M’Cheyne Bible Reading Plan
निघण्याची वेळ-याकोब पळून जातो
31 एके दिवशी लाबानाचे मुलगे आपसात बोलत असताना याकोबाने ऐकले; ते म्हणाले, “आपल्या बापाच्या मालकीचे सर्वकाही याकोबाने घेतले आहे आणि ती धनदौलत घेतल्यामुळे तो श्रीमंत झाला आहे.” 2 तेव्हा लाबान पूर्वी आपल्याशी जसा मित्राप्रमाणे प्रेमाने वागत आला होता तसा तो आता वागत नसल्याचे याकोबाच्या लक्षात आले; 3 परमेश्वर याकोबाला म्हणाला, “तुझे पूर्वज ज्या देशात राहिले त्या तुझ्या देशास तू परत जा, आणि मी तुझ्याबरोबर असेन.”
4 तेव्हा याकोबाने राहेल व लेआ यांना, तो आपले शेरडामेंढरांचे कळप राखीत होता तो तेथे येऊन त्याला भेटण्यास सांगितले; 5 याकोब, राहेल व लेआ यांना म्हणाला, “तुमचा बाप माझ्यावर रागावला असल्याचे मला समजले आहे; पूर्वी तुमचा बाप माझ्याशी नेहमी मित्राप्रमाणे फार प्रेमाने वागत होता, परंतु आता ते तसे वागत नाहीत; परंतु माझ्या वडिलांचा देव माझ्याबरोबर आहे. 6 तुम्हां दोघींनाही माहीत आहे की जेवढे कष्ट घेणे मला शक्य होते तेवढे कष्ट घेऊन मी तुमच्या बापासाठी काम केलेले आहे; 7 परंतु तुमच्या बापाने मला फसवले; त्यानी माझ्या वेतनात दहा वेळा बदल केलेला आहे; परंतु या सर्व काळात लाबानाच्या फसवणूकीच्या कारवाया पासून देवाने माझे रक्षण केले.
8 “एकदा लाबान म्हणाला, ‘सर्व ठिबकेदार शेळ्या तू ठेवून घे, त्या तुला वेतनादाखल होतील,’ त्याने असे म्हटल्यानंतर सर्व शेळ्यांना ठिबकेदार करडे होऊ लागली; तेव्हा अर्थात् ती सर्व माझी झाली; परंतु मग लाबान म्हणाला, ‘तू बांड्या बकऱ्या घे; त्या तुला वेतना दाखल होतील;’ त्याने असे म्हटल्यानंतर सर्व बकऱ्यांना बांडी करडे होऊ लागली, 9 तेव्हा अशा रीतीने देवाने तुमच्या बापाच्या कळपातून जनावरे काढ्न घेऊन ती मला दिलेली आहेत.
10 “जेव्हा माद्यावर नर उडत होते त्या ऋतूत मला स्वप्न पडले त्यात मी असे पाहिले की फक्त ठिबकेदार व बांडे असलेलेच नर उडत होते; 11 देवदूत माझ्याशी बोलला; त्याने मला, ‘याकोब’ म्हणून हाक मारली.
“मी उत्तर दिले, ‘काय आज्ञा आहे?’
12 “देवदूत म्हणाला, ‘पाहा, फक्त ठिबकेदार व बांडे असलेलेच नर माद्यांवर उडत आहेत! हे मी घडवून आणीत आहे. लाबान तुझ्याशी अन्यायाच्या गोष्टी कशा करीत आहे ते मी पाहिलेले आहे; म्हणूनच मी हे करीत आहे की त्यामुळे तुला नवीन जन्मलेली सर्व करडे मिळावीत. 13 बेथेलमध्ये जो मी तुझ्याकडे आला तो मी देव; आहे; त्या ठिकाणी तू वेदी बांधलीस, तिच्यावर तेल ओतलेस आणि तू मला वचन दिलेस आता तू ज्या देशात जन्मलास त्या आपल्या मायदेशी परत जाण्यास तयार असावेस अशी माझी इच्छा आहे.’”
14 राहेल व लेआ यांनी याकोबाला उत्तर दिले, “आमच्या बापाच्या मरणानंतर आम्हास वारसा म्हणून मिळण्याकरिता त्यांच्याजवळ काही नाही; 15 आम्ही परक्या असल्यासारखे त्यानी आम्हाला वागवले त्याने आम्हांस तुम्हाला विकून टाकले आहे आणि आमचे सर्व पैसे खर्च करुन टाकले. 16 देवाने ही सर्व संपत्ती आमच्या बापाकडून घेतली आणि आता ती आपली व आपल्या मुळाबाळांची संपत्ती झाली आहे; तेव्हा देवाने तुम्हास जे करावयास सांगितले आहे ते करा!”
17 तेव्हा याकोबाने आपल्या प्रवासाची तयारी केली; त्याने आपल्या बायकामुलांना उंटावर बसवले; 18 नंतर आपला बाप राहात होता त्या कनान देशास परत जाण्यासाठी त्यांनी प्रवास सुरु केला; याकोबाच्या मालकीच्या जनावरांचे कळप त्यांच्यापुढे चालले, पदन अराम येथे राहात असताना त्याने मिळवलेली सर्व मालमत्ता त्याने आपल्या बरोबर नेली.
19 त्याच वेळी लाबान आपल्या मेंढरांची लोकर कातरण्यास गेला होता; तो गेला असताना राहेल त्याच्या घरात गेली आणि तिने आपल्या बापाच्या कुलदेवतांच्या मूर्ती चोरल्या.
20 याकोबाने अरामी लाबानास फसवले; कारण आपण येथून निघून आपल्या देशाला जात आहो हे त्याने लाबानास सांगितले नाही; 21 याकोब आपली बायकांमुले व सर्व चीजवस्तू घेऊन ताबडतोब निघाला; त्यांनी फरात नदी ओलांडली आणि ते गिलाद डोंगराळ प्रदेशाकडे निघाले.
22 तीन दिवसानंतर याकोब पळून गेल्याचे लाबानास कळाले. 23 तेव्हा त्याने आपली माणसे एकत्र जमवली आणि याकोबाचा पाठलाग सुरु केला. सात दिवसांनतर गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाजवळ त्याला याकोब सापडला. 24 त्या रात्री देव लाबानाच्या स्वप्नात येऊन म्हणाला, “लाबाना, सावधान! तू याकोबाशी बोलताना प्रत्येक शब्द संभाळून वापर.”
चोरलेल्या कुलदेवतांचा शोध
25 दुसऱ्या दिवशी सकाळी लाबानाने याकोबाला गाठले; याकोबाने डोंगरावर आपला तळ दिला होता म्हणून लाबानानेही आपल्या बरोबरच्या माणसांसह गिलादाच्या डोंगराळ भागात आपला तळ दिला.
26 लाबान याकोबाला म्हणाला, “तू मला का फसवलेस? युद्धात धरुन नेलेल्या स्त्रियां प्रमाणे तू माझ्या मुलींना का घेऊन आलास? 27 तू मला न सांगता का पळून गेलास? तुला जायचे आहे असे तू मला सांगितले असतेस तर नाचगाणी बजावणी व संगिताची धामधूम या सहित मी तुला मेजवानी दिली असती; 28 अरे, तू मला माझ्या लाडक्या नातवांचा व माझ्या प्रिय मुलींचा निरोप घेण्याची संधी ही दिली नाहीस की त्यांची चुंबने घेण्यास सवड दिली नाहींस! तू हा अगदी मूर्खपणा केलास! 29 खरे तर अपाय करण्याची माझ्यात ताकद आहे परंतु गेल्या रात्री तुझ्या बापाचा देव माझ्या स्वप्नात आला आणि मी तुला कोणत्याच प्रकारे अपाय करु नये म्हणून त्याने मला ताकीद दिली आहे; 30 तुला तुझ्या बापाच्या घरी जायचे आहे हे मला माहीत आहे आणि म्हणूनच तू जाण्यास निघालास परंतु तू माझ्या घरातील कुलदेवाता का चोरल्यास?”
31 याकोबाने उत्तर दिले, “मी तुम्हाला न सांगता निघालो कारण मला भीती वाटली; मला विचार आला की तुम्ही तुमच्या मुली माझ्यापासून घेऊन जाल; 32 परंतु मी तुमच्या कुलदेवता मुळीच चोरल्या नाहीत. जर येथे माझ्याबरोबर असणाऱ्या कोणी तुमच्या कुलदेवता घेतल्या आहेत असे तुम्हाला आढळले तर ती व्यक्ती ठार केली जाईल; तुमची माणसे या बाबतीत माझे साक्षी असतील; तुमच्या कोणत्याही चीजवस्तूसाठी तुम्ही झडती घेऊ शकता; जे काही तुमचे असेल ते घेऊन जा.” (राहेलीने लाबानाच्या कुलदेवाता चोरल्या होत्या ते याकोबास माहीत नव्हते.)
33 म्हणून मग लाबानाने याकोबाच्या छावणीची झडती घेतली; त्याने याकोबाच्या तंबूची व नंतर लेआच्या तंबूची झडती घेतली; त्यानंतर त्याच्या घरातील कुलदेवता सापडल्या नाहीत. त्यानंतर लाबान राहेलीच्या तंबूत गेला. 34 राहेलीने त्या कुलदेवता आपल्या उंटाच्या कंठाळीत लपवून ठेवल्या होत्या आणि ती त्यांच्यावर बसली होती. लाबानाने सगळा तंबू शोधून पाहिला परंतु त्या कुलदेवता कोठेही सापडल्या नाहीत.
35 आणि राहेल आपल्या बापाला म्हणाली, “बाबा, मी आपल्यासमोर उभी राहू शकत नाही म्हणून माझ्यावर रागावू नका, कारण माझा मासिक धर्म आला आहे.” अशी रीतीने लाबानाने तळाची कसून तपासणी केली परंतु त्याला कुलदेवता सापडल्या नाहीत.
36 मग याकोबाला फार राग आला. तो म्हणाला, “मी काय वाईट केले आहे? मी कोणता करार मोडला आहे? माझा पाठलाग करण्याचा आणि मला थांबविण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? 37 माझ्या मालकीच्या सर्व चीजवस्तू तुम्ही तपासून पाहिल्या आहेत आणि तुम्हाला तुमच्या मालकीची एकही चीजवस्तू आढळली नाही; जर तुम्हाला तुमचे काही मिळाले असेल तर ते मला दाखवा; ते या ठिकाणी समोर ठेवा म्हणजे तुमची आमची माणसे ते बघतील. तुमच्या व माझ्यामध्ये कोण खरा आहे हे या माणसांना ठरवू द्या. 38 मी तुमची वीस वर्षे सेवाचाकरी केलेली आहे. त्या सर्व काळात एकही करडू किंवा कोकरु मेलेले जन्मले नाहीं; आणि तुमच्या कळपातील एकही एडका मी खाल्ला नाही. 39 एखाद्या वेळी जर एखादी मेंढी जनावरांनी ठार मारली तर ती मी नेहमीच माझ्या कळपातून भरुन दिली. मी कधीही मेलेले जनावर तुमच्याकडे घेऊन आलो नाही आणि यात माझा काही दोष नाही असे म्हणालो नाही. दिवसा व रात्री मी तुमच्या कळपाची काळजी घेतली. 40 दिवसा सूर्याच्या उन्हातापाने माझी शक्ती क्षीण होई व रात्री थंडीगारठ्यामुळे माझ्या डोळ्यातील झोंप काढून घेतली जाई. 41 वीस वर्षे एखाद्या गुलामासारखी मी तुमची सेवाचाकरी केली; पाहिली चौदा वर्षे तुमच्या दोन मुली जिंकण्यासाठी आणि शेवटची सहा वर्षे तुमचे कळप वाढावेत म्हणून मी कष्ट केले; आणि त्या काळात दहा वेळा तुम्ही माझ्या वेतनात फेरबदल केला; 42 परंतु माझ्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव आणि इसाहाकाचा देव (म्हणजे ‘भय’) माझ्या संगती होता. जर देव माझ्याबरोबर नसता तर तुम्ही मला रिकामेच माझ्या घरी पाठवले असते; परंतु देवाने मला झालेला त्रास पाहिला; देवाने मी कष्टाने केलेले काम पाहिले आणि काल रात्री देवाने सिद्ध करुन दाखवले की मी रास्त माणूस आहे.”
याकोब व लाबान यांच्यामधील करार
43 लाबान याकोबाला म्हणाला, “ह्या मुली माझ्या कन्या आहेत आणि त्यांची मुले माझ्या ताब्यात आहेत आणि ही जनावरेही माझीच आहेत; येथे तू जे पाहतोस ते सर्व माझे आहे; परंतु माझ्या मुली व त्यांची मुले यांना ठेवून घेण्यासंबंधी मी काही करु शकत नाही. 44 म्हणून मी तुझ्याशी करार करण्यास तयार आहे. आपण करार केला आहे हे दाखविण्यासाठी खूण म्हणून येथे दगडांची रास रचू.”
45 तेव्हा याकोबास एक मोठा धोंडा सापडला. तो त्याने करार केला होता हे दाखविण्यासाठी तेथे ठेवला. 46 त्याने त्याच्या माणसांना आणखी काही दगड शोधून त्यांची रास करण्यास सांगितले. नतर त्या दगडांच्या राशीशेजारी बसून ते जेवले. 47 लाबानाने त्या जागेचे नाव यगर सहादूथा ठेवले; परंतु याकोबाने त्या जागेचे नाव गलेद ठेवले. (गलेद हे गिलादाचे दुसरे नाव, हिब्रू भाषेत “कराराची-दगडांची रास”)
48 लाबान याकोबास म्हणाला, “ही दगडांची रास आपण केलेल्या कराराची आठवण ठेवण्यास आपणा दोघास मदत करील.” म्हणूनच याकोबाने त्या जागेचे नाव गलेद ठेवले.
49 मग लाबान म्हणाला, “आपण एकमेकापासून अलग होत असताना परमेश्वर आपणावर लक्ष ठेवो.” म्हणून त्या जागेचे नाव मिस्पा ठेवण्यात आले.
50 नंतर लाबान म्हणाला, “जर का तू माझ्या कन्यांना दु:ख देशील तर देव तुला शिक्षा करील हे लक्षात ठेव. जर का तू इतर स्त्रियांशी लग्न करशील तर देव पाहात आहे हे लक्षात ठेव. 51 आपणामध्ये येथे साक्षी म्हणून मी ही दगडांची रास ठेवली आहे आणि हा येथे विशेष स्तंभ आहे त्यावरुन आपण येथे करार केला हे दिसेल. 52 ही रास व हा स्तंभ ही दोन्ही आपल्यातील कराराची आपणास आठवण देण्यास मदत करोत ही ओलांडून मी तुझ्या विरुद्व भांडणतंटा करण्यास तुझ्याकडे कधीही जाणार नाही आणि तू ही माझ्याविरुद्व भांडणतंटा करण्यास माझ्या बाजूकडे, ही ओलांडून कधीही येऊ नये. 53 जर आपण हा करार मोडल्याचा दोष करु तर अब्राहामाचा देव, नाहोराचा देव आणि त्यांच्या पितरांचा देव आमचा न्याय करो व आम्हास दोषी ठरवो.”
याकोबाचा बाप, इसहाक देवाला “भय” म्हणत असे म्हणून याकोबाने “भय” हे नाव वापरुन शपथ घेतली. 54 मग याकोबाने त्या डोंगरावर एक पशू मारला व तो देवाला देणगी म्हणून अर्पण केला आणि त्याने आपल्या सर्व माणसांना भोजनासाठी येऊन सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. भोजन संपल्यावर त्यांनी ती रात्र डोंगरावरच घालवली. 55 दुसऱ्या दिवशी लाबान पहाटेस उठला. त्याने आपल्या कन्या व आपली नातवंडे यांची चुंबने घेऊन त्यांचा निरोप घेतला. त्याने त्यांना आशीर्वाद दिला आणि मग तो आपल्या घरी परत गेला.
येशू एका पक्षघाती मनुष्याला बरे करतो(A)
2 नंतर काही दिवसांनी येशू कफर्णहूमास परत गेला. तो घरी आहे ही बातमी लोकांपर्यंत गेली. 2 तेव्हा इतके लोक जमले की जागा उरली नाही. एवढेच नव्हे तर दाराबाहेरदेखील जागा नव्हती. येशू त्यांना उपदेश करीत होता. 3 काही लोक त्याच्याकडे पक्षघाती मनुष्याला घेऊन आले. त्याला चौघांनी उचलून आणले होते. 4 परंतु गर्दीमुळे त्यांना त्या मनुष्याला येशूजवळ नेता येईना, मग तो होता तेथील त्याच्यावरचे छपर त्यांनी काढले व ज्या खाटेवर तो मनुष्य होता. ती खाट त्यांनी छपरातून खाली सोडता येईल अशी जागा केली व त्या पक्षघाती मनुष्याला खाली सोडले. 5 येशूने त्यांचा विश्वास पाहिला तेव्हा तो पक्षघाती मनुष्याला, म्हणाला, “मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”
6 तेथे नियमशास्त्राचे काही शिक्षक बसले होते. ते आपसात कुजबूज करीत होते की, 7 “हा मनुष्य असे का बोलत आहे? हा देवाची निंदा करीत आहे. देवाशिवाय कोण पापांची क्षमा करू शकतो?”
8 आणि येशूला त्याच क्षणी त्याच्या आत्म्यात समजले की, ते स्वतःशी असा विचार करीत आहेत. तो त्यांस म्हणाला, “तुम्ही या गोष्टीविषयी आपसात का कुजबूज करता? 9 तूझ्या पापांची क्षमा झाली आहे, असे या पक्षघाती मनुष्याला म्हणणे किंवा ऊठ आपला बिछाना उचल आणि आपल्या घरी जा, असे म्हणणे; यातील कोणते सोपे आहे?” 10 परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे समजावे म्हणून तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, 11 “मी तुला सांगतो, ऊठ, तुझा बिछाना उचल आणि आपल्या घरी जा.”
12 मग तो लगेच उठला. त्याने आपला बिछाना घेतला व सर्वाच्या समक्ष बाहेर गेला. यामुळे ते सर्व थक्क झाले. त्यांनी देवाची स्तुती केली आणि म्हणाले, “यासारखे आम्ही कधी पाहिले नव्हते.”
लेवी (मत्तय) येशूमागे जातो(B)
13 येशू पुन्हा सरोवराकडे गेला व पुष्कळ लोक तेथे त्याच्यामागे गेले आणि त्याने त्यांस शिक्षण दिले. 14 नंतर तो जात असता त्याने अल्फीचा मुलगा लेवी यांस जकातनाक्यावर बसलेले पाहिले. मग येशू लेवीला म्हणाला, “माझ्या मागे ये.” तेव्हा लेवी उठाला आणि येशूच्या मागे गेला.
15 नंतर येशू लेवीच्या घरी जेवत असता पुष्कळ जकातदार व पापी लोकही येशू व त्यच्या शिष्यांबरोबर जेवत होते. कारण तेथे जे त्याच्यामागे आले होते त्यांच्यापैकी पुष्कळ जण होते, 16 काही नियमशास्त्राचे शिक्षक जे परुशी होते त्यांनी येशूला पापी व जकातदारांबरोबर जेवताना पाहिले. ते त्याच्या शिष्यांस म्हणाले, “येशू हा पापी व जकातदार यांच्याबरोबर का जेवत आहे?”
17 येशूने हे ऐकले आणि तो त्यांना म्हणाला, “जे निरोगी आहेत त्यांस वैद्याची गरज नाही पण रोग्यांस आहे. मी नीतिमान लोकांस नाही तर पाप्यांस बोलवावयास आलो आहे.”
येशू इतर धार्मिक पुढाऱ्यांसारखा नाही(C)
18 जेव्हा योहानाचे शिष्य व परूशी उपास करीत होते. ते काहीजण येशूकडे आले आणि त्याला म्हणाले, “योहानाचे शिष्य व परूशी लोक उपास करतात परंतु तुझे शिष्य उपास का करीत नाहीत?”
19 येशू म्हणाला, “खरोखर जोपर्यंत वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपयंर्त त्यांनी उपास करावा अशी तुमची अपेक्षा आहे काय? जोपर्यंत त्यांच्याबरोबर वर आहे तोपयंर्त त्यांना उपास करणे शक्य नाही. 20 परंतु असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून घेतला जाईल आणि नंतर ते त्या दिवशी उपास करतील.
21 “कोणी नव्या कापडाचा तुकडा जुन्या कापडाला जोडीत नाही, जर तो असे करतो तर नवे कापड आकसून जाईल व जुन्याला अधिक फाडील व ते अधिकच फाटेल. 22 तसेच नवा द्राक्षारस कोणीही द्राक्षारसाच्या जुन्या कातडी पिशवीत घातील नाही. जर तो असे करतो तर द्राक्षारस कातडी पिशवीला फाडील आणि द्राक्षारस व द्राक्षारसाची कातडी पिशवी यांचा नाश होईल. म्हणून तो नवा द्राक्षारस नव्या पिशवीत घालतो.”
काही यहूदी येशूवर टीका करतात(D)
23 नंतर असे झाले की, येशू शब्बाथ दिवशी शेतातून जात असता, जाताना त्याचे शिष्य कणसे मोडू लगले. 24 तेव्हा परूशी येशूला म्हणाले, “पाहा, शब्बाथ दिवशी जे करू नये ते हे का करतात?”
25 येशू म्हणाला, “जेव्हा दावीद व त्याच्याबरोबर असलेल्यां लोकांना भूक लागली व त्यांना खावयाला हवे होते. तेव्हा त्यांनी काय केले याविषयी तुम्ही ऐकले नाही काय? 26 अब्याथार प्रमुख याजक असताना, तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि देवाला समर्पित केलेल्या भाकरी, ज्या नियमशास्त्राप्रमाणे याजकाशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या कशा खाल्ल्या व जे त्याच्याबरोबर होते त्यांनाही कशा दिल्या, याविषयी तुम्ही वाचले नाही काय?”
27 तो त्यास सांगत होता, “शब्बाथ मनुष्यांसाठी करण्यात आला. मनुष्य शब्बाथासाठी करण्यात आला नाही. 28 म्हणून मनुष्याचा पुत्र शब्बाथाचादेखील प्रभु आहे.”
हामानला फाशी
7 तेव्हा राजा आणि हामान राणी एस्तेरकडे भोजनाला गेले. 2 मेजवानीच्या या दुसऱ्या दिवशी ते द्राक्षारस घेत असताना राजाने पुन्हा एस्तेरला विचारले, “राणी एस्तेर, तुला काय हवे आहे? काहीही माग. ते तुला मिळेल. काय हवे तुला? तुला मी काहीही देईन. अगदी अर्धे राज्य देखील.”
3 तेव्हा राणी म्हणाली, “राजा, तुला मी आवडत असेन आणि तुझी मर्जी असेल तर कृपा करून मला जगू दे. माझ्या लोकांनाही जगू दे. एवढेच माझे मागणे आहे. 4 कारण, पुरते नेस्तनाबूत होण्यासाठी, मारले जाण्यासाठी मी आणि माझे लोक विकले गेलो आहोत. आमची नुसती गुलाम म्हणून विक्री झाली असती तरी मी गप्प राहिले असते. कारण राजाला तसदी देण्याइतकी ती समस्या गंभीर ठरली नसती.”
5 तेव्हा राजा अहश्वेरोशने राणी एस्तेरला विचारले, “असे तुमच्या बाबतीत कोणी केले? तुझ्या लोकांच्या बाबतीत असे करण्याचे धाडस करणारा कोण तो माणूस?”
6 एस्तेर म्हणाली, “तो आपल्या समोरच आहे. हाच तो दुष्ट हामान आमचा शत्रू.”
तेव्हा राजा आणि राणीसमोर हामान भयभीत झाला. 7 राजाला अतिशय संताप आला. द्राक्षारस तसाच टाकून तो उठला आणि बाहेर राजबागेत गेला. पण हामान आपले प्राण वाचवण्याची याचना करत आत राणी एस्तेरजवळच थांबला. राजाने आपला वध करायचे ठरवले आहे याची कल्पना असल्यामुळे तो आपल्या प्राणांची भीक मागू लागला. 8 बागेतून राजा मेजवानीच्या दालनात येत असतानाच, ज्या आसनावर एस्तेर बसली होती त्यावर हामानला पडताना राजाने पाहिले. तेव्हा संतापून राजा म्हणाला, “मी घरात असतानाच राणीवर जबरदस्ती करणार आहेस की काय?”
राजा असे म्हणाल्याबरोबर सेवक आत आले आणि त्यांनी हामानचे तोंड झाकले. 9 हर्बोना नावाचा राजाचा खोजा म्हणाला, “हामानच्या घराजवळ पंचाहत्तर फूट उंचीचा वधस्तंभ उभारला आहे. मर्दखयला फाशी द्यायला त्याने तो उभारला होता. तुम्हाला ठार करायचा कट उघडकीला आणून ज्याने तुम्हाला मदत केली तोच हा मर्दखय.”
राजा म्हणाला, “हामानला त्या स्तंभावरच फाशी द्या.”
10 तेव्हा मर्दखयसाठी उभारलेल्या स्तंभावर हामानला फाशी देण्यात आली. राजाचा क्रोध शमला.
तुम्ही यहूदीसुद्धा पापी आहात
2 म्हणून हे मनुष्या, तू जो कोणी आहेस व जेव्हा तू न्यायासनासमोर बसतोस तेव्हा तुला सबब नाही, कारण जेव्हा तू दुसऱ्यांचा न्याय करतोस तेव्हा तू स्वतःलाही दोषी ठरवितोस कारण जो तू न्याय करतोस, तो तूही तीच गोष्ट करतोस. 2 आता आपणांला माहीत आहे की, जे अशा वाईट गोष्टी करतात त्यांचा न्याय देव करतो. आणि देवाचा न्याय योग्य असतो. 3 तुम्हीसुद्धा जे अशा वाईट गोष्टी करतात त्यांचा न्याय करता पण तुम्हीसुद्धा त्याच गोष्टी करता म्हणून निश्चितपणे तुम्हांला माहीत आहे की, देव तुमचा न्याय करील आणि स्वतःची सुटका करुन घेणे तुम्हांला शक्य होणार नाही. 4 देव तुमच्याशी अत्यंत दयाळूपणे वागतो. तो तुमच्याशी सहनशीलतेने वागतो, तुमच्यामध्ये बदल व्हावा म्हणून देव वाट पाहतो, पण त्याच्या दयाळूपणाबद्दल तुम्ही काहीच विचार करीत नाही. कदाचित तुम्ही तुमचे मन व जीवन बदलावे म्हणून देव तुमच्याशी दयाळूपणे वागतो हे तुम्हांला समजत नसेल.
5 पण तुम्ही लोक कठीण व उद्धट मनाचे आहात, तुम्ही बदलण्यास तयार नाही, त्यामुळे तुम्ही स्वतःच तुमची शिक्षा अधिकाधिक वाढवित आहात. जेव्हा देव (तुम्हाला) त्याचा क्रोध दर्शवील, त्यावेळी तुम्हांला शिक्षा होईल. त्या दिवशी लोक देवाचा यथायोग्य न्याय पाहतील. 6 देव प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल. 7 नेटाने चांगले करीत राहून गौरव, मान, अमरत्व मिळविण्याचा जे लोक प्रयत्न करतात त्यांना तो अनंतकाळचे जीवन देईल. 8 परंतु जे स्वार्थीपणामुळे सत्यात चालणे नाकारतात, व अनीतिने चालतात त्यांची तो क्रोधाने भरपाई करील. 9 जो जे वाईट ते करतो, त्या प्रत्येक मानवावर संकटे आणि दु:खे येतील. म्हणजे पहिल्यांदा यहूद्यांवर व नंतर ग्रीक लोकांवर येतील. 10 परंतु जो चांगली कृत्ये करतो त्या प्रत्येकाला गौरव, मान आणि शांति मिळेल. प्रथम यहूद्यांना व मग ग्रीक लोकांना मिळेल. 11 देवाजवळ पक्षपात नाही.
12 जे सर्व नियमशास्त्राबाहेर असून पाप करतात, ते नियमशास्त्राबाहेर नाश पावतील. व जितक्यांनी नियम शास्त्राधीन असून पाप केले तितक्यांना नियमशास्त्रानुसार शिक्षा होईल. 13 कारण जे नियमशास्त्र ऐकतात ते देवाच्या दृष्टीने नितिमान आहेत असे नाही. परंतु जे नियमशास्त्र पाळतात आणि नियमशास्त्रांत सांगितल्याप्रमाणे करतात ते नीतिमान ठरतील.
14 कारण जेव्हा यहूदी नसलेले (विदेशी) ज्यांना नियमशास्त्र नाही, मूलतः जरी त्यांना नियमशास्त्र नाही, तरीही नियमशास्त्राप्रमाणे करतात ते स्वतःच नियमशास्त्र आहेत. 15 म्हणजे ते त्यांच्या ह्रदयात नियमशास्त्र लिहिले आहे, असे दाखवतात त्यांची सद्सद्विवेक बुद्धीसुध्दा साक्ष देते आणि त्यांचे एकमेकां विषयीचे विचार त्यांना आरोपी किंवा दोषमुक्त करतात.
16 जेव्हा देव येशू ख्रिस्ताद्वारे मनुष्यांच्या रहस्यांचा, माझ्या सुवार्तेप्रमाणे न्याय करील त्या दिवशी या गोष्टी घडतील.
यहूदी आणि नियमशास्त्र
17 परंतु आता तुम्ही जे स्वतःला यहूदी समजता आणि नियमशास्त्रावर विश्वास ठेवता व आपण देवाच्या जवळचे आहोत असा अभिमान बाळगता, 18 त्या तुम्हांला त्याची इच्छा कळते आणि ज्या सर्वोत्तम गोष्टी आहेत, त्या तुम्ही स्वीकारता कारण नियमशास्त्राद्वारे तुम्हांला शिक्षण मिळाले आहे. 19 तुम्हाला वाटतें की ज्यांना योग्य मार्ग माहित नाही त्यांचे तुम्ही मार्गदर्शक आहात, जे लोक अंधारात (पापांत) आहेत, त्यांचा तुम्ही प्रकाश आहात आणि तुमची खात्री झाली आहे की तुम्ही आंधळ्यांचें पुढारी, जे अंधारात आहेत त्यांचा प्रकाश, 20 मूर्खांचे शिक्षक, बालकांचे गुरु आहात, कारण नियमशास्त्रात तुम्हांला ज्ञान आणि सत्याचे मूर्त स्वरुप मिळाले आहे. 21 तर मग तुम्ही जे दुसऱ्यांना शिकविता ते तुम्ही स्वतःला का शिकवित नाही? तुम्ही चोरी करु नये असा उपदेश करता पण तुम्ही स्वतः चोरी का करता? 22 तुम्ही व्यभिचार करु नये असे म्हणता ते तुम्ही व्यभिचार का करतां? तुम्ही मूर्तिचा तिरस्कार करता पण देवळात चोरी करता? 23 तुम्ही नियमशास्त्राविषयी बढाई मारता, ते तुम्ही नियमशास्त्र मोडून देवाचा अपमान का करता? 24 शास्त्रलेखात लिहिल्यानुसार तुमच्यामुळे “विदेशी लोकांमध्ये देवाच्या नावाचा अपमान होत आहे.” [a]
25 तुम्ही नियमशास्त्र पाळीत असला तर सुंतेला मोल आहे. पण जर तुम्ही नियमशास्त्र पाळीत नाही तर, तुमची सुंता न झाल्यासारखी आहे. 26 सुंता न झालेला मनुष्य जर नियमशास्त्राचे पालन करतो, तर त्याची सुंता न होणे हे सुंता झाल्याप्रमाणे समजण्यात येणार नाही काय? 27 ज्या मनुष्याची शारीरिक रीतीने सुंता झाली नाही आणि जो नियमशास्त्र पूर्ण करतो, तो ज्या तुम्हांला लिखित नियम व सुंता आहे, तरी नियमशास्त्र मोडता त्या तुमचा न्याय करील.
28 कारण जो बाहेरुन यहूदी आहे तो खरोखर यहूदी नाही व देहाची बाह्यत्कारी सुंता ही सुंता नव्हे. 29 पण जो अंतःकरणाचा यहूदी, तो यहूदी आहे आणि खरी सुंता लेखी नियमांद्वारे नव्हे तर आत्म्याने अंतःकरणाची केलेली सुंता होय, त्याची प्रशंसा माणसांकडून नव्हे, तर देवाकडून होते.
2006 by World Bible Translation Center