Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
निर्गम 3

जळते झुडूप

मोशेच्या सासऱ्याचे नाव इथ्रो असे होते. मोशे त्याची शेरडेमेंढरे चारणारा मेंढपाळ होता. एके दिवशी मोशे वाळवंटाच्या पश्चिमेला होरेब डोंगर म्हणजे सिनाय डोंगर ह्या देवाच्या डोंगराकडे आपली मेंढरे घेऊन गेला. त्या डोंगरावर त्याने एका जळत्या झुडूपात परमेश्वराच्या दूताला पाहिले.

मोशेने असे पाहिले की झुडूप जळत होते परंतु ते जळून खाक होत नव्हते तर जसेच्या तसेच होते. तेव्हा मोशे स्वतःशी म्हणाला, “हे झुडूप जळत असून जळून नष्ट का होत नाही हे मी जरा जवळ जाऊन पहातो.”

मोशे झुडूपाजवळ येत होता हे परमेश्वराने पाहिले. तेव्हा झुडूपातून देवाने मोशेला हाक मारून म्हटले, “मोशे मोशे!”

आणि मोशे म्हणाला, “मी इथे आहे.”

तेव्हा परमेश्वर म्हणाला, “तू आहेस तेथून झुडूपाजवळ येऊ नकोस, तर तुझ्या पायातले पायताण काढ; कारण तू पवित्र भूमिवर उभा आहेस. मी तुझ्या पूर्वजांचा म्हणजे अब्राहाम, इसहाक व याकोब यांचा देव आहे.”

देवाकडे पाहाण्यास मोशेला भीती वाटली म्हणून त्याने आपले तोंड झाकून घेतले.

परमेश्वर म्हणाला, “मिसरमध्ये माझ्या लोकांना कसा त्रास भोगावा लागत आहे; आणि मिसरच्या लोकांनी त्याचा कसा छळ चालविलेला आहे, हे मी पाहिले आहे; त्या लोकांच्या हाका मी ऐकल्या आहेत; लोकांचे हाल व दु:ख मला समजले आहे. आता मी खाली जाऊन माझ्या लोकांचा मिसरच्या लोकांपासून बचाव करीन; मी त्यांना ह्या देशातून काढून जेथे त्यांना कसलाही त्रास होणार नाही अशा चांगल्या देशात [a] जेथे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी असे विविध प्रकारचे लोक राहतात, तेथे घेऊन जाईन. मी इस्राएल लोकांचे आक्रोश ऐकले आहेत आणि मिसरच्या लोकांनी त्यांचे जीवन कसे कष्टमय व कठीण केले आहे तेही पाहिले आहे. 10 तेव्हा मी आता तुला फारोकडे पाठवीत आहे! तर तू आता त्याच्याकडे जा! आणि माझ्या लोकांना म्हणजे माझ्या इस्राएल लोकांना मिसरमधून तुझ्या पुढाकाराने घेऊन ये!”

11 परंतु मोशे देवाला म्हणाला, “मी कोणी मोठा माणूस नाही! मी साधा माणूस आहे! तेव्हा फारोकडे जाऊन इस्राएल लोकांना मिसरमधून घेऊन यावयाच्या पात्रतेचा माणूस मी नाही, तर मग मी हे कसे करु शकेन?”

12 देव म्हणाला, “हे तू करु शकशील, कारण मी तुजबरोबर असेन मी तुला पाठवीत आहे याचा पुरावा असा असेल; तू इस्राएल लोकांना मिसरमधून बाहेर आणल्यावर या डोंगरावर येऊन माझी उपासना करशील.”

13 मग मोशे देवाला म्हणाला, “परंतु मी जर इस्राएल लोकांकडे जाऊन म्हणालो, ‘तुमच्या पूर्वजांचा देव याने मला तुमच्याकडे पाठवले आहे;’ तर मग ते लोक विचारतील ‘त्याचे नाव काय आहे?’ मग मी त्यांना काय सांगू?”

14 मग देव मोशेला म्हणाला, “त्याचे नाव ‘जो मी आहे तो मी आहे’ [b] असे आहे, हे त्यांना सांग. तू इस्राएल लोकाकंडे जाशील तेव्हा ‘मी आहे’ ने मला पाठवले आहे असे त्यांना सांग. 15 देव मोशेला आणखी म्हणाला, याव्हे हा तुमच्या पूर्वजांचा म्हणजे अब्राहामचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे असे तू त्यांना सांग. माझे नांव नेहमीच ‘याव्हे’ असेल. इस्राएल लोक पिढ्यानपिढ्या मला त्याच नांवाने ओळखतील; ‘त्याच याव्हेने मला तुमच्याकडे पाठवले आहे’ असे त्यांना सांग!”

16 आणखी परमेश्वर म्हणाला, “तू जाऊन इस्राएल लोकांच्या वडीलधाऱ्यांना (पुढाऱ्यांना) एकत्र बोलव आणि त्यांना सांग की तुमच्या पूर्वजांचा देव म्हणजे अब्राहाम, इसाहाक व याकोब यांचा देव ‘याव्हे’ मला दर्शन देऊन माझ्याशी बोलला आहे. परमेश्वर म्हणतो मी तुमच्याविषयी विचार केला आहे. 17 आणि मी असे ठरवले आहे की मी तुम्हाला मिसरमध्ये भोगाव्या लागत असलेल्या त्रासापासून सोडवीन व आता कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबुसी अशा वेगवेगव्व्या लोकांच्या ताब्यात असलेल्या देशात घेऊन जाईन. मी तुम्हाला दूधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात नेईन.

18 “ते वडीलधारे (पुढारी) तुझे ऐकतील मग तू व ते वडीलधारे (पुढारी) मिळून तुम्ही मिसरच्या राजाकडे जा व त्याला सांगा, ‘इब्री लोकांचा देव याव्हे आम्हाकडे आला. व त्याने आम्हास वाळवंटात तीन दिवसांचा प्रवास करून जाण्यास व तेथे आमचा देव “याव्हे” यासाठी बळी अर्पण करण्यास सांगितले आहे.’

19 “परंतु मला माहीत आहे कि मिसरचा राजा तुम्हाला जाऊ देणार नाही. केवळ महान सामर्थ्यच तुम्हाला जाऊ देण्यास त्याला भाग पाडील; 20 तेव्हा मग मीच माझे महान सामर्थ्य मिसराविरुद्ध वापरीन; मी त्या देशात महान चमत्कार करीन. मग ते केल्यावर तो तुम्हाला जाऊ देईल; 21 आणि मिसरचे लोक तुम्हा इस्राएल लोकांवर दया करतील असे मी करीन. तेव्हा तुम्ही निघताना मिसरचे लोक तुम्हाला पुष्कळ बक्षिसे व भेट वस्तु देतील.

22 “प्रत्येक इब्री स्त्री म्हणजे इस्राएली स्त्री आपल्या मिसरमधील शेजारणीकडून व आपल्या घरात राहाणाऱ्या मिसरच्या स्त्रीकडून भेट वस्तू मागून घेईल व ते लोक तिला भेट वस्तू देतील; तुम्हा लोकांना सोन्याचांदीचे दागिने व उंची कपडे भेट म्हणून मिळतील. मिसरमधून निघताना त्या वस्तू तुम्ही आपल्या मुलांमुलीच्या अंगावर घालाल. अशा प्रकारे तुम्ही मिसरच्या लोकांची संपत्ती घ्याल.”

लूक 6

येशू हा शब्बाथाच्या दिवसाचा प्रभु आहे(A)

नंतर असे झाले की, शब्बाथ दिवशी येशू शेतामधून जात होता. आणि त्याचे शिष्य धान्याची कणसे मोडून हातावर चोळून खात होते. मग परुश्यांपैकी काही म्हणाले, “शब्बाथ दिवशी जे करण्यास मना आहे, ते तुम्ही का करता?”

येशूने त्यांना म्हटले, “जेव्हा दावीद व त्याच्याबरोबर असलेल्यांना भूक लागली तेव्हा त्यांनी काय केले हे तुम्ही वाचले नाही काय? तुम्ही हे ऐकले नाही का की, तो देवाच्या मंदिरात गेला आणि अर्पणाची भाकर त्याने खाल्ली व त्याच्याबरोबर जे होते त्यांना दिली. जी भाकर फक्त याजकच खाऊ शकत असे ती त्यांनी खाल्ली.” येशू त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा प्रभु आहे.”

येशू एका मनुष्याला शब्बाथ दिवशी बरे करतो(B)

असे झाले की दुसऱ्या एका शब्बाथाच्या दिवशी येशू सभास्थानात गेला, आणि शिकवू लागला. तेव्हा तेथे एक मनुष्य होता. त्याचा उजवा हात वाळलेला होता. येशू शब्बाथ दिवशी कोणाला बरे करतो की काय हे पाहण्यासाठी नियमशास्त्राचे शिक्षक व परुशी त्याच्यावर पाळत ठेवून होते. यासाठी की, त्याच्यावर आरोप ठेवण्यासाठी त्यांना काहीतरी कारण मिळावे. त्याला त्यांचे विचार माहीत होते, पण वाळलेल्या हाताच्या मनुष्याला तो म्हणाला, “ऊठ आणि सर्वांसमोर उभा राहा!” आणि तो मनुष्य उठला आणि तेथे उभा राहिला. येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला विचारतो, शब्बाथ दिवशी कोणत्या गोष्टी करायला परवानगी आहे? चांगले करणे की वाईट करणे? कोणते कायदेशीर आहे, एखाद्याचा जीव वाचविणे का जीव घेणे?”

10 येशूने सर्वांकडे पाहिले, मग तो त्या मनुष्याला म्हणाला, “हात सरळ कर.” त्याने हात सरळ केला आणि त्याचा हात बरा झाला. 11 पण परुशी व नियमशास्त्राचे शिक्षक खूप रागावले व येशूविषयी काय करता येईल याविषयी आपापसात चर्चा करु लागले.

येशू त्याच्या बारा शिष्यांना निवडतो(C)

12 त्या दिवसांत असे झाले की, येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेला. त्याने ती रात्र देवाची प्रार्थना करण्यात घालविली. 13 जेव्हा दिवस उगवला, तेव्हा त्याने शिष्यांना आपणांकडे बोलाविले. त्याने त्यांच्यातील बारा जणांना निवडले व त्यांना “प्रेषित” असे नाव दिले.

14 शिमोनत्याला पेत्र हे सुद्धा नाव दिले,

आंद्रिया (पेत्राचा भाऊ),

याकोब

आणि योहान,

फिलिप्प,

बर्थलमय,

15 मत्तय,

थोमा,

अल्फीचा पुत्र याकोब,

शिमोन ज्याला जिलोट म्हणत,

16 याकोबचा पुत्र यहूदा

व यहूदा इस्कर्योत, जो पुढे विश्वासघात करणारा निघाला.

येशू लोकांना शिकवितो आणि रोग्यांस बरे करतो(D)

17 तो त्यांच्याबरोबर खाली उतरला व सपाट जागेवर उभा राहिला आणि त्याच्या अनुयायांचा मोठा समुदाय तेथे आला होता. व यहूदीया, यरुशलेम, सोर आणि सिदोनच्या समुद्रकिनाऱ्याकडचे असे पुष्कळसे लोक तेथे आले होते. 18 ते तेथे त्याचे ऐकण्यास व त्यांच्या रोगापासून बरे होण्यास आले होते. व ज्यांना अशुद्ध आत्म्यांची बाधा होती त्यांनाही त्यांच्या व्याधींपासून मुक्त करण्यात आले. 19 सगळा लोकसमुदाय त्याला स्पर्श करु पाहत होता. कारण त्याच्यामधून सामर्थ्य येत होते व ते सर्वांना बरे करीत होते.

20 येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले व म्हणाला,

“जे तुम्ही गरीब आहात ते तुम्ही आशीर्वादित आहात
    कारण देवाचे राज्य तुमचे आहे.
21 तुम्ही जे भुकेले ते आशीर्वादित आहात
    कारण तुम्ही तृप्त व्हाल.
आता तुम्ही जे रडता ते तुम्ही आशीर्वादित आहात
    कारण तुम्ही हसाल.

22 “जेव्हा लोक तुमचा द्धेष करतील, तुम्हांला वाळीत टाकतील आणि तुमचा अपमान करतील, जेव्हा तुमचे नाव ते वाईट समजतील आणि मनुष्याच्या पुत्रामुळे तुम्हाला नाकारतील, तेव्हा तुम्ही आशीर्वादित व्हाल. 23 त्या दिवशी तुम्ही आनंद करा. आनंदाने उड्या मारा कारण स्वर्गात तुमचे बक्षीस मोठे आहे! कारण त्यांच्या पूर्वजांनी संदेष्ट्यांना सुध्दा तसेच केले.

24 “पण श्रीमंतानो, तुम्हांला दु:ख होवो
    कारण तुम्हांला अगोदरच सर्व सुख मिळाले आहे.
25 जे तुम्ही तृप्त आहात त्या तुम्हांला दु:ख होवो,
    कारण तुम्ही भुकेले व्हाल.
जे आता हसतात त्यांना दु:ख होवो
    कारण तुम्ही शोक कराल आणि रडाल.

26 “जेव्हा सर्व तुमच्याविषयी चांगले बोलतील तेव्हा तुम्हांला दु:ख होवो कारण त्यांच्या वाडवडिलांनी खोट्या संदेष्ट्यांना असेच केले.

तुमच्या शत्रूवर प्रेम करा(E)

27 “माझे ऐकणाऱ्यांना मी सांगतो. तुमच्या शत्रूंवर प्रेम करा. जे तुमचा द्धेष करतात, त्यांचे चांगले करा. 28 जे तुम्हांला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुम्हांला वाईट वागवितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. 29 जर कोणी तुमच्या एका गालावर मारतो तर त्याच्यासमोर दुसरा पण गाल करा. जर कोणी तुमचा अंगरखा घेतो तर त्याला तुमचा सदराही घेऊ द्या. 30 जे तुम्हांला मागतात त्या प्रत्येकाला द्या आणि जो तुमचे घेतो ते परत मागू नका. 31 लोकांनी तुमच्याशी जसे वागावे असे तुम्हांला वाटते तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा.

32 “तुमच्यावर जे प्रेम करतात त्यांच्यावर जर तुम्ही प्रेम केले, तर तुम्ही काय विशेष केले? पापी लोकसुद्धा, जे त्यांच्यावर प्रेम करतात, त्यांच्यावर प्रेम करतात. 33 तुमचे जे चांगले करतात, त्यांचे जर तुम्ही चांगले करता तर तुम्हांला काय लाभ? पापीसुद्धा असेच करतात. 34 ज्यांच्याकडून तुम्हांला परत मिळेल अशी आशा असते, त्यांना जर उसने देता तर तुम्हांला काय लाभ? पापीसुद्धा परत मिळावे या उद्देशाने दुसऱ्या पाप्याला उसने देतात.

35 “पण तुमच्या शत्रूवर प्रेम करा आणि त्यांचे चांगले करा. व कोणतीही अपेक्षा न ठेवता उसने द्या, मग तुमचे बक्षीस मोठे असेल व तुम्ही सर्वोच्च देवाचे पुत्र व्हाल. कारण देव हा कृतघ्न व दुष्ट लोकांवर दया करतो. 36 जसा तुमचा पिता कनवाळू आहे तसे तुम्हीही कनवाळू व्हा.

स्वतःकडे पाहा(F)

37 “दुसऱ्यांचा न्याय करु नका, म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही. दुसऱ्यांना दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हांला दोषी ठरविले जाणार नाही. दुसऱ्यांची क्षमा करा म्हणजे तुमचीही क्षमा केली जाईल. 38 दुसऱ्यांना द्या म्हणजे तुम्हांलाही दिले जाईल. तुमच्या पदरात हलवून, दाबून, ओसंडून वाहणारे उत्तम माप ओतले जाईल. जे माप तुम्ही दुसऱ्यांसाठी वापरता त्याच मापाने तुम्हांला दिले जाईल.”

39 त्याने त्यांना एक गोष्ट सांगितली: “एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला मार्ग दाखवू शकेल काय? ते दोघेही खड्ड्यात पडणार नाहीत काय? 40 कोणताही शिष्य त्याच्या गुरुच्या पातळीला जाऊ शकत नाही. पण प्रत्येक मनुष्य जेव्हा तो पूर्ण शिकतो तेव्हा तो गुरुसारखाच असतो.

41 “तू आपल्या भावाच्या डोळ्यतील कुसळ का पाहतोस? स्वतःच्या डोळ्यातील मुसळ तुला दिसत नाही काय? 42 तू तुझ्या भावाला कसे म्हणू शकतोस, ‘बंधु, तुझ्या डोळ्यातील कुसळ मला काढू दे.’ तुझ्या स्वतःच्या डोळ्यातील मुसळ तुला दिसत नाही? ढोंग्या, प्रथम तुझ्या डोळ्यातील मुसळ काढ मगच तुला तुझ्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढताना चांगले दिसेल.

दोन प्रकारची फळे(G)

43 “कोणतेही चांगले झाड असे नाही की जे वाईट फळ देते, किंवा कोणतेही वाईट झाड असे नाही की जे चांगले फळ देते. 44 कारण प्रत्येक झाड हे त्याच्या फळावरुन ओळखले जाते. लोक काटेरी झुडुपातून अंजिरे गोळा करीत नाहीत तसेच काटेरी झुडुपातून ते द्राक्षे गोळा करीत नाहीत. 45 चांगला मनुष्य त्याच्या अंतःकरणात ज्या चांगल्या गोष्टी साठविलेल्या असतात त्याच काढतो आणि दुष्ट मनुष्य त्याच्या अंतःकरणात जे वाईट आहे तेच बाहेर काढतो. कारण मनुष्याच्या अंतःकरणात जे असते तेच तो मुखाद्वारे बोलतो.

दोन प्रकारचे लोक(H)

46 “तुम्ही मला प्रभु, प्रभु, का म्हणता, आणि मी जे सांगतो ते तुम्ही का करीत नाही? 47 प्रत्येक जण जो माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकतो व त्या आज्ञा पाळतो-तो कसा आहे हे मी तुम्हांला दाखवितो: 48 तो एका घर बांधणाऱ्या मनुष्यासारखा आहे. त्याने खोल खोदले आणि खडकावर पाया बांधला. मग पूर आला, तेव्हा नदीचे पाणी घरावर आदळले. पण पाण्याने ते हलले नाही. कारण ते चांगले बांधले होते.

49 “पण जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती पाळीत नाही, तो, ज्याने आपले घर पाया न घालता जमिनीवर बांधले त्या मनुष्यासारखा आहे, नदीच्या पुराचे पाणी घरावर आदळते व ते घर लगेच कोसळते आणि घर पूर्णपणे नष्ट होते.”

ईयोब 20

सोफर उत्तर देतो

20 नंतर नामाथीचा सोफर म्हणाला:

“ईयोब, तुझे त्रस्त झालेले विचार मला तुला उत्तर द्यायला भाग पाडत आहेत.
    माझ्या मनात कोणते विचार चालले आहेत ते मी तुला लगेच सांगायला हवे.
तुझ्या उत्तरांनी तू आमचा अपमान केला आहेस परंतु मी शहाणा आहे.
    उत्तर कसे द्यायचे ते मला माहीत आहे.

4-5 “वाईट मनुष्याचा आनंद जास्त काळ टिकत नाही तुला हे माहीत आहे.
    आदाम या पुथ्वीतलावर आला त्या अतिप्राचीन काळापासूनचे हे सनातन सत्य आहे.
    जो माणूस देवाची पर्वा करीत नाही तो फारच थोडा काळ सुखी होतो.
दुष्ट माणसाचा अहंकार गगनाला जाऊन भिडेल
    आणि त्याचे मस्तक ढगांपर्यत पोहोचू शकेल.
परंतु त्याच्या विष्ठेप्रमाणे त्याचा मात्र नाश झालेला असेल.
    जे लोक त्याला ओळखतात ते विचारतील, ‘तू कुठे आहे?’
तो एखाद्या स्वप्नासारखा [a] उडून जाईल व तो कोणालाही सापडणार नाही.
    त्याला घालवून देण्यात येईल आणि एखाद्या दु:स्वप्नासारखा तो विसरलाही जाईल.
ज्या लोकांनी त्याला पाहिले होते, त्यांना तो पुन्हा दिसणार नाही.
    त्याचे कुटुंब पुन्हा कधी त्याच्याकडे बघणार नाही,
10 दुष्ट माणसाने गरीब लोकांकडून जे काही घेतले होते ते त्याची मुले परत करतील.
    दुष्ट माणसाचे स्वतःचे हातच त्याची संपत्ती परत करतील.
11 तो तरुण होता तेव्हा त्याची हाडे मजबूत होती.
    परंतु आता इतर अवयवांप्रमाणे त्यांची सुध्दा माती होईल.

12 “दुष्टाला वाईट गोष्टी चांगल्या वाटतात.
    तो त्यांची चव नीट कळावी म्हणून त्या आपल्या जिभेखाली ठेवतो.
13 दुष्ट माणसाला वाईट गोष्टी आवडतात म्हणून तो त्यांना सोडीत नाही.
    गोडगोळीसारखे तो त्या आपल्या तोंडात ठेवतो.
14 परंतु त्या वाईट गोष्टीच त्याच्या पोटात विष होतील.
    त्याच्या आत त्याचे सर्वाच्या विषासारखे कडू जहर होईल.
15 दुष्ट माणसाने श्रीमंती गिळली तरी तो ती ओकून टाकेल.
    देव त्याला ती ओकायला भाग पाडेल.
16 दुष्ट माणसाचे पेय म्हणजे सर्पाचे विष.
    सर्पाचा दंशच त्याला मारुन टाकील.
17 नंतर दुष्ट मनुष्य मधाने आणि दुधाने भरुन
    वाहाणाऱ्या नद्या बघण्याचे सौख्य अनुभवू शकणार नाही.
18 दुष्ट माणसाला त्याचा नफा परत करणे भाग पडेल.
    त्याने जे सुख मिळवण्यासाठी कष्ट केले ते सुख भोगण्याची परवानगी त्याला मिळणार नाही.
19 का? कारण त्याने गरीबांना कष्ट दिले.
    त्यांना वाईट वागवले.
त्याने त्यांची काळजी घेतली नाही.
    त्यांच्या वस्तू हिसकावून घेतल्या.
    दुसऱ्यांनी बांधलेली घरे त्याने बळकावली.

20 “दुष्ट माणूस कधीही समाधानी नसतो.
    त्याची श्रीमंती त्याला वाचवू शकत नाही.
21 तो खातो तेव्हा काहीही शिल्लक ठेवीत नाही.
    त्याचे यश टिकणार नाही.
22 दुष्ट मनुष्याकडे जेव्हा भरपूर असेल तेव्हा तो संकटांनी दबून जाईल.
    त्याच्या समस्या त्याच्यावर कोसळतील.
23 दुष्ट माणसाने त्याला हवे तितके खाल्ल्यानंतर
    देव त्याचा क्रोधाग्नी त्याच्यावर फेकेल.
    देव दुष्टावर शिक्षेचा पाऊस पाडेल.
24 दुष्ट मनुष्य तलवारीला भिऊन पळून जाण्याचा प्रयत्न करेल.
    परंतु पितळी बाण त्याचा बळी घेईन.
25 पितळी बाण त्याच्या शरीरातून आरपार जाईल.
    त्याचे चकाकणारे टोक त्याचे आतडे भेदील
    आणि तो भयभीत होईल.
26 त्याच्या खजिन्याचा नाश होईल.
    मानवाने उत्पन्न केला नाही असा अग्नी त्याचा नाश करेल.
    अग्नी त्याच्या घरातल्या सर्व वस्तूंचा नाश करेल.
27 दुष्ट माणूस अपराधी आहे हे स्वर्ग सिध्द करेल.
    पृथ्वी त्याच्याविरुध्द् साक्ष देईल.
28 देवाच्या क्रोधाने निर्माण झालेल्या पुरात
    त्याच्या घरातली चीजवस्तू वाहून जाईल.
29 दुष्ट माणसाच्या बाबतीत हे करायचे असे देवाने ठरवले आहे.
    देवाने ठरवलेले हे त्याचे प्रारब्ध आहे.”

1 करिंथकरांस 7

विवाहाविषयी

आता, तुम्ही ज्याविषयी आपणा त्यासंबंधाने: एखाद्या मनुष्याने एखाद्या स्त्रीला स्पर्श न करणे हे त्याच्यासाठी चांगले आहे, परंतु जारकर्माचा मोह टाळण्यासाठी, प्रत्येक पुरुषाला त्याची स्वतःची पत्नी असावी. व प्रत्येक स्त्रीला तिचा स्वतःचा पती असावा. पतीने त्याच्या पत्नीला पत्नी म्हणून तिचा हक्क द्यावा आणि त्याप्रमाणे पत्नीने तिच्या पतीला पतीचा हक्क द्यावा. पत्नीला तिच्या स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही तर तो तिच्या पतील आहे. विषयसुखासाठी एकमेकाला वचित करु नका, तुम्हालां प्रार्थनेला वेळ देता यावा म्हणून एकमेकांच्या संमतीने ठराविक वेळेकरीता दूर राहा. आणि मग पुन्हा एक व्हा यासाठी की, सैतानाने तुम्च्यात आत्मसंयमन नसल्याने मोहात पाडू नये. परंतु मी हे तुम्हांला सवलत म्हणून सांगतो, आज्ञा म्हणून नव्हे. मला असे वाटते की, सर्व लोक माझ्यासारखे असावेत पण प्रत्येक व्यक्तीला त्याचे स्वतःचे असे देवापासून दान आहे. एकाला एका प्रकारे राहण्याचे आणि दुसऱ्याला दुसऱ्या प्रकारे राहण्याचे. परंतु जे अविवाहित व विधवा आहेत त्यांना मी म्हणेन की, माझ्यासारखीचराहिली तर ते त्यांना बरे.

9-10 आता जे विवाहित आहेत त्यांना मी आज्ञा देतो. मी ती आज्ञा देत नसून प्रभु देत आहे. पत्नीने तिच्या पतीपासून वेगळे होण्याचे पाहू नये. 11 पण जर ती वेगळे राहते तर तिने लग्न न करताच राहावे किंवा पतीबरोबर समेट करावा. आणि पतीने आपल्या पत्नीला सोडचिठ्ठी देऊ नये.

12 आता इतरासाठी सांगतो, आणि हे मी सांगत आहे, प्रभु नाही: जर एखाद्या ख्रिस्ती बांधवाची पत्नी विश्वास ठेवणारी नसेल, आणि त्याच्याबरोबर राहण्यास ती राजी असेल तर त्याने तिला सोडचिठ्ठी देऊ नये. 13 आणि एखाद्या स्त्रीचा नवरा जर विश्वास ठेवणारा नसेल आणि तो तिच्याबरोबर राहण्यास राजी असेल तर तिने त्याला सोडचिठ्ठी देऊ नये, 14 कारण विश्वास न ठेवणाऱ्या पतीचे त्याच्या ख्रिस्ती पत्नीबरोबरच्या निकट सहवासाद्वारे पवित्रीकरण झाले आहे आणि विश्वास न ठेवणाऱ्या पत्नीचे त्या ख्रिस्ती पतीबरोबरच्या निकट सहवासाद्वारे त्यांचे नाते देवाच्या दृष्टीनेही कायदेशीर आहे. नाहीतर तुमची मुले अशुद्ध झाली असती, परंतु आता ती पवित्र आहेत.

15 तरीही विश्वास न ठेवणारा वेगळा होत असेल तर त्याने वेगळे व्हावे. याबाबतीत ख्रिस्ती बंधु किंवा बहीण यांना मोकळीक आहे. देवाने आपल्याला शांतीने राहण्यासाठी बोलावले आहे. 16 कारण पत्नी, तू तुइया विश्वास न ठेवणाऱ्या पतीला तारु शकशील हे तुला कसे माहीत? किंवा पती, तू आपल्या विश्वास न ठेवणाऱ्या पत्नीला तारशील हे तुला कसे माहीत?

देवाने पाचारण केल्याप्रमाणे राहा

17 फक्त, देवाने प्रत्येकाला जसे नेमले आहे आणि देवाने जसे प्रत्येकाला पाचारण केले आहे त्याप्रमाणे त्याने राहावे. आणि अशी मी सर्व मंडळ्यांना आज्ञा करतो. 18 एखाद्याला जेव्हा देवाने पाचारण केले होते तेव्हा त्याची अगोदरच सुंता झाली होती काय? त्याने आपली सुंता लपवू नये. कोणाला सुंता न झालेल्या स्थितीत पाचारण झाले काय, तर त्याने सुंता करु नये. 19 सुंता म्हणजे काही नाही व सुंता न होणे म्हणजेही काही नाही. तर देवाची आज्ञा पाळणे यात सर्व काही आहे. 20 प्रत्येकाने ज्या स्थितीत त्याला पाचारण झाले त्या स्थितीत राहावे. 21 तुला गुलाम म्हणून पाचारण झाले होते काय? त्यामुळे तुला त्रास होऊ नये, परंतु तुला स्वतंत्र होणे शक्य असेल तर पुढे हो व संधीचा उपयोग करुन घे. 22 कारण जो कोणी प्रभुमध्ये गुलाम असा पाचारण केलेला होता तो देवाचा मुक्त केलेला मनुष्य आहे, त्याचप्रमाणे ज्या मुक्त मनुष्याला देवाचे पाचारण झाले आहे तो देवाचा गुलाम आहे. 23 तुम्हांला किंमत देऊन विकत घेतले होते. मनुष्यांचे गुलाम होऊ नका. 24 बंधूनो, तुम्हांतील प्रत्येकाने ज्या स्थितीत त्याला पाचारण झाले होते, त्याच स्थितीत त्याने देवासमोर राहावे.

विवाह करुन घेण्याविषयीचे प्रश्न

25 आता कुमारिकेविषयी, मला प्रभूपासून आज्ञा नाही, पण मी माझे मत देतो. जो मी विश्वासनीय आहे कारण प्रभूने आम्हावर दया दाखविली. 26 मी हे असे समजतो: सध्याच्या दुर्दशेत हे चांगले आहे, (होय) हे चांगले आहे की, एखाद्याने माइयासारखे एकटे राहावे. 27 तुम्ही पत्नीशी बांधलेले आहात काय? तर मोकळे होण्यास पाहू नका. स्त्रीपासून मोकळे आहात काय? लग्न करण्याचे पाहू नका. 28 पण जरी तुम्ही लग्न केले तरी तुम्ही पाप केलेले नाही. आणि जर कुमारिका लग्न करते तर तिने पाप केले नाही. पण अशा लोकांना शारीरिक पीडा होतील आणि या पीडा टाळण्यासाठी मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे.

29 हेच मी म्हणत आहे, बंधूनो, वेळ थोडा आहे. येथून पुढे ज्यांना पत्न्या आहेत त्यांनी त्या नसल्यासारखे राहावे. 30 जे शोक करीत आहेत त्यांनी शोक करीत नसल्यासारखे, जे आनंदी आहेत त्यांनी आनंदी नसल्यासारखे, जे वस्तु विकत घेत आहेत, त्यांनी जणू काही त्यांच्याकडे स्वतःचे काहीच नाही 31 आणि जे लोक जग त्यांना ज्या त्यांना ज्या गोष्टी देऊ करते व त्या गोष्टींचा जे उपयोग करुन घेतात, त्यांनी जणू काय त्या गोष्टींचा पूर्ण उपयोग करुन घेतला नाही, असे राहावे. कारण या जगाची सध्याची स्थिती लयास जात आहे.

32 माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही काळजीपसून मुक्त असावे. अविवाहित पुरुष प्रभूच्या कामाविषयी आणि त्याला कसे संतोषविता येईल याबाबत काळजीत असतो. 33 परंतु विवाहित पुरुष जगिक गोष्टीविषयी आणि आपल्या पत्नीला कसे आनंदीत ठेवता येईल या काळजीत असतो. 34 त्यामुळे तो द्विधा अवस्थेत असतो. आणि एखादी अविवाहित स्त्री किंवा कुमारिका, प्रभूच्या कामाबद्दल उत्सुक असते. यासाठी की, तिने शरीराने आणि आत्म्याने पवित्र असावे. परंतु विवाहित स्त्री जगिक गोष्टी आणि तिच्या पतीला कसे आनंदी ठेवता येईल याचीच चिंता करते. 35 मी हे तुमच्याच फायद्यासाठी सांगत आहे. तुमच्यावर बंधने लादण्यासाठी सांगत नाही. आचरणातील, सुव्यवस्थेतील फायद्यासाठी व प्रभूच्या सेवेसाठी विनाअडथळा तुम्हाला समर्पण करणे शक्य व्हावे म्हणून सांगतो.

36 जर एखाद्याला असे वाटते की, तो त्याच्या कुमारिकेविषयी योग्य ते करीत नाही आणि जर त्याच्या भावना तीव्र आहेत, तर त्या दोघांनी पुढे होऊन लग्न करुन घेणे आवश्यक आहे. त्याला जे वाटते ते त्याने करावे. 37 तो पाप करीत नाही. त्याने लग्न करुन घ्यावे. परंतु जो स्वतः मनाचा खंबीर आहे व जो कोणत्याही दडपणाखाली नाही पण ज्याचा स्वतःच्या इच्छेवर ताबा आहे. व ज्याने आपल्या मनात विचार केला आहे की आपल्या कुमारिकेला ती जशी आहे तशीच ठेवावी म्हणजे तिच्याशी विवाह करु नये, तर तो चांगले करतो. 38 म्हणून जो कुमारिकेशी लग्न करतो तो चांगले करतो पण जो तिच्याशी लग्न करीत नाही तो अधिक चांगले करील.

39 पति जिवंत आहे तोपर्यंत स्त्री लग्नाने बांधलेली आहे, पण तिचा पति मेला तर तिला पाहिजे त्याच्याशी परंतु केवळ प्रभूमध्ये लग्न करण्यास ती मोकळी आहे. 40 परंतु माझ्या मते ती आहे तशीच राहिली तर ती अधिक सुखी होईल आणि मला असे वाटते की, मलाही प्रभूचा आत्मा आहे.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center