M’Cheyne Bible Reading Plan
नवीन सुरवात
9 देवाने नोहाला व त्याच्या मुलांना आशीर्वाद दिला. तो त्यांना म्हणाला, “पुष्कळ मुलांबाळांना जन्म द्या; आणि तुमच्या संततीने पृथ्वी भरुन टाका. 2 पृथ्वीवरील सर्व पशू, आकाशातील प्रत्येक पक्षी, जमिनीवर सरपटणारा प्रत्येक प्राणी आणि समुद्रातील सर्व मासे, तुमचे भय धरतील; ते सर्व तुमच्या सत्तेखाली असतील. 3 ह्या आधी मी तुम्हाला, खाण्याकरिता हिरव्या वनस्पती दिल्या; आता सर्व प्राणीही तुमचे अन्न होतील. मी पृध्वीवरील सर्व काही तुमच्या हाती देतो. ते सर्व तुमचे आहे. 4 पण मी तुम्हांस एक आज्ञा देतो की रक्तासकट मांस तुम्ही खाऊ नका कारण रक्त हे त्याचे जीवन आहे; 5 तसेच मी तुमच्या जीवाबद्दल रक्ताची मागणी करीन म्हणजे माणसाला ठार मारणाऱ्या कोणत्याहीं पशूच्या जीवाची मी मागाणी करीन आणि माणसाचा जीव घेणाऱ्या प्रत्येक माणसाच्या जीवाची मी मागणी करीन.
6 “देवाने माणूस आपल्या प्रतिरुपाचा उत्पन्न केला आहे.
म्हणून जर एखादी व्यक्ति एखाद्या व्यक्तिद्वारे ठार मारली गेली तर ती व्यक्तिपण त्याच व्यक्तिद्वारेच ठार केली जाईल.
7 “नोहा, तू व तुझी मुले तुम्हाला भरपूर संतती होवो व तुमच्या लोकांद्वारे पृथ्वी भरली जावो.”
8 मग देव नोहाला व त्याच्या मुलांना म्हणाला, 9 “मी आता तुम्हाशी व तुमच्या मागे तुमच्या संततीशी एक करार करतो; 10 तसेच तुमच्या सोबत जे पक्षी, गुरेढोरे, पशू आणि इतर जे प्राणी तारवातून बाहेर आले त्यांच्याशीही एक करार करतो म्हणजे सर्व सजीव सृष्टीशी मी करार करतो; 11 तो करार असा: पृथ्वीवरील सर्वप्राणीमात्र जलप्रलयामुळे नष्ट झाले पण येथून पुढे तसे कधीच होणार नाही, व सर्व सजीव सृष्टीचा नाश करणारा जलप्रलय पुन्हा कधी येणार नाहीं.”
12 आणि देव म्हणाला, “मी तुम्हाशी हा करार केल्याची काही तरी खूण तुम्हाला देतो त्या खुणेवरुन (पुराव्यावरुन) मी तुम्हाशी व सर्व सजीव सृष्टीशी करार केल्याचे दिसेल. हा करार पिढ्यानपिढ्या व युगानुयुग कायम राहील. 13 मी ढगात साप्तरंगी धनुष्य ठेवले आहे; ते सर्व पृथ्वी व माझ्यामध्ये केलेल्या कराराचा पुरावा म्हणून राहील. 14 मी जेव्हा पृथ्वीवरील ढग आणेल तेव्हा तुम्हाला ढगात सप्तरंगी धनुष्य दिसेल 15 जेव्हा मी ते पाहीन तेव्हा मी तुमच्याशी व पृथ्वीवरील सर्व प्राण्यांशी केलेल्या माझ्या कराराची मला आठवण होईल, ह्या कराराप्रमाणे जलप्रलय पृथ्वीवरील जीवनांचा पुन्हा कधीही नाश करणार नाही. 16 आणि ते धनुष्य पाहून कराराची मला आठवण होईल मी पृथ्वीवरील प्रत्येक जिवंत प्राण्याशी चिरंतन काळासाठी केलेल्या कराराची मला आठवण होईल.”
17 तेव्हा देव नोहाला म्हणाला, “ते रंगीत धनुष्य माझ्यामध्ये व पृथ्वीवरील सर्वसजीव प्राण्यांमध्ये झालेल्या कराराचा पुरावा आहे.”
प्रश्नांची पुन्हा सुरुवात
18 नोहाबरोबर त्याचे मुलगे तारवाबाहेर आले; त्यांची नावे शेम, हाम व याफेथ अशी होती; (हाम हा कनानाचा बाप होता.) 19 हे नोहाचे तीन मुलगे होते; यांच्या पासूनच पृथ्वीवर लोकवस्ती झाली.
20 नोहा शेतकरी झाला व त्याने एक द्राक्षमळा लावला; 21 त्याने द्राक्षारस तयार केला व तो भरपूर प्याला; तो द्राक्षारसाने धुंद झाला व आपल्या तंबूत उघडानागडा पडला. 22 तेव्हा कनानाचा बाप हाम याने आपला बाप उघडानागडा पडलेला असल्याचे पाहिले व त्याने तंबूच्या बाहेर येऊन ते आपल्या भावांना सांगितले; 23 मग शेम व याफेथ यांनी एक झगा घेतला व तो आपल्या पाठीवर ठेवून ते पाठमोरे तंबूत गेले. अशा प्रकारे त्यांनी आपल्या वडिलांची नग्नता झाकली; पाठमोरे असल्यामुळे ती त्यांना दिसली नाहीं.
24 नंतर नोहा जागा झाला, (तो द्राक्षारसाच्या नशेमुळे झोपला होता) तेव्हा आपला धाकटा मुलगा हाम याने काय केले हे त्याला समजले. 25 तेव्हा नोहा म्हणाला,
“कनान शापित होवो,
तो आपल्या भावाच्या गुलामातील सर्वात खालचा गुलाम होवो.”
26 नोहा आणखी म्हणाला,
“शेमचा परमेश्वर देव धन्यवादित असो!
कनान शेमचा गुलाम होवो.
27 देव याफेथाला अधिक जमीन देवो!
देव शेमच्या तंबूत राहो,
आणि कनान त्यांचा गुलाम होवो.”
28 जलप्रलया नंतर नोहा साडेतीनशे वर्षे जगला; 29 नोहा एकूण साडे नऊशे वर्षे जगला; मग त्यानंतर तो मरण पावला.
राष्ट्रांची वाढ आणी प्रसार
10 शेम, हाम व याफेथ ह्या नोहाच्या तीन मुलांना जलप्रलयानंतर पुष्कळ मुलगे झाले; त्यांची वंशावळ येणे प्रमाणे:
याफेथाचे वंशज
2 याफेथाचे मुलगे; गोमर, मागोग, मादय, यावान, तुबाल, मेशेख व तीरास हे होते.
3 गोमरचे मुलगे; आष्कनाझ, रीपाथ व तोगार्मा, हे होते.
4 यावानाचे मुलगे; अलीशा, तार्शीश, कित्तीम व दोदानीम.
5 भूमध्यासमुद्रच्या किनाऱ्याच्या आसपास जी राष्ट्रे झाली ती सर्व याफेथाच्या संततीपासून होती; प्रत्येक मुलाला स्वतःची जमीन होती ही सर्व कुळे वाढत गेली व त्यांची वेगवेगळी राष्ट्रे झाली. प्रत्येक राष्ट्राची भाषा वेगळी होती.
हामाचे वंशज
6 हामचे मुलगे याप्रमाणे होते: कूश, मिस्राईम, पूट व कनान
7 कुशाचे मुलगे: सबा, हवीला, साब्ता, रामा, व साव्तका;
आणि रामाचे मुलगे शबा व ददान हे होते.
8 कुशाला निम्रोद नावाचा मुलगा होता, तो पृथ्वीवर महाबलवान व पराक्रमी असा वीरपुरुष होता. 9 तो परमेश्वरापुढे बलवान शिकारी झाला म्हणून इतर माणसांची निम्रोदाशी तुलना करुन “तो माणूस, परमेश्वरासमोर बलवान निम्रोद शिकाऱ्यासारखा आहे” असे म्हणण्याची प्रथा आहे.
10 शिनार प्रांतातील बाबेल, एरक, अक्काद व कालहने ही निम्रोदाच्या राज्यातील सुरवातीची शहरे होती. 11 तेथून तो अश्शुरालाही गेला व तेथे त्याने निनवे, रहोबोथ, ईरकालह व रेसन ही शहरे वसवली 12 (रेसन हे शहर, निनवे व मोठे शहर कालह यांच्या दरम्यान आहे.)
13 मिस्राईम याला लूद, अनामीन, लहाकीम, नाप्तुहीम 14 पात्रुस कास्लूह व कप्तोरी हे मुलगे झाले. कास्लूहपासून पलिष्टी लोक आले.
15 कनानाचा पहिला मुलगा सीदोन हा होता; कनान हा हेथचाही बाप होता. कनानापासून उदयास आलेली राष्ट्रे, 16 यबूसी, अमोरी, गिर्गाशी, 17 हिव्वी, आरकी, शीनी 18 अर्वादी, समारी व हमाथी ही होती.
पुढे कनानाची कुळे जगाच्या वेगवेगळ्या भागात पसरली. 19 कनान्यांची सीमा उत्तरे कडील सीदोनापासून दक्षिणेकडील गरारापर्यंत व पश्चिमेकडील गाजापासून तर पूर्वेस सदोम व गमोरा पर्यंत तसेच आदमा पासून व सबोईम पासून व लेशापर्यंत पसरली होती.
20 ही सर्व हाम याची वंशजे होती; हया सर्व वंशजांना स्वतःची भाषा व देश होते; ती सर्व वेगवेगळी राष्ट्रे झाली.
शेम याचे वंशज
21 शेम हा याफेथाचा वडील भाऊ होता. एबर हा शेम यांचा वंशज होता. तो इब्री लोकांचा मुळ पुरुष होता.
22 शेम याचे मुलगे; एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम;
23 अरामाचे मुलगे: ऊस, हूल, गेतेर व मश हे होते;
24 अर्पक्षदास शेलह झाला,
शेलहास एबर झाला:
25 एबर यास दोन मुलगे झाले; एकाचे नाव पेलेग होते. पेलेग म्हणजे वाटणी; कारण याच्याच हयातीत पृथ्वीची वाटणी झाली; त्याच्या भावाचे नाव यक्तान होते.
26 यक्तानास अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह, 27 हदोराम, ऊजाल, दिक्ला 28 ओबाल, अबीमाएल, शबा, 29 ओफीर, हवीला व योबाब असे मुलगे झाले; हे सगळे यक्तानाचे मुलगे; 30 ते मेशापासून पूर्वेकड़ील डोंगराळ भागात राहात होते. मेशा सफारच्या देशाकडे होते.
31 हे शेमाचे वंशज होते. कुळे, भाषा, देश व राष्ट्रे याप्रमाणे त्यांची विभागणी अशी आहे.
32 ही नोहाच्या मुलांची व त्यांच्या वंशजांची, पिढ्या व कुळाप्राणे यादी आहे; त्यांच्या राष्ट्रांप्रमाणे ती आखलेली आहे; जलप्रलयानंतर त्यांची पृथ्वीवर वेगवेगळी राष्ट्रे झाली.
येशू एका पक्षघाती मनुष्याला बरे करतो(A)
9 येशू नावेत चढला व परत आपल्या नगरात गेला. 2 तेव्हा काही लोकांनी पक्षघात झालेल्या मनुष्याला येशूकडे आणले. तो मनुष्य बाजेवर पडून होता. येशूने त्यांचा विश्वास पाहून त्या पक्षघाती मनुष्याला म्हटले. “तरुण मुला, काळजी करू नकोस. तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”
3 नियमशास्त्राच्या काही शिक्षकांनी हे ऐकले आणि ते आपसात म्हणाले, “हा मनुष्य तर ईश्वराची निंदा करीत आहे.”
4 त्यांचे विचार ओळखून येशू म्हणाला, “तुमच्या अंतःकरणात तुम्ही वाईट विचार का करता? 5 कारण, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे म्हणणे, किंवा उठून चालू लाग, असे म्हणणे यातून कोणते सोपे आहे? 6 परंतु तुम्ही हे समजून घ्यावे की, मनुष्याच्या पुत्राला, पृथ्वीवर पापाची क्षमा करण्याचा अधिकार आहे.” मग येशू त्या पक्षघाती मनुष्याला म्हणाला, “ऊठ! आपला बिछाना घे आणि घरी जा.” 7 मग तो उठून आपल्या घरी गेला. 8 लोकांनी हे पाहिले व ते थक्क झाले आणि ज्या देवाने मनुष्यास असा अधिकार दिला त्याचा त्यांनी गौरव केला.
येशू मत्तयाची निवड करतो(B)
9 मग येशू तेथून पुढे निघाला, तेव्हा त्याने मत्तय नावाच्या माणसाला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले. तेव्हा येशू त्याला म्हणाला, “माझ्यामागे ये.” तेव्हा तो उठून त्याच्यामागे गेला.
10 येशू मत्तयाच्या घरी जेवत असता, पुष्कळ जकातदार व पापी आले आणि येशू व त्याचे शिष्य यांच्याबरोबर जेवायला बसले. 11 परूशांनी ते पाहिले त्यांनी येशूच्या शिष्यांस विचारले, “तुमचा गुरू जकातदार व पापी यांच्याबरोबर का जेवतो?”
12 येशूने त्यांना हे बोलताना ऐकले, तो त्यांना म्हणाला, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नाही तर जे आजारी आहेत त्यांना आहे. 13 मी तुम्हांला सांगतो, जा आणि याचा अर्थ काय ते शिका: ‘मला यज्ञपशूंची अर्पणे नकोत, तर दया हवी.’ मी नीतिमान लोकांना नव्हे, तर पापी लोकांना बोलावण्यास आलो आहे.” [a]
येशू इतर धार्मिक यहुद्यांसारखा नाही(C)
14 मग योहानाचे शिष्य त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याला विचारले, “आम्ही व परुशी पुष्कळ वेळा उपास करतो. पण तुझे शिष्य उपास करीत नाहीत. ते का?”
15 येशूने त्यांना उत्तर दिले, “नवरा मुलगा (वर) सोबत असताना त्याचे वऱ्हाडी दु:खी कसे राहतील? अशी वेळ येईल जेव्हा नवऱ्या मुलाला त्यांच्यापासून दूर केले जाईल तेव्हा ते उपास करतील.
16 “कोणी नव्या कापडाचे ठिगळ जुन्या कापडाला लावीत नाही, कारण ते ठिगळ त्या कापडापासून निघून जाईल व छिद्र अधिक मोठे होईल. 17 तसेच नवा द्राक्षारस जुन्या कातडी पिशवीत कोणी घालीत नाहीत, घातला तर पिशव्या फुटतात व त्यांचा नाश होतो. म्हणून लोक नवा द्राक्षारस नव्या पिशव्यात घालतात. तेव्हा दोन्हीही चांगले राहतात.”
येशू मृत मुलीला जीवंत करतो आणि आजारी स्त्रीला बरे करतो(D)
18 येशू या बोधकथा सांगत असता यहुद्यांच्या सभास्थानाचा एक अधिकारी त्याच्याकडे आला व येशूच्या पाया पडून म्हणाला, “माझी मुलगी आताच मेली आहे. परंतु आपण येऊन आपल्या हाताचा स्पर्श केला तर ती पुन्हा जिवंत होईल.”
19 तेव्हा येशू व त्याचे शिष्य त्या सेनाधिकाऱ्याबरोबर निघाले.
20 वाटेत बारा वर्षापासून रक्तस्राव असलेली एक स्त्री मागून येऊन येशूच्या जवळ पोहोंचली व त्याच्या वस्त्राला शिवली. 21 कारण तिने आपल्या मनात म्हटले, “मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईन.”
22 तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, “बाई काळजी करू नकोस! तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” आणि ती स्त्री त्याच क्षणी बरी झाली.
23 मग येशू त्या यहूदी सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरात आला. तेव्हा त्याने बासरी वाजविणाऱ्या व गोंधळ करणाऱ्या जमावाला पाहिले. 24 येशू म्हणाला, “जा, मुलगी मेलेली नाही, ती झोपेत आहे.” तेव्हा लोक येशूला हसले. 25 मग त्या जमावाला बाहेर पाठविल्यावर त्याने आत जाऊन तिचा हात आपल्या हातात घेतला आणि ती मुलगी उठली. 26 आणि ही बातमी त्या प्रांतात पसरली.
येशू आणखी लोकांना बरे करतो
27 तेव्हा येशू तेथून जात असता दोन आंधळे त्याच्यामागे ओरडत चालले. म्हणू लागले, “दाविदाच्या पुत्रा, आम्हांवर दया करा.”
28 येशू आत गेला तेव्हा ते आंधळेही आत गेले. त्याने त्यांना विचारले. “मी तुम्हांला दृष्टि देऊ शकेन असा तुमचा विश्वास आहे का?” “होय, प्रभु,” त्यांनी उत्तर दिले.
29 मग त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि म्हणाला, “तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्या बाबतीत घडो.” 30 आणि त्यांना पुन्हा दृष्टि आलि. येशूने त्यांना सक्त ताकीद दिली, “पाहा, हे कोणाला कळू देऊ नका.” 31 परंतु ते बाहेर गेले आणि त्यांनी त्या प्रदेशात सगळीकडे ही बातमी पसरविलि.
32 मग ते दोघे निघून जात असताना लोकांनी एका भूतबाधा झालेल्या माणसाला येशूकडे आणले. 33 जेव्हा येशूने त्यामधून भूत काढून टाकले तेव्हा पूर्वी मुका असलेला तो मनुष्य बोलू लागला. लोकांना ह्याचे आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “इस्राएलमध्ये याआधी असे कधीही झालेले पाहण्यात आले नाही.”
34 परंतु परूशी म्हणाले, “हा भूतांच्या अधिपतीच्या साहाय्याने भुते काढतो.”
येशूला असहाय लोकांविषयी कळवळा वाटतो
35 येशू त्यांच्या सभास्थानांमध्ये शिक्षण देत व राज्याचे शुभवर्तमान गाजवीत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारचे आजार बरे करीत सर्व नगरातून व सर्व खेड्यातून फिरला. 36 आणि जेव्हा त्याने त्रासलेल्या असहाय लोकांचे समुदाय पाहिले तेव्हा त्याला त्यांचा कळवळा आला. कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते कष्टी व पांगलेले होते. 37 तो आपल्या शिष्यांस म्हणाला, “पीक खरोखर फार आहे, पण कामकरी थोडे आहेत. 38 म्हणून तुम्ही पिकाच्या प्रभूची प्रार्थना करा यासाठी की, त्याने आपल्या पिकाची कापणी करायला कामकरी पाठवावेत.”
यहुदी नसलेल्यांशी मिश्रविवाह
9 हे सर्व आटोपल्यावर मग इस्राएलींमधली नेते मंडळी माझ्याकडे आली. ती मला म्हणाली, “एज्रा, इस्राएल लोकांनी आपल्या अवतीभवती राहणाऱ्या इतर लोकांपासून स्वतःला वेगळे ठेवलेले नाही. याजक आणि लेवी सुध्दा वेगळे राहात नाहीत. कनानी, हित्ती, परिज्जी, यहूसी, अम्मोनी, मवाबी, मिसरी आणि अमोरी लोक ज्या अमंगळ गोष्टी करतात त्यांचा प्रभाव इस्राएलांवर पडतो. 2 इस्राएल लोकांनी या इतर लोकांशी विवाहसंबंध ठेवले आहेत. इस्राएल लोकांनी आपले वेगळेपण टिकवले पाहिजे. पण त्यांचे यहुदी नसलेल्याइतरांशी विवाहसंबंधामुळे मिश्रण झाले आहे.इस्राएलच्या लोकांचे नेते आणि अधिकारी यांनीच या बाबतीत वाईट उदारहण घालून दिले आहे.” 3 हे ऐकून मी उद्विग्न झालो. माझी मनःस्थिती प्रकट करायला मी माझा अंगरखा आणि वस्त्रे फाडली. डोक्यावरचे आणि दाढीचे केस उपटले. माझ्या मनाला धक्का बसल्यामुळे अस्वस्थ होऊन मी खाली बसलो. 4 तेव्हा देवाच्या आज्ञा मानणाऱ्या सर्व लोकांचा भीतीने थरकाप झाला. बंदिवासातून आलेले इस्राएली लोक देवावर निष्ठा असणारे नव्हते म्हणून ते घाबरले; मला ही धक्का बसला; संध्याकाळच्या होमार्पणांची वेळ होईपर्यंत मी तिथे बसून राहिलो; सर्वजण माझ्याभोवती जमले.
5 होमार्पणांची वेळ झाली तेव्हा मी उठलो; अंगावरची वस्त्रे आणि अंगरखा फाटलेला अशा स्थितीत मी गुडघे टेकून हात पसरुन देवापुढे बसलो. मी अतिशय लज्जित अशा अवस्थेत होतो. 6 तेव्हा मी ही प्रार्थना केली:
“हे परमेश्वरा, तुझ्याकडे पाहायाची मला लाज वाटत आहे; मला लाज वाटते कारण आमच्या पापांची संख्या आमच्या मस्तकांच्या संख्येपेक्षा जास्त झाली आहे; आमचे अपराध वाढून स्वर्गापर्यंत पोचले आहेत. 7 आमच्या वाडवडीलांच्या वेळे पासून आतापर्यंत आम्ही अनेक पापांचे दोषी आहोत. आमच्या पापांची शिक्षा आमचे राजे आणि याजक यांना भोगावी लागली. परकीय राजांनी आमच्यावर आक्रमण करुन आमच्या लोकांना पकडून नेले. आमची संपत्ती लुटून त्या राजांनी आम्हाला लज्जित केले आजही तेच चालले आहे.
8 “पण आता तू अखेर आमच्यावर दया केली आहेस. बंदिवासातून सुटका करुन तू आमच्यापैकी काही जणांना या पवित्रस्थानी पारतून येऊ दिलेस. आम्हाला दास्यमुक्त करुन तू आम्हाला जीवदान दिलेस. 9 आम्ही गुलामच आहोत. पण तू आम्हाला आमच्या गुलामगीरीत आम्हाला सोडून गेला नाहीस. तू आमच्यावर दया केलीस. पारसाच्या राजांना तू आमच्याबाबतीत दयाळू केलेस. तुझे मंदिर उद्ध्वस्त झाले होते, पण त्याचा जीर्णोध्दार आमच्या हातून व्हावा म्हणून तू आम्हाला जीवदान दिलेस. यहूदा आणि यरुशलेमच्या संरक्षणासाठी भिंत बांधावी म्हणून तू साह्यकारी झालास.
10 “पण, देवा, आता आम्ही काय बोलावे? आम्ही पुन्हा तुझ्या मार्गापासून दूर चाललो आहेत. 11 देवा, तुझे सेवक, संदेष्टे यांच्यामार्फत तू आम्हाला त्या आज्ञा दिल्यास; तू म्हणालास, ‘तुम्ही जो प्रदेश ताब्यात घेऊन त्यात वास्तव्य करणार आहात तो वाया गेलेला देश आहे. तिथे राहणाऱ्या लोकांच्या अमंगळ कृत्यांनी तो अशुध्द झाला आहे; हा सर्वच प्रदेश त्या लोकांनी विटाळून टाकला आहे. आपल्या पापांनी ही भूमी त्यांनी अमंगळ केली आहे. 12 तेव्हा इस्राएल लोकांनो, तुमच्या मुलांशी त्यांच्या मुला-मुलींच्या सोयरिकी जुळवू नका. माझ्या आदेशांचे पालन करा म्हणजे तुम्ही बलशाली व्हाल आणि या भूमीवर चांगल्या गोष्टी भोगाल. हा प्रदेश आपल्या मुलाबाळांना सुपूर्द कराल.’
13 “आमच्यावर जी संकटे आली त्याला आम्हीच कारणीभूत आहोत. आम्ही दुर्वर्तन केले आणि त्याची आम्हाला खंत आहे. पण, परमेश्वरा, आमच्या अपराधांच्या मानाने तू आम्हाला केलेले शासन कमीच आहे. आम्ही जे भयंकर गुन्हे केले त्यांची जबरदस्त शिक्षा आम्हाला व्हायला हवी होती. आणि तू तर आमच्यापैकी काही जणांना बंदिवासातूनही सोडवलेस. 14 तेव्हा तुझ्या आदेशांचा भंग करता कामा नये हे आम्हाला कळले आहे. आम्ही त्या लोकांशी लग्नव्यवहार करता कामा नयेत. त्या लोकांमध्ये दुर्वर्तन फार आहे. आम्ही त्यांच्याशी लग्ने जुळवणे चालूच ठेवले तर तू आमचा नायनाट करशील मग मात्र इस्राएलांपैकी एकही माणूस जिवंत राहणार नाही.
15 “देवा, इस्राएलच्या परमेश्वरा, तू फार चांगला आहेस. तू आमच्यापैकी काहींना अजून जिवंत ठेवले आहेस. आम्ही अपराधी आहोत हे आम्हाला मान्य आहे. आमच्या पापाचारणामुळे आम्हाला तुझ्यापुढे उभे राहता येत नाही.”
शौलाचे परिवर्तन
9 शौल यरुशलेममध्ये प्रभूच्या अनुयायांना अजूनही धमकावण्याचा व जिवे मारण्याचा प्रयत्न करीत होता. म्हणून तो प्रमुख याजकांकडे गेला. 2 शौलाने त्याला दिमिष्क येथील सभास्थानातील यहूदी लोकांना पत्र लिहिण्यास सांगितले. शौलाला प्रमुख याजकाकडून दिमिष्क येथील ख्रिस्ताच्या अनुयायांना पकडण्यासाठी अधिकार पाहिजे होता. जर त्याला तेथे कोणी विश्वासणारा, मग तो पुरुष असो अथवा स्त्री, सापडले असते तर त्याने त्यांना अटक करुन यरुशलेमला आणले असते.
3 मग शौल दिमिष्काला गेला. जेव्हा तो शहराजवळ आला तेव्हा एकाएकी आकाशातून फारच प्रखर प्रकाश त्याच्याभोवती चमकला. 4 शौल जमिनीवर पडला, एक वाणी त्याच्याशी बोलताना त्याने ऐकली, “शौला, शौला! तू माझा छळ का करतोस?”
5 शौल म्हणाला, “प्रभु तू कोण आहेस?”
ती वाणी म्हणाली, “मी येशू आहे, ज्याचा तू छळ करीत आहेस तो मीच आहे. 6 आता ऊठ आणि नगरात जा. तुला काय करायचे आहे, हे तुला तेथे कोणी तरी सांगेल.”
7 जी माणसे शौलाबोबर प्रवास करीत होती, ती तेथेच स्तब्ध उभी राहिली. त्या लोकांनी आवाज ऐकला, पण त्यांना कोणी दिसले नाही. 8 शौल जमिनीवरुन उठला. त्याने डोळे उघडले, पण त्याला काहीच दिसेना. म्हणून जे लोक त्याच्या बरोबर होते, त्यांनी त्याचा हात धरुन त्याला दिमिष्क शहरात नेले. 9 तीन दिवसांपर्तंत शौलाला काहीच दिसत नव्हते. त्याने काहीच खाल्ले किंवा प्यायले नाही.
10 दिमष्कमध्ये येशूचा एक अनुयायी होता. त्याचे नाव हनन्या होते. प्रभु त्याच्याशी एका दृष्टान्तात बोलला: तो म्हणाला, “हनन्या!”
हनन्याने उत्तर दिले, “मी आहे, प्रभु!”
11 प्रभु हनन्याला म्हणाला, “ऊठ आणि नीट नावाच्या रस्तयावर जा. तेथे यहूदाचे [a] घर शोध व तार्ससहून आलेल्या शौल नावाच्या व्यक्तिबद्दल विचार. सध्या तो तेथे आहे व प्रार्थना करीत आहे. 12 शौलाने दृष्टान्त पाहिला आहे. त्यात हनन्या नावाचा मनुष्य आपल्याकडे आला असून आपल्यावर हात ठेवीत आहे, असे त्याला दिसले. व त्यानंतर त्याला पुन्हा दृष्टी प्राप्त झाली, असे त्याला दिसले.”
13 परंतु हनन्याने उत्तर दिले, “प्रभु मी त्या मनुष्याविषयी अनेक लोकांच्या तोंडून ऐकले आहे. यरुशलेम येथील तुइया संतांशी तो किती वाईट रीतीने वागला हे मी ऐकले आहे. 14 आणि आता जे तुझ्या नावावर विश्वास ठेवतात, अशा लोकांना बांधून नेण्यासाठी प्रमुख याजकाकडून अधिकारपत्र घेऊन हा शौल येथे आला आहे.”
15 परंतु प्रभु म्हणाला, “जा! एका महत्वाच्या कामाकरिता मी त्याला निवडले आहे, माझ्याविषयी त्याने राजांना, यहूदी लोकांना, आणि दुसऱ्या राष्ट्रांना सांगितले पाहिजे. 16 माझ्या नावाकरीता ज्या गोष्टी त्याला सहन कराव्या लागतील त्या मी त्याला दाखवून देईन.”
17 हनन्या निघाला, आणि यहूदाच्या घरी गेला. त्याने शौलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले, “शौला, माझ्या बंधू, प्रभु येशूने मला पाठविले. ज्याने तुला इकडे येत असता रस्त्यावर दर्शन दिले त्यानेच मला तुझ्याकडे पाठविले, येशूने मला पाठविले यासाठी की, तुला पुन्हा पाहता यावे व पवित्र आत्म्याने तू भरला जावास.” 18 लागलीच खपल्यासारखे काही तरी शौलाच्या डोळ्यांवरुन खाली पडले, आणि त्याला पुन्हा दृष्टी आली शौल तेथून उठल्यावर त्याचा बाप्तिस्मा करण्यात आला. 19 नंतर त्याने अन्न सेवन केल्यावर त्याच्या अंगात जोम आला. शौल काही दिवस दिमिष्क येथील शिष्यांबरोबर राहिला.
शौल दिमिष्कात सुवार्ता सांगतो
20 यानंतर सरळ सभास्थानात जाऊन शौल येशूच्या नावाची घोषणा करु लागला. “येशू हा देवाचा पुत्र आहे.”
21 ज्या लोकांनी शौलाचे बोलणे ऐकले त्या सर्वांना मोठे नवल वाटले. ते म्हणाले, “यरुशलेम येथील ज्या लोकांचा येशूच्या नावावर विश्वास आहे, त्या सर्वांचा नाश करु पाहणारा हाच नाही काय? तो येशूच्या अनुयायांना अटक करण्यासाठी येथे आला आहे व तो त्यांना यरुशलेम येथील प्रमुख याजकासमोर उभे करणार आहे.”
22 परंतु शौल अधिकाधिक सामर्थ्यशाली होत गेला. त्याने हे सिद्ध केले की, येशू हाच ख्रिस्त आहे. आणि त्याचे पुरावे इतके सबळ होते की, दिमिष्क येथील यहूदी त्याच्याबरोबर वाद घालू शकले नाहीत.
शौल यहूदी लोकांपासून निसटून जातो
23 बऱ्याच दिवसांनंतर यहूदी लोकांनी शौलाला जिवे मारण्याचा कट रचला. 24 यहूदी रात्रंदिवस शहराच्या वेशीवर पहारा देत होते. व शौलाला पकडण्याची वाट पाहत होते. त्यांना शौलाला ठार मारायचे होते, पण त्यांचा हा बेत शौलास समजला. 25 एक रात्री शौलाने ज्यांना शिक्षण दिले होते अशा काही अनुयायांनी शहरातून जाण्यासाठी शौलाला मदत केली, अनुयायांनी शौलाला एका टोपलीत ठेवले. नंतर त्यांनी टोपली गावकुसावरुन रात्रीच्या वेळी खाली सोडली.
यरुशलेममध्ये शौल
26 नंतर शौल यरुशलेमला गेला. तेथील विश्वासणाऱ्यांच्या परिवारात मिसळण्याचा त्याने प्रयत्न केला, पण ते त्याला घाबरत होते. त्यांचा विश्वासच बसत नव्हता की, शौल खरोखर येशूचा शिष्य झाला आहे. 27 परंतु बर्णबाने शौलाचा स्वीकार केला व त्याला घेऊन प्रषितांकडे गेला. बर्णबाने सांगितले की, शौलाने येशूला दिमिष्कच्या रस्त्यावर पाहिले आहे. येशू त्याच्याशी कसा बोलला हेही त्याने सविस्तरणे सांगितले. मग त्याने प्रेषितांना सांगितले की, येशूविषयीची सुवार्ता शौलाने मोठ्या धैर्याने दिमिष्क येथील लोकांना सांगितली.
28 मग शौल अनुयायांसह तेथे राहिला, तो यरुशलेममध्ये सगळीकडे गेला व धैर्याने प्रभुची सुवार्ता सांगू लागला. 29 शौल नेहमी ग्रीक भाषा बोलणाऱ्या यहूदी लोकांशी बोलत असे तो त्यांच्याशी वादविवाद करीत असे. पण ते त्याला मारण्याचा प्रयत्न करीत होते. 30 जेव्हा बंधुजनांना (विश्वासणाऱ्यांना) हे कळाले तेव्हा त्यांनी त्याला कैसरीया येथे नेले, व नंतर तेथून त्याला तार्सज्ञ नगराला पाठविले.
31 मंडळी जेथे कोठे ती होती-यहूदीया, गालीली, शोमरोन, तेथे त्यांना शांति लाभली. पवित्र आत्म्याच्या साहाय्याने हा गट अधिक शक्तिशाली बनला. आपल्या वागणुकीने विश्वासणाऱ्यांनी दाखवून दिले की, ते प्रभूचा आदर करतात. या कारणामुळे विश्वासणाऱ्यांचा परिवार मोठा होत गेला.
यापो येथे पेत्र
32 पेत्र यरुशलेमच्या सभोवतालच्या गावामध्ये फिरला. लोद या गावामध्ये जे विश्वासणारे होते, त्यांना भेटला. 33 लोद येथे त्याला ऐनेयास नावाचा माणूस आढळला. त्याच्या अंगातून वारे गेल्याने तो पंगू झाला होता व आठ वर्षे अंथरुणाला खिळून होता. 34 पेत्र त्याला म्हणाला, “ऐनेयास. येशू ख्रिस्त तुला बरे करीत आहे. ऊठ, आपले अंथरुण नीट कर!” ऐनेयास ताबडतोब उभा राहिला. 35 लोद येथे राहणाऱ्या सर्व लोकांनी आणि शारोनाच्या पठारावर राहणाऱ्यांनी त्याला पाहिले, तेव्हा ते सर्व प्रभूकडे वळले.
36 यापो शहरात येशूची एक शिष्या राहत होती. तीचे नाव तबिथा होते (ग्रीक भाषेत तिचे नाव दुर्कस होते, त्याचा अर्थ हरीण) ती नेहमी लोकांसाठी चांगली कामे करीत असे. गरीबांना दानधर्म करीत असे. 37 जेव्हा पेत्र लोदमध्ये होता. तेव्हा तबिथा आजारी पडली व मेली. त्यांनी (लोकांनी) तिचे शरीर धुतले व ते माडीवरच्या एका खोलीत ठेवले. 38 यापो येथीला अनुयायांनी ऐकले की, पेत्र लोदमध्ये आहे. (लोद हे यापोजवळ आहे,) म्हणून त्यांनी दोन माणसे पाठविली. त्यांनी त्याला विंनति केली. ते म्हणाले, “त्वरा करा, आमच्याकडे लवकर या!”
39 पेत्र तयार झाला व त्यांच्याबरोबर गेला. जेव्हा तो तेथे पोहोचला तेव्हा त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले. सर्व विधवा स्त्रिया पेत्राभोवती उभ्या राहिल्या. त्या रडत होत्या. दुर्कस (तबीथा) जिवंत असताना जे कपडे व झगे तिने तयार केले होते ते त्यांनी पेत्राला दाखवले. 40 पेत्राने खोलीतील सर्वांना बाहेर काढले. त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली. आणि दुर्कसच्या शरीराकडे वळून तो म्हणाला, “तबिथा ऊठ!” तेव्हा तिने डोळे उघडले, जेव्हा तिने पेत्राला पाहीले तेव्हा ती उठून बसली. 41 त्याने तिला आपला हात देऊन उभे राहण्यास मदत केली, नंतर त्याने विश्वासणाऱ्यांना आणि विधवा स्त्रियांना खोलीमध्ये बोलाविले. त्याने तबिथाला त्यांना दाखवले, ती जिवंत होती!
42 यापोमधील सर्व लोकांना हे समजले, यातील पुष्कळ लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला. 43 पेत्र यापोमध्ये बरेच दिवस राहिला. तो शिमोन नावाच्या चांभाराकडे राहिला.
2006 by World Bible Translation Center