Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
उत्पत्ति 50

याकोबाची प्रेतक्रिया

50 इस्राएल मरण पावला तेव्हा योसेफ फार दु:खी झाला. तो आपल्या बापाला कवटाळून खूप रडला; त्याने बापाची चुंबने घेतली. योसेफाने आपल्या सेवाकांतील वैद्यांना आपल्या बापाचे प्रेत मसाला लावून, व भरुन तयार ठेण्याची आज्ञा केली. तेव्हा त्यांनी खास मिसरच्या पद्धतीने इस्राएलाचे प्रेत मसाला लावून, भरुन, पुरण्यासाठी तयार केले. अशा खास पद्धतीने प्रेत तयार केल्यानंतर ते पुरण्या पूर्वी मिसरचे लोक चाळीस दिवस थांबत असत. त्यांनतर मिसरच्या लोकांनी त्यांच्या रीतीप्रमाणे याकोबासाठी सत्तर दिवस शोक केला.

सत्तर दिवसानंतर शोक करण्याचा काळ संपला. तेव्हा योसेफ फारोच्या अधिकाऱ्यांना म्हणाला, “फारोला हे सांगा, ‘माझा बाप मरावयास टेकला असताना मी त्याला वचन दिले होते की मी त्याला कनान देशातील त्याने स्वतःसाठी तयार केलेल्या गुहेत पुरेन. तेव्हा कृपया माझ्या बापास पुरावयास जाऊ द्या; मग मी परत आल्यावर तुम्हाला भेटेन.’”

फारोने उत्तर दिले, “तू आपल्या बापाला दिलेले वचन पूर्ण कर; तू जाऊन आपल्या बापाने सांगितल्या प्रमाणे त्याला पुरुन ये.”

तेव्हा योसेफ आपल्या बापाला पुरण्यासाठी गेला; तेव्हा फारोचे सर्व अधिकारी व मिसरचे नेते आणि सर्व वडीलजन योसेफाबरोबर गेले; आपले कुटुंबीय, आपले भाऊ व त्यांचे कुटुंबीय तसेच आपल्या बापाचे कुटुंबीय योसेफाबरोबर होते. (फक्त लहान मुले व पशू एवढेच गोशेन प्रांतात मागे राहिले होते.) तो लोकांचा खूप मोठा समूह होता. सैनिकांची एक पलटणाही घोडयावर बसून मोठया संख्येने योसेफाबरोबर गेले.

10 ते यार्देन (जॉईन) नदीच्या पूर्वेस गोरेन आताद येथील खळ्यावर गेले. या ठिकाणी इस्राएलाचा प्रेतक्रिया विधी झाला. हा प्रेतक्रियेचा विधी सात दिवस चालला. 11 कनान देशात राहाणाऱ्या लोकांनी गोरेन आताद येथील हे प्रेतक्रियेचे विधी व संस्कार पाहिले तेव्हा ते म्हणाले, “मिसरच्या लोकांचे प्रेतक्रिया विधी व संस्कार फारच दु:खाने भरलेले आहेत.” त्यामुळे आता त्या जागेला अबेल मिस्राईम असे नाव पडले आहे.

12 अशाप्रकारे याकोबाच्या मुलांनी आपल्या बापाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे केले; 13 त्यांनी त्याचे प्रेत कनान देशात नेऊन एफ्रोन हित्ती याजकडून कबरस्तान म्हणून उपयोगी पडावे यासाठी अब्राहामाने विकत घेतलेल्या मम्रे येथील शेतातील मकपेला गुहेत पुरले. 14 आपल्या बापाच्या प्रेतक्रियेनंतर योसेफ आणि त्याच्या बरोबर गेलेला सर्वसमुदाय मिसरला माघारी गेला.

योसेफाच्या भावांना योसेफाची भीती वाटते

15 याकोब मरण पावल्यावर योसेफाचे भाऊ चिंतेत पडले. फार पूर्वी आपण योसेफाबरोबर दुष्टपणाने वागलो त्यावरुन आता सुद्धा आपल्यावर त्याचा राग भडकेल अशी त्यांना भीती वाटली. ते स्वतःशीच म्हणाले कदाचित “योसेफ अजूनही आपला तिरस्कार करत असेल आणि आपण त्याच्याशी वाईट वागलो त्याचा तो बदला घेईल.” 16 तेव्हा त्या भावांनी योसेफाला येणे प्रमाणे निरोप पाठवला. “तुझ्या बापाने मरण्यापूर्वी आम्हाला अशी आज्ञा दिली 17 तो म्हणाला, ‘योसेफाला सांगा की तुझ्या भावांनी तुझ्याशी जे वाईट वर्तन केले त्याबद्दल तू त्यांची क्षमा करावीस अशी मी विनंती करतो.’ तेव्हा हे योसेफा, आम्ही तुला अशी विनंती करतो की, आम्ही तुझ्याशी वाईट रीतीने वागलो त्याबद्दल कृपया तू आमची क्षमा कर. आम्ही देवाचे, तुझ्या बापाच्या देवाचे दास आहोत.”

योसेफाचे भाऊ वरीलप्रमाणे बोलले त्यामुळे योसेफाला फार दु:ख झाले व तो रडला. 18 योसेफाचे भाऊ त्यांजकडे गेले व ते त्याच्या पाया पडले, मग ते म्हणाले, “आम्ही आपले दास आहोत.”

19 मग योसेफ त्यांना म्हणाला, “भिऊ नका; मी देव नाही, म्हणजे शिक्षा करण्याचा मला अधिकार नाही! 20 तुम्ही माझे वाईट करण्याचा कट केला, पण देव माझ्यासाठी चांगली योजना करीत होता. असंख्य लोकांचे प्राण वाचविण्यासाठी माझा उपयोग करावा अशी देवाची योजना होती. आजही देवाची तीच योजना आहे. 21 तेव्हा भिऊ नका; मी तुमची व तुमच्या मुलाबाळांची काळजी घेईन, तुमचे पोषण करीन.” योसेफ त्याच्या भावांशी ममतेने बोलला त्यामुळे त्याच्या भावांना बरे वाटले.

22 योसेफ आपल्या बापाच्या कुटुंबीयासह मिसरमध्ये राहिला. तो एकशे दहा वर्षांचा असताना मरण पावला. 23 योसेफाच्या हयातीत एफ्राईमाला मुले व नातवंडे झाली; आणि त्याचा मुलगा मनश्शे याला माखीर नावाचा मुलगा झाला. योसेफाने मारखीराची मुले ही पाहिली.

योसेफाचे मरण

24 योसेफाचे मरण जवळ आले तेव्हा तो आपल्या भावांना म्हणाला, “माझी मरण्याची वेळ जवळ आली आहे; परंतु देव तुमची काळजी घेईल हे मला माहीत आहे. तो देव तुम्हाला ह्या देशातून काढून अब्राहाम, इसहाक, व याकोब यांना जो देश देण्याचे वचन त्याने दिले होते त्या देशात घेऊन जाईल.”

25 मग योसेफाने आपल्या वंशजास वचन देण्यास सांगितले. तो म्हणाला, “देव जेव्हा तुम्हाला येथून काढून पुढे घालून त्या नवीन देशात घेऊन जाईल तेव्हा माझे शरीर तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन जाल असे मला वचन द्या.”

26 योसेफ एकशेदहा वर्षांचा झाल्यावर मिसरमध्ये मरण पावला. वैद्यांनी त्याच्या शरीराला मसाला लावून ते पुरण्यासाठी तयार केले व ते शवपेटीत मिसरमध्ये ठेवले.

लूक 3

योहानाचा संदेश(A)

तिबिर्य कैसराच्या कारकीर्दीच्या पंधराव्या वर्षी,

जेव्हा पंतय पिलात यहूदीयाचा राज्यपाल होता,

आणि हेरोद गालीलचा अधिकारी असताना,

आणि त्याचा भाऊ फिलिप्प हा इतुरीया व त्राखोनीती या देशांचा अधिकारी होता,

व लूसनिय हा अबिलेनेचा अधिकारी होता.

हनन्या व केफा हे मुख्य याजक होते, तेव्हा वाळवंटात देवाचे वचन जखऱ्याचा पुत्र योहान याच्याकडे आले. तो यार्देनेच्या सभोवतालच्या सर्व परिसरात गेला, व लोकांना त्यांच्या पापांपासून क्षमा मिळण्यासाठी पश्चातापाचा बाप्तिस्मा घेण्याविषयी घोषणा करीत फिरला. हे यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे झाले:

“वाळवंटात कोणाचा तरी आवाज ऐकू आला,
‘प्रभूसाठी मार्ग तयार करा,
    त्याचे रस्ते सरळ करा.
प्रत्येक दरी भरुन येईल,
    आणि प्रत्येक डोंगर व टेकडी सपाट केली जाईल
वाकड्यातिकड्या जागा सरळ केल्या जातील
    ओबडधोबड रस्ते सपाट केले जातील
आणि सर्व लोक देवाचे तारण पाहतील!’” (B)

त्याच्याकडून बाप्तिस्मा करुन घेण्यासाठी येणाऱ्या जमावाला योहान म्हणाला: “अहो, सापाच्या पिल्लांनो, येणाऱ्या क्रोधापासून सुटका करुन घेण्यासाठी तुम्हांला कोणी सावध केले? पश्चातापास योग्य असे फळ द्या, आणि आपापसात असे म्हणू नका की, ‘आमच्यासाठी अब्राहाम आमच्या पित्यासारखा आहे.’ मी तुम्हांला सांगतो की, अब्राहामासाठी मुले निर्माण करण्यास देव या खडकांचा उपयोग करण्यास समर्थ आहे. आणि झाडांच्या मुळांशी कुऱ्हाड अगोदरच ठेवलेली आहे. आणि प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडून आगीत टाकले जाईल.”

10 जमावाने त्याला विचारले, “मग आता आम्ही काय करावे?”

11 त्याने उत्तर दिले, “ज्याच्याकडे दोन सदरे असतील त्याने ज्याच्याकडे काहीच नाही त्याला ते वाटून द्यावे. ज्याच्याकडे अन्न आहे त्यानेही तसेच करावे.”

12 काही जकातदारही बाप्तिस्मा करुन घ्यावयास आले होते. ते म्हणाले, “गुरुजी, आम्ही काय करावे?”

13 तो त्यांना म्हणाला, “गरजेपेक्षा जास्त जमा करु नका.” हेच तुम्हांला सांगितले आहे.

14 काही शिपायांनीसुद्धा त्याला विचारले, “आणि आम्ही काय करावे?”

योहान त्यांना म्हणाला, “कोणाकडून बळजबरीने पैसे घेऊ नका, कोणावरही खोटा आरोप करु नका. आणि तुम्हांला मिळणाऱ्या पगारात समाधानी राहा.”

15 लोक मशीहाची अपेक्षा करीत होते. आणि ते सर्व त्यांच्या मनामध्ये योहानाबद्दल आश्चर्य करीत होते व असा विचार करीत होते की, “कदाचित तो ख्रिस्त असण्याची शक्यता आहे.”

16 त्या सर्वांना योहानाने उत्तर दिले; तो म्हणाला. “मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण एकजण जो माझ्यापेक्षाही सामर्थ्यशाली आहे तो येत आहे. त्याच्या वहाणांचे बंद सोडण्यासही मी पात्र नाही. तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील. 17 त्याचे खळे स्वच्छ करण्यासाठी व त्याच्या कोठारात गहू साठविण्यासाठी त्याच्या हातात त्याचे सूप आहे पण भुसा तो न विझविता येणाऱ्या अग्नीने जाळून टाकील.” 18 योहानाने इतर पुष्कळ उत्तेजन देणाऱ्या शब्दांनी त्यांना बोध करुन सुवार्ता सांगितली.

योहानाचा कार्य कशा संपलि

19 योहानाने हेरोद या सताधीशाची कानउघडणी केली. कारण त्याचे त्याच्या भावाच्या पत्नीशी-हेरोदीयाशी अनैतिक संबंध होते, तसेच इतर अनेक वाईट गोष्टी त्याने केल्या होत्या. 20 हे सर्व करुन सुद्धा त्यात भर म्हणून की काय त्याने योहानाला तुरुंगात टाकले.

योहानाकरवी येशूचा बाप्तिस्मा(C)

21 तेव्हा असे झाले की, जेव्हा सर्व लोकांचा बाप्तिस्मा केला जात होता, तेव्हा येशूचा सुद्धा बाप्तिस्मा झाला. तो प्रार्थना करीत असता आकाश उघडले गेले. 22 आणि पवित्र आत्मा कबुतराच्या रुपात त्याच्यावर उतरला आणि आकाशातून एक वाणी आली: “तू माझा प्रिय पुत्र आहेस, मी तुझ्याविषयी फार संतुष्ट आहे.”

योसेफाच्या घराण्याचा इतिहास(D)

23 जेव्हा येशूने त्याच्या कार्यास सुरुवात केली तेव्हा तो सुमारे तीस वर्षांचा होता. लोकांना असे वाटे की, येशू योसेफाचा मुलगा आहे.

योसेफ एलीचा मुलगा होता.

24 एली मत्ताथाचा मुलगा होता.

मत्ताथ लेवीचा मुलगा होता.

लेवी मल्खीचा मुलगा होता.

मल्खी यन्रयाचा मुलगा होता.

यन्रया योसेफाचा मुलगा होता.

25 योसेफ मत्तिथ्याचा मुलगा होता.

मत्तिथ्य अमोसाचा मुलगा होता.

अमोस नहूमाचा मुलगा होता.

नहूम हेस्लीचा मुलगा होता.

हेस्ली नग्गयाचा मुलगा होता.

26 नग्गय महथाचा मुलगा होता.

महथ मत्तिथ्याचा मुलगा होता.

मत्तिथ्य शिमयीचा मुलगा होता.

शिमयी योसेखाचा मुलगा होता.

योसेख योदाचा मुलगा होता.

27 योदा योहानानचा मुलगा होता.

योहानान रेशाचा मुलगा होता.

रेशा जरुब्बाबेलाचा मुलगा होता.

जरुब्बाबेल शल्तीएलाचा मुलगा होता.

शल्तीएल नेरीचा मुलागा होता.

28 नेरी मल्खीचा मुलगा होता.

मल्खी अद्दीचा मुलगा होता.

अद्दी कोसोमाचा मुलगा होता.

कोसोम एल्मदामाचा मुलगा होता.

एल्मदाम एराचा मुलगा होता.

29 एर येशूचा मुलगा होता.

येशू अलिएजराचा मुलगा होता.

अलिएजर योरीमाचा मुलगा होता.

योरीम मत्ताथाचा मुलगा होता.

मत्ताथ लेवीचा मुलगा होता.

30 लेवी शिमोनाचा मुलगा होता.

शिमोन यहूदाचा मुलगा होता.

यहूदा योसेफाचा मुलगा होता.

योसेफ योनामाचा मुलगा होता.

योनाम एल्याकीमाचा मुलगा होता.

31 एल्याकीम मल्लयाचा मुलगा होता.

मल्ल्या मिन्नाचा मुलगा होता.

मिन्ना मत्ताथाचा मुलगा होता.

मत्ताथ नाथानाचा मुलगा होता.

नाथान दाविदाचा मुलगा होता.

32 दावीद इशायाचा मुलगा होता.

इशाय ओबेदाचा मुलगा होता.

ओबेद बवाजाचा मुलगा होता.

बवाज सल्मोनाचा मुलगा होता.

सल्मोन नहशोनाचा मुलगा होता.

33 नहशोन अम्मीनादाबाचा मुलगा होता.

अम्मीनादाब अर्णयाचा मुलगा होता.

अर्णय हेस्रोनाचा मुलगा होता.

हेस्रोन पेरेसाचा मुलगा होता.

पेरेस यहूदाचा मुलगा होता.

34 यहूदा याकोबाचा मुलगा होता.

याकोब इसहाकाचा मुलगा होता.

इसहाक अब्राहामाचा मुलगा होता.

अब्राहाम तेरहाचा मुलगा होता.

तेरह नाहोराचा मुलगा होता.

35 नाहोर सरुगाचा मुलगा होता.

सरुग रऊचा मुलगा होता.

रऊ पेलेगाचा मुलगा होता.

पेलेग एबराचा मुलगा होता.

एबर शेलहाचा मुलगा होता.

36 शेलह केनानाचा मुलगा होता.

केनान अर्पक्षदाचा मुलगा होता.

अर्पक्षद शेमाचा मुलगा होता.

शेम नोहाचा मुलगा होता.

नोहा लामेखाचा मुलगा होता.

37 लामेख मथुशलहाचा मुलगा होता.

मथुशलह हनोखाचा मुलगा होता.

हनोख यारेदाचा मुलगा होता.

यारेद महललेलाचा मुलगा होता.

महललेल केनानाचा मुलगा होता.

38 केनान अनोशाचा मुलगा होता.

अलोश शेथाचा मुलगा होता.

शेथ आदामाचा मुलगा होता.

आदाम देवाचा मुलगा होता.

ईयोब 16-17

ईयोब अलीफजला उत्तर देतो

16 नंतर ईयोबाने उत्तर दिले,

“या सर्व गोष्टी मी पूर्वी ऐकल्या आहेत.
    तुम्ही तिघे जण मला त्रास देता, आराम नव्हे.
तुमची लांबलचक भाषणे कधीही संपत नाहीत.
    तुम्ही वाद घालणे का सुरु ठेवले आहे?
जर तुमच्यावर माझ्यासारखे संकट आले असते,
    तर जे आता तुम्ही म्हणत आहात तेच मीही म्हणू शकलो असतो.
मी तुमच्याविरुध्द शहाणपणाच्या गोष्टी सांगू शकलो असतो
    आणि माझे डोके तुमच्यासमोर हलवू शकलो असतो.
पण मी तुम्हाला धीर देऊ शकलो असतो आणि माझ्या बोलण्याने तुमच्यात आशा निर्माण केली असती.

“परंतु मी काहीही बोललो तरी माझ्या यातना कमी होत नाहीत.
    पण मी बोललो नाही तर मला शांती लाभत नाही.
देवा, खरोखरच तू माझी शक्ती हिरावून घेतली आहेस.
    तू माझ्या सर्व कुटुंबाचा नाश केला आहेस.
तू मला खूप बारीक व अशक्त केले आहे
    म्हणून मी अपराधी आहे असे लोकांना वाटते.

“देव माझ्यावर हल्ला करतो.
    तो माझ्यावर रागावला आहे आणि तो माझे शरीर छिन्न विछिन्न करतो.
तो माझ्याविरुध्द दात खातो,
    माझ्या शत्रूचे डोळे माझ्याकडे तिरस्काराने बघतात.
10 लोक माझ्या भोवती जमले आहेत.
    ते माझी थट्टा करतात व तोंडावर मारतात.
11 देवाने मला दुष्ट लोकांच्या स्वाधीन केले आहे.
    त्याने क्रूर माणसांना मला त्रास द्यायची परवानगी दिली आहे.
12 मी अगदी मजेत होतो.
    पण देवाने मला चिरडून टाकले.
हो त्याने माझी मान पकडली
    आणि माझे तुकडे तुकडे केले.
त्याने माझा निशाण्यासारखा उपयोग केला.
13     त्याचे धनुर्धारी मला घेरतात.
    तो माझ्या मुत्रपिंडात बाण सोडतो.
तो दया दाखवीत नाही.
    तो माझे मूत्राशय धरतीवर रिकामे करतो.
14 देव माझ्यावर पुन्हा पुन्हा हल्ला करतो.
    युध्दातल्या सैनिकाप्रमाणे तो माझ्यावर चाल करुन येतो.

15 “मी फार दु:खी आहे
    म्हणून मी दु:खाचे कपडे घालतो.
मी इथे धुळीत आणि राखेत बसतो
    आणि मला पराभूत झाल्यासारखे वाटते.
16 रडल्यामुळे माझा चेहरा लाल झाला आहे.
    माझ्या डोळ्याभोवती काळी वर्तुळे आहेत.
17 मी कुणाशीही दुष्टपणाने वागलो नाही.
    तरीही माझ्या बाबतीत या वाईट गोष्टी घडल्या.
    माझ्या प्रार्थना नेहमी बरोबर आणि शुध्द असतात.

18 “हे धरतीमाते, माझ्यावर जे जुलूम झाले आहेत ते लपवू नकोस.
    मी न्यायासाठी भीक मागतो आहे ते थांबवू नकोस.
19 स्वर्गात कदाचित् माझ्या बाजूचा कुणीतरी असेल.
    कदाचित् मला पाठिंबा देणारा आणि माझा बचाव करणारा कुणी तिथे असेल.
20 माझा मित्र माझ्यासाठी बोलतो.
    पण माझे डोळे देवासमोर अश्रू ढाळतात.
21 जशी एखादी व्यक्ति आपल्या मित्रासाठी वादविवाद करते
    तसा तो माझ्याविषयी देवाबरोबर बोलतो.

22 “मी अगदी थोड्या वर्षातच पुन्हा कधीही परतून
    न येणाऱ्या जागी जाणार आहे (मृत्युलोक).

17 माझा आत्मा भंगला आहे.
    मी आशा सोडून दिली आहे.
माझे आयुष्य जवळ जवळ संपले आहे
    आणि थडगे माझी वाट पाहात आहे.
लोक माझ्याभोवती उभे राहातात आणि मला हसतात.
    ते मला चिडवतात.
माझा अपमान करतात.
    तेव्हा मी फक्त बघत राहतो.

“देवा, तुझा मला खरोखरच पाठिंबा आहे हे मला दाखव.
    दुसरे कुणीही मला पाठिंबा देणार नाही.
तू माझ्या मित्रांच्या मनाची कवाडे बंद करुन टाकलीस
    आणि आता त्यांना काही कळत नाही.
    कृपा करुन तू त्यांना विजयी होऊ देऊ नकोस.
लोक काय म्हणतात ते तुला माहीत आहे
    ‘एखादा माणूस मित्राला [a] मदत करण्यासाठी स्वतःच्या मुलांकडे दुर्लक्ष करतो’
    परंतु माझे मित्र मात्र माझ्या विरुध्द गेलेत.
देवाने माझे नाव म्हणजे सर्वासाठी एक शिवी केली.
    लोक माझ्या तोंडावर थुंकतात.
दु:ख आणि यातना यांनी मी जवळ जवळ आंधळा झालो आहे,
    माझे शरीर छायेप्रमाणे अतिशय बारीक झाले आहे.
यामुळे चांगले लोक फार व्यथित झाले आहेत.
    देवाची पर्वा न करणाऱ्या लोकांमुळे निष्पाप लोक व्यथित होतात.
पण चांगली माणसे मात्र न्यायाने जीवन जगत राहातात.
    निष्पाप लोक अधिक सामर्थ्यवान होतात.

10 “पण तुम्ही सर्व एकत्र या आणि या सगळ्यात माझीच चूक आहे हे मला दाखवून द्या.
    तुमच्या पैकी कुणीही विद्वान नाही.
11 माझे आयुष्य संपत चालले आहे.
    माझ्या योजना धुळीला मिळवल्या गेल्या आणि माझी आशा नष्ट झाली.
12 माझे मित्र गोंधळून गेले आहेत.
    त्यांना रात्र दिवसासारखी वाटते.
    अंधार प्रकाशाला पळवून लावतो असे त्यांना वाटते.

13 “थडगेच माझे नवीन घर असेल अशी मी आशा करतो.
    अंधाऱ्या थडग्यांत माझे अंथरुण घालण्याची इच्छा मी धरतो.
14 ‘तू माझा जन्मदाता आहेस’ असे मी थडग्याला
    आणि किड्यांना ‘माझी आई’ किंवा ‘बहीण’ म्हणू शकेन.
15 परंतु मला जर तेवढी एकच आशा असेल, तर मला मुळीच आशा नाही.
    मला जर तेवढी एकच आशा असेल तर लोकांना मी आशे शिवायच दिसेन.
16 माझी आशा माझ्याबरोबरच मरेल का?
    ती सुध्दा मृत्युलोकात जाईल का?
    आम्ही बरोबरच मातीत जाऊ का?”

1 करिंथकरांस 4

ख्रिस्ताचे प्रेषित

एखाद्या व्यक्तीने आम्हाविषयी अशा प्रकारे समजावे: ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्याचे कारभारी. आणखी असे की, जबाबदारी असलेल्या कारभाऱ्याने विश्वासू असले पाहिजे. पण तुम्हांकडून किंवा कोणा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्याय व्हावा याबद्दल मला काही वाटत नाही, किंवा मी माझा स्वतःचादेखील न्याय करीत नाही. कारण माझी विवेकबुद्धी शुद्ध आहे, पण त्यामुळे मी निर्दोष ठरत नाही. प्रभु हाच माझा न्यायनिवाडा करतो. म्हणून योग्य समय येईपर्यंत म्हणजे प्रभु येईपर्यंत न्यायनिवाडा करु नका. तो अंधारामध्ये दडलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकील व अंतः करणातील हेतू उघडकीस आणील, त्यावेळी देवाकडून प्रत्येकाची प्रशंसा होईल.

बंधूनो, तुमच्यासाठी मी या गोष्टी माझ्याकरीता व अपुल्लोसाकरीता लागू केल्या आहेत. यासाठी की “पवित्र शास्त्र सांगते त्यापलीकडे जाऊ नका,” हे आमच्या उदाहरणावरुन तुम्ही शिकावे व तुम्ही गर्वाने फुगून जाऊ नये म्हणजे एखाद्याला चांगली वागणूक देऊन दुसऱ्याला विरोध करु नये. कोण म्हणतो की तू दुसऱ्यापेक्षा चांगला आहेस? आणि तुझ्याजवळ असे काय आहे जे तुला मिळाले नाही? ज्याअर्थी तुला सर्व मिळाले आहे, तर तुला मिळाले नाही अशी बढाई का मारतोस?

तुम्हांला असे वाटते की, तुम्ही अगोदरच श्रीमंत झाला आहात, तृप्त झाला आहात, तुम्हांला असे वाटते की आमच्याशिवाय तुम्ही राजे झाला आहात आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही खरोखरच राजे होता, यासाठी की आम्ही तुमच्यासह राजे झालो असतो. कारण मला वाटते की देवाने आम्हांला मरण्यासाठी शिक्षा दिलेल्या अशा लोकांसारखे शेवटचे प्रेषित केले कारण आम्ही जगाला, देवदूतांना तसेच माणसांना जाहीर प्रदर्शनसारखे झालो आहोत. 10 आम्ही ख्रिस्तासाठी मूर्ख, तर तुम्ही ख्रिस्तामध्ये किती हुशार आहात! आम्ही अशक्त आहोत, पण तुम्ही किती बलवान आहात! तुम्ही आदरणीय आहात, पण आम्ही तुच्छ आहोत! 11 अगदी या क्षणापर्यंत आम्ही भुकेले आणि तहानलेले, फाटकेतुटके कपडे घातलेले, ठोसे मारलेले, आम्ही बेघर असे आहोत. 12 आणि आम्ही श्रम करतो, आम्ही स्वतःच्या हातांनी काम करतो, 13 जेव्हा आमची निंदा होते, तेव्हा आम्ही आशीर्वाद दतो. जेव्हा आमचा छळ होतो तेव्हा आम्ही सहन करतो. जेव्हा आमची निंदा होते, आम्ही दयाळूपणे त्यांच्याशी बोलतो, या क्षणापर्यंत आम्ही जगासाठी गाळ आणि कचरा असे झालो आहोत.

14 मी तुम्हांला हे लाजविण्यासाठी लिहित नाही: तर उलट मी तुम्हांला माझ्या प्रिय लेकरांप्रमाणे चांगल्या गोष्टींची जाणीव करुन देतो, 15 कारण जरी तुम्हांला खिस्तामध्ये दहा हजार पालक असले तरी पुष्कळ वडील नाहीत. कारण ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेच्या योगे मी तुम्हांला जन्म दिला आहे, 16 यास्तव मी तुम्हांला बोध करतो की, माझे अनुकरण करा. 17 यासाठीच तिमथ्याला तुमच्याकडे पाठविले आहे. प्रभूमध्ये तो माझा प्रिय व विश्वासू पुत्र आहे. ज्याप्रमाणे मी त्यांना सगळीकडे प्रत्येक मंडळीमध्ये शिकवितो, तसेच तो ख्रिस्तामधील माझ्या शिकवणूकीची आठवण करुन देईल.

18 पण जणू काय मी तुमच्याकडे येणारच नव्हतो, म्हणून काही जण गर्वाने फुगले होते. 19 तरीही जर प्रभूची इच्छा असेल तर मी लवकरच तुमच्याकडे येईन. आणि मग मला समजेल की, जे गर्वाने फुगून गेले ते किती चांगले वक्ते आहेत हे नव्हे, तर ते किती सामर्थ्यशाली आहेत, हे मला समजेल. 20 कारण देवाचे राज्य बोलण्यावर अवलंबून नसते तर सामर्थ्यावर असते. 21 तुम्हांला कोणते पाहिजे? मी तुमच्याकडे तुम्हांला शिक्षा करण्यासाठी काठी घेऊन यावे की, प्रीतीने व सौम्यतेच्या आत्म्याने यावे?

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center