M’Cheyne Bible Reading Plan
देव इस्राएलास अभयवचन देतो
46 अशा रीतीने इस्राएलाने मिसरच्या प्रवासास सुरवात केली. प्रथम तो बैरशेबास गेला. तेथे त्याने आपला बाप इसहाक याच्या देवाची उपासना केली व देवाला अर्पणे वाहिली. 2 रात्री देव स्वप्नात दर्शन देऊन इस्राएलाशी बोलला. तो म्हणाला, “याकोबा, याकोबा!”
आणि इस्राएलाने उत्तर दिले, “हा मी आहे, काय आज्ञा?”
3 देव म्हणाला “मी देव आहे, तुझ्या बापाचा देव आहे; पाहा, मिसर देशास जाण्यास तू भिऊ नको 4 जाताना मी तुझ्याबरोबर येईन, आणि तुझ्या संततीस मी मिसरमधून पुन्हा बाहेर आणीन; तू मिसरमध्ये मरण पावशील परंतु मरण्याच्या वेळी योसेफ तुझ्याजवळ असेल; तू मरण पावशील तेव्हा तो आपल्या हातांनी तुझे डोळे झाकील.”
इस्राएल मिसर ला जातो
5 मग इस्राएल (याकोब) बैरशेबा सोडून मिसरच्या प्रवासास निघाला. त्याच्या मुलांनी आपला बाप, आपल्या बायका व मुले या सर्वांना फारोने पाठवलेल्या गाडयातून मिसरला आणले. 6-7 त्याच प्रमाणे त्यांनी आपली शेरडेमेंढरे गुरेढोरे आणि कनान देशात त्यांनी मिळवलेले सर्वकाही मिसरला नेले. अशा रीतीने इस्राएल आपल्या कुटुंबातील सर्वांना म्हणजे आपले मुलगे व नातू, आपल्या मुली व नाती या सर्वांना घेऊन मिसरला गेला.
याकोबाची संतती
8 इस्राएलाचे जे मुलगे आणि नातवंडे त्याच्याबरोबर मिसरला गेले त्याची नावे अशी-
याकोबाचा पहिला मुलगा रऊबेन होता. 9 रऊबेनाचे मुलगे; हलोक, पल्लू, हेस्रोन, व कार्मी
10 शिमोनाचे मुलगे; यमुवेल, यामीन, ओहाद, याकोन, सोहार आणि कनानी स्त्रीपासून झालेला मुलगा शौल.
11 लेवीचे मुलगे: गेर्षेन, कहाथ व मरारी.
12 यहूदाचे मुलगे; एर, ओनान, शेला, पेरेस व जेरह; यापैकी एर व ओनान हे कनान देशात मरण पावले; पेरेसाचे मुलगे हेस्रोन व हामूल.
13 इस्साखाराचे मुलगे; तोला, पुवा, योब व शिम्रोन.
14 जबुलूनाचे मुलगे; सेरेद, एलोन व याहलेल.
15 हे सहा मुलगे व मुलगी दीना ही लेकरे याकोबापासून लेआला पदन-अरामात झाली; त्या कुटुंबात तेहतीस जण होते.
16 गाद याचे मुलगे: सिफयोन, हगी, शूनी, एसबोन, एरी, अरोदी व अरेली.
17 आशेराचे मुलगे: इम्ना, इश्बा, इश्वी व बरीया; आणि त्याची बहीण सेराह; बरीयाचे मुलगे हेबेर व मालकीएल.
18 जिल्पा ह्या बायकोपासून झालेले हे सगळे याकोबाचे मुलगे होते. (लाबानने आपली मुलगी लीआ हिला जिल्पा दिली होती.) एकंदर त्या कुटुंबात सोळा माणसे होती.
19 योसेफ व बन्यामीन हे याकोबाची बायको राहेल हिचे मुलगे होते.
20 योसेफास मिसर देशातील ओन नगराचा याजक पोटीफरा याची मुलगी आसनथ हिच्या पोटी मनश्शे व एफ्राईम हे मुलगे झाले.
21 बन्यामीनाचे मुलगे; बेला, बेकेर, आशबेल, गेरा, नामान, एही, रोष, मुप्पीम, हुप्पीम आणि आर्द.
22 योसेफ व बन्यामीन, याकोबापासून राहेलीस झाले व त्यांना झालेली संतती मिळून ते सर्व चौदा जण ह्या कुटुंबात होते.
23 दान याचा मुलगा हुशीम होता
24 नफतालीचे मुलगे; यासहेल, गुनी, येसेर आणि शिल्लेम हे होते.
25 लाबानाने आपली मुलगी राहेल हिला दिलेल्या बिल्हेचे याकोबापासून झालेले मुलगे दान व नफताली आणि त्यांना झालेली संतती असे हे सात जण त्या कुटुम्बात होते.
26 याकोबाच्या वंशातील जी माणसे मिसरमध्ये गेली ती याकोबाच्या मुलांच्या बायका सोडून सहासष्ट जण होती. 27 योसेफास मिसर देशात झालेले दोन मुलगे मिळून एकंदर याकोबाच्या घराण्यातले सत्तर जण मिसर देशात होते.
इस्राएल मिसरमध्ये पोहोंचतो
28 याकोबाने प्रथम यहूदाला योसेफाकडे पाठवले; यहूदा गोशेन प्रांतात योसेफाकडे गेला त्यानंतर याकोब व त्याच्या परिवारातील सर्व मंडळी यहूदाच्या मागे गोशेन प्रांतात गेली. 29 आपला बाप जवळ येत आहे असे योसेफास समजले; तेव्हा तो आपला रथ तयार करुन आपला बाप इस्राएल याच्या भेटीस गोशेन प्रांतात त्याला सामोरा गेला. योसेफाने आपल्या बापास पाहिले तेव्हा त्याने त्याच्या गळ्यास मिठी मारली व त्याच्या गळ्यातगळा घालून तो बराच वेळ रडला.
30 मग इस्राएल योसेफाला म्हणाला, “आता मात्र मी शांतीने मरण पावेन; मी प्रत्यक्ष तुझे तोंड पाहिले आहे आणि तू जिवंत आहेस हे मला समजले आहे.”
31 मग योसेफ आपल्या भावांना व आपल्या बापाच्या घरच्या सर्वांस म्हणाला, “मी जाऊन फारोला सांगतो की ‘माझे भाऊ व माझ्या बापाच्या घरातील सर्व मंडळी हे कनान देश सोडून येथे माझ्याकडे आले आहेत; 32 माझ्या बापाच्या घरचे सर्वजण मेंढपाळ आहेत. ते सतत शेरडेमेंढरे व गुरुढोरे पाळीत आले आहेत. ते त्यांची शेरडेमेंढरे व गुरुढोरे पाळीत आले आहेत. ते त्यांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे व त्यांचे तेथे जे काही होते ते सर्व घेऊन आले आहेत.’ 33 जेव्हा फारो तुम्हाला बोलावून विचारील, ‘तुम्ही काय काम धंदा करता?’ 34 तेव्हा तुम्ही असे सांगा, ‘आम्ही सर्व मेंढपाळ आहोत. दुभती जनावरे पाळून आम्ही उपजिविका करतो. हा आमचा पिढीजात धंदा आहे. आमच्या आधी आमचे वाडवडील हाच धंदा करीत होते.’ मग फारो तुम्हाला गोशेन प्रातांत राहू देईल. मिसरच्या लोकांना मेंढपाळ आवडत नाहीत; म्हणून गोशेन प्रांतात राहणे तुमच्या फायद्याचे आहे.”
येशू मरणातून उठला हे अनुयायांना कळते(A)
16 शब्बाथाचा दिवस संपला तेव्हा मरीया मग्दालिया, याकोबाची आई मरीया आणि सलोमी यांनी त्याला लावण्याकरिता सुगंधी तेल विकत आणले. 2 आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी, अगदी पहाटे सूर्योदयाच्या वेळी त्या कबरेकडे गेल्या. 3 त्या एकमेकीस म्हणत होत्या की, “कबरेच्या तोंडावरुन आणांसाठी धोंड कोण बाजूला लोटील?”
4 नंतर त्यांनी वर पाहिले आणि त्यांना धोंड दूर लोटलेली आढळली. ती फारच मोठी होती. 5 त्या कबरेत आत गेल्या तेव्हा त्या भयचकित झाल्या. त्यांना एक तरुण पुरुष उजव्या बाजूस बसलेला आढळला. त्याने पांढरा शुभ्र झगा घातला होता.
6 तो त्यांना म्हणाला, “भयभीत होऊ नका, तुम्ही नसरेथकर येशू जो वधस्तंभावर खिळला होता त्याचा शोध करीत आहात. पण तो उठला आहे. येथे नाही. त्यांनी त्याला ठेवले होते ती जागा पाहा. 7 जा आणि त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की, ‘तो तुमच्या अगोदर गालीलात जात आहे, त्यांने तुम्हांस सांगितल्याप्रमाणे तेथे तो तुम्हांस दृष्टीस पडेल.’”
8 मग त्या बाहेर गेल्या आणि भीतीमुळे कबरेपासून पळाल्या. त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी कोणाला काहीही सांगितले नाही. कारण त्या भयभीत झाल्या होत्या.
काही शिष्य येशूला पाहतात(B)
9 आठवड्याच्या पहिल्या दिवशी येशू उठल्यावर त्याने प्रथम मरीया मग्दालियाला, जिच्यातून त्याने सात भुते काढली होती, तिला दर्शन दिले. 10 ती गेली आणि रडून शोक करणाऱ्या त्याच्या अनुयायांना तिने हे वृत्त सांगितले. 11 त्यांनी ऐकले की तो जिंवत आहे. व तिने त्याला पाहिले आहे. तेव्हा त्यांनी तिच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला नाही.
12 यानंतर त्यांच्यापैकी दोघे उघड्या माळरानावर चालले होते. गावाकडे जात असता येशू त्यांना दुसऱ्या रुपाने प्रगट झाला. 13 ते परत आले व इतरांना त्याविषयी सांगितले परंतु त्यांनी त्यांवरही विश्वास ठेवला नाही.
येशू शिष्यांबरोबर बोलतो(C)
14 नंतर अकरा जण जेवत बसले असता येशू त्यांना प्रगट झाला. त्याने शिष्यांच्या अविश्वासाबद्दल आणि त्यांच्या अंतःकरणाच्या कठोरतेबद्दल त्यांना समज दिली. कारण ज्यांनी त्याला उठल्यावर पाहिले होते त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही.
15 तो त्यांना म्हणाला, “संपूर्ण जगात जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. 16 जो कोणी विश्वास धरतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, परंतु जो विश्वास ठेवीत नाही त्याचा धिक्कार होईल. 17 परंतु जे विश्वास धरतील त्यांच्याबरोबर ही चिन्हे असतील, ते माझ्या नावाने भुते काढतील, ते नव्या नव्या भाषा बोलतील. 18 ते आपल्या हातांनी साप उचलतील आणि ते कोणतेही विष पितील तेव्हा ते त्यांना बाधणार नाही. ते आजाऱ्यांवर हात ठेवतील आणि ते बरे होतील.”
येशू परत स्वर्गात जातो(D)
19 मग प्रभु येशू त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर तो स्वर्गात घेतला गेला आणि देवाच्या उजव्या बाजूस जाऊन बसला. 20 शिष्य बाहेर गेले आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी सुर्वार्तेची घोषणा केली. प्रभुने त्यांच्याबरोबर कार्य केले, व त्याने वचनाबरोबर असणाऱ्या चिन्हांनी त्याची खात्री केली.
ईयोब उत्तर देतो
12 नंतर ईयोबाने उत्तर दिले:
2 “तुम्हीच फक्त शहाणे आहात
असे तुम्हाला वाटते याबद्दल माझी खात्री आहे.
तुम्ही मेल्यानंतर तुमच्याबरोबरच शहाणपणाही जाईल
असे तुम्हाला वाटते.
3 माझेही मन तुमच्या मनाइतकेच चांगले आहे,
मीही तुमच्या इतकाच हुशार आहे.
कोणालाही दिसेल की सत्य आहे.
4 “माझे मित्र मला आता हसत आहेत.
ते म्हणतात, ‘त्याने देवाची प्रार्थना केली आणि त्याला उत्तर मिळाले.
केवळ त्यामुळेच एवढ्या सगळ्या वाईट गोष्टी त्याच्या बाबतीत घडल्या.’
मी चांगला आहे मी निष्पाप आहे,
पण तरीही ते मला हसतात.
5 ज्यांच्यावर संकटे येत नाहीत तेच लोक संकटे कोसळलेल्या लोकांना हसतात.
तेच लोक खाली पडलेल्याला मारतात.
6 परंतु चोरांचे तंबू समृध्द होतात.
जे लोक देवाला क्रोध आणतात ते शांततेने राहातात.
केवळ त्यांची स्वतःची शक्तीच त्यांचा देव असतो.
7 “तुम्ही प्राण्यांना विचारा,
ते तुम्हाला शिकवतील किंवा
हवेत उडणाऱ्या पक्ष्यांना विचारा
ते तुम्हाला सांगतील.
8 किंवा पृथ्वीला विचारा,
ती तुम्हाला शिकवेल.
समुद्रातल्या माशांना त्यांचे
शहाणपण सांगू द्या.
9 या सर्व गोष्टी देवाने निर्माण केल्या आहेत
हे सर्वांना ठाऊक आहे.
10 जगणारा प्रत्येक प्राणी आणि श्वास घेणारा
प्रत्येक माणूस देवाच्या अधिपत्याखाली असतो.
11 ज्याप्रमाणे तोंडाला आवडत्या आणि नावडत्या अन्नातील फरक कळतो
त्याप्रमाणे कानालाही शहाणपणाच्या आणि मूर्खपणाच्या शब्दातील फरक कळतो.
12 ‘वृध्द् माणसे शहाणी असतात.
दीर्घायुष्याने समजुतदारपणा येतो.’
13 ईयोब आणखी म्हणाला, देवाच्या ठायी विद्वत्ता आणि सामर्थ्य आहेत.
त्याच्याजवळ चांगला उपदेश आणि समजूतदारपणाही आहे.
14 देव जेव्हा एखादी गोष्ट उध्वस्त करतो तेव्हा लोकांना ती परत उभारता येत नाही.
देवाने जर एखाद्याला तुरुंगात टाकले तर लोक त्याची सुटका करु शकत नाहीत.
15 देवाने जर पाऊस पडू दिला नाही तर पृथ्वी सुकून जाईल
आणि जर त्याने पावसाला मोकळे सोडले तर सारी पृथ्वी जलमय होऊन जाईल.
16 देव सर्वशक्तीमान आहे आणि तो नेहमीच जिंकतो.
जिंकणारे आणि हरणारे सर्वच देवाचे आहेत.
17 देव उपदेशकांना त्यांच्या विद्वत्तेपासून वंचित करतो
आणि पुढाऱ्यांना मूर्खासारखे वागायला लावतो.
18 राजांनी जरी लोकांना तुरुंगात डांबले तरी देव त्यांची सुटका करतो.
आणि त्यांना सामर्थ्यवान बनवतो.
19 तो याजकांचे सामर्थ्य काढून घेतो
आणि मंदिरातील सेवकांना फारसे महत्व देत नाही.
20 देव विश्र्वासू उपदेशकांना गप्प बसवतो
आणि वृध्दांची विद्वत्ता काढून घेतो.
21 तो पुढाऱ्यांचे महत्व कमी करतो
आणि शासकांची सत्ता काढून घेतो.
22 देवाला काळीकुटृ रहस्ये माहित असतात.
मृत्युलोकातल्या काळोखापेक्षा अधिक काळोख असलेल्या ठिकाणी तो प्रकाश पाठवतो.
23 तो राष्ट्रांना महान आणि सामर्थ्यवान बनवतो
आणि नंतर तो ते नष्ट करतो.
तो देशांना मोठे होऊ देतो
आणि नंतर त्यांतील लोकांना विखरवून टाकतो.
24 देव नेत्यांना मूर्ख बनवतो.
तो त्यांना वाळवंटात इकडे तिकडे मार्गहीन भटकायला लावतो.
25 हे नेते अंधारात वाट शोधणाऱ्या माणसाप्रमाणे असतात.
दारु प्यायलेल्या माणसाला जसे आपण कुठे जात आहोत ते कळत नाही, तसे ते असतात.”
पौलाला काही गोष्टी शेवटी सांगायच्या आहेत
16 किंख्रिया येथील मंडळीची सेविका, आमची बहीण फिबी हिची मी तुम्हांला शिफारस करतो 2 की, संतांना योग्या अशा प्रकारे तुम्ही तिचा स्वीकार करावा. आणि तिला तुमच्याकडून जी मदत लागेल ती करावी कारण माझ्यासह ती पुष्कळांना मदत करणारी होती.
3 ख्रिस्तामध्ये माझे सहकारी प्रिस्किल्ला आणि अक्विला यांना सलाम सांगा. 4 ज्यांनी माझ्यासाठी आपले जीव धोक्यात घातले होते. त्यांचे केवळ मीच आभार मानतो असे नाही, तर विदेशात स्थापन झालेल्या मंडळयाही आभार मानतात.
5 त्याशिवाय त्यांच्या घरी जी मंडळी जमते तिलाही सलाम सांगा.
माझा प्रिय मित्र अपैनत जो ख्रिस्तासाठी आशिया खंडातील प्रथम फळ आहे यालाही सलाम सांगा.
6 मरीया जिने तुमच्यासाठी फार काम केले तिला सलाम सांगा.
7 अंद्रोनीक आणि युनिया, माझे नातेवाईक आणि सहबंदिवान जे प्रेषितांमध्ये नामांकित आहेत व ख्रिस्तात माझ्यापूर्वी होते त्यांना सलाम सांगा.
8 प्रभुमध्ये माझा प्रिय आंप्लियात याला सलाम सांगा. 9 ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान
व माझा प्रिय मित्र स्ताखु यांना सलाम सांगा. 10 ख्रिस्तामध्ये पसंतीस उतरलेला अपिल्लेस याला सलाम सांगा.
अरिस्तबूल याच्या घरातील मंडळीस सलाम सांगा. 11 माझा नातेवाईक हेरोदियोन
आणि नार्किसास याच्या घरातली मंडळी जी प्रभूमध्ये आहे त्यांना सलाम सांगा. 12 त्रुफैना आणि त्रफीसा जे प्रभूमध्ये श्रम करणारे आहेत त्यांना सलाम सांगा.
प्रिय पर्सिस जिने प्रभूमध्ये फार श्रम केले आहेत तिला सलाम सांगा.
13 प्रभूमध्ये निवडलेला रुफ आणि त्याची आई जी माझीही आई आहे तिला सलाम सांगा.
14 असुंक्रित, फ्लगोन, हर्मेस, पत्रबास, हर्मास आणि त्यांच्याबरोबर जे बंधु आहेत त्यांना सलाम सांगा.
15 फिललग, युलिया, निरिय, त्याची बहीण ओलुंपा आणि त्याच्याबरोबर असलेले सर्व संतगण यांना सलाम सांगा.
16 पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा.
ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हांला सलाम सांगतात.
17 बंधूजनहो, मी तुम्हांस विंनति करतो की, तुम्हांला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे कलह आणि असंतोष निर्माण करतात त्यांच्यावर लक्ष ठेवा व त्यांच्यापासून दूर राहा. 18 असे लोक आपल्या प्रभूची सेवा करीत नाहीत, परंतु स्वतःच्या पोटाची सेवा करतात. आपल्या मधुर व खुशामत करणाऱ्या भाषणाने भोळ्या लोकांची फसवणूक करता. 19 त्यांच्यापासून दूर राहा कारण सर्व विश्वास णाऱ्यांना तुंम्ही किती आज्ञाधारक आहात हे माहीत आहे, म्हणून तुम्हाविषयी मी फार आनंदात आहे, परंतु मला तुम्ही जे चांगले त्याविषयी शहाणे आणि वाईटाविषयी भोळे असावे असे वाटते.
20 शांतीचा देव लवकरच सैतानाला तुमच्या पायदळी तुडवील आपल्या
प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हांबरोबर असो.
21 माझा सहकारी तिमथ्य त्याचप्रमाणे माझे नातेवाईक लुक्य, यासोन व सोसिपतेर हे तुम्हांला सलाम सांगतात.
22 पौलासाठी हे पत्र लिहून देणारा मी तर्तिय तुम्हांला प्रभुमध्ये सलाम सांगतो.
23 माझे व सर्व मंडळीचे आतिथ्य करणारा गायस तुम्हांला सलाम सांगतो, नगराचा खजिनदार एरास्त आणि आमचा भाऊ क्वर्त तुम्हांला सलाम सांगतात. 24 (आपला प्रभु येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो, आमेन.)
25 आता देव जो तुमच्या विश्वासात, तुम्हांला मी सांगत असलेल्या सुवार्तेप्रमाणे आणि प्रभु येशू ख्रिस्ताविषयी विदित करण्यास व तुमच्या विश्वासात स्थिर करण्यास समर्थ आहे, त्याला व देवाच्या रहस्याच्या प्रकटीकरणाला, धरुन जे पुष्कळ काळपर्यंत गुप्त ठेवले होत ते प्रकट करणाऱ्या देवाला गौरव असो. 26 परंतु आता आपणांला भविष्यवाद्यांच्या लिखाणाद्वारे दाखवून दिले आहे की, हे गुप्त सत्य सनातन देवाच्या आज्ञेप्रमाणे सर्व परराष्ट्रीयांनी विश्वासापासून आज्ञाधारकपणा निर्माण करावा यासाठी माहीत करुन दिले आहे. 27 एकच ज्ञानी देव त्याला येशू ख्रिस्ताद्वारे युगानुयुगे गौरव असो. आमेन.
2006 by World Bible Translation Center