Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
उत्पत्ति 49

याकोब आपल्या मुलांना आशीर्वाद देतो

49 मग याकोबाने आपल्या सर्व मुलांना आपल्याजवळ बोलावले. तो म्हणाला, “माझ्या मुलांनो, माझ्या जवळ या म्हणजे पुढील काळी तुमचे काय होईल हे मी तुम्हास सांगतो.”

“याकोबाच्या मुलांनो! तुम्ही सर्व एकत्र या
    आणि तुमचा बाप इस्राएल याचे ऐका.

रऊबेन

“रऊबेना! तू माझा पाहिलाच म्हणजे थोरला मुलगा आहेस:
    पुरुष म्हणून माझ्यात असलेल्या शक्तीचा तू पहिला पुरावा आहेस.
तू सर्वापेक्षा अधिक शक्तीवान
    व सर्वापेक्षा अधिक अभिमान वाटावा असा आहेस;
परंतु तुझ्या भावना पुराच्या अनावर
    व बेबंद लाटांप्रमाणे आहे;
तू माझा मुलांमध्ये श्रेष्ठ किंवा सर्वात
    अधिक महत्वाचा मुलगा होणार नाहीस कारण
तू आपल्या बापाच्या
    एका बायकोपाशी जाऊन निजलास;
तू आपल्या बापाच्या अंथरुणाचा
    आदर करुन मान राखला नाहीस.

शिमोन व लेवी

“हे भाऊ आहेत; या दोन भावांना
    तरवारींने लढण्याची आवड आहे.
त्यांनी गुपचूप वाईट गोष्टी करण्याचे ठरवले;
    त्यांचे हे बेत माझ्या जीवाला मान्य नाहीत;
तसेच त्यांच्या गुप्त बैठका मला मान्य नाहीत;
    त्यांनी रागाच्या भरात माणसांची कत्तल केली;
गंमत म्हणून त्यांनी पशूंना जखमी केले;
त्यांचा राग शाप आहे;
    ते अति रागाने वेडे होतात तेव्हा अतिशय क्रूर बनतात;
याकोबाच्या जमिनीत त्यांना वाटा मिळणार नाही.
    ते सर्व इस्राएल देशभर पसरतील.

यहूदा

“यहूदा, तुझे भाऊ तुझी स्तुती करतील;
    तू तुझ्या शत्रूंचा पराभव करशील;
    तुझे भाऊ तुला लवून नमन करतील.
यहूदा, तू आपली शिकार मारलेल्या सिंहासारखा आहेस;
    माझ्या मुला, आपल्या शिकारीचा पशू मारुन त्याच्यावर उभा असलेल्या सिंहासारखा तू आहेस;
यहूदा विसावा घेणाऱ्या सिंहासारखा आहे
    आणि त्याला त्रास देण्याइतका शूर दूसरा कोणीही नाही.
10 यहूदाचे कुटुंबीय राजे होतील
    आणि योग्य राजा येईपर्यंत
त्याच्या कुळातील राजवेत्र जाणार नाही मग बहुतेक
    जण त्याच्या आज्ञेत राहतील व त्याची सेवा करतील.
11 तो आपले गाढव अगदी चांगल्या द्राक्षवेलीस बांधून ठेवील;
    तो उंची द्राक्षारसाने आपले कपडे धुईल;
12 द्राक्षमद्य घेतल्याने त्याचे डोळे त्या द्राक्षमद्यापेक्षा अधिक लालबुंद होतील;
    त्याचे दात दूधपिण्यामुळे दूधापेक्षा अधिक सफेद होतील.

जबुलून

13 “जबुलून समुद्र किनाऱ्याजवळ राहिल;
    त्याचा समुद्र किनारा जहाजासाठी सुरक्षित बंदर असेल.
    त्याच्या जमिनीची हद्द सिदोन नगरपर्यंत असेल.

इस्साखार

14 “इस्साखार अतिशय कष्टाने काम करणाऱ्या गाढवासारखा होईल;
    जड वजनाचे सामान वाहून नेल्यावर तो विश्रांती घेईल.
15 आपले विसावा घेण्याचे ठिकाण चांगले आहे,
    आपला देश आनंददायक आहे असे तो पाहिल.
आणि मग जड बोजा वाहून नेण्यास
    व अगदी गुलामाप्रमाणे काम करण्यास तो तयार होईल.

दान

16 “दान इस्राएलाच्या इतर वंशाप्रामाणे
    आपल्या लोकांचा न्याय करील.
17 तो रस्ताच्या कडेला असणाऱ्या सापाप्रमाणे,
    वाटेच्या कडेला पडून असलेल्या भयंकर नागाप्रमाणे होईल;
तो घोड्याच्या टाचेला दंश करील;
    त्यामुळे घोडेस्वार घोड्यावरुन खाली कोसळेल;

18 “हे परमेश्वरा, तुझ्या कडून उध्दार होण्याची मी वाट पाहात आहे.

गाद

19 “लुटारुंची टोळी गाद वर हल्ला करेल, [a]
    परंतु तो त्यांना पळवून लावील.

आशेर

20 “आशेराची जमीन उत्तम अन्न भरपूर उपजवील;
    राजाला योग्य असे चांगले अन्नपदार्थ त्याजकडे असतील.

नफताली

21 “नफताली मोकळ्या सुटलेल्या बागडणाऱ्या हरिणीप्रमाणे होईल;
    त्याचे शब्द म्हणजे त्याचे बोलणे हरिणींच्या पाडसाप्रमाणे गोड व सुंदर असेल.

योसेफ

22 “योसेफ अतिशय यशस्वी झाला आहे;
    तो ओढ्याकाठी वाढणाऱ्या द्राक्षवेलीसारखा आहे;
    ती कुंपणावरही पसरते.
23 पुष्कळ लोक त्याच्या विरुद्ध झाले व त्याच्याशी लढले;
    धनुर्धारी लोकांनी त्याचा द्धेष केला;
24 परंतु आपल्या वळकट धनुष्याच्या
    आणि कुशल बाहुंच्या जोरावर त्याने युद्व जिंकिले.
त्याला याकोबाचा सामर्थ्यवान देव, मेंढपाळ,
    इस्राएलाचा खडक व तुमच्या बापाचा देव याजकडून तुम्हाला शक्ती मिळते.
25 सर्वशक्तिमान देव तुला वर आकाशातून
    व खाली खोल दरीतून आशीर्वाद देवो
तसेच स्तनांचा व गर्भाचा
    आशीर्वाद तो तुला देवो.
26 माझ्या आईबापाच्या जीवनात अनेक चांगल्या घटना घडल्या व अनेक चांगल्या गोष्टी त्यांना मिळाल्या;
    आणि मी तुझा बाप, मला त्यांच्यापेक्षा अधिक आशीर्वाद मिळाला;
तुझ्या भावांनी तुला काही ठेवले नाही.
    परंतु माझे सर्व आशीर्वाद तुझ्यावर पर्वता एवढे होतील.

बन्यामीन

27 “बन्यामीन एखाद्या भुकेलेल्या लांडग्यासारखा आहे.
    तो सकाळी आपले भक्ष्य मारुन खाईल
    व राहिलेले संध्याकाळी वाटून टाकील.”

28 हे सर्व इस्राएलाचे बारा वंश होत; आणि हया गोष्टी त्यांचा बाप त्यांच्याशी बोलला; त्याने प्रत्येक मुलाला ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे आशीर्वाद दिला. 29 मग इस्राएलाने त्यांना आज्ञा दिली. तो म्हणाला, “मी मरेन तेव्हा तुम्ही मला माझ्या लोकात नेऊन ठेवावे. एफ्राम हित्ती ह्याच्या शेतातील गुहेत माझ्या पूर्वजांबरोबर मला पुरावे. 30 ती गुहा कनान देशात मम्रेच्या राईजवळील मकपेला येथील शेतात आहे. आपल्या घराण्याला कबरस्तान असावे म्हणून अब्राहामाने ते शेत एफ्रामकडून विकत घेतले. 31 अब्राहाम व त्याची बायको सारा, यांना त्या गुहेह पुरले आहे. इसहाक आणि त्याची बायको रिबेका यांनाही तेथेच पुरले आहे. आणि माझी बायको लेआ हिलाही मी तेथेच पुरले आहे. 32 ती गुहा हेथी लोकाकडून विकत घेतलेल्या शेतात आहे.” 33 आपल्या मुलांशी हे बोलणे संपवल्यानंतर इस्राएल आपले पाय पलंगावर घेऊन झोपला व मरण पावला.

लूक 2

येशूचा जन्म(A)

त्या दिवसात कैसर औगुस्तकडून हुकुम झाला की, रोमन जगातील सर्व लोकांच्या नावांची नोंद झालीच पाहिजे. ही पहिली नावनोंदणी होती. क्वीरीनिय हा सूरिया प्रांताचा राज्यपाल होता त्यावेळेस ही नावनोंदणी झाली. प्रत्येक जण नावनोंदणी करण्यासाठी आपापल्या गावी गेला.

मग योसेफसुद्धा गालीलातील नासरेथ गावाहून यहूदीयातील दाविदाच्या बेथलेहेम या गावी गेला. कारण तो दाविदाच्या घराण्यातील व कुळातील होता. जिच्याशी त्याचे लग्न ठरले होते व जी गरोदर होती, त्या मरीयेसह तो तेथे नावनोंदणी करण्यासाठी गेला. ते तेथे असतानाच तिची बाळंतपणाची वेळ आली. आणि तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. तिने त्याला फडक्यांमध्ये गुंडाळले व गोठ्यात ठेवले, कारण धर्मशाळेत उतरण्यासाठी त्यांना जागा मिळाली नाही.

काही मेंढपाळ येशूविषयी ऐकतात

आणि तेथे काही मेंढपाळ रात्रीच्या वेळी शेतामध्ये राहून आपले कळप राखीत होते. आणि देवाचा एक दूत त्यांच्यामोर प्रगट झाला व प्रभूचे तेज त्यांच्याभोवती पसरले. आणि ते मेंढपाळ घाबरुन गेले. 10 देवदूत त्यांना म्हणाला: “भिऊ नका, कारण मी तुम्हांला आनंदाची बातमी सांगणार आहे, जिच्यामुळे सर्व लोकांना आनंद होणार आहे. 11 कारण आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभु आहे. 12 आणि तुमच्यासाठी ही खूण असेल: फडक्यात गुंडाळलेले आणि गोठ्यात निजविलेले बाळ तुम्हांला आढळेल.”

13 आणि अचानक तेथे देवदूताबरोबर स्वर्गातील सैन्याचा समुदाय जमला. ते देवाची स्तुति करीत होते आणि म्हणत होते;

14 “स्वर्गात देवाला गौरव आणि
    ज्यांच्याबद्दल देव समाधानी आहे, त्या पृथ्वीवरील मनुष्यांत शांति”

15 जेव्हा देवदूत त्यांना सोडून परत स्वर्गात गेले, तेव्हां मेंढपाळ एकमेकांना म्हणाले, “चला, बेथलेहेमला जाऊ या आणि घडलेली जी गोष्ट देवाने आम्हांला कळविली ती पाहू या.”

16 ते घाईने गेले आणि त्यांना मरीया व योसेफ आढळले आणि त्यांनी गोठ्यात ठेवलेले बाळ पाहिले. 17 जेव्हा मेंढपाळांनी त्याला पाहिले तेव्हा देवदूताने त्यांना त्या बाळाविषयी जे सांगितले होते ते सर्वांना सांगितले. 18 ज्यांनी हे ऐकले ते सर्व मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीमुळे चकित झाले. 19 पण मरीयेने या गोष्टी स्वतःजवळच ठेवल्या, व सतत त्याविषयी विचार करु लागली. 20 त्यांनी पाहिलेल्या आणि ऐकलेल्या सर्व गोष्टीविषयी देवाचे गौरव आणि स्तुति करीत मेंढपाळ घरी गेले: त्यांना जसे सांगण्यात आले तसेच सर्व घडले.

21 आणि जेव्हा बाळाची सुंता करण्याचा आठवा दिवस आला, तेव्हा त्याचे नाव येशू ठेवले गेले. हे नाव देवदूतांनी त्याला त्याची गर्भधारणा होण्यापूर्वीच ठेवले होते.

येशूचा मदिंरात प्रस्तुत केला गेला

22 मोशेच्या नियमाप्रमाणे जो त्यांचा शुद्धीकरणाच्या विधीचा काळ होता तो आला तेव्हा त्याला देवापुढे सादर करण्याचा विधि करण्यासाठी ते त्याला घेऊन यरुशलेमला गेले. 23 ज्याप्रमाणे प्रभूच्या नियमात लिहिले आहे; “प्रत्येक प्रथम जन्मलेला तर प्रभूला अर्पण करावा.” [a] 24 आणि “कबुतरांच्या जोडीचा किंवा पारव्याच्या दोन पिलांचा यज्ञ करावा.” [b]प्रभूच्या या नियमाप्रमाणे यज्ञ अर्पण करण्यास ते गेले:

शिमोन येशूला पाहतो

25 यरुशलेम येथे एक मनुष्य होता, त्याचे नाव शिमोन होते; तो नीतिमान आणि भक्तिशील होता. इस्राएलाचे सांत्वन होण्याची तो वाट पाहत होता आणि पवित्र आत्मा त्याच्यावर होता. 26 पवित्र आत्म्याने त्याला दाखवून दिले की, प्रभू ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय तो मरणार नाही. 27 आत्म्याने भरलेला तो मंदिरात गेला. आणि येशूच्या आईवडिलांनी बाळाला नियमशास्त्रात सांगितलेल्या विधीप्रमाणे करण्यासाठी त्याच्याजवळ आणले. 28 शिमोनाने येशूला आपल्या हातात घेतले, आणि त्याने देवाची स्तुति केली. तो म्हणाला:

29 “आता, प्रभु, आपल्या वचनाप्रमाणे आपल्या सेवकाला जाऊ दे,
30 कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे,
31     जे तू सर्व लोकांच्या समोर केलेस.
32 तो यहूदीतर लोकांना तुझा मार्ग प्रगट करण्यासाठी प्रकाश असा आहे.
    आणि तो तुझे लोक इस्राएल यांच्यासाठी गौरव असा आहे.”

33 त्याच्याविषयी सांगितलेल्या गोष्टींमुळे त्याचे आईवडील आश्चर्यचकित झाले. 34 मग शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला, तो येशूची आई मरीया हिला म्हणाला, “इस्राएलात, हे मूल, अनेकांचे पडणे व उठणे यांस कारणीभूत ठरेल. जे चिन्ह नाकारले जाईल ते होण्याकरिता याची नेमणूक झाली आहे. 35 अनेकांच्या मनातील विचार प्रगट होण्यासाठी तुझ्या जिवातून तरवार आरपार जाईल.”

हन्ना येशूला पाहते

36 तेथे हन्ना नावाची एक संदेष्टी स्त्री होती. ती फनूएलाची मुलगी होती. ती अशेर वंशाची होती. ती फार वृद्ध झाली होती. ती लग्नानंतर आपल्या पतीसमवेत सात वर्षे राहिली. 37 ती विधवा असून आता चौऱ्याऐंशी वर्षांची होती. तिने मंदिर कधीही सोडले नाही; उपास व प्रार्थना करुन ती रात्रंदिवस उपासना करीत असे.

38 ती त्यावेळी बालकाच्या आईवडिेलांकडे आली व तिने देवाचे आभार मानले. आणि जे यरुशलेमच्या सुटकेविषयी वाट पाहत होते त्या सर्वांना तिने त्याच्याविषयी सांगितले.

योसेफ आणि मरीया घरी येतात

39 प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांनी सर्व पूर्ण केले व नंतर ते गालीलातील त्यांच्या नासरेथ या गावी परतले. 40 बालक वाढत होता, तो बलवान झाला, तो ज्ञानाने परिपूर्ण झाला आणि देवाची कृपा त्याच्यावर होती.

येशूचे बालपण

41 प्रत्येक वर्षी त्याचे आईवडील वल्हांडण सणासाठी यरुशलेमाला जात. 42 जेव्हा तो बारा वर्षांचा झाला तेव्हा ते नेहमीप्रमाणे सणासाठी वर गेले. 43 सण संपल्यावर ते घरी परतत असता, येशू (मुलगा) मात्र यरुशलेमातच राहिला, पण त्याच्या आईवडिलांना हे माहीत नव्हते. 44 कुठल्या तरी प्रवाश्यांच्या घोळक्याबोरबर तो येत असावा असा विचार करुन पुढे एक दिवसाचा प्रवास केला. मग ते त्याला त्यांच्या नातेवाईकांमध्ये व मित्रांमध्ये शोधू लागले. 45 जेव्हा तो त्यानां सापडला नाही तेव्हा त्याला शोधण्यासाठी यरुशलेमास परत गेले.

46 असे घडले की, तीन दिवसांनंतर तो त्यांना मंदिरात सापडला, तो गुरुजनांच्यामध्ये बसून त्यांचे ऐकत होता व त्यांना प्रश्न विचारीत होता. 47 ज्यांनी त्याचे बोलणे ऐकले ते सर्व त्याच्या समजबुद्धीमुळे आणि उत्तरांमुळे चकित झाले. 48 जेव्हा त्याच्या आईवडिलांनी त्याला पाहिले तेव्हा ते चकित झाले. त्याची आई त्याला म्हणाली, “मुला, तू आमच्याबरोबर असे का केले? तुला शोधत असताना तुझे वडील व मी अतिशय काळजीत होतो.”

49 मग येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही माझा शोध का केलात? माझ्या पित्याचे कार्य जेथे आहे, तेथे मी असावे हे तुम्हांला माहीत नव्हते काय?” 50 परंतु त्याने हे जे उत्तर दिले ते त्यांना समजले नाही.

51 मग तो त्यांच्याबरोबर नासरेथास गेला. आणि तो त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याची आई या सर्व गोष्टी अंतःकरणात ठेवीत होती. 52 येशू ज्ञानाने आणि शरीराने देवाच्या आणि मनुष्यांच्या कृपेत वाढला.

ईयोब 15

अलीफज ईयोबला उत्तर देतो

15 नंतर तेमानच्या अलीफजने ईयोबला उत्तर दिले:

“ईयोबा, जर तू खरोखरच शहाणा
    असशील तर तू पोकळ शब्दांनी उत्तर देणार नाहीस.
    शहाणा माणूस गरम हवेने इतका भरलेला नसतो.
विद्वान निरुपयोगी शब्दांनी
    आणि निरर्थक बोलण्याने वाद घालत बसेल असे तुला वाटते का?
ईयोबा तुला जर तुझ्या मनाप्रमाणे वागू दिले तर कोणीही माणूस देवाला मान देणार नाही
    आणि त्याची प्रार्थना करणार नाही.
तुझ्या बोलण्यावरुन तुझे पाप चांगले कळते.
    ईयोबा तू हुशारीने बोलून तुझे पाप लपवायचा प्रयत्न करीत आहेस.
तू चुकत आहेस हे सिध्द करण्याची मला आवश्यकता वाटत नाही.
    का? कारण तू तुझ्या तोंडाने जे बोलतोस ते तू चुकात असल्याचे सिध्द करतात.
    तुझे स्वतःचेच ओठ तुझ्याविरुध्द बोलतात.

“ईयोबा, जन्माला येणारा तू पहिलाच माणूस आहेस असे तुला वाटते का?
    टेकड्या निर्माण व्हायच्या आधीच तू जन्मलास का?
तू देवाच्या गुप्त मसलती ऐकल्यास का?
    केवळ तूच एक शहाणा माणूस आहेस असे तुला वाटते का?
ईयोब, तुझ्यापेक्षा आम्हाला जास्त माहिती आहे.
    तुला न कळणाऱ्या गोष्टी आम्हाला समजतात.
10 केस पांढरे झालेले लोक आणि वृध्द आमच्याशी सहमत आहेत.
    होय, तुझ्या वडिलांपेक्षा वृध्द असलेले लोक आमच्या बाजूला आहेत.
11 देव तुझे सांत्वन करतो
    पण ते तुला पुरेसे वाटत नाही.
देवाचा निरोप आम्ही तुला अगदी हळुवारपणे दिला आहे.
12 ईयोबा, तू का समजून घेत नाहीस?
    तू सत्य का पाहात नाहीस?
13 तू हे रागाचे शब्द उच्चारतोस
    तेव्हा तू देवाच्या विरुध्द जातोस.

14 “मनुष्य कधीही निष्कलंक असू शकत नाही.
    मनुष्यप्राणी देवापेक्षा अधिक बरोबर असू शकत नाही.
15 देव त्याच्या पवित्र दूतांवर विश्र्वास ठेवत नाही.
    देवाशी तुलना करता स्वर्गसुध्दा निर्मळ नाही.
16 मनुष्यप्राणी सर्वांत वाईट आहे,
    तो अशुध्द् आणि कुजलेला आहे.
    तो वाईट गोष्टी पाण्यासारख्या पितो.

17 “ईयोबा, तू माझे ऐक मी तुला नीट सांगतो.
    मला जे माहीत आहे ते मी तुला सांगतो.
18 विद्वानांनी ज्या गोष्टी मला सांगीतल्या,
    त्या मी तुला सांगतो.
    विद्वानांच्या पूर्वजांनी त्यांना या गोष्टी सांगीतल्या.
त्यांनी माझ्यापासून कुठलीही गुप्त गोष्ट लपवून ठेवली नाही.
19 ते त्यांच्या देशात एकटे राहात होते, तिथून दुसऱ्या देशांतील लोक जात नसत.
    त्यामुळे इतरांनी कुणी त्यांना काही विचित्र कल्पना सांगितल्या नाहीत.
20 हे विद्वान लोक म्हणाले, दुष्ट माणूस जीवनभर यातना भोगतो.
    क्रूर माणूस मरण येईपर्यंत भीतीने कापत असतो.
    (क्रूर माणसाचे दिवस भरलेले असतात. तो त्या दिवसांत ही यातना भोगतो.)
21 त्याला प्रत्येक आवाजाची भीती वाटते.
    जेव्हा आपण सुरक्षित आहोत असे त्याला वाटते तेव्हा त्याचा शत्रू त्याच्यावर हल्ला करतो.
22 दुष्ट माणूस निराश झालेला असतो.
    व त्याला अंधारातून सुटका होण्याची आशा नसते.
    त्याला मारण्यासाठी तलवार टपून बसलेली असते.
23 तो इकडे तिकडे भटकत राहातो परंतु त्याचे शरीर गिधाडांचे अन्न असते.
    आपला मृत्यू अगदी जवळ आला आहे हे त्याला माहीत असते.
24 त्याला काळजी आणि यातना भयभीत करतात.
    एखाद्या राजाप्रमाणे त्याला नष्ट करण्यासाठी त्या त्याच्यावर हल्ला करतात.
25 का? कारण दुष्ट मनुष्य देवाची आज्ञा मानायला तयार नसतो.
    तो त्याच्या मुठी देवासमोर नाचवतो.
    तो सर्वशक्तिमान देवाचा पराभव करायचा प्रयत्न करतो.
26 दुष्ट माणूस अतिशय हट्टी असतो.
    तो जाड आणि मजबूत ढालीने देवावर हल्ला करतो.
27 माणूस श्रीमंत आणि धष्टपुष्ट असू शकतो.
28     पण त्याचे शहर धुळीला मिळेल.
त्याच्या घराचा नाश होईल.
    त्याचे घर रिकामे होईल.
29 दुष्ट माणूस फार दिवस श्रीमंत राहू शकत नाही.
    त्याची संपत्ती खूप दिवस टिकत नाही.
    त्याची पिके जास्त वाढत नाहीत.
30 दुष्ट माणसाची काळोखापासून सुटका नसते.
    तो त्या झाडासारखा असतो ज्याची पाने रोगामुळे मरतात
    आणि वारा त्यांना दूर उडवून नेतो.
31 निरुपयोगी गोष्टींवर विश्वास ठेवून दुष्ट माणसाने स्वतःचीच फसवणूक करुन घेऊ नये, का?
    कारण त्याला त्यातून काहीही मिळणार नाही.
32 आयुष्य संपायच्या आधीच दुष्ट माणूस म्हातारा आणि शुष्क झालेला असेल.
    तो पुन्हा कधीही हिरव्या न होणाऱ्या फांदीसारखा असेल.
33 दुष्ट माणूस द्राक्ष न पिकता गळून गेलेल्या द्राक्षाच्या वेलीसारखा असेल.
    तो फूल गळून गेलेल्या जैतून झाडाप्रमाणे असेल.
34 का? कारण ज्यांच्या जवळ देव नसतो त्यांच्याजवळ काहीही नसते.
    जे लोक पैशावर प्रेम करतात त्यांची घरे आगीत भस्मसात होतात.
35 दुष्ट माणसे सतत दुष्टपणा करण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी योजना आखत असतात.
    ते लोकांना फसविण्यासाठी योजना तयार करतात.”

1 करिंथकरांस 3

माणसांना अनुसरणे चुकीचे आहे

परंतु बंधूंनो आध्यात्मिक लोक म्हणून मी तुमच्याशी बोलू शकत नव्हतो. त्याऐवजी मला तुमच्याशी देहिक लोकांसारखे आणि ख्रिस्तामधील बालकासारखे बोलावे लागले. मी तुम्हांला पिण्यासाठी दूध दिले, जड अन्र दिले नाही. कारण तुम्ही जड अन्र खाऊ शकत नव्हता. व आतासुद्धा तुम्ही खाऊ शकत नाही. कारण तुम्ही अजूनसुद्धा दैहिक आहात. कारण तुमच्यात मत्सर व भांडणे चालू आहेत, तर तुम्ही दैहिक नाही काय, व जगातील लोकांसारखे वागत नाही काय? कारण जेव्हा काही म्हणतात, “मी पौलाचा आह,” आणि इतर दुसरे म्हणतात, “मी अपुल्लोसाचा आहे,” तेव्हा तुम्ही जगिक लोकांसारखे वागत नाही काय?

तर मग अपुल्लोस कोण आणि पौल कोण? आम्ही केवळ सेवक आहोत, ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वासणारे झाला आणि आम्हा प्रत्येकाला देवाने जे काम नेमून दिले ते काम आम्ही केले. मी बी लावले, अपुल्लोसाने त्याला पाणी घातले, पण देवाने त्याची वाढ केली. म्हणून जो बी पेरतो तो किंवा जो पाणी घालतो तो महत्त्वाचा नाही, तर देव जो त्याची वाढ करतो तो महत्त्वाचा आहे. जे बी पेरतात व पाणी घालतात ते एक आहेत व प्रत्येकाला त्याच्या फळावर आधारित अशी मजूरी मिळेल कारण देवा समवेत आपण सर्वजण कामगार आहोत.

तुम्ही देवाचे शेत आहात व देवाची इमारत आहात. 10 आणि देवाच्या दानाप्रमाणे जे मला दिले होते त्याप्रमाणे सूज्ञ, कुशल बांधणाऱ्यांप्रमाणे पाया घातला. पण दुसरा कोणी तरी त्यावर बांधतो, परंतु प्रत्येकाने आपण त्यावर कसे बांधतो याविषयी खबरदारी घ्यावी. 11 येशू ख्रिस्त जो पाया आहे त्याच्यावाचून इतर कोणीही दुसरा पाया घालू शकत नाही. 12 जर कोणी त्या पायावर सोने, चांदी, मौल्यवान दगड, लाकूड, गवत किंवा पेंढा यांनी बांधतो, 13 तर प्रत्येक व्यक्तीचे काम स्पष्ट दिसून येईल. कारण तो दिवस ते स्पष्ट करील, तो दिवस अग्नीने प्रगट होईल व तोच अग्नि प्रत्येक माणसाचे काम कसे आहे हे ठरविण्यासाठी परीक्षा घेईल. 14 ज्या कोणाचे बांधकाम, जे त्या पायावर बांधलेले आहे ते टिकेल, त्याला बक्षीस मिळेल. 15 जर एखाद्याचे काम जळून गेले, तर त्याचे नुकसान होईल, परंतु जेव्हा तो इमारतीला लागलेल्या अग्नीपासून बचावासाठी पळून जाईल तेव्हा तो तारला जाईल.

16 तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो हे तुम्हांला माहीत नाही काय? 17 जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील. कारण देवाचे मंदिर पवित्र आहे आणि ते तुम्ही आहात.

18 कोणीही स्वतःला फसवू नये. जर कोणी स्वतःला या जगाच्या दृष्टिकोणानुसार शहाणा समजत असेल तर त्याने खरोखर ज्ञानी होण्यासाठी “मूर्ख” व्हावे. 19 कारण या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपणाचे आहे. असे लिहिले आहे, “देव शहाण्यांना हुशारीमध्ये पकडतो.” 20 आणि पुन्हा “देव जाणतो की, शहाण्यांचे विचार निरर्थक आहेत.” 21 म्हणून मनुष्यांविषयी कोणीही फुशारकी मारु नये. कारण सर्व गोष्टी तुमच्या आहेत. 22 तर तो पौल, अपुल्लोस, पेत्र, जग, जीवन किंवा मरण असो, वर्तमानकाळाच्या गोष्टी असोत अथवा भविष्यकाळाच्या गोष्टी असोत, सर्व गोष्टी तुमच्या आहेत. 23 तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center