M’Cheyne Bible Reading Plan
लोटाचे पाहुणे
19 त्या दिवशी संध्याकाळी ते दोन देवदूत सदोम नगरात आले. नगराच्या वेशी जवळ बसलेल्या लोटाने त्यांस पाहिले; लोट उठून त्यांस सामोरा गेला आणि त्याने त्यांस आदराने लवून नमल केले. 2 लोट त्यांस म्हणाला, “माझे स्वामी महाराज, कृपया माझ्या घरी या; मला आपली सेवा करु द्या; तेथे तुम्ही आपले पाय धुवा, आजची रात्र रहा; मग उद्या तुमच्या पुढील प्रवासास निघा.”
त्या देवदूतांनी उत्तर दिले, “नाही नाही, आम्ही रात्री वेशीजवळील चौकात मुक्काम करु.”
3 परंतु लोट त्यांना पुन्हा पुन्हा विनंती करीतच राहिला; तेव्हा देवदूतांनी त्याची विनंती मान्य केली व ते त्याच्या घरी मुक्कामास गेले. लोट याने त्यास पिण्यास पाणी दिले, त्याने त्यांच्यासाठी भाकरी केल्या व ते जेवले.
4 त्या रात्री झोपण्याच्या वेळेपूर्वी त्या नगराच्या सर्व भागातून पुरुष तरुण आणि वृध्द असे सर्वच पुरुष लोटाच्या घरी आले; त्या सदोमकर पुरुषांनी लोटाच्या घराला गरडा घातला व त्यांनी लोटाला हाक मारत म्हटले. 5 “आज रात्री तुझ्या घरी आलेले ते दोन पुरुष (देवदूत) कोठे आहेत? त्यांना आमच्याकडे बाहेर आण; म्हणजे आम्ही त्यांच्याशी समागम करु.”
6 लोट घरातून बाहेर आला व त्याने आपल्यामागे घराचे दार बंद केले. 7 लोट त्या सदोमकर लोकांना म्हणाला, “नाही, नाही, माझ्या बंधूनो! मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही असे भयंकर वाईट काम करु नका. 8 पाहा, माझ्या दोन मुली आहेत; त्यांचा अद्याप कोणाही पुरुषाशी संबंध आला नाही; त्या शुद्ध कुमारी आहेत; मी त्यांना तुमच्या स्वाधीन करतो. तुमच्या मर्जीस येईल तसे तुम्ही त्यांच्याशी वागा; परंतु ह्या पुरुषांना (देवदूतांना) काहीही करु नका; ते माझ्या घरी पाहुणे म्हणून आले आहेत आणि त्यांचे रक्षण करणे माझे प्रथम कर्तव्य आहे.”
9 तेव्हा सभोंवतालचे घेरा टाकलेले लोक म्हणाले, “चल हो बाजूला.” नंतर ते आपापसात म्हणू लागले, “हा लोट आमच्या नगरात पाहुणा म्हणून आला आणि आता आम्ही काय करावे हे हा उपरा आम्हाला शिकवू पाहतो काय?” मग ते लोक लोटाला म्हणाले, “अरे, आम्ही त्या पाहुण्यांशी जेवढे दुष्टपणे वागूं त्यापेक्षा अधिक दुष्टतेने व वाईट रीतीने तुझ्याशी वागू, समजलास!” तेव्हा ते लोक लोटाच्या अधिक जवळ जवळ येऊ लागले व घराचा दरवाजा तोडण्यास ते पुढे सरसावले.
10 परंतु लोटाच्या घरातील त्या दोन पाहुण्यांनी दार उघडले व लोटाला मागे ओढून घरात घेतले, आणि दार बंद केले. 11 त्या दोन पुरुषांनी दारा बाहेरील लोकांस आंधळे केले; म्हणून घरात घुसण्याचा प्रयत्न करणारे ते सर्व तरुण व म्हातारे आंधळे झाले, त्यामुळे अखेर पर्यंत त्यांना घराचे दार सापडलेच नाहीं.
सदोमापासून पलायन
12 ते दोन पुरुष लोटाला म्हणाले, “तुझ्या कुटुंबातील व नात्यातील इतर कोणी लोक म्हणजे तुझे जांवई, मुलगे, मुली किवां इतर नातेवाईक या नगरात आहेत काय? तसे कोणी असतील तर त्यांना आता ताबडतोब हे शहर सोडून बाहेर पडण्यास सांग; 13 कारण आम्ही या नगराचा नाश करणार आहोत. हे नगर किती वाईट आहे ते परमेश्वराने ऐकले आहे आणि म्हणून त्याने आम्हाला या नगराचा नाश करण्यासाठी पाठवले आहे.”
14 म्हणून मग लोट बाहेर गेला व आपल्या जावयांस भेटला. तो त्यांना म्हणाला, “चला उठा, त्वरा करा, व हे शहर सोडून लवकर बाहेर पडा; कारण परमेश्वर या नगराचा नाश करणार आहे.” परंतु लोट गंमत करीत आहे असे त्याच्या जावयांस वाटले.
15 दुसऱ्या दिवशी पहाटे ते दूत लोटाला घाईकरुन म्हणालें, “उठ, ह्या नगराला ताडण होणार आहे; तेव्हा तू तुझी बायको व तुझ्या जवळ असलेल्या तुझ्या दोन मुली यांस घेऊन ताबडतोब येथून नीघ; म्हणजे मग या नगराबरोबर तुमचा नाश होणार नाही, तर तुम्ही आपले जीव वाचवाल.”
16 परंतु लोट एकदम गोंधळून गेला व दिरंगाई करु लागला; तेव्हा त्या दोन पुरुषांनी (देवदूतांनी) लोट, त्याची बायको आणि त्याच्या दोन मुली यांचे हात धरुन त्यांस सुरक्षितपणे नगराबाहेर नेले. परमेश्वराने अशा रीतीने लोट व त्याच्या कुटुंबियावर दया केली. 17 नगराबाहेर आल्यावर त्या देवदूतापैकी एक जण म्हणाला, “आता पळा व तुमचे जीव वांचवा, नगराकडे मागे वळून पाहू नका आणि या खोऱ्यात कोणत्याही ठिकाणी थांबू नका; पर्वतावर जाईपर्यंत पळत राहा जर का मधे कोठे थांबला, तर नगराबरोबर तुमचाही नाश होईल.”
18 परंतु लोट त्या दोन देवदूतांना म्हणाला, “प्रभू! इतके दूर पळत जाण्याची माझ्यावर सक्ती करु नका, 19 मी तर तुमच्या दासासारखा आहे; पण मला वांचविण्यासाठी तुम्ही माझ्यावर खूप दया केली आहे. मी डोंगरापर्यंत पळत जाऊ शकणार नाहीं; जर मी अगदी सावकाश पळू लागलो तर काहीतरी विपरीत व वाईट घडेल व मी मरुन जाईन. 20 परंतु पाहा, येथे जवळच फार लहान गांव आहे; तेथे जाण्याची मला परवानगी असावी, त्या गावापर्यंत पळत जाऊन मी सुरक्षित राहू शकतो.”
21 तेव्हा देवदूत लोटाला म्हणाला, “ठीक आहे, मी तसेही करण्यास तुला परवानगी देतो; मी त्या नगराचा नाश करणार नाही; 22 पण तेथे लवकर पळत जा. तू तेथे सुरक्षितपणे जाऊन पोहोंचेपर्यंत मला सदोम नगराचा नाश करता येणार नाही.” (लहान असल्यामुळे त्या गांवाला तेव्हापासून सोअर असे नाव पडले.)
सदोम व गमोरा नगरांचा नाश
23 लोट सोअर गांवात पाऊल टाकीत असताना सकाळ झाली व सूर्य तेजाने प्रकाशू लागला, 24 आणि परमेश्वराने सदोम व गमोरा या नगरांचा नाश करायला सुरुवात केली; त्याने आकाशातून त्या नगरावर गंधक व अग्नी यांचा वर्षाव केला; 25 अशा रीतीने परमेवराने सदोम व गमोरा या नगरांचा तसेच त्या सगळ्या खोऱ्याचा म्हणजे त्या तळवटीत राहाणाऱ्या सगळ्या माणसांचा, पशूंचा व वनस्पतींचा नाश केला.
26 लोट व त्याचे कुटुंबीय नगरातून पळून जात असताना लोटाच्या बायकोने मागे वळून जळणाऱ्या नगराकडे पाहिले तेव्हा तत्काळ ती मिठाचा खांब झाली.
27 त्याच दिवशी पहाटे अब्राहाम उठला आणि आदल्या दिवशी तो परमेश्वरासमोर ज्या ठिकाणी उभा राहिला होता तेथे गेला. 28 त्याने तेथून सदोम व गमोरा नगराकडे व संबंध खोऱ्यातील तळवटीच्या प्रदेशाकडे नजर टाकली तेव्हा तो अवघा प्रदेश म्हणजे भल्यामोठ्या अग्नीच्या ज्वालांनी व धुराच्या लोटांनी भरलेला त्याला दिसला.
29 देवाने त्या खोऱ्यातील नगरांचा अशा रीतीने नाश केला परंतु तो करीत असताना, अब्राहामाने त्याला विचारलेल्या गोष्टींची त्याने आठवण ठेवली; लोट (अब्राहामचा पुतण्या) दरीतील नगरांत राहात होता. पण नगरांचा नाश करण्यापूर्वी देवाने लोटाला तेथून दूर पाठवून दिले होते.
लोट व त्याच्या मुली
30 या नंतर अधिक काळ सोअरात राहण्यास लोटाला भीती वाटली; तेव्हा तो त्याच्या मुलींना घेऊन डोंगरात एका गुहेत जाऊन राहिला. 31 एके दिवशी वडील मुलगी धाकटीला म्हणाली, “पृथ्वीवर जिकडे तिकडे स्री पुरुष लग्न करुन राहतात, आपले वडील म्हातारे होत राहिले आहेत; आणि या भागात आपल्याबरोबर लग्न करण्यास एकही पुरुष नाही; 32 तर आता आपणाला मुले होण्याकरिता आपण आपल्या वडिलांचा उपयोग करु, तेव्हा आपण आपल्या वडिलाकडे जाऊन त्यांना भरपूर द्राक्षमद्य पाजू आणि मग त्यांच्यापाशी निजू म्हणजे मग त्यामुळे आपला वंश चालू राहील.”
33 त्याच रात्री त्या दोघी मुली वडिलांकडे गेल्या आणि त्यांना त्यानी द्राक्षमद्य पाजले; नंतर वडील मुलगी आपल्या वडिलांच्या बिछान्यात गेली व त्यांच्याजवळ निजली; पण द्राक्षमद्याच्या नशेमुळे ती आपल्याजवळ निजली हे लोटाला कळले नाही.
34 दुसऱ्या दिवशी वडील बहीण धाकट्या बहिणीला म्हणाली, “मी काल रात्री आपल्या वडिलाजवळ निजले, तर आज रात्री पुन्हा आपण वडिलांना द्राक्षमद्य पाजू या, मग रात्री तू वडिलांच्या बिछान्यात जाऊन त्याच्याजवळ नीज. अशा प्रकारे आपण त्याना मुले होऊ देऊ व आपल्या वडिलांचा वंश चालविण्यास त्यांचा उपयोग करु.” 35 तेव्हा त्या रात्री त्या दोन मुलींनी आपल्या वडिलानां द्राक्षमद्य पाजला; नंतर धाकटी मुलगी आपल्या वडिलांच्या बिछान्यात गेली व त्यांच्याजवळ निजली; यावेळी ही नशेमुळे आपली मुलगी आपल्याजवळ निजली हे लोटाला समजले नाहीं.
36 अशा रीतीने लोटाच्या दोन्हीही मुली गरोदर राहिल्या. त्यांचे वडीलच त्यांच्या बांळांचे वडील होते. 37 थोरल्या मुलीला मुलगा झाला, तेव्हा तिने त्याचे नाव मवाब ठेवले; आजतागायत राहात असलेल्या मवाबी लोकांचा हा मूळ पुरुष, 38 धाकट्या मुलीलाही मुलगा झाला; तिने त्याचे नाव बेनअम्मी असे ठेवले; आजमितीला जे अम्मोनी लोक आहेत त्यांचा हा मूळ पुरुष.
सर्वात महान कोण हे येशू सांगतो(A)
18 त्या वेळस शिष्य आले आणि त्यांनी विचारले, “स्वर्गाच्या राज्यात सर्वात महान कोण?”
2 तेव्हा त्याने एका लहान बालकाला आपल्याजवळ बोलावून त्यांच्यामध्ये उभे केले, 3 आणि म्हटले, “मी तुम्हांला खरे सांगतो, तुमच्यात बदल होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात जाणारच नाही. 4 म्हणून जो कोणी आपणांला या बालकासारखे लीन करतो तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वांहून महान आहे.
5 “आणि जो कोणी अशा एका लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो, तो मला स्वीकारतो.
पापाचा परिणामा बद्दल येशू इशारा देतो(B)
6 “परंतु जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहानातील एकाला अडखळण आणील त्याच्या गळ्यात जात्याची मोठी तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडविणे हे त्याच्या फायद्याचे आहे. 7 जगाचा धिक्कार असो कारण त्याच्यातील काही गोष्टींमुळे ते लोकांना पापात पाडते. तरी अशा काही गोष्टी होत राहणारच, पण जे लोक या गोष्टींना कारणीभूत होतात. त्यांना फार अहिताचे ठरेल.
8 “जर तुमचा उजवा हात किंवा पाय तुम्हांला पापात पाडीत असेल तर तो कापून टाका व फेकून द्या. तुम्ही एखादा अवयव गमावला, परंतु अनंतकाळचे जीवन मिळविले तर त्यात तुमचे जास्त हित आहे. दोन हात व दोन पाय यांच्यासह कधीही न विझणाऱ्या अग्नीत (नरकात) तुम्ही टाकले जाण्यापेक्षा ते जास्त बरे होईल. 9 जर तुमचा डोळा तुम्हांला पापात पाडीत असेल तर तो उपटून फेकूनच द्या. कारण एकच डोळा असला आणि तुम्हाला अनंतकालचे जीवन मिळाले तर ते जास्त बरे आहे. दोन डोळ्यांसह तुम्ही नरकात टाकले जाण्यापेक्षा ते जास्त बरे आहे.
येशू हरवलेल्या मेंढराची बोधकथा सांगतो(C)
10 “सावध असा. ही लहान मुले कुचकामी आहेत असे समजू नका. मी तुम्हांला सांगतो की, या लहान मुलांचे देवदूत स्वर्गात असतात आणि ते देवदूत माझ्या स्वर्गातील पित्याबरोबर नेहमी असतात. 11 [a]
12 “जर एखाद्या मनुष्याजवळ 100 मेंढरे आहेत आणि त्यांच्यापैकी एक मेंढरू हरवले तर तो 99 मेंढरे टेकडीवर सोडून देईल आणि ते हरवलेले एक मेंढरु शोधायला जाईल की नाही? 13 आणि जर त्या मनुष्याला हरवलेले मेंढरू सापडले तर त्याला कधीही न हरवलेल्या 99 मेंढरांबद्दल वाटणाऱ्या आनंदापेक्षा त्या एकासाठी जास्त आनंद होईल. मी तुम्हांला खरे सांगतो, 14 तशाच प्रकारे, या लहान मुलांपैकी एकाचा अगदी लहानातील लहानाचा ही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा नाही.
जेव्हा एखादी व्यक्ती तुमचे वाईट करते(D)
15 “जर तुझा भाऊ अगर तुझी बहीण तुझ्यावर अन्याय करील, तर जा अणि त्याला किंवा तिला तुझ्यावर काय अन्याय झाला ते सांग आणि तोही एकांतात सांग. जर त्यांने किंवा तिने तुझे ऐकले तर त्याला किंवा तिला आपला बंधु किंवा बहीण म्हणून परत मिळविले आहेस. 16 पण जर तो किंवा ती तुझे एकत नसेल तर एकाला किंवा दोघांना तुझ्याबरोबर घे, यासाठी की जे काही झाले त्याविषयी साक्ष द्यायला दोन किंवा तीन जण तेथे असतील, [b] 17 जर तो मनुष्य लोकांचेही ऐकणार नाही तर मंडळीसमोर ही गोष्ट मांड. जर तो मनुष्य मंडळीचेही ऐकाणार नाही, तर मग तो देवाचा नाही, असे समज किंवा एखाद्या जकातदारासारखा समज.
18 “मी तुम्हांला खरे सांगतो, जेव्हा तुम्ही जगात न्याय कराल तेव्हा तो देवाकडून झालेला न्याय असेल. जेव्हा तुम्ही एखाद्याला क्षमा कराल तेव्हा ती देवाकडून झालेली क्षमा असेल. 19 “तसेच मी तुम्हाला सांगतो की, जर तुमच्यापैकी दोघांचे एखाद्या गोष्टीविषयी एकमत झाले तर त्याकरिता प्रार्थना करा. म्हणजे तुम्ही जी गोष्ट मागाल तुमचा स्वर्गीय पिता तिची पूर्तता करील. 20 हे खरे आहे काऱण तुमच्यापैकी जर दोघे किंवा तिघे माझ्या नावात एकत्र जमले असतील तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.”
क्षमा नकरणाऱ्या नोकराचा दाखला
21 नंतर पेत्र येशूकडे आला आणि त्याने विचारले, “जर माझा भाऊ माझ्यावर अन्याय करीत राहिला तर मी त्याला किती वेळा क्षमा करावी? मी त्याला सात वेळा क्षमा करावी काय?”
22 येशूने उत्तर दिले, “मी तुला सांगतो, फक्त सातच वेळा नाही तर उलट त्याने तुझ्यावर 77 वेळा [c] अन्याय केला तरी तू त्याला क्षमा करीत राहा.”
23 “म्हणून स्वर्गाच्या राज्याची तुलना एका राजाशी करता येईल. आपले जे नोकर आपले देणे लागत होते त्यांच्याकडून त्या राजाने पैसे परत घेण्याचे ठरविले. 24 जेव्हा त्याने पैसे जमा करायला सुरूवात केली, तेव्हा एक देणेकरी ज्याच्याकडे 10,000 चांदीच्या नाण्याचे कर्ज होते त्याला त्याच्याकडे आणण्यात आले. 25 त्या देणेकऱ्याकडे राजाचे पैसे परत करण्यासाठी काहीच नव्हते, तेव्हा मालकाने आज्ञा केली की त्याला, त्याच्या पत्नीला, त्याच्या मुलांना आणि जे काही त्याच्याकडे आहे ते सर्व विकले जावे आणि जे पैसे येतील त्यातून कर्जाची परतफेड व्हावी.
26 “परंतु त्या नोकराने पाया पडून, गयावया करीत म्हटले, ‘मला थोडी सवलत द्या. जे काही मी तुमचे देणे लागतो ते तुम्हांला परत करीन.’ 27 त्या मालकाला आपल्या नोकराबद्दल वाईट वाटले, म्हणून त्याने त्या नोकराचे सर्व कर्ज माफ केले आणि त्याला सोडले.
28 “नंतर त्याच नोकराचे काही शेकडे रुपये देणे लागत असलेला दुसरा एक नोकर पहिल्या नोकराला भेटला. त्याने त्या दुसऱ्या नोकराचा गळा पकडला आणि तो त्याला म्हाणाला, ‘तू माझे जे काही पैसे देणे लागतोस ते सर्व आताच्या आता दे.’
29 “परंतु दुसरा नोकर गुडघे टेकून गयावया करीत म्हणाला, ‘मला थोडी सवलत द्या. जे काही पैसे मी तुम्हांला देणे लागतो ते परत करीन.’
30 “पण पहिल्या नोकराने दुसऱ्या नोकराला सांभाळून घेण्यास साफ नकार दिला. उलट तो गेला आणि त्याने त्याला तुरूंगात टाकले. तेथे त्याला त्याचे कर्ज फिटेपर्यंत राहावे लागणार होते. 31 घडलेला हा प्रकार जेव्हा दुसऱ्या नोकरांनी पाहिला तेव्हा ते फार दु:खी झाले, तेव्हा ते गेले आणि त्यांनी जे सर्व घडले होते ते मालकाला सांगितले.
32 “तेव्हा पहिल्या नोकारच्या मालकाने त्याला बोलाविले व तो त्याला म्हणाला, ‘दुष्टा, तू माझे कितीतरी देणे लागत होतास, परंतु मी तुझे देणे माफ करावे अशी विनंती तू मला केलीस तेव्हा मी तुझे सर्व कर्ज माफ केले. 33 म्हणून तू तुझ्याबरोबरच्या नोकारालाही तशीच दया दाखवायची होतीस.’ 34 मालक फार संतापला, शिक्षा म्हणून मालकाने पहिल्या नोकाराला तुरूंगात टाकले, आणि त्याने सर्व कर्ज फेडीपर्यंत त्याला तुरूंगातून सोडले नाही.
35 “जसे या राजाने केले तसेच माझा स्वर्गीय पिता तुमचे करील. तुम्ही आपला भाऊ अगर बहीण यांना क्षमा केली नाही तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हांला क्षमा करणार नाही.”
एज्राचे नियमशास्त्राचे पठण
8 त्या वर्षीच्या सातव्या महिन्यात सर्व इस्राएल लोक एकत्र आले. त्यांच्यामध्ये इतकी एकजूट होती की ते एकमेकांशी अगदी तद्रूप झाले होते. पाणी वेशीच्या समोरच्या मोकळ्या जागेत ते जमले. त्या सर्वांनी शिक्षक एज्राला मोशेच्या नियमशास्त्राचे पुस्तक बाहेर काढायला सांगितले. परमेश्वराने इस्राएल लोकांना सांगितले ते नियमशास्त्र हेच. 2 तेव्हा एज्राने तेथे जमलेल्या लोकांसमोर नियमशास्त्र आणले. त्या वर्षीच्या सातव्या महिन्याचा तो पहिला दिवस होता. [a] या सभेला स्त्रिया-पुरुष आणि ज्यांना ज्यांना वाचलेले समजत होते असे सर्वजण होते. 3 एज्राने या नियमशास्त्रातून पहाटेपासून दुपारपर्यंत मोठया आवाजात वाचून दाखवले. एज्रा पाणीवेशीसमोरच्या मोकळ्या चौकाकडे तोंड करून उभा होता. समस्त स्त्रीपुरुषांना आणि वाचलेले समजत होते इतपत मोठे असलेल्या सर्वापुढे त्याने वाचले. सर्व लोकांनी नियमशास्त्राचे हे पठण काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन ऐकले.
4 एज्रा एका उंच लाकडी मंचावर उभा होता. खास या प्रसंगाकरताच तो करवून घेतला होता. मतिथ्य, शेमा, अनाया, उरीया, हिल्कीया आणि मासेया हे एज्राच्या उजव्या बाजूला उभे होते तर पदाया, मीशाएल, मल्खीया, हाशूम हश्बद्दाना, जखऱ्या, आणि मशुल्लाम हे डावीकडे होते.
5 आणि एज्राने ग्रंथ उघडला. एज्रा उंच मंचावर सर्वांसमोर उभा असल्यामुळे सगळयांना तो दिसत होता. एज्राने नियमशास्त्राचा ग्रंथ उघडल्याबरोबर लोक उभे राहिले. 6 एज्राने परमेश्वराची, थोर परमेश्वराची स्तुती केली तेव्हा सर्व लोकांनी आपले हात वर करून “आमेन! आमेन! आमेन!” असा उद्गार काढला. मग सर्वांनी खाली वाकून, मस्तक जमिनीपर्यंत लववून परमेश्वराला वंदन केले.
7 बाजूला उभे असलेले लेवी घराण्यातील लोक समुदायाला नियमशास्त्र समजावून सांगत होते. त्या लेवींची नावे अशी: येशूवा, बानी, शेरेब्या, यामीन, अक्कूब, शब्बथई, होदीया, मासेया, कलीता, अजऱ्या, योजाबाद, हानान व पेलाया, 8 या लेवींनी देवाच्या नियमशास्त्राचा ग्रंथ वाचला. त्याचा अर्थ स्पष्टकरून लोकांना समजेल असा उलगडून सांगितला. ज्याचे पठण चालले होते ते लोकांना समजावे म्हणून त्यांनी हे विवरण केले.
9 यानंतर नहेम्या हा राज्यपाल, याजक व शिक्षक एज्रा आणि लोकांना स्पष्टीकरण करून सांगणारे लेवी हे बोलले. ते म्हणाले, “तुमचा परमेश्वर देव याचा आजचा हा खास पवित्र दिवस आहे. आज दु:खी राहू नका आणि शोक करु नका.” कारण नियमशास्त्रातील देवाची वचने ऐकत असताना लोक रडू लागले होते म्हणून त्यांनी हे सांगितले.
10 नहेम्या म्हणाला, “आता जा आणि सुग्रास अन्न खा, गोड पेये प्या. ज्यांना असे खाणेपिणे करता आलेले नाही त्यांना आपल्यातले काही खाद्य-पेय पाठवा. परमेश्वराचा हा पवित्र दिवस आहे. दु:खी राहू नका. कारण परमेश्वराचा आनंदच तुम्हाला सामर्थ्य देणार आहे.”
11 लेवी घराण्यातील लोकांनी जमलेल्या लोकांना शांत केले. लेवी म्हणाले, “शांत व्हा, उगे राहा. आजचा दिवस पवित्र आहे. शोक करु नका.”
12 मग सर्व लोक मेजवानी घ्यायला गेले. खाद्यपेयात त्यांनी इतरांना सहभागी करून घेतले. अतिशय आनंदात त्यांनी हा विशेष दिवस साजरा केला. परमेश्वराची जी वचने शिक्षक त्यांना समजावून सांगत होते ती त्यांना अखेर समजली.
13 यानंतर त्या महिन्याच्या दुसऱ्या दिवशी सर्व घराण्यांचे प्रमुख एज्राला तसेच याजकांना व लेवींना भेटायला गेले. नियमशास्त्राचे अध्ययन करण्यासाठी ते शास्त्री एज्रा भोवती जमले.
14-15 परमेश्वराने मोशेमार्फत लोकांना हे नियमशास्त्र दिले. त्यात यांना अभ्यासातून असे सापडले की, वर्षाच्या सातव्या महिन्यात इस्राएल लोकांनी तात्पुरत्या राहूट्यांत राहावे. लोकांनी सर्व नगरांमध्ये आणि यरुशलेमभर फिरुन अशी घोषणा करावी, “डोंगराळ भागामध्ये जाऊन वेगवेगळया प्रकारच्या जैतून वृक्षांच्या फांद्या आणाव्या. देवदारू, खजुरी आणि सावली देणाऱ्या वृक्षांच्या फांद्या आणाव्या आणि त्यांची तात्पुरते मांडव उभारावेत. नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे करावे.”
16 तेव्हा लोक बाहेर पडले आणि त्यांनी तशा फांद्या आणल्या. त्यांतून त्यांनी स्वतःसाठी तात्पुरते मांडव बनवले. प्रत्येकाने आपापल्या धाब्यावर आणि आपापल्या अंगणात मांडव उभारले. मंदिराच्या अंगणात, पाणी वेशी समोरच्या चौकात आणि एफ्राईम वेशी जवळही त्यांनी मांडव घातले. 17 बंदिवासातून परत आलेल्या सर्वच्या सर्व इस्राएल लोकांनी असे मांडव घातले. त्यात ते राहिले. नूनचा मुलगा यहोशवा याच्या काळापासून ते आजतागायत इस्राएलींनी हा मंडपाचा सण अशाप्रकारे साजरा केला नव्हता. सर्वांना अतिशय आनंद झाला होता.
18 या सणाच्या काळात एज्राने त्यांना रोज नियमशास्त्र वाचून दाखवले. सणाच्या पहिल्या दिवसापासून अखेरच्या दिवसापर्यंत एज्राने हे पठण केले. इस्राएलींनी सात दिवस हा सण साजरा केला. नियमशास्त्राला अनुसरुन आठव्या दिवशी ते सर्वजण खास सभेसाठी एकत्र जमले.
करिंथमध्ये पौल
18 नंतर पौलाने अथेनै शहर सोडले व करिंथ शहरास गेला. 2 करिथमध्ये पौल एका यहूदी मनुष्याला भेटला ज्याचे नाव अक्विल्ला असे होते. तो पंत येथील रहिवासी होता. आपली पत्नी प्रिस्किल्ला हिच्यासह नुकताच तो इटलीहून आला होता. कारण सर्व यहूदी लोकांनी रोम शहर सोडून गेले पाहिजे असा हुकूम क्लौद्य [a] याने काढला होता. पौल त्यांना (अक्विल्ला व प्रिस्किल्ला) भेटावयास गेला. 3 पौलासारखेच ते तंबू बनविणारे होते. तो त्यांच्याबरोबर राहिला व त्यांच्याबरोबर काम करु लागला.
4 प्रत्येक शब्बाथवारी पौल सभास्थानात यहूदी लोकांशी व ग्रीक लोकांशी बोलत असे (चर्चा करीत असे) आणि तो यहूदी व ग्रीक लोकांची मने वळविण्याचा प्रयत्न करीत असे. 5 जेव्हा सीला व तीमथ्य हे मासेदोनियाहून परत आले, तेव्हा पौल उपदेश करण्यात आपला सर्व वेळ घालवू लागला. येशू हाच रिव्रस्त आहे अशी साक्ष देऊ लागला. 6 परंतु यहूदी लोकांनी पौलाला विरोध केला. त्याला ते (यहूदी लोक) वाईट रीतीने बोलले. तेव्हा आपला विषेध दर्शविण्याकरिता पौलाने आपल्या अंगावरील कपडे झटकले. तो यहूदी लोकांना म्हणाला, “जर तुमचे तारण झाले नाही, तर तो तुमचा दोष असेल! तुमचे रक्त तुमच्याच माथी असो! मी जबाबदार नाही. येथून पुढे मी यहूदीतर लोकांकडेच जाईन.”
7 पौल तेथून निघाला आणि सभास्थानाजवळ राहत असलेल्या तीत युस्त नावाच्या देवाच्या भक्ताच्या घरी गेला. 8 त्या सभास्थानाचा क्रिस्प हा पुढारी होता. क्रिस्पने व त्याच्या घरातील सर्वांनी प्रभूवर विश्वास ठेवला. करिंथ येथील पुष्कळ लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले आणि विश्वास ठेवला. करिंथ येथील पुष्कळ लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले आणि विश्वास ठेवला आणि त्यांचा बाप्तिस्मा करण्यात आला.
9 एके रात्री, प्रभु स्वप्नामध्ये पौलाशी बोलला, “घाबरु नको! बोलत राहा. शांत राहू नको! 10 मी तुझ्याबरोबर आहे. कोणीही तुझ्यावर हल्ला करणार नाही व तुला इजा करणार नाही; कारण या शहरात माझे पुष्कळ लोक आहेत.” 11 म्हणून पौल तेथे दीड वर्षे देवाचे वचन त्या लोकांना शिकवीत राहिला.
पौलाला गल्लियोपुढे उभे करतात
12 जेव्हा गल्लियो अखया प्रांताचा राज्यपाल होता, त्यावेळेस काही यहूदी पौलविरुद्ध एकत्र आले आणि त्याला न्यायसभेपुढे उभे केले. 13 यहूदी लोक म्हणाले, “हा मनुष्य अशा रीतीने लोकांना देवाची उपासना करायला शिकवीत आहे की, जे नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे.”
14 पौल काही बोलणार इतक्यात गल्लियो यहूदी लोकाना म्हणाला, “एखादा अपराध किंवा वाईट गोष्ट असती तर तुमचे म्हणणे ऐकून घेणे रास्त ठरले असते. 15 परंतु ज्याअर्थी ही बाब शब्द, नावे व तुमच्या नियमशास्त्रातील प्रश्नांशी संबंधित आहे. त्याअर्थी तुम्हीच तुमची समस्या सोडवा. अशा गोष्टींबाबत न्याय करण्यास मी नकार देतो!” 16 मग गल्लियोने त्यांना न्यायालयाबाहेर घालवून दिले.
17 मग त्या सर्वांनी यहूदी सभास्थानाचा प्रमुख सोस्थनेस याला मारहाण केली, पण गल्लियोने त्याकडे लक्ष दिले नाही.
पौल अंत्युखियास परत जातो
18 पौल बंधुजनांबरोबर बरेच दिवस राहिला. नंतर तो निघाला, व सूरिया देशाला समुद्रमार्गे गेला. आणि त्याच्याबरोबर प्रिस्किल्ला व अक्विल्ला ही दोघे होती. पौलाने किंख्रिया येथे आपल्या डोक्याचे मुंडण केले. कारण त्याने नवस केला होता. 19 मग ते इफिस येथे आले. पौलाने प्रिस्किल्ला व अक्विल्ला यांना तेथे सोडले. तो सभास्थानान गेला आणि यहूदी लोकांबरोबर वादविवाद केला. 20 जेव्हा त्यांनी त्याला तेथे आणखी काही वेळ थांबण्यासाठी सांगितले, तेव्हा तो कबूल झाला नाही. 21 परंतु जाता जाता तो म्हणाला, “देवाची इच्छा असेल तर मी परत तुमच्याकडे येईन.” मग तो समुद्रमार्गे इफिसहून निघाला.
22 जेव्हा तो कैसरीया येथे आला, तेव्हा तो तेथून वर यरुशलेमला गेला. आणि मंडळीला भेटला. मग तो खाली अंत्युखियाला गेला. 23 तेथे काही दिवस राहिल्यानंतर तो गेला, आणि गलतिया व फ्रुगिया या प्रदेशातून ठिकठिकाणी प्रवास करीत गेला. त्याने येशूच्या अनुयायांना विश्वासात बळकट केले.
इफिस व अखया (करिंथ) येथे अपुल्लो
24 अपुल्लो नावाचा एक यहूदी होता. तो आलेक्सांद्र येथे जन्मला होता. तो उच्च शिक्षिंत होता. तो इफिस येथे आला. त्याला पवित्र शास्त्राचे सखोल ज्ञान होते. 25 देवाच्या मार्गाचे शिक्षण त्याला देण्यात आले होते. तो आत्म्यात आवेशी असल्यामुळे येशूविषयी अचूकतेने शिकवीत असे व बोलत असे, तरी त्याला फक्त योहानाचा बाप्तिस्माच ठाऊक होता. 26 नंतर तो यहूदी लोकांच्या सभास्थानात धैर्याने बोलू लागला. जेव्हा प्रिस्किल्ला व अक्विल्ला यांनी त्याला बोलताना ऐकले, तेव्हा त्यांनी त्याला एका बाजूला घेतले. आणि देवाच्या मार्गाविषयी अधिक अचूक रीतीने त्याला स्पष्ट करुन सांगितले.
27 अपुल्लोला अखया देशाला जायचे होते, तेव्हा बंधुंनी त्याला उत्तेजन दिले. आणि तेथील येशूच्या अनुयायांना त्याचे स्वागत करण्याविषयी लिहिले. जेव्हा तो पोहोंचला, तेव्हा ज्यांनी कृपेमुळे (येशूवर) विश्वास ठेवला होता, त्यांना त्याने खूप मदत केली. 28 जाहीर वादविवादात त्याने यहूदी लोकांना फार जोरदारपणे पराभूत केले. आणि पवित्र शास्त्राच्या आधारे येशू हाच ख्रिस्त आहे हे सिद्ध केले.
2006 by World Bible Translation Center