M’Cheyne Bible Reading Plan
एसावाशी पुनर्भेट
32 याकोबानेही ते ठिकाण सोडले. तो प्रवास करीत असताना त्याला देवदूत भेटले. 2 जेव्हा याकोबाने त्यांना पाहिले तेव्हा तो म्हणाला, “हा देवाचा तळ आहे.” म्हणून त्याने त्या जागेचे नाव “महनाइम” ठेवले.
3 याकोबाचा भाऊ एसाव सेइर नावाच्या देशात राहात होता. हा देश म्हणजे अदोमाचा डोंगराळ प्रांत होता. याकोबाने एसावाकडे निरोपे पाठवले. 4 त्याने त्यांना सांगितले “तुम्ही या सर्व गोष्टी माझे स्वामी एसाव त्यांना सांगा, ‘आपला सेवक याकोब असे म्हणतो की आजपर्यंत अनेक वर्षे मी लाबानाकडे राहिलो; 5 माझ्यापाशी पुष्कळ गाईगुरे, गाढवे, शेरडामेंढराचे कळप आणि दास व दासी आहेत. महराज, आपण आमचा स्वीकार करावा अशी विंनती करण्यासाठी मी आपणाकडे हा निरोप पाठवीत आहे.’”
6 निरोपे याकोबाकडे मागे आले आणि म्हणाले, “आम्ही आपला भाऊ एसाव याजकडे गेलो व त्यांस भेटलो तो आपणाला भेटावयास येत आहे; त्याच्या बरोबर चारशे माणसे आहेत.”
7 त्या निरोपामुळे याकोब घाबरला. आपल्या जवळच्या लोकांच्या त्याने दोन टोळ्या केल्या. तसेच शेरडेमेंढरे, गुरेढोरे आणि उंट गाढवे यांच्याही त्याने दोन टोळ्या केल्या. 8 त्याने विचार केला, “जर एसाव आला व त्याने एका टोळीचा नाश केला तर दुसरी टोळी पळून जाईल व वाचवली जाईल.”
9 याकोब म्हणाला, “माझे वडील अब्राहाम, इसहाक यांच्या देवा! परमेश्वरा! तू मला माझ्या देशात व माझ्या कुटुंबात परत येण्यास सांगितलेस; तसेच तू माझे कल्याण करशील असेही तू म्हणालास. 10 तू माझ्यावर दया केली आहेस आणि माझ्या करिता अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेस हे मी जाणतो. मी पहिल्याच वेळी यार्देन नदी उतरुन प्रवास केला तेव्हा माझ्याजवळ एका काठी शिवाय माझ्या मालकीचे काहीही नव्हते; परंतु आता माझ्या मालकीच्या, भरपूर वस्तूंच्या व माणसांच्या पूर्ण दोन टोळ्या आहेत. 11 मी तुझी प्रार्थना करतो की कृपाकरुन तू माझा भाऊ एसाव याच्यापासून मला वाचव; मला त्याची भीती वाटते, की तो येऊन आम्हा सर्वांस ठार मारील; मुलांच्या मातांनाही लेंकरासकट तो मारुन टाकील. 12 परमेश्वरा! तू मला वचन दिलेस, ‘मी तुझे भले करीन; मी तुझी संतनी वाढवीन आणि ती समुद्राच्या वाळू इतकी करीन; त्याची गणती करता येणार नाही एवढी ती करीन.’”
13 त्या रात्री याकोब त्या ठिकाणी राहिला. त्याने एसावाला देणगी म्हणून देण्यासाठी काही गोष्टींची भेट तयार केली. 14 त्याने दोनशे शेळ्या व वीस बोकड, दोनशें मेंढ्या व वीस एडके, 15 तसेच तीस साडणी व त्यांची बछडी, चाळीस गाई व दहा खोंड, वीस गाढवी व दहा गाढवे घेतली व एवढ्यांचे वेगवेगळे कळप केले. 16 त्याने प्रत्येक कळप एकेका नोकराच्या ताब्यात दिला; मग तो नोकरांना म्हणाला, “प्रत्येक कळप वेगळा करा आणि कळपाकळपात थोडे अंतर ठेवून माझ्यापुढे चाला.” 17 याकोबाने चाकरांना आज्ञा दिल्या; जनावरांच्या पहिल्याच टोळीच्या चाकराला तो म्हणाला, “जेव्हा माझा भाऊ एसाव तुझ्याकडे येईल व विचारील, ‘ही कोणाची जनावरे आहेत? तू कोठे चाललास? तू कोणाचा नोकर आहेस?’ 18 तेव्हा तू त्याला असे उत्तर दे, ‘ही जनावरे आपला सेवक याकोब याच्या मालकीची आहेत. याकोबाने ही स्वामी आपल्याला भेट म्हणून पाठवली आहेत आणि याकोब आमच्या पाठोपाठ येत आहे.’”
19 याकोबाने दुसऱ्या तिसऱ्या आणि इतर सर्व चाकरांना अशीच आज्ञा करुन अशाच प्रकारे उत्तर देण्यास सांगितले. तो म्हणाला, “तुम्हाला जेव्हा एसाव भेटेल तेव्हा तुम्ही असेच करावे. 20 तुम्ही म्हणावे, ‘ही आपणाकरिता भेट आहे आणि आपला दास याकोब आमच्या मागून येत आहे.’”
याकोबाने विचार केला, “जर मी ही माणसे भेटीसह पुढे पाठवली तर कदाचित एसाव मला क्षमा करील व माझा स्वीकार करील.” 21 म्हणून त्याप्रमाणे याकोबाने भेट पुढे पाठवली परंतु तो त्या रात्री तळावरच मागे राहिला.
22 मग याकोब रात्रीचाच उठला. त्याने आपल्या दोन्ही बायका, दोन्ही दासी आणि अकरा मुले यांस बरोबर घेतले आणि तो यब्बोक नदीच्या उतारापाशी नदी पार करुन गेला. 23 त्याने आपल्या कुटुंबातील सर्वांस नदी पार करुन पाठवले; नंतर त्याचे जे काही होते तेही सर्व त्याने नदी पार करुन पलीकडे पाठवले.
देवाशी झोंबी
24 नदी उतरुन पलीकडे जाण्यात याकोब सर्वात शेवटी होता; परंतु नदी उतरुन जाण्यापूर्वी तो अद्याप एकटाच असताना एक पुरुष आला व त्याने याकोबाशी झोंबी केली. सूर्य उगवेपर्यंत त्याने त्याच्याशी झोंबी केली 25 त्या माणसाने पाहिले की आपण याकोबावर मात करुन त्याचा पराभव करु शकत नाही म्हणून त्याने याकोबाच्या जांघेस स्पर्श केला तेव्हा याकोबाचा पाय जांघेच्या सांध्यातून निखळला.
26 मग तो पुरुष याकोबास म्हणाला, “आता मला जाऊदे,कारण सुर्य वर येत आहे.'
परंतु याकोब म्हणाला, “तू मला आशीर्वाद दिलाच पाहिजेस नाहीतर मी तुला जाऊ देणार नाही.”
27 तो पुरुष त्याला म्हणाला, “तुझे नाव काय आहे?”
आणि याकोब म्हणाला, “माझे नाव याकोब आहे.”
28 तेव्हा तो पुरुष म्हणाला, “तुझे नाव याकोब असणार नाही. येथून पुढे तुझे नांव इस्राएल असेल. मी हे नांव तुला देत आहे कारण तू देवाशी व माणसांशी झोंबी केली आहेस आणि तू हरला नाहीस तर जिंकलास.”
29 मग याकोबाने त्याला विचारले, “कृपया तुझे नाव मला सांग.”
परंतु तो पुरुष म्हणाला, “तू माझे नाव का विचारतोस?” त्यावेळी तेथेच त्या पुरुषाने याकोबाला आशीर्वाद दिला.
30 म्हणून याकोबाने त्या जागेचे नाव पनीएल ठेवले. याकोब म्हणाला, “ह्या ठिकाणी मी देवाला तोंडोतोंड पाहिले आहे परंतु माझा जीव वाचवला गेला.” 31 मग पनीएलाहून तो पुढे निघाला तेव्हा सूर्य उगवला. याकोब आपल्या पायामुळे लंगडत चालत होता. 32 म्हणून आजपर्यंत इस्राएल लोक जनावरांच्या जांघेच्या सांध्याजवळचा स्नायू खात नाहीत कारण याच स्नायूपाशी याकोबाला दुखापत झाली होती.
येशू वाळलेल्या हाताच्या मनुष्याला बरे करतो(A)
3 दुसऱ्यांदा येशू सभास्थानात गेला. तेथे वाळलेल्या हाताचा मनुष्य होता. 2 येशूवर आरोप करण्यासाठी कारण मिळावे म्हणून तो शब्बाथ दिवशी त्या मनुष्याला बरे करतो की काय हे पाहण्यासाठी काही लोक त्याच्यावर बारकाईने नजर ठेवून होते. 3 येशू वाळलेल्या हाताच्या मनुष्याला म्हणाला, “लोकांच्या समोर उभा राहा.”
4 नंतर तो त्यांना म्हणाला, “शब्बाथ दिवशी चांगले करणे किंवा वाईट करणे, जीव वाचविणे किंवा जिवे मारणे यांतील कोणते योग्य आहे?” परंतु ते गप्प राहीले.
5 येशूने सर्वांकडे रागाने पाहिले. त्यांच्या मनाच्या कठीणतामुळे तो फार खिन्न झाला. तो त्या मनुष्याला म्हणाला, “तुझा हात पुढे सरळ कर,” त्याने तो लांब केला आणि त्याचा हात बरा झाला. 6 नंतर परूशी निघून गेले आणि लगेच त्याला ठार करणे कसे शक्य होईल याविषयी हेरोदीयांबरोबर [a] येशूविरूद्ध कट करू लागले.
पुष्कळ लोक येशूच्या मागे जातात
7 येशू आपल्या शिष्यांसह गालील सरोवराकडे निघून गेला आणि गालील व यहूदीयातून मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे आला. 8 कारण तो करीत असलेल्या कृत्यांविषयी त्यांनी ऐकले व यरुशलेम, इदूमिया, यार्देनेच्या पलीकडच्या प्रदेशातून, सोर व सीदोनच्या आसपासच्या प्रदेशातून मोठा लोकसमुदाय येशूकडे आला.
9 मग गर्दीमुळे चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने आपल्या शिष्यांस एक छोटी होडी आणावयास सांगितली, 10 त्याने अनेक लोकांना बरे केले होते म्हणून ज्यांना रोग होते ते त्याला स्पर्श करण्यासाठी व वाट काढण्यासाठी पूढे रेटीत होते. 11 जेव्हा अशुद्ध आत्मे येशूला पाहत तेव्हा ते त्याच्यासमोर खाली पडून मोठ्याने ओरडत की, “तू देवाचा पुत्र आहेस!” 12 पण त्याने त्यांना सक्त ताकीद दिली की, मला प्रगट करू नका.
येशू त्याचे बारा शिष्य निवडतो(B)
13 नंतर येशू डोंगरावर गेला आणि जे त्याला पाहिजे होते त्यांना त्याने स्वतःकडे बोलाविल. व ते त्याच्याकडे आले. 14 त्याने बारा जण निवडले व त्यांना प्रेषीत हे नाव दिले. त्याने त्यांची यासाठी निवड केली की, त्यांनी त्याच्याजवळ असावे व त्यांना दुसऱ्या ठिकाणी उपदेश करण्यासाठी त्याला पाठविता यावे. 15 व त्यांना भुते काढण्याचा अधिकार असावा. 16 मग येशूने या बारा जणांची निवड केली
व जो शिमोन (त्याला पेत्र हे नाव दिले).
17 जब्दीचा मुलगा याकोब व याकोबाचा भाऊ योहान (यांना त्याने बेनेरेगेश, ज्याचा अर्थ “गर्जनेचे पुत्र” असा होतो हे नाव दिले.)
18 अंद्रिया,
फिलीप,
बर्थलमय,
मत्तय,
थोमा,
अल्फीचा मुलगा याकोब,
तद्दय,
शिमोन कनानी 19 आणि यहूदा इस्कर्योत ज्याने नंतर येशूचा विश्वासघात केला.
काही यहूदी येशूमध्ये अशुद्ध आत्मा आहे असे म्हणतात(C)
20 नंतर येशू घरी गेला आणि पुन्हा एकदा एवढा मोठा लोकसमुदाय जमला की, येशू व त्याचे शिष्य जेवूसुद्धा शकले नाहीत. 21 त्याच्या कुटुंबातील लोकांनी याविषयी ऐकले तेव्हा ते त्यास आणावयास गेले कारण लोक म्हणत होते की तो वेडा आहे.
22 यरूशलेमेहून आलेले नियमशास्त्राचे शिक्षक म्हणत होते की, “याच्यामध्ये बालजबूल आहे. आणि त्या भुतांच्या अधिपतीच्या सामर्थ्याने हा भुतांना घालवून देतो.”
23 मग य़ेशूने त्यांना जवळ बोलाविले व बोधकथेच्या साहाय्याने त्याच्याशी बोलू लागला, “सैतानच सैतानाला कसा काढू शकेल? 24 जर राज्यातच फूट पडली तर ते राज्य टिकू शकत नाही. 25 आणि घरातच फूट पडली तर ते घर टिकू शकत नाही. 26 तर मग सैतान स्वतःलाच विरोध करू लागला आणि त्याच्यातच फूट पडली तर तो टिकू शकणार नाही. परंतु त्याचा शेवट होईल.
27 “खरोखर कोणालाही बलवान मनुष्याच्या घरात शिरून त्याची मिळकत लुटता येणार नाही. प्रथम त्या बलवान माणसाला बांधले पाहिजे, मगच त्याचे घर लुटता येईल.
28 “मी तुम्हांस खरे सांगतो की, लोकांच्या पापांची व त्यांनी केलेल्या देवाच्या निंदेची त्यांना क्षमा होईल. 29 पण जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील, त्याची कधीच क्षमा होणार नाही आणि तो मनुष्य सार्वकालिक पापाचा दोषी आहे.”
30 येशू असे म्हणाला कारण नियमशास्त्राचे शिक्षक म्हणाले की त्याच्यामध्ये अशुद्ध आत्मा आहे.
येशूचे अनुयायी हे त्याचे खरे कुटुंब आहे(D)
31 नंतर येशूची आई आणि भाऊ तेथे आले. ते बाहेर उभे राहिले आणि कोणाला तरी त्याला बोलवावयास पाठविले. 32 लोकसमुदाय त्याच्याभोवती जमा झाला होता. लोक येशूला म्हणाले, “पाहा तुझी आई व तुझे भाऊ बाहेर तुझी वाट पाहात आहेत.”
33 त्याने त्यांना उत्तर दिले. “कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ?” 34 येशूने जे त्याच्याभोवती जमले होते त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाला, “हे पाहा माझी आई आणि माझे भाऊ. 35 जे जे कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतात तेच माझे भाऊ, माझी बहीण व माझी आई आहेत.”
यहुदींच्या मदतीसाठी राजाचा आदेश
8 यहूद्यांचा शत्रू असलेल्या हामानच्या मालकीची सर्व मालमत्ता त्याच राजा अहश्वेरोशने राणी एस्तेरला दिली. मर्दखयशी असलेले नाते एस्तेरने राजाला सांगितले. त्यानंतर मर्दखय राजाकडे आला. 2 राजाला आपली मुद्रा हामानकडून परत मिळाली होती. ती आपल्या बोटातून काढून राजाने मर्दखयला दिली. मग एस्तेरने मर्दखयला हामानच्या मालमत्तेचा प्रमुख नेमले.
3 एस्तेर मग राजाशी पुन्हा बोलली. त्याच्या पायाशी स्वतःला झोकून देऊन ती रडू लागली. आगागी हामानने आखलेली दुष्ट योजना राजाने रद्द करावी म्हणून त्याची विनवणी करु लागली. यहुद्यांना अपाय करण्याचा बेत हामानने आखला होता.
4 मग राजाने आपला सोन्याचा राजदंड एस्तेरपुढे केला. एस्तेर उठली आणि राजापुढे उभी राहिली. 5 मग ती म्हणाली, “राजा, तुला मी आवडत असेन आणि तुझ्या मनास येत असेल तर कृपया माझ्यासाठी एवढे कर. तुला ही कल्पना चांगली वाटत असेल तर कृपया तू असे कर. तुझी माझ्यावर मर्जी असल्यास हामानने पाठवलेला आदेश रद्द करणारा आदेश लिही. राजाच्या अंमलाखाली असलेल्या सर्व प्रांतांतील यहुद्यांच्या संहाराचा कट अगागी हामानने केला होता. आणि तो अंमलात आणण्यासाठी त्याने तशा आज्ञा पाठवल्या होत्या. 6 माझ्या लोकांवर ही भयंकर आपत्ती आलेली मला पाहवणार नाही. माझ्या लोकांची हत्या माझ्याने पाहवणार नाही.”
7 राजा अहश्वेरोशने राणी एस्तेर आणि मर्दखय यांना उत्तर दिले. राजा त्यांना म्हणाला, “हामान यहुद्यांविरुध्द होता म्हणून त्याची मालमत्ता मी एस्तेरला दिली. आणि माझ्या शिपायांनी त्याला वधस्तंभावर फाशी दिले आहे. 8 आता राजाच्या अधिकारात दुसरा आदेश लिहा. तुम्हाला सर्वात उत्तम वाटेल अशा पध्दतीने यहुद्यांना साहाय्यकारी होईल असा तो असू द्या. मग राजाच्या विशेष मुद्रेने त्या हुकामावर शिक्का उठवा. राजाच्या अधिकारात लिहिलेले आणि राजमुद्रेने मुद्रित केलेले राज्यकारभार विषयक पत्र कोणालाही रद्द करता येत नाही.”
9 राजाच्या लेखकांना ताबडतोब बोलवण्यात आले. तिसऱ्या म्हणजे शिवान महिन्याच्या तेविसाव्या दिवशी हे झाले. सर्व यहुदी आणि हिंन्दूस्तानपासून कूशपर्यंतच्या एकशेसत्तावीस प्रांतांमधील अधिपती, अधिकारी आणि सरदार यांना उद्देशून मर्दखयने दिलेले सर्व आदेश त्या लेखकांनी लिहून काढले. प्रत्येक प्रांताच्या भाषेत ते लिहिण्यात आले. प्रत्येक भाषिक गटाच्या भाषेत त्यांचा अनुवाद करण्यात आला. यहुद्यांच्या भाषेत आणि त्यांच्या लिपीत ते आदेश लिहिले गेले. 10 मर्दखयने राजा अहश्वेरोशच्या नावाने आदेश काढले. मग ते राजाच्या मुद्रेने मुद्रांकित केले. आणि जासूदांकरवी घोड्यावरुन पाठवले. खास राजासाठी जोपासलेल्या वेगवान घोड्यांवरुन हे जासूद गेले.
11 त्या पत्रांमधील राजाचे आदेश असे होते: प्रत्येक नगरातील यहुद्यांना स्वसंरक्षणासाठी एकत्र जमण्याचा अधिकार आहे. कोणत्याही प्रांतातील कोणतेही सैन्य त्यांच्यावर आणि त्यांच्या बायकामुलांवर चालून आले तर त्या सैन्याला ठार करण्याचा, त्याला पुरते नेस्तनाबूत करण्याचा हक्क त्यांना आहे. आपल्या शत्रूची मालमत्ता ताब्यात घ्यायचा, तिची नासधूस करायचा यहुद्यांना अधिकार आहे.
12 अदारच्या म्हणजे बाराव्या महिन्यातल्या तेराव्या दिवशी यहुद्यांवर कारवाई करायची असे ठरले होते. त्यामुळे यहुद्यांना राजा अहश्वेरोशच्या सर्व प्रांतांत असा प्रतिकार करायची मुभा होती. 13 राजाच्या आज्ञापत्राची प्रत पाठवायची होती. हे आज्ञापत्र म्हणजे कायदाच होता. प्रत्येक प्रांतात तो कायदा लागू होता. राजाच्या साम्राज्यातील सर्व प्रदेशांमध्ये तो जाहीर केला गेला. यहूद्यांनी या विशिष्ट दिवशी तयार राहावे, त्यांना शत्रूला शह देता यावा म्हणून हा आदेश पाठवला गेला. 14 राजाच्या घोड्यांवर स्वार होऊन जासूद तातडीने निघाले. राजानेच त्यांना वेळ न गमावता जायला लावले. हाच आदेश शूशन राजधानीतही दिला गेला.
15 मर्दखय राजाकडून निघाला. त्याने राजाकडचा विशेष पोषाख घातला होता. त्याचे कपडे निळया आणि पांढऱ्या रंगाचे होते. मोठा सोन्याचा मुकुट त्याने घातला होता. तलम सणाचा जांभळा झगा त्याने वर चढवला होता. शूशनमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. लोक अतिशय आनंदात होते. 16 यहूद्यांच्या दृष्टीने ती पर्वणी होती. त्यामुळे त्यादिवशी जल्लोषाचे वातावरण होते.
17 ज्या ज्या प्रांतात आणि नगरात राजाची आज्ञा पोचे तिथे तिथे यहुद्यांमध्ये आनंद आणि उल्हास पसरे. त्यांनी भोजनसमारंभ केले. इतरांमधले बरेच लोकही यहूदी बनले. कारण त्यांना यहूद्यांची भीती वाटू लागली.
3 तर मग यहूदी असण्यात फायदा काय? किंवा सुंतेपासून फायदा काय? 2 सर्व बाबतीत पुष्कळच आहे. कारण सर्वप्रथम त्यांना देवाची वचने विश्वासाने सोपविण्यात आली होती. 3 हे खरे आहे की त्यातील काही अविश्वासू होते; देवाच्या विश्वासूपणाला अविश्वासूपणा नाहीसा करील काय? 4 खात्रीने नाही! देव खरा असलाच पाहिजे आणि प्रत्येक मनुष्य खोटा, पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की,
“तू बोलशील तेव्हा योग्य ठरशील आणि तुझा न्याय होत
असता तू विजय मिळविशील.” (A)
5 जर आपल्या दुष्टपणामुळे देवाचा न्याय स्पष्ट होत असेल तर त्याला काय म्हणावे? देव जो आपणावर क्रोध आणतो त्याला अनीतिमान म्हणावे काय? (मी हे मानवाप्रमाणे बोलतो). 6 खात्रीने नाही! कारण मग देव जगाचा न्याय कसा करील?
7 परंतु तुम्ही असे म्हणाला की, “जर देवाचा खरेपणा माझ्या खोटेपणामुळे त्याच्या गौरवासाठी उठून दिसत असेल, तर मग मी पापी का गणला जातो?” 8 आपण का वाईट करु नये जर त्याचा परिणाम चांगला होत असेल. कारण काही जण आपल्या विरुध्द वाईट बोलत आहेत, आणि त्यांना मिळणारी शिक्षा त्याबद्दलचा न्याय आहे.
सर्व लोक दोषी आहेत
9 तर मग काय? आम्ही यहूदी, विदेशी लोकांपेक्षा अधिक चांगल्या स्थितीत आहोत काय? मुळीच नाही! कारण यहूदी आणि ग्रीक हे सारखेच पापाच्या अधिकाराखाली आहेत. 10 शास्त्रात असे लिहिले आहे:
“पापाशिवाय असा कोणीही नाही.
एकही नाही.
11 समंजस असा कोणी नाही.
कोणीही देवाचा शोध करीत नाही.
12 ते सर्व दूर गेले आहेत,
आणि सर्व लोक निरुपयोगी झाले आहेत.
चांगले करणारा कोणी नाही,
एकही नाही.” (B)
13 “लोकांची तोंडे उघड्या कबरांसारखी आहेत
ते आपल्या जिभांनी लोकांना फसवितात.” (C)
“ते ज्या गोष्टी बोलतात त्यात सापाचे विष असते.” (D)
14 “त्यांची तोंडे शापांनी आणि कडूपणाने भरली आहेत.” (E)
15 “त्यांचे पाय रक्तपात करण्यास नेहमी तयार असतात.
16 जेथे कोठे ते जातात तेथे विध्वंस व विपत्ती आणतात.
17 त्यांना शांतीचा मार्ग माहीत नाही.” (F)
18 “त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही.” (G)
19 आता आपणाला माहीत आहे की, नियमशास्त्र जे सांगते ते नियमशास्त्राच्या आधिन असणाऱ्यांकरिता आहे व मनुष्यांच्या कामचुकार पणाला आळा घालण्यासाठी व सर्व जगाला चांगले व पूर्ण होण्यासाठी आहे. त्या नियमशास्त्रा प्रमाणे सर्व दोषी आहेत. 20 नियमशास्त्राच्या कर्मांनी कोणीही देवासमोर नीतिमान ठरणार नाही. कारण नियमशास्त्राद्वारे पापाची जाणीव होते.
देव लोकांना नीतिमान कसे करतो?
21 परंतु आता देवाची मानवाविषयीची नीतिमत्वाची कृती नियमशास्त्राव्यतिरिक्त प्रगट झाली आहे. त्याला नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांची साक्ष आहे. 22 देवाची नीतिमत्त्वाची कृती ही येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे आहे आणि जे विश्वास ठेवतात त्या सर्वांसाठी दाखविली आहे. त्यात भेदभाव नाही. 23 सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. 24 परंतु त्यांना देवाने त्याच्या कृपेने येशू ख्रिस्ताद्वारे खंडणी भरुन नीतिमान ठरविले आहे. 25-26 लोकांच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून ख्रिस्ताचे रक्त सांडून देवाने त्याला जाहीरपणे पुढे केले. देवाने हे यासाठी सिद्ध केले की तो नीतिमान आहे हे सिद्ध व्हावे.देवाच्या सहनशीलतेमुळे त्याने हे सिद्ध केले की, या सध्याच्या काळी तो नीतिमान आहे. यासाठी जो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, तो नीतिमान असावा.
27 मग आमच्या बढाई मारण्याचे प्रयोजन काय? ती वगळण्यात आली. कोणत्या प्रकारच्या नियमाने? कर्माच्या काय? नाही, तर ज्यामध्ये विश्वास आहे, त्याच्या आधारे. 28 कारण आपण असे मानतो की, मनुष्य देवावरील विश्वासाने नियमशास्त्रातील कर्माशिवाय नीतिमान ठरतो. 29 किंवा देव फक्त यहूद्यांचाच आहे काय? तो विदेशी लोकांचा नाही काय? होय, तो विदेशी लोकांचादेखील आहे. 30 ज्याअर्थी देव एकच आहे, त्याअर्थी तो ज्यांची सुंता झाली आहे, त्यांच्या विश्वासाने आणि ज्यांची सुंता झालेली नाही अशांनाही विश्वासाने नीतिमान ठरवील. 31 तर मग आपण या विश्वासाचा आग्रह धरुन नियमशास्त्र निरर्थक ठरवितो काय? खात्रीने नाही, आपण तर नियमशास्त्राला मान्यता देतो.
2006 by World Bible Translation Center