Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
उत्पत्ति 22

अब्राहामा, तुझ्या पुत्राचे माझ्यासाठी होमार्पण कर

22 या गोष्टी घडल्यानंतर देवाने अब्राहामाच्या विश्वासाची कसोटी घेण्याचे ठरवले. देवाने अब्राहामाला हाक मारली, “अब्राहाम”,

आणि अब्राहाम म्हणाला, “मी येथे आहे”

देव म्हणाला, “तुझा एकुलता एक प्रिय पुत्र इसहाक याला घेऊन तू मोरिया देशात जा आणि तेथे, मी सांगेन त्या डोंगरावर माझ्यासाठी त्याचे होमार्पण कर.”

तेव्हा अब्राहाम पहाटेस उठला, त्याने खोगीर घालून आपले गाढव तयार केले; इसहाकाला व दोन सेवकांना आपल्या बरोबर घेतले तसेच होमार्पणाकरिता लाकडे घेतली आणि मग ते सर्व देवाने सांगितलेल्या ठिकाणी गेले. तीन दिवस प्रवास केल्यानंतर अब्राहामाने वर पाहिले तेव्हा काही अंतरावर त्याला जेथे जायचे होते ते ठिकाण दिसले. मग अब्राहाम आपल्या सेवकांना म्हणाला, “तुम्ही येथे गाढवा जवळ थांबा; मी माझ्या मुलाला घेऊन त्या समोरच्या जागी जातो, व देवाची उपासना करुन आम्ही माघारी येतो.”

अब्राहामाने लाकडे घेऊन मुल्याच्या खांद्यावर ठेवली; एक खास सुरा (बळी देण्याकरिता) आणि विस्तव घेतला. मग तो व त्याचा मुलगा असे दोघे जण देवाची उपासना करण्यासाठी होमार्पणाच्या जागेकडे संगती निघाले.

इसहाकाने आपल्या बापास हाक मारली, “बाबा!”

अब्राहामाने उत्तर दिले, “काय माझ्या प्रिय मुला?”

इसहाक म्हणाला, “मला लाकडे व विस्तव दिसतात, परंतु होमार्पणासाठी कोंकरु? ते कोठे आहे?”

अब्राहामाने उत्तर दिले, “माझ्या लाडक्या बाळा, होमार्पणासाठी लागणारे कोंकरु देव आपल्याला योग्यवेळी देईल.”

इसहाक वाचतो

तेव्हा अब्राहाम व त्याचा मुलगा संगती निघाले व देवाने सांगिलेल्या ठिकाणी ते जाऊन पोहोंचले, तेथे अब्राहामाने एक वेदी बांधली, त्याने वेदीवर लाकडे रचली; नंतर त्याने आपला पुत्र इसहाक याला बांधून वेदीवरील लाकडावर ठेवले; 10 मग अब्राहामाने आपल्या मुलाचा बळी देण्यासाठी हातातील सुरा उंचावला.

11 परंतु तेवढ्यात, त्याच क्षणाला परमेश्वराच्या दूताने त्याला थांबवले; तो स्वर्गातून ओरडून त्याला म्हणाला, “अब्राहामा! अब्राहामा!”

अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे.”

12 देवदूत म्हणाला, “तू आपल्या मुलाला मारु नकोस, किंवा त्याला कोणत्याही प्रकारची इजा करु नकोस; कारण आता मला खात्रीने समजले की तू देवाला घाबरतोस आणि त्याचा आदर करतोस; कारण तू माझ्यासाठी आपल्या एकुलत्या एका लाडक्या पुत्रालाही, अर्पण करावयास मागेपुढे न पाहता तयार झालास.”

13 आणि मग अब्राहामाने वर दृष्टि करुन सभोंवार पाहिले तेव्हा त्याला एका झुडपात शिंगे अडकलेला एक एडका दिसला; मग त्याने जाऊन तो घेतला व परमेश्वराला होमार्पणासाठी त्याचा बळी दिला. अशा रीतीने अब्राहामाचा मुलगा इसहाक वांचला. 14 तेव्हा अब्राहामाने त्या जागेला, “याव्हे यिरे” असे नाव दिले; आणि आजवर देखील, “या डोंगरावर परमेश्वर दिसू शकतो असे लोक बोलतात.”

15 नंतर स्वर्गातून परमेश्वराच्या दूताने अब्राहामास दुसऱ्यांदा हाक मारली. 16 तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो की तू माझ्यासाठी तुझ्या एकुलत्या एका लाडक्या मुलाचा बळी द्यावयांस मागे पुढे न पाहता तयार झालास म्हणून मी परमेश्वर स्वतःची शपथ घेऊन तुला वचन देती की 17 मी खरोखर तुला आशीर्वाद देईन व तुझी वाढ करीन; मी तुला असंख्य वंशज देईन; तुझी संतती आकाशातील ताऱ्याइतकी, समुद्रकिनाऱ्यावरील वाळू इतकी होईल असे मी करीन; आणि तुझी संतती आपल्या सर्व शत्रुंचा पराभव करुन त्यांना जिंकेल. 18 पृथ्वीवरील प्रत्येक राष्ट्र तुझ्या वंशजाद्वारे आशीर्वाद पावेल; तू माझ्या सर्व आज्ञा पाळल्यास म्हणून मी हे करीन.”

19 मग अब्राहाम आपल्या सेवकाकडे मागे आला आणि अब्राहाम, इसहाक व त्याचे सेवक असे सर्व मिळून प्रवास करीत मागे बैरशेबाला गेले; आणि अब्राहामाने बैर-शेबा येथे वस्ती केली.

20 या सर्व गोष्टी घडल्यानंतर अब्राहामाला असा निरोप आला, “पाहा तुझा भाऊ नाहोर व त्याची बायको मिल्का यांनाही आता मुले झाली आहेतच. 21 त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव ऊस, दुसऱ्याचे बूज, तिसऱ्याचे कमुवेल-हा आरामाचा बाप; 22 त्यानंतर केसेद, हजो, पिलदाश, यिदलाप आणि बथुवेल अशी त्यांची नावे आहेत” 23 बथुवेल रिबकाचा बाप होता. अब्राहामाचा भाऊ नाहोर याजपासून मिल्केला हे आठ मुलगे झाले; 24 आणि त्याची स्त्रीगुलाम रेऊमा हिलाही त्याच्या पासून तेबाह, गहाम, लहश व माका हे चार मुलगे झाले.

मत्तय 21

येशू यरुशलेममध्ये राजासारखा प्रवेश करतो(A)

21 येशू व त्याचे शिष्य यरुशलेमजवळ आले असता ते जैतूनाचा डोंगर म्हटलेल्या टेकडीवर बेथफगे या जागी थांबले. येशूने त्याच्या दोन शिष्यांना असे सांगून पाठविले की, “तुमच्या समोर असलेल्या गावात जा. तुम्ही गावात शिराल तेव्हा एक गाढवी बांधून ठेवलेली व तिच्या जवळ एक शिंगरु असलेले तुम्हांला आढळेल. ती दोन्ही गाढवे सोडून माझ्याकडे घेऊन या. जर कोणी तुम्हांला विचारले की, ही गाढवे कशासाठी नेत आहात तर त्याला सांगा की, ‘येशूला यांची गरज आहे. तो ती लगेच माझ्याकडे पाठवील.’”

हे यासाठी घडले की संदेष्ट्यांपैकी एक जण जे बोलला होता ते पूर्ण व्हावे:

“सोयोनेच्या कन्येला सांग, पाहा,
    ‘तुझा राजा तुझ्याकडे येत आहे!
तो लीन आहे आणि नम्र होऊन गाढवावर बसून येत आहे,
    होय शिंगरावर, कष्ट करणाऱ्या प्राण्याच्या शिंगरावर.’” (B)

त्याचे शिष्य गेले आणि जसे येशूने सांगितले होते तसे त्यांनी केले. शिष्यांनी गाढवी व शिंगरू येशूकडे आणले. त्या गाढवावर त्यांनी आपले अंगरखे घातले आणि येशू त्यावर बसला. पुष्कळ लोकांनी आपले अंगरखे येशूसाठी वाटेवर अंथरले. दुसऱ्या काही लोकांनी झाडांच्या फांद्या तोडल्या आणि त्या रस्त्यावर पसरल्या. काही लोक येशूच्या पुढे चालू लागले. काही लोक येशूच्या मागून चालू लागले. ते लोक मोठ्याने जयघोष करु लागले,

“होसान्ना, [a] दाविदाच्या पुत्राला
    ‘प्रभुच्या नावाने येणारा धन्यवादित असो.’ (C)

स्वर्गीय देवाला होसान्ना!”

10 जेव्हा येशूने यरूशलेमेमध्ये प्रवेश केला तेव्हा संपूर्ण शहर ढवळून निघाले व लोक विचारत होते, “हा कोण आहे?”

11 जमाव उत्तर देत होता, “हा येशू संदेष्टा आहे, तो गालील प्रांतातील नासरेथचा आहे.”

येशू मंदिरात जातो(D)

12 मग येशूने मंदिराच्या आवारात प्रवेश केला तेव्हा तेथे जे लोक विक्री करीत होते व खरेदी करीत होते त्यांची मेजे त्याने उलथून टाकली आणि जे लोक कबूतरे विकत होते त्यांची बसण्याची बाके उलथून टाकली. 13 येशू त्यांना म्हणाला, “पवित्र शास्त्रात असे म्हटले आहे, ‘माझे घर प्रार्थनेचे घर म्हटले जाईल. [b] पण तुम्ही त्याला लुटारुंची गुहा केले आहे.’” [c]

14 काही आंधळे आणि पांगळे लोक मंदिरात येशूकडे आले. येशूने त्यांना बरे केले. 15 जेव्हा मुख्य याजक व नियमशास्त्राच्या शिक्षकांनी, येशूने केलेल्या आश्चर्यकारक गोष्टी आणि मंदिराच्या आवारात लहान मुलांना, “दाविदाच्या पुत्राला होसान्ना.” अशी घोषाणा देताना पाहिले, तेव्हा या सर्व गोष्टींमुळे त्यांना राग आला.

16 त्यांनी त्याला विचारले, “ही मुले काय म्हणत आहे हे तुम्ही ऐकता ना?”

येशूने त्यांना उत्तर दिले, “होय, पवित्र शास्त्रात काय लिहिले आहे ते तुम्ही ऐकले नाही का? ‘तू बालके व तान्हुली यांना स्तुती करायला शिकविले आहेस.’h

17 नंतर येशू तेथून निघाला व बेथानीला गेला. तेथे तो रात्रभर राहिला.

येशू विश्वासाचे सामर्थ्य दर्शवितो(E)

18 दुसऱ्या दिवशी पहाटे तो यरूशलेमकडे पुन्हा येत असत त्याला भूक लागली. 19 रस्त्याच्या कडेला त्याला अंजिराचे एक झाड दिसले. अंजिर खायला मिळेल या आशेने तो झाडाजळ गेला. पण झाडावर त्याला एकही अंजिर दिसले नाही. त्याला फक्त पाने होती. येशू त्या झाडाला म्हणाला, “यापुढे तुला कधीही फळ न येवो!” आणि ते झाड लगेच वाळून गेले आणि मेले.

20 शिष्यांनी हे पाहिले, तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, “हे अंजिराचे झाड इतक्या लवकर वाळून कसे गेले आणि मेले?”

21 येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, जर तुम्हांला विश्वास असेल, आणि जर तुम्ही संशय धरला नाही तर मी जे अंजिराच्या झाडाबाबतीत केले तेच नव्हे तर या डोंगराला उठून समुद्रात पड असे म्हणालात तरी ते घडेल. 22 जर तुमचा विश्वास असेल तर जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल ते तुम्हांला मिळेल.”

यहूदी पुढारी येशूच्या अधिकाराविषयी शंका घेतात(F)

23 येशू मंदिरात गेला, येशू तेथे शिक्षण देत असताना मुख्य याजक व वडीलजन येशूकडे आले. ते येशूला म्हणाले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हांला कोणी दिला?”

24 येशू म्हणाला, “मी सुद्धा तुम्हांला एक प्रश्न विचारतो. जर तुम्ही मला उत्तर दिले तर मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मी तुम्हाला सांगेन. 25 तुम्ही मला सांगा, योहान लोकांना बाप्तिस्मा देत असे. तेव्हा त्याला तो देण्याचा अधिकार कोठून आला- देवाकडून की मनुष्यांकडून?”

येशूच्या या प्रश्नावर ते चर्चा करू लागले. ते म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा देवाकडून होता असे म्हणावे तर येशू म्हणले, ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’ 26 पण जर तो मनुष्यांकडून होता असे आपण म्हणालो तर सर्व लोक आपल्यावर रागावतील. आपल्याला लोकांची भीति आहे. कारण योहान हा एक संदेष्टा होता असे ते सर्व जण मानतात.”

27 म्हणून त्यांनी येशूला उत्तर दिले, “योहानाचा अधिकार कोठून होता हे आम्हांला माहीत नाही.”

तेव्हा येशू म्हणाला, “मग मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मीही तुम्हांला सांगणार नाही.

येशू दोन पुत्रांचा दाखला सांगतो

28 “याविषयी तुम्हांला काय वाटते ते मला सांगा. एका मनुष्याला दोन मुलगे होते. तो मनुष्य आपल्या पहिल्या मुलाकडे गेला आणि म्हणाला, ‘माझ्या मुला, आज तू माझ्या द्राक्षाच्या मळ्यात जा आणि काम कर.’

29 “मुलाने उत्तर दिले, ‘मी जाणार नाही.’ परंतु नंतर त्या मुलाने जायचे ठरविले व तो गेला.

30 “नंतर वडील आपल्या दुसऱ्या मुलाकडे गेले आणि म्हणाले, ‘माझ्या मुला, आज तू जाऊन माझ्या द्राक्षाच्या मळ्यात काम कर.’ त्या मुलाने उत्तर दिले, ‘होय बाबा, मी जातो.’ पण तो गेला नाही.

31 “त्या दोघांपैकी कोणत्या मुलाने वडीलांची आज्ञा पाळली?”

ते म्हणाले, “पहिल्या मुलाने.”

येशू त्यांना म्हणाला, “मी खरे सांगतो, जकातदार व वेश्या हे वाईट लोक आहेत असे तुम्हांला वाटते, पण ते तुमच्या अगोदर स्वर्गाच्या राज्यात जातील. 32 जीवनाचा खरा रस्ता कोणता हे तुम्हांला दाखवावे म्हणून योहान आला आणि तुम्ही योहानाला मानले नाही. जकातदार व वेश्या यांनी योहानावर विश्वास ठेवला हे तुम्ही पाहिले पण तरी देखील तुम्ही आपले मन बदलण्यास आणि योहानावर विश्वास ठेवण्यास तयार झाला नाही.

देव आपला पुत्र पाठवितो(G)

33 “ही बोधकथा ऐका: एक मनुष्य होता, त्याचे शेत होते. त्याने आपल्या शेतात द्राक्षे लावली. शेताच्या भोवती त्याने एक भिंत बांधली आणि द्राक्षे कुस्करून रस गाळण्याकरिता खड्डा करून एक घाणा तयार केला. आणि टेहळाणी करण्यासाठी एक मनोरा (माळा) बांधला. मग त्याने आपला मळा काही शेतकऱ्यांना करायला खंडाने दिला. मग तो परत गेला. 34 जेव्हा द्राक्षे तोडणीचा हंगाम जवळ आला, तेव्हा त्या मनुष्याने आपला वाटा आणण्याकरिता काही नोकर खंडकरी शेतकऱ्याकडे पाठविले.

35 “परंतु शेतकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. एकाला मार दिला तर दुसऱ्या नोकराला जिवे मारले. नंतर तिसऱ्याला दगडमार करून ठार केले. 36 मग शेतकऱ्यांकडे त्या मनुष्याने आणखी एकदा नोकर पाठविले. पहिल्यापेक्षा त्याने जास्त नोकर पाठविले पण त्या शेतकऱ्यांनी त्यांना तशीच वागणूक दिली. 37 नंतर, त्याने त्याच्या स्वतःच्या मुलाला त्यांच्याकडे पाठविले, तो म्हणाला, ‘निश्चितच ते माझ्या मुलाचा मान राखतील.’

38 “पण जेव्हा शेतकऱ्यांनी त्याच्या मुलाला पाहिले तेव्हा ते एकमेकास म्हणू लागले, ‘हा तर मालकाचा मुलगा आहे. तो वारस आहे. चला आपण त्याला ठार करू व त्याचे वतन घेऊ.’ 39 त्यांनी त्याला धरले व मळ्याच्या बाहेर फेकले व त्याला ठार मारले.

40 “मग द्राक्षमळ्याचा मालक परत येईल तेव्हा या शेतकऱ्यांचे काय करील?” 41 यहूदी मुख्य याजक आणि पुढारी म्हणाले, “तो त्या लोकांना खात्रीने मरणदंड देईल. कारण ते दुष्ट होते. नंतर तो आपला मळा दुसऱ्यास खंडाने देईल. हंगामाच्या दिवसात जे त्याच्या पिकाची वाटणी देतील, अशांना तो ते देईल.”

42 येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही पवित्र शास्त्रात वाचले असलेच की.

‘बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला
    दगड कोनशिला झाला आहे हे
प्रभूने केले आणि
    आमच्यासाठी हे अदभुत आहे.’ (H)

43 “म्हणून मी तुम्हांला सांगतो की, देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेण्यात येईल. देवाला आपल्या राज्यात पाहिजेत अशा गोष्टी जे लोक करतील, त्यांना ते देण्यात येईल. 44 जो कोणी या दगडावर पडेल, त्याचे तुकडे तुकडे होतील आणि जर हा दगड एखाद्या मनुष्यावर पडेल तर त्या मनुष्याचा चक्काचूर होईल.”

45 येशूने सांगितलेल्या या बोधकथा मुख्य याजकांनी आणि परूश्यांनी ऐकल्या. येशू त्यांच्याविषयी बोलत आहे हे त्यांनी ओळखले. 46 त्यांना येशूला अटक करायचे होते. पण त्यांना लोकांचे भय वाटत होते, कारण लोक येशूला संदेष्टा मानीत होते.

नहेम्या 11

यरुशलेममध्ये नव्याने आलेले लोक

11 आता इस्राएली लोकांचे नेते यरुशलेम नगरात राहायला आले. बाकीच्या इस्राएलीपैकी कोणी कोणी जायचे ते ठरवायचे होते. म्हणून त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. दर दहाजणापैकी एकाने यरुशलेम या पवित्र नगरात राहावे आणि उरलेल्या नऊ जणांनी आपापल्या गावी वस्ती करावी असे ठरले. काही लोक स्वखुषीने यरुशलेममध्ये राहायला तयार झाले. त्याबद्दल इतरांनी त्यांना धन्यवाद दिले व आशीर्वाद दिले.

जे प्रांताचे नेते यरुशलेममध्ये राहायला गेले ते असे. (काही इस्राएल लोक, याजक, लेवी, मंदिराचे सेवेकरी आणि शलमोनच्या सेवकांचे वंशज यहुदाच्या गावामध्ये राहात होते. वेगवेगव्व्या गावांमध्ये ते आपापल्या वतनात होते. यरुशलेममध्ये काही यहुदी आणि बन्यामिनी घराण्यातील व्यक्ती राहात होत्या.)

यरुशलेममध्ये आलेले यहुदाचे वंशज पुढीलप्रमाणे:

उज्जीयाचा मुलगा अथाया, (उज्जीया जखऱ्याचा मुलगा, जखऱ्या अमऱ्याचा मुलगा आणि अमऱ्या शफाट्याचा. शफाट्या महललेलचा. महललेल हा पेरेसचा वंशज) बारूखचा मुलगा मासेया (बारुख हा कोल-होजचा मुलगा, कोलहोजे हजायाचा मुलगा, हजाया अदायाचा, अदाया योयारीबचा, योयारीब जखऱ्याचा आणि जखऱ्या शेलहचा मुलगा.) पेरेसच्या यरुशलेममध्ये राहणाऱ्या वंशजांची संख्या 468 होती. हे सर्व शूर पुरुष होते.

यरुशलेममध्ये राहायला गेलेले बन्यामीनचे वंशज असे:

मशुल्लामचा मुलगा सल्लू (मशूल्लाम योएदचा मुलगा, योएद पदायाचा, पदाया कोलायाचा मुलगा, कोलाया मासेयाचा, मासेया ईथीएलचा आणि ईथीएल यशायाचा) यशायाच्या पाठोपाठ गब्बई आणि सल्लाई होते. ते एकंदर 928 जण होते. जिखरीचा पुत्र योएल त्यांचा प्रमुख होता. हसनुवाचा पुत्र यहुदा हा यरुशलेम नगराच्या दुसऱ्या विभागाचा अधिकारी होता.

10 यरुशलेममध्ये राहायला आलेले याजक पुढीलप्रमाणे:

योयारीबचा मुलगा यदया, याखीन, 11 हिल्कीयाचा मुलगा सराया (हिल्कीया मशुल्लामचा मुलगा, मशुल्लाम सादोकचा, सादोक मरायोमचा, मरायोम अहीटूबचा. अहीटूब देवाच्या मंदिराचा अधीक्षक होता.) 12 आणि त्यांचे 822 भाऊंबंद मंदिराचे काम करत होते. आणि यरोहामचा मुलगा अदाया (यरोहाम पलल्याचा मुलगा. पलल्या अम्झीचा, अम्झी जखऱ्याचा मुलगा, जखऱ्या पश्हूरचा आणि पश्हूर मल्कीयाचा) 13 मल्कीयाचे 242 भाऊबंद (हे सर्वजण आपापल्या पितृकुळांचे प्रमुख होते) अजरेलचा मुलगा अमशसइ (अजरेल अहजईचा मुलगा, अहजई मशिल्लेमोतचा, मशिल्लेमोथ इम्मेरचा) 14 आणि इम्मेरचे 128 भाऊबंद (हे सर्व शूर सैनिक होते. हगदोलीमचा पुत्र जब्दीएल त्यांचा अधिकारी होता.)

15 यरुशलेममध्ये राहायला गेलेले लेवी पुढीलप्रमाणे:

हश्शूबचा मुलगा शमया, (हश्शूब अज्रीकामचा मुलगा, अज्रीकाम हशब्याचा, हशब्या बुन्नीचा) 16 शब्बथई आणि योजाबाद (हे दोघे लेव्यांचे प्रमुख होते आणि देवाच्या मंदिराबाहेरच्या कारभाराचे ते प्रमुख होते.) 17 मत्तन्या, (हा मीखाचा मुलगा मीखा जब्दीचा आणि जब्दी आसाफचा. आसाफ गानवृंदाचा प्रमुख होता. ईशस्तुती आणि प्रार्थनागीते म्हणताना तो आरंभ करी व लोक पाठोपाठ म्हणत.) व बकबुक्या (भाऊबंदांमध्ये त्याचा अधिकार दुसरा होता) आणि शम्मूवाचा मुलगा अब्दा, (शम्मूवा गालालाचा मुलगा, गालाल यदुथूनाचा) 18 अशाप्रकारे यरुशलेम या पवित्र नगरात 284 लेवी राहायला गेले.

19 यरुशलेममध्ये गेलेले द्वारपाल असे:

अक्‌कूब, तल्मोन आणि त्यांचे 172 भाऊबंद नगराच्या दरवाजांवर ते पहारा करत.

20 बाकीचे इस्राएली लोक आणि याजक तसेच लेवी यहूदाच्या वेगवेगळया नगरांमध्ये आपापल्या वडिलोपार्जित वतनांमध्ये राहिले. 21 मंदिराचे सेवेकरी ओफेल टेकडीवर राहात. सीहा आणि गिश्पा हे या सेवेकऱ्यांचे प्रमुख होते.

22 उज्जी हा यरुशलेममधील लेवींचा प्रमुख होता. उज्जी हा बानीचा मुलगा. (बानी हशब्याचा, हशब्या मत्तन्याचा, मत्तन्या मीखाचा मुलगा.) उज्जी हा आसाफचा वंशज. आसाफचे वंशज गायक असून देवाच्या मंदिरातील सेवेची जबाबदारी त्यांच्यावर होती. 23 ते राजाज्ञा पाळत. गायकांनी दररोज काय करायचे ते आज्ञेत सांगितलेले असे. 24 राजाचा हुकूम काय आहे हे पथह्या लोकांना सांगत असे. (पथह्या हा मशेजबेल याचा मुलगा. मशेजबेल जेरहच्या वंशातला होता. जेरह यहूदाचा पुत्र.)

25 यहूदाच्या वंशातील लोक ज्या गावागावांमध्ये राहात ती गावे अशी: किर्याथ आर्बात व त्याच्या आसपासची खेडी. दिबोन आणि त्याच्या भोवतालची खेडी. यकबसेल आणि त्या भोवतालची खेडी, 26 आणि येशूवा, मोलादा, बेथ-पलेत ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे, 27 हसर शूवाल, बैरशेबा आणि त्यांच्या भोवतालची खेडी, 28 सिक्‌लाग, मकोना व त्यांच्या भोवतालची गावे, 29 एनरिम्मोन, सारया, यर्मूथ 30 जानोहा, अदुल्लम ही नगरे आणि त्यांच्या आसपासची गावे, लाखीश आणि त्याच्या भोवतालची शेतीवाडी, अजेका आणि त्याभोवतीची खेडी. अशाप्रकारे यहुदाचे लोक बैरशेबापासून हिन्नोमच्या खोऱ्यापर्यंतच्या भागात राहात होते.

31 गेबातील बन्यामीनच्या कुळातले वंशज मिखमाश, अया, बेथेल ही नगरे व त्या भोवतालची खेडी 32 अनाथोथ, नोब, अनन्या, 33 हासोर, रामा, गित्तइम, 34 हादीद, सबोइम, नबल्लट, 35 लोद, ओना आणि कारागिरांचे खोरे येथे राहात होते. 36 लेवींच्या कुळातील लोकांचे काही गट बन्यामीनांच्या प्रदेशात गेले.

प्रेषितांचीं कृत्यें 21

पौल यरुशलेमला जातो

21 त्यांचा निरोप घेतल्यानंतर आम्ही समुद्रमार्गे निघालो. आणि सरळ प्रवास करीत कोस येथे आलो. दुसऱ्या दिवशी आम्ही रुदास गेलो. तेथून आम्ही पातरा येथे गेलो. तेथे फेनीकेला जाणारे जहाज आम्हांला आढळले. तेव्हा आम्ही जहाजात बसून पुढे निघालो.

तेव्हा कुप्र आमच्या नजरेत आले. परंतु ते डाव्या अंगाला टाकून आम्ही थेट सूरीया देशाला रवाना झालो व सोर येथे उतरलो. कारण तेथे जहाजातील माल उतरावययाचा होता. तेथे येशूचे काही शिष्य आम्हाला आढळले, आणि आम्ही त्यांच्याबरोबर सात दिवस राहिलो. पवित्र आत्म्याच्या सूचनेवरुन त्यांनी पौलाला असे सांगितले की, त्याने यरुशलेमला जाऊ नये. आमच्या भेटीचे दिवस संपत आल्यावर आम्ही तेथून निघून आमचा पुढील प्रवास परत सुरु केला. त्यावेळी तेथील बंधुजन आपल्या पत्नी, मुलांच्याबरोबर आमच्यासह शहरबाहेर आले व तेथील समुद्रकिनाऱ्यावर आम्ही गुडघे टेकले व प्रार्थना केली. मग एकमेकांचा निरोप घेऊन आम्ही जहाजात बसलो व ते लोक आपापल्या घरी गेले.

सोर पासून आम्ही आमचा प्रवास सुरु केला व पोलेमा येथे उतरलो. आणि तेथील बंधुवर्गास भेटलो, त्यांच्याबरोबर एक दिवस राहिलो. आणि दुसऱ्या दिवशी निघून आम्ही कैसरीयास आलो व सुवार्तिक फिलिप्प याच्या घरी जाऊन राहिलो. तो निवडलेल्या सात सेवकांपैकी [a] एक होता. त्याला चार मुली होत्या. त्यांची लग्रे झालेली नव्हती. या मुलींना देवाच्या गोष्टी (भविष्याविषयीचे) सांगण्याचे दान होते.

10 त्या बंधूच्या बरोबर बरेच दिवस राहिल्यावर अगब नावाचा संदेष्टा यहूदीयाहून तेथे आला. 11 त्याने आमची भेट घेऊन पौलाच्या कमरेचा पट्टा मागून घेतला. त्याने स्वतःचे हात व पाय बांधले आणि तो म्हणाला, “पवित्र आत्मा असे महणतो; हा पट्टा ज्या मनुष्याच्या कमरेचा आहे, त्याला यरुशलेमा येथील यहूदी लोक असेच बांधतील व यहूदीतरांच्या हाती देतील.”

12 आम्ही व तेथील सर्वांनी ते शब्द ऐकले. तेव्हा आम्ही व इतर लोकांनी पौलाला कळकळीची विनंति केली की, त्याने यरुशलेमला जाऊ नये. 13 पण पौल म्हणाला, “तुम्ही हे काय करीत आहा, असे रडून तुम्ही मला हळवे बनवीत आहात काय? मी फक्त बांधून घेण्यासाठी नव्हे तर प्रभु येशूच्या नावासाठी यरुशलेममध्ये मरायलादेखील तयार आहे.”

14 यरुशलेमापासून दूर राहण्यासाठी आम्ही त्याचे मन वळवू शकलो नाही, म्हणून आम्ही त्याला विनंति करायची सोडली आणि म्हटले, “प्रभूच्या इच्छेप्रमाणे होवो.”

15 त्यानंतर आम्ही तयार झालो आणि यरुशलेमला निघालो. 16 कैसरीया येथील येशूचे काही शिष्य आमच्याबरोबर आले आणि आम्हांला म्लासोनकडे घेऊन गेले. कारण त्याच्याकडेच आम्ही राहणार होतो. तो (म्नासोन) कुप्रचा होता. तो सुरुवातीच्या काळात प्रथम शिष्य झालेल्यांपैकी एक होता.

पौल याकोबची भेट घेतो

17 आम्ही जेव्हा यरुशलेमला पोहोंचलो, तेव्हा तेथील बंधुजनांनी मोठ्या आनंदाने आमचे स्वागत केले. 18 दूसऱ्या दिवशी पौल आमच्यासह याकोबाला भेटायला आला. तेव्हा सर्व वडीलजन हजर होते. 19 पौल त्यांना भेटला. नंतर त्याच्या हातून देवाने यहूदीतर लोकांत कशीकशी सेवा करुन घेतली, याविषयी क्रमवार सविस्तर माहिती सांगितली.

20 जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा त्यांनी देवाचा गौरव केला. आणि ते त्याला म्हणाले, “बंधु, तू पाहशील की हजारो यहूदी विश्वासणारे झालेत. पण त्यांना असे वाटते की, मोशेचे नियम पाळणे फार महत्वाचे आहे. 21 या यहूदी लोकांनी तुइयाविषयी ऐकले आहे की, जे यहूदी इतर देशांत राहतात त्यांना तू मोशेचे नियम पाळू नका असे सांगतोस. तसेच आपल्या मुलांची सुंता करु नका असे सांगतो व आपल्या चालीरीति पाळू नका असे सांगतो.

22 “मग आता काय केले पाहिजे? तू येथे आला आहेस हे त्यांना नक्की कळेल. 23 तेव्हा आता आम्ही सांगतो तसे कर: आमच्यातील चार लोकांनी नवस केला आहे. 24 त्या चौघांना घे व स्वतःचे त्यांच्यासह शुद्धीकरण करुन घे. त्या चौघांना त्यांच्या डोक्याचे मुंडण करता यावे म्हणून त्यांचा खर्च तू कर. मग सर्वांना हे समजेल की, त्यांनी जे काही तुझ्याबद्दल ऐकले आहे ते खरे नाही, उलट तू नियमशास्त्राचे पालन करतोस हे दिसेल.

25 “जे विदेशी विश्वासणारे आहेत त्यांना आम्ही पत्र लिहिले आहे.

ते असे ‘मूर्तीला वाहिलेले अन्न त्यांनी खाऊ नये.

रक्त अगर गुदमरुन मारलेले प्राणी त्यांनी खाऊ

नयेत अनैतिक कृत्ये करु नयेत.’”

Paul Is Arrested

26 मग पौलानेच त्या चार लोकांना आपल्याबरोबर घेतले. दुसऱ्या दिवशी शुद्धीकरणाच्या विधीमध्ये तो सहभागी झाला. मग तो मंदिरात गेला. शुद्धीकरणाचे दिवस केव्हा संपतील हे जाहीर केले. शेवटच्या दिवशी प्रत्येकासाठी अर्पण देण्यात येईल.

27 सात दिवस जवळ जवळ संपत आले होते. परंतु आशियातील काही यहूदी लोकांनी पौलाला मंदिरात पाहिले. त्यानी लोकांना भडकाविले व त्याला (पौलाला) धरले. 28 ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “इस्राएलच्या लोकांनो, मदत करा! हाच तो मनुष्य आहे, जो सर्व लोकांना सगळीकडे आपल्या लोकांविरुद्ध, आपल्या नियमांविरुद्ध व या जागेबद्दल शिकवीत आहे, आणि आता त्याने विदेशी लोकांना देखील मंदिरात आणले आहे, आणि ही पवित्र जागा विटाळविली आहे.” 29 ते असे म्हणाले, कारण इफिसच्या त्रफिमला त्यांनी पौलाबरोबर यरुशलेम येथे पाहिले होते. त्रफिम यहूदी नव्हता, तो ग्रीक होता. लोकांना वाटले, पौलानेच त्याला मंदिरात नेले आहे.

30 सर्व शहर खवळून उठले. सगळे लोक धावू लागले. त्यांनी पौलाला पकडले व मंदिरातून बाहेर ओढून काढले. लगेच दारे बंद करण्यात आली. 31 ते त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करीत असतानाच रोमी सैन्याच्या सरदाराकडे बातमी गेली की, शहरात सगळीकडे गोंधळ उडालेला आहे. 32 ताबडतोब त्याने काही शिपाई व काही शताधिपती घेतले. व तो यहूदी जेथे पौलाला मारीत होते, तेथे धावत गेला. जेव्हा यहूदी लोकांनी रोमी सरदाराला व सैन्याला पाहिले तेव्हा त्यांनी पौलाला मारण्याचे थांबविले.

33 मग सरदार पौलाकडे आला व त्याला अटक केली व त्याला साखळदंडानी बांधण्याचा आदेश दिला. मग सरदाराने पौल कोण आहे व त्याने काय केले आहे याविषयी विचारले. 34 गर्दितून वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू येऊ लागले. गोंधळामुळे व ओरडण्यामुळे सरदारला सत्य काय आहे हे जाणून घेता येईना. म्हणून सरदाराने शिपायांना हुकूम दिला की, पौलाला इमारतीत घेऊन जावे. 35 जेव्हा पौल इमारतीच्या पायऱ्यांजवळ आला तेव्हा शिपायांना त्याला उचलून आत न्यावे लागले. 36 कारण जमाव हिंसक बनत चालला होता. जमाव त्याच्यामागे चालला होता व ओरडत होता, “त्याला जिवे मारा!”

37 शिपाई पौलाला इमारतीत घेऊन जाणार इतक्यात पौल सरदाराला म्हणाला, “मी काही बोलू शकतो काय?”

तो सरदार म्हणाला, “तुला ग्रीक बोलता येते काय? 38 मग मला वाटते, तो मनुष्य तू नाहीस, मला वाटले इजिप्तच्या ज्या मजुराने काही दिवसांपूर्वी बंड करुन सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तोच तू आहेस. त्या इजिप्तच्या मनुष्यांने चार हजार दहशतवाद्यांना अरण्यात नेले.”

39 पौल म्हणाला, “किलकिया प्रांतातील तार्सज्ञ नगरात राहणारा मी एक यहूदी आहे. मी एका महत्वाच्या शहराचा नागरिक आहे. मी तुम्हांला विनवितो, मला लोकांशी बोलू द्या.”

40 जेव्हा सरदाराने त्याला बोलण्याची परवानगी दिली तेव्हा तो पायऱ्यांवर उभा राहिला आणि आपल्या हाताने त्याने लोकांना शांत राहण्यास सांगितले. जेव्हा सगळीकडे शांतता पसरली तेव्हा पौल हिब्रू भाषेत बोलू लागला:

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center