Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
उत्पत्ति 29

याकोब राहेलला भेटतो

29 नंतर याकोबाने आपला प्रवास पुढे चालून ठेवला. तो पूर्वेकडील प्रदेशात गेला. त्याने समोर पाहिले तेव्हा त्याला एका शेतात एक विहीर दिसली; त्या विहिरी जवळ शेरडामेंढराचे तीन कळप बसलेले होते; ही विहीर त्यांची पाणी पिण्याची जागा होती. या विहिरीचे तोंड एका मोठया दगडाने झाकलेले होते; जेव्हा सर्व कळप तेथे जमत तेव्हा मेंढपाळ विहिरीच्या तोंडावरील मोठा दगड ढकलून बाजूला सारीत मग सर्व कळपांचे पाणी पिऊन झाल्यावर ते तो दगड परत त्याच जागेवर ठेवीत.

याकोब त्या मेंढपाळांना म्हणाला, “माझ्या बंधूंनो, तुम्ही कोठून आलात?”

ते म्हणाले, “आम्ही हारानाहून आलो आहोत.”

मग याकोब म्हणाला, “नाहोराचा मुलगा लाबान याला तुम्ही ओळखता का?”

ते म्हणाले, “होय, आम्ही त्याला ओळखतो.”

याकोबाने त्यांना विचारले, “तो बरा आहे काय?”

त्यानी उत्तर दिले, “तो बरा व खुशाल आहे आणि त्याचे सर्वकाही चांगले आहे. ती पाहा त्याची मुलगी राहेल, त्याची मेंढरे घेऊन इकडे येत आहे.”

याकोब म्हणाला, “हे पाहा, अद्याप दिवस बराच आहे आणि सूर्य मावळण्यास अजून बराच वेळ आहे; तसेच रात्रीसाठी कळपांना गोळा करण्यास अजून बराच अवकाश आहे; तेव्हा त्यांना पाणी पाजा, आणि चरण्यासाठी त्यांना परत शेतात जाऊ द्या.”

परंतु ते म्हणाले, “आम्हाला तसे करता येत नाही, कारण सर्व कळप एकत्र आल्यावरच आम्ही विहिरीवरील दगड बाजूला सारतो व मग सर्व कळपांना पाणी पाजतो.”

याकोब मेंढपाळांशी बोलत असतानाच राहेल आपल्या बापाची मेंढरे घेऊन आली; (कारण शेरडा मेंढराना चारण्याचे व त्यांची निगा राखण्याचे काम ती करीत असे.) 10 राहेल ही याकोबाच्या मामाची म्हणजेच याकोबाची आई रिबका हिचा भाऊ लाबान याची मुलगी होती. याकोबाने जेव्हा राहेलीस पाहिले तेव्हा त्याने जाऊन विहिरीच्या तोंडावरील दगड लोटला आणि आपल्या मामाच्या मेंढरास पाणी पाजले. 11 नंतर त्याने राहेलीचे चुंबन घेतले आणि तो खूप रडला; 12 आपण तिच्या बापाच्या आप्तातील असल्याचे म्हणजे तिच्या बापाची धाकटी बहीण रिबका हिचा मुलगा असल्याचे त्याने राहेलीस सांगितले; तेव्हा राहेल धावत घरी गेली आणि या गोष्टी तिने आपल्या बापाला सांगितल्या.

13 आपला भाचा याकोब आल्याचे वर्तमान लाबानाने ऐकले तेव्हा लाबान धावत त्याला भेटावयास गेला; त्याने याकोबला मिठी मारली व त्याची चुंबने घेतली आणि त्याला आपल्या घरी आणले; मग याकाबाने घडलेल्या सर्व गोष्टी आपला मामा लाबान याला सांगितल्या.

14 मग लाबान म्हणाला, “हे आश्चर्य आहे की आपले रक्ताचे नाते आहे.” तेव्हा त्यानंतर याकोब एक महिनाभर लाबानापाशी राहिला.

याकोब फसवला जातो

15 एके दिवशी लाबान याकोबाला म्हणाला, “तू माझ्या घरी, काही मोबदला न घेता गुलामासारखे काम करीत राहावेस हे योग्य नाही; तू माझा नातलग आहेस; तर तुला मी काय वेतन द्यावे ते सांग.”

16 लाबानाला दोन मुली होत्या; थोरल्या मुलीचे नाव होते लेआ आणि धाकटीचे राहेल.

17 लेआचे डोळे अधू आणि निस्तेज होते. परंतु राहेल सुडौल बांध्याची व दिसावयास सुंदर होती; 18 याकोबाचे राहेलीवर प्रेम जडले होते; म्हणून याकोब लाबानमामास म्हणाला, “तुम्ही मला तुमच्या धाकट्या मुलीशी राहेलीशी लग्न करण्याची परवानगी देणार असाल तर मी तुमच्या घरी सात वर्षे तुमची सेवाचाकरी करीन.”

19 लाबान म्हणाला, “परक्या कोणापेक्षा तिने तुझ्याशी लग्न करावे हे तिच्यासाठी चांगले आहे; म्हणून तू आता माझ्यापाशी राहा.”

20 म्हणून मग याकोब आपल्या मामापाशी राहिला आणि त्याने सात वर्षे त्याची सेवाचाकरी केली; परंतु राहेलीवरील गाढ प्रेमामुळे ती वर्षे त्याला फार थोड्या दिवसासारखी वाटली.

21 सात वर्षेनंतर याकोब लाबानाला म्हणाला, “आता मला राहेल द्या म्हणजे मी तिच्याशी लग्न करीन कारण तुमच्या सेवा चाकरीचा माझा वेळ संपलेला आहे.”

22 तेव्हा लाबानाने तेथील सर्वलोकांस मेजवानी दिली; 23 त्या रात्री लाबानाने आपली थोरली मुलगी लेआ याकोबाच्या स्वाधीन केली; त्या रात्री याकोब व त्याची बायको लेआ यांनी एकत्र निजून विवाहाच्या जीवनाचा आनंद उपभोगला; 24 (लाबानाने आपली दासी जिल्या आपल्या मुलीची दासी म्हणून तिला दिली.) 25 दुसऱ्या दिवशी सकाळी याकोबाने लेआला पाहिले तेव्हा आपण रात्री लेआबरोबर एकत्र निजलो असे त्याला समजले; मग याकोब लाबानाला म्हणाला, “तुम्ही मला फसवले; मला राहेलीशी लग्न करता यावे म्हणून मी अतिशय काबाडकष्ट केले; तुम्ही मला असे का फसवले?”

26 लाबान म्हणाला, “आमच्या देशातील रीतीरिवाजा प्रमाणे आधी थोरल्या मुलीचे लग्न झाल्या शिवाय आम्ही धाकटया मुलीचे लग्न करुन देत नाहीं; 27 तरी परंतु हा लग्न विधी सप्ताह सोहळा साजरा करण्यात सहभागी हो म्हणजे मग मी तुला लग्न करण्यासाठी राहेलही देतो; परंतु त्यासाठी तू आणखी सात वर्षे माझी सेवाचाकरी केली पाहिजेस.”

28 त्याप्रमाणे याकोबाने आठवडाभर तो सर्व लग्न सोहळा पूर्ण केला; मग लाबानाने त्याची धाकटी कन्या राहेल त्याला बायको करुन दिली; 29 (लाबानाने आपली दासी बिल्हा, आपली कन्या राहेल हिला दासी म्हणून दिली.) 30 तेव्हा मग याकोब राहेलीशीही एकत्र निजला; आणि याकोबाचे लेआपेक्षा राहेलीवर अधिक प्रेम होते, म्हणून लाबानाकडे याकोबाने राहेलीसाठी आणखी सात वर्षे सेवा चाकरी केली.

याकोबाची वंशावळ वाढली

31 परमेश्वराने पाहिले की याकोबाचे लेआपेक्षा राहेलीवर अधिक प्रेम आहे, म्हणून परमेश्वराने लेआला मुले होऊ दिली परंतु राहेलीस मूलबाळ दिले नाही;

32 लेआला मुलगा झाला; तिने त्याचे नाव रऊबेन ठेवले; कारण ती म्हणाली, “परमेश्वराने माझे दु:ख पाहिले आहे; कारण माझा नवरा माझ्यावर प्रेम करीत नाही; परंतु आता कदाचित तो माझ्यावर प्रेम करील.”

33 लेआ पुन्हा गरोदर राहिली आणि तिला आणखी एक मुलगा झाला; ह्या मुलाचे नाव तिने शिमोन ठेवले, कारण ती म्हणाली, “माझ्या नवऱ्याचे माझ्यावर प्रेम नाही हे परमेश्वराने ऐकले आहे म्हणून त्याने मला हा मुलगा दिला आहे.”

34 लेआ आणखी गर्भवती झाली व तिला मुलगा झाला; तेव्हा तिने त्याचे नाव लेवी असे ठेवले; कारण ती म्हणाली, “आता मात्र माझा नवरा माझ्यावर नक्की प्रेम करील कारण मी त्यांना तीन मुलगे दिले आहेत.”

35 त्यानंतर लेआला आणखी एक मुलगा झाला; तिने त्याचे नाव यहूदा ठेवले; करण ती म्हणाली, “आता मी परमेश्वराची स्तुति करीन.” नंतर तिचे जनन थांबले.

मत्तय 28

येशू मरणातून उठल्याची बातमी(A)

28 शब्बाथवारानंतरचा पहिला दिवस आला. पहाटेस मरीया मग्दालिया, मरीया नावाची दुसरी स्त्री कबर पाहावयास तेथे गेल्या.

त्यावेळी तेथे मोठा भूकंप झाला. देवाचा दूत स्वर्गातून तेथे आला. तो देवदूत कबरेकडे गेला. त्याने कबरेच्या तोंडावरची धोंड बाजूला केली. नंतर तो देवदूत त्या घोंडेवर बसला. चमकणाऱ्या विजेसारखा तो देवदूत दिसत होता. त्याचे कपडेबर्फासारखे शुभ्र होते. कबरेवर पहारा करणारे शिपाई, देवदूत पाहून खूप घाबरले, ते थरथर कापू लागले. आणि ते मेलेल्या माणसासारखे झाले.

देवदूत म्हणाला, “भिऊ नका, ज्याला वधस्तंभावर खिळले होते त्या येशूला तुम्ही पाहत आहात. पण तो तेथे नाही. तो म्हणाला होता, त्याप्रमाणे त्याला मरणातून उठविण्यात आले आहे. या आणि जेथे त्याचे शरीर ठेवले होते ती जागा पाहा. आता ताबडतोब निघा आणि त्याच्या शिष्यांना सांगा, ‘येशू मरणातून उठला आहे. तो गालीलात जाणार आहे. तो तुमच्या अगोदर तेथे जाईल, तुम्ही त्याला तेथे पाहाल.’” नंतर देवदूत म्हणाला, “मी तुम्हांला सर्व काही सांगितले आहे.”

म्हणून त्या स्त्रिया लगबगीने कबरेजवळून निघाल्या. त्या फार घाबरलेल्या होत्या. परंतु फार आनंदितही झाल्या होत्या. जे काही घडले ते सांगण्यासाठी त्या धावत निघाल्या. अचानक येशू त्यांना भेटला आणि तो त्यांना म्हणाला, “शांती असो.” त्या त्याच्याजवळ आल्या. त्यांनी त्याचे पाय धरले आणि त्याची उपासना केली. 10 मग येशू त्यांना म्हणाला, “मला अडवू नका. माझ्या भावांना सांगा की त्यांनी गालीलात जावे. तेथेच त्यांची माझी भेट होईल.”

यहूदी पुढाऱ्यांना अहवाल

11 स्त्रिया शिष्यांना सांगण्यासाठी गेल्या. तेव्हा कबरेवरील पहारेकरी शिपायांतील काही जण नगरात गेले आणि त्यांनी घडलेले सर्व मुख्य याजकांना सांगितले. 12 नंतर याजक जाऊन वडीलजनांना भेटले. आणि त्यांनी एक बेत रचला. त्यांनी शिपायांना पुष्कळ पैसे देऊन असे म्हणण्यास सांगितले. 13 ते म्हणाले, “लोकांना असे सांगा की, आम्ही रात्री झोपेत असताना येशूचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शरीर चोरुन नेले. 14 हे जर राज्यापालाच्या कानावर गेले तर आम्ही त्याला पटवून देऊ आणि तुम्हांला काही होऊ देणार नाही.” 15 मग शिपायांनी पैसे घेतले व याजकांनी सांगितले तसे केले. आणि ही गोष्ट यहूदी लोकांत आजवर प्रचलित आहे.

येशू आपल्या शिष्यांशी बोलतो(B)

16 अकरा शिष्य गालीलास निघून गेले. येशूने सांगितलेल्या डोंगरावर ते हजर झाले. 17 त्या डोंगरावर येशू त्यांना दिसला. त्यांनी त्याची उपासना केली. पण तो येशू आहे यावर शिष्यांपैकी काहींचा विश्वास बसला नाही. 18 तेव्हा येशू त्याच्याकडे आला आणि म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर मला सर्व अधिकार देण्यात आला आहे. 19 म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रातील लोकांस माझे शिष्य करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्या. 20 आणि जे काही मी तुम्हांला शिकविले आहे ते त्या लोकांना करायला शिकवा. आणि पाहा, काळाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर राहीन.”

एस्तेर 5

एस्तेर राजाशी बोलते

तिसऱ्या दिवशी एस्तेरने आपली राजवस्त्रे परिधान केली आणि ती राजमहालाच्या आतल्या भागात जाऊन उभी राहिली. ती उभी होती तो राजमंदिरासमोरचा भाग होता. राजमंदिरात राजा सिंहासनावर बसला होता आणि त्याचे तोंड लोक येत त्या दिशेलाच होते. त्यामुळे राजाने एस्तेर राणी चौकात उभी राहिलेली पाहिली. तिला पाहून तो खुष झाला. आपल्या हातातला सोन्याचा राजदंड त्याने तिच्या दिशेने पुढे केला. तेव्हा राणी आत शिरली आणि राजाजवळ गेली. सुवर्णराजदंडाच्या दुसऱ्या टोकाला तिने स्पर्श केला.

मग राजाने तिला विचारले, “राणी एस्तेर तुला कसली काळजी लागली आहे? तुला काय विचारायचे आहे? तुला तू मागशील ते मी देईन, अगदी अर्धे राज्यदेखील देईन.”

एस्तेर म्हणाली, “तुमच्यासाठी आणि हामानसाठी मी भोजन तयार केले आहे. तुम्ही आणि हामान या भोजनाला आज यावे”

तेव्हा राजा म्हणाला, “हामानला ताबडतोब घेऊन या म्हणजे आम्हाला एस्तेरच्या म्हणण्याप्रमाणे जाता येईल.”

राजा आणि हामान मग एस्तेरने आखलेल्या भोजन समारंभाला गेले. ते द्राक्षारस घेत असताना पुन्हा राजाने एस्तरेला विचारले, “आता सांग एस्तेर तुला काय हवे आहे? हवे ते माग. मी ते तुला देईन. बोल तर काय पाहिजे? तुला काय हवे ते देईन, अगदी अर्धे राज्यसुध्दा देईन.”

एस्तेर म्हणाली, “मला मागायचे ते असे: राजाची माझ्यावर कृपादृष्टी असेल आणि मी मागेन ते द्यायला राजा खुशीने तयार असेल तर राजा आणि हामान यांनी उद्याही यावे. उद्या मी राजासाठी आणि हामानसाठी आणखी एक मेजवानी देईन. मला खरोखर काय हवे ते मी उद्या सांगीन.”

हामानचा मर्दखयवर राग

हामान त्यादिवशी अतिशय आनंदात आणि चांगल्या मनःस्थितीत राजमहालातून निघाला. पण मर्दखयला राजद्वाराशी पाहाताच त्याला मर्दखयचा आतिशय संताप आला. हामान तिथून निघाला तेव्हा मर्दखयने त्याला मान न दिल्यामुळे हामान रागाने वेडापिसा झाला. मर्दखय हामानला घाबरत नव्हता आणि त्याचाच हामानला राग आला. 10 पण आपल्या रागाला आवर घालून हामान घरी आला. मग आपले मित्र आणि बायको जेरेश यांना त्याने बोलावले. 11 आपल्या ऐश्वर्याची बढाई मारायला त्याने सुरुवात केली. आपली पुत्रसंतती, राजाने केलेले आपले अनेक प्रकारचे सन्मान, राजाने आपल्याला दिलेले सर्वाच्च अधिकाराचे स्थान या सगळ्यांची तो बढाई मारु लागला. 12 हामान पुढे म्हणाला, “एवढेच नाहीतर राणी एस्तेरने आज दिलेल्या मेजवानीला राजाबरोबर फक्त मलाच काय ते तिने बोलावले. पुन्हा उद्याही राणीने मला राजाबरोबर बोलावले आहे. 13 पण या सगळ्या गोष्टींचा मला तेवढा आनंद होत नाही. तो यहुदी मर्दखय जोपर्यंत राजद्वाराशी बसलेला आहे तोपर्यंत मला खराखुरा आनंद मिळणार नाही.”

14 मग हामानची पत्नी जेरेश आणि त्याचे सगळे मित्र यांनी एक सूचना मांडली ते म्हणाले, “त्याला फाशी देण्यासाठी एक स्तंभ उभारायला सांग तो 75 फूट उंच असू दे. मग सकाळी राजाला त्यावर मर्दखयला फाशी द्यायला सांग. त्यानंतर राजाबरोबर खुशाल मेजवानीला जा म्हणजे तुला आनंद होईल.”

हामानला ती सूचना आवडली म्हणून त्याने फाशीचा स्तंभ उभारायची आज्ञा केली.

प्रेषितांचीं कृत्यें 28

माल्ता बेटावर पौल

28 जेव्हा आमचे पाय सुखरुपपणे तेथील जमीनीला लागले. तेव्हा आम्हांना कळले की, त्या बेटाचे नाव माल्ता असे आहे. तेथील रहिवाश्यांनी आम्हांला अतिशय ममतेने वागविले. त्यांनी एक शेकोटी पेटविली आणि आमचे स्वागत केले. कारण पाऊस पडू लागाला होता. व थंडीही होती. पौलाने काटक्या गोळा केल्या आणि ते त्या शेकोटीत टाकू लागला. उष्णतेमुळे तेथून एक साप निघाला. आणि त्याने पौलाच्या हाताला विळखा घातला. ते पाहून तेथील रहिवासी एकमेकांना म्हणू लागले, “हा मनुष्य खुनी असला पाहिजे. समुद्रातून जरी हा वाचला असला तरी देवाच्या न्यायामुळे याचे आयुष्य संपुष्टातच आले आहे!”

परंतु पौलाने तो प्राणी शेकोटीत झटकून टाकला. आणि पौलाला काही अपाय झाला नाही. त्या बेटावरील लोकांना पौलाचे अंग सुजून येईल किंवा पौल एकाएकी मरुन पडेल असे वाटत होते. बराच वेळ वाट पाहूनही पौलाला काहीही विकार झाल्याचे दिसेना, तेव्हा त्या लोकांचे विचार पालटले, आणि पौल देवच आहे असे ते म्हणू लागले.

तेथून जवळच पुब्ल्य नावाच्या मनुष्याची शेती होती. पुब्ल्य हा त्या बेटाचा मुख्य अधिकारी होता. त्याने आम्हा सर्वांचे त्याच्या घरी स्वागत केले आणि तीन दिवस आमचा चांगला पाहुणचार केला. पुब्ल्याचे वडील तापाने व हगवणीने आजारी होते. त्यामुळे अंथरुणाला खिळून होते. पौल त्या आजारी व्याक्तिला भेटायला गेला प्रार्थना करुन पौलाने आपला हात त्याच्यावर ठेवला आणि त्या मनुष्याला बरे केले. हे घडलेले पाहिल्यावर त्या बेटावरील इतर आजारी लोक पौलाकडे आले आणि बरे झाले.

10 त्यांनी आम्हांला सन्मानपूर्वक पुष्कळ वस्तू भेटीदाखल दिल्या. आणि जेव्हा आम्ही परत प्रवासाला निघालो तेव्हा आम्हांला लागणाऱ्या अनेक गोष्टी पुरविल्या.

पौल रोमला खाना होतो

11 आम्ही तेथे हिवाळ्यात राहिल्यावर आलेक्सांद्रा शहरातील एका जहाजातून पुढील प्रवासाला निघालो. ते जहाज त्या बेटावर हिवाळाभर मुक्कामाला होते. त्या जहाजाच्या समोरील बाजूस “जुळ्या देवाचे” [a] चिन्ह होते. 12 मग आम्ही सुराकूस येथे जाऊन पोहोंचलो आणि तेथे तीन दिवास राहिलो. 13 तेथून शिडे उभारुन आम्ही निघालो, आणि रेगियोन नगराला गेला. तेथे एक दिवस मुक्काम केला. नंतर दक्षिणेकडील वारा सुटल्यावर दुसऱ्या दिवशी पुत्युलास गेलो. 14 त्या शहरात आम्हांला काही बंधु (विश्वासणारे) आढळले. त्या बंधूंच्या सांगण्यावरुन आम्ही तेथे सात दिवस राहिलो. मग आम्ही रोम येथे जाऊन पोहोंचलो. 15 तेथील बंधुनी आमच्याबद्दलची वार्ता ऐकली होती. ते आमच्या भेटीसाठी अप्पीयाच्या बाजारपेठेपर्यंत आणि तीन धर्मशाळेपर्यंत आले. पौलाची त्यांची भेट झाल्यावर त्याने देवाचे उपकार मानले, व त्याला धीर आला.

रोम येथे पौल

16 आम्ही रोम येथे पोहोंचल्यावर पौलाला एकटे राहायला परवानगी मिळाली. परंतु त्याच्यावर देखरेख करण्यासाठी एक शिपाई ठेवण्यात आला.

17 तीन दिवसांनंतर पौलाने सर्व यहूदी पुढाऱ्यांना एकत्र बोलावले. जेव्हा सर्व जण जमा झाले तेव्हा पौल त्यांना म्हणाला, “बंधूंनो, आपल्या बांधवांविरुद्ध मी काहीही केलेले नाही. तरी मला यरुशलेम येथे पकडून रोमी लोकांच्या हाती कैदी म्हणून देण्यात आले. आणि 18 त्यांनी माझी चौकशी केली. तेव्हा त्यांची मला सोडून देण्याची इच्छा होती. कारण मरणदंडाला योग्य असा कोणताही गुन्हा मी केला नव्हता. 19 परंतु यहूदी लोकांनी जेव्हा माझ्या सुटकेला हरकत घेतली, तेव्हा कैसराकडे न्याय मागणे मला भाग पडले. याचा अर्थ असा नाही की, यहूदी लोकांविरुद्ध मला दोषारोप करण्याची इच्छा आहे. 20 या कारणासाठी तुम्हाला भेटण्याची आणि तुमच्याशी बोलण्याची मी इच्छा दाखविली. कारण इस्राएलाच्या आशेच्या निष्ठेमुळेच मी या साखळदंडानी जखडलो गेलो आहे.”

21 यहूदी पुढारी पौलाला म्हणाले, “आम्हांला तुमच्या बाबत यहूदीयाहून कसलेही पत्र आलेले नाही, अगर तिकडून येणाऱ्या बंधुजनांपैकी एकाही भावाने तुमच्याविषयी वाईट कळविले अथवा बोललेले नाही. 22 परंतु तुमची मते काय आहेत हे समजून घेण्याची आमची इच्छा आहे. कारण या गटाविरुद्ध (ख्रिस्ती गटाविरुद्ध) सगळीकडे लोक बोलतात हे आम्हांना माहीत आहे.”

23 तेव्हा (रोम शहरातील) यहूदी लोकांनी एक बैठकीचा दिवस ठरविला, जेथे पौल राहत होता, तेथे ते मोठ्या संख्येने जमा झाले. तेव्हा पौलाने त्यांना समजावून सांगितले आणि देवाच्या राज्यविषयी आपली साक्ष दिली. मोशेच्या नियमशास्त्रापासून आणि संदेष्ट्यांच्यापासून फोड करुन येशूविषयी त्यांची खात्री पटविण्याचा प्रयत्न केला. हे तो (पौल) सकाळपासून संध्याकाळपर्यंत करीत होता. 24 त्याने फोड करुन सांगितलेल्या गोष्टीविषयी काही जणांची खात्री पटली, तर काहींनी तो बोलत असलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही.

25 पौल पुढील एक गोष्ट बोलला, त्यावरुन मतभेद होऊन त्यांच्यापैकी काही जण उठले आणि तेथून जाऊ लागले, पौल म्हणाला, “यशया संदेष्टयांच्या द्वारे पवित्र आत्मा आपल्या वाडवडिलांशी जे बोलला, ते खरोखरच किती खरे आहे! यशया म्हणाला होता:

26 ‘या लोकांकडे (यहूदी) तुम्ही जा, आणि त्यांना सांगा:
तुम्ही ऐकाल तर खरे
    पण तुम्हांला समजणार नाही.
तुम्ही पहाल तुम्हाला दिसेल
    पण तुम्ही काय पाहात ते तुम्हाला कळणार नाही.
27 कारण या लोकांचे विचार मंद झाले आहेत
    त्याच्या कानांनी त्यांना ऐकू येत नाही.
    आणि त्यांनी आपले डोळे बंद केले आहेत नाही
तर त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले असते
    आणि आपल्या कानांनी ऐकले असते आणि माझ्याकडे वळाले
असते आणि मी त्यांना बरे केले असते.’ (A)

28 “म्हणून देवाचे हे तारण यहूदीतर विदेशी लोकांकडे पाठविण्यात आले आहे. हे तुम्हा यहूदी लोकांना कळावे. ते ऐकतील.” 29 [b]

30 पूर्ण दोन वर्षे तो त्याच्या भाड्याच्या घरात राहिला. जे त्याला भेटायला येत, त्यांचे तो स्वागत करी. 31 त्याने देवाच्या राज्याविषयी प्रचार केला. त्याने प्रभु येशूविषयी शिक्षण दिले. तो हे काम फार धैर्याने करीत असे. आणि कोणीही त्याला बोलण्यात अडवू शकले नाही.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center