M’Cheyne Bible Reading Plan
स्वप्ने पडणारा योसेफ
37 याकोब कनान देशात वस्ती करुन राहिला; येथेच त्याचा बापही राहिला होता. 2 याकोबाच्या वंशाचा हा वृत्तान्त आहे.
योसेफ सतरा वर्षांचा उमदा तरुण होता. शेळ्यामेढ्यांचा सांभाळ करणे हे त्याचे काम होते. आपल्या भावांबरोबर (म्हणजे आपल्या बापाच्या बायका बिल्हा व जिल्पा यांच्या मुलांबरोबर) तो हे काम करीत असे; त्या भावांनी केलेल्या वाईट गोष्टीविषयी त्याने आपल्या बापाला सांगितले. 3 इस्राएल (याकोब) सर्व मुलांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती करीत असे कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता. त्याने योसेफाला एक विशेष सुंदर पायघोळ झगा दिला होता. 4 आपला बाप आपल्या इतर भावांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती करतो हे त्याच्या भावांना दिसले म्हणून ते योसेफाचा द्वेष करु लागले. यासेफाशी चांगल्या रीतीने बोलणे देखील त्यांनी सोडून दिले.
5 एकदा योसेफास एक विशेष स्वप्न पडले; नंतर त्याने ते स्वप्न आपल्या भावांना सांगितले; त्यानंतर तर त्याचे भाऊ त्याचा अधिक द्वेष करु लागले.
6 योसेफ, म्हणाला, “मला असे स्वप्न पडले. 7 आपण सर्वजण शेतात गव्हाच्या पेंढ्या बांधण्याचे काम करीत होतो; तेव्हा माझी पेंढी उठून उभी राहिली आणि तुम्हा सर्वांच्या पेंढ्या तिच्या भोवती गोलाकार उभ्या राहिल्या व त्यांनी माझ्या पेंढिला खाली वाकून नमन केले.”
8 हे ऐकून त्याचे भाऊ त्याला म्हणाले, “याचा अर्थ तू आमचा राजा होऊन आमच्यावर राज्य करणार असे तुला वाटते काय?” त्याच्या त्यांच्याविषयीच्या या स्वप्नामुळे तर त्याचे भाऊ आता त्याचा अधिकच द्वेष करु लागले.
9 नंतर योसेफाला आणखी एक स्वप्न पडले. तेही त्याने आपल्या भावांना सांगितले. तो म्हणाला, “मला आणखी एक स्वप्न पडले; सूर्य चंद्र व अकरा तारे यांनी मला खाली वाकून नमन केलेले पाहिले.”
10 योसेफाने आपल्या बापालाही या स्वप्नाविषयी सांगितले; परंतु त्याच्या बापाने त्याबद्दल टीका करुन म्हटले, “असले कसले रे स्वप्न आहे हे? तुझी आई, तुझे भाऊ व मी आम्ही भूमीपर्यंत लवून तुला नमन करु असे तुला वाटते काय?” 11 योसेफाचे भाऊ त्याचा हेवा करीतच राहिले; परंतु योसेफाच्या बापाने या गोष्टी संबंधी खूप विचार केला आणि या गोष्टींचा काय अर्थ असावा या विषयी आश्चर्य करीत त्याने ते विचार आपल्या मनात ठेवले.
12 एके दिवशी योसेफाचे भाऊ आपल्या बापाची मेंढरे चारावयास शखेम येथे गेले. 13 याकोब योसेफाला म्हणाला, “तुझे भाऊ शखेम येथे आपल्या मेंढाराबरोबर आहेत; तू तेथे जा.”
योसेफ म्हणाला, “बर, मी जातो.”
14 योसेफाचा बाप म्हणाला, “शखेमाला जा; आणि तुझे भाऊ सुखरुप आहेत का; व माझी मेंढरे ठीक आहेत का ते पाहा व मागे येऊन मला त्यांच्या संबंधी सांग.” अशा रीतीने योसेफाच्या बापाने त्याला हेब्रोन दरीतून शखेमास पाठवले.
15 शखेमाजवळ योसेफ वाट चुकला; तो शेतात इकडे तिकडे भटकताना एका माणसाला आढळला त्या माणसाने त्याला विचारले, “तू कोणाला शोधत आहेस?”
16 योसेफाने उत्तर दिले, “मी माझ्या भावांना शोधत आहे; आपल्या मेंढरांबरोबर ते कोठे आहेत ते आपण मला सांगू शकाल का?”
17 तो माणूस म्हणाला, “ते अगोदरच येथून गेले आहेत; आपण दोथानास जाऊ असे त्यांस बोलताना मी ऐकले.” म्हणून मग योसेफ आपल्या भावांमागे गेला व ते त्याला दोथानात सांपडले.
योसेफ गुलाम म्हणून विकला जातो
18 योसेफाच्या भावांनी योसेफाला दुरुन येताना पाहिले आणि कट करुन त्याला ठार मारण्याचे ठरवले. 19 ते एकमेकांस म्हणाले, “हा पाहा, एकामागे एक स्वप्ने पडणारा योसेफ इकडे येत आहे. 20 आता आपल्याला शक्य आहे तोंवर याला आपण ठार मारुन टाकावे त्याचे शरीर एका कोरड्या खाड्यात फेकून देऊ आणि त्याला कोणाएका हिंस्र पशूने मारुन टाकले असे आपल्या बापाला सांगू; मग त्याची स्वप्ने काही कामाची नाहीत हे आपण त्याला दाखवून देऊ.”
21 परंतु रऊबेनास योसेफाला वाचवावयाला पाहिजे होते; म्हणून रऊबेन म्हणाला, “आपण त्याला ठार मारू नये; 22 त्याला काहीही इजा न करता, त्याला आपण एखाद्या खाड्यात टाकून देऊ;” आपल्या भावांच्या हातातून सोडवून योसेफाला वाचवावयाचे व त्याच्या बापाकडे परत पाठवून द्यावयाचे असा रऊबेनाचा बेत होता. 23 योसेफ त्याच्या भावजवळ येऊन पोहोंचला तेव्हा त्यांनी त्याच्यावर हल्ला केला; त्यांनी त्याचा विशेष सुंदर पायघोळ झगा फाडून टाकला. 24 नंतर त्यांनी त्याला एका खोल कोरड्या खाड्यात टाकून दिले.
25 योसेफ खाड्यात असताना त्याचे भाऊ भाकरी खावयास बसले. त्यांनी वर नजर करुन पाहिले तेव्हा त्यांना दुरुन एक उंटांचा तांडा दिसला; ते आपल्या, उंटांवर मसाल्याचे अनेक पदार्थ व वनस्पती इत्यादी भारी किंमतीचे पदार्थ लादून गिलादाहून मिसरकडे चालले होते. 26 तेव्हा यहूदा म्हणाला, “आपल्या भावाला ठार मारुन आणि त्याचा खून लपवून ठेवून आपल्याला काय फायदा? 27 आपण त्याला जर ह्या इश्माएली व्यापाऱ्यांना विकून टाकले तर आपल्याला अधिक लाभ होईल; आणि आपल्या स्वतःच्या भावाला ठार मारल्याचा दोषही आपणावर येणार नाहीं;” इतर भावांना हे म्हणणे पटले. 28 ते मिद्यानी व्यापारी जवळ आल्यावर त्या भावांनी योसेफाला खाड्यातून बाहेर काढले व त्या इश्माएली व्यापाऱ्यांस वीस चांदीची नाणी घेऊन विकून टाकले. ते व्यापारी योसेफास मिसर देशास घेऊन गेले.
29 इतका वेळपर्यंत रऊबेन आपल्या भावाबरोबर तेथे नव्हता, म्हणून त्यांनी योसेफाला विकून टाकल्याचे त्याला माहीत नव्हते; रऊबेन त्या खाड्याकडे परत गेला तेव्हा त्यात त्याला योसेफ दिसला नाही; तेव्हा त्याला अतिशय दु:ख झाले; अतिशोकामुळे त्याने आपली वस्त्रे फाडली; 30 तो शोक करीत आपल्या भावांकडे जाऊन म्हणाला, “बधूनो, आपला धाकटा भाऊ योसेफ खाड्यात नाही, हो! तर आता मी काय करु!” 31 त्या भावांनी एक तरुण बकरा मारुन त्याचे रक्त योसेफाच्या सुंदर पायघोळ झग्याला लावले. 32 नंतर तो रक्ताने भरलेला झगा आपल्या बापाला दाखवून ते म्हणाले, “आम्हाला हा झगा सांपडला; हा झगा योसेफाचा आहे की काय?”
33 त्यांच्या बापाने तो झगा पाहिला आणि तो योसेफाचाच आहे हे ओळखले! तेव्हा त्याचा बाप म्हणाला, “होय! मुलांनो, हा त्याचाच झगा आहे! हिंस्र पशूने त्याला खाऊन टाकले असावे. माझा मुलगा योसेफ याला हिंस्त्र पशूने खाऊन टाकले आहे यात संशय नाही.” 34 याकोबाला आपल्या मुलाबद्दल अतिशय दु:ख झाले, एवढे की त्याने आपली वस्त्रे फाडली आणि कंबरेस गोणताट गुंडाळले आणि कितीतरी दिवस आपल्या मुलासाठी शोक केला. 35 याकोबाच्या सर्व मुलांनी व मुलीनीं त्याचे सांत्वन करण्यास खूप प्रयत्न केला खरा परंतु तो कधीही समाधान पावला नाही; तो म्हणाला, “मी मरेपर्यंत माझ्या मुलासाठी शोक करीत राहीन व अधोलोकात माझ्या मुलाकडे जाईन.” [a] असा त्याच्या बापाने योसेफाकरिता अतिशय शोक केला.
36 त्या मिद्यानी व्यापाऱ्यांनी योसेफास मिसर देशात नेऊन पोटीफर नांवाचा फारो राजाचा अधिकारी, गारद्यांचा सरदार होता त्यास विकून टाकले.
देवाचा नियम आणि माणसांनी बनविलेले नियम(A)
7 काही परूशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक जे यरूशलेमेहून आले होते ते येशूभोवती जमले. 2 आणि त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध (म्हणजे हात न धुता) हातांनी जेवताना पाहिले. 3 (कारण परूशी व इतर सर्व यहूदी वाडवडिलांच्या रुढी पाळून विशिष्ट रीतीने नीट हात धुतल्याशिवाय जेवत नाहीत.) 4 बाजारातून आणलेली कुठलीही वस्तू धुतल्याशिवाय ते खात नाहीत. त्यांच्या पूर्वजांच्या इतर अनेक चालारीति ते पाळतात आणि प्याले, घागरी, तांब्याची भांडी धुणे अशा दुसऱ्या इतर रुढीही पाळतात.
5 मग परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक यांनी येशूला विचारले, “तुझे शिष्य वाडवडिलांच्या रुढी का पाळत नाहीत? हात न धुता का जेवतात?”
6 येशू त्यांना म्हणाला, “यशयाने जेव्हा तुम्हा ढोंगी लोकांविषयी भविष्य केले तेव्हा त्याचे बरोबरच होते. यशया लिहितो,
‘हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात
परंतु त्याची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत,
7 ते व्यर्थ माझी उपासना करतात
कारण ते लोकांना शास्त्र म्हणून जे शिकवितात ते मनुष्यांनी केलेले नियम असतात.’ (B)
8 तुम्ही देवाच्या आज्ञा पाळत नाही, तर आता तुम्ही मनुष्याची शिकवण पाळता आहात.”
9 आणखीतो त्यांना म्हणाला, “आपल्या स्वतःच्या रूढी प्रस्थापित करण्यासाठी देवाच्या आज्ञा दूर करण्यात तुम्ही पटाईत आहात. 10 मोशे म्हणाला, ‘तू आपल्या आईवडिलांचा सन्मान कर.’ [a] जो मनुष्य आपल्या वडिलांबद्दल किंवा आईबद्दल वाईट बोलतो, त्याला ठार मारलेच पाहिजे. [b] 11 परंतु तुम्ही शिकविता, एखादा मनुष्य आपल्या आईला व वडिलांना असे म्हणू शकतो की, ‘तुम्हांला मदत करण्यासाठी माझ्याकडे थोडेफार आहे. परंतु तुम्हाला मदत करण्यासाठी मी ते वापरणार नाही. मी ते देवाला देईन.’ 12 तुम्ही त्याला त्याच्या वडिलांसाठी किंवा आईसाठी काही करू देत नाही. 13 तुम्ही अशा रूढी पाळण्याचे शिकवून रुढींनी देवाचे वचन रद्द करता आणि तुम्ही अशा प्रकारच्या अनेक गोष्टी करता.”
14 येशूने लोकांना आपल्याकडे पुन्हा बोलावून म्हटले, “प्रत्येकाने माझे ऐका व हे समजून घ्या. 15 बाहेरून मनुष्याच्या आत जाऊन त्याला अपवित्र करील असे काही नाही. ज्या कुणाला ऐकायला कान आहेत तो ऐको.” 16 [c]
17 लोकसमुदायाला सोडून येशू घरात गेला तेव्हा शिष्यांनी त्याला या दाखल्याविषयी विचारले, 18 तो त्यांना म्हणाला, “तुम्हांलादेखील हे समजत नाही काय?” जे बाहेरून मनुष्याच्या आत जाते ते त्याला अपवित्र करीत नाही हे तुम्हांला समजत नाही का? 19 कारण ते त्याच्या अंतःकरणात जात नाही तर त्याच्या पोटात जाते. नंतर ते शरीराबाहेर जाते. असे सांगून सर्व अन्न त्याने शुद्ध घोषित केले.
20 आणखी तो म्हणाला, “जे माणसाच्या आतून बाहेर पडते ते माणसाला अपवित्र करते. कारण आतून म्हणजे अंतःकरणातून वाईट विचार बाहेर पडतात. 21 जारकर्म, चोरी, खून, 22 व्यभिचार, लोभ, वाईटपणा, कपट, असभ्यता, मत्सर, शिव्यागाळी, अहंकार आणि मूर्खपणा, 23 या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर पडतात आणि माणसाला अपवित्र करतात.”
यहूदी नसलेल्या स्त्रीला येशू मदत करतो(C)
24 येशू त्या ठिकाणाहून निघाला आणि सोर प्रांताच्या आसपासच्या प्रदेशात गेला. तो एका घरात गेला व हे कोणाला कळू नये अशी त्याची इच्छा होती. परंतु तो त्याची उपस्थिती लपवू शकला नाही. एका स्त्रीने ऐकले की येशू तेथे आहे. तिच्या मुलीला अशुद्ध आत्मा लागलेला होता. 25 ती स्त्री आली व येशूच्या पाया पडली. 26 ती स्त्री ग्रीक होती व सिरीयातील फिनीशिया येथे जन्मली होती. तिने येशूला आपल्या मुलीतून भूत काढण्याची विनंती केली.
27 येशू तिला म्हणाला, “प्रथम मुलांना तृप्त होऊ दे कारण मुलांची भाकरी घेऊन कुत्र्याला टाकणे योग्य नव्हे.”
28 परंतु ती त्याला म्हणाली, “प्रभु, कुत्रीसुद्धा मुलांच्या हातून मेजाखाली पडलेला चुरा खातात.”
29 येशू त्या स्त्रीला म्हणाला, “तुझ्या या उत्तरामुळे तू शांतीने घरी जा. तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे.”
30 मग ती घरी आली तिची मुलगी अंथरुणावर पडली आहे व तिच्यातून भूत निघून गेले आहे. असे तिने पाहिले.
येशू एका बहिऱ्या मनुष्याला बरे करतो
31 येशू सोर भोवतलच्या प्रदेशातून परतला आणि सिदोनाहून दकापलिसच्या वाटेने गालील समुद्राकडे आला. 32 तेथे काही लोकांनी एका बहिऱ्या तोतऱ्या मनुष्याला येशूकडे आणले व आपण त्याच्यावर हात ठेवा अशी विनंति केली.
33 येशूने त्याला लोकांपासून एका बाजूस घेऊन त्याच्या कानात आपली बोटे घातली. नंतर तो थुंकला आणि त्या माणसाच्या जिभेला स्पर्श केला. 34 त्याने स्वर्गाकडे पाहून मोठा उसासा टाकला व म्हणाला, “एफ्फात्था” म्हणजे मोकळा हो. 35 आणि त्याच क्षणी त्याचे कान मोकळे झाले. त्याला बोलता येऊ लागले. त्याने कोणाला सांगू नका अशी आज्ञा केली.
36 येशू नेहमी अशा गोष्टी न सांगण्याविषयी लोकांना सूचना देऊ लागला, (पण लोक त्याविषयी अधिकाअधिक सांगत गेले.) 37 ते लोक फारच आश्चर्यचकित झाले व म्हणाले, “त्याने सर्व काही चांगले केले आहे. तो बहिऱ्यांना ऐकण्यास आणि मुक्यांना बोलावयास लावतो.”
इयोब आपल्या जन्मदिवसाला शाप देतो
3 नंतर ईयोबाने आपले तोंड उघडले आणि आपल्या जन्मदिवसाला शाप दिला. 2 तो म्हणाला,
3 “मी ज्या दिवशी जन्मलो तो दिवस कायमचा नष्ट होवो.
ज्या रात्री ‘तो मुलगा आहे’ असे म्हटले गेले ती रात्र कधीच आली
नसती तर बरे झाले असते असे मला वाटते.
4 तो दिवस काळाकुटृ झाला असता,
देवाला त्याचे विस्मरण झाले असते,
त्या दिवशी उजेड पडला नसता तर फार बरे झाले असते.
5 तो दिवस मृत्यूसारखा काळा होवो.
ढगही त्या दिवशी लपले असते आणि काळ्या ढगांनी प्रकाशाला घाबरवले असते तर बरे झाले असते असे मला वाटते.
6 अंधाराने त्या रात्रीला ठेवून घ्यावे.
दिनदर्शिकेतून ती रात्र नष्ट होवो.
तिचा अंर्तभाव कुठल्याही महिन्यात होऊ नये.
7 त्या रात्रीतून काहीही निर्माण होऊ नये.
आनंददायी आवाज त्या रात्री ऐकू न येवोत.
8 जादुगाराने शापवाणी उच्चारावी आणि माझ्या जन्मदिवसाला शापावे.
ते लिव्याथानाला चेतविण्यास सदैव तत्पर असतात.
9 त्या दिवसाचे पहाटेचे तारे काळे होवोत.
त्या रात्रीला पहाटेच्या प्रकाशाची वाट बघू दे पण तो प्रकाश कधीही न येवो.
सूर्याचे पाहिले किरण तिला कधीही न दिसोत.
10 का? कारण त्या रात्रीने माझ्या जन्माला अटकाव केला नाही.
ही संकटे बघण्यापासून तिने मला परावृत केले नाही.
11 मी जन्माला आलो तेव्हाच का मरुन गेलो नाही?
मी जन्मतःच का मेलो नाही?
12 माझ्या आईने मला आपल्या मांडीवर का घेतले?
तिने मला स्तनपान का दिले?
13 मी जर जन्मतःच मेलो असतो तर आता मी अगदी शांत असतो.
पूर्वी होऊन गेलेल्या राजेलोकांच्यात आणि विद्वानांच्यामध्ये मी झोपी गेलो असतो
आणि विश्रांती घेतली असती तर किती बरे झाले असते.
14 त्या लोकांनी आपल्यासाठी प्रासाद आणि शहरे बांधली
परंतु आता ती ओसाड आणि उध्वस्त झाली आहेत.
15 ज्या राजांनी आपली थडगी वा घरे सोन्या रुप्यांनी भरली
त्यांच्या बरोबरच माझेही दफन झाले असते तर बरे झाले असते.
16 मी जन्मतःच मेलेले
आणि जमिनीत पुरले गेलेले मूल का झालो नाही?
दिवसाच्या प्रकाशाचा किरणही न पाहिलेले
मूल मी असतो तर बरे झाले असते.
17 वाईट लोक थडग्यात गेल्यानंतरच त्रास देण्याचे थांबवितात.
आणि जे लोक दमलेले असतात त्यांना थडग्यात विश्रांती मिळते.
18 थडग्यात कैद्यांनाही विसावा मिळतो.
तेथे त्यांना रक्षकांचे ओरडणे ऐकू येत नाही.
19 थडग्यात, स्मशानात अनेक प्रकारचे लोक असतात, लहान थोर सर्व तेथे असतात,
गुलामांचीही तेथे आपल्या मालकापासून सुटका होते.
20 “दु:खी कष्टी लोकांनी का जगत राहायचे?
ज्याचा आत्मा कटू आहे अशाला जीवन का द्यायचे?
21 ज्याला मरायचे आहे त्याला मरण येत नाही,
दु:खी माणूस गुप्त खजिन्यापेक्षा मृत्यूच्या शोधात असतो.
22 ते लोक थडगे दिसल्यावर अधिक सुखी होतील.
आपली कबर मिळाली की आनंदी होतील.
23 परंतु देव त्यांचे भविष्य नेहमी गुप्त ठेवतो
आणि त्यांच्या भोवती संरक्षक भिंत उभारतो.
24 जेव्हा खायची प्यायची वेळ होते तेव्हा मी दु:खाचा नि:श्वास टाकतो सुखाचा नाही!
माझ्या तक्रारी, माझे गाऱ्हाणे पाण्यासारखे बाहेर ओतले जाते.
25 काहीतरी भयानक घडणार असल्याची मला सतत धास्ती वाटत होती आणि तेच घडले.
जे भयानक घडणार आहे अशी भीती वाटत होती तेच माझ्या बाबतीत घडले.
26 मी शांत होऊ शकत नाही.
मी स्वस्थ राहू शकत नाही.
मी विसावा घेऊ शकत नाही.
मी अतिशय अस्वस्थ आहे.”
विवाहावरुन उदाहरण
7 बंधूनो, तुम्हांस माहीत नाही काय? कारण नियमशास्त्र माहीत असलेल्या लोकांबरोबर मी बोलत आहे की, जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे, तोपर्यंत नियमशास्त्र त्याच्यावर सता चालविते. 2 कारण लग्न झालेली स्त्री जोपर्यंत तिचा पती जिवंत आहे तोपर्यंत ती नियमशास्त्राने त्याला बांधलेली असते, पण जर तिचा नवरा मेला तर ती पतीविषयीच्या नियमातून मोकळी होते. 3 म्हणून पती जिवंत असताना ती दुसन्याची झाली, तर तिला व्यभिचारिणी असे म्हणतील. पण जर तिचा पती मरण पावला तर ती लग्नाच्या नियमातून मुक्त होते आणि जरी ती दुसऱ्या पुरुषाची पत्नी झाली तरी ती व्यभिचारिणी होत नाही.
4 माझ्या बंधूनो, अशाच प्रकारे नियमशास्त्राप्रमाणे तुम्हांलाही ख्रिस्ताच्या शरीराद्वारे ठार मारण्यात आले यासाठी की तुम्ही दुसऱ्या पुरुषाचे, जो मेलेल्यातून उठविला गेला होता त्याचे व्हावे, यासाठी की देवाच्या सेवेसाठी आमचा वापर व्हावा. 5 कारण जेव्हा आम्ही आमच्या पापी मानवी स्वभावाप्रमाणे जगत होतो तेव्हा पापी वासना नियमशास्त्राच्या द्वारे मरणाला फळ देण्यासाठी आपल्या अवयवामध्ये कार्य करीत होत्या. 6 ज्या नियमशास्त्रामध्ये आम्ही कैदी झालो होतो त्यात आम्ही मेलेलो असल्याने आता आम्ही नियमशास्त्रापासून मुक्त आहोत तेव्हा आता आम्ही देव, आमचा प्रभु याची पवित्र शास्त्राच्या जुनेपणाप्रमाणे नव्हे तर आत्म्याच्या नवेपणाप्रमाणे सेवा करतो.
पापाविरुद्धची लढाई
7 तर मग आता आपण काय म्हणतो? नियमशास्त्र पाप आहे असे आम्ही म्हणावे काय? खात्रीने नाही! कारण नियमशास्त्रावाचून पाप काय आहे हे मला समजले नसते. खरोखर “लोभ धरु नको” असे नियमशास्त्राने सांगितले नसते तर लोभ म्हणजे काय हे मला माहीत झाले नसते. [a] 8 परंतु पापाने संधी साधली आणि मजमध्ये सर्व प्रकारचा लोभ भरला. कारण नियमशास्त्राशिवाय पाप मृतवत आहे. 9 एके काळी मी नियाशास्त्राशिवाय जगत होतो, परंतु जेव्हा नियमशास्त्र आले तेव्हा पाप संजीवित झाले. 10 आणि मी मरण पावलो, जी आज्ञा जीवन आणण्यासाठी योजण्यात आली होती तिचा परिणाम माझ्यासाठी मरण असा झाला. 11 कारण पापाने संधी साधली आणि त्या आज्ञेयोगे मला फसविले व तिच्याद्वारे ठार केले.
12 म्हणून आम्ही असा निष्कर्ष काढतो की, नियमशास्त्र पवित्र आहे आणि आज्ञा पवित्र, नीतिमान आणि उत्तम आहेत. 13 याचा अर्थ असा आहे का, की जे उत्तम होते ते माझ्यासाठी मरण होते काय? खात्रीने नाही! परंतु पाप हे पाप म्हणून ओळखले जावे म्हणून त्याने जे उत्तम त्याद्वारे मजमध्ये मरण निर्माण केले. यासाठी की, पाप त्या आज्ञेमुळे कमालीचे पापिष्ठ व्हावे.
मनुष्याच्या मनातील लढा
14 कारण आम्हांला माहीत आहे की, नियमशास्त्र आत्मिक आणि मी दैहिक मनुष्य आहे. मी गुलाम म्हणून पापांत शरणागत राहावे म्हणून विकलेला असा आहे. 15 मी काय करतो हे मला माहीत नाही कारण काय करायचे हे मला माहीत नाही. कारण ज्या गोष्टींचा मी द्वेष करतो, त्याच गोष्टी मी करतो. 16 आणि ज्या गोष्टी मला कराव्याशा वाटत नाही त्याच करतो तर नियमशास्त्र उत्तम आहे हे मान्य करतो. 17 परंतु खरे तर मी त्या करतो असे नव्हे तर माझ्या ठायी वसत असलेले पाप त्या गोष्टी करते. 18 होय, मला माहीत आहे की, जे चांगले आहे ते माझ्यामध्ये वसत नाही. 19 चांगले करण्याची माझ्या ठायी इच्छा आहे, परंतु तसे मी करीत नाही, त्याऐवजी जे फार वाईट व जे मला करावेसे वाटत नाही तेच करतो. 20 आणि ज्याअर्थी, ज्या गोष्टी मला कराव्याशा वाटत नाहीत त्या मी करतो, तेव्हा खरे तर त्या गोष्टी मी करतो असे नाही तर माझ्याठायी असणारे पाप त्या गोष्टी करते.
21 तर माझ्यामध्ये मला हा नियम आढळतो की, माझ्यातील मनुष्याला चांगले करावेसे वाटते पण वाईट ही एकच गोष्ट माझ्याबरोबर आहे. 22 माझ्या आत असलेला मनुष्य देवाच्या नियमशास्त्रामुळे आनंद करतो. 23 परंतु माझ्या अवयवात मला निराळाच नियम कार्य करताना दिसतो. तो माझ्या मनावर अमल करणाऱ्या नियमाबरोबर लढतो, आणि पापाने मजवर लादलेल्या नियमाचा, जो माझ्या शरीरात कार्य करतो, त्याचा कैदी करतो. 24 मी अत्यंत दु:खी मनुष्य आहे! मरणाधीन असलेल्या शरीरापासून मला कोण सोडवील? 25 परंतु आमचा प्रभु येशू ख्रिस्त याच्याद्वारे देवाचे आभार मानतो.
तर मग माझ्या मनाने मी देवाच्या नियमाचा गुलाम आहे. पण माझ्या पापी स्वभावाने मी पापाने माझ्यावर लादलेल्या नियमाचा गुलाम आहे.
2006 by World Bible Translation Center