M’Cheyne Bible Reading Plan
सुंता-कराराची खूण
17 अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याच्याशी बोलला परमेश्वर म्हणाला, “मी सर्वशक्तिमान देव आहे; माझ्यासाठी पुढील प्रमाणे गोष्टी कर: माझ्या आज्ञा पाळ, आणि योग्य मार्गाने चाल व सात्विकतेने राहा. 2 तू असे करशील तर मी आपणामध्ये एक करार करीन; मी तुला अगणित पटीत वाढवीन असे अभिवचन देतो.”
3 मग अब्रामाने देवाला लवून नमन केले; देव त्याला म्हणाला, 4 “आपल्या करारातील माझा भाग हा असा; मी तुला अनेक राष्ट्रांचा महान पिता करीन; 5 मी तुझे नाव बदलतो; तुझे नाव अब्राम असणार नाहीं तर तुझे नाव अब्राहाम होईल; मी तुला हे नाव देत आहे कारण तू अनेक राष्ट्रांचा पिता होशील. 6 मी तुला भरपूर संतती देईन; तुझ्यापासून नवीन राष्ट्रे उदयास येतील, आणि राजे उत्पन्न होतील. 7 आणि मी तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये एक करार करतो. हा करार तुझ्या वंशजानांही पिढ्यानपिढ्या कायम लागू राहिल; मी तुझा व तुझ्या वंशजांचा देव होईन. 8 ज्या प्रदेशामधून तू जात आहेस तो म्हणजे कनान देश मी तुला व तुझ्या वंशजाला कायमचा देईन आणि मी तुमचा देव होईन.”
9 आणि देव अब्राहामाला पुढे म्हणाला, “आता ह्या करारतील तुझा भाग हा असा: तू व तुझ्या वंशजांनी पाळावयाचा माझा करार हा 10 की तुझ्या वंशजात जन्मलेल्या प्रत्येक पुरुषांची सुंता करुन घ्यावी. 11 तू हा करार पाळीत असल्याची खूण म्हणून आपली सुंता करुन घ्यावीस. 12 जन्मलेला लहान मुलगा आठ वर्षांचा होईल तेव्हा तू त्याची सुंता करावी; तुझ्या कुटुंबात जन्मलेल्या तसेच दुझ्या दासाच्या किंवा गुलामांच्या कुटुंबात जन्मलेल्या हरएक पुरुषाची सुंता करावी; 13 अशा रीतीने तुझ्या राष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक पुरुषांची सुंता करावी, मग तो तुझ्या कुटुंबातील असो किंवा विकत घेतलेल्या गुलामाच्या कुटुंबात जन्मलेला असो; तुझ्या व माझ्यामध्ये केलेला करार या खुणेवरुन कायम राहील; 14 ज्या कोणाची सुंता झाली नाही त्याला समाजातून बाहेर टाकावे; कारण त्याने माझा करार मोडला आहे.”
इसहाक-वचनाचा पुत्र
15 देव अब्राहामाला म्हणाला, “तुझी बायको साराय हिला मी नवीन नाव देतो, तिचे नाव सारा असे होईल. 16 मी तिला आशीर्वादीत करीन; मी तिला मुलगा देईन आणि तू बाप होशील. सारा अनेक राष्ट्रांची माता होईल राष्ट्रांचे राजे तिच्या पासून निपजतील.”
17 अब्राहामाने देवाला लवून नमन केले, परंतु स्वतःशीच हसून तो म्हणाला, “मी शंभर वर्षांचा आहे; मला मुलगा होणे शक्य नाहीं; आणि सारा नव्वद वर्षांची आहे; तिला मूल होऊ शकणार नाहीं.”
18 मग अब्राहाम देवाला म्हणाला, “इश्माएल जगेल व तुझी सेवा करील अशी मला आशा वाटते.”
19 देव म्हणाला, “नाही, मी सांगितले की तुझी बायको सारा हिला मुलगा होईल; त्याचे नाव तू इसहाक ठेव; मी त्याच्याशी करार करीन; तो करार त्याच्या वंशजांसाठी चिरंतर असेल.
20 “तू मला इश्माएल विषयी विचारलेस ते मी ऐकले; मी त्याला आशीर्वाद देईन; त्याला भरपूर संतती होईल; बारा महान सरदारांचा तो पिता होईल; त्याचे कुटुंब म्हणजे एक मोठे राष्ट्र होईल; 21 पण मी इसहाका बरोबर माझा करार करीन, साराला मुलगा होईल तो इसहाक असेल; तो मुलगा पुढल्या वर्षी याचवेळी जन्मेल.”
22 देवाचे अब्राहामाशी बोलणे संपल्यावर देव अब्राहामाला सोडून वर (स्वर्गात) गेला, व अब्राहाम तेथे एकटाच राहीला; 23 तेव्हा अब्राहामाने आपला मुलगा इश्माएल व आपल्या घरी जन्मलेल्या गुलामांना व मोल देऊन विकत घेतलेल्या मुलानां एकत्र केले, आणि देवाने सांगितल्याप्रमाणेच त्याच्या घरातले सर्वपुरुष व मुलगे यांची त्याच दिवशी सुंता करण्यात आली.
24 अब्राहाम नव्याण्णव वर्षांचा होता तेव्हा त्याची सुंता झाली; 25 आणि त्याचा मुलगा इश्माएल तेरा वर्षांचा होता तेव्हा त्याची सुंता झाली. 26 सगळ्या गुलामांची एकाच दिवशी सुंता झाली; 27 आणि त्याच्या घरी जन्मलेले व त्याने विकत घेतलेले असे त्याच्या घरचे सगळे पुरुष यांचीही त्याच्या बरोबर सुंता झाली.
यहुदी पुढारी येशूची परीक्षा पाहतात(A)
16 परूशी आणि सदूकी येशूकडे आले, त्यांना येशूची परीक्षा पाहायची होती. आम्हांला आकाशातून चिन्ह दाखवा अशी मागणी त्यांनी केली.
2 त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही संध्याकाळ झाली असता म्हणता आजचे हवामान चांगले असेल कारण आभाळ तांबूस आहे, 3 आणि तुम्ही सकाळी म्हणता, आज वादळ होईल कारण आभाळ तांबूस व गडद आहे. तुम्हांला आभाळाचे स्वरूप ओळखता येते, पण काळाची लक्षणे ओळखता येत नाहीत? 4 दुष्ट व व्यभिचारी पिढी चिन्ह शोधते, पण तिला योना संदेष्ट्यशिवाय दुसरे चिन्ह दिले जाणार नाही.” मग तो त्यांना सोडून गेला.
येशू यहुदी पुढाऱ्यांविषयी सावध करतो(B)
5 येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे गेले तेव्हा भाकरी घ्यायला विसरले. 6 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “परूशी व सदूकी यांच्या खमिराविषयी सावध असा.”
7 तेव्हा ते आपापसात विचार करून म्हणाले, “आपण भाकरी घेतल्या नाहीत म्हणून ते असे म्हणत आहे.”
8 पण येशून हे ओळखून म्हटले, “अहो अल्पविश्वासू, आपण भाकरी घेतल्या नाहीत असा विचार तुम्ही आपापसामध्ये का करता? 9 तुम्हांला अजून आठवत नाही काय? पाच भाकरींनी पाच हजार लोकांना जेवू घातले ते, आणि त्यानंतर तुम्ही किती टोपल्या उचलून घेतल्या ते तुम्हांला आठवत नाही काय? 10 तसेच चार हजारांच्या जेवणाला सात भाकरी, आणि तुम्ही किती टोपल्या उचलून घेतल्या हे तुम्हांला आठवत नाही काय? 11 मी भाकरी विषयी तुम्हांला बोललो नाही, तर परूशी व सदूकी यांच्या खमिराविषयी सावध राहा, असे म्हणालो, हे तुम्हांला कसे समजत नाही?”
12 तेव्हा त्यांना समजले की, त्याने त्यांना भाकरीच्या खमिराविषयी सावध राहण्यास सांगितले नव्हते तर परूशी आणि सदूकी यांच्या शिकवणुकीविषयी सावधान राहायला सांगितले होते.
पेत्र म्हणतो की येशू हा ख्रिस्त आहे(C)
13 येशू फिलिप्पाच्या कैसरिया या भागाकडे गेला. तो त्याच्या शिष्यांना म्हणाला, “मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात?”
14 आणि ते म्हणाले, “काही बाप्तिस्मा करणारा योहान, तर कित्येक एलीया तर दुसरे काही यिर्मया किंवा संदेष्ट्यापैकी एक असे म्हणतात.”
15 मग येशू त्यांना म्हणाला, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?”
16 शिमोनाने उत्तर दिले, “तू ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र आहेस.”
17 येशू म्हणाला, “शिमोन, योनाच्या पुत्रा, तू धन्य आहेस कारण रक्त व मांस यांनी तुला हे प्रगट केले नाही, तर माझा पिता जो स्वर्गात आहे त्याने तुला हे प्रगट केले. 18 आणखी मी तुला असे सांगतो की, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन. आणि मृत्युलोकाचा यावर अधिकार चालणार नाही. 19 मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधून ठेवशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. 20 तेव्हा त्यानी शिष्यांस निक्षून सांगितले की, मी ख्रिस्त आहे ते तुम्ही कोणालाही सांगू नका.”
येशू म्हणतो की त्याने मेलेच पाहिजे(D)
21 तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यास दाखवू लागला की, आपण यरूशलेमला जावे आणि वडील यहुदी नेते व मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्याकडून पुष्कळ दु:खे सोसावी व जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठविले जावे याचे अगत्य आहे.
22 तेव्हा पेत्राने त्याला जवळ घेऊन निषेध करून म्हटले, “प्रभु, या गोष्टीपासून देव तुझी सुटका करो. या गोष्टी तुझ्या बाबतीत कधीही घडणार नाहीत!”
23 परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यामागे हो, तू मला अडखळण आहेस. कारण तू देवाच्या गोष्टींकडे लक्ष लावीत नाहीस तर मनुष्यांच्या गोष्टींकडे लक्ष लावतोस.”
24 तेव्हा येशूने आपल्या शिष्यांस म्हटले, “जर कोणी माझ्या मागे येऊ इच्छित असेल तर त्याने स्वतःला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे. 25 कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्याला गमावील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावील तो त्याला मिळवील. 26 जर मनुष्याने सर्व जग मिळविले आणि अनंतकालिक जीवन गमावले तर त्याला काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जिवाचा काय मोबदला देईल? 27 कारण मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या वैभवात आपल्या दूतांसहित येणार आहे. आणि तेव्हा तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे मोबदला देईल. 28 मी तुम्हांला खरे सांगतो की, येथे उभे राहाणाऱ्यातले काही जण असे आहेत की, ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”
आणखी समस्या
6 पुढे, आम्ही भिंत बांधल्याचे सनबल्लट, तोबीया, गेशेम हा अरब आणि आमचे इतर शत्रू यांनी ऐकले. भिंतीतली भगदाडे आम्ही बुजवली पण वेशीचे दरवाजे अजून बसवले गेले नव्हते. 2 तेव्हा सनबल्लट आणि गेशेम यांनी मला असा निरोप पाठवला: “नहेम्या, ये. आपण एकमेकांना भेटू. ओनोंच्या मैदानावर केफिरिम या गावात आपण एकत्र जमू.” पण त्यांचा हेतू मला इजा करण्याचा होता.
3 तेव्हा मी माझ्या निरोप्यांमार्फत पुढीलप्रमाणे निरोप पाठवला: “एका महत्वाच्या कामात असल्यामुळे मी खाली येऊ शकत नाही. तुम्हाला भेटायला आल्यामुळे काम थांबावे असे मला वाटत नाही.”
4 सनबल्लट आणि गेशेम यांनी हाच निरोप माझ्याकडे चार वेळा पाठवला. आणि मी ही त्यांना प्रत्येक वेळी हेच उत्तर पाठवले. 5 मग, पाचव्या वेळी सनबल्लटने आपल्या मदतनीसा करवी हाच निरोप मला दिला. यावेळी त्याच्याकडे उघडे पत्र होते. 6 पत्रातला मजकूर असा होता.
“येथे एक अफवा पसरली आहे. लोक सर्वत्र तेच बोलत आहेत. खेरीज, गेशेमच्या म्हणण्याप्रमाणे त्यात तथ्य आहे. तू आणि यहुदी मिळून राजाविरुध्द बंड करायच्या बेतात आहात असे लोक म्हणतात. म्हणूनच तुम्ही यरुशलेमच्या तटबंदीचे बांधकाम करत आहात. तू यहुदी लोकांचा नवा राजा होणार असेही लोक म्हणतात. 7 ‘यहुदात राजा आहे’ असे स्वतःबद्दल घोषित करायला तू यरुशलेममध्ये संदेष्टे नेमले आहेस अशीही एक अफवा आहे.
“नहेम्या, राजा अर्तहशश्तच्या हे सगळे कानावर जाईल हे मी तुला बजावून ठेवतो. तेव्हा, ये आपण एकदा भेटून त्याबद्दल बोलू.”
8 तेव्हा मी सनबल्लटला उलट उत्तर पाठवले की, “तू म्हणतोस तसे काही चाललेले नाही. या केवळ तुझ्याच मनातल्या कल्पना आहेत.”
9 आमचे शत्रू आम्हाला भीती दाखवायचा प्रयत्न करत होते. ते मनात म्हणत होते, “यहुदी घाबरतील आणि काम चालू ठेवण्याची उमेद त्यांच्यात राहणार नाही. मग भिंतीचे काम पुरे होणार नाही.”
मग मी प्रार्थना केली, “देवा, मला बळ दे.”
10 मी एकदा दलायाचा मुलगा शमाया याच्या घरी गेलो. दलाया हा महेतबेलचा मुलगा. शमायाला आपल्या घरीच थांबून राहावे लागले होते. तो म्हणाला,
“नहेम्या, आपण देवाच्या मंदिरात भेटू. आत पवित्र जागेत जाऊन आपण दरवाजे बंद करु, कारण लोक तुला मारायला येत आहेत. ते आज रात्रीच तुला मारायला येतील.”
11 पण मी शमायाला म्हणालो, “माझ्यासारख्याने पळून जावे? जीव बचावण्यासाठी माझ्यासारख्या माणसाने मंदिरात जाऊन बसू नये. मी जाणार नाही.”
12 शमायाला देवाने पाठवले नव्हते हे मला माहीत होते. त्याने माझ्याविरुध्द भाकीत केले कारण तोबीया आणि सनबल्लटने त्याला त्याबद्दल पैसे चारले होते, हे मी जाणून होतो. 13 मला हैराण करून घाबरवावे यासाठी शमायाला पैसे दिले जात होते. घाबरुन जाऊन लपून बसण्यासाठी मंदिरात जाण्याचे पाप माझ्या हातून व्हावे अशी त्यांची इच्छा होती. तसे झाले असते तर माझी अप्रतिष्ठा करायला आणि माझी अपकीर्ती करायला माझ्या शत्रूंना ते एक कारण मिळाले असते.
14 देवा, कृपा करून तोबीया आणि सनबल्लट यांची आठवण ठेव. त्यांनी केलेली दुष्कृत्ये आठव. मला भय दाखवणारी नोवद्या ही संदेष्ट्री आणि इतर संदेष्टे यांचे ही स्मरण असू दे.
भिंत बांधून झाली
15 मग अलूल महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी यरुशलेमच्या भिंतीचे काम समाप्त झाले. भिंतीचे काम व्हायला बावन्न दिवस लागले. 16 कोट बांधण्याचे काम पूर्ण झाल्याचे आमच्या सर्व शत्रूंनी ऐकले. ते पूर्ण झाल्याचे आमच्या भोवतींच्या सर्व राष्ट्रांनी पाहिले आणि त्यांचे धैर्य गळून गेले. कारण आमच्या देवाच्या मदतीने हे काम झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
17 शिवाय, तटबंदीचे काम पूर्ण झाल्यांनतरच्या काळात यहुदातील श्रीमंत लोक तोबीयाला सारखी पत्रे पाठवत होती. तोबीया त्यांना उत्तरे देत होता. 18 यहुदातील बऱ्याच लोकांनी त्याच्याशी प्रामाणिक राहायचे त्याला वचन दिले होते म्हणून ते ही पत्रे पाठवत होते. कारण, आरहाचा मुलगा शखन्या याचा तोबीया जावई होता. आणि तोबीयाचा मुलगा योहानान याचे मशुल्लामच्या मुलीशी लग्न झाले होते. मशुल्लाम हा बरेख्याचा मुलगा. 19 आणि पूर्वी या लोकांनी तोबीयाला एक खास वचन दिले होते. त्यामुळे तोबीया किती चांगला आहे हे ही माणसे मला सारखी सांगत. आणि मी काय करत असे ते तोबीयाला सांगत राहात. मला भयभीत करण्यासाठी मग तोबीया मला पत्रे पाठवी.
तीमथ्य पौल व सीला यांच्यासह जातो
16 पौल दर्बे व लुस्त्र या शहरांमध्ये गेला. तेथे रिव्रस्ताचा एक शिष्य ज्याचे नाव तीमथ्य, तो होता. तीमथ्याची आई एक यहूदी विश्वासणारी स्त्री होती. त्याचा पिता एक ग्रीक मनुष्य होता. 2 तीमथ्याविषयी लुस्त्र व इकुन्या येथील बंधुजनांचे फार चांगले मत होते. 3 तीमथ्याला आपल्याबरोबर प्रवासाला घेऊन जावे अशी पौताची इच्छा होती. पण त्या भागात राहणाऱ्या यहूदी लोकांना माहीत होते की, तीमथ्याचे वडील ग्रीक (यहूदीतर) आहेत. म्हणून पौलाने यहूदी लोकांचे समाधान होण्यांसाठी तीमथ्याची सुंता केली.
4 मग पौल व त्याच्याबरोबर असलेले लोक इतर शहरांमधून प्रवास करीत निघाले. यरुशलेममधील प्रेषितांनी व वडीलजनांनी दिलेले नियम व त्यावरचे निर्णय ते विश्वासणाऱ्यांना देत गेले. त्यांनी विश्वासणाऱ्यांना त्या नियमांचे पालन करण्यास सांगितले. 5 मग मंडळ्या विश्वासात भक्कम होत गेल्या व संख्येतदेखील त्या वाढत गेल्या.
पौलाला आशियातून बोलावतात
6 पौल व त्याच्याबरोबर असलेले बंधू फ्रुगिया व गलतीया या प्रदेशातून गेले. आशिया देशात पवित्र आत्म्याने त्यांना सुवार्ता सांगण्यास मना केले. 7 पौल व तीमथ्य मिसिया देशाच्या जवळ गेले. त्यांना बिथनीया प्रांतात जायचे होते. पण येशूच्या आत्म्याने त्यांना आत जाऊ दिले नाही. 8 म्हणून ते मिसियाजवळून जाऊन त्रोवस येथे गेले.
9 त्या रात्री पौलाने एक दृष्टान्त पाहिला, या दृष्टान्तामध्ये “मसेदोनियाला या आणि आम्हांला मदत करा!” अशी विनंति मासेदिनियातील कोणीतरी मनुष्य उभा राहून पौलाला करीत होता. 10 पौलाला हा दृष्टान्त झाल्यावर आम्ही तेथे जाऊन तेथील लोकांना सुवार्ता सांगावी यासाठी देवाने आम्हांला बोलाविले. हे आम्ही समजलो. आणि लगेच मासेदोनियाला जाण्याच्या तयारीला लागलो.
लीदीयाच्या मनाचा पालट
11 नंतर आम्ही जहाजाने त्रोवस सोडले आणि आम्ही समथ्राकेस येथे समुद्रमार्गे आलो. दुसऱ्या दिवशी नियापोलीस येथे गेलो. 12 नंतर आम्ही फिलिप्पैला गेलो. ते त्या भागातील मासेदोनियातील पहिले नगर आहे. ते रोमी लोकांचे नगर आहे. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो.
13 शब्बाथवारी आम्ही त्या नगराच्या वेशीच्या बाहेर प्रार्थना करण्यासाठी नदीकाठी सुरक्षित जागा आढळेल असे वाटल्यावरुन तेथे जाऊन बसलो, आणि तेथे जमा झालेल्या स्त्रियांशी बोलू लागलो. 14 त्यांच्यामध्ये लुदिया नावाची स्त्री होती. ती थुवतीरा नगरची होती, ती किरमीजी रंगाच्या कापडाचा व्यापार करीत असे, ती चांगली देवभक्त होती. लीदीयाने पौलाचे बोलणे ऐकले. देवाने तिचे अंतःकरण उघडले. पौलाने जे सांगितले त्यावर तिने विश्वास ठेवला. 15 तिचा व तिच्या घरामध्ये राहणाऱ्या सर्वांचा बाप्तिस्मा करण्यात आला. मग लुदियाच्या आम्हांला तिच्या घरी बोलाविले, ती म्हणाली, तुम्हाला जर खरोखरच वाटत असेल की मी प्रभु येशूमध्ये विश्वासणारी आहे, तर माझ्या घरी येऊन राहा. तिने आम्हांला तिच्या घरी राहावे म्हणून गळ घातली.
पौल व सीला तुरुंगात
16 एकदा आम्ही प्रार्थनेला जात असताना. एक दासीकाम करणारी मुलगी आम्हांना भेटली, तिच्या अंगात येत असे [a] ती दैवप्रश्ना सांगून आपल्या घरधन्यास पुष्कळ मिळकत करुन देत असे. 17 ती मुलगी पौलाच्या व आमच्या मागे आली. ती मोठ्याने म्हणाली, “हे लोक सर्वेच्च देवाचे सेवक आहेत! ते तुम्हांला सांगत आहेत की, तुमचे तारण कसे होईल!” 18 तिने हे असे बरेच दिवस केले. त्यामुळे पौल विचलित झाला. मग तो वळला व त्या आत्म्याला म्हणाला, “येशू रिव्रस्ताच्या सामर्थ्याने, मी तुला आज्ञा देतो, तिच्यातून बाहेर निघ!” ताबडतोब तो आत्मा बाहेर आला.
19 ज्या लोकांची ही मुलगी नोकरी करीत असे त्यांनी हे पाहिले. त्यांनी हे ओळखले की, आता ते त्या मुलीचा वापर पैसे कमविण्यासाठी करु शकणार नाहीत. म्हणून त्यांनी पौल व सीला यांना धरुन शहरातील सभेच्या ठिकाणी ओढून नेले. शहराचे अधिकारीही तेथे होते. 20 त्या लोकांनी पौल व सीला यांना पुढाऱ्यांपुढे आणले, व ते म्हणाले, “हे लोक यहूदी आहेत. आपल्या शहरात ते त्रास देत आहेत. 21 आमच्यासाठी च्या गोष्टी योग्य नाहीत त्या करण्यासाठी ते लोकांना सांगत आहेत. आम्ही रोमी नागरिक आहोत व या गोष्टी आम्ही करणार नाही.”
22 लोक पौल व सीला यांच्याविरुद्ध होते. मग पुढाऱ्यांनी पौलाचे व सीलाचे कपडे फाडले व लोकांना सांगितले की, त्यांना काठीने मारा. 23 लोकांनी पौलाला व सीला यांना पुष्कळ मारले. मग पुढाऱ्यांनी त्या दोघांना तुंरुंगात टाकले, पुढाऱ्यांनी तुंरुंगाधिकाऱ्याला सांगितले, “फार काळजीपूर्वक यांच्यावर पहारा ठेवा!” 24 अधिकाऱ्याने तो खास आदेश मिळाल्यावर पौल व सीला यांना तुरुंगात आत दूरवर ठेवले. त्याने त्यांचे पाय लाकडाच्या ओंडक्यांमध्ये बांधले.
25 मध्यरात्रीच्या वेळी पौल व सीला, देवाची गीते गात होते व प्रार्थना करीत होते व इतर कैदी ऐकत होते. 26 अचानक मोठा धरणीकंप झाला. तो इतका जबरदस्त होता की त्यामुळे तुरुगाचे पाये डळमळले. मग तुरुंगाचे सर्व दरवाजे उघडले. सर्व कैद्यांची त्यांच्या साखळदंडातून सुटका झाली. 27 तुरुंगाधिकारी जागा झाला. त्याने पाहिले की, तुरुंगाचे दरवाजे उघडे आहेत. त्याला वाटले कैदी अगोदरच पळाले असतील म्हणून अधिकाऱ्याने आपली तरवार काढली, तो स्वतःला मारणार होता 28 इतक्यात पौल ओरडला, “स्वतःला इजा करुन घेऊ नकोस आम्ही सर्व येथेच आहोत!”
29 अधिकाऱ्याने कोणाला तरी दिवा आणायला सांगितले. मग तो आतमध्ये पळाला. तो थरथर कापत होता. तो पौल व सीला यांच्यापुढे पडला. 30 मग त्यांने त्यांना बाहेर आणले आणि म्हणाला, “पुरुषांनो, माझे तारण व्हावे म्हणून मी काय करावे?”
31 ते त्याला म्हणाले, “प्रभु येशूवर विश्वास ठेव आणि तुझे तारण होईल-तुझे व तुझ्या घरात राहणाऱ्या सर्वांचे तारण होईल.” 32 पौलाने व सीलाने तुरुंगाधिकाऱ्याच्या घरातील सर्वांना व त्यालासुद्धा प्रभूचा संदेश सांगितला. 33 त्या वेळी बरीच रात्र झाली होती, पण तुरुंगाधिकाऱ्यांने पौल व सीला यांच्या जखमा धुतल्या. मग अधिकारी व त्याच्या घरातील सर्वांना बाप्तिस्मा झाला. 34 नंतर त्याने पौल व सीला यांना घरी नेले व अन्न खावयास दिले. सर्व लोक अतिशय आनंदित झाले होते. कारण ते आता देवावर विश्वास ठेवीत होते.
35 दुसऱ्या दिवशी सकाळी पुढाऱ्यांनी काही शिपायांना पाठविले व तुरुंगाधिकाऱ्याला निरोप दिला की, “त्या लोकांना (पौल व सीला) यांना मोकळे सोडा!”
36 तुरुंग आधिकारी पौलाला म्हणाला, “पुढाऱ्यांनी या शिपायांना तुम्हाला सोडण्याविषयी सांगितले आहे. तुम्ही आता जाऊ शकता. शांतीने जा.”
37 परंतु पौल त्या शिपायांना म्हणाला, “तुमच्या पुढाऱ्यांनी आम्ही चूक केली आहे हे सिद्ध केले नाही. परंतु त्यांनी आम्हांला लोकांसमोर मारले व तुरुंगात टाकले. आम्ही रोमी नागरिक आहोत म्हणून आम्हांला अधिकार आहेत. आता पुढाऱ्यांना वाटते की आम्ही गुप्त्पणे निघून जावे. नाही! पुढाऱ्यांनी येऊन आम्हांना बाहेर काढले पाहिजे!”
38 शिपायांनी पुढाऱ्यांना पौल जे म्हणाला, ते सांगितले, जेव्हा पुढाऱ्यांनी ऐकले की पौल व सीला रोमी नागारिक आहेत, तेव्हा ते घाबरले. 39 मग पुढाऱ्यांनी येऊन त्यांची क्षमा मागितली. पुढाऱ्यांनी येऊन त्यांना सोडविले व शहर सोडण्याविषयी सांगितले. 40 पण जेव्हा पौल व सीला तुरुंगाबाहेर आले, तेव्हा ते लीदीयाच्या घरी गेले. त्यांनी तेथे काही विश्वासणाऱ्यांना पाहिले, व त्यांना धीर दिला, मग पौल व सीला गेले.
2006 by World Bible Translation Center