M’Cheyne Bible Reading Plan
योसेफ सापळा टाकतो
44 मग योसेफाने आपल्या कारभाऱ्याला आज्ञा देऊन म्हटले, “या लोकांच्या पोत्यात जेवढे अधिक धान्य मावेल व त्यांना देता येईल तेवढे भर; आणि त्या सोबत प्रत्येकाचे पैसेही त्या पोत्यात ठेव. 2 सर्वात धाकट्या भावाच्या पोत्यात पैशाबरोबर माझा विशेष चांदीचा प्यालाही ठेव.” त्याच्या कारभाऱ्याने त्याच्या आज्ञाप्रमाणे सर्वकाही केले.
3 दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी त्या भावांना त्यांच्या गाढवांसहित त्यांच्या देशाला रवाना करण्यात आले. 4 त्यांनी नगर सोडल्यानंतर थोडया वेळाने योसेफ आपल्या कारभऱ्यास म्हणाला, “जा आणि त्या लोकांचा पाठलाग कर आणि त्यांना थांबवून असे म्हण, ‘आम्ही तुमच्याशी भलेपणाने वागलो! असे असता तुम्ही आमच्याशी अशा वाईट रीतीने का वागला. तुम्ही माझ्या स्वामीचा चांदीचा प्याला का चोरल? 5 हा प्याला खास माझा धनी पिण्याकरिता वापरतात; गुप्त गोष्टी समजून घेण्यासाठी तो वापरतात. तसेच देवाला प्रश्न विचारण्याकरिता माझा धनी हया प्यालाचा उपयोग करतात. हा प्याला चोरुन तुम्ही फार वाईट केले आहे.’”
6 तेव्हा तो कारभारी स्वार होऊन व त्यांना गाठून योसेफाने आज्ञा केल्याप्रमाणे बोलला.
7 परंतु ते भाऊ कारभाऱ्याला म्हणाले, “स्वामी असे का बरे बोलतात? आम्ही कधीच अशा गोष्टी करीत नाही! 8 मागे आमच्या पोत्यात मिळालेले पैसे आम्ही आता येताना आठवणीने आणले; तेव्हा खात्रीने आपल्या स्वामीच्या घरातून आम्ही सोने किंवा चांदी चोरणार नाही. 9 या उपर आम्हापैकी कोणाच्या पोत्यात तुम्हाला जर तो चांदीचा प्याला मिळाला तर तो भाऊ मरेल; तुम्ही त्याला मारून टाकावे आणि मग आम्ही सर्वजण आमच्या स्वामीचे गुलाम होऊ.”
10 कारभारी म्हणाला, “ठीक आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपण करु. जर मला चांदीचा प्याला मिळाला तर मग तो माणूस माझ्या धन्याचा गुलाम होईल; इतर जण जाण्यास मोकळे राहतील.”
सापळा उघडतो; वन्यामीन त्यात अडकतो
11 नंतर हर एक भावाने लगेच आपली गोणी जमिनीवर उतरुन उघडली. 12 कारभाऱ्याने थोरल्या भावापासून सुरवात करुन धाकटया भावाच्या गोणीपर्यंत तपासून पाहिले; तेव्हा त्याला बन्यामीनाच्या गोणीत तो चांदीचा प्याला मिळाला. 13 तेव्हा त्या भावांना भयंकर दु:ख झाले; अति दु:खामुळे त्यांनी आपली वस्त्रे फाडली आणि आपल्या गोण्या गाढवांवर लादून ते परत नगरात आले.
14 यहूदा व त्याचे भाऊ परत योसेफाच्या घरी गेले. योसेफ अजून घरातच होता. त्या भावांनी योसेफापुढे लोटांगण घातले. 15 योसफ त्यांना म्हणाला, “तुम्ही असे का केले? मला शकून पाहून गुप्त समजण्याचे विशेष ज्ञान आहे हे तुम्हाला माहीत नाही का? आणि या बाबतीत माझ्यापेक्षा अधिक चांगले ज्ञान इतर कोणालाही नाही!”
16 यहूदा म्हणाला, “महाराज! आम्ही आता काहीच बोलू शकत नाही, व याचा उलगडा करण्याचा दुसरा मार्ग नाही. आम्ही अपराधी नाही हे पटविण्यास दुसरा कोणताच मार्ग नाही. आमच्या दुसऱ्या कोणत्यातरी अपराधाबद्दल देवाने आम्हाला दोषी ठरवले आहे. म्हणून आता बन्यामीनासकट आम्ही सर्वजण महाराजांचे गुलाम झालो आहोत.”
17 परंतु योसेफ म्हणाला, “मी तुम्हा सर्वजणांना गुलाम करणार नाही! फक्त ज्याने चांदीचा प्याला चोरला तोच माझा गुलाम होईल. बाकीचे तुम्ही शांतीने आपल्या बापाकडे जाऊ शकता.”
यहूदा बन्यामीनाकरिता विनवणी करतो
18 मग यहूदा योसेफाकडे जाऊन म्हणाला, “कृपा करुन माझ्यावर रागावू नका परंतु अगदी खरेपणाने व मोकळेपणाने मला आपल्याबरोबर बोलू द्या. आपण फारो राजासमान असून इतके अधिकार आपणाला आहेत हे मी जाणतो. 19 मागच्या वेळी आम्ही येथे असताना आपण आम्हाला विचारले, ‘तुम्हाला बाप किंवा भाऊ आहे का?’ 20 आणि आम्ही आपणास उत्तर दिले, ‘होय! आमचा बाप आहे, परंतु तो आता फार म्हातारा झाला आहे; तसेच आम्हाला एक धाकटा भाऊही आहे. आमच्या बापाच्या म्हातारपणी हा आमचा भाऊ जन्मला म्हणून आमच्या बापाचा त्याच्यावर फार जीव आहे; आणि त्याचा तरुण भाऊ मरण पावला; तेव्हा त्या दोघांच्या आईचा हा एकच मुलगा राहिला आहे; आणि म्हणूनच तो आमच्या बापाचा फार प्रिय व लाडका मुलगा आहे.’ 21 आपण म्हणाला, ‘मग त्या तुमच्या धाकटया भावाला माझ्याकडे घेऊन या; मला त्याला पाहावयाचे आहे.’ 22 आणि आम्ही आपणास म्हणालो, ‘तो धाकटा भाऊ येऊ शकणार नाही, कारण तो बापाला सोडून कोठे जात नाही, जर का बापापासून त्याची ताटातूट झाली तर मग आमचा बाप भयंकर दु:खी होईल व त्या दु:खाने तो मरुन जाईल.’ 23 परंतु आपण आम्हाला बजावून म्हणाला, ‘तुम्ही तुमच्या धाकटया भावला घेऊन आलेच पाहिजे नाही तर मी तुम्हाला पुन्हा धान्य विकणार नाही.’ 24 म्हणून मग आम्ही आमच्या बापाकडे परत गेलो व आपण जे बोलला ते त्याला सांगितले.
25 “काही दिवसानंतर आमचा बाप म्हणाला, ‘मुलांनो, पुन्हा जाऊन आपणासाठी धान्य विकत आणा.’ 26 आणि आम्ही म्हणालो, ‘आम्ही आमच्या धाकट्या भावाला बरोबर घेतल्याशिवाय जाणार नाही कारण तुमच्या धाकट्या भावाला माझ्याकडे आणल्या खेरीज मी पुन्हा तुम्हाला धान्य विकणार नाही असे त्या प्रमुख अधिकाऱ्याने आम्हास बजावले आहे.’ 27 मग आमचा बाप आम्हाला म्हणाला, ‘मुलांनो, तुम्हाला माहीत आहे की माझी बायको राहेल हिच्या पोटी मला दोन मुलगे झाले; 28 आणि त्यातल्या एकाला मी पाहिले तो वन्यपशूद्वारे मारला गेला. पुन्हा तो कोणाच्या दष्टीस पडला नाही. 29 आणि आता माझ्या ह्या दुसऱ्या मुलाला तुम्ही माझ्यापासून घेऊन गेला आणि त्याला जर काही अपाय झाला तर मी भयंकर दु:खी होऊन मरुन जाईन.’ 30 तो मुलगा आमच्या बापाच्या आयुष्यात फार महत्वाचा आहे तेव्हा आता जर का आम्ही आमच्या धाकटया भावाशिवाय घरी गेलो आणि आमच्या बापाने हे पाहिले तर 31 आमचा धाकटा भाऊ आमच्या बरोबर नाही असे पाहून आमचा बाप नक्की मरुन जाईल; आणि आपल्या बापाला भयंकर दु:ख देऊन त्याच्या मरणास आम्ही कारण झालो हा दोष सतत आमच्या माथ्यावर राहील.
32 “हया धाकट्या भावाबद्दल मी माझ्या बापास जामीन राहिलो आहे. मी माझ्या बापास सांगितले, ‘जर मी माझ्या धाकट्या भावाला तुम्हाकडे परत घेऊन आलो नाही तर मग जन्मभर मी तुमचा दोषी राहीन.’ 33 तेव्हा महाराज, मी हात जोडूत तुमची काकूळतीने विनवणी करतो; तुम्हापाशी भिक्षा मागतो, त्या घाकट्या मुलाला त्याच्या भावांबरोबर परत जाऊ द्या. मी येथे राहातो आणि तुमचा गुलाम होतो माझे स्वामी! 34 आणि त्या धाकटया भावशिवाय माझ्या बापाकडे माघारी जाण्याची माझ्यात हिंमत नाही! माझ्या बापाचे काय होईल याची मला भयंकर भीती वाटते, हो स्वामी!”
यहूदी पुढारी येशूला ठार मारण्याचा कट करतात(A)
14 वल्हांडण [a] आणि बेखमीर भाकरीच्या सणाच्या [b] दोन दिवस अगोदर प्रमुख याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक कपटाने त्याला धरून जिवे मारण्याचा मार्ग शोधीत होते. 2 कारण ते म्हणत होते “आपण ते सणात करू नये नाही तर लोक दंगा करतील.”
एक स्त्री काही तरी विशेष करते(B)
3 येशू बेथानी येथे शिमोन कुष्ठरोगी याच्या घरी मेजावर जेवायला बसला असता कोणी एक स्त्री वनस्पतींपासून बनविलेल्या शूद्ध, सुगंधी तेलाची फार मौल्यवान अलाबास्त्र कुपी घेऊन आली. तिने अलाबास्त्र कुपी फोडली आणि सुगंधी तेल येशूच्या मस्तकावर ओतले.
4 तेथे असलले काही लोक रागावले, ते एकमेकांना म्हणाले, “सुगंधी तेलाचा असा नाश व्हावा हे बरे नाही. 5 कारण हे सुगंधी तेल तीस दिनारापेक्षा अधिक किंमतीला विकता आले असते आणि ते पैसे गरीबांना देता आले असते.” त्यांनी तिच्यावर कडक टीका केली.
6 पण येशू म्हणाला, “तिला एकाकी असू द्या. तिला का त्रास देता? तिने माझ्यासाठी एक सुंदर कृत्य केले आहे. 7 गरीब तर नेहमी तुमच्याजवळ असतील आणि पाहिजे त्या वेळेला त्यांना मदत करणे तुम्हांला शक्य आहे. परंतु मी नेहमीच तुमच्याबरोबर असेन असे नाही. 8 तिला शक्य झाले ते तिने केले. तिने दफनविधीच्या तयारीच्या काळाअगोदरच माझ्या शरीरावर सुगंधी तेल ओतले आहे. 9 मी तुम्हांला खरे सांगतो सर्व जगात जेथे कोठे सुवार्तेची घोषणा केली जाईल तेथे तिची आठवण म्हणून तिने जे केले ते नेहमीच सांगितले जाईल.”
यहूदा येशूचा शत्रु होतो(C)
10 नंतर बारा शिष्यांपैकी एक, यहूदा इस्कर्योत येशूला विश्वासघाताने धरून देण्यासाठी प्रमुख याजकांकडे गेला. 11 त्यांना हे ऐकून आनंद झाला. आणि त्यांनी त्याला पैसे देण्याचे वचन दिले. मग यहूदा येशूला धरून त्यांच्या हातात देण्याची संधि पाहू लागला.
येशू वल्हांडण सणाचे भोजन खातो(D)
12 बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी जेव्हा वल्हांडण सणाचा कोकरा मारीत असत तेव्हा येशूचे शिष्य त्याला म्हणाले, “आम्ही जातो आणि वल्हांडण सणाच्या भोजनाची तयारी करतो. आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे?”
13 येशूने आपल्या दोघा शिष्यांना पाठविले आणि त्यांना सांगितले, “शहरात जा, आणि पाण्याचे भांडे घेऊन जाणारा मनुष्य तुम्हांला भेटेल, त्याच्या मागे जा. 14 आणि जेथे तो आत जाईल त्या घराच्या मालकास सांगा, ‘गुरुजी म्हणतात, जेथे मला माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडण सणाचे भोजन करणे शक्य होईल अशी खोली कोठे आहे?’ 15 आणि तो तुम्हांला माडीवरची एक मोठी नीटनेटकी केलेली खोली दाखवील, तेथे आपणासाठी तयारी करा.”
16 शिष्य निघाले आणि ते शहरात गेले. आणि येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांना सर्व आढळले. मग त्यांनी वल्हांडण सणाच्या भोजनाची तयारी केली.
17 संध्याकाळ झाली तेव्हा येशू बारा जणांसह आला. 18 मेजावर बसून ते जेवीत असता येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, तुमच्यापैकी जो एक जण मला शत्रूच्या स्वाधीन करून देईल, तो माझ्याबरोबर येथे जेवीत आहे.”
19 शिष्य अतिशय खिन्न झाले व प्रत्येक जण त्याला म्हणू लागला, “तो मी आहे का?”
20 तो त्यांना म्हणाला, “बारा जणांपैकी एक जो माझ्याबरोबर ताटात भाकर बुडवीत आहे तोच. 21 हाय, हाय, त्याच्याविषयी पवित्र शास्त्रात जसे लिहिले आहे, तसा मनुष्याचा पुत्र जाईल, परंतु ज्याच्याकडून मनुष्याचा पुत्र धरून दिला जाईल, त्याचा नाश होवो. तो जन्मला नसता तर ते त्याच्यासाठी बरे झाले असते.”
प्रभु भोजन(E)
22 ते भोजन करीत असता येशूने भाकर घेतली, उपकारस्तुति केली, ती मोडली आणि त्यांना दिली. तो म्हणाला, “घ्या, हे माझे शरीर आहे.”
23 नंतर येशूने प्याला घेतला, उपकारस्तुति केली. तो प्याला त्यांना दिला आणि सर्व त्यांतून प्याले. 24 मग येशू म्हणाला, “हे माझे नव्या कराराचे [c] रक्त आहे. पुष्कळांसाठी ते ओतले जात आहे. 25 मी तुम्हांला खरे सांगतो की, देवाच्या राज्यात मी नवा द्राक्षारस पिईन त्या दिवसापर्यंत मी यापुढे द्राक्षाचा उपज (द्राक्षारस) पिणार नाही.”
26 नंतर त्यांनी उपकारस्तुतिचे गीत गाईले व ते जैतुनाच्या डोंगराकडे निघून गेले.
येशू सांगतो त्याचे सर्व शिष्य त्याला सोडून जातील(F)
27 येशू शिष्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व विश्वास गमावून बसाल. कारण असे लिहिले आहे की,
‘मी मेंढपाळास मारीन
आणि मेंढरे विखुरली जातील.’ (G)
28 परंतु माझे पुनरूत्थान झाल्यावर मी तुमच्यापुढे गालीलात जाईन.”
29 पेत्र म्हणाला, “इतर सर्वांनी जरी त्यांचा विश्वास गमावला तरी मी गमावणार नाही.”
30 मग येशू त्याला म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज रात्री दोनदा कोंबडा आरवण्यापुर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.”
31 तरीही पेत्र अधिक आवेशाने म्हणाला, “जरी मला आपणांबरोबर मरावे लागले तरी सुद्धा मी आपणांला नाकारणार नाही.” आणि इतर सर्व जण तसेच म्हणाले.
येशू एकाटाच प्रार्थना करतो(H)
32 नंतर ते गेथशेमाने म्हटलेल्या जागी आले, तेव्हा येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.” 33 येशूने आपल्याबरोबर पेत्र, याकोब व योहान यांना घेतले. दु:ख व वेदनांनी त्याचे मन भरून आले. 34 तो त्यांना म्हणाला, “माझा जीव मरणाइतका वेदना सोशीत आहे. येथे राहा व जागृत असा.”
35 त्यांच्यापासून थोडे दूर अंतरावर जाऊन तो जमिनीवर पडला आणि त्याने प्रार्थना केली की, “शक्य असेल तर ही घटका मजपासून टळून जावो.” 36 तो म्हणाला, “ अब्बा, [d] बापा, तुला सर्व काही शक्य आहे. हा प्याला मजपासून दूर कर पण मला पाहिजे ते नको तर तुला पाहिजे ते कर. (माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे कर.)”
37 नंतर येशू आला आणि त्यांना झोपलेले पाहिले. तो पेत्राला म्हणाला, “शिमोना, तू झोपी गेलास काय? तासभर तुझ्याच्याने जागे राहवत नाही काय? 38 जागृत राहा आणि प्रार्थना करा म्हणजे तुम्ही मोहात पडणार नाही. आत्मा उत्सुक आहे पण देह अशक्त आहे.”
39 पुन्हा येशू दूर गेला आणि त्याच गोष्टी उच्चारून त्याने प्रार्थना केली. 40 नंतर तो परत आला व त्याला ते झोपलेले आढळले. कारण त्यांचे डोळे जड झाले होते आणि त्याला काय उत्तर द्यावे हे त्यांना कळेना.
41 तो पुन्हा तिसऱ्या वेळेस आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही अजूनही झोपलेले आणि विश्रांति घेत आहात काय? पुरे झाले! आता वेळ आली आहे. मनुष्याचा पुत्र पाप्यांच्या हाती धरून दिला जात आहे. 42 उठा, आपण जाऊ या. पाहा, मला धरून देणारा मनुष्य इकडे इकडे येत आहे.”
येशूला अटक करण्यात येते(I)
43 आणि येशू बोलत आहे तोपर्यंत बारा जणांपैकी एक-यहूदा आला. त्याच्याबरोबर मुख्य याजक व नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडील यांनी पाठविलेले अनेक लोक तलवारी व सोटे घेऊन आले.
44 घात करून देणाऱ्याने त्यांना अशी खूण दिली होती की, “मी ज्या कोणाचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्याला धरा आणि बाजूला काढा.” 45 मग यहूदा आल्याबरोबर तो येशूकडे गेला आणि म्हणाला, “गुरूजी!” आणि यहूदाने येशूचे चुंबन घेतले. 46 नंतर त्यांनी त्याच्यावर हात टाकले आणि त्याला अटक केली. 47 तेथे जवळ उभे असलेल्यांपैकी एकाने आपली तलवार काढली आणि मुख्य याजकाच्या नोकरावर वार करून त्याचा कान कापून टाकला.
48 नंतर येशू त्यांना म्हणाला, “मी लूटारू असल्याप्रमाणे तुम्ही तलवारी आणि सोटे घेऊन मला पकाडायला बाहेर पडलात काय? 49 मी दररोज मंदिरात शिकवीत असता तुम्हांबरोबर होतो आणि तुम्ही मला अटक केली नाही. परंतु शास्त्रलेख पूर्ण झालाच पाहिजे.” 50 सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.
51 एक तरूण मनुष्य अंगावर तागाचे वस्त्र पांघरून त्याच्या मागे चालत होता. त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, 52 परंतु तो तागाचे वस्त्र टाकून उघाडाच पळून गेला.
यहूदी पुढाऱ्यांबरोबर येशू(J)
53 नंतर त्यांनी येशूला तेथून मुख्य याजकाकडे नेले. आणि सर्व मुख्य याजक, वडील व नियमशास्त्राचे शिक्षक जमा झाले. 54 थोडे अंतर ठेवून पेत्र येशूच्या मागे थेट मुख्य याजकाच्या वाड्यात गेला. तेथे पेत्र पहारेकऱ्याबरोबर विस्तवाजवळ शेकत बसला.
55 मुख्य याजक आणि सर्व यहूदी सभा येशूला जिवे मारण्यासाठी पुरावा गोळा करण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु त्यांना काही मिळेना. 56 पुष्कळांनी त्याच्याविरूद्ध खोटी साक्ष दिली. परंतु त्यांची साक्ष सारखी नव्हती.
57 नंतर काही जण उभे राहीले आणि त्याच्या विरूद्ध साक्ष देऊन म्हणाले, “आम्ही त्याला असे म्हणताना ऐकले की, 58 ‘हाताने बांधलेले मंदिर मी पाडून टाकीन आणि हातांनी न बांधलेले असे दुसरे मंदिर तीन दिवसात उभारीन.’” 59 परंतु तरीही या बाबतीत त्यांच्या साक्षीत मेळ नव्हता.
60 नंतर मुख्य याजक त्यांच्यापुढे उभा राहिले आणि त्याने येशूला विचारले, “तू उत्तर देणार नाहीस काय? हे लोक तुझ्याविरूद्ध आरोप करताहेत हे कसे?” 61 परंतु येशू गप्प राहिला. त्याने उत्तर दिले नाही.
नंतर मुख्य याजकाने पुन्हा विचारले, “धन्य देवाचा पुत्र तो तू रिव्रस्त आहेस काय?”
62 येशू म्हणाला, “मी आहे, आणि तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसलेले व आकाशातील मेघांसह येताना पाहाल.”
63 मुख्य याजकाने आपले कपडे फाडले आणि म्हणाला, “आपणांला अधिक साक्षीदारांची काय गरज आहे? 64 तुम्ही निंदा ऐकली आहे. तुम्हांला काय वाटते?”
सर्वांनी त्याला मरणदंड योग्य आहे अशी शिक्षा फर्माविली. 65 काही जण त्याच्यावर थुंकू लागले. त्याचे तोंड झाकून बुक्के मारू लागले व त्याला म्हणू लागले, “ओळख बरे, तुला कोणी मारले?” पाहारेकऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि मारले.
येशूला ओळखतो हे सांगण्यास पेत्र घाबरतो(K)
66 पेत्र अंगणात असतानाच मुख्य याजकांच्या दासींपैकी एक आली. 67 आणि तिने पेत्राला शेकताना पाहिले. तेव्हा तिने त्याच्याकडे निरखून पाहिले व म्हणाली, “तू सुद्धा नासरेथकर येशूबरोबर होतास ना?”
68 परंतु पेत्राने ते नाकारले, आणि म्हणाला, “तू काय म्हणतेस हे मला कळत नाही व समजतही नाही.” पेत्र अंगणाच्या दरवाजाच्या देवडीवर गेला आणि कोंबडा आरवला.
69 जेव्हा दासीने त्याला पाहिले तेव्हा जे लोक तेथे होते त्यांना ती म्हणू लागली की, “हा मनुष्य त्यांच्यापैकीच एक आहे.” 70 पेत्राने पुन्हा ते नाकारले.
नंतर थोड्या वेळाने तेथे उभे असलेले लोक पेत्राला म्हणाले, “खात्रीने तू त्यांच्यापैकी एक आहेस, कारण तू सुद्धा गालीली आहेस.”
71 पेत्र स्वतःची निर्भत्सना करीत व शपथ वाहून म्हणाला, “तुम्ही ज्या माणसाविषयी बोलत आहात त्याला मी ओळखत नाही!”
72 आणि लगेच दुसऱ्यांदा कोंबडा आरवला. “दोन वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील,” असे येशू म्हणाला होता याची पेत्राला आठवण झाली व तो अतिशय दु:खी झाला व ढसढसा रडला.
10 “मी माझ्या स्वतःच्या आयुष्याचा तिरस्कार करतो म्हणून मी मुक्तपणे तक्रार करीन.
माझा आत्मा कडू जहर झालेला आहे म्हणून मी आता बोलेन.
2 मी देवाला म्हणेन, ‘मला दोष देऊ नकोस.
मी काय चूक केली आहे ते मला सांग.
माझ्याविरुध्द तुझ्या मनात काय आहे?
3 देवा, मला कष्ट देण्यात मुला सुख वाटते का?
तुझ्या निर्मिती विषयी तुलाच आस्था नसावी असे वाटते, की वाईट लोकांनी ज्या मसलती केल्या त्या बाबतीत तू समाधानी आहेस?
4 देवा, तुला मानवी डोळे आहेत का?
लोकांना दिसते ते तुला दिसते का?
5 तुझे आयुष्य आमच्या आयुष्याइतकेच लहान आहे का?
ते माणसाच्या आयुष्याइतकेच थोडे आहे का?
नाही तर मग त्या विषयी तू कसे जाणून घेतोस?
6 तू माझ्या चुका शोधत असतोस,
माझी पापं धुंडाळीत असतोस.
7 मी निष्पाप आहे हे तुला माहित आहे.
परंतु तुझ्या हातातून मला कुणीही वाचवू शकणार नाही.
8 देवा, तुझ्या हातांनी माझी निर्मिती केली,
माझ्या शरीराला आकार दिला.
परंतु आता तेच हात माझ्याभोवती आवळले जात आहेत
आणि माझा नाश करीत आहेत.
9 देवा, जरा आठव तू मला मातीसारखे बनवलेस.
आता तूच परत माझी माती करणार आहेस का?
10 तू मला दुधासारखे ओतलेस
आता दही घुसळणाऱ्याप्रमाणे तू मला घुसळून बदलणार आहेस का?
11 हाडे आणि स्नायू यांनी तू मला एकत्र बांधलेस.
नंतर तू मला कातडीचे आणि मांसाचे कपडे चढविलेस.
12 तू माझ्यात प्राण ओतलेस आणि माझ्याशी अंत्यत दयाळू राहिलास.
तू माझी काळजी वाहिलीस आणि माझ्या जीवाचे रक्षण केलेस.
13 परंतु तू हे तुझ्या हृदयात लपवून ठेवलेस तू तुझ्या हृदयात याची गुप्तपणे आखणी केलीस हे मला माहित आहे.
तुझ्या मनात हेच होते याची जाणीव मला आहे.
14 मी पाप करतो तेव्हा तू माझ्यावर नजर ठेवतोस
कारण त्यामुळेच माझ्या पापाबद्दल तू मला शिक्षा करशील
15 पाप केल्यावर मी अपराधी असेन
आणि माझ्या दृष्टीने ते फारच वाईट असेल.
परंतु मी निष्पाप असूनही माथा उंच करु शकत नाही.
मला खूप लाज वाटते आणि मी गोंधळून जातो.
16 मी जेव्हा यशस्वी होतो आणि मला गर्व चढू लागतो
तेव्हा शिकाऱ्याने सिंहाची शिकार करावी तशी तू माझी शिकार करतोस.
तू तुझे सामर्थ्य पुन्हा माझ्याविरुध्द दाखवितोस.
17 माझी चूक सिध्द करण्यासाठी तुझ्याकडे नेहमीच कुणीतरी असते.
माझ्यावरचा तुझा राग अधिकच भडकेल.
तू माझ्याविरुध्द सैन्याची आणखी
कुमक पुनः पुन्हा आणशील.
18 म्हणून देवा, तू मला जन्माला तरी का घातलेस?
मी कुणाच्या दृष्टीस पडण्याआधीच मेलो असतो तर बरे झाले असते.
19 मी जगलोच नसतो तर बरे झाले असते.
माझ्या मातेच्या उदरातून मला सरळ थडग्यातच नेले असते तर किती चांगले झाले असते.
20 माझे आयुष्य जवळ जवळ संपले आहे,
म्हणून तू मला एकटे सोड.
21 जिथून कुणीही परत येत नाही तिथे म्हणजे अंधार
आणि मृत्यूच्या जागी जाण्यापूर्वी जो काही थोडा वेळ माझ्यासाठी उरला आहे
त्याचा मला उपभोग घेऊ दे.
22 काळोखाच्या गर्भात, मृत्यूलोकात जाण्यासाठी जो थोडा वेळ अजून आहे तो मला सुखाने घालवू दे, जिथून कुणीही परत येत नाही अशा काळोखाने दाट छायेने
आणि गोंधळाने भरलेल्या, ज्या जागी प्रकाशसुध्दा अंधकारमय आहे अशा जागी जाण्यापूर्वी मला सुखाने जगू दे.’”
इतर लोकांवर टीका करु नका
14 जो विश्वासात दुर्बल आहे त्याचा स्वीकार करा. पण मतभेदावरुन भांडणाच्या हेतूने नव्हे. 2 एखाद्याचा विश्वास असा असतो की, तो सर्व गोष्टी खाऊ शकतो, परंतु दुर्बल मनुष्य भाजीच खातो. 3 जो कोणत्याही प्रकारचे अन्र खातो त्याने जो काही विशिष्ट गोष्टी खात नाही, त्याला तुच्छ मानू नये. आणि जो काही विशिष्ट गोष्टी खातो त्याने त्याला दोष देऊ नये कारण देवाने त्याचा स्वीकार केला आहे. 4 दुसऱ्याच्या नोकराला दोष लावणारा तू कोण आहेस? त्याच्या मालकाच्या दृष्टीने तो स्थिर राहील किंवा त्याचे पतन झाले असताही स्थिर राहील. कारण त्याला स्थिर करण्यास मालक समर्थ आहे.
5 एखादा मनुष्य एक दिवस दुसऱ्या दिवसापेक्षा अधिक मानतो परंतु दुसरा मनुष्य प्रत्येक दिवस सारखाच मानतो. प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खात्री करुन घ्यावी. 6 जो विशेष दिवस पाळतो तो प्रभूचा मान राखण्यासाठी पाळतो आणि जो कोणत्याही प्रकारचे अन्र खातो तो प्रभूचा मान राखण्यासाठी खातो. विशिष्ट प्रकारचे अन्र खात नाही तो प्रभूचा मान ठेवण्यासाठी खात नाही. तो सुद्धा देवाचे आभार मानतो.
7 कारण कोणीही स्वतःसाठी जगत नाही, किंवा मरत नाही, जर आपण जगतो तर प्रभुचे लोक म्हणून जगतो आणि मरतो तर प्रभूचे लोक म्हणून मरतो. 8 म्हणून जर आपण जगतो किंवा मरतो तर आपण प्रभूचे आहोत. 9 ख्रिस्त मेला आणि जिवंत झाला यासाठी की त्याने जे आता मेलेले आहेत आणि जे अजूनही जिवंत आहेत त्या दोघांचा प्रभु व्हावे.
10 तेव्हा तू आपल्या बलवान भावाला दोष का लावतो? किंवा जो अशक्त आहे त्या भावाला तुच्छ का मानतोस? कारण आपण सर्व जण देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत. 11 असे लिहिले आहे की,
“प्रभु म्हणतो खात्रीने मी जिंवत आहे
‘प्रत्येक गुडघा माझ्यासमोर टेकला जाईल
आणि प्रत्येक जीभ देवाचे उपकार मानील.’” (A)
12 म्हणून प्रत्येक जण आपापल्यासंबंधी देवाला हिशेब देईल.
इतरांना पाप करु देऊ नका
13 म्हणून आपण एकमेकांचा न्याय करण्याचे थांबवू या. तुम्ही असा निश्चय करावा की, तुम्ही आपल्या भावाच्या मार्गात पाप करण्यासाठी मोह किंवा अडखळण ठेवणार नाही. 14 मला माहीत आहे आणि मी जो प्रभु येशूमध्ये आहे त्या माझी खात्री झाली आहे की, जो पदार्थ खाण्यास अशुद्ध आहे असे समजतो त्याशिवाय कोणताही पदार्थ मूळचा अशुद्ध नाही. त्याच्यासाठी ते अशुद्ध आहे.
15 जर खाण्यामुळे तुझा भाऊ दु:खी झाला आहे तर तू प्रीतीने वागत नाहीस. ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्याचा तुझ्या अन्राने नाश करु नकोस. 16 म्हणून तुम्हांसाठी जे चांगले आहे त्याची निंदा होऊ नये. 17 खाणे पिणे यात देवाचे राज्या नाही. परंतु नीतिमत्व, शांति आणि आनंद, जो पवित्र आत्म्यात आहे त्यामध्ये आहे. 18 जो कोणी अशा प्रकारे जगून ख्रिस्ताची सेवा करतो तो देवाला आनंद देणारा आणि सर्व लोकांनी पसंत केलेला असा आहे.
19 तर मग आपण शांतीला आणि एकमेकांच्या वाढीला मदत करणाऱ्या गोष्टींच्या मागे लागावे. 20 तुम्ही खाता त्या अन्रामुळे देवाच्या कार्याचा नाश करु नका. सर्व गोष्टी शुद्ध आहेत. असंतोषाने खाणे मनुष्यासाठी चुकीचे आहे. 21 मांस न खाणे, द्राक्षारस न पिणे, तुझा भाऊ न अडखळेल असे करणे चांगले आहे.
22 तुझा जो विश्वास आहे तो देवासमोर तुझ्या ठायी असू दे. ज्याला योग्य आहे असे वाटते व त्यामुळे जो स्वतःचा द्वेष करीत नाही तो धन्य. 23 जर तो पुढे जाऊन आपण हे टाळावे असा विश्वास ठेवूनखातो तो देवासमोर दोषी ठरतो. कारण त्याची कृति विश्वासावर आधारित नाही, ते पाप आहे.
2006 by World Bible Translation Center