Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
उत्पत्ति 40

योसेफ दोन स्वप्नांचा अर्थ सांगतो

40 काही दिवसानंतर फारोच्या नोकराकडून काही अपराध घडला. हे नोकर म्हणजे एक आचारी व दुसरा प्यालेबरदार हे होते. म्हणून फारो राजा त्यांच्यावर रागावला. तेव्हा फारोने त्यांना योसेफ ज्या तुरुंगात होता त्यातच डांबून टाकले. फारोच्या गारदयाचा सरदार पोटीफर हा त्या तुरुंगाचा मुख्य अधिकारी होता. त्या सरदाराने त्या दोघाही अपराध्यांना योसेफाच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. ते दोघे काही काळपर्यंत तुरुंगात अटकेत राहिले. एके रात्री त्या दोघांही अपराध्यांना एकेक स्वप्न पडले, आणि प्रत्येकाच्या स्वप्नाचा विशेष अर्थ होता. दुसऱ्या दिवशी सकाळी योसेफ त्यांच्याकडे गेला तेव्हा ते त्याला दु:खी व चिंतेत असलेले दिसले. तेव्हा योसेफाने त्यांना विचारले, “तुम्ही आज एवढे काळजीत का दिसता?”

त्या दोघांनी उत्तर दिले, “आम्हा दोघांना रात्री एक एक स्वप्न पडले; परंतु त्यांचा अर्थ आम्हाला समजत नाही; त्यांचा अर्थ सांगणारा किंवा उलगडा करणारा कोणी नाही.”

योसेफ त्यांना म्हणाला, “एकच म्हणजे केवळ देवच स्वप्नांचा अर्थ सांगू शकतो किंवा उलगडा करु शकतो; म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मला तुमची स्वप्ने सांगा.”

प्यालेबरदाराचे स्वप्न

तेव्हा प्यालेबरदाराने योसेफाला आपले स्वप्न सांगितले. तो म्हणाला, “मी माझ्या स्वप्नात एक द्राक्षवेल पाहिला. 10 त्याला तीन फाटे होते. त्या फाटयांना फुले आली व नंतर त्यातून द्राक्षे तयार झाली असे मी पाहिले. 11 मी फारो राजाचा मद्याचा प्याला धरुन उभा होतो; तेव्हा मी ती द्राक्षे घेऊन त्या प्यालात पिळली; आणि मग द्राक्षारसाचा तो प्याला मी फारोच्या हातात दिला.”

12 नंतर योसेफ म्हणाला, “ह्या तुझ्या स्वप्नाचा अर्थ मी तुला उलगडून सांगतो; ते तीन फाटे म्हणजे तीन दिवस. 13 हे तीन दिवस संपण्यापूर्वी फारो राजा तुझ्या अपराधाची तुला क्षमा करील व तुला पुन्हा तुझ्या पूर्वीच्या कामावर परत घेईल. तू आतापर्यंत फारोचे जे काम करीत होतास तेच काम तू करशील. 14 परंतु तुला तुरुंगातून सोडल्यावर माझी आठवण कर, व माझ्यावर कृपा करुन मला मदत कर. माझ्या संबंधी फारोला सांग म्हणजे मग मी ह्या तुरुंगातून सुटेन. 15 मला माझ्या घरातून व माझ्या मायदेशातून म्हणजे माझ्या इब्री लोकांच्या देशातून येथे बळजबरीने आणले गेले; वास्तविक मला येथे तुरुंगात अटकेत राहाण्याची शिक्षा मिळावी असा मी कोणाचा काहीच अपराध केला नाही.”

आचाऱ्याला पडलेले स्वप्न

16 आचाऱ्याने पाहिले की दुसऱ्या बंदीवान सेवकाचे स्वप्न चांगले आहे; म्हणून तो योसेफाला म्हणाला, “मला ही एक स्वप्न पडले, ते असे; माझ्या डोक्यावर रोट्यांच्या तीन टोपल्या होत्या. 17 सगळ्यात वरच्या टोपलीत फारो राजासाठी सर्व प्रकारची पक्वाने होती; परंतु त्या पक्वान्नातील पदार्थ पक्षी खात होते.”

18 योसेफाने उत्तर दिले, “तुझ्या स्वप्नाचा अर्थ मी उलडून सांगतो त्या तीन टोपल्या म्हणजे तीन दिवस. 19 तीन दिवस संपण्याच्या आत फारो राजा तुला या बंदीवासातून सोडवील आणि तुझे शीर उडवून टाकील व तुझे धड झाडाला टांगील; आणि पक्षी तुझ्या धडाचे मांस तोडून खातील.”

योसेफाचा विसर पडतो

20 तीन दिवसानंतर फारो राजाचा वाढदिवस होता. तेव्हा त्याने आपल्या सर्व सेवक वर्गाला एक मेजवानी दिली; त्यावेळी त्याने त्या आचाऱ्याला व प्यालेबरदाराला तुरुंगातून सोडले. 21 फारोने प्यालेबरदाराची सुटका केली व त्याला पुन्हा पूर्वीप्रमाणे त्याच्या कामावर ठेवले; आणि प्यालेबरदाराने मद्याचा प्याला फारो राजाच्या हातात दिला. 22 परंतु फारोने आचाऱ्याला फाशी दिले; तेव्हा जे होईल असे योसेफाने सांगितले होते ते थेट तसेच घडून आले. 23 परंतु त्या प्यालेबरदाराने योसेफासंबंधी तो काहीच बोलला नाही. अशा रीतीने त्या प्याले बरदाराला योसेफाविषयी विसर पडला.

मार्क 10

येशू घटस्फोटाविषयी शिकवितो(A)

10 नंतर येशूने ती जागा सोडली आणि यहूदीया प्रांतात व यार्देन ओलांडून पलीकडे गेला. लोक पुन्हा गटागटाने त्याच्याकडे आले. आणि जसा त्याचा परिपाठ होता तसे त्याने त्यांना शिकविले.

काही परुशी येशूकडे आले. त्यांनी त्याला विचारले, “आपल्या पत्नीला घटस्फोट द्यावा हे मनुष्यासाठी कायदेशीर आहे काय?” हे तर त्यांनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी विचारले.

येशूने त्यांना उत्तर दिले, “मोशेने तुम्हांला काय आज्ञा दिली आहे?”

ते म्हणाले, “मोशेने पुरूषाला सुटपत्र लिहिण्याची व असे करून आपल्या बायकोला सोडण्याची परवानगी दिली आहे.”

येशू म्हणाला, “कारणकेवळ तुमच्या हट्टामुळे मोशेने तुमच्यासाठी ही पर्यायी अनुमति दिली (लिहिली) आहे. परंतु उत्पत्तीच्या आरंभापासून देवाने त्यांना पुरूष व स्त्री असे निर्माण केले. [a] या कारणामुळे पुरुष आपल्या आईवडिलांना सोडील व आपल्या पत्नीशी जडून राहील. आणि ती दोघे एकदेह होतील. [b] म्हणून यापुढे ती दोन नाहीत तर एकदेह आहेत. यासाठी देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने वेगळे करू नये.”

10 नंतर, येशू व शिष्य घरात असता शिष्यांनी या गोष्टीविषयी त्याला विचारले, 11 येशू त्यांना म्हणाला, “जो कोणी आपली पत्नी टाकतो व दुसरीबरोबर लग्न करतो तो आपल्या पत्नीविरुद्ध व्यभिचार करतो. 12 आणि जर पत्नी आपल्या नवऱ्याला सोडते आणि दुसऱ्याबरोबर लग्न करते तर तीही व्यभिचार करते.”

येशू मुलांचा स्वीकार करतो(B)

13 त्याने त्यांना स्पर्श करावा, यासाठी लोक लहान बालकांना त्याच्याकडे आणीत होते. परंतु शिष्यांनी त्यांना दटावले 14 येशूने हे पाहिले तेव्हा तो रागावला आणि त्यांना म्हणाला, “लहान बालकांना माझ्याकडे येऊ द्या. त्यांना मना करू नका कारण देवाचे राज्य यांच्यासारख्यांचेच आहे. 15 मी तुम्हांस खरे सांगतो, जो कोणी बालकासारखा देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा तेथे कधीही प्रवेश होणार नाही.” 16 तेव्हा त्याने बालकांना उचलून जवळ घेतले. आपले हात त्यांच्यावर ठेवले आणि आशिर्वाद दिला.

श्रीमंत मनुष्य अनुसरण्याचे नाकारतो(C)

17 येशू प्रवासाला निघाला असता एक मनुष्य त्याच्याकडे धावत आला आणि त्याच्यापुडे गुडघे टेकून म्हणाला, “उत्तम गुरूजी, अनंतकाळचे जीवन मिळण्यासाठी मी काय करावे?”

18 येशू त्याला म्हणाला, “तू मला उत्तम का म्हणतोस? एका देवाशिवाय कोणी उत्तम नाही. 19 तुला आज्ञा माहीत आहेतच: खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, फसवू नको, आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान कर.”

20 तो मनुष्य म्हणाला, “गुरूजी, मी तरूणपणापासून या आज्ञा पाळत आलो आहे.”

21 येशूने त्याच्याकडे पाहिले त्याला त्याच्याविषयी प्रेम वाटले. तो त्याला म्हणाला, “तुझ्यामध्ये एका गोष्टीची उणीव आहे. जा, तुझ्याजवळ जे सर्व आहे ते वीक. नंतर ते गोरगरिबांस वाटून टाक, स्वर्गात तूला संपत्ती प्राप्त होईल. तर मग चल आणि माझ्या मागे ये.”

22 हे शब्द ऐकून तो मनुष्य खूप निराश झाला व खिन्न होऊन निघून गेला कारण त्याच्याजवळ खूप संपत्ति होती.

23 येशूने सभोवताली पाहिले व तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “ज्याच्याजवळ संपत्ति आहे त्याचा देवाच्या राज्यात (श्रीमंतांचा) प्रवेश होणे किती कठीण आहे.”

24 त्याचे शब्द ऐकून शिष्य थक्क झाले, परंतू येशू त्यास म्हणाला, “माझ्या मुलांनो, देवाच्या राज्यात श्रीमंताचा प्रवेश होणे किती कठीण आहे! 25 श्रीमंतांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा उटांला सुईच्या नेढयातून जाणे सोपे आहे.”

26 ते यापेक्षाही अधिक आश्चर्यचकित झाले आणि एकमेकाला म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?”

27 त्यांच्याकडे पाहून येशू म्हणाला, “मनुष्यांना हे अशक्य आहे पण देवाला अशक्य नाही. कारण सर्व गोष्टी देवाला शक्य आहेत.”

28 पेत्र त्याला म्हणू लागला, “पाहा, आम्ही सर्व सोडले आणि आपल्या मागे आलो आहोत.”

29 येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो की, ज्या कोणी माझ्यासाठी व सुवार्तेसाठी आपले घर, भाऊ, बहिणी, आईवडील, मुले किंवा शेतीवाडी सोडली, त्याचा छळ झाला तरी 30 त्याला शंभरपटीने फायदा मिळेल आणि येणाऱ्या युगात त्याला अनंतकाळचे जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही. 31 परंतु ज्यांना सध्या मोठे स्थान आहे भविष्यात त्यांना खालचे स्थान मिळेल व ज्यांना खालचे स्थान आहे त्यांना मोठे स्थान मिळेल.”

येशू पुन्हा आपल्या मरणाविषयी सांगतो(D)

32 ते वर यरूशलेमेच्या रस्त्यावरून जात असता येशू त्यांच्यापुढे चालत होता. त्याचे शिष्य विस्मित झाले होते आणि त्याच्यामागून येणारे घाबरले होते. नंतर येशूने त्या बारा शिष्यांना पुन्हा एका बाजूला घेतले आणि स्वतःच्या बाबतीत काय घडणार आहे हे त्यांना सांगू लागला. 33 “ऐका! आपण वर येरूशलेमेस जात आहोत आणि मनुष्याचा पुत्र विश्वासघाताने धरून मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या हाती दिला जाईल. ते त्याला मरणाची शिक्षा देतील आणि ते त्याला यहूदीतर लोकांच्या हाती देतील. 34 ते त्याची थटृटा करतील, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील, ठार करतील आणि तीन दिवसांनी तो पुन्हा उठेल.”

याकोब व योहान येशूला मदतीसाठी विचारतात(E)

35 याकोब व योहान हे जब्दीचे मुलगे त्याच्याकडे आले. आणि त्याला म्हणाले, “गुरुजी, आम्ही आपणांजवळ जे मागू ते आपण आमच्यासाठी करावे अशी आमची इच्छा आहे.”

36 येशू त्यांना म्हणाला, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?”

37 ते म्हणाले, “आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला तुमच्या उजवीकडे व दुसऱ्याला डावीकडे बसण्याचा अधिकार द्यावा.”

38 येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही काय मागत आहात हे तुम्हांस कळत नाही. मी जो प्याला पिणार आहे, तो तुमच्याने पिणे शक्य आहे काय? किंवा मी जो बाप्तिस्मा घेणार आहे तो तुमच्याने घेणे शक्य आहे काय?”

39 ते त्याला म्हणाले, “आम्हांस शक्य आहे.”

मग येशू त्यांना म्हणाला, “मी जो प्याला पिणार आहे तो तुम्ही प्याल आणि जो बाप्तिस्मा घेईन तो तुम्ही घ्याल, 40 परंतु माझ्या उजवीकडे किंवा डावीकडे बसू देणे माझ्या हाती नाही. ज्यांच्यासाठी त्या जागा तयार केल्या आहेत, त्यांच्यासाठीच त्या राखून ठेवल्या आहेत.”

41 दहा शिष्यांनी या विनंतिविषयी ऐकले तेव्हा ते याकोब व योहानावर फार रागावले. 42 येशूने त्यांना जवळ बोलाविले आणि म्हटले, “तुम्हांस माहीत आहे की, परराष्ट्रीयांची जे सत्ताधारी आहेत ते त्यांच्यावर स्वामित्व गाजवितात आणि त्यांचे पुढारी त्यांच्यावर अधिकार गाजवितात. 43 परंतु तुमच्याबाबतीत तसे नाही. तुमच्यातील जो कोणी मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे. 44 आणि जो कोणी पाहिला होऊ इच्छितो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे. 45 कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यावयास नाही तर तो सेवा करावयास आला आहे. व अनेकांसाठी आपले जीवन खंडणी म्हणून देण्यासाठी आला आहे.”

येशू आंधळ्याला बरे करतो(F)

46 मग ते यरीहोस आले. येशू आपले शिष्य व लोकसमुदायासह यरीहो सोडून जात असता तिमयाचा मुलगा बार्तीमय हा एक आंधळा भिकारी रस्त्याच्या कडेला बसला होता. 47 जेव्हा त्याने ऐकले की, नासरेथचा येशू जात आहे तेव्हा तो मोठ्याने ओरडून म्हणू लागला, “येशू, दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा.”

48 तेव्हा त्याने गप्प बसावे म्हणून अनेकांनी त्याला दटावले. पण तो अधिक मोठ्याने ओरडून म्हणू लागला. “येशू दाविदाचे पुत्र मजवर दया करा.”

49 मग येशू थांबला आणि म्हणाला, “त्याला बोलवा.”

तेव्हा त्यांनी आंधळ्या मनुष्याला बोलाविल आणि म्हटले, “धीर धर, येशू तुला बोलावीत आहे.” 50 त्या आंधळ्याने आपला झगा टाकला, उडी मारली व तो येशूकडे आला.

51 येशू त्याला म्हणाला, “मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?”

आंधळा मनुष्य त्याला म्हणाला, “गुरुजी मला पुन्हा दृष्टी प्राप्त व्हावी.”

52 मग येशू त्याला म्हणाला, “जा! तू विश्वास ठेवलास म्हणून तू बरा झाला आहेस.” लगेच तो पाहू शकला (त्याला दृष्टी आली) आणि रस्त्याने तो येशूच्या मागे चालू लागला.

ईयोब 6

ईयोब अलीफजला उत्तर देतो

नंतर ईयोबाने उत्तर दिले:

“जर माझ्या दु:खाचे वजन करता आले आणि माझ्या कष्टांना वजनाच्या काट्यात तोलता आले
    तर तुम्ही माझ्या दु:खाची कल्पना करु शकाल.
माझे दु:ख समुद्रातल्या वाळूपेक्षा जड आहे.
    म्हणूनच मी मूर्खासारखी बडबड करतो असे वाटते.
त्या सर्वशक्तीमान देवाचे बाण माझ्यात आहेत.
    माझ्या आत्म्याला त्या बाणांच्या विषाची जाणीव होते.
    देवाची भयानक शस्त्रे माझ्या विरुध्द सज्ज आहेत.
काहीही वाईट घडलेले नसते तेव्हा तुझे शब्द सहजपणे बोलता येतात.
    रानटी गाढवसुध्दा खायला गवत असले की कसली तक्रार करीत नाही.
    आणि गायसुध्दा तिला तिचा चारा मिळाला की मुकाट असते.
अन्न मिठाशिवाय चांगले लागत नाही
    आणि अंड्यातल्या पांढऱ्या भागाला काही चव नसते.
मी त्याला स्पर्शही करु शकत नाही.
    तसल्या बेचव अन्नाची मला शिसारी येते.
तुमचे शब्दही मला आता
    तसेच वाटायला लागले आहेत.

“मी जे मागेन ते मला मिळायला पाहिजे असे मला वाटते.
    मला जे हवे ते देवाने द्यायला पाहिजे असे मला वाटते.
मला देवाच्या हातून मरण हवे.
    त्याने मला चिरडून टाकावे.
10 आणि जेव्हा तो मला मारेल तेव्हा मला एका गोष्टीचे समाधान मिळेल,
    एका गोष्टीबद्दल मी आनंदी असेन,
    या सगळ्या दु:खातही मी पवित्र परमेश्वराच्या आज्ञेचा कधीही भंग केला नाही.

11 “माझी शक्ती आता संपली आहे, त्यामुळे जगण्याची इच्छा माझ्यात नाही.
    माझे काय होणार आहे याची मला काहीच कल्पना नाही.
    त्यामुळे ज्याच्यासाठी धीर धरावा असे काही कारण उरलेले नाही.
12 मी पाषाणासारखा शक्तीमान नाही.
    माझे शरीर पितळेचे बनलेले नाही.
13 आता स्वतःला सावरायची ताकद माझ्यात नाही.
    का? कारण यश माझ्यापासून हिरावून घेण्यात आले आहे.

14 “एखाद्यावर संकट आले तर त्याच्या मित्रांनी त्याला दया दाखवावी
    आणि आपला मित्र सर्वशक्तीमान देवापासून दूर गेला तरी माणसाने मित्राशी निष्ठा ठेवली पाहिजे.
15 पण मित्रांनो, तुम्ही मात्र निष्ठावान नाही.
    मी तुमच्यावर विसंबून राहू शकत नाही.
    जे कधी वाहतात, कधी वाहात नाहीत अशा ओढ्यासारखे तुम्ही आहात. ओढे जेव्हा हिमाने आणि
16 वितळणाऱ्या बर्फाने गच्च होतात व दुथडी भरुन वाहू लागतात तसे तुम्ही आहात.
17 जेव्हा हवामान उष्ण आणि कोरडे होते
    तेव्हा पाणी वाहात नाही
    आणि ओढे नाहीसे होतात.
18 व्यापारी त्याची नागमोडी वळणे शोधत वाळवंटात जातात
    परंतु ते दिसेनासे झालेले असतात.
19 तेमाच्या व्यापाऱ्यांनी पाणी शोधले.
    शबाच्या प्रवाशांनी आशेने त्याचा शोध घेतला.
20 त्यांना पाणी सापडण्याची खात्री होती
    परंतु त्यांची निराशा झाली.
21 आता तुम्ही त्या ओढ्यासारखे आहात.
    तुम्ही माझ्या संकटांना पाहून घाबरता.
22 मी तुम्हाला मदत मागितली का?
    नाही. पण तुम्ही आपणहून मला उपदेश केला.
23 ‘माझे शत्रूपासून रक्षण करा!
    क्रूर लोकांपासून मला वाचवा!’
    असे मी तुम्हाला म्हटले का?

24 “आता तुम्ही मला शिकवा म्हणजे मी शांत होईन.
    माझी काय चूक झाली ते मला दाखवा.
25 प्रामाणिक शब्द नेहमीच सामर्थ्यशाली असतात.
    परंतु तुमचे वादविवाद काहीच सिध्द करु शकत नाहीत.
26 माझ्यावर टीका करण्याचा तुमचा उद्देश आहे का?
    तुम्ही आणखी कंटाळवाणे बोलणार आहात का?
27 पोरक्या मुलांच्या वस्तू जिंकून घेण्यासाठी
    तुम्ही जुगार खेळायलाही तयार आहात.
    तुम्ही तुमच्या मित्रालाही विकून टाकाल.
28 पण आता माझ्याकडे लक्षपूर्वक पाहा.
    मी तुमच्याशी खोटे बोलणार नाही.
29 तुम्ही आता तुमचा विचार बदला, अन्यायी होऊ नका.
    पुन्हा विचार करा.
    मी काहीही चूक केलेली नाही.
30 मी खोटे बोलत नाही
    आणि खऱ्या-खोट्यातला फरक मला कळतो.”

रोमकरांस 10

10 बंधूनो, इस्राएलाच्या वतीने माझी मनीषा आणि देवाजवळ प्रार्थना आहे की, त्यांचे तारण व्हावे, कारण मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी कळकळ आहे, परंतु ती ज्ञानावर आधारित नाही. देवापासून मिळणाऱ्या नीतिमत्वाविषयी त्यांना माहिती नसल्यामुळे ते आपलेच नीतिमत्व स्थापावयास पाहत होते. त्यामुळे ते देवाच्या नीतिमत्वाला वश झाले नाहीत. कारण ख्रिस्त नियमशास्त्राचा शेवट आहे यासाठी की, जे विश्वास ठेवतात त्यांना नीतिमत्व मिळावे.

नियमशास्त्राद्वारे मिळणाऱ्या नीतिमत्वाविषयी मोशे लिहितो, “जो मनुष्य या गोष्टी करतो तो त्याकडून जगेल.” [a] विश्वासाने मिळणारे नीतिमत्व हे सांगते, “तुम्ही आपल्या मनात म्हणू नका की ‘स्वर्गात कोण जाईल?’” (म्हणजे “ख्रिस्ताला खाली आणावयास”) किंवा “‘खाली अधोलोकात कोण जाईल?’” (म्हणजे “ख्रिस्ताला मेलेल्यातून वर आणायला.”)

नाही! शास्त्र काय म्हणते? “ते वचन तुमच्याजवळ, तुमच्या मुखात, तुमच्या अंतःकरणात आहे.” [b] ते वचन हे आहे की, जर तू तुझ्या मुखाने “येशू प्रभु आहे” असा विश्वास धरतोस आणि आपल्या अंतःकरणात देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले असा विश्वास धरतोस तुझे तारण होईल 10 कारण नीतिमत्वासाठी मनुष्य अंतःकरणाने विश्वास ठेवतो आणि तारणासाठी विश्वासाने कबूल करतो.

11 शास्त्र सांगते, “जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.” [c] 12 याचे कारण की, यहूदी आणि ग्रीक यांच्यात भेद नाही. कारण प्रभु हा सर्वांचा प्रभु आहे. जे हाक मारतात त्या सर्वांवर दया करण्या इतका तो संपन्र आहे. 13 कारण “जे कोणी प्रभूचे नाव घेऊन हाक मारतील, त्यांचे तारण होईल.” [d]

14 परंतु ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याला हाक मारणे त्यांना कसे शक्य होईल? ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर विश्वास ठेवणे त्यांना कसे शक्य होईल? आणि जर कोणी त्यांना उपदेश केला नाही, तर ते कसे ऐकतील? 15 त्यांना पाठविले नाही तर उपदेश करणे त्यांना कसे शक्य होईल? असे लिहिले आहे की, “शुभवार्ता आणणाऱ्याचे पाय किती सुंदर आहेत!”p

16 परंतु सर्वच यहूद्यांनी ती शुभवार्ता स्वीकारली नाही. यशयाने म्हटल्याप्रमाणे “प्रभो, आम्ही ज्या गोष्टी त्यांना सांगितल्या, त्यावर कोणी विश्वास ठेवला?” 17 म्हणून जे ऐकले त्याचा परिणाम विश्वास आणि जेव्हा कोणी येशूविषयी उपदेश केला.

18 परंतु मी म्हणतो, “त्यांनी आमचा उपदेश ऐकला नव्हता काय?” होय, त्यानी ऐकला: आत्मा म्हणतो:

“त्यांच्या आवाजाचा नाद सर्व पृथ्वीवर गेला आहे
    आणि त्यांचे शब्द पृथ्वीच्या शेवटापर्यंत गेले आहेत.” (A)

19 परंतु मी म्हणातो, “इस्राएल लोकांना कळले नव्हते काय?” होय, त्यांना कळले, प्रथम मोशे म्हणतो,

“खरे तर ज्या लोकांचे राष्ट्र नाही त्यांचा उपयोग करुन मी तुम्हांला मत्सरी करीन.
    विश्वासहीन राष्ट्राचा उपयोग करुन मी तुम्हांला राग आणीन.” (B)

20 नंतर यशया फार धीट होऊन म्हणतो,

“जे मला शोधीत नव्हते
    त्यांना मी सापडलो,
जे माझी चौकशी करीत नसत त्यांना मी प्रगट झालो.” (C)

21 परंतु देव इस्राएल लोकांविषयी म्हणतो,

“ज्या लोकानी माझी आज्ञा मोडली,
    आणि मला विरोध केला त्यांच्याकडे सर्व दिवसभर मी आपले हात पसरले आहेत.” (D)

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center