M’Cheyne Bible Reading Plan
योसेफ ओळख देतो
45 आता मात्र अधिक वेळपर्यंत योसेफाला आपले दु:ख रोखून धरता येईना. तेव्हा तेथे हजर असलेल्या सर्व लोकां देखत तो मोठ मोठयाने रडू लागला. तो म्हणाला, “येथील इतर सर्व लोकांना येथून निघून जाण्यास सांगा.” तेव्हा तेथील सर्वजण निघून गेले; केवळ त्याचे भाऊच त्याच्यापाशी राहिले; मग योसेफाने आपली ओळख दिली. 2 तो एकसारखा रडत होता. फारोच्या वाडयातील मिसरच्या लोकांनी व फारोच्या घराण्यातील लोकांनीही त्याचे रडणे ऐकले. 3 मग योसेफ हूंदके देत आपल्या भावांना म्हणाला, “प्रिय भावांनो! तुमचा भाऊ योसेफ-मीच आहे!” मग गहिंवर आवरुन योसेफ पुढे म्हणाला, “माझा बाप खुशाल आहे ना!” परंतु त्याचे भाऊ आश्चर्याने चकित झाले; ते एवढे घाबरले व गोंधळले की त्यांच्या तोंडून शब्द फुटेना!
4 तेव्हा योसेफ आपल्या भावांना पुन्हा म्हणाला, “जरा इकडे माझ्याकडे या; कृपा करुन माझ्याजवळ या अशी मी विनंती करतो.” तेव्हा त्याचे भाऊ त्याच्या जवळ गेले; आणि योसेफ त्यांना म्हणाला, “तुमचा भाऊ योसेफ मीच आहे; होय! ज्या भावाला तुम्ही मिसरच्या लोकांना गुलाम म्हणून विकले तो योसेफ मीच आहे. 5 आता त्याविषयी काही चिंता व काळजी करु नका; किंवा तुम्ही जे केले त्याबद्दल आपल्याला संताप करुन घेऊ नका; मी येथे यावे व त्यामुळे आपणा सर्वांचे प्राण वाचावेत ही देवाचीच योजना होती. 6 हा भयंकर दुष्काळ आता दोन वर्षे पडला आहे आणि आणखी पाच वर्षे पेरणी किंवा कापणी होणार नाही. 7 अशारीतीने या देशात मी अगोदर येऊन तुमच्यासर्वांचे प्राण वाचावेत म्हणून देवाने मला तुमच्या आधी येथे पाठवले आहे. 8 मला येथे पाठवण्यात तुमचा दोष नव्हता तर ही देवाची योजना होती. देवाने मला फारोच्या बापासमान केले आहे; त्यामुळे मी फारोच्या घरदाराचा स्वामी आणि सर्व मिसर देशाचा प्रशासक झालो आहे.”
इस्राएलास मिसरला जाण्याचे निमंत्रण येते
9 योसेफ म्हणाला, “तर आता तोबडतोब माझ्या बापाकडे जाण्यास निघा; माझ्या बापाला सांगा की तुमचा मुलगा योसेफ याने तुम्हाला येणे प्रमाणे संदेश पाठवला आहे.” देवाने मला अवघ्या मिसर देशाचा प्रशासक म्हणजे अधिपति केले आहे. तर आता वेळ न दवडता माझ्याकडे निघून या. 10 तुम्ही माझ्या जवळ गोशेन प्रांतात राहा; तुम्ही, तुमची मुले, नातवंडे तसेच तुमची शेरडेमेंढरे, गुरेढोरे असा तुम्हां सर्वांचे मी स्वगात करतो. 11 येणाऱ्या दुष्काळाच्या पाच वर्षात मी तुमची सर्व प्रकारची काळजी घेईन त्यामुळे तुम्हावर व तुमच्या कुटुंबावर सर्व काही गमावण्याची वेळ येणार नाही.
12 योसेफ आपल्या भावांशी बोलतच राहिला. तो म्हणाला, “मी योसेफच आहे याची आता तुम्हाला खात्री पटली असेल; तुमचा भाऊ बन्यामीन याला खात्री पटली आहे; त्याने मला ओळखले आहे; आणि तुमच्याशी बोलणारा मी खरोखर योसेफच आहे. 13 तेव्हा मिसर देशातील माझी धनदौलत व माझे वैभव आणि तुम्ही येथे जे जे पाहिले आहे त्या संबंधी माझ्या बापाला सांगा; आता लवकर जाऊन माझ्या बापाला माझ्याकडे घेऊन या.” 14 मग योसेफ आपला धाकटा भाऊ बन्यामीन याला मिठी मारुन रडला; आणि बन्यामीनही त्याच्या खांद्यावर डोके ठेऊन रडला. 15 मग योसेफाने आपल्या प्रत्येक भावाला मिठी मारली व त्यांचे मुके घेतले आणि तो रडला; यानंतर त्याचे भाऊ त्याज बरोबर बोलू लागले.
16 योसेफाचे भाऊ त्याजकडे आले आहेत अशी बातमी फारो, त्याच्या घरची मंडळी व त्याचे सेवक यांना समजली त्यामुळे त्या सर्वांना त्याविषयी आनंद झाला. 17 तेव्हा फारो योसेफाला म्हणाला, “तुझ्या भावांना सांग की तुम्हाला गरज असेल तेवढी अन्नसामग्री घेऊन कनान देशास जा; 18 तसेच तुमचा बाप आणि तुमच्या घरची सर्व मंडळी यांना घेऊन माझ्याकडे या; तुम्हाला राहावयास मिसरमधील सर्वात उत्तम प्रदेश मी देईन आणि तुमच्या घरातील मंडळी, यांना आमच्या येथे असलेले उत्तम पदार्थ खावयास मिळतील.” 19 मग फारो म्हणाला, “आपल्या गाड्यांपैकी सर्वात चांगल्या गाड्या तुझ्या भावांना दे व त्यांना सांग की कनान देशास जाऊन तुमचे वडील आणि तुमच्या स्त्रिया व मुले या सर्वांना गाड्यात बसवून मागे घेऊन या; 20 त्यांचे सामान सुमान व जे काही असेल ते सर्व घेऊन येण्यास संकोच धरु नका असे सांग. मिसरमधील उत्तम ते आम्ही त्यांना देऊ शकतो!”
21 तेव्हा इस्राएलाच्या मुलांनी तसे केले; योसेफाने त्यांना फारोने वचन दिल्याप्रमाणे सर्वात चांगल्या गाड्या दिल्या; आणि त्यांच्या प्रवासाकरिता भरपूर अन्नसामग्री दिली; 22 तसेच त्याने प्रत्येक भावाला एक सुंदर पोशाख दिला; व बन्यामीनाला पाच सुंदर पोशाख आणि चांदीची तीनशे नाणी दिली. 23 त्याने आपल्या बापासाठीही देणग्या पाठवल्या. मिसरमधील चांगले पदार्थ गोण्यात लादलेली दहा गाढवी आपल्या बापाकरिता परतीच्या प्रवासासाठी पाठवल्या. 24 मग योसेफाने आपल्या भावांना निरोप दिला; ते निघाले तेव्हा त्याने त्यांना सांगितले, “सरळ घरी जा आणि रस्त्यात एकमेकांशी भांडू नका.”
25 अशा रीतीने त्याचे भाऊ मिसर सोडून कनान देशास आपल्या बापाकडे गेले. 26 त्यांनी आपल्या बापास सांगितले, “बाबा! बाबा! तुमचा मुलगा योसेफ अजून जिवंत आहे आणि तो अवघ्या मिसर देशाचा प्रशासक म्हणजे प्रमुख अधिकारी आहे.” हे ऐकून त्यांच्या बापाला भोवळ आली.
त्यांच्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसेना! 27 परंतु त्यांनी त्याला योसेफाने सांगितलेल्या सर्व गोष्टी कळवल्या; मग योसेफाने त्या सर्वांना मिसरला घेऊन जाण्यासाठी पाठवलेल्या चांगल्या गाड्या पाहिल्या तेव्हा त्याच्या जीवात जीव आला व त्याला फारच फार आनंद झाला; 28 इस्राएल म्हणाला, “आता मात्र तुमच्यावर माझा विश्वास बसला आहे की माझा मुलगा योसेफ अजून जिवंत आहे; आता मी मरण्यापूर्वी त्याला जाऊन भेटेन!”
राज्यपाल पिलात येशूला प्रश्न करतो(A)
15 पहाट होताच मुख्य याजक, वडील, नियमशास्त्राचे शिक्षक व सर्व यहूदी सभा यांनी एक योजना आखली, त्यांनी येशूला बांधले आणि पिलाताच्या ताब्यात दिले.
2 पिलाताने त्याला विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?”
येशूने उत्तर दिले, “तू म्हणतोस तसेच.”
3 मुख्य याजकांनी पुष्कळ बाबतीत येशूवर आरोप ठेवले. 4 मग पिलाताने त्याला पुन्हा प्रश्न विचारला, “तू उत्तर देणार नाहीस काय? पाहा, ते किती तरी गोष्टीविषयी तुझ्यावर आरोप ठेवीत आहेत!”
5 पण तरीही येशूने उत्तर दिले नाही म्हणून पिलाताला आश्चर्य वाटले.
पिलात येशूला मुक्त करण्याचा अय़शस्वी प्रयत्न करतो(B)
6 वल्हांडण सणाच्या वेळी ते कोणत्याही एका कैद्याच्या सुटकेची मागणी करीत असत. त्याला पिलात रिवाजा प्रमाणे लोकांसाठी सोडत असे. 7 बरब्बा नावाचा एक मनुष्य, बंडखोरांबरोबर तुरुंगात होता. या लोकांनी दंगलीमध्ये खून केला होता.
8 लोक आले आणि पिलाताला तो नेहमी त्यांच्यासाठी करीत असे तसे करायला लावले. 9 पिलाताने विचारले, “तुमच्यासाठी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय?” 10 पिलात असे म्हणाला कारण त्याला माहीत होते की, द्वेषामुळे मुख्य याजकांनी येशूला धरुन दिले होते. 11 परंतु पिलाताने त्याच्याऐवजी बरब्बाला सोडावे असे मुख्य याजकांनी लोकांना चिथावले.
12 परंतु पिलात त्यांना पुन्हा म्हणाला, “तर मग तुम्ही ज्याला यहूद्यांचा राजा म्हणता त्याचे मी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?”
13 ते पुन्हा मोठ्याने ओरडले, “त्याला वधस्तंभावर खिळा!”
14 पिलाताने पुन्हा विचारले, “का? त्याने कोणता गुन्हा केला आहे?”
ते सर्व अधिकच मोठ्याने ओरडले, “ला वधस्तंभावर खिळा!”
15 पिलाताला लोकांना खूष करायचे होते म्हणून त्याने त्यांच्यासाठी बरब्बाला सोडले आणि येशूला फटके मारुन वधस्तंभावर खिळण्यासाठी शिपायांच्या स्वाधीन केले.
16 शिपायांनी येशूला राज्यपालाच्या राजवाड्यात, ज्याला प्रयटोरियम म्हणतात तेथे नेले आणि त्यांनी सैनिकांची एक तुकडीच एकत्र बोलाविली. 17 त्यांनी त्याच्या अंगावर जांभळा झागा घातला व काट्यांचा मुगुट करुन त्याला घातला. 18 ते त्याला मुजरा करु लागले आणि म्हणू लागले, “हूद्यांच्या राजाचा जयजयकार असो.” 19 त्यांनी वेताच्या काठीने वारंवार त्याच्या डोक्यावर मारले. त्याच्यावर थुंकले आणि गुडघे टेकून त्याला नमन केले. 20 त्यांनी त्याची थट्टा केल्यावर त्याच्या अंगावरुन जांभळा झगा काढून घेतला व त्याचे स्वतःचे कपडे त्याला घातले. नंतर वधस्तंभावर खिळणे शक्य व्हावे म्हणून ते त्याला बाहेर घेऊन गेले.
येशूला वधस्तंभावर जिवे मारतात(C)
21 वाटेत त्यांना कुरेने येथील शिमोन नावाचा एक मनुष्य दिसला. तो अलेक्सांद्र व रुफ यांचा पिता होता व आपल्या शेतातून घरी परत चालला होता. मग सैनिकांनी त्याला जबरदस्तीने येशूचा वधस्तंभ वहावयास लावले. 22 आणि त्यांनी येशूला गुलगुथा म्हणजे (कवटीची जागा) म्हटलेल्या ठिकाणी आणले. 23 त्यांनी त्याला बोळ मिसळलेला द्राक्षारस दिला परंतु त्याने तो घेतला नाही. 24 त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले, कोणी कोणते कपडे घ्यावे यासाठी त्यांनी चिठठ्या टाकल्या व त्याचे कपडे वाटून घेतले.
25 त्यांनी त्याला वधस्तंभांवर खिळले तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते. 26 आणि त्याच्यावर त्याच्या दोषारोपाचा लेख, “ यहूद्याचा राजा.” असा लिहिला होता. 27 त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारूंना एकाला त्याच्या उजविकडे व दुसऱ्याला त्याच्या डावीकडे वधस्तंभावर खिळले होते. 28 [a]
29 जवळून जाणारे लोक त्याची निंदा करीत होते. ते आपली डोकी हलवून म्हणाले, “अरे! मंदिर पाडून ते तीन दिवासात बांधणारा तो तूच ना! 30 वधस्तंभावरुन खाली ये आणि स्वतःचा बचाव कर.”
31 तसेच मुख्य याजकांनी, नियमशास्त्राच्या शिक्षकांनी येशूची थट्टा केली आणि एकमेकाला म्हणाले, “त्याने दुसऱ्यांचे तारण केले पण त्याला स्वतःचा बचाव करता येत नाही! 32 या मशीहाला, इस्त्राएलाचा राजा रिव्रस्त याला वधस्तंभावरुन खाली येऊ द्या मग आम्ही ते पाहू आणि त्याच्यावर विश्वास ठेवू” आणि जे त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळले होते त्यांनी देखील त्याचा अपमान केला.
येशूचे मरण(D)
33 दुपारची वेळ झाली. सगळ्या भूमीवर अंधार पडला, तो अंधार दुपारी तीन वाजेपर्यंत राहिला. 34 मग तीन वाजता रिव्रस्त मोठ्याने आरोळी मारुन म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबखथनी,” म्हणजे, “माझ्या देवा, माझ्या देवा, माझा त्याग तू का केलास?”
35 जवळ उभे असलेल्या काही जणांनी हे ऐकले तेव्हा ते म्हणाले, “ऐका, तो एलीयाला बोलवीत आहे.”
36 एक जण धावत गेला. त्याने स्पंज आंबेत बुडूवून भरला. काठीवर ठेवला व तो येशूला पिण्यास दिला आणि म्हणाला, “थांबा! एलीया येऊन त्याला खाली उतरवितो की काय हे आपण पाहू.”
37 मग मोठ्याने आरोळी मारुन येशूने प्राण सोडला.
38 तेव्हा मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटला व त्याचे दोन भाग झाले. 39 येशूच्या पुढे उभे अलेल्या सेनाधिकाऱ्याने जेव्हा त्याची आरोळी ऐकली आणि तो कसा मरण पावला हे पाहिले तेव्हा तो म्हणाला, “खरोखर हा मनुष्य देवाचा पुत्र होता.”
40 तेथे असलेल्या काही स्त्रिया दुरुन पाहत होत्या. त्यांच्यामध्ये मरीया मग्दालिया, धाकटा याकोब आणि योसे यांची आई मरीया व सलोमी या होत्या. 41 येशू जेव्हा गालीलात होता तेव्हा या स्त्रिया त्याच्या मागे जात व त्याची सेवा करीत असत. याशिवाय त्याच्याबरोबर यरुशलेमेपर्यंत आलेल्या इतर अनेक स्रियाही होत्या.
येशूला पुरतात(E)
42 त्या सुमारास संध्याकाळ झाली होती आणि तो तयारीचा म्हणजे शब्बाथाच्या आधीचा दिवस होता. 43 योसेफ अरिमथाईकर न्यायसभेचा माननीय सभासद होता व तो सुद्धा देवाचे राज्य येण्याची वाट पाहत होता. तो योसेफ धैर्याने पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले.
44 येशू इतक्या लवकर कसा मरण पावला याचे पिलाताला आश्चर्य वाटले. मग त्याने सेनाधिकारी बोलाविले आणि त्याना विचारले. येशूला मरुन बराच वेळ झाला की काय? 45 सेनाधिकाऱ्याकडून त्याने अहवाल ऐकला, तेव्हा त्याने ते शरीर योसेफाला दिले.
46 मग योसेफाने तागाचे वस्त्र विकत आणले. आणि येशूला वधस्तंभावरुन खाली काढले व त्याला तागाच्या वस्त्रात गुंडाळून ते त्याने खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले. नंतर त्याने कबरेच्या तोंडावर धोंड बसविली. 47 येशूला कोठे ठेवले हे मरीया मग्दालिया आणि योसेची आई मरीया हे सर्व बघत होत्या येशूला कुठे ठेवले, हे त्यांनी पाहिले.
सोफर ईयोबशी बोलतो
11 नंतर नामाथीच्या सोफरने ईयोबला उत्तर दिले:तो म्हणाला,
2 “शब्दांच्या या भाडिमाराला उत्तर द्यायलाच हवे.
ह्या सगळ्या बोलण्याने ईयोब बरोबर ठरतो का? नाही.
3 ईयोब, आमच्याजवळ तुला द्यायला उत्तर नाही
असे तुला वाटते का?
तू देवाला हसशील तेव्हा तुला कुणी ताकीद देणार नाही
असे तुला वाटते का?
4 ईयोब तू देवाला म्हणतोस,
‘मी जे बोलतो ते बरोबर आहे
आणि मी शुध्द पवित्र आहे हे तू बघू शकतोस.’
5 ईयोब देवाने तुला उत्तर द्यावे
आणि तू चुकतो आहेस हे तुला सांगावे असे मला वाटते.
6 देव तुला ज्ञानाचे रहस्य सांगू शकेल.
प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात हे तो तुला सांगेल.
तुला जेवढी शिक्षा करायला हवी
तेवढी देव करत नाही हे तू समजून घे.
7 “ईयोब, तू देवाला खरोखरीच समजू शकतोस असे तुला वाटते का?
त्या सर्वशक्तिमान देवाला समजणे अशक्य आहे.
8 त्याचं शहाणपण स्वर्गाच्या उंचीइतकं आहे,
तू काय करु शकतोस?
ते मृत्यूच्या ठिकाणापेक्षा शेओलपेक्षा खोल आहे.
तू काय जाणू शकतोस?
9 देव पृथ्वीपेक्षा मोठा आहे
आणि सागरापेक्षा महान आहे.
10 “देवाने जर तुला कैद करुन न्यायालयात न्यायचे ठरवले,
तर त्याला कोणीही अडवू शकत नाही.
11 कवडीमोलाचा कोण आहे ते देवाला माहीत आहे.
तो ज्या वाईट गोष्टी बघतो त्या त्याच्या लक्षात राहातात.
12 रानटी गाढव माणसाला जन्म देऊ शकत नाही.
आणि मूर्ख माणूस कधीही शहाणा होऊ शकणार नाही.
13 पण ईयोब फक्त देवाची सेवा करण्यासाठी तू तुझ्या मनाची तयारी केली पाहिजेस
आणि तू तुझे हात त्याची उपासना करण्यासाठी त्याच्या दिशेने उचलले पाहिजेस.
14 तुझ्या घरात असलेले पाप तू दूर ठेवले पाहिजेस.
तुझ्या डेऱ्यात वाईट गोष्टींना थारा देऊ नकोस.
15 तरच तू उजळ माथ्याने देवाकडे बघू शकशील.
तू न भीता सर्व सामर्थ्यानिशी उभा राहू शकशील.
16 नंतर तू तुझे दु:ख विसरशील.
तुझे दु:ख निचरा झालेल्या पाण्यासारखे वाहून जाईल.
17 भर दुपारच्या सूर्य प्रकाशापेक्षाही तुझे आयुष्य चमकदार होईल.
आयुष्यातील अंधार सकाळच्या सूर्याप्रमाणे चमकेल.
18 नंतर तुला सुरक्षित वाटेल.
कारण तेव्हा तिथे आशा असेल.
देव तुझी चिंता वाहील आणि तुला विश्रांती देईल.
19 तू विश्रांती घेण्यासाठी आडवा होऊ शकशील आणि तुला कोणीही त्रास देणार नाही.
तुझ्याकडे खूप लोक मदतीसाठी येतील.
20 वाईट लोकही मदतीची अपेक्षा करतील.
परंतु त्यांची संकटापासून सुटका नाही
त्यांची आशा त्यांना मृत्यूकडे नेईल.”
15 आपण जे आत्मिकरीत्या सशक्त आहोत त्या आपण आपणाला सुखी न करता अशक्तांच्या दुर्बलतेचा भार वाहिला पाहिजे. 2 आपल्यापैकी प्रत्येकाने त्याच्या शेजाऱ्याला त्यांच्याकरिता व त्यांची उन्रती व्हावी या हेतूने सुखी करावे. 3 ख्रिस्ताने सुद्धा स्वतःला सुखी केले नाही. याउलट पवित्र शास्त्रात लिहिले आहे. “तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेली निंदा माझ्यावर आली आहे.” [a] 4 आता पवित्र शास्त्रत पूर्वी जे लिहिले होते ते आपल्या शिक्षणाकरिता लिहिले होते यासाठी की, शास्त्रापासून मिळणारे उतेजन आणि धीर यांची आपण आशा धरावी म्हणून शिकवितो. 5 आणि देव जो धीराचा आणि उतेजनाचा उगम आहे, तो तुम्ही ख्रिस्त येशूच्या उदाहरणाप्रमाणे एकमेकांबरोबर एकमताने राहावे असे करावे. 6 म्हणजे तुम्ही सर्व जण एक मुखाने देव जो आपला प्रभु येशू ख्रिस्ताचा पिता याला गौरव द्यावे. 7 म्हणून ख्रिस्ताने देवाच्य गौरवासाठी तुम्हाल स्वीकारले. तसे तुम्ही एकमेकांचा स्वीकार व स्वागत करा. 8 मी तुम्हांस सांगतो देवाच्या सत्यतेसाठी ख्रिस्त सुंती लोकांचा, यहूदी लोकांचा सेवक झाला यासाठी की पूर्वजांना दिलेली वचने निश्चित व्हावीत. 9 यासाठी की यहूदीतर लोक देवाने त्यांच्यावर दाखविलेल्या दयेबद्दल गौरव करतील, पवित्र शास्त्रात लिहिले आहे:
“म्हणून विदेशी लोकांमध्ये मी तुझे उपकार मानीन.
आणि तुझ्या नावाची स्तुति करीन.” (A)
10 आणि पुन्हा शाश्त्र असे म्हणते,
“विदेशी लोकांनो, देवाच्या निवडलेल्या लोकांबरोबर आनंद करा.” (B)
11 आणि पुन्हा शास्त्र असे म्हणते
“अहो सर्व विदेशी लोकांनो, प्रभूचे स्तवन करा
आणि सर्व लोक त्याची स्तुति करोत.” (C)
12 यशयासुद्धा असे म्हणतो,
“इशायाचे मूळ प्रगट होईल,
ते राष्ट्रावर राज्य करावयास उत्पन्र होईल.
ती राष्ट्रे त्याच्यावर आपला विश्वास ठेवतील.” (D)
13 देव जो सर्व आशेचा उगम, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हांला तो आनंदाने व शांतीने भरो, यासाठी की, तुम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आशेत विपुल व्हावे.
पौल त्याच्या कामाविषयी बोलतो
14 माझ्या बंधूंनो, मी तुम्हांविषयी निश्चित आहे की, तुम्ही चांगुलपणाने, ज्ञानाने पूर्ण भरलेले व एकमेकांस बोध करावयास समर्थ आहात. 15 परंतु तुम्हांला धीटपणे काही गोष्टींची आठवण देण्यासाठी लिहिले आहे. मी हे देवाने दिलेल्या देणगीमुळे असे केले. 16 ते हे की, विदेशी लोकांची सेवा करण्यासाठी मी ख्रिस्त येशूचा सेवक व्हावे व देवाच्या सुवार्तेचे याजकपण करावे, अशासाठी परराष्ट्रीय हे देवाला मान्य, पवित्र आत्म्याचे समर्पित असे व्हावे.
17 तर मग मी जो आता ख्रिस्त येशूमध्ये आहे तो देवाशी संबंधित असलेल्या गोष्टींत अभिमान बाळगतो. 18 कारण माझ्या शब्दांनी आणि कृत्यांनी विदेशी लोकांनी आज्ञापालन करावे अशा ज्या गोष्टी ख्रिस्ताने माझ्या करवी घडविल्या नाहीत, त्या सांगणयाचे धैर्य मी करणार नाही. 19 अदभुते, चमत्काराच्या व देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने मी यरुशलेमेपासून इल्लूरिकमाच्या सभोवती ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्याचे पूर्ण केले आहे. 20 जेथे ख्रिस्ताचे नाव सांगितले जात नाही अशा ठिकाणी सुवार्ता सांगण्याची माझी आकांक्षा आहे. यासाठी की मी दुसऱ्याच्या पायावर बांधु नये. 21 परंतु असे लिहिले आहे,
“ज्यांना त्याचे वर्तमान आले नाही ते ऐकतील
आणि ऐकले नाही ते समजतील.” (E)
Paul’s Plan to Visit Rome
22 या कारणांमुळे मला तुमच्याकडे येण्यास पुष्कळ वेळा अडथळा झाला.
23 परंतु ज्या अर्थी मला या प्रांतात एकही ठिकाण राहीले नाही, व पुष्कळ वर्षांपासून तुम्हांला भेटण्याची माझी इच्छा आहे. 24 जेव्हा मी स्पेनला जाईल तेव्हा तुम्हांला भेटण्याचा विचार करीत आहे व तुमच्याविषयी माझे मन भरल्यावर माझ्या त्या प्रवासात तुम्ही मला मदत कराल अशी आशा आहे.
25 पण मी यरुशलेमातील संतांच्या सेवेसाठी जात आहे. 26 कारण मासेदोनिया आणि अखिया येथील मंडळ्यांनी यरुशलेमेतील गरीब संत जनांना मदत करण्याचे ठरविले आहे. 27 ते त्यांचे ऋणी आहेत. व त्यांनी हे करण्याचे ठरविले आहे, कारण जर यहूदीतरांना इस्राएलाच्या आशीर्वादात भागी मिळाली आहे, तर त्यांनी त्यांच्या ऐहिक गरजा भागवून त्यांची सेवा करावी. 28 मग हे काम संपवून त्याचे फळ सुरक्षितपणे त्याच्या हाती सोपविल्यावर जेव्हा मी स्पेनला जाण्यासाठी निघेन, तेव्हा मी त्या मार्गाने जात असता तुमच्या शहरातून जाईन. 29 आणि मला माहीत आहे की, मी जेव्हा तुमच्याकडे येईन तेव्हा ख्रिस्ताच्या पूर्ण आशीर्वादाने भरलेला असा येईन.
30 बंधूंनो, आपल्या प्रभु येशू ख्रिस्तामुळे आणि आत्म्याकडून जे प्रेम आपणांकडे येते त्यामुळे माझ्या वतीने, माझ्याबरोबर देवाजवळ आग्रहाने प्रार्थना करण्याची विनंति करतो. 31 यासाठी की यहूदीयात जे अविश्वासू आहेत त्यांच्यापासून माझी सुटका व्हावी आणि यरुशलेमेतील मंडळीतील माझी सेवा संताना मान्या व्हावी. 32 यासाठी की, देवाच्या इच्छेने मी तुम्हांकडे आनंदाने यावे आणि तुम्हांबरोबर ताजेतवाने व्हावे. 33 शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.
2006 by World Bible Translation Center