M’Cheyne Bible Reading Plan
लोट याला कैद केले जाते
14 शिनाराचा राजा अम्रफेल, एल्लासाराचा राजा अर्योक, एलामाचाराजा कदार्लागोमर आणि गोयीमाचा राजा तिदाल, 2 यांनी सदोमाचा राजा बेरा, गमोराचा राजा बिर्शा, अदमाचा राजा शिनाब, सबोयिमाचा राजा शमेबर आणि बेलाचा म्हणजे सोअराचा राजा यांच्यांशी युद्ध केले.
3 या सर्व राजांनी आपले सैन्य सिद्दीम खोऱ्यात एकत्र जमविले. (हे खोरे म्हणजे आताचा क्षार समुद्र) 4 या सर्व राजांनी बारा वर्षे कदार्ला गोमर राजाची सेवा केली, पंरतु तेरव्या वर्षी ते त्याच्या विरुद्ध उठले. 5-6 तेव्हा चौदाव्या वर्षी कदार्लागोमर व त्याच्या बरोबरचे राजे लढाई करण्यास चालून आले आणि त्यांनी अष्टरोथ कर्णईम येथे रेफाई लोकांचा, हाम येथे लूजी लोकांचा, शावेह किर्याथाईम येथे एमी लोकांचा आणि, सेईर म्हणजे ईदोम डोंगराळ प्रदेशात होरी लोकांचा आणि, सेईर म्हणजे ईदोम डोंगराळ प्रदेशात होरी लोकांचा पराभव केला आणि त्यांना एलपारान (हे वाळवंटा जवळ आहे) जवळ असलेल्या रानापर्यंत पिटाळून लावले. 7 त्यानंतर कदार्लागोमर राजा उत्तरेकडे वळाला व एन मिशपात म्हणजे कादेश येथे जाऊन त्याने अमालेकी लोकांचा पराभव केला; तसेच हससोन-तामार येथे राहणाऱ्या अमोरी लोकांचाही पराभव केला.
8 त्यावेळी सदोमाचा राजा, गमोराचा, राजा, अदमाचा सबोयिमाचा राजा आणि बेला म्हणजे सोअराचा राजा यांनी आपले सैन्य एकत्र केले व आपल्या शत्रूशी लढण्याकरिता ते सिद्दीम खोऱ्याकडे गेले. 9 एलामाचा राजा कदार्लागोमर, गोयीमाया राजा तिदाल, शिनाराचा राजा अम्राफेल आणि एलामाचा राजा अर्योक यांच्या विरुद्ध ते लढले; असे चार राजे पांच राजांविरुद्द लढले.
10 सिद्दीम खोऱ्यात डांबराने भरलेल्या अनेक खाणी होत्या. सदोम व गमोराचे राजे सैन्यासह पळून जाताना बरेच सैनिक खाणीत पडले परंतु बाकीचे डोंगराकडे पळून गेले.
11 तेव्हा त्यांच्या शत्रुंनी सदोम व गमोरा येथील लोकांची सर्व मालमत्ता, अन्न व वस्त्र सामुग्री लुटून नेली त्यांनी त्यांच्या सर्व वस्तू ही नेल्या. 12 अब्रामाचा पुतण्या लोट सदोमात राहात होता. त्याला शत्रूनीं पकडले व त्याच्या मालकीच्या सर्व मालमत्तेसह त्याला कैद करुन ते घेऊन गेले. 13 या लढाईत पकडला न गेलेला एक मनुष्य अब्राम इब्रीकडे पळून गेला व त्याने त्याला हे वर्तमान सांगितले त्यावेळी अब्राम मम्रे अमोरी वृक्षांजवळ तळ देऊन राहिला होता; मम्रे, अष्कोल व आनेर ह्यांनी एकमेकांना व अब्रामाला मदत करण्याचा करार केला.
अब्राम लोटाची सुटका करतो
14 लोटाला कैद करुन नेल्याचे वर्तमान अब्रामाला समजले, तेव्हा त्याने आपल्या कुटुंबात जन्मलेल्या सर्वांना एकत्र बोलावले व त्यांच्यातून लढाईच्या कामात कसलेले असे तीनशे अठरा तरबेज लढवैय्ये घेऊन त्याने थेट दान नगरापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला. 15 त्या रात्री त्याने आपल्या सैनिक दासांसह शत्रूसैन्यावर अचानक हल्ला चढवला; त्यांनी शत्रू सैन्याचा पराभव केला व दिमिष्काच्या म्हणजे दमास्कसच्या उत्तरेस असलेल्या होबा पर्यंत त्यांचा पाठलाग केला. 16 तेव्हा शत्रुने लुटलेली सगळी मालमत्ता तसेच आपला पुतण्या लोट याची मालमत्ता, स्त्रिया आणि दास अब्रामाने परत आणले.
17 मग कदार्लागोमर व त्याच्याबरोबरचे राजे यांचा पराभव केल्यावर अब्राम आपल्या घरी गेला; तेव्हा सदोमाचा राजा शावेच्या खोऱ्यात त्याला भेटावयास गेला. (त्या खोऱ्याला आता राजाचे खोरे असे म्हणतात.)
मलकीसदेक
18 आणि परात्पर देवाचा याजक असलेला शालेमाचा राजा मलकीसदेकही भाकर व द्राक्षारस घेऊन अब्रामाला भेटण्यास आला. 19 मलकीसदेकाने अब्रामाला आशीर्वाद देऊन म्हटले,
“अब्रामा, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्नकर्ता
परात्पर देव तुला आशीर्वाद देवो.
20 त्या परात्पर देवाने तुझ्या शत्रूंचा पराभव करण्यास तुला मदत केली
त्या परात्पर देवाचा आम्ही धन्यवाद करतो.”
तेव्हा अब्रामाने लढाईच्या काळात त्याच्याजवळून जे जे घेतले होते त्याचा दहावा भाग मलकीसदेकाला दिला. 21 मग सदोमाचा राजा अब्रामास म्हणाला, “मला फक्त कैद करुन नेलेले माझे लोक द्या आणि त्यांची मालमत्ता तुम्ही तुमच्यासाठी ठेवा.”
22 परंतु अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला, “आकाश व पृथ्वीचा निर्माणकर्ता परमेश्वर, परात्पर देव याला मी वचन देतो की, 23 मी तुझे असलेले काहीही ठेवणार नाहीं, एखादे सूत वा जोड्याचा बंधही ठेवणार नाही ‘मी अब्रामाला श्रीमंत केले’ असे तू म्हणावे असे मला वाटत नाही. 24 माझ्या या तरुण माणसांनी जे अन्न खाल्ले आहे तेवढ्याचाच मी स्वीकार करतो; परंतु इतर लोकांना लढाईतून मिळालेल्यापैकी त्यांचा वाटा घेऊ दे, आणि त्यातून काही आनेर, अष्कोल व मम्रे यांस दे, कारण त्यांनी लढाईत मला खूप मदत केली.”
बी पेरणाऱ्याची बोधकथा(A)
13 त्याच दिवशी येशू घराबाहेर पडून सरोवराच्या काठी जाऊन बसला. 2 पुष्कळ लोक त्याच्याभोवती जमले, म्हणून येशू नावेत जाऊन बसला व सर्व लोकसमुदाय किनाऱ्यावर उभा राहिला. 3 तेव्हा त्याने त्यांना गोष्टीरूपाने बोध केला. तो म्हणाला,
“एक शेतकरी बी पेरायला निघाला. 4 तो पेरीत असता काही बी रस्त्यावर पडले, पक्षी आले व त्यांनी ते खाऊन टाकले. 5 काही बी खडकाळ जमिनीवर पडले. तेथे पुरेशी माती नव्हती. तेथे बी फार झपाट्याने वाढले. पण जमीन खोलवर नव्हती, 6 म्हणून जेव्हा सूर्य उगवाला तेव्हा रोपटे वाळून गेले. कारण त्याला खोलवर मुळे नव्हती. 7 काही बी काटेरी झुडपावर पडले. काटेरी झुडूप वाढले आणि त्याने रोपाची वाढ खुंटविली. 8 काही बी चांगल्या जमिनीवर पडले, ते रोप वाढले व त्याला धान्य आले. आणि कोठे शंभरपट, कोठे साठपट. कोठे तीसपट असे त्याने पीक दिले. 9 ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.”
येशूने बोधकथांचा वापर का केला(B)
10 मग शिष्य त्याच्याजवळ आले आणि त्यांनी विचारले, “तुम्ही त्यांना गोष्टीरूपाने बोध का करता?”
11 तेव्हा त्याने उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये तुम्ही समजू शकता, पण त्यांना ते समजणार नाही. 12 कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व ते त्याला पुष्कळ होईल, परंतु ज्या कोणाकडे नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याकडून काढून घेतले जाईल. 13 म्हणून मी त्यांना गोष्टीरूपाने बोध करतो, कारण ते पाहत असताना ही त्यांना दिसत नाही आणि ऐकत असतांनाही त्यांना समजत नाही. 14 तेव्हा हे लोक दाखवून देत आहेत की, त्यांच्यासंबंधी यशयाने पूर्वी जे लिहून ठेवले ते खरे आहे. ते असे,
‘तुम्ही लक्ष द्याल,
ऐकाल पण तुम्हांला समजणार नाही,
तुम्ही पाहाल आणि निरीक्षण कराल
पण तुम्हांला काहीच दिसणार नाही.
15 कारण या लोकांचे अंतःकरण कठीण झाले आहे
त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही.
त्यांनी आपले डोळे मिटले आहेत.
यासाठी की, या लोकांनी आपल्या डोळ्यांनी पाहू नये,
आपल्या कानांनी ऐकू नये
आपल्या अंतःकरणाने समजू
नये व मागे फिरू नये, आणि मी त्यांना बरे करू नये.’ (C)
16 पण तुमचे डोळे धन्य आहेत कारण ते पाहतात, तुमचे कान धन्य आहेत कारण ते ऐकातात. 17 मी तुम्हांला खरे सांगतो, तुम्ही ज्या गोष्टी पाहत आहा त्या पाहण्यासाठी अनेक संदेष्टे व नीतिमान लोक आतुरतेने वाट पाहत होते. तरी त्यांना त्या पाहता आल्या नाहीत, आणि तुम्ही ज्या गोष्टी ऐकत आहात त्या ऐकण्याची त्यांची खूप इच्छा होती तरी त्यांनी त्या ऐकल्या नाहीत.
येशू बीयांविषयी स्पष्टीकरण करतो(D)
18 “पेरणाऱ्याच्या बोधकथेचा अर्थ काय हे समजून घ्या,
19 “कोणी राज्याची गोष्ट ऐकतो पण ती त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट (सैतान) येतो व त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते घेतो, वाटेवर पेरलेला तो हाच आहे.
20 “खडकाळ जागेवर पेरलेला तो असा आहे की, तो वचन ऐकतो व लगेच आनंदाने स्वीकारतो. 21 तरी त्याच्यामध्ये मूळ नसल्याने तो थोडा काळच टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा कोणी छळ केला, व त्रास झाला म्हणजे तो लगेच अडखळतो.
22 “आणि काटेरी झाडांमध्ये पेरलेला असा आहे की, तो वचन ऐकतो पण जगिक गोष्टीविषयीचा ओढा, संपत्तीचा मोह ही वचनाला वाढू देत नाहीत आणि तो निष्फळ होतो.
23 “चांगल्या जमिनीवर पेरलेला असा आहे की, तो वचन ऐकतो, ते समजतो व तो निश्चितपणे पीक देतो. कोणी शंभरपट, कोणी साठपट, कोणी तीसपट असे पीक देतो.”
गहू आणि निदण यांची बोधकथा
24 नंतर येशूने त्यांना दुसरी बोधकथा सांगितली. तो म्हणाला, “स्वर्गाचे राज्य हे एखाद्या मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरण्यासारखे आहे. 25 पण लोक झोपेत असता त्या मनुष्याचा शत्रू आला व गव्हामध्ये निदण पेरून गेला. 26 पण जेव्हा रोपे वाढली व दाणे आले तेव्हा निदणही दिसू लागले. 27 मग त्या माणसाचे नोकर त्याच्याकडे आले व म्हणाले, मालक आपण आपल्या शेतात चांगले बी पेरले ना? मग त्यात निदण कोठून आले?
28 “तो त्यांना म्हणाला, ‘कोणीतरी शत्रूने हे केले आहे.’
“त्याच्या नोकरांनी विचारले, ‘आम्ही जाऊन ते उपटून टाकावे अशी आपली इच्छा आहे काय?’
29 “पण तो मनुष्य म्हणाला, ‘नको तुम्ही निदण जमा करीत असताना त्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. 30 कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यास सांगेन की पहिल्याने निदण जमा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा. पण गहू माझ्या गोदामात साठवा.’”
येशूच्या आणखी काही बोधकथा(E)
31 मग येशूने त्यांना आणखी एक बोधकथा सांगितली. तो म्हणाला, “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे, तो एका माणसाने घेऊन आपल्या शेतात पेरला. 32 मोहरीचा दाणा सर्व दाण्यांहून लहान आहे. पण तो त्याचे झाड मात्र खूप मोठे येते. इतके की, आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांद्यांवर राहतात.”
33 मग येशूने लोकांना आणखी एक दाखला सांगितला, “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे. ते एका स्त्रीने घेतले व तीन मापे पिठामध्ये ठेवले तेव्हा ते सर्व पीठ फुगले.”
34 लोकांना बोध करण्यासाठी येशूने नेहमीच गोष्टींचा उपयोग केला. 35 ते यासाठी की, संदेष्ट्यांनी जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की,
“गोष्टी सांगायला मी आपले तोंड उघडीन,
जगाच्या स्थापनेपासून गुप्त राहिलेल्या गोष्टी मी बोलेन.” (F)
येशू बोधकथा समजावून सांगतो
36 मग येशू लोकांना सोडून घरात गेला. त्याच्याकडे त्याचे शिष्य आले आणि म्हणाले, “शेतातील निदणाची बोधकथा आम्हांला नीट समजावून सांगा.”
37 येशूने उत्तर दिले, “शेतामध्ये चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. 38 आणि शेत हे जग आहे. चांगले बी हे देवाच्या राज्यातील मुले आहेत आणि निदण हे दुष्टाचे (सैतानाचे) मुलगे आहेत. 39 हे निदण पेरणारा शत्रू हा सैतान आहे आणि कापणी या काळाची समाप्ति आहे व कापणी करणारे देवदूत आहेत.
40 “म्हणून जसे निदण गोळा करून अग्नीत टाकतात त्याप्रमाणे या काळाच्या शेवटी होईल. 41 मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील आणि ते त्याच्या राज्यातून अडखळण करणाऱ्या सर्व गोष्टी आणि अन्याय करणारे यांना बाजूला काढतील. 42 आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे रडणे व दात खाणे चालेल. 43 तेव्हा नीतिमान लोक आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐका.
गुप्त ठेवी आणि मोती यांच्या बोधकथा
44 “स्वर्गाचे राज्य हे जणू काय शेतामध्ये लपवून ठेवलेल्या ठेवीसारखे आहे. एके दिवशी एका मनुष्याला ती ठेव सापडली. त्यामुळे त्या मनुष्याला खूप आनंद झाला. तो ती गुप्त ठेव पुन्हा त्याचा शेतात लपवून ठेवतो व आपले सर्व काही विकून ते शेत विकत घेतो.
45 “आणखी, स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध घेणाऱ्या व्यापाऱ्यासारखे आहे, 46 एक दिवस त्याला एक अत्यंत सुंदर मोती सापडतो. तेव्हा तो जाऊन आपले सर्व काही विकतो आणि तो मोती विकत घेतो.
माशाच्या जाव्याविषयीची बोधकथा
47 “तसेच, स्वर्गाचे राज्य पाण्यात टाकलेल्या जाळ्यासारखे आहे. जाळ्यात सर्व प्रकारचे मासे सापडतात. 48 ते भरल्यावर माणसांनी ते ओढून किनाऱ्यावर आणले व बसून जे चांगले ते भांड्यात भरले व जे वाईट ते फेकून दिले. 49 या काळाच्या शेवटी असेच होईल. देवदूत येतील आणि वाईटांना नितीमान लोकांतून वेगळे करतील. 50 वाईट लोकांना अग्नीत फेकून देण्यात येईल. तेथे रडणे व दात खाणे चालेल.”
51 येशूने शिष्यांना विचारले, “तुम्हांला या सर्व गोष्टी समजल्या काय?”
तेव्हा ते म्हणाले, “होय.”
52 तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “प्रत्येक नियमशास्त्राचा शिक्षक ज्याला स्वर्गाच्या राज्याविषयी शिकविण्यात आले आहे तो घरमालकासारखा आहे. त्याच्याकडे अनेक जुन्या व नव्या गोष्टी घरातील तिजोरीत ठेवलेल्या आहेत.”
येशू आपल्या गावी जातो(G)
53 येशूने लोकांना बोध करण्याचे व गोष्टी सांगून शिकविण्याचे संपवल्यानंतर तो निघून गेला. 54 त्याने आपल्या गावी येऊन त्यांच्या सभास्थानामध्ये असे शिकविले की, ते चकित होऊन म्हणाले, “हे ज्ञान व ही सामर्थ्याची कृत्ये याला कशी आली? 55 हा त्या सुताराचा मुलगा ना? याच्या आईला मरीया म्हणतात ना? आणि याकोब व योसेफ आणि शिमोन व यहूदा याचे भाऊ आहेत ना? 56 याच्या सर्व बहिणी आपल्यात आहेत ना? मग याला या सर्व गोष्टी कशा आल्या असे ते त्याच्याविषयी गोंधळात पडले.” 57 त्यांनी त्याला मानण्याचे नाकारले. पण येशू त्यांना म्हणाला, “इतर लोक संदेष्ट्याचा सन्मान करतात. पण त्याच्या स्वतःच्या गावात किंवा घरात त्याचा सन्मान होत नाही.” 58 तेथील लोकांच्या अविश्वासामुळे त्याने तेथे जास्त चमत्कार केले नाहीत.
तटबंदीचे बांधकाम करणारे
3 मुख्य याजकाचे नाव होते एल्याशीब. एल्याशीब आणि त्याचे याजक बांधव उठून कामाला लागले आणि त्यांनी मेंढेवेस बांधली. त्यांनी पवित्र परमेश्वरासाठी प्रार्थनापूर्वक तिची प्रतिष्ठापना केली. दरवाजे भिंतीत बसवले. हमेयाचा बुरुज (म्हणजे शंभराचा बुरुज) आणि हनानेल बुरुज इथपर्यंत या याजकांनी यरुशलेमच्या तटबंदीचे काम केले. त्यांनी पवित्र परमेश्वरासाठी आपल्या कामाची प्रार्थनापूर्वक प्रतिष्ठापना केली.
2 याजकांच्या शेजारी यरीहोच्या लोकांनी भिंत बांधली आणि इम्रीचा मुलगा जक्कूर याने यरीहोच्या लोकांच्या कामालगत भिंतीचे बांधकाम केले.
3 हस्सनाच्या मुलांनी मत्स्यवेस बांधली. तुळ्या घातल्या. दरवाजे बसवले. या दरवाजांना कड्या आणि अडसर घातले.
4 उरीयाचा मुलगा मेरेमोथ याने या तटबंदीच्या पुढच्या भागाची डागडूजी केली. (उरीया हा हक्कोस याचा मुलगा.)
बरेख्याचा मुलगा मशुल्लाम याने त्याच्या पुढच्या भागाचे काम केले. (बरेख्या मशेजबेलचा मुलगा.)
बानाचा मुलगा सादोक याने त्यापुढील भागाची दुरुस्ती केली.
5 तकोवाच्या लोकांनी भिंतीच्या त्यापुढच्या भागाची डागडूजी केली. पण तकोवाच्या नेत्यांनी मात्र आपला राज्यपाल नहेम्या याच्यासाठी काम करायला नकार दिला.
6 यहोयादा आणि मशुल्लाम यांनी जुन्या वेशीची दुरुस्ती केली. यहोयादा पासेहाचा मुलगा आणि मशुल्लाम बसोदयाचा मुलगा. त्यांनी तुळया बसवल्या आणि दरवाजे बिजागऱ्यांनी जोडले. नंतर कड्या व अडसर बसवले.
7 गिबोन आणि मिस्पा येथील लोकांनी भिंतीच्या पुढील भागाचे काम केले. गिबोन मधला मलत्या आणि मेरोनोथ येथला यादोन आणि गिबोन आणि मिस्पा येथील लोकांनी हे काम केले. गिबोन आणि मिस्पा हा भाग फरात नदीच्या पश्चिमेडील भागाच्या राज्यपालांच्या सत्तेखाली होता.
8 हरह याचा मुलगा उज्जियेल याने पुढच्या भागाची डागडुजी केली. उज्जियेल सोनार होता. हनन्या हा सुगंधी द्रव्ये करणाऱ्यांपैकी होता. या लोकांनी रुंद कोटापर्यंत यरुशलेमची डागडुजी केली.
9 हूरचा मुलगा रफाया याने भिंतीचा पुढील भाग बांधून काढला. यरुशलेमच्या अर्ध्या भागाचा हा राज्यपाल होता.
10 हरूमफाचा मुलगा यदाया याने भिंतीच्या पुढच्या भागाचे काम केले. आपल्या स्वतःच्या घरालगतच्या भिंतीची डागडूजी त्याने केली. त्याच्या पुढचा भाग हशबन्याचा मुलगा हत्तूश याने बांधला. 11 हारीमचा मुलगा मल्कीया आणि पहथ-मवाबचा मुलगा हश्शूब यांनी पुढच्या भागाची दुरूस्ती केली. तसेच भट्टी बुरुज ही बांधला.
12 हल्लोहेशचा मुलगा शल्लूम याने त्यापुढचा भाग दुरुस्त केला. या कामात त्याच्या मुलींनी त्याला मदत केली. शल्लूम यरुशलेमच्या अर्ध्या भागाचा आधिकारी होता.
13 हानून नावाचा एक जण आणि जानोहे येथे राहाणारे लोक यांनी खोऱ्याच्या वेशीची दुरुस्ती केली. ही वेस बांधून त्यांनी दारे बिजागऱ्यांवर उभी केली. मग या दारांना त्यांनी कड्या व अडसर घातले. शिवाय त्यांनी पाचशे यार्ड लांबीची भिंतही दुरुस्त केली. थेट उकिरड्याच्या वेशीपर्यंत त्यांनी ही डागडुजी केली.
14 रेखाबचा मुलगा मल्कीया याने ही उकिरड्याची वेस बांधली. मल्कीया बेथ-हक्करेम या जिल्ह्याचा राज्यपाल होता. त्याने वेस दुरुस्त केली. दरवाजे बिजागऱ्यांसह लावले. या दरवाजांना कड्या, अडसर घातले.
15 कोलहोजेचा मुलगा शल्लूम याने कारंज्याजी वेस दुरुस्त केली. शल्लूम मिस्पा जिल्ह्याचा अधिकारी होता. त्याने वेस बांधून तिला छप्पर केले. वेशीचे दरवाजे बिजागऱ्यांसह लावले. मग दारांना कड्या व अडसर बसवले. शिवाय त्याने राजाच्या बागेलगतच्या सिल्लोम तळ्याची भिंतही बांधली. दावीद नगरातून पायऱ्या उतरतात तिथपर्यंत त्याने डागडुजी केली.
16 अजबूकचा मुलगा नहेम्या याने पुढचा भाग दुरुस्त केला. नहेम्या बेथसुरच्या अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी होता. दावीदच्या कबरेसमोरच्या भागापर्यंत त्याने डागडुजी केली. तसेच बांधून काढलेला तलाव आणि वीरगृह इथपर्यंत त्याने काम केले.
17 लेवी घराण्यातील लोकांनी पुढचे काम केले. बानीचा मुलगा रहूम याच्या हाताखाली या लोकांनी काम केले. हशब्याने पुढच्या भागाची डागडुजी केली. नहेम्या कईला जिल्ह्याचा तो अधिकारी होता. त्याने आपल्या जिल्ह्यातर्फे दुरुस्त्या केल्या.
18 त्याच्याभावांनी पुढचे काम केले. हेनदादचा मुलगा बवई याच्या हाताखाली त्यांनी काम केले. कईलाच्या उरलेल्या निम्म्या भागाचा बवई अधिकारी होता.
19 नंतर येशूवाचा मुलगा एजेर पुढचे दुरुस्तीचे काम पार पाडले. एजेर मिस्पाचा राज्यपाल होता. शस्त्रागारापासून भिंतीच्या कोपऱ्यापर्यंतच्या भिंतदुरुस्तीचे काम त्याने केले 20 जक्कायाचा मुलगा बारुख याने पुढची दुरुस्ती केली. बारुखने खूप मेहनत घेऊन कोपऱ्यापासून पुढे एल्याशीबच्या घराच्या प्रवेशद्वारापर्यंतचे काम केले. एल्याशीब हा मुख्य याजक होता. 21 हक्कोसचा मुलगा उरीया. उरीयाचा मुलगा मेरेमोथ याने एल्याशीबच्या घराच्या दारापासून थेट घराच्या शेवटपर्यंत भिंतीचे काम केले. 22 भिंतीच्या पुढच्या भागाची दुरुस्ती त्या भागात राहणाऱ्या याजकांनी केली. [a]
23 बन्यामीन आणि हश्शूब यांनी आपापल्या घरासमोरील भिंत दुरुस्त केली अनन्याचा मुलगा मासेया. मासेयाचा मुलगा अजऱ्या. याने आपल्या घरालगतच्या भिंतीचे दुरस्तीचे काम केले.
24 हेनादादचा मुलगा बिन्नुई याने अजऱ्याच्या घरापासून, भिंतीचे वळण आणि पुढचा कोपरा येथपर्यंतचे काम केले.
25 उजई याचा मुलगा पलाल याने बुरजालगतच्या भिंतीच्या वळणापासूनची दुरुस्ती केली. ही बुरुज राजाच्या वरच्या घराजवळ होता. म्हणजेच राजाच्या पहारेकऱ्यांच्या चौकालगत होता. त्यांनंतर परोशचा मुलगा पदाय याने दुरुस्ती केली.
26 ओफेल टेकडीवर मंदिराचे सेवेकरी राहात असत. त्यांनी जलवेशीच्या पूर्वेपर्यंत आणि तिच्या नजीकच्या बुरुजापर्यंतचे भिंतदुरुस्तीचे काम केले.
27 पुढे तकोवाच्या लोकांनी मोठ्या बुरुजापासून ते थेट ओफेल टेकडीपर्यंतचा उरलेला भाग दुरुस्त केला.
28 घोडा वेशीवरचा भाग याजकांनी दुरुस्त केला. प्रत्येक याजकाने आपापल्या घरापुढच्या भागाची दुरुस्ती केली. 29 इम्मोरचा मुलगा सादोक याने आपल्या घरापुढच्या भिंतीची डागडुजी केली. शखन्याचा मुलगा शमाया याने पुढचा भाग दुरुस्त केला. शमाया हा पूर्ववेशीचा राखणदार होता.
30 शलेम्याचा मुलगा हनन्या याने आणि सालफचा सहावा मुलगा हानून याने भिंतीची पुढची दुरुस्ती केली.
बरेख्याचा मुलगा मशुल्लाम याने आपल्या घरापुढची भिंत दुरुस्त केली. 31 मंदिराचे सेवेकरी आणि व्यापारी यांच्या घरापर्यंतच्या भिंतीच्या भागाची दुरुस्ती मल्कीया याने केली. हा भाग तपासणी वेशीसमोर येतो. भिंतीच्या कोपऱ्यावरील जागे खोलीपर्यंतच्या भिंतीची दुरुस्ती मल्कीयाने केली. मल्कीया सोनार होता. 32 कोपऱ्यावरील खोली आणि मेंढरांची वेस यांच्या दरम्यानच्या भिंतीची दुरुस्ती सोनार आणि व्यापारी यांनी केली.
बर्णबा व शौल खास कामसाठी निवड होते
13 अंत्युखिया येथील ख्रिस्ती मंडळीत काही संदेष्टे व शिक्षक होते. ते पुढीलप्रमाणे: बर्णबा, निग्र शिमोन, लूक्य कुरेनेकर, मनाएन (जो हेरोदाबरोबर लहानाचा मोठा झाला), आणि शौल. 2 ही सर्व माणसे देवाची सेवा करीत असत व उपास करीत असत. पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, “बर्णबा व शौलाला माझ्याकडे द्या. एक खास काम त्यांच्याकडून मला करवून घ्यायचे आहे. हे काम करण्यासाठी मी त्यांना निवडले आहे”
3 म्हणून मंडळीने उपास व प्रार्थना केल्या, त्यांनी बर्णबा व शौल यांच्या डोक्यांवर हात ठेवून प्रार्थना केली, मग त्यांना पाठवून दिले.
कुप्र येथे बर्णबा व शौल
4 पवित्र आत्म्याच्या द्वारे बर्णबा व शौल यांना पाठविण्यात आले. ते सलुकीया शहराला गेले. नंतर ते समुद्रमार्गे कुप्र बेटावर गेले. 5 जेव्हा बर्णबा व शौल सलमीन शहरात आले, तेव्हा त्यांनी देवाचा संदेश यहूदी लोकांच्या सभास्थानात दिला. मार्क म्हटलेला योहान त्यांच्या मदतीला होता.
6 ते संपूर्ण बेट पार करुन पफे शहरास गेले. पफे येथे त्यांना एक यहूदी मनुष्य भेटला. तो जादूच्या करामती करीत असे. त्याचे नाव बर्येशू होते. तो खोटा संदेष्टा होता. 7 बर्येशू नेहमी सिर्ग्य पौल याच्या निकट राहण्याचा प्रयत्न करायचा. सिर्ग्य पौल राज्यपाल होता. व तो हुशार होता. त्याने बर्णबा व शौल यांना आपणाकडे बोलाविले. त्याला त्यांचा संदेश ऐकावयाचा होता. 8 परंतु अलीम जादूगार हा बर्णबा व शौल यांच्या विरुद्ध होता. (ग्रीक भाषेत बर्येशूसाठी अलीम शब्द वापरतात. त्याचा अर्थ तोच आहे.) राज्यपालाने येशूवर विश्वास ठेवू नये म्हणून अलीमने त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. 9 पण शौल आत्म्याने भरला होता. (शौलाचे दुसरे नाव पौल) पौलाने अलीमकडे (बर्येशूकडे) पाहिले व म्हणाला, 10 “सैतानाच्या पुत्रा! जे काही योग्य असेल त्या सर्वांचा तू शत्रू आहेस. तू दुष्टाईने व खोटेपणाने भरलेला आहेस. तू देवाचे सत्य नेहमी खोटेपणात बदलण्याचा प्रयत्न करतोस! 11 आता तुला देवाने स्पर्श करताच तू आंधळा होशील. भर दिवसाच्या उन्हातही तुला काही काळ दिसणार नाही.”
मग अलीमसाठी सर्व काही अंधकारमय झाले, चाचपडत तो इकडेतिकडे फिरु लागला. कोणीतरी मदतीला घेऊन त्याचा हात धरुन जाण्यासाठी प्रयत्न करु लागला. 12 जेव्हा राज्यपालाने ते पाहिले (सार्ग्य पौल) त्याने विश्वास ठेवला. प्रभूच्या शिक्षणाने तो चकित झाला.
पौल व बर्णबा कुप्र सोडतात
13 पौल व जे लोक त्याच्याबरोबर होते ते पफेकडून समुद्रमार्गे निघाले. ते पंफुल्यातील पिर्गा गावी आले. परंतु योहान (मार्क) त्यांना सोडून परत यरुशलेमला गेला. 14 त्यांनी त्यांचा प्रवास पुढे चालू ठेवला. पिर्गापासून पुढे ते अंत्युखियास गेले. (जे पिसीडीयाजवळ होते.)
अंत्युखियात असताना शब्बाथ दिवशी ते यहूदी सभास्थानात गेले आणि तेथे बसले. 15 पवित्र शास्त्रातील नियमशास्त्र आणि संदेष्टयांच्या लोखाणाचे वाचन झाले, मग सभास्थानच्या अधिकाऱ्यांनी पौल व बर्णबाला निरोप पाठविला: “बधूनो, येथील लोकांना काही मदत होईल असे काही तरी तुम्हांला सांगायचे असेल तर कृपा करुन बोला!”
16 पौल उभा राहिला. आणि आपला हात उंचावून (लोकांचे लक्ष वेधून घेऊन) म्हणाला, “माझ्या यहूदी बांधवानो व इतर लोकहो, जे तुम्ही खऱ्या देवाची उपासना करता, ते कृपा करुन माझे ऐका! 17 इस्राएलाच्या देवाने आपल्या वाडवडिलांची निवड केली. ते ज्या काळात इजिप्तमध्ये परकी म्हणून राहत होते, त्याकाळात देवाने त्यांना यशस्वी होण्यास मदत केली. मोठ्या सामर्थ्याने देवाने त्यांना त्या देशातून बाहेर आणले. 18 आणि देवाने अरण्यातील चाळीस वर्षांत त्यांना सहनशीलता दाखविली. 19 देवाने कनानच्या प्रदेशातील सात राष्ट्रांना नाश केला. देवाने त्यांच्या जमिनी त्याच्या लोकांना दिल्या. 20 हे सर्व साधारणपणे चारशेपन्रास वर्षांत घडले.
“त्यानंतर देवाने आपल्या लोकांना शास्ते (नेते) दिले. ते शमुवेल संदेष्टेयाच्या काळापर्यंत. 21 मग लोकांनी राजाची मागणी केली. देवाने त्यांना किशाचा पुत्र शौल याला दिले. शौल हा बन्यामिनाच्या वंशातील होता. तो चाळीस वर्षेपर्यंत राजा होता. 22 नंतर देवाने शौलाला काढून टाकले. देवाने दावीदाला त्यांचा राजा केले. दावीदाविषयी देव असे बोलला: दावीद, इशायाचा पुत्र, हा मला आवडला, मला ज्या गोष्टी पाहिजेत त्या सर्व तो करील.
23 “याच दाविदाच्या वंशजातून देवाने इस्राएल लोकांचा तारणारा आणिला. तो वंशज येशू आहे. देवाने हे करण्याचे अभिवचन दिले होते. 24 येशू येण्यापूर्वी सर्व यहूदी लोकांना योहानाने उपदेश केला. त्यांच्या अंतःकरणात बदल व्हावा म्हणून योहानाने लोकांना सांगितले की, त्यांनी बाप्तिस्मा घेतला पाहिजे. 25 जेव्हा योहान आपले काम संपवत होता, तेव्हा तो म्हणाला, ‘मी कोण आहे असे तुम्हांला वाटते? मी ख्रिस्त नाही. तो नंतर येत आहे. त्याच्या वहाणांचे बंद सोडण्याची सुद्धा माझी लायकी नाही.’
26 “माझ्या बंधूनो, अब्राहामच्या कुटुंबातील पुत्रांनो, आणि तुम्ही यहूदी नसलेले पण खऱ्या देवाची उपासना करणारे, ऐका! या तारणाची बातमी आम्हांला सांगितली गेली. 27 जे यरुशलेममध्ये राहतात ते यहूदी व यहूदी पुढारी यांना जाणीव झाली नाही की, येशू हा तारणारा होता. येशूविषयी जे शब्द भविष्यवाद्यांनी लिहिले ते यहूदी लोकांसाठी प्रत्येक शब्बाथाच्या वारी वाचले गेले. परंतु त्यांना ते समजले नाही. यहूदी लोकांनी येशूचा धिक्कार केला, जेव्हा त्यांनी असे केले, तेव्हा त्यांनी भविष्यावाद्यांचे म्हणणे खरे ठरविले! 28 येशूने का मरावे याचे खरे कारण ते शोधू शकले नाहीत. पण त्यांनी पिलाताला सांगितले की त्याला जिवे मारावे.
29 “शास्त्रामध्ये येशूच्याबद्दल या गोष्टी लिहिल्या होत्या की, जे वाईट ते त्याच्याबाबतीत घडणारे होते. ते सर्व या यहूदी लोकांनी येशूला केले. मग त्यांनी येशूला वधस्तंभावरुन खाली घेतले. व त्याला कबरेत ठेवले. 30 पण देवाने त्याला मरणातून उठविले 31 यानंतर, पुष्कळ दिवसांपर्यंत जे त्याच्याबरोबर होते, त्यांना गालीला पासून यरुशलेमपर्यंत येशूने दर्शन दिले. ते लोक आता त्याचे शाक्षीदार म्हणून लोकांसमोर आहेत.
32 “आम्ही तुम्हांला देवाने जे अभिवचन आमच्या वाडवडिलांना (पूर्वजांना) दिले त्याविषयी सुवार्ता सांगतो. 33 आम्ही त्यांची लेकरे (वंशज) आहोत आणि देवाने हे अभिवचन आमच्या बाबतीत खरे करुन दाखविले. देवाने हे येशूला मरणातून पुन्हा उठविण्याद्वारे केले. आम्ही याविषयी स्तोत्रसंहितेमध्येसुद्धा वाचतो:
‘तू माझा पुत्र आहेस.
आज मी तुझा पिता झालो आहे.’ (A)
34 देवाने येशूला मरणातून उठविले. येशू पुन्हा कबरेत जाऊन माती बनणार नाही. म्हणून देव म्हणाला:
‘दाविदाला देण्यात आलेली पवित्र
व सत्यअभिवचने मी तुला देईन.’ (B)
35 पण दुसऱ्या ठिकाणी देव म्हणतो:
‘तू तुझ्या पवित्र पुरुषाला कबरेत कुजण्याचा अनुभव घडू देणार नाहीस.’ (C)
36 “ज्या काळात दाविद राहत होता तेव्हा त्याने देवाच्या इच्छेप्रमाणे केले. मग तो मेला. आपल्या वाडवडिलांशेजारी त्याला पुरले. आणि कबरेत त्याचे शरीर कुजले 37 पण ज्याला देवाने मरणातून पुन्हा उठविले, त्याला कुजण्याचा अनुभव आला नाही. 38-39 बंधूनो, आम्ही जे सांगत आहोत ते तुम्ही समजून घेतले पाहिजे: या एकाकडूनच तुमच्या पापांची क्षमा तुम्हांला मिळू शकते. मोशेचे नियमशास्त्र तुम्हांला तुमच्या पापांपासून मुक्त करणार नाही. पण प्रत्येक व्यक्ति जी त्याच्यावर विश्वास ठेवते, ती त्याच्याद्वारे त्या सर्वाविषयी न्यायी ठरविली जाते. 40 संदेष्टयांनी सांगितलेल्या काही गोष्टी घडतील, सावध राहा! या गोष्टी तुमच्याबाबत होऊ नयेत म्हणून जपा. भविष्यवादी म्हणाला:
41 ‘ऐका, जे तुम्ही संशय धरता!
तुम्ही चकित होता पण मग दूर जाता व मरता;
कारण तुमच्या काळामध्ये
मी (देव) काही तरी करीन ज्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही कोणी
ते स्पष्ट करुन सांगितले तरी
तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही.’” (D)
42 जेव्हा पौल व बर्णबा (सभास्थानातून) जाऊ लागले, तेव्हा लोक म्हणाले की, पुढील शब्बाथाच्या दिवशी परत या आणि आम्हाला याविषयी अधिक सांगा. 43 सभास्थानातील बैठक संपल्यावर अनेक यहूदी लोक आणि यहूदी मतानुसारी चालणारे इतर धार्मिक लोक पौल व बर्णबा यांच्यामागे गेले. पौल व बर्णबा यांनी त्या लोकांना देवाच्या कृपेत टिकून राहण्यास कळकळीची विनंति केली.
44 पुढील शब्बाथवारी शहरातील जवळ जवळ सर्व लोक देवाचे वचन ऐकण्यासाठी एकत्र आले. 45 यहूदी लोकांनी त्या सर्वांना तेथे पाहिले. त्यामुळे यहूदी लोकांना मत्सर वाटू लागला. तेही काही फार वाईट गोष्टी बोलले आणि जे पौल बोलला त्याविरुद्ध वाद उपस्थित केला. 46 पण पौल व बर्णबा फार धैर्याने बोलले. ते म्हणाले. “देवाचा संदेश तुम्हा यहूद्यांना प्रथम आम्हांला सांगितलाच पाहिजे. पण तुम्ही ऐकण्यास नकार देत आहात. तुम्ही तुमचे स्वतःचेच नुकसान करुन घेत आहात. व अनंतकाळचे जीवन प्राप्त करुन घेण्यासाठी अपात्र ठरत आहात! म्हणून आम्ही आता दुसऱ्या देशांतील यहूदीतर लोकांकडे जाऊ! 47 प्रभूने आम्हांला हे करण्यास सांगितले आहे. प्रभु म्हणाला:
‘दुसऱ्या देशांसाठी मी तुम्हाला प्रकाश असे केले यासाठी की,
तुम्ही पृथ्वीवरील सर्व लोकांना तारणाचा मार्ग दाखवू शकाल.’” (E)
48 जेव्हा यहूदी नसलेल्यांनी पौलाला असे बोलताना ऐकले तेव्हा ते फार आनंदित झाले, देवाच्या संदेशाचा त्यांनी बहुमान केला. आणि त्या लोकांपैकी पुष्कळांनी संदेशावर विश्वास ठेवला, कारण ते अनंतकाळच्या जीवनासाठी निवडले गेले होते.
49 आणि म्हणून देवाचा संदेश संपूर्ण देशात सांगितला गेला. 50 तेव्हा यहूदी लोकांनी शहरातील काही धर्मिक स्त्रिया व पुढारी यांना भडकावून दिले. त्या लोकांनी पौल व बर्णबा यांच्याविरुद्ध अनेक वाईट गोष्टी केल्या आणि त्यांना शहराबाहेर घालवून दिले. 51 मग पौल व बर्णबा यांनी आपल्या पायाची धूळ झटकली. व ते इकुन्या शहराला गेले. 52 पण अंत्युखियातील येशूचे अनुयायी आनंदाने व पवित्र आत्म्याने भरुन गेले होते.
2006 by World Bible Translation Center