M’Cheyne Bible Reading Plan
फारो राजाला पडलेली स्वप्ने
41 दोन वर्षानंतर फारो राजाला स्वप्न पडलेःते असे की तो नाईल नदीच्या काठी उभा राहिला होता. 2 तेव्हा त्याने सात गाई नाईल नदीतून बाहेर येताना पाहिल्या. त्या धुष्टपुष्ट व सुंदर होत्या. त्या तेथे उभ्या राहून गवत खात होत्या. 3 त्यानंतर आणखी सात रोड व कुरुप गाई नदीतून बाहेर आल्या व त्या सात धष्टपुष्ट व सुंदर गाईच्या बाजूला उभ्या राहिल्या. 4 आणि त्या सात दुबळ्या व कुरुप गाईनी त्या सात सुंदर व धष्टपुष्ठ गाईना खाऊन टाकले. त्या नंतर फारो राजा जागा झाला.
5 मग फारो राजा पुन्हा झोपल्यावर त्याला दुसऱ्यांदा स्वप्न पडले; त्यात त्याने पाहिले की एकाच ताटाला सात भरदार कणसे आली. 6 त्या नंतर त्या ताटाला सात खुरटलेली व करपलेली अशी सात कणसे आली. 7 नंतर त्या सात खुरटलेल्या व करपलेल्या कणसांनी ती सात चांगली व टपोऱ्या दाण्यांची भरदार कणसे गिळून टाकली; तेव्हा फारो पुन्हा जागा झाला आणि ते तर स्वप्न असल्याचे त्याला समजले. 8 दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर फारो राजा त्या स्वप्नामुळे चिंतेत पडून बेचैन झाला व त्याने पंडितांना बोलावले; फारोने आपली स्वप्ने त्यांना सांगितली; परंतु त्यांतील कोणालाच त्या स्वप्नांच अर्थ सांगता आला नाही किंवा त्याचा उलगडा करता आला नाही.
प्यालेबरदार योसेफाविषयी फारोला सांगतो
9 तेव्हा प्यालेबरदाराला योसेफाची आठवण आली. तो फारोस म्हणाला, “माझ्या बाबतीत जे घडले त्याची मला आठवण येत आहे; 10 आपण माझ्यावर व आचाऱ्यावर संतापला होता आणि आपण आम्हांस तुरुंगात टाकले होते. 11 तेव्हा तुरुंगात असताना एकाच रात्री आम्हा दोघांना स्वप्ने पडली. प्रत्येक स्वप्नाचा अर्थ वेगळा होता. 12 तेथे कोणी इब्री तरुण आमच्या बरोबर कैदेत होता. तो गारदद्यांच्या सरदाराचा दास होता. त्याला आम्ही आमची स्वप्ने सांगितली त्याने त्यांचे स्पष्टीकरण केले आणि त्याने आमच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला व उलगडा केला. 13 आणि त्याने सांगितलेला अर्थ खरा ठरला. तो म्हणाला की माझी सुटका होईल व मला पूर्वीप्रमाणे माझ्या कामावर पुन्हा घेतले जाईल आणि अगदी त्याप्रमाणे खरेच घडून आले; आणि तो म्हणाला की आचारी मरेल आणि त्याप्रमाणे तेही खरे झाले.”
योसेफाला स्वप्नांचा अर्थ सांगणयास बोलावले जाते
14 मग फारोने योसेफाला तुरुंगातून आणण्यास बोलावणे पाठवले. तेव्हा गारद्यांनी योसेफाल ताबडतोब तुरुंगातून बाहेर आणले. योसेफ दाढी करुन व स्वच्छ कपडे बदलून फारोपुढे येऊन उभा राहिला. 15 मग फारो योसेफास म्हणाला, “मला स्वप्न पडले आहे, परंतु त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही. मी तुझ्याविषयी ऐकले की जो कोणी तुला स्वप्न सांगतो तेव्हा तू लगेच स्वप्नांचा अर्थ सांगतोस.”
16 योसेफ म्हणाला, “मी माझ्या कौशल्याने किंवा हुशारीने स्वप्नांचा अर्थ सांगतो असे नाही, तर केवळ देवालाच हे सामर्थ्थ आहे आणि तो देवच फारोच्या स्वप्नांचा अर्थ सांगेल.”
17 मग फारो योसेफला म्हणाला, “स्वप्नामध्ये मी नाईल नदीच्या काठी उभा होतो. 18 तेव्हा नदीतून सात धष्टपुष्ट व सुंदर गाई बाहेर आल्या व गवत खाऊ लागल्या असे मी पाहिले. 19 त्यानंतर सात रोड व कुरुप गाई नदीतून बाहेर येताना मी पाहिल्या. त्यांच्या सारख्या दुबळ्या व कुरुप गाई मी सबंध मिसर देशात कधीच पाहिल्या नव्हत्या. 20 त्या रोड व कुरुप गाईनी आधीच्या धष्टपुष्ट व सुंदर गाई गिळून टाकल्या. 21 तरीही त्या रोड व कुरुपच राहिल्या, त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांनी त्या सात गाई गिळून टाकल्या असे वाटत नव्हते; त्या पूर्वी इतक्याच अशक्त व रोड दिसत होत्या मग मी जागा झालो.
22 “त्यानंतर दुसऱ्या स्वप्नात एकाच ताटाला सात चांगली भरदार व टपोऱ्या दाण्यांची भरगच्च कणसे आली, 23 मग त्यांच्या मागून त्या ताटाला आणखी दुसरी करपटलेली, कुरुप व गरम वाऱ्याच्या झळयामुळे करपलेली सात कणसे आली. 24 व त्यांनी ती चांगली सात कणसे गिळून टाकली.
“ही माझी स्वप्ने मी माझ्या जादुगारांना, ज्योतिष्यांना व पंडितांना सांगितली; परंतु त्यांचा अर्थ कोणालाही सांगता आला नाही; तेव्हा त्यांचा अर्थ काय आहे?”
योसेफ स्वप्नांचा अर्थ सांगतो
25 मग योसेफ फारोला म्हणाला, “महाराज, ह्या दोन्हीही स्वप्नांचा अर्थ एकसारखाच आहे; लवकरच काय होणार आहे हे देव आपणास सांगत आहे; 26 त्या सात चांगल्या गाई आणि ती सात चांगली कणसे म्हणजे सात चांगली वर्षे. दोन्हीही स्वप्ने सारखीच आहेत; 27 त्या दुसऱ्या सात रोड गाई व ती सात रोड कणसे म्हणजे अवघ्या देशावर येणाऱ्या दुष्काळाची सात वर्षे. ती सात वर्षे चांगल्या सात वर्षानंतर येतील. 28 लवकरच काय घडणार आहे हे देवाने आपणास दाखवले आहे. मी संगितल्याप्रमाणेच हे घडून येईल. 29 सात वर्षांच्या सुबत्तेच्या काळात चांगले व भरपूर पीक येईल व मिसर देशभर भरपूर खावयास असेल. 30 परंतु सुकाळाच्या सात वर्षांनंतर सर्व देशभर दुष्काळाची अशी सात वर्षे येतील की त्यामुळे मिसर देशभर पिकलेले धान्य विसरले जाईल; आणि हा दुष्काळ देशाचा नाश करील. 31 आणि भरपूर धान्य असतानाचे दिवस कसे होते याचा लोकांना विसर पडेल.
32 “तेव्हा फारो महाराज, एकाच गोष्टीविषयी आपणाला दोन स्वप्ने पडली ते यासाठी की देव हे सर्व लवकरच व नक्की घडवून आणील, हे आपणास दाखवावे. 33 तेव्हा, फारो महाराज, आपण एखाद्या चतुर व शहाण्या पुरुषाची निवड करुन त्याला सर्व मिसर देशावर प्रशासक म्हणून नेमावे; 34 त्या नंतर शेतकऱ्याकडून धान्य गोळा करण्यासाठी इतर अधिकारी निवडावेत; येत्या सात वर्षांच्या सुकाळात प्रत्येकाने आपल्या धान्याच्या उत्पन्नाचा पांचवा हिस्सा सरकारला द्यावा. 35 अशा रीतीने ही माणसे सुकाळाच्या सात वर्षात पुष्कळ अन्न गोळा करतील आणि गरज पडेपर्यंत नगरात साठवून ठेवतील अशा प्रकारे, फारो, हे अन्न तुझ्या नियंत्रणात राहील. 36 येणाऱ्या दुष्काळातील सात वर्षांच्या काळात त्या धान्याचा उपयोग होईल. तेव्हा मग दुष्काळाच्या सात वर्षात मिसराचा नाश होणार नाही.”
37 फारो राजाला ही कल्पना फार चांगली वाटली व पटली; तसेच त्याच्या सर्व सेवकांनी एकमताने तिला संमती दिली. 38 फारोने म्हटले, “योसेफापेक्षा अधिक चांगला व योग्य, दुसरा कोणी पुरुष सापडेल काय? देवाचा आत्मा त्याच्यात असल्यामुळे त्याला शहाणपण येते!”
39 तेव्हा फारो योसेफास म्हणाला, “देवाने तुला या सर्व गोष्टी दाखवल्या आहेत, म्हणून तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही. 40 म्हणून मी तुला या देशाचा (मिसरचा) अधिपती म्हणजे सर्वात उच्च अधिकारी म्हणून नेमतो. सर्व लोक तुझ्या सर्व आज्ञा पाळितील; या देशात केवळ राजासना पुरता म्हणजे नामधारी राजा म्हणून काय तो मी एक तुझ्यापेक्षा मोठा असेन.”
41 मग फारो योसेफास म्हणाला, “मी तुला आता अवघ्या मिसर देशाचा प्रशासक म्हणून नेमितो.” 42 मग फारोने राजमुद्रा असलेली आपल्या बोटातील अंगठी योसेफाच्या बोटात घातली; तलम तागाच्या वस्त्राचा पोशाख त्याला घातला आणि त्याच्या गाळ्यात एक सोन्याची साखळी घातली. 43 नंतर फारोने योसेफाला संचलनातील दुसऱ्या रथात बसण्यास सांगितले; खास नेमलेले गारदी पुढे चालले होते; ते ललकारून जाहीरपणे सांगत होते, “लोक हो! आपल्या देशाच्या प्रशासक योसेफ, याला लवून मुजरा करा.” अशी रीतीने योसेफाला मिसर देशाचा प्रशासक (प्रमुख अधिकारी) नेमले.
44 फारो योसेफाला म्हणाला, “मी मिसराचा राजा आहे खरा, परंतु तुझ्या हुकुमाशिवाय कोणी आपला हात किंवा पाय हलवू शकणार नाहीं.” 45 फारोने योसेफाला सापनाथ-पानेह असे दुसरे नाव दिले. फारोने ओन शहराचा याजक पेटीफरा याची मुलगी आसनथ ही योसेफाला बायको करुन दिली. अशा रीतीने योसेफ सर्व मिसर देशावर प्रशासक झाला.
46 योसेफ मिसर देशाचा राजा फारो याची सेवा करु लागला तेव्हा तो अवघा तीस वर्षांचा होता; योसेफाने मिसर देशभर दौरा करुन देशाची पाहणी केली. 47 सुकाळाच्या सात वर्षात सर्व देशभर भरपूर पीक आले. 48 योसेफाने सुकाळाच्या सात वर्षात अन्न गोळा करुन त्या त्या शेतातले धान्य जवळच्याच नगरोनगरी साठवून ठेवले. 49 योसेफाने जणू काय समुद्राच्या वाळू इतके धान्य गोळा करुन साठवून ठेवले; ते इतके होते की त्याचे मोजमाप करता येत नव्हते.
50 योसेफाची बायको ही ओन नगराचा याजक पोटीफरा याची मुलगी होती. दुष्काळाच्या सात वर्षांपैकी पहिले वर्ष येण्याअगोदर योसेफ व आसनथ यांना दोन मुलगे झाले. 51 पहिल्या मुलाचे नाव मनश्शे होते; योसेफाने त्याला हे नांव दिले कारण तो म्हणाला, “देवाने मला झालेला त्रास व माझ्यावर झालेला अन्याय, तसेच माझ्या घराकडील सर्व काही यांचा मला विसर पडू दिला.” 52 योसेफाने दुसऱ्या मुलाचे नाव एफ्राईम असे ठेवले कारण तो म्हणाला, “माझ्यावर संकटे आली परंतु देवाने मला सर्व बाबतीत सफल केले.”
दुष्काळ पडण्यास सुरवात होते
53 सात वर्षापर्यंत मिसरमध्ये भरपूर अन्न होते पण ती वर्षे संपली. 54 परंतु सात वर्षानंतर अगदी योसेफाने सांगितल्याप्रमाणे दुष्काळ पडण्यास सुरुवात झाली; तेव्हा कोणत्याच देशात कोठेही कसलेच पीक आले नाही; आणि लोकांना खावयास धान्य मिळेना; परंतु मिसरमध्ये मात्र योसेफाने धान्य साठवल्यामुळे लोकांपाशी खावयास भरपूर अन्न होते. 55 दुष्काळ पडण्यास सुरुवात झाली, तेव्हा लोकांनी धान्यासाठी फारोकडे ओरड केली; तेव्हा फारो मिसरच्या लोकांना म्हणाला, “योसेफाला विचारा व तो सांगेल ते करा.”
56 तेव्हा चोहीकडे दुष्काळ पडल्यावर योसेफाने मिसरच्या लोकांना धान्य भांडारातून धान्य विकत दिले. मिसरमध्ये फार वाईट प्रकारचा दुष्काळ पडला होत. 57 मिसरच्या सभोवतालच्या देशातून लोक धान्य विकत घेण्यासाठी योसेफाकडे येऊ लागले कारण त्यावेळी जगाच्या त्या भागात दुष्काळ पडला होता.
येशू यरूशलेमेत राजासारखा प्रवेश करतो(A)
11 जेव्हा ते यरूशलेमजवळ जैतुनाच्या डोंगराजवळ बेथानी गावाजवळ आले तेव्हा येशूने आपल्या दोन शिष्यास असे सांगून पाठविले की, 2 “तुम्ही जे गाव पुढे दिसते त्या गावात जा. गावात जाताच, ज्याच्यावर कोणी बसले नाही असे शिंगरू बांधलेले आढळेल. ते सोडा व येथे आणा. 3 आणि जर कोणी तुम्हांला विचारले, ‘तुम्ही हे का नेत आहात?’ तर तुम्ही असे म्हणा, ‘प्रभूला याची गरज आहे.’ व तो ते लगेच परत तेथे पाठवील.”
4 मग ते गेले आणि त्यांना रस्त्यावर, दाराजवळ एक शिंगरू बांधलेले दिसले. मग त्यांनी ते सोडले. 5 तेथे उभे असलेल्या लोकांपैकी काही जण त्यांना म्हणाले, “हे शिंगरू सोडुन तुम्ही काय करीत आहात?” 6 त्यांनी येशू त्यांना काय म्हणाला ते सांगितले. तेव्हा त्या लोकांनी त्यास ते शिंगरू नेऊ दिले.
7 त्यांनी ते शिंगरू येशूकडे आणले. त्यांनी आपली वस्त्रे त्याच्यावर पांघरली व येशू त्यावर बसला. 8 पुष्कळ लोकांनी आपले झगे रस्त्यावर पसरले आणि इतरांनी शेतातून तोडलेल्या डहाळ्या पसरल्या. 9 पुढे चालणारे व मागून येणारे घोषणा देऊ लागले,
“‘होसान्ना’,
‘प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो!’ (B)
10 “आमचा पूर्वज दावीद याचे
येणारे राज्य धन्यवादित असो!
स्वर्गात होसान्ना!”
11 नंतर येशूने यरूशलेमात प्रवेश केल्यावर तो मंदिरात गेला व सभोवतालचे सर्व पाहिले. त्या सुमारास संध्याकाळ झाली होती म्हणून तो बेथानीस गेला व शिष्यांना आपल्याबरोबर नेले.
येशू म्हणाला अंजिराचा झाड़ मरेल(C)
12 दुसऱ्या दिवशी ते बेथानी सोडून जात असताना येशूला भूक लागली. 13 त्याने दूर असलेल्या व पानांनी भरलेल्या अंजिराच्या झाडाकडे पाहिले. त्यावर काही मिळेल या आशेने तो पाहावयास गेला पण तेथे त्याला पानाशिवाय काही आढळले नाही. कारण तो अंजिराचा हंगाम नव्हता. 14 नंतर तो त्याला म्हणाला, “यापूढे तुझे फळ कोणीही कधीही खाणार नाही.” त्याच्या शिष्यांनी हे ऐकले.
येशू मंदिरात जातो(D)
15 नंतर ते येरूशलेमेत गेले आणि येशू मंदिरात गेला तेव्हा मंदिरात जे खरेदी विक्रीचा व्यवहार करीत होते त्यांना येशू बाहेर घालवू लागला. त्याने सराफांचे चौरंग व जे कबुतरे विकत होते त्यांची बाके उलथून टाकली. 16 येशूने मंदिरातून कोणालाही काहीही बाहेर नेऊ दिले नाही. 17 मग येशू शिकवू लागला. तो त्यांना म्हणाला, “माझ्या घराला सर्व राष्ट्रांचे प्रार्थनामंदिर म्हणतील, असे पवित्र शास्त्रात लिहिले नाही काय? परंतु तुम्ही त्याला चोरांची गुहा बनविली आहे.” [a]
18 मुख्य याजकांनी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनी हे ऐकले आणि ते त्याला ठार मारण्याचा मार्ग शोधू लागले. कारण सर्व लोक त्याच्या शिक्षणाने थक्क झाल्याने ते त्याला भीत होते. 19 त्या रात्री येशू व त्याचे शिष्य शहराबाहेर गेले.
येशू विश्वासाचे सामर्थ्य दाखवितो(E)
20 सकाळी येशू आणि त्याचे शिष्य जात असता त्यांनी ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले पाहिले. 21 पेत्राला आठवण झाली. तो येशूला म्हणाला, “गुरूजी, पाहा! ज्या अंजिराच्या झाडाला आपण शाप दिला ते वाळून गेले आहे.”
22 येशूने उत्तर दिले, “देवावर विश्वास ठेवा. 23 मी तुम्हांस खरे सांगतो की, जो कोणी या डोंगराला ‘उपटून समुद्रात टाकाला जा’ असे म्हणेल व तो आपल्या मनात शंका न धरता, त्याच्या शब्दाप्रमाणे घडेल असा विश्वास धरील तर त्याच्यासाठी तसेच घडेल. 24 या कारणास्तव मी तुम्हांस सांगतो जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल ते मिळालेच आहे असा विश्वास धरा आणि ते तुम्हांला मिळेल. 25 जेव्हा तुम्ही प्रार्थना करीत उभे राहता तेव्हा तुमच्या मनात जर कोणाच्या विरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा यासाठी की, तुमच्या स्वर्गातील पित्याने तुमच्या पापांची क्षमा करावी. 26 परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.”
यहूदी पुढारी येशूच्या अधिकाराविषयी संशय घेतात(F)
27 ते परत यरूशलेमेस आले. आणि येशू मंदिरात फिरत असता मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडील त्याच्याकडे आले. 28 आणि त्याला म्हणाले, “आपण कोणात्या अधिकाराने या गोष्टी करता? त्या करण्याचा अधिकार आपणांस कोणी दिला?”
29 येशू त्यांना म्हणाला, “मीही तुम्हांला एक प्रश्न विचारतो आणि जर तुम्ही मला त्याचे उत्तर दिले तर मी या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो हे तुम्हांस सांगेन. 30 योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गातून होता की मनुष्यांपासून होता? याचे उत्तर द्या.”
31 त्याविषयी त्यांनी आपसात चर्चा केली आणि म्हणू लागले जर आपण तो स्वर्गापासून म्हणावे तर तो म्हणेल, “मग त्यावर तुम्ही विश्वास का ठेवला नाही? 32 परंतु जर आपण तो मनुष्यांपासून आहे असे म्हणावे तर लोक आपणावर रागावातील.” पुढाऱ्यांना लोकांची भीति वाटत होती. कारण सर्व लोकांचा विश्वास होता की योहान खरोखर संदेष्टा होता.
33 मग त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हांला माहीत नाही.”
तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मग मीही या गोष्टी कोणात्या अधिकाराने करीत आहे हे तुम्हांला सांगत नाही.”
7 ईयोब म्हणाला, “मनुष्याला पृथ्वीवर खूप धडपड करावी लागते.
त्याचे आयुष्य मजुराच्या आयुष्यासारखे असते.
2 गुलामाप्रमाणे माणसालाही उन्हातान्हात काम केल्यानंतर थंडगार सावलीची गरज भासते.
माणूस काम केल्यानंतर पगाराच्या दिवसाची वाट बघणाऱ्या मजुराप्रमाणे आहे.
3 महिन्या मागून महिने निराशेत निघून गेले.
माझ्या वाट्याला रात्रीमागून रात्र कष्टाचीच आली.
4 मी झोपी जाण्याच्या वेळी विचार करतो
उठण्यासाठी किती वेळ आहे याचा
आणि रात्र संपतच नाही.
सूर्य उगवेपर्यंत मी या कुशीवरुन त्या कुशीवर तळमळत असतो.
5 माझे शरीर किड्यांनी आणि घाणींनी भरलेले आहे.
माझी कातडी सोलवटलेली आणि वाहत्या जखमांनी भरलेली आहे.
6 “माझे दिवस विणकऱ्याच्या मागापेक्षा भरभर जातात
आणि माझे आयुष्य आशेशिवाय संपते.
7 देवा, माझे आयुष्य म्हणजे केवळ श्र्वास आहे हे आठव.
मी पुन्हा कधीही काही चांगले पाहणार नाही.
8 आणि तुम्ही मला पुन्हा कधीही पाहणार नाही.
तुम्ही मला शोधाल तेव्हा मी गेलेला असेन.
9 ढग दिसेनासा होतो आणि निघून जातो.
त्याचप्रमाणे माणूस मरतो आणि थडग्यात पुरला जातो.
तो पुन्हा कधीही परत येत नाही.
10 तो त्याच्या जुन्या घरात कधीही परत येणार नाही.
त्याचे घर त्याला ओळखणार नाही.
11 “तेव्हा मी गप्प बसणार नाही. मी बोलेन.
माझ्या आत्म्याला क्लेश होत आहेत.
माझा आत्मा अगदी कडू जहर झाला आहे म्हणून मी तक्रार करीन.
12 देवा, तू माझ्यावर पाहारा का करीत आहेस?
मी समुद्र आहे की त्यातला अक्राळ विक्राळ प्राणी?
13 माझे अंथरुणच मला स्वस्थता देऊ शकेल.
माझा बिछानाच मला विश्रांती आणि स्वास्थ्य देईल.
14 पण देवा, मी जेव्हा स्वस्थ पडतो तेव्हा तू मला भयानक स्वप्नांनी घाबरवतोस.
आणि तुझ्या दृष्टांतांनी मला भय वाटते.
15 म्हणून जगण्यापेक्षा गुदमरुन
मरणे मी पसंत करतो.
16 मी माझ्या जीवनाचा तिरस्कार करतो.
मी आशा सोडून दिली आहे.
मला जगण्याची आसक्ती नाही.
मला एकटा सोडून दे, माझ्या जीवनाला काही अर्थ नाही.
17 देवा, माणूस तुला इतका महत्वाचा वाटतो?
तू त्याला इतका आदर का दाखवावास?
तू त्याची दखल तरी का घेतोस?
18 तू त्याला रोज सकाळी का भेटतोस?
आणि क्षणाक्षणाला त्याची परीक्षा का घेतोस?
19 देवा, तू एक क्षणभरही माझ्यावरची तुझी नजर वळवीत नाहीस.
तू मला एक क्षणही एकटा सोडीत नाहीस.
20 देवा, तू लोकांवर नजर ठेवतोस.
मी पाप केले असले तरी मी आता काय करु शकतो?
तू मला तुझे लक्ष्य का बनवत आहेस?
मी तुझ्यासाठी एक समस्या बनलो आहे का?
21 तू मला माझ्या पापाबद्दल क्षमा का करुन टाकीत नाहीस?
मी लवकरच मरेन आणि माझ्या थडग्यात जाईन.
तू नंतर माझा शोध घेशील
पण मी गेलेला असेन.”
देव त्याच्या लोकांना विसरला नाही
11 तर मग मी म्हणतो, “देवाने आपल्या लोकांना सोडून दिले आहे काय?” खात्रीने नाही! कारण मीही इस्राएली आहे. अब्राहामापासूनचा, बन्यामिन वंशातला. 2 देवाला ज्यांचे पूर्वज्ञान होते त्या इस्राएली लोकांना त्याने सोडून दिले नाही. एलियासंबंधी पवित्र शास्त्र काय म्हणते ते तुम्हांस ठाऊक नाही काय? तो देवाजवळ इस्राएल लोकांविरुद्ध अशी विनंति करतो की, 3 “हे प्रभु, त्यांनी तुझ्या भविष्यवाद्यांना ठार मारले आहे. त्यांनी तुझ्या वेद्या पाडून टाकल्या आहेत, तुझ्या संदेष्ट्यां पैकी मीच एकटा राहिलो आहे. आणि ते माझाही जीव घ्यावयास पाहतात.q 4 परंतु त्याला देवाचे काय उत्तर मिळाले? देव म्हणतो. “ज्यांनी बालापुढे गुडघे टेकले नाहीत अशी सात हजार माणसे मी आपणासाठी राखून ठेवली आहेत.”r
5 त्याच प्रमाणे हल्ली देवाच्या कृपेच्या निवडीप्रमाणे काही शिल्लक राहिले आहेत. 6 आणि जर तो देवाच्या कृपेचा परिणाम असेल तर तो लोकांच्या कर्माचा नाही. तर देवाची कृपा ही कृपाच राहत नाही.
7 तर मग काय? इस्राएल लोक जे मिळविण्याचा प्रयत्न करीत होते ते त्यांना मिळाले नाही. परंतु जे निवडलेले त्यांना मिळाले आणि बाकीचे कठीण झाले. 8 पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे:
“देवाने त्यांना बधीरपणाचा आत्मा,” (A)
“पाहू न शकणारे डोळे ऐकू
न शकणारे कान दिले
आणि आजपर्यंत हे असे चालूच आहे.” (B)
9 दाविद म्हणतो,
“त्यांचे मेज त्यांस सापळा आणि फास होवो.
त्यांचे पतन होवो आणि त्यांना अपराधाबद्दल शिक्षा व प्रायश्चित मिळो.
10 दिसू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होवोत.
आणि त्यांच्या कष्टाच्या ओझ्याखाली तू सर्वकाळ त्यांच्या पाठी वाकीव.” (C)
11 म्हणून मी असे म्हणतो, यहूद्यांचा नाश व्हावा म्हणून ते अडखळले नाहीत काय? खात्रीने नाही! त्यांच्या चुकीमुळे विदेशी लोकांना तारण प्राप्त व्हावे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये ईर्षा उत्पन्र व्हवी म्हणून असे झाले. 12 परंतु त्यांनी केलेल्या चुकीचा अर्थ जगास विपुलता आणि आमचा बोध उपदेश न ऐकल्याने त्यांच्या संख्येत झालेला न्हास याचा अर्थ यहूदीतरास विपुलता तर आमचा बोध स्वीकारल्याने त्यांचा समावेश झाल्यास किती तरी अधिक विपुलता येईल.
13 तर तुम्ही जे यहूदी नाही त्यांना मी निश्चितपणे सांगतो कारण मी यहूदीतरांसाठी प्रेषित आहे. मी माझ्या सेवेला मान देतो. 14 या आशेने की, माझ्या हाडामांसातल्यांना ईष्योवान करुन त्यांच्यातील काही जणांचे तारण करावे. 15 जर देवाने त्यांच्या केलेल्या अव्हेराचा परिणाम जगासाठी समेट झाला. तर देवाकडून स्वीकार याचा अर्थ मेलेल्यांतून जिवंत होणे, नाही का? 16 जर प्रथम भाग पवित्र आहे, तर संपूर्ण पिठाचा गोळा पवित्र आहे. जर झाडाचे मूळ पवित्र आहे तर फांद्यासुद्धा पवित्र आहेत.
17 परंतु काही डहाळ्या तोडून टाकण्यात आल्या आणि तुम्ही रानटी जैतून असता कलम करुन लावले गेलात व जैतूनाच्या पौष्टिक मुळाचे भागीदार झालात. 18 तर तुम्ही त्या तोडलेल्या फांद्यांहून मोठे आहात अशी बढाई मारु नका. लक्षात ठेवा, तुम्ही मुळाला आधार देत नाही, तर मूळ तुमचे पोषण करते. 19 आता तुम्ही म्हणाल, “होय, आमचे कलम व्हावे यासाठीच फांद्या तोडल्या होत्या.” 20 त्या त्यांच्या अविश्वासामुळे तोडून टाकण्यात आल्या हे खरे आहे परंतु तुम्ही तुमच्या विश्वासामुळे स्थिर आहात. यास्तव अभिमान बाळगू नका. तर भीति बाळगा. 21 कारण देवाने जर मूळ फांद्याही राखल्या नाहीत तर तो तुम्हांलाही राखणार नाही.
22 अशा प्रकारे तुम्ही देवाचा दयाळूपणा आणि कठोरताही पाहा. जे पतन पावले आहेत त्यांच्याविषयी कठोरता परंतु देवाचा तुमच्याविषयीचा दयाळूपणा, जर तुम्ही त्याच्या दयेत राहिला नाहीत तर तुम्हांला झाडापासून छाटून टाकले जाईल. 23 आणि इस्राएल त्याच्या अविश्वासात राहीले नाही तर तेही कलम पुन्हा लावण्यात येईल. कारण देव त्यांना कलम म्हणून लावण्यास समर्थ आहे. 24 म्हणून तुम्ही जे निसर्गत; रानटी जैतुनांची फांदी म्हणून तोडले गेलात आणि निसर्गक्रम सोडून मशागत केलेल्या जैतुनाच्या झाडास कलम असे लावले गेलात तर किती सहजपणे मशागत केलेल्या जैतुनांच्या फांद्या त्या मूळच्या झाडात कलम केल्या जातील!
25 परंतु बंधूनो, तुम्ही आपल्या शहाणपणावर अवलंबून या रहस्याविषयी अजाण असावे असे मला वाटत नाही. इस्राएली लोकांत अंशतः कठीणपणा आला आहे आणि तो देवाच्या कुटुंबात विदेशी लोकांचा भरणा पूर्ण होईपर्यंत राहणार आहे. 26 आणि नंतर इस्राएलाचे राष्ट्र म्हणून तारण होईल, असे लिहीले आहे,
“मुक्त करणारा सीयोनातून येईल,
तो याकोबाच्या घराण्यातून त्यांची सर्व अभक्ती दूर करील.
27 जेव्हा मी त्यांच्या पातकांची क्षमा करीन.
तेव्हा त्यांच्याशी मी हा करार करीन.” (D)
28 जेथ पर्यंत सुवार्तेचा संबंध आहे ते तुमच्यामुळे शत्रू आहेत परंतु देवाच्या निवडीमुळे त्याने पूर्वजांना दिलेल्या वचनाप्रमाणे देव त्यांच्यावर प्रेम करतो. 29 कारण देवाने ज्यांना बोलाविले आहे आणि तो जे देतो त्याच्याविषयी कधीही आपले मत बदलत नाही. 30 कारण जसे तुम्ही पूर्वी देवाची आज्ञा पाळत नव्हता, परंतु आता तुम्हांला त्यांच्या आज्ञाभंगामुळे देवाची दया मिळाली आहे. 31 त्याचप्रमाणे तेही आता आज्ञा मोडणारे झाले आहेत, यासाठी की त्यांना आता देवाची कृपा मिळावी. 32 कारण देवाने सर्व लोकांना आज्ञाभंगाच्या तरुंगात कोंडले आहे, यासाठी की, त्याने त्यांच्यावर दया करावी.
देवाचे गौरव
33 देवाच्या बूद्धीची आणि ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे. त्याच्या निर्णय आणि त्याच्या मार्गाचा माग काढणे कठीण आहे. 34 पवित्र शास्त्र सांगते.
“प्रभूचे मन कोणाला माहीत आहे
किंवा त्याचा सल्लागार कोण असेल?” (E)
35 “प्रथम कोणी काही त्याला दिले
का यासाठी की त्याची परतफेड देवाने करावी?” (F)
36 कारण सर्व गोष्टी त्याने निर्माण केल्या आणि त्याच्या द्वारे अस्तित्वात आहेत. त्याला युगानुयुग गौरव असो, आमेन.
2006 by World Bible Translation Center