M’Cheyne Bible Reading Plan
भेटीस आलेल्या तीन व्यक्ति
18 काही काळानंतर परमेश्वराने अब्राहामाला पुन्हा दर्शन दिले. अब्राहाम तेव्हा मम्रेच्या एलोन झाडांच्या राईत राहात होता. एके दिवशी भर दुपारी कडक उन्हाच्या वेळी अब्राहाम आपल्या तंबूच्या दाराशी बसला होता. 2 अब्राहामाने वर पाहिले तों आपल्या समोर तीन पुरुष उभे असलेले त्याला दिसले; त्यांना पाहून अब्राहाम धावत त्यांना सामोरा गेला आणि त्याने त्यांना लवून नमन केले; 3 अब्राहाम त्यांचे स्वागत करुन म्हणाला, “माझ्या स्वामीनों, मी जो आपला सेवक त्या माझ्या सोबत कृपा करुन काही वेळ राहा; 4 तुमचे पाय धुण्यासाठी मी पाणी घेऊन येतो; तुम्ही झाडा खाली सावलीत अमळ विसावा घ्या; 5 मी तुम्हासाठी थोडी भाकर आणतो; तुम्हाला पाहिजे तेवढे जेवा; मग पुढील प्रवास चालू करा.”
ते तीन पुरुष म्हणाले, “बरं, हे तर ठीक आहे आम्ही तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो.”
6 अब्राहाम लगेच घाईने पळत तंबूत गेला व साराला म्हणाला, “तिघांना तीन भाकरी पुरतील एवढे पीठ ताबडतोब मळ, त्याच्या भाकरी कर.” 7 नंतर अब्राहाम आपल्या गुरांच्या कळपाकडे पळत गेला, आणि त्यातून त्याने उत्तम कोवळे वासरु घेतले; ते दासाजवळ देऊन त्याने त्याला लवकर कापून जेवणासाठी रांधण्यास सांगितले; 8 अब्राहामाने त्या तीन पुरुषांना वासराचे शिजवलेले मांस, तसेच दूध व लोणी खाण्यासाठी त्यांच्यापुढे वाढले आणि त्यांचे जेवण संपेपर्यंत अब्राहाम राईत झाडाखाली त्यांच्या जवळ त्यांची सेवा करण्याकरीता उभा राहिला.
9 ते पुरुष अब्राहामाला म्हणाले, “तुझी बायको सारा कोठे आहे?”
अब्राहाम म्हणाला, “ती तंबूत आहे.”
10 मग परमेश्वर म्हणाला, “मी पुढल्या वसंत ऋतूत येईन त्या वेळी तुझी बायको सारा हिला मुलगा होईल.”
सारा तंबूच्या तोंडाशी उभी राहून कान देत होती म्हणून या गोष्टी तिने ऐकल्या. 11 अब्राहाम व सारा वयाने फार म्हातारे झाले होते. साराचे मुले होण्याजोगे वय निघून गेले होते. 12 म्हणून साराने जे ऐकले त्यावर विश्वास ठेवला नाहीं. ती स्वतःशीच हसून म्हणाली, “मी म्हातारी झाली आहे, आणि माझा नवराही म्हातारा झाला आहे मी इतकी म्हातारी झाली आहे की आता मला मूल होणे शक्य नाही.”
13 तेव्हा परमेश्वर अब्राहामाला म्हणाला, “सारा का हसली? मी आता म्हातारी झाली आहे म्हणून मला मुलगा होईल काय असे ती का म्हणाली? 14 परमेश्वराला काही अशक्य आहे का? येत्या वसंतऋ तूत सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा येईन तेव्हा तुझी बायको सारा हिला मुलगा होईल.”
15 परंतु सारा म्हणाली, “मी हसलेच नाही!” (ती असे म्हणाली कारण ती फार घाबरली होती.)
परंतु परमेश्वर म्हणाला, “नाही, मला माहीत आहे की हे खरे नाहीं; तू नक्की हसलीसच.”
16 नंतर ते पुरुष उठले व सदोम नगराकडे वळून ते तिकडे जाण्यास निघाले; अब्राहाम त्यांना वाटेस लावण्यासाठी त्यांच्या बरोबर थोडा रस्ता चालून गेला.
अब्राहामाने परमेश्वराबरोबर केलेला चांगला सौदा
17 परमेश्वर आपणा स्वतःशीच बोलला, “मी आता जे काही करणार आहे त्या विषयी अब्राहामाला सांगावे काय? 18 कारण अब्राहामापासून एक मोठे व शक्तीमान राष्ट्रे नक्की निर्माण होईल, आणि पृथ्वीवरील सगळी राष्ट्रे त्याच्यामुळे आशीर्वादित होतील. 19 मी अब्राहामाबरोबर एक विशेष करार केलेला आहे, तो यासाठी की त्याने आपल्या मुलांना व वंशजाना देवाच्या इच्छेप्रमाणे चालण्याची आज्ञा करावी आणि त्यांनी न्यायनीतीने चालावे; मग मी परमेश्वर त्याला मी दिलेल्या वचनाप्रमाणे जे द्यायचे ते देईन.”
20 मग परमेश्वर म्हणाला, “सदोम व गमोरा येथील लोक फार दुष्ट आहेत असे मी पुष्कळ वेळा ऐकले आहे. 21 म्हणून मी स्वतः प्रत्यक्ष जाऊन परिस्थीती पाहीन व मग त्यांची दुष्ट करणी ऐकल्याप्रमाणे खरोखर आहे की काय हे मला नक्की समजेल.”
22 मग ते पुरुष सदोमाकडे वळून चालू लागले, परंतु अब्राहाम परमेश्वरा पुढे तसाच उभा राहिला. 23 मग अब्राहामाने परमेश्वराजवळ जाऊन विचारले, “परमेश्वरा तू दुष्ट लोकांचा नाश करताना चांगल्या लोकांचाही नाश करणार काय? 24 आणि जर कदाचित त्या नगरात पन्नास लोक चांगले व नीतिमान असतील तर? तरी ही त्या नगराचा तू नाश करणार काय? तू खात्री ने नगरात राहाणाऱ्या पन्नास नीतिमान लोकांसाठी नगराचा बचाव करशील. 25 तू नक्की नगराचा नाश करणार नाहीस; दुष्ट लोकांना मारण्यासाठी तू पन्नास नीतिमान लोकंना मारणार नाहीस; आणि जर तसे झाले तर मग चांगले व वाईट अशा लोकांची गत सारखीच होणार; त्या दोन्ही प्रकारच्या लोकांना शिक्षा होणार; तू सर्व पृथ्वीचा न्यायाधीश आहेस, तू योग्य तेच करशील हे मला माहीत आहे.”
26 नंतर परमेश्वर बोलला, “या सदोम शहरात मला पन्नास चांगले लोक आढळले तर त्यांच्यासाठी मी संपूर्ण शहराची गय करीन, व सर्व शहर वाचवीन.”
27 मग अब्राहाम म्हणाला, “हे प्रभु, तुझ्या तुलनेने मी केवळ धूळ व राख आहे, तरी तुला एक प्रश्न विचारु दे; 28 समजा कदाचित् जर पाच लोक कमी असतील म्हणजे फक्त पंचेचाळीसच चांगले लोक असतील तर? त्या पाच कमी असलेल्या लोकांकरिता तू सर्व नगराचा नाश करशील काय?”
परमेश्वर म्हणाला, “मला पंचेचाळीस लोक चांगले आढळले तर मी नगराचा नाश करणार नाही.”
29 पुन्हा अब्राहाम परमेश्वराला म्हणाला, “आणि जर तेथे तुला चाळीसच चांगले लोक आढळले तर? संपूर्ण शहराचा तू नाश करशील काय?”
परमेश्वर म्हणाला, “जर मला चाळीसच लोक चांगले आढळले तर मी शहराचा नाश करणार नाही.”
30 मग अब्राहाम म्हणाला, “प्रभु, कृपा करुन माझ्या बोलण्याचा तुला राग न यावा; मला आणखी विचारण्याची परवानगी असावी; तेथे फक्त तीसच लोक चांगले असतील तर? तू त्या नगराचा नाश करशील काय?”
परमेश्वर म्हणाला, “जर तीस चांगले लोक असतील तर मी तसे करणार नाही.”
31 मग अब्राहाम म्हणाला, “प्रभु, थोडा त्रास देऊन पुन्हा विचारु का? समजा तेथे कदचित् वीसच लोक चांगले असतील तर?”
परमेश्वराने उत्तर दिले, “जर तेथे वीसच लोक चांगले असतील तर त्या वीसा करिता मी नगराचा नाश करणार नाही.”
32 अब्राहाम म्हणाला, “प्रभु, कृपा करुन माझ्यावर रागावू नकोस, परंतु शेवटी एकदाच थोडा त्रासदायक प्रश्न विचारण्यास परवानगी असावी, कदाचित् तुला तेथे दहाच लोक चांगले आढळले तर तू काय करशील?”
परमेश्वर म्हणाला, “जर मला नगरात दहाच लोक चांगले आढळले तर त्या दहाकरिता मी नगराचा नाश करणार नाहीं.”
33 मग अब्राहामाशी बोलणे संपविल्यावर परमेश्वर निघून गेला आणि अब्राहाम आपल्या तंबूकडे परत गेला.
येशू मोशे व एलीयाबरोबर दिसतो(A)
17 सहा दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपल्याबरोबर घेतले व त्यांना उंच डोंगरावर एकांती नेले. 2 त्याचे शिष्य पाहत असतानाच येशूचे रुप पालटले. त्याचे तोंड सूर्यासारखे प्रकाशले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी पांढरी शुभ्र झाली. 3 तेव्हा मोशे व एलीया हे त्याच्याशी संभाषण करीत असलेले त्यांना दिसले.
4 पेत्र येशूला म्हणाला, “प्रभु, येथे असणे हे आपणांसाठी बरे आहे. आपली इच्छा असेल तर मी येथे तीन मंडप करतो, एक आपल्यासाठी एक मोशेसाठी व एक एलीयासाठी.”
5 पेत्र बोलत आहे, इतक्यात, एका तेजस्वी ढगाने त्यांच्यावर सावली केली, आणि त्या ढगातून वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र आहे, याजविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका.”
6 येशुबरोबर असलेल्या शिष्यांनी ही वाणी ऐकली. तेव्हा ते जमिनीवर पालथे पडले कारण ते फार भ्याले होते. 7 तेव्हा येशू जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हणाला, “उठा! घाबरू नका.” 8 मग त्यांनी आपले डोळे उघडले आणि वर पाहिले तेव्हा त्यांना येशू शिवाय दुसरे कोणीही दिसले नाही.
9 येशू आणि त्याचे शिष्य डोंगरावरून खाली उतरत असताना, येशूने त्यांना आज्ञा केली की, डोंगरावर त्यांनी जे पाहिले ते कोणालाही सांगू नये. मनुष्याचा पुत्र मरणातून पुन्हा उठेपर्यंत वाट पाहा.
10 मग त्याच्या शिष्यांनी म्हटले, “नियमशास्त्राचे शिक्षक असे का म्हणतात की, एलिया अगोदर आला पाहिजे?”
11 तेव्हा त्याने उत्तर दिले, “एलिया येऊन सर्व काही पूर्ववत करील हे खरे, 12 पण मी तुम्हांला सांगतो की, एलीया आलाच आहे आणि त्यांनी त्याला ओळखले नाही पण त्यांना वाटले तसे त्यांनी त्याला केले. मनुष्याचा पुत्रही त्यांच्याकडून असेच सहन करणार आहे.” 13 तेव्हा त्यांना समजले की त्याने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयी सांगितले आहे.
येशू एका फेफरेकरी मुलाला बरे करतो(B)
14 नंतर येशू व शिष्य लोकसमुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे आला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, 15 “प्रभु, माझ्या मुलावर दया करा. त्याला फेफरे येतात व त्याचे फार हाल होतात कारण तो सारखा विस्तवात आणि पाण्यात पडतो. 16 मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले पण त्यांना त्याला बरे करता येईना.”
17 येशूने उत्तर दिले, “अहो अविश्वासू विपरीत पिढीच्या लोकांनो, मी तुमच्याबरोबर आणखी कोठवर राहू? मी तुमचे किती सहन करू? त्याला माझ्याकडे आणा.” 18 येशूने त्या मुलामध्ये असलेल्या भुताला कडक रीतीने धमकावले, तेव्हा ते भूत त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेला तो मुलगा बरा झाला.
19 नंतर शिष्य एकांती येशूजवळ येऊन म्हणाले, “आम्हांला (त्याच्यातील भूत) का काढता आले नाही?”
20 तेव्हा तो म्हणाला, “तुमच्या अल्पविश्वासामुळे. मी तुम्हांला खरे सांगतो, तुमच्यात जर मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल तर तुम्ही या डोंगराला म्हणू शकता, येथून निघून तेथे जा, तर तो डोंगर जाईल. तुमच्यासाठी काहीही अशक्य असणार नाही.” 21 [a]
येशू स्वतःच्या मरणाविषयी बोलतो(C)
22 जेव्हा ते एकत्र गालीलात आले तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती विश्वासघाताने धरून दिला जाणार आहे. 23 ते त्याला जिवे मारतील आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठविला जाईल.” तेव्हा शिष्य फार दु:खी झाले.
येशू कर देण्याविषयी शिकवितो
24 येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूमास आले तेव्हा मंदिराचा कर वसूल करणारे आले, ते पेत्राकडे येऊन म्हणाले, “तुमचा गुरू कराचा रूपया देत नाही काय?”
25 त्याने म्हटले, “होय देतो.”
मग तो घरात आल्याबरोबर तो बोलण्याअगोदर येशू म्हणाला, “शिमोना, तुला काय वाटते? पृथ्वीवरील राजे जकात किंवा कर कोणाकडून घेतात, आपल्या मुलांकडून की परक्याकडून?”
26 जेव्हा तो म्हणाला, “परक्याकडून.”
तेव्हा येशूने त्याला म्हटले, “तर मग मुले मोकळी आहेत. 27 तरी आपण त्यांना अडखळण आणू नये, म्हणून पाण्यात जाऊन गळ टाक आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड म्हणजे तुला दोन रूपयांचे एक नाणे सापडेल. ते घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल दे.”
7 तेव्हा तटबंदीचे काम पुरे झाले मग आम्ही वेशीवर दरवाजे बसवले. वेशींवर पहारा करायला माणसे नेमली. मंदिरात गायनाला आणि याजकांना मदत करायला माणसे नेमून दिली. 2 यानंतर माझा भाऊ हनानी याला मी यरुशलेमचा अधिकार सोपवला. हनन्या नावाच्या दुसऱ्या एकाला गिढीचा मुख्याधिकारी म्हणून निवडले. हनानीची निवड मी केली कारण तो अत्यंत प्रामाणिक होता आणि इतरांपेक्षा देवाबद्दल तो अधिक भय बाळगत असे. 3 नंतर हनानी आणि हनन्या यांना मी म्हणालो, “सूर्य चांगला वर येऊन ऊन तापल्यावरच तुम्ही रोज वेशीचे दरवाजे उघडा आणि सूर्यास्तापूर्वीच दरवाजे लावून घ्या. यरुशलेममध्ये राहणाऱ्यांमधून पहारेकऱ्यांची निवड करा. त्यापैकी काही जणांना नगराच्या रक्षणासाठी मोक्याच्या जागी ठेवा. आणि इतरांना आपापल्या घराजवळ पहारा करु द्या.”
बंदिवासातून परतणाऱ्यांची यादी
4 आता नगर चांगले विस्तीर्ण आणि मोकळे होते. पण वस्ती अगदी कमी होती आणि घरे अजून पुन्हा बांधून काढली गेली नव्हती. 5 तेव्हा सर्व लोकांनी एकदा एकत्र जमावे असे देवाने माझ्या मनात आणले. सर्व वंशावळयांची यादी करावी म्हणून मी सर्व महत्वाची माणसे, अधिकारी, सामान्य लोक यांना एकत्र बोलावले. बंदिवासातून जे सगळ्यात आधी परत आले त्यांच्या वंशावळ्यांच्या याद्या मला सापडल्या त्यात मला जे लिहिलेले सापडले ते पुढीलप्रमाणे:
6 बंदिवासातून परत आलेले या प्रांतातले लोक असे. बाबेलचा राजा नबुखदनेस्सर याने या लोकांना बाबेलला कैद करून नेले होते. हे लोक यरुशलेम आणि यहुदा येथे परतले. जो तो आपापल्या गावी गेला. 7 जरुब्बाबेल बरोबर परत आले ते लोक असे: येशूवा, नहेम्या, अजऱ्या, राम्या, नहमानी, मर्दमानी, बिलशान, मिस्पेरेथ बिग्वई, नहूम आणि बाना. इस्राएलचे जे लोक परतले त्यांची नावे आणि संख्या पुढीलप्रमाणे:
8 परोशचे वंशज 2,172
9 शेफठ्याचे वंशज 372
10 आरहचे वंशज 652
11 येशूवा आणि यवाब यांच्या वंशावळीतील पहथमवाबचे वंशज 2,818
12 एलामचे वंशज 1,254
13 जत्तूचे वंशज 845
14 जक्काईचे वंशज 760
15 बिन्नुईचे वंशज 648
16 बेबाईचे वंशज 628
17 आजगादचे वंशज 2,322
18 अदोनीकामचे वंशज 667
19 बिग्वईचे वंशज 2,067
20 आदीनाचे वंशज 655
21 हिज्कीयाच्या कुटुंबातील ओटेरचे वंशज 98
22 हाशुमाचे वंशज 328
23 बेसाईचे वंशज 324
24 हारिफाचे वंशज 112
25 गिबोनाचे वंशज 95
26 बेथलहेम आणि नटोफा या गावांमधली माणसे 188
27 अनाथोथ गावची माणसे 128
28 बेथ-अजमावेथ मधले लोक 42
29 किर्याथ-यारीम, कपीरा व बैरोथ या गावातली 743
30 रामा आणि गेबा इथली 621
31 मिखमास या गावची 122
32 बेथल आणि आय इथली 123
33 नबो या दुसऱ्या एका गावची 52
34 एलाम या दुसऱ्या गावची 1,254
35 हारिम या गावचे लोक 320
36 यरीहो या गावचे लोक 345
37 लोद, हादीद व ओनो या गावाचे 721
38 सनावाचे 3,930
39 याजक पुढीलप्रमाणे:
येशूवाच्या घराण्यातली यदाया याचे वंशज 973
40 इम्मेराचे वंशज 1,052
41 पशहूराचे वंशज 1,247
42 हारिमाचे वंशज 1,017
43 लेवीच्या घराण्यातील माणसे पुढील प्रमाणे:
होदयाच्या कुळातली कदमीएलच्या घराण्यातील येशूवाचे वंशज 74
44 गाणारे असे:
आसाफाचे वंशज 148
45 द्वारपाल पुढील प्रमाणे:
शल्लूम, आटेर, तल्मोन, अक्कूब, हतीता, शोबा यांचे वंशज 138
46 हे मंदिराचे विशेष सेवेकरी:
सीहा, हशूफा, तबायोथ, यांचे वंशज
47 केरोस, सीया, पादोन
48 लेबोना, हगाबा, सल्माई
49 हानान, गिद्देल, गहार
50 राया, रसीन, नकोदा
51 गज्जाम, उज्जा. पासेहा
52 बेसई, मऊनीम, नफूशेसीम
53 बकबूक, हकूफ, हईराचे
54 बसलीथ, महीद, हर्शा
55 बकर्स, सीसरा, तामहा
56 नसीहा आणि हतीफा
57 शलमोनच्या सेवकांचे वंशज:
सोताई, सोफेरेथ, परीदा
58 याला, दर्कोन, गिद्देल
59 शफाठ्या, हत्तील, पोखेरेथ-हस्सबाईम आणि आमोन.
60 मंदिराचे सेवेकरी आणि शलमोनच्या सेवकांचे वंशज मिळून 392
61 तेल मेलह, तेल-हर्षा, करुब, अद्दोन व इम्मेर या गावांमधून काही लोक यरुशलेमला आले होते पण आपली घराणी मूळ इस्राएलींमधलीच आहेत हे त्यांना खात्रीलायक सांगता येत नव्हते. ते लोक असे:
62 दलाया, तोबीया आणि नकोदा यांचे वंशज 642
63 आणि याजकांच्या घराण्यातील वंशज असे:
हबाया, हक्कोस, बर्जिल्लय (गिलादच्या बर्जिल्लयच्या मुलीशी लग्न करणाऱ्याची गणना बर्जिल्लयच्या वंशजात होई)
64 काही असे होते की त्यांना आपल्या वंशावळीचा इतिहास शोधूनही सापडला नाही. याजक म्हणून काम करता यावे यासाठी आपण याजकांचेच पूर्वज आहोत हे काही त्यांना सिध्द करता आले नाही. त्यामुळे त्यांना याजक म्हणून सेवा करता आली नाही. त्यांची नावे याजकांच्या यादीमध्ये समाविष्ट झाली नाहीत. 65 अत्यंत पवित्र अन्न या लोकांनी खाऊ नये अशी राज्यपालाने त्यांना आज्ञा दिली. ऊरीम व थुम्मीम घातलेल्या मुख्य याजकाने या बाबतीत देवाची अनुज्ञा घेईपर्यंत त्यांनी या अन्नातले काही खायचे नव्हते.
66-67 परत आलेल्या जथ्थ्या मध्ये सगळे मिळून एकंदर 42,360 लोक होते. यात 7,337 स्त्री-पुरुष सेवकांची गणना केलेली नाही. शिवाय त्यांच्यामध्ये 245 गायकगायिका होत्या. 68-69 त्यांच्याजवळ 736 घोडे, 245 खेचरे, 435 उंट आणि 6,720 गाढवे होती.
70 घराण्यांच्या काही प्रमुखांनी कामाला हातभार म्हणून पैसे दिले. राज्यपालने एकोणिस पौंड सोने भांडाराला दिले. शिवाय पन्नास वाडगे आणि याजकांसाठी 530 वस्त्रे दिली. 71 घराण्याच्या प्रमुखांनी कामाला साहाय्य म्हणून भांडाराला 375 पौंड सोने दिले. याखेरीज 1 1/3 टन चांदी देखील दिली. 72 इतर सर्व लोकांनी मिळून 375 पौंड सोने, 1 1/3 टन चांदी आणि याजकांसाठी 67 वस्त्रे दिली.
73 अशाप्रकारे याजक, लेवींच्या घराण्यातील लोक, द्वारपाल, गायक आणि मंदिरातील सेवेकरी आपापल्या गावी स्थिरावले. इतर इस्राएल लोकही आपापल्या गावी स्थायिक झाले. आणि सातव्या महिन्यापर्यंत सर्व इस्राएल लोक स्वतःच्या गावांमध्ये स्थिरस्थावर झाले.
थेस्सलनीका येथे पौल
17 पौल व सीला अंफिपुली व अपुल्लोनिया या प्रदेशांतून प्रवास करीत गेले. ते थेस्सलनीका शहरात आले. त्या शहरात यहूदी लोकांचे सभास्थान होते. 2 यहूदी लोकांना भेटण्यासाठी पौल सभास्थानात गेला. तो असे नेहमीच करीत असे. तीन आठवडे प्रत्येक शब्बाथवारी पवित्र शास्त्राविषयी पौलाने यहूदी लोकांशी चर्चा केली. 3 पौलाने पवित्र शास्त्रातील वचने यहूदी लोकांना स्पष्ट करुन सांगितली. त्याने दाखवून दिले की, रिव्रस्ताने मरणे अगत्याचे होते. तसेच त्याचे मरणातून उठणेही अगत्याचे होते. पौल म्हणाला, “हा मनुष्य ‘येशू’ ज्याच्याबद्दल मी तुम्हांला सांगत आहे तो ‘ख्रिस्त’ आहे.” 4 सभास्थानांमध्ये काही ग्रीक लोक होते, जे खऱ्या देवाची उपसाना करीत. तेथे काही महत्वाच्या स्त्रियाही होत्या. यातील पुष्कळ लोक पौल व सीला यांना जाऊन मिळाले.
5 पण ज्या यहूदी लोकांनी विश्वास ठेवला नव्हता, ते जळफळू लागले. शहरातून काही दुष्ट माणसांना त्यांनी भाड्याने आणले. त्या दुष्ट माणसांनी आणखी लोकांना जमा केले व शहरात अशांतता निर्माण केली. लोक यासोनाच्या घरी गेले. पौल व सीला यांचा शोध घेत ते गेले. त्या लोकांची अशी इच्छा होती की, पौल व सीला यांना लोकांसमोर आणायचे. 6 पण त्यांना पौल व सीला सापडले नाहीत. म्हणून लोकांनी यासोनाला व आणखी काही दुसऱ्या विश्वासणाऱ्यांना नगराच्या अधिकाऱ्यांपुढे ओढीत नेले. ते मोठ्याने ओरडून म्हणाल, “या लोकांनी जगात सगळीकडे उलथापालथ केली. आणि आता ते येथेसुद्धा आले आहेत! 7 यासोनाने त्यांना आपल्या घरी ठेवले. कैसराच्या [a] नियमांविरुद्ध हे लोक करतात. ते म्हणत की, आणखी एक राजा आहे. त्याचे नाव येशू आहे.”
8 शहराच्या अधिकाऱ्यांनी व इतर लोकांनी हे ऐकले. ते खूपच अस्वस्थ झाले. 9 त्यांनी यासोनला व इतर विश्वासणाऱ्यांना दंड भरण्यास सांगितले. मग त्यांनी विश्वासणाऱ्यांना जाऊ दिले.
पौल व सीला बिरुया येथे जातात
10 त्याच रात्री विश्वासणाऱ्यांनी पौल व सीला यांना बिरुया नावाच्या दुसऱ्या शहरी पाठविले. बिरुयामध्ये पौल व सीला यहूदी सभास्थानामध्ये गेले. 11 हे यहूदी लोक थेस्सलनीका येथील यहूदी लोकांपेक्षा बरे होते. पौल व सीला यांनी गोष्टी सांगितल्या. त्या गोष्टी त्यांनी आनंदाने ऐकल्या. बिरुया येथील हे यहूदी लोक पवित्र शास्त्राचा दररोज अभ्यास करीत. या गोष्टी खऱ्याच घडल्या आहेत की काय याविषयी जाणून घेण्यास ते उत्सुक होते. 12 यातील पुष्कळ यहूदी लोकांनी विश्वास ठेवला. पुष्कळशा ग्रीक पुरुषांनी व स्त्रियांनी (ज्यांना समाजात महत्व होते.) त्यांनीसुद्धा विश्वास ठेवला.
13 परंतु जेव्हा थेस्सलनीका येथील यहूदी लोकांना समजले की पौल बिरुया येथेही देवाचे वचन सांगत आहे, ते बिरुया येथे सुद्धा आले. थेस्सलनीका येथील यहूदी लोकांनी बिरुया येथील लोकांना हैराण केले व त्रास दिला. 14 म्हणून विश्वासणाऱ्यांनी पौलाला ताबडतोब सुमुद्राकडे नेले. पण सीला व तीमथ्य तेथेच राहिले. 15 विश्वासणारे जे पौलाबरोबर गेले होते त्यांनी त्याला अथेनै शहरात आणले. या बांधवांनी पौलचा संदेश जो सीला व तीमथ्यासाठी होता, तो घेऊन ते परत आले. संदेशात असे म्हटले होते. ʇतुम्हांला शक्य होईल तितक्या लवकर माइयाकडे या.
अथेनै येथे पौल
16 पौल अथेनै येथे सीला व तीमथ्य यांची वाट पाहत होता. पौलाचे मन अस्वस्थ झाले. कारण त्याने पाहिले की, ते शहर मूर्तीनी भरलेले आहे. 17 सभास्थानामध्ये पौल जे खऱ्या देवाची उपासना करीत अशा यहूदी व ग्रीक लोकांशी बोलला. शहराच्या व्यापार क्षेत्रातील काही लोकांशीही पौल बोलला. पौल दररोज लोकांशी बोलत असे. 18 काही एपिकूरपंथी व स्तोयिक पंथीय तत्वज्ञानी मंडळीने त्याच्याशी वाद घातला.
त्यांच्यातील काही म्हणाले, “या माणसाला तो काय बोलत आहे, ते त्याचे त्यालाच कळत नाही. तो काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे?” पौल त्यांना येशूच्या मरणातून पुन्हा उठण्याची सुवार्ता सांगत होता. ते म्हणाले, “असे वाटते की तो आपल्याला दुसऱ्या कोणत्या तरी देवाबद्दल सांगत आहे.”
19 त्यांनी पौलाला धरले व अरीयपगाच्या [b] सभेपुढे नेले ते म्हणाले, “तुम्ही आम्हांला जी नवी कल्पना शिकवीत आहात ती कृपा करुन स्पष्ट करुन सांगा. 20 तुम्ही ज्या गोष्टी सांगत आहात त्या आमच्यासाठी नवीन आहेत. यापूर्वी आम्ही हे कधीही ऐकले नाही. या शिकवणीचा अर्थ काय हे आम्हांला जाणून घ्यायचे आहे.” 21 (अथेनै येथे राहणारे तसेच त्यांच्यात राहणारे विदेशी लोक नेहमी नव्या कल्पनांविषयी बोलण्यात वेळ घालवित असत).
22 मग पौल अरीयपगाच्या सभेपुढे उभा राहिला, पौल म्हणाला, “अर्थनैच्या लोकांनो, मी पाहत आहे की, सर्व गोष्टींमध्ये तुम्ही फार धर्मिक आहात. 23 मी तुमच्या शहरातून जात होतो आणि ज्यांची तुम्ही उपासना करता ते मी पाहिले. मी एक वेदी पाहिली. त्यावर असे लिहिले होते: ‘अज्ञात देवाला’. तुम्ही अशा देवाची उपासना करता जो तुम्हांला माहीत नाही. याच देवाविषयी मी तुम्हांला सांगत आहे!
24 “ज्याने हे सर्व जग व त्यातील सर्व काही निर्माण केले तोच हा देव आहे. तो जमीन व आकाश यांचा प्रभु आहे. मनुष्यांनी बांधलेल्या मंदिरात तो राहत नाही! 25 हा देव जीवन देतो, श्वास देतो व सगळे काही देतो. त्याला जे पाहिजे ते सगळे त्याच्याकडे आहे. 26 देवाने एका माणसाला (आदाम) निर्माण करुन सुरुवात केली. त्याच्यापासून त्याने वेगवेगळे लोक निर्माण केले. देवाने त्यांना सगळीकडे राहण्यास मुभा दिली. देवाने त्यांना काळ व सीमा ठरवून दिल्या.
27 “त्यांनी देवाचा शोध करावा अशी त्याची इच्छा होती. कदाचित तो त्यांचा शोध करील व त्यांना तो सापडेल. पण तो आमच्या कोणापासूनही दूर नाही. 28 आम्ही त्याच्यासह राहतो आम्ही त्याच्यासह चालतो आम्ही त्याच्यासह आहोत. तुमच्यातीलच काही लोकांनी असे लिहिले आहे: ‘आम्ही त्याची मुले आहोत’
29 “आपण देवाची मुले आहोत. म्हणून इतर लोक ज्या प्रकारे समजतात त्या प्रकारचा देव आहे असे आपण मुळीच समजू नये. तो सोने, चांदी, किंवा दगडासारखा नाही. 30 भूतकाळात लोक देवाला समजू शकले नाहीत पण देवाने त्याकडे दुर्लक्ष केले. पण आता, जगातील प्रत्येक व्यक्तीला देव सांगतो की, त्याने आपले ह्रदय व जीवन बदलावे. 31 देवाने एक दिवस ठरविलेला आहे, ज्या दिवशी तो जगातील प्रत्येक व्यक्तीचा न्याय करील. तो नि:पक्षपाती असेल, हे करण्यासाठी तो एका माणासाचा (येशूचा) वापर करील. देवाने त्याला फार पूर्वीच निवडले आहे. व प्रत्येक माणसाला देवाने हे दाखवून दिले आहे; त्या माणसाला मरणातून पुन्हा उठवून दाखवून दिले आहे!”
32 जेव्हा लोकांनी ऐकले की, येशूला मरणातून पुन्हा उठविण्यात आले तेव्हा त्यांच्यातील काही जण हसू लागले. लोक म्हणाले, “आम्ही याविषयी नंतर पुन्हा ऐकू!” 33 पौल त्यांच्यापासून निघून गेला. 34 पण काही लोकांनी पौलावर विश्वास ठेवला व ते त्याला जाऊन मिळाले. त्यांच्यापैकी एक दिओनुस्य होता. तो अरीयपगा सभेचा सभासद होता. दामारि नावाच्या स्त्रीनेही विश्वास ठेवला. आणखीही काही लोक होते, ज्यानी विश्वास ठेवला.
2006 by World Bible Translation Center