Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
उत्पत्ति 47

इस्राएल गोशेन प्रांतात वस्ती करतो

47 योसेफ फारोकडे जाऊन म्हणाला, “माझा बाप माझे भाऊ व त्यांच्या कुटुंबातील सर्व मंडळी कनानातून त्यांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे व त्यांचे सर्वकाही घेऊन येथे आले आहेत. ते हल्ली गोशेन प्रांतात आहेत.” योसेफाने आपल्याबरोबर फारोसमोर जाण्यासाठी आपल्या भावांपैकी पाच जणांची निवड केली.

फारो त्या भावांना म्हणाला, “तुम्ही काय धंदा करता?”

ते भाऊ म्हणाले, “महाराज, आम्ही आपले दास मेढपाळ आहोत; आमच्या आधी आमचे पूर्वजही मेंढपाळच होते.” ते फारोला पुढे म्हणाले, “कनान देशात फारच भयंकर व कडक दुष्काळ पडला आहे. तेथे एकाही शेतात आमच्या कळपासाठी हिरवे गवत किंवा हिरवा चारा नाही म्हणून आम्ही ह्या देशात राहण्यास आलो आहोत; महाराज आम्ही आपणास नम्र विनंती करतो की आम्हास कृपा करुन गोशेन प्रांतात राहू द्यावे.”

मग फारो योसेफाला म्हणाला, “तुझा बाप व तुझे भाऊ तुझ्याकडे आले आहेत. त्यांना राहण्याकरिता तू मिसरमधील कोणतेही ठिकाण निवड; त्यांना उत्तम जमीन असलेला प्रदेश दे. त्याना गोशेन प्रांतात वस्ती करुन राहू दे; आणि ते जर तरबेज व कुशल मेंढपाळ असतील तर मग त्यांनी माझ्या गुराढोरांचीही काळजी घ्यावी.”

मग योसेफाने आपल्या बापाला फारोच्या समोर येण्यास सांगितले. तेव्हा याकोबाने फारोस आशीर्वाद दिला.

मग फारोने याकोबाला विचारले, “तुमचे वय किती आहे?”

याकोबाने उत्तर दिले, “मला फक्त थोडे परंतु कठिण आणि दु:खी असे जीवन लाभले आहे व ते मला त्रासदायक व दु:खदायक असे झाले; मला फक्त 130 वर्षांचे आयुष्य मिळाले परंतु माझे पूर्वज माझ्यापेक्षा अधिक वर्षांचे जीवन जगले.”

10 याकोबाने फारोला आशीर्वाद दिला व मग तो फारोपुढून निघून गेला.

11 योसेफाने फारोचे म्हणणे मानले व त्याने आपल्या बापाला व भावांना मिसरमधील सर्वात उत्तम भूमीचा रामसेस नगरजवळील प्रांत त्यांना राहावयास दिला. 12 आणि त्याने आपला बाप, आपले भाऊ व त्यांच्या घरचे सर्व यांना भरपूर अन्नसामुग्री पुरवली.

योसेफ फारोसाठी जमीन खरेदी करतो

13 त्यावेळी दुष्काळ तर फारच कडक झाला. देशात अन्नधान्य कोठेच मिळेना; त्यामुळे मिसर व कनान देश या वाईट परिस्थितीमुळे हवालदील झाले. 14 लोकांनी अधिकात अधिक धान्य विकत घेतले; योसेफाने धान्य विक्रीचे पैसे साठवून फारोच्या वाड्यात आणले. 15 काही काळाने मिसर व कनान देशातील लोकांचे पैसे संपून गेले. त्यांच्या जवळचे सर्व पैसे अन्नधान्य विकत घेण्यात खर्च झाल्यामुळे त्यांच्याकडे शिल्लक काहीच राहिले नाही. त्यामुळे मिसरचे लोक योसेफाकडे जाऊन म्हणाले, “महाराज! कृपा करुन आम्हाला धान्य द्या! आमचे सर्व पैसे संपले आहेत; आम्हाला जर काही खावयास मिळाले नाही तर तुमच्या डोळ्यादेखत आम्ही मरुन जाऊ.”

16 परंतु योसेफ म्हणाला, “तुम्ही मला तुमची गुरेढोरे द्या म्हणजे मग मी तुम्हाला धान्य देईन.” 17 तेव्हा लोकांनी त्याच्याकडील गुरेढोरे शेरडेमेंढरे, घोडे, गाढवे आणि इतर जनावरे देऊन अन्नधान्य विकत घेतले; आणि त्या वर्षात लोकांकडून गुरेढोरे घेऊन त्यांच्या बदल्यात योसेफाने त्यांना अन्नधान्य दिले.

18 परंतु त्याच्या नंतरच्या वर्षात लोकांच्यापाशी असलेली गुरेढोरेही संपली व अन्नधान्य विकत घेण्यास त्यांच्या जवळ काहीही राहिले नाही; म्हणून मग लोक योसेफाकडे जाऊन म्हणाले, “महाराज! आपणास माहीत आहे की आमच्याकडे पैसे उरलेले नाहीत आणि आमची गुरेढोरेही तुमची झाली आहेत; तेव्हा आमच्याकडे आता आपणास दिसतात ती फक्त आमची शरीरे व आमची जमीन या शिवाय दुसरे काहीही राहिलेले नाही. 19 आता मात्र आपण बघत असताना आम्ही नक्की मरुन जाऊ; परंतु जर आपण आम्हास अन्नधान्य द्याल तर मग आम्ही आमची जमीन फारोला देऊ आणि आम्ही त्याचे गुलाम होऊ; कृपा करुन आम्हाला बियाणे द्या म्हणजे आम्ही ते पेरु; मग मात्र आम्ही जगू, मरणार नाही; आणि आमची जमीन आम्हांस धान्य देईल.”

20 तेव्हा मिसरमधील सर्व शेतजमीनी योसेफाने फारोकरिता विकत घेतल्या; मिसरच्या लोकांनी आपल्या शेतजमिनी योसेफाला विकल्या कारण दुष्काळ भयंकर तीव्र झाला होता. 21 मिसरमधील सर्व लोक फारोचे गुलाम झाले. 22 योसेफाने याजकांच्या मालकीच्या जमिनी मात्र विकत घेतल्या नाहीत. फारो याजकांना त्यांच्या कामाबद्दल पगार देत होता; त्या पैशातून ते आपणासाठी अन्नधान्य विकत घेत असत म्हणून त्यांच्यावर आपल्या जमिनी विकण्याची वेळ आली नाही.

23 तेव्हा योसेफ लोकांना म्हणाला, “पाहा, मी फारोकरिता तुम्हाला तुमच्या जमिनीसकट विकत घेतले आहे; तर मी आता तुम्हाला बियाणे देतो; ते तुम्ही शेतात पेरा; 24 मग हंगामाच्या वेळी तुमच्या उत्पन्नातील पांचवा हिस्सा फारोला दिलाच पाहिजे; बाकीचे चार हिस्से तुम्ही तुमच्याकारिता घ्यावेत. त्यातून पुढच्या वर्षाकरिता तुम्ही बियाणे ठेवावे व बाकीच्या धान्याचा तुमच्या घरातील लहानथोरांस खाण्यासाठी उपयोग करावा.”

25 लोक म्हणाले, “महाराज, आपण आम्हाला वाचवले आहे म्हणून फारोचे गुलाम होण्यात आम्हाला आनंद आहे.”

26 त्यावेळी मग योसेफाने देशासाठी एक कायदा केला, तो आजपर्यंत चालू आहे; त्या कायद्याप्रमाणे जमिनीच्या उत्पन्नचा पाचवा भाग फारोचा आहे. फारो मिसरमधील सर्व जमिनीचा मालक आहे; फक्त याजकांची जमीन फारोच्या मालकीची नाही.

“मला मिसरमध्ये मूठमाती देऊनको”

27 इस्राएल (याकोब) मिसरमध्ये गोशेन प्रांतात राहिला. त्याची संतती खूप वाढली व त्यांची भरभराट झाली; त्यांना मिसरमधील जमीन मिळाली व त्यांनी वतने केली आणि तेथे त्यांचे सर्वकाही चांगले झाले.

28 याकोब मिसरमध्ये सतरा वर्षे राहिला तेव्हा तो एकशे सत्तेचाळीस वर्षांचा झाला. 29 दिवस वाढत गेले तसे इस्राएलाने (याकोबाने) जाणले की आता आपण लवकर मरणार, म्हणून मग त्याने आपला मुलगा योसेफ याला आपणाजवळ बोलावले; तो म्हणाला, “तू जर माझ्यावर प्रेम करतोस तर माझ्या मांडिखाली तुझा हात ठेवून मला वचन दे की मी जे सांगतो ते तू करशील आणि तू माझ्याशी खरेपणाने वागशील. जेव्हा मी मरेन तेव्हा मला मिसरमध्ये पुरु नको; 30 तर मला मिसरमधून बाहेर घेऊन जा व माझ्या पूर्वजांना जेथे पुरले आहे तेथे म्हणजे आपल्या वंशजांसाठी घेतलेल्या कबरस्तानात मला मूठमाती दे.”

योसेफाने उत्तर दिले, “बाबा! तुम्ही मला जे करावयास सांगितले ते मी नक्की करीन असे वचन देतो.”

31 मग याकोब म्हणाला, “तू माझ्याशी तशी शपथ वाहा;” तेव्हा तसे करण्याबद्दल योसेफाने शपथ वाहिली; मग इस्राएलाने (याकोबाने) आपले डोके मागे पलंगाच्या उशाकडे नम्रतेने लववून नमन केले.

लूक 1:1-38

लूक येशूच्या जीवनाविषयी लिहितो

पुष्कळ लोकांनी आमच्यामध्ये घडलेल्या ऐतिहासिक घटनांची नोंद करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्याच गोष्टी लिहिल्या ज्या आम्हांला काही इतर लोकांकडून समजल्या होत्या-या लोकांनी त्या गोष्टी सुरुवातीपासून पाहिल्या होत्या आणि देवाचा संदेश लोकांना सांगून त्याची सेवा केली होती. थियफिला महाराज, सुरुवातीपासून या सगळ्या गोष्टींचा काळजीपूर्वक अभ्यास मी केला आहे, म्हणून मला असे वाटले की, या सर्व घटनांविषयी आपणांला व्यवस्थित माहिती लिहावी. हे मी यासाठी लिहित आहे की, जे काही तुम्हांला शिकविण्यात आले ते खरे आहे, हे तुम्हांला समजावे.

जखऱ्या आणि अलीशिबा

यहूदीयाचा राजा हेरोद याच्या दिवसांत, जखऱ्या नावाचा एक याजक होता. तो अबीयाच्या याजककुळातील होता. त्याला एक पत्नी होती, ती अहरोनाच्या वंशातील कन्यांपैकी होती. तिचे नाव अलीशिबा होते. दोघेही देवाच्या दृष्टीने धार्मिक होते आणि प्रभूच्या आज्ञा व विधी पाळण्यात काटेकोर होते. परंतु त्यांना मूल नव्हते कारण अलीशिबा वांझ होती. आणि शिवाय दोघेही फार म्हातारे झाले होते.

जेव्हा जखऱ्याच्या गटाची मंदिरात सेवा करण्याची वेळ आली आणि त्यावेळी तो तेथे देवाचा याजक म्हणून सेवा करीत होता, याजकांच्या प्रथेप्रमाणे मंदिरात देवापुढे धूप जाळण्यासाठी चिठ्ठ्या टाकून त्याची निवड करण्यात आली. 10 जेव्हा धूप जाळण्याच्या वेळी सर्वजण बाहेर जमून प्रार्थना करीत होते,

11 तेव्हा देवाच्या दूताने त्याला दर्शन दिले. देवदूत धूप जाळण्याच्या वेदीच्या उजव्या बाजूला उभा होता. 12 जेव्हा जखऱ्याने त्याला पाहिले तेव्हा तो अस्वस्थ झाला, आणि त्याला भीति वाटली. 13 देवदूत त्याला म्हणाला, “जखऱ्या, भिऊ नको, कारण तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे, आणि तुझी पत्नी अलीशिबा इजपासून तुला मुलगा होईल. तू त्याचे नाव योहान ठेव. 14 तो तुला आनंद आणि सुख देईल. त्याचा जन्म होईल तेव्हा पुष्कळ लोक आनंदित होतील. 15 देवाच्या दृष्टीने तो महान होईल. त्याने कोणतेही कडक पेय किंवा मद्य पिऊ नये. आणि तो आईच्या गर्भात असल्यापासूनच पवित्र आत्म्याने भरलेला असेल.

16 “आणि तो पुष्कळ इस्राएल लोकांना प्रभु त्यांचा देव याच्याकडे वळविण्यास कारणीभूत ठरेल. 17 योहान स्वतः देवापुढे चालेल, तो एलीयाप्रमाणे समर्थ होईल. एलीयाला जो आत्मा होता, तोच त्याला असेल. तो वडिलांची अंतःकरणे त्याच्या मुलांकडे वळवील. आज्ञा न मानणाऱ्यांना तो धार्मिकतेकडे नेईल. प्रभुसाठी लोकांना तयार करण्यासाठी तो या गोष्टी करील.”

18 मग जखऱ्या देवदूताला म्हणाला, “हे खरे आहे हे मला कसे समजेल? कारण मी वृद्ध मनुष्य आहे, आणि माझी पत्नीसुद्धा वृद्ध झाली आहे.”

19 आणि देवदूताने उत्तर दिले. तो म्हणाला, “मी गब्रीएल आहे. मी देवाच्या समक्षतेमध्ये उभा राहतो. आणि मला तुझ्याशी बोलायला व तुला ही सुवार्ता सांगायला पाठविण्यात आले आहे. 20 पण हे लक्षात ठेव, तू मुका राहशील. हे घडेपर्यंत तुला बोलता येणार नाही. कारण माझे शब्द जे योग्य वेळी खरे ठरणार आहेत त्या माझ्या शब्दांवर तू विश्वास ठेवला नाहीस.”

21 लोक जखऱ्याची वाट पाहत होते, आणि तो मंदिरात इतका वेळ का राहिला याचे त्यांना नवल वाटत होते. 22 जेव्हा तो बाहेर आला तेव्हा त्याला त्यांच्याशी बोलता येईना. मग त्यांना जाणीव झाली की, मंदिरात त्याने दृष्टान्त पाहिला आहे. तो त्यांना खुणा करीत होता परंतु बोलू शकत नव्हता. 23 मग असे झाले की, त्याच्या सेवेचा कालावधि संपल्यानंतर तो घरी गेला.

24 काही काळानंतर त्याची पत्नी अलीशिबा गरोदर राहिली. आणि पाच महिने तिने स्वतः एकांतवास पत्करला. ती म्हणाली, 25 “शेवटी आता प्रभुने मला या मार्गाने मदत केली आहे. लोकांमध्ये माझी लाज राखण्यासाठी त्याने माझी पुष्कळ काळजी घेतली.”

कुमारी मरीया

26-27 अलीशिबाच्या सहाव्या महिन्यात, देवाने गब्रीएल दूताला गालीलातील नासरेथ गावी पाठविले.योसेफ नावाच्या मनुष्याशी ज्या कुमारीची मागणी झाली होती, तिच्याकडे गब्रीएलाला पाठविण्यात आले. योसेफ हा दाविदाच्या [a] घराण्यातील होता. तिचे नाव मरीया होते. 28 गब्रीएल तिच्याकडे आला आणि म्हणाला, “अभिवादन! तुझ्यावर कृपा झालेली आहे. प्रभु तुझ्याबरोबर आहे.”

29 परंतु या शब्दांनी ती अस्वस्थ झाली, आणि या अभिवादनाचा अर्थ काय असावा याचे ती नवल करु लागली.

30 देवदूत तिला म्हणाला, “मरीये, भिऊ नकोस, देवाने तुझ्यावर कृपा केली आहे. 31 ऐक! तू गरोदर राहशील, आणि तुला मुलगा होईल, त्याचे नाव तू येशू ठेव. 32 तो महान होईल व त्याला सर्वोच्य देवाचा पुत्र म्हणतील. आणि प्रभु देव त्याला त्याचा पिता दावीद याचे सिंहासन देईल. 33 याकोबाच्या घराण्यावर सर्वकाळासाठी तो सत्ता चालवील त्याच्या राज्याचा कधीही अंत होणार नाही.”

34 तेव्हा मरीया दूताला म्हणाली, “मी कुमारी असल्याने हे असे कसे घडेल?”

35 देवदूत तिला म्हणाला, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, आणि सर्वोच्च देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करील. आणि म्हणून जे पवित्र बाळ जन्मास येईल, त्याला देवाचा पुत्र म्हणतील. 36 आणि याकडे लक्ष दे: तुझी नातेवाईक अलीशिबा जरी वांझ असली तरी तीसुद्धा गरोदर आहे व तिच्या पोटी पुत्र आहे. आणि ज्या स्त्रीला ते म्हणाले की तुला मूल होणार नाही तिला आता सहावा महिना आहे! 37 कारण देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही.”

38 मरीया म्हणाली, “मी प्रभूची दासी आहे, आपण म्हणालात तसे माझ्याबाबतीत घडो.” मग देवदूत तिला सोडून गेला.

ईयोब 13

13 ईयोब म्हणाला: “हे सर्व मी पूर्वी पाहिले आहे,
    तू जे म्हणालास ते सर्व मी आधीच ऐकले आहे.
    त्या सर्व गोष्टी मला समजतात.
तुला जेवढे माहीत आहे तेवढेच मलाही माहीत आहे.
    मी तुझ्या इतकाच हुशार आहे.
परंतु मला तुझ्याशी वाद घालायचा नाही.
    मला सर्वशक्तीमान देवाशी बोलायचे आहे.
    मला देवाबरोबर माझ्या संकटांविषयी बोलायचे आहे.
तुम्ही तिघेजण खोटे बोलून तुमचे अज्ञान लपवीत आहात.
    ज्या वैद्याला कुणालाही बरे करता येत नाही अशा निरुपयोगी वैद्यासारखे तुम्ही आहात.
तुम्ही गप्प बसावे अशी माझी इच्छा आहे.
    ती तुम्हाला करता येण्याजोगी सर्वात शहाणपणाची गोष्ट असेल.

“आता माझ्या युक्तिवादाकडे लक्ष द्या
    मी काय म्हणतो ते ऐका.
तुम्ही देवासाठी खोटे बोलाल का?
    तुमचे खोटे बोलणे देवाच्या इच्छेनुसार आहे असे तुम्हाला वाटते का?
तुम्ही माझ्याविरुध्द देवाचा बचाव करीत आहात का?
    तुम्ही मुळीच न्यायाने वागत नाहीत तो देव आहे
    म्हणून तुम्ही त्याची बाजू घेत आहात.
जर देवाने अगदी जवळून तुमची तपासणी केली तर,
    त्याला काही तरी चांगले आढळेल का?
तुम्ही लोकांना जसे मूर्ख बनवू शकता तसेच
    देवालाही बनवू शकाल असे तुम्हाला वाटते का?
10 तुम्ही जर एखादा माणूस महत्वाचा आहे म्हणून न्यायालयात त्याची बाजू घेतलीत
    तर देव तुमच्यावर टीका करेल हे तुम्हाला माहीत आहे.
11 देवाचे मोठेपण तुम्हाला घाबरवते.
    तुम्ही त्याला भीता.
12 तुमचे युक्तिवाद कुचकामाचे आहेत.
    तुमची उत्तरे कवडीमोलाची आहेत.

13 “आता जरा गप्प बसा आणि मला बोलू द्या!
    माझे जे काही होईल ते मला मान्य आहे.
14 मी मलाच संकटात लोटीन
    आणि माझ्याच हातात माझेच जीवन धरीन? [a]
15 देवाने मला मारुन टाकले तरी मी देवावरच विश्वास ठेवीन.
    पण मी त्याच्या समोर माझा बचाव करीन.
16 आणि देवाने जर मला जिवंत राहू दिले तर ते मी बोलण्याइतका धीट होतो म्हणूनच असेल.
    पापी माणूस देवाच्या डोळ्याला डोळा भिडवू शकणार नाही.
17 मी काय म्हणतो ते लक्षपूर्वक ऐका.
    मला नीट सांगू द्या.
18 मी आता माझ्या बचावाला सिध्द् झालो आहे.
    मी माझे मुद्दे काळजीपूर्वक मांडीन.
    मला माहीत आहे की मी बरोबर आहे हे मी दाखवून देईन.
19 माझे चुकले आहे असे जर कुणी दाखवून दिले
    तर मी गप्प बसेन.

20 “देवा, तू मला फक्त दोन गोष्टी दे,
    मग मी तुझ्यापासून लपणार नाही.
21 मला शिक्षा देणे बंद कर
    आणि तुझ्या भयानक गोष्टींनी मला भयभीत करण्याचे थांबव.
22 नंतर मला हाक मार.
    मी तुला ओ देईन किंवा मला बोलू दे आणि तू मला उत्तर दे.
23 मी किती पापे केली आहेत?
    मी काय चुका केल्या आहेत?
    तू मला माझी पापे आणि माझ्या चुका दाखव.
24 देवा, तू मला का चुकवीत आहेस?
    आणि मला शत्रूसारखे का वागवीत आहेस?
25 तू मला घाबरवतो आहेस का?
    मी वाऱ्यावर उडणारे एक पान मात्र आहे.
    तू गवताच्या एका काडीवर आक्रमण करीत आहेस.
26 देवा, तू माझ्याबद्दल फार कटू बोलतोस.
    मी तरुणपणात जी पापे केली त्याबद्दल तू मला कष्ट भोगायला लावतो आहेस का?
27 तू माझ्या पायात बेड्या घातल्या आहेस.
    माझ्या प्रत्येक पावलावर तू पाळत ठेवतोस,
    माझी प्रत्येक हालचाल तू टिपतोस.
28 म्हणून मी कुजलेल्या लाकडासारखा,
    कसरीने खाल्लेल्या कापडासारखा क्षीण होत चाललो आहे”

1 करिंथकरांस 1

देवाच्या इच्छेप्रमाणे ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरिता निवडलेला, मी पौल आणि बंधु सोस्थनेस यांजकडून देवाच्या सेवेला समर्पित केलल्या करिंथ येथील मंडळीस तसेच देवाने पवित्र होण्यास बोलाविलेल्या (पाचारलेल्या) व येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवणऱ्या सर्व बंधूजनांस:

देव पिता आणि त्यांचा व आपला प्रभु (येशू ख्रिस्त) यांजपासून कृपा व शांति असो.

पौल दवाचे उपकार मानतो

मी नेहमीच माझ्या देवाचे तुमच्यासाठी उपकार मानतो. कारण ख्रिस्त येशूमध्ये देवाची कृपा तुम्हांला मिळाली आहे, 5-6 त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक बाबतीत संपन्र झाला आहात: सर्व प्रकारच्या बोलण्यात व सर्व प्रकारच्या ज्ञानात, जशी आम्ही ख्रिस्ताविषयी साक्ष दिली, तुमच्यात ती पक्की झाली, याचा परिणाम असा झाला की, तुम्ही कोणत्याही दानात कमी पडत नाही, कारण तुम्ही ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहता. तो सुद्धा आपल्या प्रभु येशूच्या दिवशी शेवटपर्यंत तुम्हांस निर्दोष असे प्रस्थापित करील. ज्याने आपला पुत्र येशू ख्रिस्त, आपला प्रभु याच्या सहभागीपणात तुम्हांला बोलावले होते तो देव विश्वासनीय आहे.

करिंथ येथील मंडळीतील समस्या

10 परंतु बंधूनो, प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावांमध्ये मी तुम्हांस विनंति करतो की, तुम्ही सर्वांनी सारखेच बोलावे आणि तुमच्यात मतभेद असू नयेत, तर तुम्ही एकाच विचाराने व एकाच हेतूने परिपूणे व्हावे.

11 कारण क्लोअच्या घरातील माणसांकडून मला असे कळविण्यात आले की, तुमच्यात भांडणे आहेत, 12 माझे म्हणणे असे आहे की तुमच्यातील प्रत्येक जण म्हणतो, “मी पौलाचा आहे.” “मी अपुल्लोचा आहे,” “मी पेत्राचा आहे,” “मी ख्रिस्ताचा आहे.” 13 ख्रिस्त विभागला गेला आहे का? पौल वधस्तंभावर तुमच्यासाठी खिळला गेला होता का? पौलाच्या नावाने तुमचा बाप्तिस्मा, झालाय का? 14 मी देवाचे आभार मानतो की, क्रिस्प व गायस यांच्याशिवाय मी कोणाचाही बाप्तिस्मा केला नाही. 15 यासाठी की कोणीही म्हणू नये की, माझ्या नावात तुमचा बाप्तिस्मा करण्यात आला. 16 स्तेफनाच्या घरच्यांचासुद्धा मी बाप्तिस्मा केला, पण उरलेल्यांविषयी म्हणाल, तर इतर कोणाचाही बाप्तिस्मा केल्याचे मला आठवत नाही. 17 कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करण्यासाठी नाही तर सुवार्ता सांगण्यासाठी पाठविले, ती भाषणाच्या ज्ञानाने नव्हे, तर अशासाठी की, ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे सामर्थ्य निरर्थक होऊ नये.

ख्रिस्तामध्ये देवाचे सामर्थ्य आणि ज्ञान

18 कारण ज्यांचा नाश होत आहे अशांसाठी वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, परंतु ज्यांचे तारण होत आहे, अशांसाठी तो देवाचे सामर्थ्य आहे. 19 कारण पवित्र शास्त्रांत असे लिहिले आहे,

“शहाण्यांचे शहाणपण मी नष्ट करीन,
    आणि बुद्धिवंतांची बुध्दि मी बाजूला करीन.” (A)

20 ज्ञानी मनुष्य कोठे आहे? विद्वान कोठे आहे? या जगातील वाद घालणारा कोठे आहे? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरविले नाही का? 21 म्हणून, देवाच्या ज्ञानात असतानाही, जगाला स्वतःच्या ज्ञानाने देवाला ओळखता आले नाही, आम्ही जो “मूर्खपणाचा” संदेश गाजवितो त्यामुळे जे विश्वासणारे आहेत त्यांचे तारण करण्याचे देवाने निवडले.

22 कारण अनेक यहूदी लोक चमत्काराची चिन्हे विचारतात आणि ग्रीक लोक ज्ञानाचा शोध घेतात, 23 परंतु आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो. हा संदेश यहूदी लोकांसाठी अडखळण, आणि यहूदीतरांसाठी मूर्खपणा असा आहे. 24 परंतु ज्यांना बोलावलेले आहे, अशा यहूदी व ग्रीक दोघांसही ख्रिस्त हा संदेश आहे तो देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान असाही आहे. 25 तथापि ज्यांस तुम्ही देवाचा “मूर्खपणा” म्हणता ते मानवप्राण्याच्या शहाणपणापेक्षा अधिक शहाणपणाचे आहे. आणि ज्यांस तुम्ही देवाचा “दुर्बळपणा” समजता ते मानवप्राण्याच्या सशक्तपणाहून अधिक शक्तिशाली आहे.

26 तर आता बंधुभागिनींनो, देवाने तुम्हांला केलेल्या पाचारणाबद्दल विचार करा. मानवी दृष्टिकोनातून तुमच्यातील पुष्कळसे शहाणे नव्हते. तुमच्यापैकी पुष्कळसे सामर्थ्यशाली नव्हते. तुमच्यापैकी पुष्कळसे उच्च कुळातले नव्हते, 27 त्याऐवजी जगातले जे मूर्ख पण त्यांना त्याने निवडले, यासाठी की, शहाण्या माणसास फजित करावे. 28 आणि देवाने दीन, तुच्छ मानलेले, जे “नगण्य” त्यांना निवडले. यासाठी की जे “काहीतरी” आहेत त्यांना नगण्य करावे. 29 यासाठी की कोणीही देवासमोर बढाई मारु नये. 30 कारण तो ख्रिस्त येशूमध्ये तुमच्या जीवनाचा उगम आहे. व तो देवाची देणगी म्हणून आपले. ज्ञान, आपले नीतिमत्व, आपले पवित्रीकरण आणि आपली खंडणी असा झाला. 31 यासाठी की शास्त्रात असे लिहिले आहे, “जो बढाई मारतो त्याने देवाविषयी बढाई मारावी.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center