Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
उत्पत्ति 25

अब्राहामाचे कुटुंब

25 अब्राहामाने पुन्हा लग्न केले, त्याच्या दुसऱ्या बायकोचे नाव कटूरा होते. कटुरेला जिब्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शुह ही मुले झाली; यक्षानास शबा व ददान ही दोन मुले होती; अश्शूरी व लऊमी लदूशी लोक हे ददानाचे वंशज होते; एफा, एफर, हनोख, अबीदा व एल्दा हे मिद्यानाचे मुलगे होते; ही सर्व मुले अब्राहामापासून कटूरेला झाली. 5-6 मरण्यापूर्वी अब्राहामाने आपल्या गुलाम स्त्रियांच्या मुलांसाठी काही देणग्या दिल्या; त्याने या मुलांना इसहाकापासून वेगळे करुन दूर पूर्वेकडील देशात पाठवून दिले; नंतर त्याने आपली सगळी मालमत्ता इसहाकाला दिली.

अब्राहाम एकशे पंच्याहत्तर वर्षे जगला; त्याला दीर्घकाळ सुखी व समाधानी जीवन लाभले; मग तो अशक्त होऊन मरण पावला व आपल्या पूर्वजास जाऊन मिळाला; इसहाक व इश्माएल या त्याच्या मुलांनी त्याला सोहराचा मुलगा एप्रोन हित्ती याच्या मम्रेच्या पूर्वेकडे असलेल्या शेतातील मकपेला गुहेत सारेच्या जवळ पुरले; 10 अब्राहामाने हित्ती लोकांकडून विकत घेतलेली हीच ती गुहा. 11 अब्राहामाच्या मृत्यूनंतर परमेश्वराने त्याचा मुलगा इसहाक याला आशीर्वादित केले आणि त्यानंतर ही इसहाक बैर-लहाय-रोई येथेच राहू लागला.

12 अब्राहामापासून सारेची दासी हागार हिला झालेल्या इश्माएलाची ही वंशावळ; 13 इश्माएलाच्या मुलांची नावे अशी. नबायाथ हा त्याचा पहिला मुलगा; नंतर केदार जन्मला, मग अदबील, मिबसाम, 14 मिश्मा, दुमा, मस्सा, 15 हदद, तेमा, यतूर, नापीश व केदमा; 16 अशी इश्माएलाच्या पुत्रांची नावे होती; प्रत्येक मुलाच्या परिवार गटाचा एक तळ होता; पुढे त्याचेच एक गांव बनले; हे बारा पुत्र आपापल्या लोकासहीत बारा वंशाचे संस्थापक सरदार झाले. 17 इश्माएल एकशें सदतीस वर्षे जगला नंतर तो मेला आणि आपल्या पूर्वजांमध्ये गोळा झाला; 18 त्याचे वंशज सर्व वाळवंट भागात तळ देत राहिले; हा भाग मिसर जवळील हवीलापासून शूरपर्यंत आहे आणि तो शूरपासून पार अश्शूरपर्यंत जातो. अश्शूर इश्माएलाचे वंशज अधूनमधून आपल्याच भाऊबंदावर हल्ला करीत असत.

इसहाकाचा वंश

19 इसहाकाची घराणी अशी, अब्राहामाला इसहाक नावाचा मुलगा होता. 20 तो चाळीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने पदन अराम येथील अरामी बथुवेलाची कन्या व लाबान याची बहीण रिबका इजशी लग्न केले. 21 इसहाकाच्या बायकोला मूलबाळ होईना म्हणून इसहाकाने रिबकेसाठी परमेश्वराची प्रार्थना केली; परमेश्वराने इसहाकाची प्रार्थना ऐकली आणि रिबका गर्भवती झाली.

22 ती गरोदर असताना तिच्या उदरातील दोन मुले एकमेकांशी झगडू लागली; तेव्हा परमेश्वराची प्रार्थना करुन ती म्हणाली, “परमेश्वरा, मला हे असे का होत आहे?” 23 परमेश्वर तिला म्हणाला,

“दोन राष्ट्राचे राज्यकर्ते
    तुझ्या उदरातून जन्म घेतील;
एक मुलगा दुसऱ्यापेक्षा बलवान होईल;
    वडील मुलगा धाकट्याची सेवा करील.”

24 मग रिबकेची प्रसूतीची वेळ आली तेव्हा तिला जुळी मुले झाली; 25 पहिला मुलगा तांबूस रंगाचा होता, त्याचे अंग जणूकाय केसाळ झग्यासारखे होते; म्हणून त्याचे नाव एसाव (म्हणजे केसाळ) असे ठेवले. 26 पाठोपाठ दुसरा मुलगा जन्मला तेव्हा त्याने एसावाची टाच हाताने घट्ट धरली होती; म्हणून त्याचे नाव याकोब असे ठेवले. रिबकेला ही जुळी मुले झाली तेव्हा इसाहक साठ वर्षांचा होता.

27 ही जुळी मुले वाढत जाऊन मोठी झाली तेव्हा एसाव तरबेज शिकारी झाला; शेताशेतातून व रानावनातून फिरण्याची त्याला आवड होती. पण याकोब शांत होता तो त्याच्या तंबूत राहिला. 28 एसाव इसहाकाचा आवडता होता; त्याने शिकार करुन आणलेल्या प्राण्यांचे मांस खाणे इसहाकाला आवडत असे; परंतु याकोब रिबकेचा आवडता होता.

29 एके दिवशी एसाव शिकारीहून परत आला; तो फार थकलेला होता व भुकेने अगदी गळून गेला होता. याकोब मसुरीच्या लाल डाळीचे वरण शिजवीत होता. 30 तेव्हा एसाव याकोबाला म्हणला, “मी भुकेने व्याकूळ झालो आहे तर मला थोडे तांबड्या डाळीचे वरण खावयास घेऊ दे;” यावरुन लोक त्याला अदोम (म्हणजे तांबडा) म्हणत.

31 परंतु याकोब म्हणाला, “त्याबद्दल तू मला आजच तुझा ज्येष्ठपणाचा हक्क दिला पाहिजेस.”

32 एसाव म्हणाला, “भुकेने माझा प्राण चालला आहे, मी जर मेलो तर माझ्या बापाची मालमत्ता मला काय उपयोगाची? तेव्हा मी माझ्या ज्येष्टपणाचा हक्क तुला देतो.”

33 परंतु याकोब म्हणाला, “तर प्रथम, तू तुझा ज्येष्ठपणाचा वारसा हक्क मला देशील अशी शपथ माझ्याशी वाहा.” तेव्हा एसावाने तशी शपथ वाहिली; अशा रीतीने एसावाने आपल्या बापाकडून मिळणाऱ्या सगळ्या मालमत्तेचा व ज्येष्टपणाचा आपला वारसा हक्क आपला धाकटा भाऊ याकोब याला मोबदला म्हणून दिला. 34 मग याकोबाने त्याला भाकर व मसुरीच्या डाळीचे वरण दिले. एसावाने ते खाल्ले व पाणी पिऊन झाल्यावर तो तेथून निघून गेला. अशा रीतीने आपल्या बापाकडून मिळणाऱ्या ज्येष्ठपणाच्या हक्काची एसावाने बेपर्वाईने कदर केली नाहीं.

मत्तय 24

मंदिराचा भावी नाश(A)

24 येशू मंदिरातून बाहेर निघून चालत निघाला होता तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे आले. कारण त्यांना त्याला मंदिराच्या इमारती दाखवायच्या होत्या. प्रतिसादादाखल, तो त्यांना म्हणाला, “तुम्ही या सर्व गोष्टी पाहता. खरे ना? आता, मी तुम्हांला खरे सांगतो, येथे एक दगड दुसऱ्या दगडावर राहणार नाही. त्यातील प्रत्येक दगड खाली टाकला जाईल.”

येशू जैतूनाच्या डोंगरावर बसला असताना, त्याचे शिष्य त्याच्याशी एकांतात बोलावे म्हणून आले, ते म्हणाले, “आम्हांला सांगा की या गोष्टी कधी होतील? तुम्ही परत येण्याचा आणि जगाचा शेवट होण्याचा काळ जवळ आला आहे हे आम्ही कोणत्या घटनांवरून ओळखावे?”

येशूने त्यांना उत्तर दिले, “सांभाळा! कोणीही तुम्हांला फसवू नये मी हे म्हणतो कारण असे पुष्कळ आहेत की जे माझ्या नावाने येतील आणि ते म्हणतील, ‘मी ख्रिस्त आहे,’ आणि ते पुष्कळ लोकांना फसवितील. तुम्ही लढायांबद्दल आणि लढायांच्या अफवांबद्दल ऐकाल पण त्यामुळे तुम्ही त्यांना भिऊ नका. या गोष्टी घडल्याच पाहिजेत. तरी इतक्यात शेवट जवळ येणार नाही. होय, एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल. अनेक ठिकाणी भूकंप व दुष्काळ येतील. पण या सर्व गोष्टी म्हणजे प्रसूतीच्या कळांची सुरूवात अशा आहेत.

“लोक तुमच्याशी वाईट वागतील. तुमचा छळ व्हावा आणि तुम्हांला जिवे मारावे यासाठी लोक तुम्हांला राज्यकर्त्याच्या हाती देतील. सर्व लोक तुमचा द्वेष करतील. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून या गोष्टी तुमच्यावर ओढवतील. 10 अशा वेळी बरेच विश्वासणारे आपला विश्वास गमावतील. ते एकमेकाविरुद्ध उठतील आणि एकमेकांचा द्वेष करतील. 11 अनेक खोटे संदेष्टे येतील, ते लोकांना चुकीचे शिक्षण देतील व त्यावर विश्वास ठेवायला लावतील. 12 सतत वाढणाऱ्या दुष्टाईमुळे अधिकाधिक विश्वासणाऱ्यांची प्रीति कमी कमी होत जाईल. 13 पण जो मनुष्य शेवटपर्यंत खंबीरपणे वागेल तोच तारला जाईल. 14 सर्व जगभर देवाची सुवार्ता गाजविली जाईल व हे सर्व राष्ट्रातील लोकांना साक्ष असे होईल. आणि मग शेवट होईल.

15 “दानीएल संदेष्ट्याने एका अमंगळ गोष्टीविषयी सांगितले की, जिच्यामुळे नाश ओढवेल. अशी अमंगळ गोष्ट ही पवित्र जागी- मंदिरामध्ये उभी असलेली तुम्ही पाहाल.” (तुम्ही लोक जे हे वाचाल ते याचा अर्थ समजून घ्या.) 16 “त्यावेळी यहूदातील लोकांनी डोंगरावर पळून जावे. 17 जो कोणी छपरावर असेल त्याने घरातील सामान घेण्यासाठी उतरु नये. 18 जर कोणी शेतात असेल तर त्याने आपला सदरा घेण्यासाठी परत जाऊ नये.

19 “त्याकाळी गर्भवती असलेल्या अगर तान्ही बालके असलेल्या स्रियांना फार कठीण जाईल. 20 जेव्हा या गोष्टी होतील आणि तुम्हांला पळून जावे लागेल तेव्हा थंडीचे दिवस नसावेत अथवा शब्बाथ दिवस नसावा यासाठी प्रार्थना करा. 21 कारण त्याकाळी फार पीडा येतील. जगाच्या आरंभापासून कधीही झाली नाही आणि पुन्हा कधी होणार नाही अशी पीडा त्या काळी भोगावी लागेल.

22 “आणखी, देवाने ते दिवस जर थोडेच ठेवले नसते तर कोणीच वाचले नसते. परंतु त्याच्या निवडलेल्यांमुळे तो ते दिवस थोडे करील.

23 “त्या वेळी जर एखाद्याने तुम्हांला म्हटले, ‘पहा! ख्रिस्त येथे आहे,’ किंवा ‘तो तेथे आहे’, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. 24 खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदयास येतील. ते महान आश्चर्यकारक चिन्हे दाखवतील. देवाच्या निवडलेल्या लोकांना ते चिन्हे दाखवतील व लोकांना एवढेच नव्हे तर देवाच्या निडवलेल्यांना फसविण्याचा प्रयत्न करतील. 25 या गोष्टी होण्या अगोदरच मी तुम्हांला सावध केले आहे.

26 “एखादा मनुष्य तुम्हांला सांगेल, ‘पाहा, मशीहा ओसाड रानात आहे.’ तर तेथे जाऊ नका. किंवा जर ते म्हणाले, पाहा, ‘ख्रिस्त, आतल्या खोलीत लपला आहे’, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. 27 मी हे म्हणतो कारण वीज जशी पूर्वेकडून पश्चिमेकडे चमकताना सर्वाना दिसते तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणेदेखील असेल. 28 जेथे कोठे प्रेत असेल तेथे गिधाडेही असतील.

29 “छळानंतर लगेच, असे घडेल:

‘सूर्य अंधकारमय होईल
    व चंद्र प्रकाश देणार नाही.
आकाशातील तारे व नक्षत्रे गळून पडतील आकाशातील सर्व शक्ती डळमळतील.
    आकाश गुंडाळीसारखे गुंडाळले जाईल.’ (B)

30 “त्यावेळेला मनुष्याच्या पुत्राच्या येण्याचे चिन्ह आकाशात दिसेल. तेव्हा जगातील सर्व लोक शोक करतील. मनुष्याच्या पुत्राला सर्व जण मेघावर बसून येताना पाहतील. तो महासामर्थ्य आणि वैभव यांच्यासह येईल. 31 मनुष्याचा पुत्र तुतारीचा मोठा नाद करून आपले दूत पृथ्वीभोवती पाठवून देईल. ते पृथ्वीच्या चारही कोपऱ्यातून, आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत निवडलेल्यांना गोळा करतील.

32 “अंजिराच्या झाडापासून शिका: अंजिराच्या झाडाच्या फांद्या जेव्हा हिरव्या आणि कोवळ्या असतात आणि पाने फुटू लागतात तेव्हा उन्हाळा जवळ आला हे तुम्हांला कळते. 33 मी तुम्हांला ज्याविषयी सांगितले त्याबाबतीतही असेच होईल जेव्हा या सर्व गोष्टी तुम्ही पाहाल तेव्हा वेळ जवळ येत आहे हे तुम्ही ओळखाल. 34 मी तुम्हांला खरे सांगतो: या गोष्टी होत असताना आजची ही पिढी नाहीशी होणार नाही. 35 सर्व जग, आकाश, पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने कधीही नष्ट होणार नाहीत.

ती वेळं कोनती अशेल ते फक्त देवालाच ठाउक(C)

36 “पण त्या दिवसाविषयी आणि त्या घटके विषयी कोणालाही माहीत नाही, स्वर्गातील देवदूतांनाही नाही, किंवा खुद्द पुत्रालाही नाही. फक्त पिताच हे जाणतो.

37 “नोहाच्या काळी घडले तसे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळेसही होईल. 38 महापूर येण्याअगोदर लोक खातपीत होते. लोक लग्न करीत होते. लग्न करून देत होते. नोहा जहाजात जाईपर्यत लोक या गोष्टी करीत होते. 39 त्यांना माहीत नव्हते की काही तरी घडणार आहे. परंतु नंतर पूर आला आणि सर्व लोक मरून गेले.

“मनुष्याचा पुत्र आल्यावर असेच होईल. 40 दोघे जण शेतात एकत्र काम करत असतील तर त्यातला एक जण वर घेतला जाईल आणि दुसरा तेथेच राहील. 41 दोन स्त्रिया जात्यावर धान्य दळत असतील तर त्या दोघीतील एक वर घेतली जाईल आणि दुसरी तेथेच राहील.

42 “म्हणून तुम्ही तयार असा, कारण तुम्हांला माहीत नाही की कोणत्या दिवशी तुमचा प्रभु येत आहे, 43 हे लक्षात ठेवा, चोर केव्हा येईल हे जर घराच्या मालकाला माहीत असते तर तो त्यासाठी तयारीत राहिला असता आणि त्याने चोराला घर फोडू दिले नसते. 44 या कारणासाठी तुम्हीसुद्धा तयार असले पाहिजे. जेव्हा तुम्हांला अपेक्षा नसेल तेव्हा मनुष्याचा पुत्र येईल.

चांगला व वईट सेवक(D)

45 “शहाणा आणि विश्वासू सेवक कोण बरे? दुसऱ्या सेवकांना वेळेवर जेवण देण्याचे काम मालक एका सेवकावर सोपवितो. हे काम करण्यासाठी मालक कोणाला विश्वासाने सांगेल? 46 मालक आल्यावर आपले दिलेले काम करीत असलेला सेवक खरोखर धन्य! 47 मी तुम्हांला सांगतो: मालक आपल्या सर्व मालमत्तेवर त्या सेवकाची नेमणूक करील.

48 “पण जर सेवक वाईट निघाला आणि आपला मालक लवकर घरी परत येणार नाही असे म्हणाला तर काय होईल? 49 तो सेवक इतर सेवकांना मारहाण करील आणि आपल्यासारख्या लोकांबरोबर जेवण करील आणि दारू पिऊन मस्त होईल. 50 आणि तो सेवक तयारीत नसेल अशा वेळी मालक येईल. 51 मग मालक त्या सेवकाचे तुकडे करील. त्या सेवकाला मालक ढोंगी लोकांबरोबर राहायला पाठवील. आणि त्या ठिकाणी रडणे व दात खाणे चालेल.

एस्तेर 1

राणी वश्तीचा आज्ञाभंग

राजा अहश्वेरोशच्या कारकिर्दीतील गोष्ट. हिंदुस्तानपासून कूश पर्यंत एकशेसत्तावीस प्रांतांवर तो राज्य करत होता. शूशन या राजधानीच्या नगरातून राजा अहश्वेरोश राज्य करीत असे.

आपल्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी त्याने आपले प्रधान आणि अधिकारी यांना मेजवानी दिली. पारस आणि मेदय या प्रांतांमधले सैन्याधिकारी आणि महत्वाचे कारभारीही त्या ठिकाणी होते. या मेजवान्या एकशेऐंशी दिवस चालल्या. या काळात राजा अहश्वेरोशने आपल्या राज्याच्या ऐश्वर्याचे प्रदर्शन केले. आपल्या प्रासादाचे राजेशाही सौंदर्य आणि वैभव त्याने सर्वांना दाखवले. एकशेऐंशी दिवसांचा हा काळ संपल्यावर राजा अहश्वेरोशने आणखी एक मेजवानी दिली. ती सात दिवस चालली. राजवाडयाच्या अंतर्भागातील उद्यानात ही मेजवानी होती. तिथे शूशन या राजधानीच्या शहरातील समस्त लहान थोरांना आमंत्रित केले होते. या आतल्या उद्यानात अळशीच्या सुताचे पांढरे निळे शोभेचे पडदे खोलीभर टांगले होते. हे पडदे पांढऱ्या जांभळया अळशीच्या दोऱ्यांनी रुप्याच्या कड्यांमध्ये अडकवून संगमरवरी स्तंभांना लावले होते. तेथील मंचक सोन्यारुपाचे असून जांभा, संगमरवर शिंप आणि इतर मूल्यवान खड्यांच्या नक्षीदार फरशीवर ठेवलेले होते. सुवर्णपात्रांतून द्राक्षारस दिला होता. ही पात्रेही नानाविविध तऱ्हांची होती. राजा अतिशय उदार असल्यामुळे द्राक्षारस भरभरुन देण्यात आला. सर्व आमंत्रितांना मनसोक्त द्राक्षारस देण्यात यावा अशी राजाने आपल्या सेवकांना आज्ञा दिली होती व सेवक राजाची आज्ञा पाळत होते.

राणी वश्ती हिनेही राजमहालातील स्त्रियांना मेजवानी दिली.

10-11 मेजवानीच्या सातव्या दिवशी राजा अहश्वेरोश द्राक्षारस प्याल्याने उत्तेजित मनः स्थितीत होता. तेव्हा आपल्या तैनातीत असलेल्या महूमान, बिजथा, हरबोना, बिगथा, अवगथा, जेथर आणि कर्खस या सात खोजांना त्याने राणीला राजमुगुट घालून आपल्याकडे आणण्यास सांगितले. राणी खूप सुंदर होती. तेव्हा आपले सर्व अधिकारी व सरदार यांच्यासमोर तिने आपले रुप दाखवावे अशी त्याची इच्छा होती.

12 पण त्या सेवकांनी जेव्हा राणी वश्तीला राजाची ही आज्ञा सांगितली तेव्हा तिने येण्यास नकार दिला. तेव्हा राजा फार संतापला. 13-14 पंडिताचा आणि ज्योतिष्यांचा सल्ला घ्यायची राजाची प्रथा होती. त्यानुसार कायदे जाणणाऱ्या पंडितांशी राजा बोलला. ही सुज्ञ मंडळी राजाला जवळची होती. त्यांची नावे अशी: कर्शना, शेथार, अदमाथा, तार्शीश, मेरेस, मर्सना ममुखान. हे सातजण पारस आणि मेदय मधले अत्यंत महत्वाचे अधिकारी होते. राजाला भेटण्याचा त्यांना विशेषाधिकार होता. राज्यातले ते सर्वात उच्च पदावरील अधिकारी होते. 15 राजा ने त्यांना विचारले “राणी वश्तीवर काय कायदेशीर कारवाई करावी कारण तिने राजाची जी आज्ञा खोजांमार्फत दिली होती तीचे उल्लंघन केले आहे.”

16 तेव्हा ममुखानाने सर्व अधिकाऱ्यांसमक्ष राजाला सांगितले, “राणी वश्तीच्या हातून प्रमाद घडलेला आहे. तिची ही गैरवर्तणूक केवळ राजाच्याच विरुध्द नव्हे तर राज्यातील सर्व सरदार व प्रजा यांच्याविरुध्द आहे. 17 माझे म्हणणे असे आहे की राणी वश्ती अशी वागली हे इतर सर्व बायकांना समजेल. त्या उद्या आपल्या नवऱ्यांचा शब्द डावलतील. त्या आपापल्या नवऱ्यांना म्हणतील, ‘अहश्वेरोश राजाने राणीला आपल्यापुढे आणायला सांगितले पण तिने यायला नकार दिला.’

18 “राणीचे कृत्य आजच पारस आणि मेदय इथल्या अधिकाऱ्यांच्या बायकांच्या कानावर गेले आहे. त्यांच्यावर तिच्या या वर्तणुकीचा प्रभाव पडेल. त्या बायकाही मग राजाच्या अधिकाऱ्यांशी तसेच वागतील. त्यातून अनादर आणि संताप फैलावेल.

19 “तर राजाची मर्जी असल्यास एक सूचना करतो. राजाने एक राजकीय फर्मान काढावे आणि त्यात काही फेरबदल होऊ नये म्हणून पारसी आणि मेदय यांच्या कायद्यात ते लिहून ठेवावे. राजाज्ञा अशी असेल की वश्तीने पुन्हा कधीही राजा अहश्वेरोशच्या समोर येऊ नये. तसेच तिच्यापेक्षा जी कुणी चांगली असेल तिला राजाने पट्टराणी करावे. 20 राजाच्या या विशाल साम्राज्यात ही आज्ञा एकदा जाहीर झाली की सर्व बायका आपापल्या नवऱ्यांशी आदराने वागतील. लहानापासून थोरापर्यंत सर्वांच्या बायका आपल्या नवऱ्याचा मान ठेवतील.”

21 या सल्ल्याने राजा आणि त्याचा अधिकारी वर्ग आनंदित झाला. ममुखानची सूचना राजा अहश्वेरोशने अंमलात आणली. 22 राजा अहश्वेरोशने सर्व राज्यभर खलिते पाठवले. प्रत्येक प्रांतात पाठवायचा खलिता त्या प्रांताच्या भाषेत होता. प्रत्येक राष्ट्राला तिथल्या भाषेत पत्र गेले. प्रत्येक पुरुषाची आपल्या घरात सत्ता चालावी असे त्या पत्रांमध्ये सर्वांना समजेल अशा भाषेत लिहिलेले होते.

प्रेषितांचीं कृत्यें 24

यहूदी लोक पौलावर दोष ठेवतात

24 पाच दिवसांनतर हनन्या कैसरिया येथे गेला. हनन्या मुख्य याजक होता. हनन्याने आपल्याबरोबर काही यहूदी वडीलजन आणि तिर्तुल्ल नावाचा वकील यांना कैसरिया येथे नेले; त्यांनी राज्यपालापुढे पौलावरिल दोषारोप सादर केले. जेव्हा पौलाला आत नेण्यात आले तेव्हा तिर्तुल्ल याने पौलावरील आरोप सांगण्यास सुरुवात केली.

तो म्हणाला, “फेलिक्स महाराज, तुमच्यामुळे आम्हांला फार शांतता लाभली असून, तुमच्या दूरदृष्टीमुळे जरुर असलेल्या सुधारणासुद्धा या देशात झाल्या आहेत. फेलिक्स महाराज, आम्ही हे सर्व प्रकारांनी व सर्व ठिकाणी हे कृतज्ञतेने मान्य करतो. परंतु तुमचा अधिक वेळ न घेता, आम्ही जे काही तुम्हांला थोडक्यात सांगतो, ते ऐकून घेण्याची कृपा करावी, ही विनंती करतो. हा मनुष्य त्रास देणारा आहे, जगात सगळीकडे यहूदी लोकांना त्याने त्रास दिलेला आहे. तो नासरेथकराच्या पंथाचा पुढारी आहे. 6-7 त्याने देवाचे मंदिर विटाळण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही त्याला धरले [a] या गोष्टी खऱ्या आहेत की नाही हे तुम्ही ठरवू शकता. त्याला काही प्रश्न विचारा.” इतर यहूदी लोकांनी याला मान्यता दिली व सांगितले की, “हे सर्व खरे आहे!”

Paul Defends Himself Before Felix

10 जेव्हा राज्यपालाने पौलाला बोलण्यास खुणावले, तेव्हा पौल म्हणाला, “फेलिक्स महाराज, बरीच वर्षे या देशाचे न्यायाधीश म्हणून आपण काम करीत आहात, म्हणून मला आपणा समोर स्वतःचा बचाव करायला आनंद वाटत आहे. 11 यरुशलेम येथे उपासनेसाठी जाऊन मला बारोपेक्षा जास्त दिवस झालेले नाहीत, ही गोष्ट खरी आहे की नाही, हे आपण पडताळून पाहू शकता 12 मी मंदिरात कोणाशी वाद घालताना, सभास्थातात किंवा बाहेर कोठे कोणाला चिथावून देताना या लोकांना आढळलो नाही. 13 हे लोक माझ्यावर जो आरोप ठेवीत आहेत, तो त्यांना तुमच्यासमोर सिद्ध करता येणार नाही.

14 “मात्र मी हे आपल्यसमोर कबूल करतो: या मार्गाने (ख्रिस्ती मार्गाने) जाऊन मी आपल्या वाडवडिलांच्या देवाची उपासना करतो त्या मार्गाला हे लोक पंथ म्हणतात. जे काही नियमशास्त्रात सांगितले आहे आणि जे काही आमच्या संदेष्ट्यानी सांगितलेले आहे, त्या सर्वांवर मी विश्वास ठेवतो. 15 आणि धार्मिकांचे व वाईटांचेही मरणातून पुन्हा उठणे होणार आहे, ही गोष्ट हे लोकही माइयाबरोबर मानतील अशी मी देवामध्ये आशा बाळगतो. 16 यासाठी देवापुढे आणि मनुष्यांपुढे आपला विवेक शुद्ध असावा याचा मी नेहमी आटोकाट प्रयत्न करीत असतो.

17 “अनेक वर्षे दूर राहिल्यानंतर माइया लोकांतील गरीबांना दान देऊन यरुशलेममध्ये स्वतःसाठी अर्पण करावे म्हणून मी मंदिरात जाऊन हा विधी करीत असताना, शुद्धीकरण झालेला असा मी त्यांस आढळलो. 18 तेथे मी कसलाही जमाव केला नव्हता अगर दंगा ही केला नव्हता 19 पण आशियातील काही लोक तेथे हजर होते. 20 जर त्यांना माइयाविरुद्ध काही म्हणायचे असेल, तर त्यांनी आपणांपुढे हजर होऊन मला दोषलावावा. किंवा मी जेव्हा धर्मसभेपुढे उभा राहिलो, त्यावेळी माइयामध्ये काही चूक त्यांना आढळली असेल, तर त्यांनी तसे सांगावे. 21 मी या लोकांमध्ये उभे राहून मोठ्याने म्हणालो की, ‘मेलेल्यांतून पुन्हा उठण्याच्या प्रश्नावरुन माझा न्यायनिवाडा होत आहे.’ या एका गोष्टीशिवाय दुसरा आरोप माइयावर करायचा असेल तर यांनी तसे सांगावे.”

22 फेलिक्सला (ख्रिस्ती) मार्गाविषयी चांगली माहिती असल्याने त्याने सुनावणी थांबवली. फेलिक्स म्हणाला, “जेव्हा लुसिया सरदार येथे येईल, तेव्हा तुझ्या प्रकरणाचा काय निर्णय घ्यायचा ते मी ठरवीन.” 23 मग फेलिक्सने शतधिपतीला आज्ञा केली की, पौलाला पहाऱ्यात ठेवावे, परंतु त्याला थोडी मोकळीक देण्यात यावी. आणि असाही हुकूम केला की, त्याच्या मित्रांना त्याची गरज भागविण्यास मना करु नये.

पौल फेलिक्स व त्याच्या पत्नीशी बोलतो

24 काही दिवसांनंतर फेलिक्स आपली पत्नी द्रुसिल्ला हिच्याबरोबर आला. ती एक यहूदी स्त्री होती. फेलिक्सने पौलाला बोलावणे पाठविले. आणि त्याने येशू ख्रिस्तावरील विश्वासाबाबत पौलाचे बोलणे ऐकून घेतले. 25 परंतु जेव्हा पौलाने धार्मिकपणा, आत्मसंयमन, आणि होणाऱ्या न्यायाविषयी सांगितले. तेव्हा फेलिक्सला भीति वाटली. तो पौलाला म्हणाला, “आता तू जा, परत वेळ मिळाला म्हणजे मी तुला बोलावीन.” 26 यावेळी पौल त्याला पैसे देऊ करील असे त्याला वाटत होते म्हणून फेलिक्स त्याला वरचेवर बोलावणे पाठवत असे आणि त्याच्याशी बोलत असे.

27 दोन वर्षे झाल्यावर फेलिक्सच्या जागी पुर्क्य फेस्त हा राज्यपाल झाला. आणि यहूदी लोकांचे मन मोडण्याची फेलिक्सची इच्छा नव्हती, म्हणून त्याने जाण्यापूर्वी पौलाला तुरुंगातच ठवले.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center