M’Cheyne Bible Reading Plan
देवाचा अब्रामाशी करार
15 या सर्व गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टांन्तात परमेश्वराचे वचन आले. देव म्हणाला, “अब्रामा, भिऊ नको; मी तुझे रक्षण करीन आणि तुला आनंद होईल असे मी तुला मोठे प्रतिफळ देईन.”
2 परंतु अब्राम म्हणाला, “परमेश्वर देवा, असे काहीही प्रतिफळ नाही की जेणे कडून मला आनंद होईल, कारण मला मुलगा नाही; म्हणून माझ्या मरणानंतर माझे सर्वकाही दिमिष्कातील माझा गुलाम, अलिएजर यालाच मिळेल.” 3 अब्राम पुढे म्हणाला, “तू मला मुलगा दिला नाहीस म्हणून माझ्या घरात जन्मलेला माझा गुलामच माझ्या सगळ्या मालमत्तेचा वारस होईल.”
4 परमेश्वर अब्रामाशी बोलला, तो म्हणाला, “तुझे सर्वकाही त्या तुझ्या गुलामाला मिळणार नाही; तर तुला मुलगा होईल [a] आणि तोच तुझ्या सगळ्या मालमत्तेचा वारस होईल.”
5 मग देवाने अब्रामाला रात्रीचे आकाश दाखविण्यासाठी बाहेर नेले. देव म्हणाला, “ह्या आकाशातील ताऱ्यांकडे पाहा, तुला मोजता येणार नाहीत इतके ते आहेत; येथून पुढच्या काळात तुझी संततीही त्या ताऱ्यांइतकी अगणित होईल.”
6 अब्रामाने देवावर विश्वास ठेवला देवाने त्याची प्रामाणिकांता गणना केली प्रमाणिक जीवन जगण्यास योग्य असा त्याचा विश्वास होता. 7 देव अब्रामाला म्हणाला, “हा देश तुला वतन करुन देण्याकरिता खास्द्यांच्या ऊर नगरातून तुला आणणारा मीच परमेश्वर आहे.”
8 परंतु अब्राम म्हणाला, “परमेश्वरा, माझ्या स्वामी, हा देश कायमचा वतन करुन मला मिळेल, याची खात्री मला कशी यावी?”
9 देव अब्रामाला म्हणाला, “माझ्यासाठी तीन वर्षांची एक कालवड, तीन वर्षांची एक शेळी, तीन वर्षांचा एक एडका तसेच एक होला व एक पारव्याचे पिल्लू आण.”
10 अब्रामाने तीं सर्व देवाकडे आणली अब्रामाने त्यांना चिरुन त्या प्रत्येकाचे दोन दोन अर्धे तुकडे केले; व ते समोरा समोर ठेवले; पक्षी मात्र त्याने दोन अर्धे चिरले नाहीत; 11 मग कापलेल्या प्राण्यांचे मांस खाण्याकरिता हिंस्र पक्ष्यांनी उडून त्यावर झडप घातली; परंतु अब्रामाने त्यांना हाकलून लावले.
12 नंतर त्या दिवशी सूर्य मावळू लागला, तेव्हा अब्रामाला गाढ झोप लागली म्हणून तो झोपला; तो झोपेत असताना अती भयंकर अंधार त्याच्यावर पडला; 13 मग परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तुला या गोष्टी समजल्या पाहिजेत; तुझे वंशज परक्या देशात राहतील ते तेथे परके असतील, ते तेथे गुलाम होतील आणि 400 वर्षे त्यांचा छळ होईल, त्यांच्यावर जुलूम केला जाईल; 14 परंतु चारशे वर्षानंतर ज्याने त्यांना गुलाम बनवले त्या राष्ट्राला मी शिक्षा करीन, आणि मग आपल्या बरोबर पुष्कळ धन घेऊन ते त्या देशातून निघतील.
15 “तू स्वतः फार म्हातारा होऊन शांतीने मरण पावशील आणि तुझे पूर्वज जेथे पुरलेले आहेत तेथे तुला मूठमाती देतील. 16 मग चार पिढ्यानंतर तुझे लोक या देशात माघारे येतील. त्यावेळी ते येथे राहाणाऱ्या अमोरी लोकांचा पराभव करतील, अमोरी लोकांना शिक्षा करण्यासाठी मी तुझ्या लोकांचा उपयोग करीन. (हे काही काळानंतर घडेल कारण अमोरी लोकांचा दुष्टपणा अद्याप शिगेला पोहोंचला नाहीं.)”
17 सूर्य मावळल्यानंतर गडद अंधार पडला; मारलेल्या जनावरांच्या तेथेच पडलेल्या धडांच्या दोन दोन अर्ध्या तुकड्यांमधून धुराचा लोट आणि अग्नी निघून गेला.
18 म्हणून त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाला वचन दिले व त्याच्याशी करार केला. परमेश्वर म्हणाला, “मिसर देशाच्या नदी पासून फरात म्हणजे युफ्रेटीस या महानदीपर्यंतचा प्रदेश मी तुझ्या वंशजांना देतो; 19 केनी, कनिजी, कदमोनी, 20 हित्ती, परिजी, रफाईम, 21 अमोरी, कनानी, गिर्गाशी व यबूसी या लोकांचा प्रदेश मी तुम्हाला देतो.”
हेरोद येशूविषयी ऐकतो(A)
14 त्या वेळी हेरोदाने [a] येशूविषयी बातमी ऐकली. 2 तेव्हा त्याने आपल्या सेवकांना म्हटले. “येशू हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे. तो मेलेल्यातून उठला आहे. त्यामुळेच तो हे चमत्कार करीत आहे.”
बाप्तिस्मा करणारा योहान कसा मारला गेला
3 हेरोदाने आपला भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदिया हिच्यामुळे योहानला अटक करून तुरूंगात टाकले होते. 4 कारण योहान त्याला सांगत होता, “तू होरोदियाला ठेवणे योग्य नाही.” 5 हेरोद त्याला मारावयास पाहत होता, पण तो लोकांना भीत होता कारण लोकांचा असा विश्वास होता की, योहान संदेष्टा आहे.
6 हेरोदाच्या वाढदिवशी हेरोदियाच्या मुलीने दरबारीत नाच करून हेरोदाला संतुष्ट केले. 7 त्यामुळे त्याने शपथ वाहून ती जे काही मागेल ते देण्याचे अभिवचन तिला दिले. 8 तिच्या आईच्या सांगण्यावरून ती म्हणाली, “मला तेथे तबकात बाप्तिस्मा करणारा योहान याचे शीर द्या.”
9 हेरोद राजाला फार वाईट वाटले. तरी त्याने आपल्या शपथपूर्वक दिलेल्या वचनामुळे व आमंत्रित लोकांमुळे ते द्यावे अशी आज्ञा केली. 10 आणि त्याने तुरुंगात माणसे पाठवून योहानाचे शीर तोडले. 11 मग त्यांनी त्याचे शीर तबकात घालून त्या मुलाला आणून दिले. तिने ते आपल्या आईकडे आणले. 12 मग त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले व त्याला पुरले, आणि त्यांनी जाऊन जे घडले ते येशूला सांगितले.
येशू पाच हजारांहून अधिक लोकांना जेवू घालतो(B)
13 मग ते ऐकून येशू तेथून नावेत बसून निघून गेला व नंतर नावेतून उतरून माळरानावर एका निवांत व एकाकी जागी गेला. लोकांनी हे ऐकले तेव्हा ते पायी त्याच्याकडे गेले. 14 मग तो किनाऱ्यावर आला, जेव्हा त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला. तेव्हा त्याला त्यांच्याबद्दल कळवळा वाटला. म्हणून जे आजारी होते त्यांना त्याने बरे केले.
15 मग संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “ही माळरानावरची उजाड जागा आहे आणि भोजन वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावामध्ये जाऊन स्वतःकरिता अन्न विकत घ्यावे म्हणून त्यांना पाठवून द्या.”
16 परंतु येशू त्यांना म्हणाला, “त्यांना जाण्याची गरज नाही. तुम्हीच त्यांना खायला द्या.”
17 तेव्हा ते त्याला म्हणाले, “पाच भाकरी व दोन मासे याशिवाय येथे आमच्याजवळ काहीच नाही.”
18 तो म्हणाला, “त्या इकडे आणा.” 19 मग लोकांना गवतावर बसण्याची आज्ञा केत्यावर त्याने त्या पाच भाकरी व दोन मासे घेऊन वर आकाशकडे पाहून त्यावर आशीर्वाद मागितला. नंतर त्याने भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकास दिल्या. 20 ते सर्व जेवून तृप्त झाले. मग त्या उरलेल्या तुकड्यांच्या त्यांनी बारा टोपल्या भरुन घेतल्या. 21 स्त्रिया व मुले मोजली नाहीत, पुरूष मात्र पाच हजार होते.
येशू सरोवरावरून चालातो(C)
22 स्वतः लोकसमुदायास निरोप देईपर्यंत त्याने शिष्यांना नावेत बसून लगेच आपल्यापुढे पलीकडे जाण्यास सांगितले. 23 लोकांना पाठवून दिल्यावर तो प्रार्थना करण्यास एकांत ठिकाणी डोगरावर गेला, रात्र झाली तेव्हा तो तेथे एकटाच होता. 24 पण त्यावेळी नाव किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर होती व ती लाटांनी हेलकावत होती, कारण वारा समोरून वाहत होता.
25 मग पहाटेच्या वेळी तो पाण्यावरून चालत शिष्यांकडे आला. 26 शिष्य त्याला पाण्यावरून चालताना पाहून घाबरून गेले, त्यांना वाटले, भूतबीत आहे की काय म्हणून ते भूत, भूत असे ओरडू लागले.
27 पण येशू लगेच त्यांना म्हणाला, काळजी करू नका. मी आहे, भीऊ नका.
28 पेत्र म्हणाला, प्रभु जर तो तूच आहेस तर मला पाण्यावरून तुझ्याकडे यायला सांग.
29 येशू म्हणाला, “ये.”
मग पेत्र नावेतून पाण्यात उतरला व पाण्यावरून चालत येशूकडे जाऊ लागला. 30 पण तो पाण्यावरून चालत असतानाच वारा व लाटा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला. बुडताना ओरडला, “प्रभु, मला वाचवा.”
31 आणि लगेंच येशूने आपला हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, “अरे अल्पविश्वासू माणसा, तू संशय का धरलास?”
32 मग ते नावेत बसल्यावर वारा थांबला. 33 तेव्हा जे नावेत होते ते त्याला नमन करून म्हणाले, “तुम्ही खरोखर देवाचे पुत्र आहात.”
येशू रोग्यानां बरे करीतो(D)
34 नंतर ते पलीकडे गनेसरेत येथे पोहोचले. 35 तेथील लोकांनी येशूला पाहिले व सभोवतालच्या सर्व प्रदेशात निरोप पाठविला व त्यांनी सर्व प्रकारच्या आजाऱ्यांस त्याच्याकडे आणले. 36 आणि आम्हांला आपल्या वस्त्राच्या काठाला स्पर्श करू द्यावा, अशी विनंती केली, तेव्हा जितक्यांनी स्पर्श केला तितके बरे झाले.
सनबल्लट आणि तोबीया
4 आम्ही यरुशलेमचा कोट बांधून काढत आहोत हे सनबल्लटच्या कानावर गेले. तेव्हा तो फार संतापला आणि नाराज झाला. त्याने यहूद्यांचा उपहास करायला सुरुवात केली. 2 सनबल्लटने आपले मित्र आणि शोमरोन येथील सैन्य यांच्याशी बातचीत केली. तो म्हणाला, “हे दुबळे यहुदी करताहेत तरी काय? आपण त्यांची गय करु असे त्यांना वाटते? आपण यज्ञ करु असे त्यांना वाटते की काय? अगदी एका दिवसात आपण सगळे बांधकाम पुरे करु असे त्यांना वाटत असावे. या उकिरड्यातून आणि घाणीतून ते पुन्हा दगडांना सजीव करु शकणार नाहीत. ते निव्वळ राखेचे आणि उकिरड्याचे ढीग आहेत.”
3 तोबीया अम्मोनीची सनबल्लटला साथ होती. तोबीया म्हणाला, “यहूद्यांनी हे कसले बांधकाम आरंभले आहे? एक लहानसा कोल्हा त्यावर चढून गेला तरी तो हा दगडी कोट पाडून टाकील.”
4 नहेम्याने देवाची प्रार्थना केली. तो म्हणाला, “आमच्या देवा, आमची प्रार्थना ऐक. हे लोक आमचा तिरस्कार करतात. सनबल्लट आणि तोबीया आमचा अपमान करत आहेत. त्या वाईट गोष्टी त्यांच्यावरच उलटव. त्यांना लाजिरवाणे कर. त्यांना निर्वासित अवस्थेत कैदी कर. 5 त्यांच्या अपराधांची क्षमा करु नकोस. तसेच तुझ्या डोळयादेखत केलेल्या पापांना क्षमा करु नकोस. त्यांनी बांधकाम करणाऱ्यांचा अपमान केला आहे. आणि त्यांना नाउमेद केले आहे.”
6 यरुशलेमचा कोट आम्ही बांधला. पूर्ण नगराभोवती तटबंदी बांधून काढली. पण तिची उंची असायला हवी त्यापेक्षा निम्मीच होती. लोकांनी मनापासून काम केले म्हणून आम्ही एवढे केले.
7 पण सनबल्लट तोबीया, अरबी, अम्मोनी आणि अश्दोदी यांचा मात्र फार संताप झाला. लोकांनी यरुशलेमच्या भिंतीचे काम सुरुच ठेवले आहे हे त्यांनी ऐकले. भिंतीला पडलेली भगदाडे ते बुजवत आहेत हे ही त्यांच्या कानावर आले. 8 तेव्हा या सर्वांनी एकत्र येऊन यरुशलेम विरुध्द हल्ला करण्याचा कट केला. यरुशलेममध्ये गोंधळ उडवायचा त्यांनी बेत केला. शहरावर चाल करून येऊन हल्ला करायचे त्यांनी ठरवले. 9 पण आम्ही आमच्या देवाची प्रार्थना केली. आणि त्यांना तोंड द्यायला सज्ज असावे म्हणून आम्ही रात्रंदिवस पहारा करण्यासाठी भिंतींवर राखणदार नेमले.
10 आणि त्यावेळी यहुदी लोक म्हणाले, “बांधकामावरचे लोक थकत चालले आहेत. वाटेत खूपच घाण आणि केरकचरा माजला आहे. कोटाचे बांधकाम आम्ही चालू ठेवू शकत नाही. 11 आणि आपले शत्रू म्हणताहेत, ‘यहुदींना काही समजायच्या किंवा दिसायच्या अगोदरच आपण त्यांच्यात शिरकाव केलेला असेल. आपण त्यांना मारुन टाकू म्हणजे कामच थांबेल.’”
12 मग आमच्या शत्रूंच्या मध्ये राहणारे जे यहुदी लोक होते त्यांनी आम्हाला पुढील गोष्ट दहादा सांगितली, “आपल्या शत्रूने आम्हाला चहूबाजूंनी वेढले आहे. पाहावे तिकडे तेच आहेत.”
13 तेव्हा मी कोटाभोवतालच्या सर्वात सखल जागांच्या मागे काही जणांना ठेवले. भिंतीतील भगदाडांजवळ त्याना ठेवले. आपापल्या तलवारी, भाले आणि धनुष्यांसह कुटुंबेच मी नेमली. 14 सगळी परिस्थिती मी डोळ्याखालून घातली. आणि मग उभा राहून मी महत्वाची घराणी, अधिकारी आणि इतर लोक यांना म्हणालो, “आपल्या शत्रूची धास्ती बाळगू नका. लक्षात ठेवा, आमचा प्रभु, परमेश्वर जो महान आणि सामर्थ्यशाली आहे त्याचे स्मरण करा. आपले भाऊबंद मुलगे, मुली यांच्याकरता तुम्ही लढा दिला पाहिजे, आपल्या बायका आणि घरेदारे यांच्यासाठी लढले पाहिजे.”
15 आपले बेत आम्हाला कळून चुकले आहेत हे मग आमच्या शत्रूंनी ऐकले. देवाने त्यांचे बेत धुळीला मिळवले हे त्यांना समजले. तेव्हा आम्ही पुन्हा कोटाच्या कामाला लागलो. जो तो आपापल्या ठिकाणी जाऊन आपल्या वाटचे काम करु लागला. 16 त्या दिवसापासून माझ्याकडची निम्मी माणसे तटबंदीचे काम करत होती. आणि उरलेले निम्मे लोक भाले, ढाली, धनुष्य, चिलखत यासह राखणीला सज्ज होते. भिंतीचे बांधकाम करणाऱ्या सर्व यहुदी लोकांच्या पाठीमागे सैन्यातील अधिकारी उभे होते. 17 बांधकाम करणारे आणि त्यांचे मदतनीस यांच्या एका हातात बांधकामाची अवजारे तर दुसऱ्या हातात शस्त्रे होती. 18 तलवार कमरेला बांधूनच प्रत्येकजण बांधकाम करत होता. सावधगिरीच्या इषाऱ्याचे रणशिंग वाजवणारा माणूस माझ्या शेजारीच होता. 19 मग मी प्रमुख घराणी, अधिकारी आणि इतर लोक यांच्याशी बोललो. त्यांना मी म्हणालो “ही एक प्रचंड कामगिरी आहे आणि आपण भिंतीलगत विखुरलेलो आहोत. एकमेकापासून लांब अंतरावर आहोत. 20 तेव्हा कर्ण्याचा आवाज कानी पडताच त्या ठिकाणी धावत या. तेथे आपण एकत्रगोळा होऊ आणि देवच आपल्यासाठी लढेल.”
21 तेव्हा आम्ही यरुशलेमच्या कोटाचे काम चालूच ठेवले. अर्ध्या लोकांजवळ भाले होते. पहाट उजडल्यापासून ते थेट रात्री आकाशात चांदण्या दिसू लागेपर्यंत आम्ही काम करत होतो. 22 त्यावेळी मी लोकांना असेही म्हणालो, “प्रत्येक बांधकाम करणाऱ्याने आपल्या मदतनीसासह रात्री यरुशलेमच्या आत राहिले पाहिजे. म्हणजे रात्री ते राखणदार म्हणून आणि दिवसा कामगार म्हणून काम करतील.” 23 तेव्हा आमच्यापैकी कोणीही अंगावरचे कपडे उतरवले नाहीत. मी, माझे भाऊ, माझी माणसे, आणि राखणदार यांच्यापैकी कोणीही नाही. सदा सर्वकाळ आम्ही सर्वजण शस्त्रसज्ज होतो-अगदी पाणवठ्यावर जात असू तेव्हा ही.
इकुन्या येथे पौल व बर्णबा
14 पौल व बर्णबा इकुन्या शहरात गेले. ते तेथील यहूदी सभास्थानात गेले. (प्रत्येक शहरात गेल्यावर ते असेच करीत) तेथील लोकांशी ते बोलले. पौल व बर्णबा इतके चांगले बोलले की, पुष्कळ यहूदी लोकांनी व ग्रीक लोकांनी त्यांनी जे सांगितले त्यावर विश्वास ठेवला. 2 परंतु काही यहूदी लोकांनी विश्वास ठेवला नाही. त्यांनी यहूदीतर लोकांची मने भडकाविली आणि बंधुजनांविषयीची मने वाईट केली.
3 म्हणून पौल व बर्णबाने त्या ठिकाणी बरेच दिवस मुक्काम केला. आणि धैर्याने येशूविषयी सांगत राहीले. पौल व बर्णबाने देवाच्या कृपेविषयी संदेश दिला. देवाने त्यांना पौल व बर्णबाला चमत्कार व अदूभुत कृत्ये करण्यास मदत करुन ते जे काही सांगत होते ते खरे ठरविले. 4 परंतु शहरातील काही लोकांना यहूदी लोकांची मते पटली. दुसऱ्या लोकांना पौल व बर्णबाचे म्हणणे पटले. (त्यानी विश्वास ठेवला) त्यामुळे शहरात दोन तट पडले.
5 काही यहूदीतर लोक, काही यहूदी लोक व त्यांचे पुढारी यांनी पौल व बर्णबाला बांधले व इजा करण्याचा प्रयत्न केला. त्यांना पौल व बर्णबा यांना दगडमार करुन मारावयाचे होते. 6 जेव्हा पौल व बर्णबा यांना त्याविषयी कळले तेव्हा त्यांनी ते शहर सोडले. ते लुस्त्र व दर्बे या लुकवनियाच्या नगरात गेले. आणि त्या शहरांच्या सभोवतालच्या परिसरात गेले. 7 त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी सुवार्ता सांगितली.
लुस्त्र व दर्बे येथे पौल
8 लुस्त्र येथे एक मनुष्य होता त्याचे पाय अधू होते ,तो जन्मतःच पांगळा जन्मला होता. व कधीच चालला नव्हता. 9 पौल भाषण करीत असताना हा मनुष्य ऐकत होता. पौलाने त्याच्याकडे पाहिले. पौलाने पाहिले की, देव त्याला बरे करील असा त्या मनुष्याचा विश्वास झाला आहे. 10 तेव्हा पौल मोठ्याने म्हणाला, “तुझ्या पायावर उभा राहा!” तेव्हा त्या मनुष्याने उंच उडी मारली आणि चालू लागला.
11 पौलाने केलेले लोकांनी जेव्हा पाहिले, तेव्हा ते आपल्या लुकवनिया भाषेत ओरडले. ते म्हणाल, “देव माणसांसारखे झाले आहेत! ते आमच्याकडे खाली आले आहेत!” 12 लोकांनी बर्णबाला ज्युपिटर [a] म्हटले व पौलाला मर्क्युरी [b] म्हटले, कारण पौल मुख्य बोलणारा होता. 13 ज्युपिटरचे मंदिर जवळ होते. या मंदिराचा पुजारी काही बैल व फुले घेऊन वेशीजवळ आला. पुजारी व लोकांना पौल व बर्णबा यांची उपासाना करण्यासाठी त्यांच्यापुढे बळी द्यावयाचा होता.
14 परंतु ते काय करीत आहेत, हे जेव्हा पौल व बर्णबा यांना समजले तेव्हा त्यांनी आपले कपडे फाडले व लोकांच्या गर्दीत शिरले आणि मोठ्याने म्हणाले, 15 “लोकांनो, ह्या गोष्टी तुम्ही का करीत आहात? आम्ही देव नाही! तुम्हांला जशा भावना आहेत, तशाच आम्हालाही आहेत! आम्ही तुम्हांला सुवार्ता सांगायला आलो. आम्ही तुम्हांला हे सांगत आहोत की या व्यर्थ गोष्टींपासून तुम्ही तुमचे मन वळवावे. खऱ्या जिवंत देवाकडे आपले मन लावावे. त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व जे काही आहे ते निर्माण केले.
16 “भूतकाळात, देवाने सर्व राष्ट्रांना त्यांना जसे पाहिजे तसे वागू दिले. 17 परंतु देवाने अशा गोष्टी केल्या की त्या द्वारे तो खरा आहे हे सिद्ध व्हावे. तो तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करतो, तो तुम्हांला आकाशातून पाऊस देतो.योग्य वेळी तो तुम्हांला चांगले पीक देतो. तो तुम्हांला भरपूर अन्न देतो व तो तुमची अंतःकरणे आनंदाने भरतो.”
18 पौल व बर्णबाने ह्या गोष्टी लोकांना सांगितल्या. व मोठ्या प्रयासाने आपणास यज्ञ अर्पिण्यापासून त्याना परावृत केले.
19 नंतर अंत्युखिया व इकुन्या येथील काही यहूदी लोक तेथे आले. त्यांनी लोकसमुदायाची मने आपल्या बाजूस वळविली, आणि पौलाला दगडमार केला. त्यात पौल मेला असे समजून त्यांनी त्याला ओढत नेऊन नगराबाहेर टाकले. 20 येशूचे शिष्य पौलाभोवती जमा झाले मग पौल उठून परत शहरात गेला व दुसऱ्या दिवशी ते दोघे दर्बेला गेले.
सिरीयातील अंत्युखियाला परत येणे
21 आणि त्या नगरात त्यांनी सुवार्ता सांगून अनेक लोकांना शिष्य केले. त्यानंतर ते लुस्त्र, इकुन्या आणि अंत्युखिया नगरांना परत आले. 22 आणि त्यांनी तेथील शिष्यांना येशूवरील विश्वासात बळकट केले. त्यांनी आपल्या विश्वासांत अढळ राहावे म्हणून उत्तेजन दिले. ते म्हणाले, “अनेक दु:खांना तोंड देत आपण देवाच्या राज्यात प्रवेश केला पाहिजे.” 23 पौल व बर्णबाने प्रत्येक मंडळीत वडीलजनांची नेमणूक केली. त्यांनी या वडिलांसाठी उपास आणि प्रार्थना केल्या, प्रभु येशूवर विश्वास असलेले असे सर्व वडीलजन होते म्हणून पौलाने व बर्णबाने त्यांना प्रभुच्या हाती सोपविले.
24 पौल आणि बर्णबा पिशीदिया प्रदेशातून गेले नंतर ते पंफुलिया येथे आले. 25 त्यांनी पिर्गा शहरात देवाचा संदेश दिला नंतर ते अत्तालिया शहरात गेले. 26 नंतर तेथून पुढे पौल व बर्णबा सिरीया येथील अंत्युखियात समुद्रमार्गे गेले. जे काम त्यांनी पूर्ण केले होते त्याची सुरुवात त्यांनी अंत्युखियापासूनच केली होती.
27 जेव्हा ते तेथे पोहोंचले, तेव्हा त्यांनी मंडळीला एकत्र बोलाविले आणि देवाने त्यांच्याबाबतीत ज्या ज्या गोष्टी केल्या त्या त्यांना सांगितल्या, तसेच दुसऱ्या देशातील यहूदीतर लोकांमध्ये देवाने कसे दार उघडले ते सांगितले, 28 नंतर ते शिष्यांबरोबर तेथे बरेच दिवस राहिले.
2006 by World Bible Translation Center