Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
उत्पत्ति 42

स्वप्ने खरी होतात

42 या सुमारास कनानमध्ये ही दुष्काळ पडला होता परंतु मिसरमध्ये धान्य असल्याचे याकोबाला समजले. तेव्हा याकोब आपल्या मुलांना म्हणाला, “आपण येथे काही न करता स्वस्थ का बसलो आहोत. मिसर देशात धान्य मिळते असे मी ऐकले आहे. तुम्ही जाऊन आपणासाठी धान्य विकत आणा म्हणजे आपण जगू, मरणार नाही.”

तेव्हा योसेफाचे दहा भाऊ धान्य विकत घेण्यासाठी मिसरला गेले. याकोबाने, योसेफाचा सख्खा भाऊ बन्यामीन याला त्याच्या भावाबरोबर पाठवले नाही; कारण योसेफाप्रमाणे बन्यामीनावरही काही वाईट प्रसंग ओढवेल अशी त्याला भीती वाटली. कनान देशात फारच तीव्र दुष्काळ पडला होता, म्हणून कनानातून पुष्कळ लोक धान्य विकत घ्यावयास मिसराला गेले त्या लोकांत इस्राएलाचे मुलगेही होते.

त्या वेळी योसेफ मिसरचा प्रशासक म्हणजे प्रमुख अधिकारी होता. बाहरेच्या देशातून धान्य विकत घ्यावयास मिसरमध्ये येणाऱ्या लोकांना धान्य विकण्याचा अधिकार केवळ योसेफालाच होता; म्हणून योसेफाचे भाऊ त्याजकडे आले आणि त्यांनी त्याला लवून नमन केले. योसेफाने आपल्या भावांना पाहिल्याबरोबर ओळखले परंतु ते कोण आहेत हे माहित नसल्यासारखे दाखवून तो त्यांच्याशी कठोरपणाने बोलला त्याने त्यांना विचारले, “तुम्ही कोठून आला?”

त्याच्या भावांनी उत्तर दिले, “महाराज, आम्ही कनान देशातून धान्य विकत घेण्यासाठी आलो आहो.”

योसेफाने आपल्या भावांना ओळखले परंतु त्यांनी त्याला ओळखले नाही. आणि मग योसेफाला आपल्या भावांविषयी पडलेली स्वप्ने आठवली.

योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “तुम्ही हेर आहात! तुम्ही धान्य खरेदी करण्यास नव्हे तर आमच्या देशाचा कमजोरपणा हेरण्यास आला आहात.”

10 परंतु त्याचे भाऊ म्हणाले, “नाही नाही, महाराज! आम्ही आपले दास खरोखर केवळ धान्य विकत घ्यावयास आलो आहोत. 11 आम्ही सर्व भाऊ एका पुरुषाचे मुलगे आहोत. आम्ही प्रमाणिक म्हणजे खरेपणाने बोलणारे व चालणारे सरळ माणसे आहोत. आम्ही खरेच धान्य खरेदी करण्यास आलो आहोत.”

12 नंतर योसेफ त्यांना म्हणाला, “नाही, तुम्ही आमचा कमकुवतपणा पाहण्यास आलेले हेर आहात.”

13 परंतु ते भाऊ म्हणाले, “नाही नाही महाराज! आम्ही सर्व भाऊच आहोत. आमच्या कुटुंबातील आम्ही एका बापाचे बारा मुलगे आहोत. आमचा सर्वात धाकटा भाऊ घरी बापाजवळ आहे. आणि आमचा दुसरा एक भाऊ फार पूर्वी मरण पावला. कनान देशातले आम्ही सर्व आपल्या दासासमान आहोत.”

14 परंतु योसेफ त्यांना म्हणाला, “नाही, माझे म्हणणे अगदी बरोबर आहे. तुम्ही हेरच आहात; 15 परंतु तुम्ही खरे बोलत आहा हे पटवून देण्याची मी तुम्हाला एक संधी देतो; फारोची शपथ! मी वचन देतो की तुमचा धाकटा भाऊ येथे येईपर्यंत तुम्हाला येथून जाता येणार नाही. 16 तेव्हा तुम्हातील एकाने मागे घरी जाऊन तुमच्या धाकटया भावाला येथे घेऊन यावे, आणि तो पर्यंत तुम्ही इतरांनी येथे तुरुंगात राहावे; मग तुम्ही कितपत खरे बोलता हे आम्हास कळेल. परंतु माझी खात्री आहे की तुम्ही हेरच आहात.” 17 मग योसेफाने त्या सर्वांना तीन दिवस तुरुंगात अटकेत ठेवले.

शिमोनास ओलीस ठेवले जाते

18 तीन दिवसानंतर योसेफ त्यांना म्हणाला, “मी देवभिरु माणूस आहे. म्हणून मी सांगतो तसेच करा, म्हणजे तुमच्या धाकट्या भावाला येथे आणून तुमचा खरेपणा पटवून द्या; मग मी तुम्हाला वाचवू शकेन. 19 तुम्ही जर खरेच प्रामाणिक असाल तर मग तुम्हातील एका भावास येथे तुरुंगात ओलीस ठेवा व बाकीचे तुम्ही तुमच्या घरच्या माणसांकरिता धान्य घेऊन जा. 20 मग तुमच्या धाकट्या भावास येथे माझ्याकडे घेऊन या. यावरुन तुम्ही माझ्याशी खरे बोलता किंवा नाही याची मला खात्री पटेल. आणि तुम्हाला मरावे लागणार नाही.”

तेव्हा तसे करण्यास ते भाऊ कबूल झाले. 21 ते एकमेकांस म्हणाले, “आपला धाकटा भाऊ योसेफ याच्याशी आपण वाईट रीतीने वागलो त्याचा बदला म्हणून आपणास ही शिक्षा होत आहे. त्याने त्याला सोडून द्यावे व त्याचा जीव वाचवावा म्हणून काकुळतीने रडून आपणास विनंती केली परंतु आपण त्याचे ऐकले नाही म्हणून आता आपणास हे भोगावे लागत आहे.”

22 मग रऊबेन त्यांना म्हणाला, “मी तुम्हाला सांगितले की त्या लहान भावाच्या जीवाला, वाईट रीतीने वागून काही अपाय करु नका; परंतु तुम्ही ते ऐकले नाही म्हणून आता त्याच्या मृत्यूबद्दल आपण ही शिक्षा भोगीत आहोत.”

23 योसेफ दुभाष्यातर्फे आपल्या भावांशी बोलत असल्यामुळे, योसेफाला आपल्या भोषेतील बोलणे कळत असेल असे त्यांना वाटले नाही. परंतु त्यांचे सर्व बोलणे योसेफाला समजले; त्यामुळे त्याला फार दु:ख झाले व 24 म्हणून तो त्यांच्यापासून बाजूला जाऊन रडला थोडया वेळाने तो परत त्यांच्याकडे आला. आणि त्यांच्याशी बोलला इतर भाऊ पाहात असताना त्याने एका भावाला शिमोनला त्यांच्यातून काढून घेतले आणि बांधले. 25 मग आपल्या भावांच्या पोत्यात धान्य भरण्यास तसेच त्या धान्याबद्दल त्याच्या भावांनी दिलेला परंतु योसेफाने न घेतलेला पैसा गुपचूप ज्याच्या त्याच्या पोत्यात भरण्यास व त्यांच्या परतीच्या प्रवासात वाटेत खाण्यासाठी अन्नसामग्री देण्यास योसेफाने आपल्या काही सेवकांना सांगतिले.

26 तेव्हा त्या भावांनी ते धान्य आपापल्या गाढवावर लादले व तेथून ते माघारी जाण्यास निघाले. 27 ते भाऊ रात्रीच्या मुक्कामासाठी एका ठिकाणी थांबले. तेव्हा त्यांच्यापैकी एकाने त्याच्या गाढवाला थोडेसे धान्य देण्यासाठी आपली गोणी उघडली तेव्हा त्याने धान्यासाठी दिलेल पैसे त्याला त्या गोणीत आढळले. 28 तेव्हा तो आपल्या इतर भावांना म्हणाला, “पाहा! धान्यासाठी मी दिलेले हे पैसे कोणीतरी पुन्हा माझ्या गोणीत ठेवले आहेत!” तेव्हा ते भाऊ अतिशय घाबरले, ते एकमेकांस म्हणाले, “देव आपल्याला काय करत आहे.”

ते भाऊ याकोबाला हकीकत सांगतात

29 ते भाऊ कनान देशास आपला बाप याकोब याजकडे गेले आणि त्यांनी घडलेल्या सर्व गोष्टी त्याला सांगितल्या. 30 ते म्हणाले, “त्या देशाचा (मिसरचा) अधिपति म्हणजे प्रमुख अधिकारी आमच्याशी कठोरपणाने बोलला आम्ही हेर आहोत असे त्याला वाटले; 31 परंतु आम्ही हेर नसून प्रामाणिक म्हणजे खरेपणाने वागणारे सरळ माणसे आहोत असे त्याला सांगितले. 32 आम्ही त्याला सांगितले की आम्ही बारा भाऊ एका माणसाचे मुलगे आहोत आमचा एक भाऊ वारला तसेच आमचा सर्वात धाकटा भाऊ कनान देशात आजपर्यंत आमच्या बापाजवळच असतो असेही सांगितले.

33 “तेव्हा त्या देशाचा प्रशासक म्हणजे प्रमुख अधिकारी आम्हाला म्हणाला, ‘तुम्ही प्रामाणिक व साळसूद लोक आहात हे पटवून देण्याचा एक मार्ग आहे; तो असा की तुम्ही तुम्हातील एका भावास येथे ओलीस माझ्यापाशी ठेवा; तुम्ही इतरजण तुमच्या कुटुंबातील माणसाकरिता धान्य घेऊन जा. 34 आणि नंतर तुम्ही तुमच्या धाकट्या भावाला येथे माझ्याकडे घेऊन या; मग तुम्ही खरेच प्रामाणिक व साळसूद माणसे आहात हे मला पटेल; नाही तर मग तुम्ही तुमच्या सेनापतीच्या हुकुमाने आमचा नाश करावयास आला आहात असे मी समजेन; तुम्ही जर खरे बोलत असाल तर मग मी तुमचा भाऊ परत तुमच्या हवाली करीन आणि मग तुम्हाला आपणाकरिता आमच्या देशातून धान्य विकत घेण्यासाठी ये जा करण्याची परवानगी असेल.’”

35 मग ते भाऊ आपापल्या पोत्यातून धान्य काढावयास गेले; तेव्हा प्रत्येकाच्या पोत्यात पैशाची पिशवी मिळाली. त्या पैसाच्या पिशव्या पाहून ते भाऊ व त्यांचा बाप हे अतिशय घाबरले.

36 याकोब त्यांना म्हणाला, “मी माझ्या सर्व मुलांना मुकावे अशी तुमची इच्छा आहे काय? योसेफ गेला; शिमोनही गेला; आणि आता बन्यामीनालाही माझ्यापासून घेऊन जाण्याची तुमची इच्छा आहे!”

37 मग रऊबेन आपल्या बापास म्हणाला, “बाबा, मी जर बन्यामीनाला मागे आणले नाही तर माझे दोन मुलगे तुम्ही मारुन टाका; बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा! मी खरोखर बन्यामीनाला मागे तुमच्याकडे घेऊन येईन!”

38 परंतु याकोब म्हणाला, “मी बन्यामीनाला तुमच्याबरोबर पाठविणार नाही; त्याचा भाऊ मरण पावला आणि आता माझी बायको राहेल हिचा एवढा एकच मुलगा राहिला आहे. मिसरच्या फेरीत त्याला काही अपाय झाला तर त्यामुळे मला मरण येईल; आणि अतिशय दु:खी म्हातारा माणूस म्हणून तुम्ही मला कबरेत पाठवाल.”

मार्क 12

देव त्याचा पुत्र पाठवितो(A)

12 येशू त्यांना बोधकथा सांगून शिकवू लागला, “एका मनुष्याने द्राक्षाचा मळा लावला व त्याच्याभोवती कुंपण घातले. त्याने द्राक्षारसासाठी कुंड खणले, आणि टेहळणीसाठी माळा बांधला. त्याने तो शेतकऱ्यास खंडाने दिला व तो दूर प्रवासास गेला.

“हंगामाच्या योग्य वेळी शेतकऱ्याकडून द्राक्षमळ्यातील फळांचा योग्य हिस्सा मिळावा म्हणून त्याने एका नोकरास पाठविले. परंतु त्यांनी नोकरास धरले, मारले आणि रिकामे पाठवून दिले. नंतर त्याने दुसऱ्या नोकरास पाठविले. त्यानी त्याचे डोके फोडले आणि त्याला अपमानकारक रीतीने वागविले. मग धन्याने आणखी एका नोकराला पाठविले. त्यांनी त्याला जिवे मारले त्याने इतर अनेकांना पाठविले. शेतकऱ्यांनी काहींना हाणमार केली तर काहींना ठार मारले.

“धन्याजवळ पाठविण्यासाठी आता फक्त त्याचा प्रिय मुलगा उरला होता. त्याने त्याला सर्वात शेवटी पाठविले. तो म्हणाला, ‘खात्रीने ते माझ्या मुलाला मान देतील.’ तो त्याचा आवडता मुलगा होता म्हणून शेवटी त्याने त्याला त्या शेतकऱ्यांकडे पाठाविले.

“परंतु ते शेतकरी एकमेकांस म्हणाले, ‘हा तर वारस आहे. चला, आपण याला जिवे मारू म्हणजे वतन आपले होईल!’ मग त्यांनी त्याला धरले, जिवे मारले, आणि द्राक्षमऴ्याबाहेर फेकून दिले.

“तर मग द्राक्षमळ्याचा धनी काय करील? तो येईल आणि शेतकऱ्यांना जिवे मारील व द्राक्षमळा दुसऱ्यांना देईल. 10 तुम्ही हा शास्त्रलेख वाचला नाही काय?

‘जो दगड बांधणारांनी नाकारला
    तो कोनशिला झाला.
11 हे प्रभुने केले.
    आणि ते आमच्यासाठी आश्चर्य कारक आहे.’” (B)

12 मग ते येशूला अटक करण्याचा मार्ग शोधू लागले. परंतु त्यांना लोकांची भीति वाटत होती. त्याला अटक करण्याची त्यांची इच्छा होती कारण त्यांना माहीत होते की, ही बोधकथा त्याने त्यांनाच उद्देशून सांगितली होती. मग ते त्याला सोडून निघून गेले.

यहूदी पुढारी येशूला फसविण्याचा प्रयत्न करतात(C)

13 नंतर त्यांनी त्याला चुकीचे बोलताना पकडावे म्हणून काही परुशी व हेरोदी यांना. त्याच्याकडे पाठविले. 14 ते त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “गुरूजी आम्हांस माहीत आहे की, आपण प्रामाणिक आहात आणि कुणाची तमा न बाळगता आपण देवाचा मार्ग खरेपणाने शिकविता. तर मग कैसरला कर देणे योग्य आहे की नाही? आणि आम्ही तो द्यावा की न द्यावा?”

15 परंतु येशूने त्यांचा ढोंगीपणा ओळखला व त्यांना म्हणाला, “तुम्ही माझी परीक्षा का पाहता? माझ्याकडे एक नाणे (चांदीचे एक नाणे) आणा म्हणजे मी ते पाहीन.” 16 मग त्यांनी त्याच्याकडे नाणे आणले. त्याने त्यांना विचारले, “हा मुखवटा व लेख कोणाचा आहे?” ते त्याला म्हणाले, “कैसराचा.”

17 मग येशू त्यांना म्हणाला, “कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला द्या.” तेव्हा त्यांना त्याच्याविषयी फार आश्चर्य वाटले.

काही सदूकी येशूला फसविण्याचा प्रयत्न करतात(D)

18 नंतर काही सदूकी त्याच्याकडे आले, (सदूकी पुनरूत्थान नाही असे समजतात) त्यांनी त्याला विचारले, 19 “गुरुजी. मोशाने आमच्यासाठी असे लिहिले आहे की, जर कोणा मनुष्याचा भाऊ मेला व पत्नी राहिली, परंतु मूलबाळ नसले तर वंश पुढे चालावा म्हणून त्या मनुष्याने तिच्याबरोबर लग्न करावे आणि मेलेल्या भावाचा वंश वाढवावा. 20 असे कोणी सात भाऊ होते. पहिल्याने पत्नी केली व तो मूलबाळ व होता मेला. 21 दुसऱ्याने तिच्याबरोबर लग्न केले, तोही मूलबाळ न होता मेला. 22 तिसऱ्याने तसेच केले. त्या सात भावांपैकी एकालाही त्या स्त्रीपासून, मूलबाळ झाले नाही. शेवटी ती स्त्रीही मेली. 23 सातही भावांनी तिच्याबरोबर लग्न केले तर पुनरूत्थानाच्या वेळी जेव्हा लोक मेलेल्यातून उठतील तेव्हा ती कोणाची पत्नी असेल? कारण सातही जणांनी तिच्याबरोबर लग्न केले होते.”

24 येशू त्यांना म्हणाला, “खात्रीने, पवित्र शास्त्र आणि देवाचे सामर्थ तुम्हांला माहीत नाही म्हणून तुम्ही अशी चूक करीत आहात. 25 कारण जेव्हा लोक मेलेल्यातून उठतील तेव्हा ते लग्न करणार नाहीत व करून देणार नाहीत. त्याऐवजी ते स्वर्गातील देवदूताप्रमाणे असतील. 26 परंतु मेलेल्यांचा पुन्हा उठण्याविषयी तुम्ही मोशाच्या पुस्तकातील जळत्या झुडपाविषयी वाचले नाही काय? तेथे देव मोशाला म्हणाला, ‘मी अब्राहामाचा, इसहाकाचा आणि याकोबाचा देव आहे.’ [a] 27 तो मेलेल्यांचा देव नव्हे तर जिवंत लेकांचा देव आहे. तुम्ही फार चुकत आहा.”

सर्वात महत्त्वाची आज्ञा कोणती?(E)

28 त्यानंतर एका नियमशास्त्राच्या शिक्षकाने त्यांना वाद घालताना ऐकले. येशूने त्यांना किती चांगल्या प्रकारे उत्तर दिले ते पाहिले. तेव्हा त्याने विचारले, “सर्व आज्ञांत महत्त्वाची पाहिली आज्ञा कोणती?”

29 येशूने उत्तर दिले, “पहिली महत्त्वाची आज्ञा ही, ‘हे इस्त्राएला, ऐक, आपला प्रभु देव अनन्य आहे. 30 तू आपला देव जो तुझा प्रभु आहे, त्याजवर संपूर्ण अतःकरणाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण मनाने आणि संपूर्ण शक्तीने प्रीति कर.’ [b] 31 दुसरी आज्ञा ही आहे, ‘जशी आपणांवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर.’ [c] यापेक्षा दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही.”

32 तो मनुष्य उत्तरला, “देव एकच आहे, गुरूजी, आणि त्याच्याशिवाय कोणीही नाही असे आपण म्हणता ते योग्य बोललात. 33 त्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण समजुतीने, पूर्ण शक्तीने आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति करणे हे सर्व यज्ञ व अर्पणे, जी आपणास करण्याची आज्ञा दिली आहे, त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे.”

34 येशूने पाहिले की, त्या मनुष्याने शहाणपणाने उत्तर दिले आहे. तेव्हा तो त्याला म्हणाला, “तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस.” त्यांनतर त्याला प्रश्न विचारण्याचे धाडस कोणी केले नाही.

ख्रिस्त दावीदाचा पुत्र असेल काय?(F)

35 येशू मंदिरात शिकवीत असता, तो म्हणाला, “रिव्रस्त दाविदाचा पुत्र आहे असे नियमशास्त्राचे शिक्षक म्हणतात ते कसे शक्य आहे? 36 दावीद स्वतः पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन म्हणाला,

‘प्रभु देव, माझ्या प्रभुला म्हणाला,
मी तुझे वैरी तुझ्या पायाखाली घालेपर्यंत
    तू माझ्या उजवीकडे बैस.’ (G)

37 दावीद स्वतः ख्रिस्ताला ‘प्रभु’ म्हणतो तर मग ख्रिस्त दाविदाचा पुत्र कसा?” आणि मोठा लोकासमुदाय त्याचे आनंदाने ऐकत होता.

येशू नियमशास्त्राच्या बोधकांचा टीका करतो(H)

38 शिक्षण देताना तो म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांविषयी सावध असा. त्यांना लांब झगे घालून मिरवायला आणि बाजारात नमस्कार घ्यायला आवडते. 39 आणि सभास्थानातील व मेजवानीतील सर्वात महत्त्वाच्या जागांची त्यांना आवड असते. 40 ते विधवांची घरे खाऊन टाकतात आणि धार्मिकता दाखविण्यासाठी ते लांब लांब प्रार्थना करतात. या लोकांना फार कडक शिक्षा होईल.”

विधवा दान देण्याचा अर्थ दाखविते(I)

41 येशू दानपेटीच्या समोर बसला असता लोक पेटीत पैसे कसे टाकतात हे पाहत होता. आणि पुष्कळ श्रीमंत लोक भरपूर पैसे टाकीत होते. 42 नंतर एक गरीब विधवा आली. तिने तांब्याची दोन लहान नाणी टाकली, ज्याची किंमत शंभरातील एका पैशाएवढी होती.

43 येशूने आपल्या शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, की सर्वांनी त्या पेटीत जे दान टाकले त्या सर्वांपेक्षा या विधवेने अधिक टाकले आहे. 44 मी असे म्हणतो कारण त्यांच्याजवळ जे भरपूर होते त्यामधून त्यांनी काही दान दिले, परंतु ती गरीब असूनही तिच्याजवळ होते ते सर्व तिने देऊन टाकले. ती सर्व तिच्या जीवनाची उपजीविका होती.”

ईयोब 8

बिल्दद ईयोबशी बोलतो:

नंतर शूहीच्या बिल्ददने उत्तर दिले,

“तू किती वेळपर्यंत असा बोलत राहणार आहेस?
    तुझे शब्द सोसाट्याच्या वाऱ्यासारखे उडत आहेत.
देव नेहमीच न्यायी असतो.
    तो सर्वशक्तिमान देव बरोबर असलेल्या गोष्टी कधीच बदलत नाही.
तुझ्या मुलांनी देवाविरुध्द काही पाप केले
    असेल म्हणून त्यांना देवाने शिक्षा केली.
परंतु ईयोब, आता तू त्याच्या कडे लक्ष दे
    आणि त्या सर्वशक्तिमान देवाची दयेसाठी आवर्जून प्रार्थना कर.
तू जर चांगला आणि पवित्र असलास
    तर तुला मदत करण्यासाठी तो त्वरित येईल.
    तुझे कुटुंब तुला परत देईल.
नंतर तुझ्याकडे सुरुवातीला होते
    त्यापेक्षा किती तरी अधिक असेल.

“वृध्दांना त्यांचे पूर्वज
    काय काय शिकले ते विचार.
आपण अगदी कालच जन्माला आलो आहोत असे आपल्याला वाटते.
    सर्व जाणून घेण्याच्या दृष्टीने आपण खूप लहान आहोत.
छायेप्रमाणे आपले पृथ्वीतलावरचे दिवस खूप कमी आहेत.
10 तुला कदाचित् वृध्द् शिकवू शकतील.
    ते जे शिकले तेच तुलाही शिकवतील.”

11 बिल्दद म्हणाला: “लव्हाळी वाळवटांत उंच वाढू शकतात का?
    गवत (बोरु) पाण्याशिवाय उगवू शकेल का?
12 नाही, पाणी जेव्हा आटून जाते, तेव्हा तेही सुकून जातात.
    आणि कापून त्यांचा उपयोग ही करुन घेता येत नाही कारण ते खूपच लहान असतात.
13 जे लोक देवाला विसरतात ते या गवतासारखे असतात.
    जो देवाला विसरतो त्याला आशा नसते.
14 माथा टेकवण्यासाठी त्याच्या जवळ कुठेही जागा नसते.
    त्याची सुरक्षितता कोळ्याच्या जाळ्यासारखी असते.
15 तो जर कोळ्याच्या जाळ्यावर
    टेकला तर ते मोडेल.
त्याने त्याचा आधार घेतला तरी ते
    त्याला आधार देऊ शकणार नाही.
16 मनुष्य खूप पाणी व सूर्यप्रकाश मिळालेल्या वनस्पतीसारखा आहे.
    तिच्या फांद्या सर्व बागेत पसरतात.
17 तिची मुळे खडकांभोवती आवळली जातात
    आणि खडकांवरही उगवण्याचा प्रयत्न करतात.
18 परंतु ती वनस्पती तिच्या जागेवरुन हलवली तर मरते
    आणि कुणालाही तिथे ती कधी होती हे कळत नाही.
19 परंतु ती वनस्पती आनंदी असते
    कारण तिच्याच जागी दुसरी वनस्पतीवाढत असते.
20 देव निरागस लोकांना सोडून देत नाही.
    तो वाईट माणसांना मदतही करत नाही.
21 देव तुझे तोंड हास्याने भरुन टाकेल
    आणि तुझे ओठ आनंदी चित्कारांनी!
22 पण तुझे शत्रू मात्र लज्जेची वस्त्रे घालतील
    आणि दुष्ट माणसांची घरे नष्ट होतील.”

रोमकरांस 12

आपले जीवन देवाला द्या

12 म्हणून बंधूनो, देवाच्या दयेमुळे मी तुम्हांला विनवितो की, तुमची शरीरे देवाला संतोष देणारा जिवंत यज्ञ अशी अर्पण करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आणि यापुढे या जगाच्या आदर्शाप्रमाणे आचरण करु नका, त्याऐवजी तुमच्या मनाच्या नवीनपणामुळे तुमचा बदल होऊ द्या. यासाठी की देवाची पूर्ण आणि त्याला आनंद देणारी उत्तम इच्छा काय आहे हे तुम्हांला कळावे व तिचा तुम्ही स्वीकार करावा.

मला देण्यात आलेल्या कृपादानाच्या दृष्टीने मी तुम्हांतील प्रत्येकाला सांगतो की, विचार करण्यास योग्य आहे त्या आपल्या योग्यतेपेक्षा आपणांला अधिक श्रेष्ठ मानू नका. तर देवाने सोपवून दिलेल्या परिमाणाप्रमाणे समंजस असा जो मार्ग त्या दृष्टीने विचार करा. कारण एका शरीरात आपले अनेक अवयव आहेत तरी सर्व अवयवांचे कार्य एकच नसते. त्याचप्रमाणे, आपण पुष्कळ अंग असून ख्रिस्तामध्ये एक शरीर व एकमेकांचे अवयव आहोत.

देवाने दाखविलेल्या दयेनुसार आपणांस निरनिराळी दाने आहेत, जर कोणाला देवाचा संदेश देण्याचे दान आहे तर त्याने ते आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने उपयोगात आणावे. जर कोणाला सेवेचे दान असेल तर त्याने सेवेला वाहून घ्यावे, कोणाला शिक्षणाचे दान असेल तर त्याने शिक्षणाला वाहून घ्यावे. कोणाला बोध करण्याचे दान असेल तर त्याने बोध करण्यास वाहून घ्यावे. ज्याला दानधर्म देण्याचे दान असेल त्याने ते सद्हेतूने द्यावे. ज्याला अधिकाराचे दान असेल त्याने दक्षतेने ते काम करावे ज्याला दयेचे दान असेल त्याने आनंदाने दया करावी.

तुमची प्रीति प्रामाणिक असावी. जे वाईट त्याचा द्वेष करा व बऱ्याला चिकटून राहा. 10 बंधूप्रेमाच्याबाबतीत एकमेकांशी ममतेने वागा, आदराच्या बाबतीत स्वतःपेक्षा इतरांचा बहुमान करा. 11 आस्थेविषयी आळशी होऊ नका. आत्म्यात उत्सुक असा. प्रभूची सेवा करा. 12 आपल्या घरात आनंदी राहा. संकटात सहनशील राहा. चिकाटिने प्रार्थना करा. 13 पवित्र जनांच्या गरजा भागवा. आदरातिथ्य करण्यात तत्पर असा.

14 जे तुमचा छळ करतात त्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या. शाप देऊ नका. 15 जे आनंद करतात त्यांच्याबरोबर आनंद करा. रडणाऱ्यांबररोबर रडा. 16 एकमेकांबरोबर ऐक्याने रहा, गर्व करु नका. त्याऐवजी नम्र लोकांच्या सहवासात रहा. स्वतःस शहाणे समजू नका.

17 कोणाचीही वाईटाबद्दल वाईट अशी फेड करुन नका. सर्व लोकांच्या दृष्टीने चांगले ते करण्याचा प्रयत्न करा. 18 शक्य असेल तर ते तुमच्यावर अवलंबून असल्याने सर्व लोकांबरोबर शांतीने राहा. 19 प्रिय बंधूंनो, सूड उगवू नका, देवाच्या रागाला वाट द्या. असे लिहिले आहे, “सूड घेणे माझ्याकडे आहे. मी फेड करीन असे प्रभु म्हणतो. [a]

20 “तुमचा शत्रू भुकेला असल्यास
    त्यास खावयास द्या,
तहानेला असेल तर
    प्यावयास द्या.
कारण असे केल्याने तुम्ही त्याच्या डोक्यावर निखाऱ्यांची रास कराल.” [b]

21 वाइटाने जिंकले जाऊ नका तर चांगल्याने वाइटास जिंका.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center