M’Cheyne Bible Reading Plan
अब्राम कनान देशाकडे माघारे येतो
13 अशा रीतीने अब्रामाने मिसर देश सोडला व तो आपली बायको साराय, पुतण्या लोट आणि त्यांची सर्व मालमत्ता घेऊन नेगेब मधून प्रवास करीत गेला. 2 त्या काळी अब्राम फार श्रीमंत झाला होता; त्याच्याजवळ पुष्कळ गुरेढोरे, शेरेडेमेंढरे, गाढवे व उंट तसेच सोने चांदी इत्यादी भरपूर होते.
3 अब्राम इकडेतिकडे सतत प्रवास करीत राहिला; त्याने नेगेब सोडले व तो पुन्हा मागे बेथेलला गेला; बेथेल व आय यांच्या दरम्यान याच ठिकाणी त्याने त्याच्या कुटुंबासह तळ दिला होता व 4 परमेश्वराची उपासना करण्याकरिता त्याने एक वेदी बांधली होती, म्हणून त्याच ठिकाणी अब्रामाने परमेश्वराची उपासना केली.
अब्राम व लोट वेगळे होतात
5 या काळात लोट अब्रामाबरोबर प्रवास करीत होता. लोट याजकडे खूप, गुरेढोरे व तंबू होते 6 अब्राम व लोट यांची गुरेढोरे इतकी वाढली की त्या दोघांना एकत्र राहाण्यास ती जागा व तो प्रदेश पुरेना, 7 शिवाय अब्राम व लोट यांच्या गुराख्यांची एकसारखी भांडणे होऊ लागली; त्याकाळी त्या देशात कनानी व परिज्जी लोकांची वस्ती होती.
8 तेव्हा अब्राम लोटास म्हणाला, “तुझ्या माझ्यामध्ये तसेच तुझे व माझे गुराखी यांच्यामध्ये भांडणतंटा नसावा, कारण आपण सगळे भाऊबंद आहोत. 9 तेव्हा आपण वेगळे व्हावे हे आपल्यासाठी बरे आहे तुला पाहिजे तो प्रदेश तू निवड; तू जर डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, आणि तू जर उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन.”
10 लोटाने यार्देन दरीकडे नजर टाकली तेव्हा तेथे सर्वत्र भरपूर पाणी असल्याचे त्याला दिसले (परमेश्वराने सदोम व गमोरा या नगरांचा नाश केला त्याच्या आधीची ही घटना आहे. त्यावेळी थेट सोअरापर्यंत पसरलेले यार्देन नदीचे खोरे परमेश्वराच्या बागे सारखे सुंदर होते मिसर मधील प्रदेशाप्रमाणे ही भूमी चांगली होती.) 11 तेव्हा लोटाने यार्देन नदीच्या खोऱ्यात राहाणे निवडले; मग ते दोघे वेगळे झाले आणि लोटाने पूर्वेकडे प्रवास करण्यास सुरवात केली; 12 अब्राम कनान देशातच राहिला आणि लोट यार्देनेच्या तळवटीतील शहरातून राहिला; लोट दक्षिणेकडे दूर सदोमाला गेला आणि तेथेच त्याने आपला तबू ठोकला. 13 सदोम नगराचे लोक अतिशय दुष्ट व वाईट असल्याचे परमेश्वराला माहित होते.
14 लोट निघून गेल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तुझ्या अवतीभोवती, उत्तरेकडे व दक्षिणेकडे, पूर्वेकडे व पश्चिमेकडे दूरवर नजर टाकून पाहा; 15 तू पाहातोस हा सगळा प्रदेश मी तुला आणि तुझ्यानंतर तुझ्या संततीला कायमचा देईन. 16 मी तुझी संतती या पृथ्वीवरील धुळीच्या कणाइतकी करीन, ती इतकी करीन की जर कोणाला ते कण मोजता येतील तर तुझ्या संततीचीही गणना होईल. 17 तर उठून जा व या तुझ्या प्रदेशातून फिरुन ये; हा सर्व प्रदेश मी आता तुला देत आहे.”
18 तेव्हा अब्रामाने आपले तंबू हलविले व हेब्रोन शहरजवळील मम्रेच्या मोठया वृक्षांत तो राहावयास गेला; परमेश्वराची उपासना करण्यासाठी त्याने तेथे वेदी बांधिली.
काही यहूदी येशूवर टीका करतात(A)
12 त्या दिवशी म्हणजे शब्बाथ [a] दिवशी येशू धान्याच्या शेतातून चालला होता. शेतात पीक उभे होते. येशूच्या शिष्याना भूक लागली होती, म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले. 2 जेव्हा परूश्यांनी हे पाहिले, तेव्हा ते येशूला म्हणाले, “पाहा, तुमचे शिष्य शब्बाथ दिवशी जे करू नये ते करीत आहेत.”
3 तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “दाविदाला व त्याच्याबरोबरच्या माणसांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले, हे तुम्ही वाचले आहे काय? 4 देवाच्या मंदिरात तो गेला आणि त्याने व त्याच्या बरोबर असलेल्या लोकांनी समर्पित केलेल्या भाकरी खाल्ल्या. असे करणे नियमशास्त्राच्या विरूद्ध होते. फक्त याजकांनाच ती भाकर खाण्याची परवानगी होती. 5 आणि तुम्ही नियमशास्त्र वाचले आहे की, प्रत्येक शब्बाथाच्या दिवशी मंदिरातील याजक मंदिरात शब्बाथ पवित्र पाळण्याविषयीचा नियम मोडीत असत परंतु ते तसे करू शकत असत. 6 मी तुम्हांला सांगतो की, मंदिरापेक्षा महान असा कोणीतरी येथे आहे. 7 पवित्र शास्त्र म्हणते, ‘मला यज्ञपशूची अर्पणे नकोत, तर मला दया हवी.’ [b] याचा खरा अर्थ तुम्हांला समजला असता तर तुम्ही या निर्दोष लोकांना दोष लावला नसता.
8 “कारण मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा प्रभु आहे.”
येशू हात वाळलेल्या माणसाला बरे करतो(B)
9 येशूने ते ठिकाण सोडले व यहूद्यांच्या सभास्थानात तो गेला. 10 सभास्थानात हात वाळलेला एक मनुष्य होता. काही यहूद्यांनी येशूवर काही दोषारोप करता यावा या हेतूने त्याला विचारला, “शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय?”
11 येशूने त्यांना उत्तर दिले, “जर तुमच्यापैकी एखाद्याकडे मेंढरू असले व शब्बाथ दिवशी ते खड्ड्यात पडले, तर तो त्याला वर काढणार नाही काय? 12 तर मग मनुष्य मेंढरापेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान आहे. म्हणून नियमशास्त्र लोकांना शब्बाथ दिवशी चांगले करण्याची मोकळीक देते.”
13 मग येशू त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्याला म्हणाला, “तुझा हात पुढे सरळ कर.” त्या मनुष्याने हात लांब केला व तो हात बरा झाला आणि दुसऱ्या हातासारखाच चांगला झाला. 14 नंतर परूश्यांनी बाहेर जाऊन त्याला कसे मारावे याविषयी मसलत केली.
येशू देवाचा निवडलेला सेवक
15 परूशी काय करीत आहेत ते येशूला माहीत होते. म्हणून येशू तेथून गेला. पुष्कळ लोक येशूच्या मागे निघाले व त्याने जे कोणी रोगी होते, त्या सर्वाना बरे केले. 16 आणि त्याने त्यांना निक्षून सांगितले की, तो कोण आहे, हे इतरांना सांगू नका. 17 यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले गेले होते ते पूर्ण होण्यासाठी त्याने असे म्हटले.
18 “हा माझा सेवक,
याला मी निवडले आहे.
मी त्याजवर प्रीति करतो,
आणि त्याच्याविषयी मला संतोष वाटतो.
मी आपला आत्मा त्याच्यावर ठेवीन,
आणि तो यहूदीतरांसाठी योग्य न्यायाची घोषणा करील.
19 तो वाद घालणार नाही किंवा ओरडणार नाही,
रस्त्यावर लोक त्याचा आवाज ऐकणार नाहीत.
20 वाकलेला बोरू तो मोडणार नाही
आणि मंदावलेली वात तो विझविणार नाही.
योग्य निर्णयाचा विजय होईपर्यंत तो असे करील.
21 सर्व लोक त्याच्यावर आशा ठेवतील.” (C)
येशूचे सामर्थ्य देवाकडून आहे(D)
22 मग काही माणसांनी एकाला येशूकडे आणले. तो मनुष्य आंधळा व मुका होता व त्याच्यामध्ये भूत होते. येशूने त्या माणसाला बरे केले व तो बोलू लागला व पाहू लागला. 23 सर्व लोक चकित झाले, ते म्हणाले, “हा दाविदाचा पुत्र असेल काय?”
24 परूश्यांनी लोकांना हे बोलताना ऐकले. परूशी म्हणाले, “भुते काढण्यासाठी येशू बालजबूल सैतानाचे सामर्थ्य वापरतो आणि बालजबूल हा तर भुतांचा प्रमुख आहे.”
25 परूशी कसला विचार करीत आहेत ते येशूला जाणवत होते. म्हणून येशू त्यांना म्हणाला, “आपसात लढणारी राज्ये नाश पावतात व फूट पडलेले शहर किंवा घर टिकत नाही. 26 आणि जर सैतानच सैतानला काढतो तर त्यांच्यात मतभेद आहे, त्यांच्यात फूट आहे मग त्याचे राज्य कसे टिकेल? 27 आणि मी जर बालजबुलाच्या सहाय्याने भुते काढतो तर तुमची मुले कोणाच्या सामर्थ्याने भुते काढतात. म्हणून तुमचे स्वतःचे लोक तुम्हांला चूक ठरवितील. 28 परंतु मी जर देवाच्या साहाय्याने भुते काढतो तर देवाचे राज्य तुमच्यापर्यंत आले आहे हे निश्र्चित समजा. 29 किंवा एखाद्या बलवान मनुष्याच्या घरात शिरून, त्याच्या घरातील सर्व वस्तूची चोरी जर कोणाला करायची असेल तर प्रथम त्या बलवान मनुष्याला तो बांधून टाकील व मग तो चोरी करील. 30 एखादा मनुष्य जर माझे समर्थन करीत नसेल, तर तो माझ्याविरुद्ध आहे. जो मनुष्य माझ्याबरोबर काम करीत नाही तो माझ्याविरुद्ध काम करीत आहे.
31 “म्हणून मी तुम्हांला सांगतो, मनुष्यांना ते करीत असलेल्या सर्व पापांची क्षमा करण्यात येईल. ते जे काही वाईट बोलतील त्याबद्दलही क्षमा करण्यात येईल पण जर कोणी पवित्र आत्म्याविरूद्ध बोलेल, तर त्याला क्षमा करण्यात येणार नाही. 32 एखादा मनुष्य जर मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल तर त्याला क्षमा करण्यात येईल पण जो कोणी पवित्र आत्म्याविरूद्ध बोलेल त्याला क्षमा होणार नाही. त्याला या काळीही क्षमा होणार नाही व भविष्यातही होणार नाही.
ज्या गोष्टी तुम्ही करता त्या तुम्ही कोण आहात हे दाखवितात(E)
33 “जर तुम्हांला चांगले फळ हवे असले, तर झाड चांगले करा. जर तुम्ही झाड चांगले करणार नाही. तर फळही चांगले येणार नाही. कारण झाड त्याच्या फळावरून ओळखले जाते. 34 अहो सापाच्या पिल्लांनो. तुम्ही वाईट असता तुम्हांला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? जे अंतःकरणात आहे तेच तोंडावाटे बाहेर पडते. 35 चांगला मनुष्य आपल्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो. 36 आणखी मी तुम्हांस सांगतो की. जो प्रत्येक व्यर्थ शब्द लोक बोलतील त्याचा हिशेब ते न्यायाच्या दिवशी देतील. 37 कारण तू आपल्या बोलण्यावरून न्यायी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरूनच दोषी ठरशील.”
यहूदी लोक येशूकडे पुरावा मागतात(F)
38 काही नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी यांच्यापैकी काही जणांनी येशूला म्हटले, “गुरुजी, तुमच्या हातून एखादे चिन्ह पहावे अशी आमची इच्छा आहे.”
39 येशूने उत्तर दिले, “जे लोक देवाशी प्रामाणीक नाहीत, पापी आहेत असे लोक पुराव्यासाठी चमत्कार पाहू इच्छितात. पण योना संदेष्ट्याशिवाय दुसरे चिन्ह तुम्हांला मिळणार नाही. 40 कारण योना जसा तीन दिवस व तीन रात्री माशाच्या पोटात होता तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. 41 जेव्हा तुमच्या पिढीचा न्याय होईल, तेव्हा निनवेचे लोक उभे राहतील, तुमच्याविरूद्ध साक्ष देतील आणि तुम्हांला दोष देतील. कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला. आणि आता तर तुमच्यामध्ये योनापेक्षा महान असा कोणी एक येथे आहे.
42 “न्यायाच्या दिवशी दक्षिणेची राणी [c] या पिढीबरोबर उभी राहून हिला दोषी ठरवील. कारण शलमोनाचे ज्ञान ऐकायला ती पृथ्वीच्या शेवटापासून आली. आणि शलमोनापेक्षा महान असा कोणी येथे आहे.
सध्याचे लोक पापी आहेत(G)
43 “जेव्हा अशुद्ध आत्मा माणसाला सोडून बाहेर निघून जातो तेव्हा तो पाणी नसलेल्या ठिकाणाहून विसावा शोधीत फिरतो पण तो त्याला मिळत नाही. 44 तेव्हा तो म्हणतो, जेथून मी आलो त्या माझ्या घरात मी परत जाईन आणि जेव्हा तो परत येतो तेव्हा ते घर रिकामे असलेले तसेच स्वच्छ व नीटनेटके असे त्याला दिसते. 45 नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा वाईट असे दुसरे सात आणखी आत्मे आपल्याबरोबर घेतो व ते आत शिरून त्याला झपाटतात व त्याच्यात राहतात. मग त्या माणसाची शेवटची स्थिति पहिल्यापेक्षा वाईट होते. तसेच आजच्या ह्या पापी पिढीचे होईल.”
येशूचे अनुयायी हेच त्याचे कुटुंब(H)
46 तो लोकांशी बोलत असता, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याशी बोलण्यासाठी बाहेर वाट पाहट उभे होते. 47 तेव्हा कोणी तरी त्याला म्हणाले, “तुमची आई व भाऊ बाहेर उभे आहेत. ते तुमच्याशी बोलण्याची वाट पाहत आहेत.”
48 त्याच्याशी बोलणाऱ्याला त्याने उत्तर दिले, “कोण माझी आई? कोण माझा भाऊ?” 49 मग तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, “पाहा हे माझे आई व माझे भाऊ आहेत. 50 कारण माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेनुसार जे वागतात, तेच माझे भाऊ, बहीण आणि आई आहेत.”
राजा अर्तहशश्त नहेम्याला यरुशलेमला पाठवतो
2 राजा अर्तहशश्तच्या कारकीर्दीच्या विसाव्या वर्षी नीसान महिन्यात राजासमोर द्राक्षारस आणला गेला. मी तो उचलला आणि राजाला दिला. या पूर्वी मी कधी राजाच्या सहवासात असताना उदास नव्हतो पण यावेळी मात्र कष्टी होतो. 2 म्हणून राजाने मला विचारले, “तुला बरे वाटत नाही का? तू असा खिन्न का दिसतोस? तू मनातून दु:खी दिसतोस.”
तेव्हा मी फार घाबरलो. 3 पण, भ्यायलेला असूनही मी राजाला म्हणालो, “राजा चिरायू होवो! माझ्या पूर्वजांचे जिथे दफन झाले आहे ते नगर उद्ध्वस्त झाले आहे. म्हणून मी दु:खी आहे. नगराच्या वेशीसुध्दा आगीत जळून गेल्या आहेत.”
4 यावर राजा मला म्हणाला, “तुझ्यासाठी मी काय करावे असे तुला वाटते?”
उत्तर देण्यापूर्वी मी स्वर्गातील देवाची प्रार्थना केली. 5 मग मी राजाला म्हणालो, “राजाची मर्जी असेल आणि मी तुमच्याशी भलेपणाने वागलो असेन तर कृपया मला माझ्या पूर्वजांचे जिथे दफन झाले आहे त्या यहुदातील यरुशलेम नगराला पाठवावे. तिथे जाऊन नगराची पुन्हा उभारणी करण्याची माझी इच्छा आहे.”
6 राणी राजाजवळच बसली होती. त्या दोघांनी मला विचारले, “तुला या कामासाठी जाऊन यायला किती दिवस लागतील? तू परत केव्हा येशील?”
राजा मला जाऊ द्यायला आनंदाने तयार झाला म्हणून मी ही त्याला विशिष्ट मुदत सांगितली. 7 मी पुढे राजाला असेही म्हणालो, “राजाची माझ्यावर मेहेरनजर असेल तर माझी आणखी एक विनंती आहे. फरात नदीच्या पश्चिमेकडील अधिकाऱ्यांसाठी काही पत्रे मला द्यावीत. म्हणजे ती त्यांना दाखवल्यावर यहुदाच्या वाटेवर त्यांच्या हद्दीतून सुखरुप जायला ते मला परवानगी देतील. 8 शिवाय दरवाजे, भिंती, प्रार्थनामंदिराच्या भोवतालच्या भिंती आणि माझे घर यांच्यासाठी मला मजबूत लाकूड लागणार आहे. त्यासाठी राजाचा वनाधिकारी आसाफ याला द्यायला मला पत्र द्यावे.”
राजाने मला तशी पत्रे आणि मी मागितले ते सर्व काही दिले. देवाची माझ्यावर कृपा असल्यामुळे राजाने हे दिले.
9 मग मी फरात नदीच्या पश्चिमेकडे असलेल्या, प्रदेशाच्या अधिकाऱ्यांकडे गेलो. त्यांना राजाने दिलेली पत्रे दिली. राजाने माझ्यासोबत सैन्यातले अधिकारी आणि घोडेस्वारही पाठवले होते. 10 सनबल्लट आणि तोबीया यांना माझा बेत ऐकून माहीत होता. इस्राएलींच्या मदतीसाठी कोणी एक जण आला आहे याने ते नाराज झाले व रागावले. सनबल्लट होरोन या गावचा होता आणि तोबीया अम्मोनी आधिकारी होता.
नहेम्या यरुशलेमच्या तटबंदीची पाहणी करतो
11-12 मी यरुशलेमला गेलो आणि तीन दिवस राहिलो. मग रात्री काहीजणांना घेऊन बाहेर पडलो. यरुशलेमसाठी काही करण्याचा जो विचार देवाने माझ्या मनात जागवला होता त्याबद्दल मी कोणाशी काही बोललो नव्हतो. मी ज्या घोड्यावर बसलो होतो तो वगळता आणखी घोडे माझ्याबरोबर नव्हते. 13 अंधार असतानाच खोऱ्याच्या वेशीतून मी बाहेर पडलो.मकरकूप विहिर आणी राखेच्या ढिगाची वेस यांच्या दिशेने मी कूच केले. यरुशलेमची मोडलेली तटबंदीची भिंत आणि त्यातील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली प्रवेशद्वारे यांची पहाणी केली. 14 मग कारंजाचे प्रवेशद्वार आणि राजाचा तलाव यांच्याकडे गेलो. पण माझा घोडा पलीकडे जाऊ शकेल इतकीही जागा नसल्याचे जवळ गेल्यावर माझ्या लक्षात आले. 15 तेव्हा मी अंधारातच भिंतीची बारकाईने तपासणी करत खोऱ्यातून वरती गेलो,शेवटी मी मागे वळलो आणि परतून खोऱ्याच्या वेशीतून आत शिरलो. 16 इस्राएली अधिकारी आणि महजन यांना माझा ठावठिकाणा माहीत नव्हता. माझे काय चालले आहे ते त्यांना माहीत नव्हते. यहुदी, याजक, राजाचे कुटुंबीय, अधिकारी आणि जे बांधकामाचे काम करणार होते यांच्यापैकी कोणालाही मी काही बोललो नव्हतो.
17 मग मी या सगळयांना म्हणालो, “इथे आपल्याला काय त्रास आहे तो तुम्ही पाहातच आहात. यरुशलेम उजाड आणि उद्ध्वस्त झाले आहे. त्याच्या वेशी आगीत जळून गेल्या आहेत. चला, आता आपण यरुशलेमची तटबंदी पुन्हा बांधू या. म्हणजे आपली आणखी अप्रतिष्ठा होणार नाही.”
18 देवाची माझ्यावर कृपा असल्याचेही मी त्यांना सांगितले. राजा माझ्याशी काय बोलला ते मी त्यांना सांगितले. तेव्हा ते लोक म्हणाले, “आपण आत्ताच कामाला लागू या!” म्हणून आम्ही या सत्कार्याला सुरुवात केली. 19 पण आम्ही पुन्हा बांधकाम करत असल्याची खबर होरोनचा सनबल्लट, अम्मोनी अधिकारी तोबीया आणि अरबी गेशेम यांना लागली. त्यांनी अगदी नीच पातळीवर जाऊन आमचा उपहास केला. ते म्हणाले, “हे काय करताय तुम्ही? राजाविरुध्द बंड करणार आहात का?”
20 पण मी त्यांना असे म्हणालो: “स्वर्गातील देवच आम्हाला यश देईल. आम्ही देवाचे सेवक असून आम्ही हे नगर पुन्हा उभारू. या कामात तुम्ही काही मदत करु शकणार नाही. तुमच्या कुटुंबातील कोणीही यरुशलेममध्ये राहिलेले नाही. तुमच्या मालकीची जमीन येथे नाही. या जागेत असायचा तुम्हाला काही अधिकार नाही.”
हेरोद अग्रिप्पा ख्रिस्ती मंडळीला दुखावतो
12 त्याच काळात हेरोद राजा मंडळीतील काही विशिष्ट विश्वासणऱ्यांचा छळ करु लागला. 2 हेरोदाने याकोबाला तलवारीने मारण्याची आज्ञा केली, याकोब हा योहानाचा भाऊ होता. 3 हेरोदाने पाहिले की, यहूदी लोकांना हे आवडले आहे. म्हणून त्याने पेत्रालासुद्धा अटक करण्याचे ठरविले. (हे वल्हांडण सणाच्या काळात घडले.) 4 हेरोदाने पेत्राला अटक करुन तुरुंगात टाकले. सोळा शिपाई पेत्राभोवती पहारा देत होते. हेरोदाला वल्हांडण होईपर्यंत थांबायचे होते. मग त्याने पेत्राला लोकांसमोर आणण्याची योजना केली. 5 म्हणून पेत्राला तुंगात ठेवण्यात आले. पण मंडळी सातत्याने पेत्रासाठी देवाकडे प्रार्थना करीत होती.
पेत्र तुरुंग सोडतो
6 पेत्र दोन शिपायांच्यामध्ये झोपला होता. त्याला साखळ्यांनी बांधले होते. तुरुंगाच्या दाराजवळ आणखी काही शिपाई पहारा देत होते. ती रात्रीची वेळ होती व हेरोदाने असा विचार केला की, दुसऱ्या दिवशी पेत्राला लोकांसमोर आणावे. 7 अचानक देवाचा दूत तेथे उभा राहिला. तुरुंगाच्या खोलीत एकदम प्रकाश पडला. देवदूताने पेत्राच्या कुशीला स्पर्श करुन त्याला उठविले. देवदूत म्हणाला, “लवकर ऊठ!” तेव्हा पेत्राच्या हातातील साखळ्या गळून पडल्या. 8 देवदूत पेत्राला म्हणाला, “कपडे घाल व तुझ्या वहाणा घाल.” मग पेत्राने कपडे घातले. मग देवदूत म्हणाला, “तुझा झगा अंगात घाल व माझ्यामागे ये!”
9 मग देवदूत बाहेर पडला व पेत्र त्याच्या मागे चालला. पेत्राला कळत नव्हते की, देवदूत हे खरोखर काय करीत आहे. त्याला वाटले आपण दृष्टान्त पाहत आहोत. 10 पहिल्या व दुसऱ्या फेऱ्यातील पहारेकऱ्यांना ओलांडून पेत्र व देवदूत लोखंडी फाटकाजवळ येऊन पोहोंचले. शहर आणि त्यांच्यामध्ये आता फक्त फाटकच होते. ते फाटक त्यांच्यासाठी आपोआप उघडले. पेत्र व देवदूत फाटकामधून बाहेर पडले. त्यांनी एक रस्ता पार केला आणि अचानक देवदूत पेत्राला सोडून निघून गेला.
11 पेत्राला मग कळले की नेमके काय घडले. आणि तो म्हणाला, “आता मला समजले की प्रभूने त्याचा दूत माइयाकडे पाठविला. व त्याने मला हेरोदापासून सोडविले. यहूदी लोकांना वाटले की, माझा छळ होईल. पण प्रभूने मला या सर्वांतून सोडविले आहे.”
12 या गोष्टीची जाणीव झाल्यावर पेत्र मरीयेच्या घरी गेला. ती योहानाची आई होती. (योहानाला मार्क असेही म्हणत) पुष्कळ लोक त्या ठिकाणी जमले होते. ते सर्व प्रार्थना करीत होते. 13 पेत्राने बाहेरील बाजूने दार ठोठावले. तेव्हा रुदा नावाची दासी दार उघडण्यासाठी आली. 14 तिने पेत्राचा आवाज लगेच ओळखला आणि ती खूप आनंदित झाली. ती दार उघडण्याचेसुद्धा विसरुन गेली. ती आतमध्ये पळाली आणि लोकांना तिने सांगितले, “पेत्र दाराजवळ उभा आहे!” 15 विश्वासणारे रुदाला म्हणाले, “तू बावचळलीस!” परंतु पेत्र दाराजवळ उभा आहे, असे रुदा परत परत अगदी कळकळीने सांगू लागली. म्हणून लोक म्हणाले, “तो पेत्राचा दूत असला पाहिज!”
16 पण पेत्र बाहेरुन दार सारखे ठोठावत होता. जेव्हा विश्वासणाऱ्यांनी दार उघडले, तेव्हा त्यांनी पेत्राला पाहिले. ते चकित झाले होते. 17 पेत्राने हाताने खुणावून शांत राहायला सांगितले, मग त्याने प्रभूने तुरुंगातून कसे आणले हे सविस्तर सांगितले. तो म्हणाला. “याकोब व इतर बांधवांना काय घडले ते सांगा.” मग पेत्र तेथून निघून दुसऱ्या ठिकाणी गेला.
18 दुसऱ्या दिवाशी शिपाई फार हताश झाले होते. पेत्राचे काय झाले असावे याचा ते विचार करीत होते. 19 हेरोदाने पेत्राला सगळीकडे शोधले पण तो त्याला शोधू शकला नाही. मग हेरोदाने पहारेकऱ्यांना प्रश्न विचारले व त्यांना मरणाची शिक्षा ठोठावली.
हेरोद अग्रिप्पाचे मरण
नंतर हेरोद यहूदातून निघून गेला. तो कैसरीया शहरात गेला व तेथे काही काळ राहिला. 20 हेरोद सोर व सिदोन नगरातील लोकांवर फार रागावला होता. ते लोक मिळून हेरोदाला भेटायला आले. ब्लस्तसला आपल्या बाजूला वळविण्यात ते यशस्वी झाले. ब्लस्तस हा राजाचा खाजगी सेवक होता. लोकांनी हेरोदाकडे शांततेची मागणी केली कारण त्यांचा देश अन्नधान्याच्या बाबतीत हेरोदाच्या देशावर अवलंबून होता.
21 हेरोदाने त्यांना भेटण्यासाठी एक दिवस ठरविला. त्या दिवशी हेरोदाने आपला सुंदर दरबारी पोशाख घातला होता. तो सिंहासनावर बसून लोकांसमोर भाषण करु लागला. 22 लोक मोठ्याने ओरडून म्हणाले, “ही तर देवाची वाणी आहे, मनुष्याची नव्हे!” हेरोदाने या स्तुतीचा स्वीकार केला. 23 आणि त्याने देवाला गौरव दिला नाही, म्हणून देवाच्या दूताने लगेच त्याला आजारी पाडले. किड्यांनी त्याला आतून खाल्ले आणि तो मेला.
24 देवाचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्येत पसरत होता. व लोकांना प्रेरित करीत होता. विश्वासणाऱ्यांचा गट दिवसेंदिवस मोठा होत होता.
25 बर्णबा व शौलाने त्यांचे यरुशलेम येथील काम संपविल्यानंतर ते अंत्युखियाला परत आले. त्यांनी मार्क योहान याला त्यांच्याबरोबर घेतले.
2006 by World Bible Translation Center