Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
उत्पत्ति 28

28 नंतर इसहाकाने याकोबाला बोलावून त्याला आशीर्वाद दिला नंतर त्याने त्याला बजावून आज्ञा दिली; तो म्हणाला, “तू कनानी मुलीपैकी कोणत्याच मुलीशी लग्न करता कामा नये; तेव्हा तू आता येथून नीघ, व पदल अरामात बथुवेल तुझ्या आईचे वडील बथुवेल याच्या कडे जा. तुझ्या आईचा भाऊ लाबान तेथे राहातो आणि त्याच्या मुलीपैकीच एकीशी लग्न कर. मी सर्वसमर्थ देव [a] याची प्रार्थना करतो की त्याने तुला आशीर्वादित करावे; आणि तुला खूप मुले द्यावीत तू महान राष्ट्राचा पिता व्हावे अशी प्रार्थना करतो. तसेच परमेश्वराने अब्राहामाला व त्याच्या संततीला जसा आशीर्वाद दिला तसाच आशीर्वाद त्याने तुला व तुझ्या संततीलाही द्यावा अशी मी प्रार्थना करतो; आणि मी आणखी अशी ही प्रार्थना करतो की जो हा देश परमेश्वराने अब्राहामाला दिला व ज्यात तू राहातोस त्या देशाचा त्याने तुला मालक करावे.”

अशी रीतीने इसहाकाने याकोबाला पदन अराम येथे पाठवले; तेव्हा याकोब पदन अराम येथील अरामी बथूवेलाचा मुलगा व आपली आई रिबका हिचा भाऊ, लाबान याच्याकडे गेला.

एसावाला कळले की आपला बाप इसहाक याने याकोबला आपला आशीर्वाद दिला, व याकोबाने कोणत्याच कनानी स्त्रिशी लग्न करु नये अशी आज्ञा दिली, तसेच बायको शोधण्यासठी त्याने याकोबाला पदन अराम येथे पाठवून दिले; आणि याकोबही आपल्या आईबापाची आज्ञा मानून पदन अरामास गेला ह्या ही गोष्टी एसावास कळाल्या; या सर्व गोष्टींवरुन आपल्या बापाला आपल्या मुलांनी कोणत्याच कनानी मुलीशी लग्न करु नये असे वाटते हे एसावाला उमगले एसावाला अगोदरच दोन कनानी बायका होत्या, म्हणून तो इश्माएलाकडे गेला आणि त्याने आणखी एका स्त्रीशी म्हणजे इश्माएलाची मुलगी महलथ हिच्याशी लग्न केले, इश्माएल अब्राहामाचा मुलगा होता आणि महलथ नबायोथाची बहीण.

परमेश्वराचे निवासस्थान-बेथेल

10 याकोबाने बैर-शेबा सोडले व तो हारानाला गेला; 11 प्रवास करताना सूर्य मावळला म्हणून त्याने एके जागी रात्रीं मुक्काम केला; तेथे रात्रीं झोंपताना त्याला एक धोंडा दिसला तो उशास घेऊन तो रात्रीं तेथेच झोंपला; 12 तेव्हा त्याला एक स्वप्न पडले; स्वप्नात एक उंच शिडी आहे, तिचे एक टोक जमिनीवर व दुसरे टोक वर स्वर्गापर्यंत पाहोचलेले आहे असे त्याने पाहिले; 13 याकोबाने पाहिले की देवदूत शिडीवर चढत व उतरत आहेत. शिडीवरती परमेश्वर उभा असल्याचे त्याला दिसले; परमेश्वर त्याला म्हणाला, “तुझे आजोबा अब्राहाम व तुझे वडील इसहाक यांचा मी परमेश्वर व देव आहे; तू ज्या भूमिवर झोंपला आहेस ती भूमि म्हणजे तो देश मी तुला व तुझ्या वंशजांना देईन 14 तसेच मी तुला भरपूर वंशज देईन; तुझे वंशज पृथ्वीवरील मातीच्या कणाइतके अगणित होतील; ते उत्तर व दक्षिण, पूर्व व पश्चिम या दिशांकडील देशात पसरतील; तुझ्यामुळे व तुझ्या वंशजांमुळे पृथ्वीवरील सर्व लोक आशीर्वादित होतील.

15 “मी सतत तुझ्याबरोबर आहे आणि तू ज्या ज्या ठिकाणी जाशील त्या प्रत्येक ठिकाणी मी तुझे रक्षण करीन आणी तुला या देशात परत आणीन; मी हे माझे वचन पूर्ण करीपर्यंत तुला अंतर देणार नाही.”

16 मग याकोब झोपेतून जागा झाला व म्हणाला, “खरोखर या ठिकाणी परमेश्वर आहे हे मला समजले आहे; परंतु झोंपून उठेपर्यंत ते मला कळले नाही.”

17 याकोबाला भीती वाटली, तो म्हणाला, “हे फार महान ठिकाण आहे, हे देवाचे निवासस्थान, त्याचे घर व स्वर्गाचे दार आहे.”

18 याकोब पहाटे लवकर उठला; त्याने उशास घेतलेला धोंडा एका टोकावर उभा करुन जमिनीत रोवला; मग त्याने त्यावर तेल ओतले. अशा प्रकारे त्याने त्या धोंड्याचे देवाचे स्मारक केले. 19 त्या ठिकाणाचे नाव लूज होते परंतु याकोबाने त्याचे नाव बेथेल ठेवले.

20 मग याकोबाने शपथ वाहून नवस केला; तो म्हणाला, “जर देव माझ्याबरोबर राहील; आणि जेथे जेथे मी जाईन तेथे तो माझे रक्षण करील; आणि जर तो मला खावावयास अन्न व ल्यावयास वस्त्र पुरवील; 21 आणि जर मी शांतीने माझ्या बापाच्या घरी परत येईन जर देव या सर्वगोष्टी करील तर मग तो माझा परमेश्वर होईल; 22 मी हा धोंडा या ठिकाणी स्मारकस्तंभ म्हणून उभा करुन ठेवतो, त्यावरुन परमेश्वराकरिता हे पवित्र ठिकाण आहे असे दिसेल आणि देवाने मला दिलेल्या सर्वाचा दशांश म्हणजे दहावा भाग मी देवाला अर्पण करीन.”

मत्तय 27

येशूला राज्यपाल पिलाताकडे नेतात(A)

27 जेव्हा सकाळ झाली तेव्हा सर्व मुख्य याजक व वडीलजन यांनी येशूविरूद्ध कट केला. आणि कशा प्रकारे येशूला ठार मारायचे याचा विचार केला. त्यांनी येशूला साखळदंडानी बांधून दूर नेले व राज्यपाल पिलाताच्या स्वाधीन केले.

यहूदाची आत्महत्या(B)

त्याच वेळेला, यहूदा, जो येशूचा विश्वासघात करून त्याला पकडून देण्यास कारणीभूत होता, त्याने पाहिले की, त्यांनी येशूला जिवे मारण्याचे ठरविले आहे, तेव्हा त्याने जे केले होते त्याचे त्याला वाईट वाटले. म्हणून त्याने चांदीची तीस नाणी घेऊन मुख्य याजक व वडिलांना परत दिली. तो म्हणाला, “मी पाप केले आहे, मी एका निष्पाप मनुष्याला जिवे मारण्यासाठी तुमच्या हाती दिले.”

यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “आम्हांला त्याचे काय? तो तुझा प्रश्न आहे!”

तेव्हा यहूदाने ती चांदीची नाणी मंदिरात फेकून दिली आणि तो गेला. मग बाहेर जाऊन त्याने स्वतःला गळफास लावून घेतला.

मुख्य याजकांनी चांदीची ती तीस नाणी घेतली आणि ते म्हणाले, “हे पैसे मंदिराच्या खजिन्यात ठेवता येणार नाहीत. हे आमच्या नियमाविरूद्ध आहे, कारण ते पैसे कोणाला तरी जिवे मारण्यासाठी दिले होते.”

म्हणून त्यांनी त्या पैशांनी कुंभाराचे शेत नावाची जागा विकत घेण्याचे ठरविले. यरूशलेमला भेट देण्यासाठी येणाऱ्या माणसांना मरण आले तर त्यांना पुरण्यासाठी त्या शेताचा उपयोग करता येईल. त्यामुळे आजही त्या जागेला रक्ताचे शेत असे म्हणतात. अशा रीतीने यिर्मया संदेष्ट्याचे बोल खरे ठरले. ते असे:

“त्यांनी चांदीची तीस नाणी घेतली हे पैसे यहूदी लोकांनी त्याच्या (येशूच्या) जिवाचे मोल म्हणून देण्याचे ठरविले. 10 मला प्रभु परमेश्वराने आज्ञा दिल्यानुसार चांदीच्या त्या तीस नाण्यांनी त्यांनी कुंभाराचे शेत विकत घेतले.” [a]

राज्यपाल पिलात येशूला प्रश्न विचारतो(C)

11 राज्यपाल पिलातापुढे येशू उभा राहिला तेव्हा पिलाताने त्याला प्रश्न विचारले. तो म्हणाला, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?”

येशूने उत्तर दिले, “होय, मी आहे, जसे तुम्ही म्हणता.”

12 पण जेव्हा मुख्य याजकांनी व वडिलांनी त्याच्यावर दोषारोप केले, तेव्हा तो गप्प बसला.

13 म्हणून पिलात येशूला म्हणाला, “हे लोक तुझ्यावर जो दोषारोप ठेवीत आहेत तो तू ऐकत आहेस ना? तर मग तू का उत्तर देत नाहीस?”

14 परंतु येशूने पिलाताला काहीही उत्तर दिले नाही. आणि पिलात आश्चर्यचकित झाला.

येशूला मुक्त करण्याचा पिलाताचा अयशस्वी प्रयत्न(D)

15 वल्हांडण सणानिमित्त दरवर्षी लोकसमुदायासाठी तुरूंगातून एकाला सोडण्याची प्रथा होती. 16 त्या विशिष्ट वेळेला तेथे एक कुप्रसिद्ध कैदी होता. त्याचे नाव बरब्बा [b] होते.

17 म्हणून जेव्हा लोक जमले, तेव्हा पिलाताने त्यांना विचारले, “तुमच्यासाठी मी कोणाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे? कुविख्यात बरब्बाला की ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूला?” 18 लोकांनी इर्षेला पेटून येशूला पिलाताच्या हाती दिले होते हे पिलाताच्या ध्यानी आले.

19 न्यायासनावर बसला असता पिलात हे बोलला. तो तेथे बसलेला असतानाच त्याच्या पत्नीने त्याला एक निरोप पाठविला. तो निरोप असा होता: “या मनुष्याविषयी सावध राहा; कारण तो दोषी नाही. त्याच्याविषयी स्वप्न पडल्यामुळे मला आज दिवसभर फार दु:ख सहन करावे लागले आहे.”

20 पण पिलाताने बरब्बाला सोडून द्यावे व येशूला जिवे मारावे अशी मागणी लोकांनी करावी म्हणून मुख्य याजकांनी व वडीलजनांनी लोकसमुदायाचे मन वळविले.

21 पिलात म्हणाला, “माझ्यासमोर बराब्बा व येशू दोघेही आहेत. मी तुमच्यासाठी कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे?”

लोकांनी उत्तर दिले. “बरब्बा.”

22 पिलाताने विचारले, “मग ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूचे मी काय करावे?”

सर्व लोक ओरडून म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून मारून टाका!”

23 पिलाताने विचारले, “का? मी त्याला जिवे मारावे असे तुम्ही का म्हणता? त्याने काय अपराध केला आहे?”

परंतु सर्व लोक मोठ्याने ओरडून म्हणू लागले, “त्याला वधस्तंभावर खिळा!”

24 लोकांच्या पुढे आपले काही चालणार नाही हे पिलाताने पाहिले. उलट लोक अधिक अशांत होऊ लागले होते म्हणून पिलाताने थोडे पाणी घेतले आणि लोकांच्या समोर आपले हात धुतले. मग पिलात म्हणाला, “या मनुष्याच्या मरणाची जबाबदारी माझ्यावर नाही, तुम्हीच त्यासाठी जबाबदार आहात.”

25 सर्व लोक ओरडून म्हणू लागले, “याच्या मरणाची जबाबदारी आमच्यावर असो. त्याच्यासाठी व्हायची शिक्षा आम्ही व आमची मुले भोगायला तयार आहोत.”

26 मग पिलाताने बरब्बाला सोडून दिले. येशूला चाबकाचे फटके मारावे असे पिलाताने आपल्या काही सैनिकांना सांगितले. नंतर येशूला वधस्तंभावर खिळून मारावे म्हणून पिलाताने शिपायांच्या हाती दिले.

पिलाताचे शिपाई येशूची थट्टा करतात(E)

27 नंतर पिलाताचे शिपाई येशूला राज्यापालाच्या वाड्यात घेऊन आले. ते सर्व घोळक्याने येशूभोवती जमले. 28 त्यांनी येशूचे कपडे काढले व त्याला लाल किरमिजी झगा घातला. 29 काटेरी झाडाच्या फांद्यांचा एक मुकुट तयार करून तो येशूच्या डोक्यावर ठेवला. तसेच त्यांनी त्याच्या उजव्या हातात एक काठी दिली. मग शिपाई येशूपुढे गुडघे टेकून त्याची थट्टा करु लागले. ते म्हणू लागले, “यहूद्याचा राजा चिरायू होवो!” 30 नंतर शिपाई येशूवर थुंकले. त्याच्या हातातील काठी त्यांनी घेतली आणि त्या काठीने त्याच्या डोक्यावर मारत राहिले. 31 येशूची थट्टा करण्याचे संपविल्यावर त्यांनी त्याचा झगा काढून घेतला आणि त्याचे कपडे त्याला घातले. मग ते त्याला वधस्तंभावर खिळून मारण्यासाठी घेऊन गेले.

येशूला वधस्तंभावर खिळून मारतात(F)

32 शिपाई येशूला शहराबाहेर घेऊन चालले होते. तेव्हा त्यांनी एका मनुष्याला वेठीला धरून येशूचा वधस्तंभ वाहायला लावले. तो कुरेने या गावचा असून त्याचे नाव शिमोन होते. 33 जेव्हा ते गुलगुथा (“म्हणजे कवटीची जागा”) नावाच्या ठिकाणी येऊन पोहोचले. 34 तेव्हा त्यांनी येशूला पित्तमिश्रित द्राक्षारस प्यायला दिला. त्याने तो चाखला. पण पिण्यास नकार दिला.

35 त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले. नंतर त्यांनी चिठ्ठ्या टाकून येशूचे कपडे आपसात वाटून घेतले. 36 शिपाई तेथे बसून येशूवर पहारा देऊ लागले. 37 येशूच्या डोक्याच्या वरच्या बाजूला त्याच्यावर ठेवण्यात आलेला दोषारोप लिहिलेला लेख शिपायांनी लावला. त्यावर मजकूर होता, “येशू-यहूद्यांचा राजा.”

38 येशूच्या दोन्ही बाजूंना दोन लुटारु खिळण्यात आले होते. 39 जवळून जाणारे लोक येशूची निंदा करु लागले. ते डोकी हलवू लागले. 40 आणि म्हणू लागले, “तू म्हणालास की, ‘हे मंदिर मोडून तीन दिवसात परत उभे करीन.’ आता स्वतःचा बचाव कर, जर तू खरोखरच देवाचा पूत्र असलास तर वधस्तंभावरून खाली ये.”

41 तसेच मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक, वडील हेही तेथे होते. तेही इतरांसारखी येशूची निंदा करू लागले. 42 ते म्हणू लागले, “याने दुसऱ्यांना वाचविले, परंतु तो स्वतःचा बचाव करू शकत नाही. लोक म्हणतात की, हा इस्राएल (यहूदी) लोकांचा राजा आहे. जर तो राजा असेल, तर त्याने वधस्तंभावरून खाली यावे. म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू! 43 याचा देवावर विश्वास आहे, जर देवाला तो खरोखर पाहिजे असेल तर त्याने त्याला वाचवावे. तो स्वतः असे म्हणत असे, ‘मी देवाचा पुत्र आहे.’”

44 तसेच त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेले चोर देखील येशूविषयी वाईट गोष्टी बोलू लागले.

येशूचे मरण(G)

45 दुपारनंतर लगेच सुमारे तीन तास सर्व भूमीवर अंधार पसरला. 46 सुमारे तीन वाजता येशू मोठ्याने ओरडून म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबकत्नी?” याचा अर्थ “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”

47 जे लोक तेथे उभे होते त्यांनी हे एकले. ते म्हणू लागले, “तो एलीयाला हाक मारीत आहे!”

48 एक जण लगेच धावत गेला आणि बोळा घेऊन आला. त्या मनुष्याने तो बोळा आंबेत बुडविला आणि तो वेताच्या टोकावर ठेवून येशूला प्यायला दिला. 49 परंतु दुसरे काही लोक म्हणु लागले, “थांबा, एलीया येऊन त्याला वाचवितो काय, हे आम्हांला पाहायचे आहे.”

50 पुन्हा एकदा येशूने मोठ्याने आरोळी मारली आणि तो मरण पावला.

51 त्याचवेळी, येशू मेल्याबरोबर मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत दुभागला गेला, भूकंप झाला, खडक फुटले. 52 कबरी उघडल्या, आणि देवाचे बरेच लोक जे मरण पावले होते, ते उठविले गेले. 53 ते लोक कबरींतून बाहेर पडले, येशू मरणातून पुन्हा उठल्यावर ते लोक पवित्र नगर अर्थात यरूशलेमामध्ये गेले आणि अनेक लोकांनी त्यांना पाहिले.

54 सेनाधिकारी व त्याच्याबरोबर येशूवर जे शिपाई पहारा देत होते त्यांनी भूकंप व जे काही घडले ते पाहिले. आणि ते फार भ्याले. ते म्हणाले, “हा मनुष्य खरोखर देवाचा पुत्र होता.”

55 तेथे बऱ्याच स्त्रिया वधस्तंपासून काही अंतरावर उभ्या राहून हे पाहत होत्या. येशूची सेवा करण्यासाठी या स्त्रिया गालीलाहून त्याच्यामागून आल्या होत्या. 56 मरीया मग्दालिया, याकोब व योसेफ यांची आई मरीया आणि जब्दीचे पुत्र याकोब व योहान यांची आई तेथे होत्या.

येशूला पुरतात(H)

57 संध्याकाळ झाल्यावर योसेफ नावाचा एक श्रीमंत मनुष्य तेथे आला. तो अरिमथाईचा होता व येशूचा अनुयायी होता. 58 योसेफ पिलाताकडे गेला. आणि त्याने त्याचे शरीर मागितले. पिलाताने येशूचे शरीर योसेफाला देण्याचा हुकूम शिपायांना केला. 59 नंतर योसेफाने येशूचे शरीर घेतले आणि नवीन तागाच्या कपड्यात ते गुंडाळले. 60 मग योसेफाने खडकात खोदलेल्या नव्या कबरेत येशूचे शरीर ठेवले. नंतर कबरेच्या तोंडवर एक मोठी धोंड लोटून ती कबर बंद केली. या गोष्टी केल्यानंतर योसेफ निघून गेला. 61 मरीया मग्दालिया, आणि मरीया नावाची दुसरी स्त्री कबरेभोवती बसल्या होत्या.

येशूच्या कबरेवर पहारा

62 त्या दिवसाला तयारीचा दिवस [c] म्हणत असत, दुसऱ्या दिवशी मुख्य याजक व परुशी पिलाताकडे गेले. 63 ते म्हणाले, “महाराज, तो लबाड मनुष्य (येशू) जिवंत असताना असे म्हणाला होता की, ‘मी मरण पावल्यानंतर तीन दिवसांनी परत उठेन.’ 64 म्हणून तीन दिवसापर्यंत कबरेवर कडक पहारा ठेवण्याचा हुकुम द्या. (कारण) त्याचे शिष्य येऊन त्याचे शरीर चोरुन नेण्याचा प्रयत्न करतील. मग तो मरणानंतर पुन्हा उठला असे लोकांना सांगतील. ही शेवटची फसवणूक पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल.”

65 पिलात म्हणाला, “तुम्ही शिपाई घेऊ शकता. जा आणि कबरेवर कडक पहारा ठेवा.” 66 म्हणून ते गेले आणि कबरेवर कडक पहारा ठेवला. कबरेवर जी धोंड होती तिच्यावर सरकारी शिक्का मारला. आणि तेथे पहारा करण्यासाठी शिपाई नेमले.

एस्तेर 4

मर्दखय मध्यस्थीसाठी एस्तेरला राजी करतो

जे काही झाले ते मर्दखयच्या कानावर आले. यहुद्यांविरुध्द राजाने काढलेला हुकूम त्याला समजला तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली. शोकाची वस्त्रे परिधान करून डोक्याला राख फासून तो नगरातून मोठयाने आक्रोश करत आणि रडत निघाला. पण तो फक्त राजाच्या प्रवेश द्वारापर्यंतच पोचू शकला. शोकाची वस्त्रे घातलेल्या कोणालाही तिथून आत जाण्यास मनाई होती. राजाचा हुकूम ज्या प्रांतात पोचला तिथे तिथे यहुद्यांमध्ये शोककळा पसरली आणि ते आक्रोश करु लागले. उपवास करून आणि मोठयाने ते आकांत करु लागले. डोक्यात राख घालून आणि शोकवस्त्रे घालून बहुतेक यहुदी राखेत पडून राहिले.

एस्तेरच्या दासी आणि खोजे तिच्याकडे आले आणि त्यांनी तिला मर्दखयविषयी सांगितले. तेव्हा राणी एस्तेर अतिशय दु:खी आणि नाराज झाली. शोकाच्या वस्त्रांऐवजी घालायला तिने मर्दखयकडे चांगली वस्त्रे पाठवली. पण तो ती घेईना. एस्तेरने मग हथाकला बोलावले. हथाक हा तिच्या सेवेसाठी निवडलेला राजाच्या खोजांपैकी एक जण होता. मर्दखय एवढा कशाने त्रस्त झाला आहे हे शोधून काढायची एस्तेरने त्याला आज्ञा दिली. राजद्वारासमोरच्या नगरातल्या मोकळया जागेत मर्दखय होता तिथे हथाक गेला. मर्दखयने मग हथाकला त्याच्या बाबतीत जे जे झाले ते सर्व सांगितले. यहुद्यांचा वध करण्याबद्दल राजाच्या खजिन्यात नेमकी किती रक्कम जमा करायचे हामानने वचन दिले आहे ते ही त्याने हथाकला सांगितले. यहूद्यांच्या वधाच्या राजाज्ञेची प्रतही मर्दखयने हथाकला दिली. हा हुकूम शूशन नगरात सर्वत्र दिला गेला होता. हथाकने एस्तेरला तो हुकूम दाखवून सर्व काही तिला सांगावे अशी त्याची इच्छा होती. एस्तेरने राजाकडे जाऊन मर्दखय आणि तिचे लोक यांच्यासाठी दयेची याचना व मदत करण्यास हथाकने तिला प्रवृत्त करावे असेही त्याने सांगितले.

हथाकने एस्तेरकडे येऊन तिला, मर्दखय म्हणाला ते सगळे सांगितले.

10 मग मर्दखयसाठी एस्तेरने हथाकजवळ निरोप दिला: 11 “मर्दखय, राजाचे सर्व अधिकारी आणि राजाच्या प्रदेशातील सर्व लोक हे जाणून आहेत की न बोलावता जो राजाकडे जाईल त्या व्यक्तीसाठी मग तो पुरुष असो की स्त्री राजाचा एकच कायदा आहे तो म्हणजे मृत्युदंड. मात्र राजाने आपला सुवर्ण राजदंड त्या व्यक्तीपुढे केल्यास हा कायदा अंमलात आणला जात नाही. राजाच्या तेवढ्या कृतीने त्या माणसाला जीवदान मिळते. आणि मला तर राजाकडून गेल्या तीस दिवसात बोलावणे आलेले नाही.”

12-13 मग एस्तेरचा हा निरोप मर्दखयला मिळाला. मर्दखयला तिचा निरोप मिळाल्यावर त्याने आपले उत्तर पाठवले. “राजमहालात राहतेस म्हणून तू यातून सुटशील असे समजू नकोस. 14 तू आत्ता गप्प बसलीस तर यहुद्यांना दुसऱ्या ठिकाणाहून मदत आणि स्वातंत्र्य मिळेल. पण तू आणि तुझे पितृकुळ यांचा मात्र नाश होईल. आणि कोणी सांगावे, या अशा काळासाठीच कदाचित तुझी राणी म्हणून निवड झाली असेल.”

15-16 तेव्हा एस्तेरने मर्दखयला हे उत्तर पाठवले: “मर्दखय, शूशन मधील सर्व यहुद्यांना एकत्र घेऊन ये आणि माझ्यासाठी सर्वजण उपास करा. तीन दिवस आणि तीन रात्र काहीही खाऊ पिऊ नका. मी तुमच्यासारखाच उपास करीन, तसेच माझ्या दासीदेखील करतील. आपल्या उपवासानंतर मी राजाकडे जाईन. राजाने मला बोलावलेले नसताना त्याच्याकडे जाणे नियमाविरुध्द आहे हे मला माहीत आहे. पण तरी मी जाईन. मग मी मेले तर मेले.”

17 तेव्हा मर्दखय निघून गेला. एस्तेरने त्याला जे करायला सांगितले तसे त्याने केले.

प्रेषितांचीं कृत्यें 27

पौल समुद्रमार्गे रोमला निघतो

27 जेव्हा आम्ही समुद्रमार्गे इटलीला जाण्याचे ठरविले तेव्हा पौल व इतर काही कैद्यांना युल्य नावाच्या शताधिपतीच्या हाती सोपविण्यात आले. युल्य हा सम्राटाच्या सेनेतील एक अधिकारी होता. अद्रमुतिय येथील एका जहाजातून आम्ही जाणार होतो. हे जहाज आशियाच्या किनाऱ्यावरील बंदरे घेत पुढे जाणार होते. आम्ही या जहाजातून प्रवासाला निघालो. तेव्हा मासेदोनियातील थेस्सलनीका येथे राहणारा अरिस्तार्ख आमच्याबरोबर होता.

दुसऱ्या दिवशी आम्ही सिदोन नगराला पोहोंचलो. युल्य पौलाशी फार चांगला वागला. पौलाच्या मित्राना त्याची काळजी घेता यावी म्हणून त्याने मोकळीक दिली. तेथून आम्ही समुद्रमार्गे पुढे निघालो. आणि कुप्रच्या किनाऱ्याकिनाऱ्याने निघालो कारण वारा समोरचा होता. किलकिया व पंफुल्याजवळच्या समुद्राला पार करुन लुक्या प्रांतातील मुर्या बंदरात पोहोंचलो. तेथे शताधिपतीला इटलीला जाणारे आलेक्झांद्रीयाचे एक जहाज आढळले. त्याने आम्हांला त्या जहजात बसविले.

आम्ही बरेच दिवस हळूहळू प्रवास करीत होतो. कनिदा येथपर्यंत येण्यासाठी आम्हांला फार कष्ट पडले कारण वारा तोंडचा होता. आम्हांला पुढे जाता येईना. म्हणून आम्ही क्रेताच्या दक्षिणेकडून सलमोनाच्या समोरच्या बाजूस गेलो. यापुढे आमचे जहाज क्रेतच्या किनाऱ्याने मोठ्या अडचणींतून सुरक्षित बंदर येथे पोहोंचले, तेथे जवळच लसया नगर होते.

बराच वेळ वाया गेला होता. आणि पुढील प्रवास करणे बरेच अवघड झाले होते. कारण एव्हाना यहूद्यांच्या उपासाचा काळही [a] निघून गेला होता. तेव्हा पौलाने त्यांना सावधानतेचा इशारा दिला. पौल म्हणला, 10 “पुरुषांनो, मला वाटते, आपल्या प्रवासात जहाजातील मालाला आणि जहाजालाच नव्हे तर आपल्या जीवालाही धोका होईल!” 11 परंतु पौलाच्या मताशी जहाजाचा कप्तान व मालक सहमत झाले नाहीत, उलट जहाजाच्या कप्तानाच्या व मालकाच्या बोलण्यावरच शताधिपतीचा जास्त विश्वास होता. 12 परंतु हे बंदर (सुरक्षित म्हटलेले) हिवाळ्यात मुक्काम करायला सोईचे नव्हते. म्हणून बहुमताने पुढे निघावे असे ठरले. आणि फेनिकेला जाण्याचा प्रयत्न करावा आणि शक्य झाले तर तेथेच हिवाळा घालवावा असे ठरले. (फेनिके हे क्रेत बेटावरील शहर होते. त्याचे बंदर नैऋ त्य व वायव्य दिशेला होते.)

वादळ

13 जेव्हा दक्षिणेकडून मंद वारे वाहू लागले, तेव्हा ते नांगर उचलून क्रेताच्या किनाऱ्याकिनाऱ्याने तारु हाकारीत जाऊ लागले. जहाजावरच्या लोकांना वाटू लागले की, अशाच प्रकारचे वारे आम्हांला पाहिजे होते. व तसेच ते वाहत आहे. 14 परंतु लवकरच क्रेत बेटावरुन “ईशान्येचे” म्हटलेले वादळी वारे वाहू लागले. 15 आणि जहाज वादळी वाऱ्यात सापडले, व त्याला पुढे जाता येईना. तेव्हा पुढे जाण्याचा प्रयत्न सोडून आम्ही वाऱ्याने जहाज भरकटू दिले.

16 मग कौदा नावाच्या लहानशा बेटाच्या किनाऱ्याकिनाऱ्याने आम्ही जाऊ लागलो. मग थोड्या खटपटीनंतर जीवनरक्षक होडी वर उचलून घेतली. 17 जीवन रक्षक होडी आत घेतल्यावर लोकांनी जहाज दोरखंडाने आवळून बांधले. जहाज वाळू असलेल्या सूर्ती [b] नावाच्या उथळ जागी आदळेल या भीतीने त्यांनी शीड खाली काढले. तेव्हा वाऱ्याने ते भरकटू लागले.

18 जोरदार वादळी वाऱ्याचे तडाखे खावे लागल्याने लोकांनी दुसऱ्या दिवशी जहाजावरील सामान बाहेर टाकून दिले. 19 तिसऱ्या दिवशी जहाजाची काही सामग्री त्यांनी आपल्या हातांनी बाहेर काढून टाकली. 20 बरेच दिवस आम्हांला सूर्य किंवा तारे दिसले नाहीत. वादळ फारच भयंकर होते. आम्ही आमच्या सर्व आशा सोडून दिल्या. आम्ही मरणार असे आम्हांला वाटू लागले.

21 बराच काळपर्यंत लोकांनी अन्नपाणी घेतले नव्हते. मग पौल त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, “गुहस्थांनो, क्रेतावरुन मुक्काम हलवू नका, हा माझा सल्ला तुम्ही ऐकायला पाहिजे होता. म्हणजे हा त्रास व ही हानि तुम्हांला टाळता आली असती. पण आता तुम्ही धीर धरावा अशी माझी विनंति आहे. 22 कारण तुमच्यापैकी एकाच्याही जीवाला धोका पोहोंचणार नाही. आपले जहाज मात्र गमवावे लागेल. 23 मी ज्या देवाचा सेवक आहे आणि ज्याची भक्ति मी करतो, त्याचा दूत काल रात्री माझ्या बाजूला उभा राहीला. 24 आणि तो दूत म्हणाला, ‘पौला भिऊ नको! तुला कैसरापुढे उभे राहिलेच पाहिजे. तुझ्याबरोबर प्रवास करणारे जे लोक आहेत, त्यांच्या जीवाचे रक्षण करण्याचे वचन देवाने मला दिले आहे.’ 25 तेव्हा गुहस्थांनो, तुम्ही सर्व धीर धरा! कारण मला जसे दूताने सांगितले, अगदी तसे होणार असा मला विश्वास आहे. 26 परंतु आपणास एखाद्या बेटावर उतरुन थांबावे लागले.”

27 चौदाव्या रात्री आमचे जहाज अद्रिया समुद्रातून चालले होते, तेव्हा खलाशांनी जहाज एखाद्या भूमीजवळ पोहोंचले असावे असा अंदाज केला. 28 त्यांनी पाण्याची खोली मोजली तेव्हा ती वीस वाव भरली. आणखी काही वेळाने त्यांनी परत एकदा समुद्राची खोली मोजली तेव्हा ती पंधरा वाव भरली. 29 ओबडधोबड खडकाळ जागेवर आपले जहाज आदळेल अशी भीति वाटल्याने त्यांनी चार नांगर जहाजाच्या मागील बाजूने टाकले आणि दिवस उजाडण्याची वाट पाहू लागले. 30 खलाशांनी जहाजातून सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जहाजाच्या पुढील भागातून नांगर टाकल्याचे भासवून जीवनरक्षक होड्या समुद्रात टाकल्या. 31 परंतु पौल शताधिपतीला व इतर शिपायांना म्हणाला, “जर हे लोक जहाजात राहणार नाहीत, तर तुम्ही वाचणार नाही.” 32 यावर शिपायांनी जीवनरक्षक होड्यांचे दोर कापून टाकले. आणि त्या खाली पाण्यात पडू दिल्या.

33 पहाट होण्याअगोदर पौलाने त्या सर्वांना काहीतरी खाण्याचा आग्रह केला. तो म्हणाला, “आज चौदावा दिवस आहे. तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात पण खाणेपिणे काही केले नाही. अन्नाचा कणही खाल्ला नाही. 34 तुम्ही थोडे तरी खा. कारण तुमचा टिकाव लागण्यासाठी तुम्ही खाणे जरुरीचे आहे. तुम्ही खावे अशी मी तुम्हांला विनंति करतो. तुमच्यापैकी कोणाच्या केसालाही धक्का लागणार नाही.” 35 असे बोलल्यानंतर पौलाने भाकर घेतली आणि सर्वांच्या समक्ष देवाचे उपकार मानले, ती भाकर मोडून तो खाऊ लागला. 36 ते पाहून त्या सर्वांना धीर आला आणि ते जेवले. 37 आम्ही सर्व मिळून जहाजात दोनशे शाहातर लोक होतो. 38 त्या सर्वांनी पुरेसे खाल्ल्या प्यायलयांनंतर धान्य समुद्रात टाकून दिले आणि जहाजातील भार कमी केला.

जहाज नष्ट होते

39 दिवस उजाडल्यावर त्यांना भूभागाची ओळख पटली नाही. परंतु तेथे किनारा असलेल्या उपसागरासारखी ती जागा दिसून आली. म्हणून शक्य झाल्यास तेथील किनाऱ्याला जहाज लावण्याचे त्यांनी ठरविले. 40 म्हणून त्यांनी नांगर कापले आणि समुद्रात पडू दिले. त्याचबरोबर सुकाणूंच्या दोऱ्या एकत्र केल्या. नंतर त्यांनी जहाजाच्या पुढच्या भागाचे शीङ वारा भरावे म्हणून उभे केले आणि जहाज किनाऱ्याला आणले. 41 परंतु दोन समुद्रांमधील वर आलेल्या वाळूच्या ढिगावर जहाज जोराने आदळले. तेव्हा जहाजाची पुढची बाजू वाळूमध्ये रुतून बसली आणि गलबताचा मागचा भाग लाटांच्या तडाख्यामुळे तुटू लागला.

42 तेव्हा शिपायांनी कैद्यांना मारण्याचे ठरविले. यासाठी की त्यांच्यातील कोणी पोहोत जाऊन पळू नये. 43 परंतु शतधिपतीला पौलाला वाचवायचे होते म्हणून त्याने शिपायांना तो विचार सोडून देण्यास सांगितले. आणि ज्यांना पोहता येत असेल त्यांनी जहाजातून उड्या टाकून किनाऱ्याला जावे अशी आज्ञा केली. 44 बाकीच्या लोकांनी फळ्यांच्या अगर जहाजाच्या तुटलेल्या लाकडांच्या आधारे भूमी गाठावी असे सांगितले. अशा रीतीने जहाजातील सर्व जण सुखरुपपणे भूमीवर पोहोंचले.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center