशील
    आणि तू त्यांच्याच गोष्टी खऱ्या धरुन चालशील.
30 संकटे कोसळतात तेव्हा दुष्ट माणसे त्यातून वाचतात.
    देवाच्या क्रोधातून ते सहीसलामत सुटतात.
31 दुष्टांनी केलेल्या वाईट कृत्यांबद्दल त्यांना कुणी शिक्षा करत नाही.
    त्यांच्या तोंडावर कुणी त्याबद्दल टीका करीत नाही.
32 दुष्ट माणूस स्मशानात गेल्यावर
    तेथील रक्षक त्याच्या थडग्याची देखभाल करतो.
33 म्हणून दरीतली माती देखील दुष्ट माणसाठी सुखावह असेल.
    व त्याच्या अंत्ययात्रेत हजारो लोक सामील होतील.

34 “म्हणून तुमच्या पोकळ शब्दांनी तुम्ही माझे सांत्वन करु शकणार नाही.
    तुमची उत्तरे माझ्या उपयोगाची नाहीत.”

1 करिंथकरांस 8

मूर्तीला अर्पिलेल्या अन्राविषयी

आता, मूर्तिंना अर्पण केलेल्या गोष्टीविषयी: आम्हाला माहीत आहे की, “आम्हा सर्वांना ज्ञान आहे.” ज्ञान लोकांना गर्वाने फुगविते. परंतु प्रीति लोकांना बलवान होत जाण्यास मदत करते. जर एखाद्याला वाटत असेल की, त्याला काही माहीत आहे, तर जसे त्याला कळायला पाहिजे तसे त्याला माहीत नसते. पण जर कोणी देवावर प्रीति करतो तर देवाला तो माहीत असतो.

म्हणून मूर्तिला वाहिलेल्या अन्राविषयी आपल्याला माहीत आहे की, “जगामध्ये खरी मूर्तिच नाही.” आणि त्या एकाशिवाय दुसरा देव नाही. आणि जरी लोक त्यांना देव म्हणतात, तरी असे अनेक तथाकथित देव आहेत जे स्वर्गात किंवा पृथ्वीवर आहेत (आणि पुष्कळ देव व पुष्कळ प्रभु आहेत) परंतु आमच्यासाठी फक्त एकच देव जो पिता तो आहे. आणि ज्याच्यासाठी आपण जगतो आणि ज्याच्यापासून सर्व गोष्टी येतात आणि फक्त एकच प्रभु येशू ख्रिस्त आहे. ज्याच्याद्वारे सर्व गोष्टी अस्तित्वात येतात व ज्याच्याद्वारे आपण जगतो.

पण प्रत्येकाला हे ज्ञान नसते. काहींना, ज्यांना आतापर्यंत मूर्तीची उपासना करण्याची सक्य होती ते असे मांस खातात व असा विचार करतात ते मूर्तीला वाहिलेले होते. आणि त्यांची सद्सद्विवेकबुद्धि दुर्बल असल्याने त्यांच्या कृत्यांना डागाळलेली आहे. परंतु अन्र आपणाला देवाजवळ आणणार नाही. जर आम्ही खाल्ले नाही तर वाईट होणार नाही किंवा खाल्ले तर अधिक चांगले होणार नाही.

तुमचा हा अधिकार जे दुर्बल आहोत त्यांच्यासाठी अपराध तर नाही याकडे लक्ष द्या. 10 कारण तू जो या गोष्टीचे ज्ञान असलेला त्या तुला दुर्बल बुद्धिच्या कोणी मूर्तिच्या मंदिरात जेवताना पाहिले, तर तो दुर्बल असून त्याची विवेकबुद्धि आत्यंतिक प्रबळ झाल्याने मूर्तीला वाहिलेले मांस खाण्यास त्याला उत्तेजन मिळणार नाही काय? 11 तो जो दुर्बल आहे, त्या तुझ्या भावासाठी ख्रिस्त मरण पावला त्याचा तुझ्या ज्ञानामुळे नाश होतो. 12 आणि अशा प्रकारे तुझ्या बंधूविरुद्ध पाप करुन आणि त्याच्या दुर्बल विवेकबुध्दीला जखम करुन तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करता. 13 म्हणून अन्र जर माझ्या बंधूना पाप करायला लावते तर मी कधीही मांस खाणार नाही. यासाठी की माझ्या बंधूने पाप करु नये.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center