M’Cheyne Bible Reading Plan
शेवटी साराला मूल
21 परमेश्वराने साराला दिलेले वचन पाळले व पूर्ण केले. 2 सारा गरोदर राहिली आणि अब्राहामाच्या म्हातारपणी तिने त्याला मुलगा दिला. ह्या सगळ्या गोष्टी परमेश्वराने वचन दिल्याप्रमाणे अगदी जशाच्या तशाच घडून आल्या. 3 अब्राहामापासून साराला मुलगा झाला आणि त्याने त्याचे नाव इसहाक ठेवले. 4 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राहामाने इसहाक आठ दिवसांचा झाल्यावर त्याची सुंता केली.
5 इसहाक जन्मला तेव्हा अब्राहाम शंभर वर्षांचा होता. 6 आणि सारा म्हणाली, “परमेश्वर देवाने मला हास्य म्हणजे आनंदीआनंद दिला आहे. ज्या कोणाला हे समजेल त्या प्रत्येकाला माझ्याबरोबर आनंद होईल. 7 मला आता ह्या वयात अब्राहामापासून मूल होईल असे कोणाला वाटले असते काय? परंतु अब्राहाम म्हातारा झाला असताना देखील मी त्यास मुलगा दिला आहे.”
घरात संकट
8 इसहाक वाढत राहिला, तो दुधाऐवजी जेवण घेण्याइतक्या वयाचा झाला तेव्हा त्याचे दूध तोडण्याच्या प्रसंगी अब्राहामाने मोठी मेजवानी दिली. 9 ह्याच्या आधी साराची मिसर देशाची दासी हागार हिने अब्राहामापासून एका मुलाला जन्म दिला होता; अब्राहाम त्याचाही बाप होता. परंतु आता साराने पाहिले की तो आधीचा मुलगा इसहाकाला चिडवत होता. 10 तेव्हा सारा अब्राहामाला म्हणाली, “त्या दासीला व तिच्या मुलाला येथून बाहेर घालवून द्या; आपल्या मरणानंतर आपल्या मालमत्तेचा वारस इसहाक होईल; या दासीचा मुलगा इसहाकाबरोबर आपल्या मालमत्तेचा वाटेकरी व तुमचा वारस होणार नाही.”
11 ह्या गोष्टीमुळे अब्राहामाला वाईट वाटले व त्याला इश्माएलाची चिंता वाटू लागली; 12 परंतु देव अब्राहामाला म्हणाला, “त्या मुलाबद्दल बिलकूल चिंता करु नकोस, तसेच त्या दासीचीही चिंता करु नकोस. साराच्या इच्छेप्रमाणे कर. इसहाकच तुझा एकटाच वारस होईल. 13 परंतु मी त्या दासीच्या मुलालाही आशीर्वाद देईन; तो तुझा मुलगा आहे म्हणून त्याच्या कुटुंबांपासूनही मी एक मोठे राष्ट्र निर्माण करीन.”
14 दुसऱ्या दिवशी सकाळी अब्राहामाने भाकरी व पाण्याची पिशवी आणून हागारेला दिली; ती शिदोरी व आपला मुलगा घेऊन हागार तेथून निघाली आणि अब्राहामाने तिची रवानगी केली; हागार तेथून निघून बैर-शेबाच्या वाळवंटात भटकत राहिली.
15 काही वेळाने पिशवीतील सर्व पाणी संपले, एक थेंबही पिण्यासाठी राहिला नाही; तेव्हा हागारेने आपल्या मुलाला एका झुडपाखाली ठेवले; 16 आणि तेथून काही अंतर ती चालून गेली व थांबून तेथे बसली. आपला मुलगा पाण्यावाचून मरेल असे तिला वाटले; त्याचा मृत्यू आपल्याला पाहवणार नाही असे समजून ती तेथे दूर अंतरावर बसली, व हंबरडा फोडून रडू लागली.
17 देवाने मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला; आणि देवाचा दूत स्वर्गातून हागारेला हाक मारुन म्हणाला, “हागारे, तुला काय झाले? भिऊ नकोस; तुझ्या मुलाचे रडणे परमेश्वराने ऐकले आहे 18 ऊठ मुलाला उचलून घे; त्याचा हात धर व त्याला घेऊन पुढे चल; मी त्याच्या पासून एक मोठे राष्ट्र निर्माण करीन.”
19 मग देवाने हागारेला पाण्याची विहीर दिसू दिली. तेव्हा हागार त्या विहिरीपाशी गेली आणि तिने मसक पाण्याने भरली, नंतर आपल्या तहानलेल्या मुलाला तिने पाणी पाजिले.
20 तो मुलगा वाढत असताना देव सतत त्याच्याबरोबर राहिला; इश्माएल वाळवंटात लहानाचा मोठा होऊन शिकारी झाला; तो धनुष्यबाण मारावयास शिकला व तरबेज तिरंदाज झाला; 21 नंतर त्याच्या आईने त्याला मिसर देशातील मुलगी बायको करुन दिली. ते पारानच्या वाळवंटात राहिले.
अब्राहामाचा अबीमलेखाशी करार
22 त्यानंतर अबीमलेख व त्याचा सेनापति पीकोल यांनी अब्राहामाशी बोलणी केली; ते अब्राहामास म्हणाले, “तू जे काही करतोस त्यात देव तुझ्याबरोबर असतो; 23 तेव्हा आता देवासमोर येथे मला वचन दे की तू माझ्याशी व माझ्यामागे माझ्या संतानाशी न्यायनीतीने वागशील असा माझ्याशी करार कर; तू माझ्याशी व ज्या ह्या माझ्या देशात तू राहिलास त्या देशाशी दयाळूपणे राहशील, असे वचन दे, तसेच मी जसा तुझ्याशी दयाळूपणाने वागलो तसाच तूही माझ्याशी दयाळूपणाने राहशील असे वचन तू मला दे, व असा करार तू माझ्याशी कर.”
24 आणि अब्राहाम म्हणाला, “मी असे वचन देतो की जसा तू माझ्याशी दयाळूपणे वागलास तसाच मी ही तुझ्याशी वागेन.” 25 मग अबीमलेखाच्या सेवकांनी पाण्याची विहीर बळकावली म्हणून अब्राहामाने अबीमलेखाकडे तक्रार केली.
26 परंतु अबीमलेख म्हणाला, “असे कोणी केले आहे ते मला माहीत नाही. ह्या पूर्वी तू हे मला कधीही सांगितले नाहीस”
27 अशा रीतीने अब्राहाम व अबीमलेख यांनी आपसात करार केला. अब्राहामाने अबीमलेखाला काही मेंढरे व बैल, कराराचा पुरावा म्हणून दिले; 28 अब्राहामाने अबीमलेखा पुढे मेंढ्याच्या सात माद्या ठेवल्या.
29 अबीमलेखाने अब्राहामाला विचारले, “या सात मेंढ्या तू अशा बाजूला का काढल्यास?”
30 अब्राहामाने उत्तर दिले, “जेव्हा तू ह्या मेंढया माझ्याकडून स्वीकारशील तेव्हा ही विहीर मी खणली असा तो पुरावा होईल.”
31 तेव्हा त्यानंतर त्या विहिरीला बैर-शेबा असे नाव पडले, कारण त्या ठिकाणी अब्राहाम व अबीमलेख यांनी एकमेकांना वचन देऊन करार केला.
32 त्यांनी बैर शेबा येथे करार केल्यानंतर अबीमलेख व त्याचा सेनापती पलिष्ट्यांच्या देशात परत गेले.
33 अब्राहामाने बैर-शेबा येथे एक विशेष प्रकारचे झाड लावले, 34 आणि त्याच जागी, जो निरंतर राहतो अशा परमेश्वराची प्रार्थना केली; आणि तो बराच काळ पलिष्ट्यांच्या देशात राहिला.
येशू शेतमजुराच्या बोधकथेचा वापर करतो
20 “स्वर्गाचे राज्य हे कोण्या शेतमालकासारखे आहे. जो अगदी पहाटे त्याच्या द्राक्षमळ्यासाठी मोलाने मजूर आणण्यासाठी गेला. 2 त्या मनुष्याने एक दिवसाच्या मजुरीकरिता प्रत्येकाला चांदीचे एक नाणे [a] देण्याचे कबूल केले. आणि त्याने द्राक्षाच्या मळ्यात कामास पाठविले.
3 “सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो मनुष्य बाजारात गेला तेव्हा तेथे काही माणसे उभी असलेली त्याला दिसली. त्या लोकांना काहीच काम नव्हते. 4 मग तो त्यांना म्हणाला, ‘तुम्हीसुद्धा माझ्या द्राक्षमळ्यात कामाला जा आणि जी योग्य मजुरी आहे ती मी तुम्हांला देईन.’ 5 मग ते काम करण्यास मळ्यात गेले.
“तो मनुष्य बारा वाजता आणि तीन वाजता बाजारात गेला आणि त्या मनुष्याने आपल्या मळ्यात काम करण्यासाठी काही लोकांना दोन वेळा जाऊन मजुरीवर घेतले. 6 पाच वाजता तो मनुष्य परत एकदा बाजारात गेला तेव्हा आणखी काही लोक उभे असलेले त्याला आढळले. त्याने त्यांना विचारले, ‘तुम्ही काही काम न करता दिवसभर येथे का बरे उभे राहिला आहात?’
7 “त्या लोकांनी उत्तर दिले, ‘आम्हांला कोणी काम दिले नाही.’
“तो मनुष्य त्यांना म्हणाला, ‘तर मग तुम्ही जाऊन माझ्या मळ्यात काम करा.’
8 “संध्याकाळी मळ्याचा मालक मुकादमाला म्हणाला, ‘मजुरांना बोलवा आणि त्यांना त्यांची मजुरी देऊन टाका! मी ज्यांना अगदी शेवटी कामावर आणले त्यांना अगोदर मजुरी द्या. नंतर बाकीच्या सर्वांना मजुरी द्या. मी कामावर रोजगारीने पहिल्याने बोलाविलेल्यांना सर्वात शेवटी मजुरी द्या.’
9 “जे मजूर संध्याकाळी साधारण पाच वाजता कामावर घेतले होते ते आपली मजुरी घेण्यासाठी आले. प्रत्येकाला एक चांदीचे नाणे मजुरी मिळाली. 10 मग ज्यांना सुरूवातीला कामावर घेण्यात आले होते, ते आपली मजुरी घेण्यासाठी आले. त्यांना वाटत होते की, इतरांपेक्षा त्यांना जास्त पैसे मिळतील, पण त्यां सर्वांना एकच चांदीचे नाणे मजुरी मिळाली. 11 त्यांनी ते घेतले व मालकाकडे तक्रार करू लागले. 12 ते म्हणाले, ‘ज्यांना शेवटी कामावर घेतले त्यांनी केवळ एक तासच काम केले. परंतु तुम्ही त्यांना आमच्या बरोबरीने मजुरी दिली. आम्ही मात्र दिवसभर उन्हात राबलो.’
13 “परंतु मळ्याचा मालक त्यांच्यातील एकाला म्हाणाला, ‘मित्रा मी तुझ्याबाबतीत अन्याय करीत नाही. आपण यावर सहमत झालो नाही का की, मी तुला एक चांदीचे नाणे मजुरी देईन? 14 जे तुझे आहे ते घे आणि घरी जा. तुम्हांला दिली तितकीच मजुरी मला या शेवटच्या माणसाला द्यायची आहे. 15 मी माझ्या पैशाचा वापर मला पाहिजे तसा करू शकत नाही का? मी लोकांशी चांगला आहे म्हणून, तुला हेवा वाटतो का?’
16 “म्हणून आता जे शेवटचे आहेत ते पहिले होतील आणी पहिले ते शेवटचे होतील.”
येशू त्याच्या मरणाविषयी बोलतो(A)
17 येशू यरूशलेमला चालला होता. तो चालत असता त्याने त्याच्या शिष्यांना बाजूला घेतले, आणि त्यांना म्हणाला, 18 “ऐका, आपण यरुशलेमकडे जात आहोत. मनुष्याच्या पुत्राला धरून मुख्य याजक व नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या हाती धरुन देण्यात येईल. त्याने मेलेच पाहिजे असे ते म्हणतील. 19 ते मनुष्याच्या पुत्राला यहूदीतरांच्या हाती देतील. ते लोक त्याची थट्टा करतील, त्याला चाबकाने मारतील नंतर ते त्याला वधस्तंभावर खिळून जिवे मारतील. परंतु मरणानंतर तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठविले जाईल.”
एका आईची खास विनंति(B)
20 त्यानंतर जब्दीच्या मुलांची आई, आपल्या मुलांसह त्याच्याकडे आली. ती त्याच्या पाया पडली आणि तिने त्याला एक विनंति केली.
21 त्याने तिला विचारले, “तुला काय पाहिजे?”
ती म्हणाली, “माझा एक मुलगा तुमच्या राज्यात तुमच्या उजवीकडे बसेल आणि दुसरा डावीकडे बसेल असे वचन द्या.”
22 येशू तिला म्हणाला, “तू काय मागत आहेस ते तुला माहीत नाही! जे दु:ख मला सोसावे लागणार आहे ते तुमच्याने सोसवेल काय?”
ते म्हणाले, होय, “आम्ही ते सोसू शकू!”
23 येशू त्याना म्हणाला, “तुम्ही खरोखर माझ्या प्याल्यातून प्याल खरे, पण माझ्या उजव्या आणि डाव्या हाताला बसण्याचा मान, देणे हे ठरविणारा मी नाही, तर माझ्या पित्याने तो मान कोणाला द्यायचा हे ठरविले आहे.”
24 जेव्हा इतर दहा शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते त्या दोघांवर रागावले. 25 मग येशूने बोलावून त्यांना म्हटले, “यहूदीतर लोकांच्या राजांना लोकांवर आपली सत्ता आहे हे दाखविणे आवडले आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना आपले अधिकार वाटेल तसे वापरणे आवडते. 26 पण तुमचे वागणे तसे नसावे. जर तुमच्यातील कोणाला मोठे व्हायचे असेल तर त्याने तुमचा दासच झाले पाहिजे. 27 आणि ज्याला पहिला व्हावयाचे आहे त्याने कनिष्ट झाले पाहिजे. 28 म्हणजे तुम्ही मनुष्याच्या पुत्रासारखे असले पाहिजे. जो इतरांकडून सेवा करून घ्यायला आला नाही तर इतरांची सेवा करायला आणि अनेकांचे तारण व्हावे यासाठी आपला जीव खंडणी म्हणून देण्यासाठी आला.”
येशू दोन आंधळ्यांना बरे करतो(C)
29 ते यरीहो शहर सोडत असताना, मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे आला. 30 रस्त्याच्या कडेला दोन आंधळे बसले होते आणि जेव्हा त्यांनी ऐकले की, येशू तेथून जात आहे, तेव्हा ते मोठ्याने ओरडले, “प्रभु येशू, दाविदाच्या पुत्रा. आमच्यावर दया करा.”
31 जमावाने त्यांना दटावले व त्यांना शांत राहण्यास सांगितले. पण ते अधिकच मोठ्याने ओरडू लागले, “प्रभु, दाविदाच्या पुत्रा, आमच्यावर दया करा.”
32 मग येशू थांबला आणि त्यांच्याशी बोलला, त्याने विचारले, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?”
33 त्या आंधळ्या मनुष्यांनी उत्तर दिले, “प्रभु, आम्हांला दिसावे अशी आमची इच्छा आहे.”
34 येशूला त्यांच्याबद्दल कळवळा आला, आणि त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला. त्याच क्षणी त्यांना दिसू लागले. आणि ते त्याच्या मागे गेले.
10 त्या मोहरबंद करारातील नावे पुढीलप्रमाणे:
प्रांताधिपती नहेम्या. हा हखल्याचा मुलगा. सिदकीय, 2 सराया, अजऱ्या, यिर्मया, 3 पश्हूर, अमऱ्या, मल्खीया, 4 हत्तश, शबन्या, मल्लूख, 5 हारिम, मरेमोथ, ओबद्या, 6 दानीएल, गिन्नथोन, बारुख, 7 मशुल्लाम, अबीया, मियामीन, 8 माज्या, बिल्गई, आणि शमया. ज्यांनी त्या करारावर आपल्या नावाची मुद्रा उठवली त्यापैकी ही याजकांची नावे झाली.
9 आणि लेव्यांची पुढीलप्रमाणे:
अजन्याचा मुलगा येशूवा, हेनादादच्या घराण्यातला बिन्नइ, कदमीएल, 10 आणि त्यांचे भाऊ: शबन्या, होदीया, कलीता, पलाया, हनान, 11 मीखा, रहोब, हशव्या, 12 जक्कूर, शेरेब्या, शबन्या, 13 होदीया, बानी, बनीनू.
14 आपल्या नावाची मोहोर उठवणाऱ्यांमधले लोकांचे नेते हे:
परोश, पहथ-मवाब, एलाम, जातू, बानि, 15 बुन्नी, अजगाद, बेबाई, 16 अदोनीया, बिग्वइ, आदीन, 17 आटेर,हिज्कीया, अज्जूर, 18 होदीया, हाशूम, बेसाई, 19 हारीफ, अनाथोथ, नोबाई, 20 मप्पीयाश, मशुल्लाम, हेजीर, 21 मशेजबेल, सादोक, यद्दूवा, 22 पलट्या, हानान, अनया, 23 होशेया, हनन्या, हशशूब. 24 हल्लोहेश, पिल्हा शोबेक, 25 रहूम, हश्बना, मासेया, 26 अहीया, हनान, अनान, 27 मल्लूख, हारिम आणि बाना.
28-29 मग ह्या सर्व लोकांनी देवापुढे विशेष शपथ घेतली. आणि जर आपण ही शपथ पाळली नाही तर दुर्घटना घडू देत अशी त्यांनी मागणी केली. या सर्व लोकांनी देवाचे नियमशास्त्र पाळायची शपथ वाहिली. देवाचे हे नियमशास्त्र आम्हाला त्यांचा सेवक मोशे याच्या कडून मिळालेले आहे. या लोकांनी आपल्या परमेश्वराच्या देवाच्या सर्व आज्ञा, नियम, आणि शिकवण यांचे काळजीपूर्वक पालन करण्याचे वचन दिले. हे वचन पुढील लोकांनी दिले. वरील लोकांखेरीज उरलेले सर्व लोक याजक, लेवी, द्वारपाल, गायक, मंदिराचे सेवक आणि अवतीभवतीच्या इतर लोकांपासून वेगळे झालेले इस्राएलमधील सर्व लोक देवाचे नियमशास्त्र पाळण्यासाठी ते आपण होऊन वेगळे झाले. त्याचबरोबर त्यांच्या सर्व बायका, आणि सावधानपणे ऐकू शकतील आणि समजू शकतील असे त्यांचे सर्व मुलगे आणि मुली. या सर्व लोकांनी आपले बांधव आणि महत्वाच्या व्यक्तींसमवेत देवाचे नियमशास्त्र पाळण्याची शपथ घेतली. आणि जर आपण देवाचे हे नियमशास्त्र पाळले नाही तर आपल्यावर अरिष्टे कोसळण्यासबंधीचा शापही त्यांनी स्वीकारला.
30 “आमच्या भोवतींच्या प्रदेशातील लोकांमध्ये आम्ही आमच्या मुलींची लग्ने होऊ देणार नाही तसेच त्यांच्या मुली आमच्या मुलांसाठी करून घेणार नाही असे आम्ही वचन देतो.
31 “शब्बाथ दिवशी आम्ही काम करणार नाही. शब्बाथ दिवशी किंवा दुसऱ्या कोणत्याही पवित्र दिवशी आमच्या भोवतीच्या प्रदेशातील लोकांनी धान्य किंवा इतर काही वस्तू विकायला आणल्या तर त्यांची खरेदी आम्ही करणार नाही. दर सातव्या वर्षी आम्ही जमीन पडीक ठेवू. तिची मशागत करणार नाही. तसेच त्या वर्षी सर्व देणेकऱ्यांना आम्ही ऋणातून मुक्त करु.
32 “मंदिराच्या सेवेच्या सर्व आज्ञा पाळायची जबाबदारी आम्ही घेत आहोत. देवाच्या मंदिराची काळजी घेण्यासाठी म्हणून एकतृतीयांश शेकेल आम्ही दरवर्षी देऊ. 33 मंदिरातील मेजावर याजकांनी ठेवायच्या धान्यार्पणाची समर्पित भाकर, रोजचे अन्नार्पण आणि होमार्पण, शब्बाथ, नवचंद्रदिनी आणि नैमित्तिक सण यादिवशी करायची अर्पणे, इस्राएलींच्या शुध्दीकरणासाठी करायची पवित्रार्पणे आणि पापार्पणे, देवाच्या मंदिराच्या कामी येणारा खर्च हे सर्व खर्च या पैशातून भागतील.
34 “दरवर्षी नेमलेल्या वेळी मंदिरात लाकडाची अर्पणे आणावी म्हणून आम्ही सर्वांनी याजक, लेवी व सर्व लोक यांनी चिठ्ठ्या टाकल्या आहेत. त्या चिठ्ठ्यांनुसार प्रत्येक कुटुंबाने परमेश्वर देवाच्या वेदीवर जाळण्यासाठी लाकूड आणायचे आहे. नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे आपल्याला हे करायलाच हवे.
35 “आमच्या शेतातले पहिले पीक आणि फळझाडांची पहिली फळे दरवर्षी परमेश्वराच्या मंदिरात आणायची आमची जबाबदारी आहे हे आम्ही कबूल करतो.
36 “नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे आम्ही पुढील गोष्टीही करु: आमचा पहिला पुत्र आणि आमची गुरेढोरे, शेळया मेंढ्या यांचे पहिले पिलू यांना आम्ही आमच्या देवाच्या मंदिरात सेवेला असलेल्या याजकांकडे आणू.
37 “तसेच परमेश्वराच्या मंदिरातील कोठारांसाठी याजकांकडे पुढील गोष्टी आणू: पिठाचा पहिला उंडा. धान्यार्पणाचा पहिला भाग, आमच्या सर्व वृक्षांच्या फळांचा पहिला बहार, नवीन काढलेला द्राक्षारस आणि तेल यांचा पहिला भाग, या गोष्टी. तसेच लेवींना आमच्या पिकातला एक दशांश भाग देऊ. कारण ते सर्व नगरांतून आमच्या उत्पन्नाचा दहावा भाग घेतात. 38 लेवी या धान्याचा स्वीकार करतील तेव्हा अहरोनाच्या वंशातील एखादा याजक त्यांच्याबरोबर असावा. मग लेवींनी ते धान्य देवाच्या, मंदिरात आणावे व मंदिराच्या कोठारांमध्ये जमा करावे. 39 इस्राएल लोक आणि लेवी यांनी धान्य, नवीन द्राक्षरस आणि तेल यांची अर्पणे कोठारामध्ये आणावीत. मंदिरासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तेथे असतात तसेच सेवा करणारे याजक, गायक आणि द्वारपाल यांचेही वास्तव्य तिथे असते.
“देवाच्या मंदिराची आम्ही नीट जपवणूक करु असे आम्ही वचन देतो.”
पौल मासेदिनिया व ग्रीसला जातो
20 जेव्हा गोंधळ थांबला, तेव्हा पौलाने येशूच्या अनुयायांना भेटायला बोलाविले आणि त्यांना उत्तेजत दिल्यानंतर त्यांचा निरोप घेतला. आणि तो मासेदोनियाला निघाला. 2 मासेदोनियातून जात असताना निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या येशूच्या अनुयायांना त्याने अनेक गोष्टी सांगून धीर दिला. मग पौल ग्रीसला आला. 3 त्या ठिकाणी तो तीन माहिने राहिला.
पौल सूरियाला समुद्रमार्गे निघाला असता, यहूदी लोकांनी त्याच्याविरुद्ध कट रचला, हे पाहून त्याने मासेदोनियातून परत फिरण्याचे ठरविले. 4 त्याच्याबरोबर काही लोक होते ते असे: बिरुया शहराच्या पुरर्ाचा मुलगा सोपत्र. थेस्सलनीका येथील अरिस्तार्ख व सकूंद, दर्बे येथील गायस आणि तीमथ्य, तुखिक व त्रफिम हे आशिया प्रांतातील होते. 5 ही माणसे आमच्यापुढे गेली व त्रोवस येथे आमची वाट पाहू लागली. 6 बखमीर भाकरीच्या यहूदी सणानंतर आम्ही फिलीप्पै येथून समुद्रमार्गे निघालो आणि पाच दिवसांनी त्रोवस येथे त्यांना जाऊन भेटलो व तेथे सात दिवस राहिलो.
पौलाची त्रोवसला शेवटची भेट
7 मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी आम्ही सर्व भाकर मोडण्यासाठी [a] एकत्र जमलो असताना, पौल त्यांच्याबरोबर बोलू लागला कारण दुसऱ्या दिवशी निघण्याचा त्याचा बेत होता. तो मध्यरात्रीपर्यंत बोलत राहीला. 8 वरच्या मजल्यावरील ज्या खोलीत आम्ही जमा झालो होतो तेथे पुष्कळ दिवे होते. 9 युतुख नावाचा एक तरुण खिडकीत बसला होता. पौल बोलत असताना त्याच्यावर झोपेचा इतका अंमल चढला की, तो तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला, जेव्हा त्याला उचलले, तेव्हा तो मेलेला आढळला.
10 पौल खाली गेला व त्याच्यावर ओणवा पडला आणि त्याला आपल्या हातांनी कवेत धरुन म्हणाला, “चिंता करु नका! त्याच्यात अजून जीव आहे.” 11 मग पौल वर गेला. त्यांने भाकर मोडली व ती खाल्ली. पहाट होईपर्यंत तो त्यांच्याशी बोलला, मग तो गेला. 12 त्या तरुणाला त्यांनी जिवंत असे घरी नेले, त्या सर्वांना फार समाधान झाले.
त्रोवसापासून मिलेतापर्यंत प्रवास
13 तेथून आम्ही पुढे निघालो व अस्सा या नगरी समुद्रमार्गे निघालो. तेथे आम्ही पौलाला घेणार होतो. त्यानेच अशा प्रकारे योजना केली होती, ती म्हणजे त्याने स्वतः पायी जायचे. 14 जेव्हा आम्हांला तो अस्सा येथे भेटला, तेव्हा आम्ही त्याला जहजात घेतले, आणि आम्ही मितुलेनाला गेलो. 15 दुसऱ्या दिवशी आम्ही जहाजाने मितुले नाहून निघालो व खियासमोर आलो. मग दुसऱ्या दिवशी सामा बेट ओलांडले आणि एक दिवसानंतर मिलेतला आलो. 16 कारण पौलाने ठरविले होते की इफिस येथे थांबायचे नाही. आशियात त्याला जास्त वेळ थांबायचे नव्हते. तो घाई करीत होता कारण शक्य झाल्यास पन्नासाव्या दिवसाच्या सणसाठी त्याला यरुशलेम येथे राहावयास हवे होते.
पौल इफिस येथील वडीलजनंशी बोलतो
17 मिलेताहून इफिस येथे निरोप पाठवून पौलाने तेथील मंडळीच्या वडीलजनांना बोलावून घेतले.
18 जेव्हा ते आले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “आशियात आलो त्या दिवसापासून मी तुमच्या सोबत असताना कसा राहिलो हे तुम्हांना माहीत आहे. 19 मी प्रभूची सेवा पूर्ण नम्रतेने व रडून केली. यहूदी लोकांनी केलेल्या कटामुळे निर्माण झालेल्या उपद्रवांना तोंड देत मी त्याची सेवा केली. 20 जे काही तुमच्या चांगल्यासाठी होते ते तुम्हांला सांगण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही, हे तुम्हांना माहीत आहे. आणि या गोष्टी जाहीरपणे व घराघरातून सांगण्यासाठी मी कधीही मागेपुढे पाहिले नाही. 21 पश्चाताप करुन देवाकडे वळण्याविषयी आणि आपल्या प्रभु येशूवरील विश्वासाविषयी यहूदी व ग्रीक लोकांना सारखीच साक्ष दिली.
22 “आणि आता आत्म्याच्या आज्ञेने यरुशलेमला चाललो आहे, आणि तेथे माझ्याबाबतीत काय घडेल हे माहीत नाही. 23 मला फक्त एकच गोष्ट माहीत आहे की प्रत्येक शहरात पवित्र आत्मा मला सावध करतो. तुरुंगवास व संकटे माझी वाट पाहत आहेत हे तो मला सांगतो 24 मी माइया जीवनाविषयी काळजी करीत नाही. सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे मी माझे काम पूर्ण करणे. प्रभु येशूने जे काम मला दिले ते मला पूर्ण करायला पाहिजे-ते काम म्हणजे- देवाच्या कृपेबद्दल (दयाळूपणबद्दल) ची सुवार्ता लोकांना सांगितली पाहिजे.
25 “राच्याची करीत ज्या लोकांत मी फिरलो त्या तुम्हांतील कोणालाही मी पुन्हा कधीही दिसणार नाही हे आता मला माहीत आहे. 26 म्हणून मी तुम्हांला जाहीरपणे सांगतो की, सर्वांच्या रक्तासंबंधाने मी निर्दोष असा आहे. 27 देवाची संपूर्ण इच्छा काय आहे हे प्रगट करण्यास मी कधीही मागेपुढे पाहिलेले नाही. 28 तुमची स्वतःची व देवाच्या सर्व लोकांची, ज्याना देवाने तुम्हांला दिलेले आहे, त्यांची काळजी घ्या. कळपाची (देवाच्या लोकांची) काळजी घेण्याचे काम पवित्र आत्म्याने तुम्हांला दिलेले आहे. तुम्ही मंडळीसाठी मेंढपाळासारखे असले पाहिजे. ही मंडळी देवाने स्वतःचे रक्त देऊन विकत घेतली. 29 मला माहीत आहे की, मी गेल्यावर तुमच्यामध्ये भयंकर असे दुष्ट लांडगे येतील. ते कळपाला सोडणार नाहीत. 30 तुमच्यामधूनसुद्धा लोक उठतील, चुकीचे असे तुम्हांला शिकवून आपल्या मागे घेऊन जातील. 31 यासाठी सावध राहा. तुम्हांतील प्रत्येकाला गेले तीन वर्षे डोळ्यांत अश्रु आणून सावध करण्याचे मी कधीच थांबविले नाही हे आठवा.
32 “आणि आता मी तुम्हांला देवाच्या व वचनाच्या कृपेच्या अधीन करतो. जी तुमची वाढ करण्यासाठी समर्थ आहे, व सर्व पवित्र केलेल्यांमध्ये वतन द्यावयाला समर्थ आहे. 33 मी कोणाच्याही सोन्याचा, चांदीचा व कपड्यांचा लोभ धरला नाही. 34 मी आपल्या स्वतःच्या व माझ्याबरोबर राहणाऱ्यांच्या गरजा माझ्या हातांनी भागविल्या हे तुम्हांला चांगले माहीत आहे. 35 अशा रीतीने मी तुम्हास उदाहरण घालून दिले आहे की जे दुर्बल आहेत अशांना आपण स्वतः मेहनत करुन मदत केली पाहिजे. व प्रभु येशूचे शब्द लक्षात ठेवले पाहिजेत. तो स्वतः म्हणाला, ‘घेण्यापेक्षा देणे अधिक आशीर्वादाचे असते.’”
36 आणि हे बोलल्यावर पौलाने गुडघे टेकले आणि प्रार्थना केली. 37 तेव्हा प्रत्येकाला खूपच रडू आले, ते पौलाच्या गळ्यात पडले व त्याचे मुके घेत राहिले. 38 ते पुन्हा त्याला कधीही पाहू शकणार नाहीत, या वाक्याने त्यांना फार दु:ख झाले, मग ते त्याला जहाजापर्चंत निरोप देण्यास गेले.
2006 by World Bible Translation Center