M’Cheyne Bible Reading Plan
मनश्शे व एफ्राईम यांना आशीर्वाद
48 मग काही काळानंतर आपला बाप फारो आजारी असल्याचे समजले म्हणून योसेफ आपले दोन मुलगे मनश्शे व एफ्राईम यांना घेऊन आपल्या बापाला भेटावयास गेला; 2 “योसेफ आपणास भेटावयास आला आहे” असे समजल्याबरोबर इस्राएल फार अशक्त झाला होता; तरीही अगदी कष्टाने प्रयत्न करुन तो बिछान्यावर उठून बसला.
3 मग इस्राएल योसेफास म्हणाला, “सर्वसमर्थ देवाने मला कनानातील लूज येथे दर्शन देऊन आशीर्वाद दिला. 4 देव म्हणाला, ‘मी तुला खूप संतती देईन व ती वाढवीन आणि तुम्ही एक मोठे राष्ट्र व्हाल; तुझी संतती या देशाची कायमची वतनदार होईल.’ 5 आणि आता तुला दोन मुलगे आहेत. मी येथे मिसरला येण्यापूर्वी हे दोघे येथे जन्मले. तुझे हे दोन मुलगे मनश्शे व एफ्राईम मला माझ्या स्वतःच्या मुलासारखे आहेत; म्हणजे जसे मला रऊबेन व शिमोन तसेच हे दोघे आहेत. 6 ते माझे मुलगे आहेत म्हणून माझ्या सर्व मालमत्तेत वाटेकरी होतील; परंतु तुला जर आणखी मुलगे झाले तर मग ते तुझे होतील; पण ते एफ्राईम व मनश्शे यांना, त्यांच्या मुलग्यांसारखे होतील म्हणजे पुढील काळात एफ्राईम व मनश्शे यांच्या मालमत्तेचे ते वारस होतील म्हणजेच त्यांचे वतन एफ्राईम व मनश्शे ह्या त्यांच्या भावांच्या नावाने चालेल. 7 कारण पदन-अराम येथून येताना तुझी आई राहेल एफ्राथजवळ आम्ही, वाटचाल करीत असताना कनान देशात मरण पावली; त्यामुळे मी फार दु:खी झालो; तेव्हा एफ्राथच्या म्हणजे बेथलेहेमाच्या वाटेवर मी तिला मूठमाती दिली.”
8 मग इस्राएलाने योसेफाच्या मुलांना पाहिले; तेव्हा इस्राएल म्हणाला, “हे मुलगे कोणाचे आहेत?”
9 योसेफ आपल्या बापास म्हणाला, “बाबा! हे माझे मुलगे आहेत; हे मला देवाने दिले आहेत.”
इस्राएल म्हणाला, “तुझ्या मुलांना माझ्याकडे आण म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन.”
10 इस्राएल अतिशय म्हातारा झाला होता आणि त्याची नजर मंद झाल्यामुळे त्याला चांगले स्पष्ट दिसत नव्हते; तेव्हा इस्राएलाने त्या मुलांना कवटाळून त्यांचे मुके घेतले. 11 मग इस्राएल योसेफास म्हणाला, “मुला तुझे तोंड पुन्हा पाहावयास मिळेल असे वाटले नव्हते, पण पाहा! देवाने तुझी व माझी भेट होऊ दिली. मला तुझी मुलेही पाहू दिली.”
12 मग योसेफाने आपल्या मुलांना इस्राएलाच्या मांडीवरुन काढून घेतले; ते मुलगे इस्राएला समोर उभे राहिले व त्यांनी त्याला लवून नमन केले. 13 योसेफाने मनश्शेला आपल्या डाव्या हाती म्हणजे तो इस्राएलाच्या उजव्या हाती येईल असे व एफ्राईमाला आपल्या उजव्या हाती म्हणजे तो इस्राएलाच्या डाव्या हाती येईल असे उभे केले. 14 परंतु इस्राएलाने आपल्या उजव्या डाव्या हातांची घडी टाकून अदलाबदल केली आणि आपला उजवा हात त्याने धाकटया मुलाच्या म्हणजे एफ्राईमाच्या डोक्यावर ठेवला व डावा हात थोरल्याच्या म्हणजे मनश्शेच्या डोक्यावर ठेवला; 15 आणि इस्राएलाने योसेफाला आशीर्वाद दिला; तो म्हणाला,
“माझे पूर्वज अब्राहाम व इसहाक यांनी आपल्या देवाची उपासना केली
व त्याच देवाने मला माझ्या सर्व आयुष्यभर चालवले आहे;
16 तोच मला सर्व संकटातून सोडवणारा माझा देवदूत होता.
त्यानेच ह्या मुलांना आशीर्वाद द्यावा अशी मी प्रार्थना करतो.
आता ही मुले माझे व आपले पूर्वज
अब्राहाम व इसहाक यांचे नाव चालवोत;
ते वाढून त्यांची पृथ्वीवर अनेक कुटुंबे, कुळे व राष्ट्रे होवोत
अशी मी प्रार्थना करतो.”
17 आपल्या बापाने एफ्राईमाच्या डोक्यावर आपला उजवा हात ठेवला असे पाहिले तेव्हा योसेफाला ते आवडले नाही; त्याला तो हात एफ्राईमाच्या डोक्यावरुन काढून मनश्शेच्या डोक्यावर ठेवावयास पाहिजे होता म्हणून योसेफाने आपल्या बापाचा हात धरला. 18 योसेफ आपल्या बापास म्हणाला, “बाबा! तुम्ही आपला उजवा हात चुकीच्या मुलावर ठेवला आहे. मनश्शे हा प्रथम जन्मलेला म्हणजे माझा थोरला मुलगा आहे.”
19 परंतु त्याचा बाप आपले म्हणणे कायम ठेवत पुढे म्हणाला, “माझ्या मुला! मला माहीत आहे; होय मला माहित आहे की मनश्शे हा प्रथम जन्मलेला आहे; आणि तो महान होईल; तो अनेक राष्ट्रांचा पिता होईल म्हणजे त्याच्यापासून अनेक राष्ट्रे उदयास येतील, परंतु धाकटा भाऊ थोरल्या पेक्षाही अधिक महान होईल आणि त्याची कुळे वाढून त्यांचा मोठा राष्ट्रसमूह निर्माण होईल.”
20 तेव्हा त्या दिवशी इस्राएलाने त्या मुलांना आशीर्वाद दिला; तो म्हणाला,
“इस्राएल लोक आशीर्वाद देताना
तुमची नावे उच्चारितील;
ते म्हणतील, ‘देव तुम्हाला एफ्राईमासारखा,
मनश्शेसारखा आशीर्वाद देवो.’”
अशारीतीने इस्राएलाने एफ्राईमास मनश्शेपेक्षा अधिक मोठे केले.
21 मग इस्राएल योसेफास म्हणाला, “माझे शेवटचे दिवस आता अगदी जवळ आले आहेत, आता मी मरणार; परंतु देव सतत तुमच्या बरोबर राहील, तो तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या देशात घेऊन जाईल. 22 तुझ्या भावांना मी जे दिले नाही ते मी तुला देतो; मी स्वतः तलवारीने व धनुष्याने लढून अमोरी लोकाकडून जिंकलेला पर्वत तुला देतो.”
जखऱ्या व अलीशिबेला मरीया भेटते
39 त्याच वेळी मरीया तयार झाली आणि लगेच यहूदीयाच्या डोंगराळ भागातील एका गावी गेली. 40 तिने जखऱ्याच्या घरात प्रवेश केला आणि अलीशिबेला अभिवादन केले. 41 आणि असे झाले की, जेव्हा अलीशिबेने मरीयेचे अभिवादन ऐकले तेव्हा तिच्या पोटातील बालकाने उडी मारली. आणि अलीशिबा पवित्र आत्म्याने भरुन गेली.
42 ती मोठ्या आवाजात बोलली, “सर्व स्त्रियांमध्ये तू अधिक धन्य आहेस, तुझ्या पोटचे फळ धन्य आहे. 43 परंतु माझ्या बाबतीत अशी कोणती गोष्ट घडली की माझ्या प्रभूच्या आईने माझ्याकडे यावे? 44 कारण तुझ्या अभिवादनाचा आवाज माझ्या कानी पडताक्षणीच, माझ्या पोटातील बाळाने आनंदाने उडी घेतली. 45 प्रभूने तुला ज्या गोष्टी घडतील असे सांगितले त्यावर तू विश्वास ठेवलास म्हणून तू धन्य आहेस.”
मरीया देवाची स्तुति करते
46 आणि मरीया म्हणाली,
47 “माझा आत्मा प्रभूची स्तुति करतो;
माझा आत्मा माझ्या तारणाऱ्या देवामध्ये आनंद करतो.
48 कारण त्याने त्याच्या नम्र दासीची काळजी वाहिली होय,
येथून पुढे सर्व लोक मला धन्य म्हणतील.
49 कारण सर्वसमर्थाने माझ्यासाठी महान कृत्ये केली आहेत,
त्याचे नाव पवित्र आहे.
50 जे त्याचे भय धरतात,
त्यांच्यावर तो पिढ्यानपिढ्या दया करतो.
51 त्याने आपल्या बाहूंनी आपले सामर्थ्य दाखविले;
गर्विष्ठ लोकांना त्यांच्या बढाईखोर विचारांसह विखरुन टाकले आहे.
52 सत्ताधीशांना त्याने त्यांच्या सिंहासनावरुन खाली आणले आहे,
आणि नम्र जनांना त्याने उंच केले आहे.
53 त्याने भुकेलेल्यांना उत्तम पदार्थांनी समाधान दिले आहे.
श्रीमंत लोकांना त्याने रिकामे पाठविले आहे.
54 त्याचा सेवक जो इस्राएल याला
मदत करण्यास तो आला आहे.
55 त्याने आपल्या पूर्वजांना जे अभिवचन दिले होते त्याप्रमाणे
अब्राहाम व त्याच्या वंशजांवर दया करण्याचे तो लक्षात ठेवतो.”
56 मरीया अलीशिबेबरोबर तीन महीने राहिली, आणि मग ती तिच्या घरी परत गेली.
योहानाचा जन्म
57 अलीशिबेला तिचे मूल होण्याची वेळ आली, तेव्हा तिने एका मुलाला जन्म दिला. 58 तिच्या शेजाऱ्यांनी व नातेवाईकांनी ऐकले की, देवाने तिच्यावर मोठी कृपा केली आहे, ते तिच्या आनंदात सहभागी झाले.
59 मग असे झाले की, आठव्या दिवशी मुलाची सुंता करण्यासाठी ते आले, ते, त्याच्या बापाचे जे नाव होते तेच म्हणजे जखऱ्या नाव ठेवणार होते. 60 पण त्याची आई म्हणाली, “नाही, त्याला योहान असे म्हणावे.”
61 ते तिला म्हणाले, “तुझ्या कोणत्याच नातेवाईकाचे नाव ते नाही.” 62 नंतर त्यांनी त्याच्या वडिलांना खुणेने विचारले, “त्याला कोणते नाव ठेवायचे आहे?”
63 त्याने लिहिण्यासाठी पाटी मागितली आणि लिहिले, “त्याचे नाव योहान आहे.” त्या सर्वांना खूपच आश्चर्य वाटले. 64 लगेच त्याचे तोंड उघडले आणि त्याची जीभ मोकळी झाली, आणि तो बोलू लागला व देवाची स्तुति करु लागला. 65 सर्व शेजारी भयभीत झाले आणि यहूदीयाच्या सर्व डोंगराळ प्रदेशात लोक या सर्व गोष्टींबद्दल बोलत होते. 66 ज्या कोणी हे ऐकले त्या प्रत्येकाने याविषयी नवल केले, ते म्हणाले, “हे मूल पुढे कोण होणार आहे?” कारण देवाचा वरदहस्त त्यांच्यावर होता.
जखऱ्या देवाची स्तुति करतो
67 मग त्याचा पिता जखऱ्या पवित्र आत्म्याने भरला गेला, त्याने भविष्यवाणी केली; तो म्हणाला,
68 “प्रभु, इस्राएलाचा देव धन्यवादित असो,
कारण तो त्याच्या लोकांना मदत करण्यास,
व त्यांना मुक्त करण्यास आला आहे.
69 त्याने आमच्यासाठी आपला सेवक दाविद याच्या घराण्यातून
आम्हांला सामर्थ्यशाली तारणारा दिला आहे.
70 देव म्हणाला की, मी असे करीन
त्याच्या पवित्र भविष्यवाद्यांकरवी तो हे बोलला व ते फार वर्षां पूर्वी होऊन गेले.
71 जे आमचे शत्रु आहेत व जे आमचा द्वेष करतात
त्यांच्यापासून मुक्त करण्याचे अभिवचन त्याने आम्हांला दिले.
72 आमच्या पूर्वजांवर दया दाखविण्यासाठी तो हे करणार आहे.
व त्यांच्याशी केलेला पवित्र करार लक्षात ठेवण्यासाठी तो आमचे रक्षण करणार आहे.
73 हा करार एक शपथ होती, जी त्याने आमचा पूर्वज अब्राहाम याच्याशी घेतली
74 ती अशी की, तो आम्हांला शत्रुच्या सामर्थ्यापासून मुक्त करील, अशासाठी की,
आम्ही त्याची सेवा निर्भयपणे करु शकू.
75 त्याची अशी इच्छा होती की, आम्ही त्याच्यासमोर धार्मिकतेने व पवित्रतेने आमच्या आयुष्याचे सर्व दिवस जगावे.
76 “मुला, आता तुला सर्वोच्च देवाचा संदेष्टा म्हणातील.
प्रभूच्या येण्यासाठी लोकांना तयार करण्यासाठी तू त्याच्या (प्रभु) पुढे चालशील.
77 कारण तू प्रभूसमोर, त्याचा मार्ग तयार करण्यासाठी आणि पापक्षमा मिळून तुमचे तारण होईल
हे त्याच्या लोकांना सांगण्यासाठी पुढे जाशील.
78 “कारण देवाच्या हळुवार करुणेमुळे
स्वर्गीय दिवसाची पहाट उजाडेल व मरणाच्या दाट छायेत जे जगत आहेत त्यांच्यावर प्रकाशेल.
79 आणि शांतीच्या मार्गावर आमच्या
पावलांना मार्गदर्शन करील.”
80 अशा रीतीने तिचा मुलगा मोठा होत गेला आणि आत्म्यात सामर्थ्यशाली झाला. इस्राएल लोकांना प्रगट होण्याच्या दिवसापर्यंत तो अरण्यात राहिला.
14 ईयोब म्हणाला:
“आपण सर्व मनुष्यप्राणी आहोत.
आपले आयुष्य अगदी कमी आणि कष्टांनी भरलेले आहे.
2 माणसाचे आयुष्य फुलासारखे आहे.
तो लवकर वाढतो आणि मरुन जातो.
माणसाचे आयुष्य छायेसारखे आहे.
ती थोडा वेळ असते आणि नंतर नाहीशी होते.
3 ते खरे आहे पण देवा, माझ्याकडे एका माणसाकडे तू लक्ष देशील का?
आणि तू माझ्याबरोबर न्यायालयात येशील का?
आपण दोघेही आपापली मते मांडू या का?
4 “परंतु एखाद्या घाणेरड्या वस्तूचे स्वच्छ वस्तूशी काय साम्य असू शकते काहीच नाही.
5 माणसाचे आयुष्य मर्यादित आहे देवा,
माणसाने किती जगायचे ते तूच ठरवतोस.
तूच त्याची मर्यादा निश्र्चित करतोस आणि ती कुणीही बदलू शकत नाही.
6 देवा, म्हणून तू आमच्यावर नजर ठेवणे बंद कर.
आम्हाला एकटे सोड.
आमची वेळ संपेपर्यंत आमचे हे कष्टप्रद आयुष्य आम्हाला भोगू दे.
7 “वृक्षाला तोडून टाकले तरी त्याच्याबाबतीत आशा असते.
ते पुन्हा वाढू शकते त्याला नवीन फांद्या फुटतच राहतात.
8 त्याची मुळे जरी जमिनीत जुनी झाली
आणि त्याचे खोड जमिनीत मरुन गेले.
9 तरी ते पाण्यामुळे पुन्हा जिवंत होते.
आणि त्याला नवीन रोपासारख्या फांद्या फुटतात.
10 परंतु माणूस जेव्हा मरतो तेव्हा तो संपतो.
माणूस मरतो तेव्हा तो कायमचा जातो.
11 नद्या सुकून जाईपर्यंत तुम्ही समुद्रातील पाणी घेऊ शकता.
तरीही माणूस मरुन जातो.
12 माणूस मरतो तेव्हा तो झोपतो
आणि पुन्हा कधीही उठत नाही.
आकाश नाहीसे होईपर्यंत मेलेला माणूस उठणार नाही.
मनुष्यप्राणी [a] त्या झोपेतून कधीच जागा होत नाही.
13 “तू मला माझ्या थडग्यात लपवावेस असे मला वाटते.
तुझा राग निवळेपर्यंत तू मला तिथे लपवावेस.
नंतर तू तुझ्या सोयीने माझी आठवण करु शकतोस.
14 मेलेला माणूस पुन्हा जिवंत होऊ शकतो का?
मी माझी सुटका होईपर्यंत वाट बघत राहीन.
15 देवा तू मला हाक मारशील
आणि मी तुला उत्तर देईन.
मग जे तू मला निर्माण केलेस तो
मी तुला महत्वाचा वाटेन.
16 तू माझी प्रत्येक हालचाल निरखशील.
पण माझ्या पापांची तुला आठवण होणार नाही.
17 तू माझी पापे एखाद्या पिशवीत बांधून ठेवावीस अंसे मला वाटते.
ती पिशवी मोहोरबंद कर आणि फेकून दे.
18 “डोंगर पडतात आणि नष्ट होतात.
मोठमोठे खडक फुटतात आणि त्यांच्या ठिकऱ्या होतात.
19 खडकावरुन वाहणारे पाणी त्यांची झीज करते.
पुरामुळे जमिनीवरची माती वाहून जाते.
त्याचप्रमाणे देवा, तू माणसाची आशा नष्ट करतोस.
20 तू त्याचा संपूर्ण पराभव करतोस
आणि मग तू तेथून निघून जातोस.
तू त्याला दु:खी करतोस
आणि त्याला नेहमीसाठी मृत्यूलोकात पाठवून देतोस.
21 त्यांच्या मुलांना मानसन्मान प्राप्त झाला तर ते त्याला कळत नाही.
त्याच्या मुलांनी काही चुका केल्या तर त्या त्याला कधी दिसत नाहीत.
22 त्या माणसाला फक्त त्याच्या स्वतःच्या शारीरिक दु:खाची जाणीव असते.
आणि तो केवळ स्वतःसाठीच रडतो.”
ख्रिस्ताविषयीचा वधस्तंभावरील संदेश
2 म्हणून बंधूनो, जेव्हा मी तुमच्याकडे आलो, तेव्हा मी देवाचे रहस्यमय सत्य मानवी ज्ञानाने किंवा वक्तृत्वकलेने सांगण्यासाठी आलो नाही. 2 कारण तुमच्यामध्ये असताना फक्त येशू ख्रिस्त आणि तोही वधस्तंभावर खिळलेला याशिवाय कशाचेही ज्ञान असू नये असा मी निश्र्च्य केला आहे. 3 तेव्हा मी तुमच्याकडे अशक्तपणाने, भीतियुक्त असा व थर थर कापत आलो आहे. 4 माझे भाषण व संदेश हे मन वळविणाऱ्या मानवी ज्ञानाद्वारे दिलेले नव्हते, ते आत्मा आणि सामर्थ्य यांचा पुरावा असलेले होते. 5 यासाठी की, तुमचा विश्वास मानवी ज्ञानावर नव्हे तर देवाच्या सामर्थ्यवर असावा.
देवाचे ज्ञान
6 परंतु जे प्रौढ आहेत त्यांना आम्ही ज्ञान देतो. या युगाच्या अधिकाऱ्यांना नव्हे, ज्यांचा शेवट करण्यासाठी आणण्यात येत आहे. 7 त्याऐवजी, जे लपविलेले आहे, आणि हे युग सुरु होण्यापूर्वी देवाने आमच्या गौरवासाठी नेमले होते ते देवाचे रहस्यमय ज्ञान देतो. 8 जे या युगाच्या कोणाही सत्ताधीशाला माहीत नव्हते, कारण जर त्यांना कळले असते, तर त्यांनी गौरवी प्रभूला वधस्तंभावर खिळले नसते. 9 परंतु ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते,
“डोळ्यांनी पाहिले नाही,
कानांनी ऐकले नाही,
आणि मनुष्याच्या अंतःकरणाने जे उपजविले नाही,
ते देवाने त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी तयार केले आहे.” (A)
10 परंतु देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपणांस प्रकट केले आहे.
कारण आत्मा हा प्रत्येक गोष्टीचा शौध घेतो, एवढेच नव्हे तर तो देवाच्या सखोलतेच्या गुप्ततेचाही शोध घेतो. 11 कारण मनुष्याच्या आत्म्याशिवाय त्या मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा दुसरा कोण मनुष्य आहे? याप्रमाणेच देवाच्या आत्म्याशिवाय देवाचे विचार कोणीच ओळखू शकत नाही. 12 परंतु आम्हांला जगाचा आत्मा मिळाला नाही, तर देवापासूनचा आत्मा मिळाला आहे. यासाठी की, देवाने ज्या गोष्टी फुकट दिल्या आहेत त्यांचे आम्हांला ज्ञान व्हावे.
13 मानवी ज्ञानाने शिकविलेल्या शब्दांनी आम्ही या गोष्टी सांगत नाही, तर आत्म्याने शिकविलेल्या शब्दांनी, आध्यात्मिक शब्द उपयोगात आणून आध्यात्मिक गोष्टींचे स्पष्टीकरण करतो. 14 स्वाभाविक मनुष्य देवाच्या आत्म्याने प्रगट झालेल्या गोष्टी ग्रहण करीत नाही. कारण त्या त्याला मूर्खपणाच्या आहेत. आणि त्या त्याला समजत नाहीत, कारण त्यांची आध्यात्मिक रितीने पारख केली जाते. 15 परंतु आध्यात्मिक मनुष्य सर्व गोष्ट पारखू शकतो कारण त्याची पारख करणे कोणालाही शक्य नसते, 16 कारण पवित्र शास्त्र म्हणते,
“प्रभूचे मन कोण जाणतो?
जो त्याला शिकवू शकेल?” (B)
परंतु आमच्या ठायी ख्रिस्ताचे मन आहे.
2006 by World Bible Translation Center