Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
उत्पत्ति 7

जलप्रलयाची सुरवात

नंतर परमेश्वर नोहाला म्हणाला, “या काळातील दुष्ट लोकात माझ्यासमोर तूच एक नीतिमान माणूस आहेस असे मला आढळले आहे; तेव्हा तुझ्या कुटुंबातील सर्वांना घेऊन तारवात जा. अर्पणासाठी वरील प्रत्येक जातीच्या शुद्ध प्राण्यापैकी नरमाद्यांच्या सात जोड्या, इतर अशुद्ध प्राण्यापैकी नरमादी अशी एकच जोड़ी, आणि पक्षांच्या नरमादी अशा सात जोड्या तुझ्याबरेबर तारवात नें. पृथ्वीवर त्यांचे बीज राहील आतापासून सात दिवसांनी मी पृथ्वीवर चाळीस दिवस व चाळीस रात्र प्रचंड पाऊस पाडीन; त्यामुळे पृथ्वीवर मी निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीचा नाश होईल.” परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे नोहाने सर्वकाही केले.

पाऊस आला तेव्हा नोहा सहाशे वर्षांचा होता. जलप्रलयातून तरुन जावे म्हणून नोहा व त्याचे सह त्याचे कुटुंब म्हणजे त्याची बायको, त्याचे मुलगे व सुना हे तारवात गेले. तसेच पृथ्वीतलावरील सर्व शुद्ध व अशुद्ध पशूपक्षी, सरपटणारे व रांगणारे प्राणी हे सर्व देवाने सांगितल्याप्रमाणे नर व मादी अशा जोडी जोडीने नोहाबरोबर तारवात गेले. 10 मग सात दिवसानंतर पृथ्वीवर पाऊस पडण्यास व जलप्रलय येण्यास सुरवात झाली.

11-13 दुसऱ्या महिन्याच्या सतराव्या दिवशी पृथ्वीतील पाण्याचे सर्वझरे फुटले व पाणी उफाळून वर आले व जमिनीवरुन वाहू लागले; त्याच दिवशी मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली; जणू काय आकाशाच्या खिडक्या उघडल्या; चाळीस दिवस व चाळीस रात्र मुसळधार पाऊस पडला. त्याच दिवशी नोहा, त्याची बायको, त्याचे मुलगे शेम, हाम व याफेथ व त्यांच्या बायका ही सर्वमंडळी तारवात गेली. त्यावेळी नोहा सहाशे वर्षांचा होता. 14 नोहाचे कुटुंब आणि पृथ्वीवरील सर्व सजीव प्राणी म्हणजे सर्व जातीची गुरेढोरे इतर पशू जमिनीवर सरपटणारे आणि आकाशात उडणारे पक्षी हे तारवात होते. 15 आणि ज्यांच्या जीवात प्राण आहे असे सर्व प्रकारचे प्राणी दोन दोनच्या गटाने तारवात गेले. 16 देवाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे हे जीवंत प्राणी जोडीने नर व मादी असे तारवात गेले आणि मग परमेश्वराने दार बंद केले पाणी वाढू लागले आणि त्याने जमिनीवरुन तारु उचलले.

17 चाळीस दिवस पृथ्वीवर महापुर पाणी आले; 18 पाणी एक सारखे चढतच गेले आणि त्यामुळे तारु जमिनीपासून उंचावर तरंगू लागले; 19 पाणी इतके वर चढत गेले की उंच उंच पर्वत देखील पाण्यात बुडून गेले; 20 पाणी सर्वात उंच पर्वत शिखरावर वीस फुटा पेक्षा अधिक उंच इतके वर चढले.

21-22 पृथ्वीवरील सर्व जिवंत प्राणी, म्हणजे सर्व स्त्री, पुरुष, तसेच सर्व पक्षी, गुरेढोरे, ग्रामपशू, वनपशू सरपटणारे प्राणी हे सर्व जीव जंतू मरुन गेले. 23 अशा रीतीने देवाने पृथ्वीच्या पाठीवरील सर्वकाही म्हणजे मानव, पशू, सरपटणारे प्राणी आणि आकाशातील पक्षी अशा सर्व जीवधारी प्राण्यांचा नाश केला; जे वाचले ते म्हणजे नोहा, त्याचे कुटुंब आणि तारवात त्याच्या सोबत असलेले प्राणी, फक्त एवढेच. 24 पाण्याने एकशे पन्नास दिवस पृथ्वीला झाकून ठेवले होते.

मत्तय 7

इतरांचा न्याय करण्याविषयी येशूची शिकवण(A)

“तुमचा न्याय करण्यात येऊ नये म्हणून तुम्ही इतरांचा न्याय करु नका. कारण ज्या न्यायाने तुम्ही इतरांचा न्याय करता त्याच न्यायाने तुमचा न्याय केला जाईल, आणि ज्या मापाने तुम्ही माप घालता त्याच मापाने तुम्हांला परत माप घालतील.

“तू आपल्या डोळ्यातील मुसळ लक्षात न घेता आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस? किंवा ‘तुझ्या डोळ्यातील कुसळ मला काढू दे’ असे तुझ्या भावाला कसे म्हणू शकतोस? कारण पाहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पहिल्यांदा तू आपल्या डोळ्यातील मुसळ काढ म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढायला तुला स्पष्ट दिसेल.

“जे पवित्र ते कुत्र्यांना टाकू नका, ती उलटून तुम्हांला फाडतील आणि आपले मोती डुकरांपुढे टाकू नका; टाकाल तर ती त्यांना पायदळी तुडवतील.

तुमच्या सर्व गरजा देवाला सांगा(B)

“मागा म्हणजे तुम्हांला ते देण्यात येईल. शोधा आणि तुम्हांला ते सापडेल, ठोका आणि तुमच्यासाठी दार उघडले जाईल, कारण प्रत्येकजण जो मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते, आणि जो ठोकावतो, त्याच्यासाठी दार उघडले जाते.

“तुमच्यापैकी असा कोण मनुष्य आहे की, जो आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला दगड देईल? 10 किंवा मासा मागितला, तर त्याला साप देईल? 11 वाईट असूनही जर तुम्हांला आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी देण्याचे कळते तर तुमच्या स्वर्गातील पित्याकडे जे मागतात, त्यांच्या गरजा तो किती चांगल्या प्रकारे भागवील?

अति महत्त्वाचा नियम

12 “यासाठी ज्या गोष्टी लोकांनी तुमच्यासाठी कराव्या असे तुम्हांला वाटते त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी करा. कारण नियमशास्त्राच्या व संदेष्टेयांच्या शिकवणीचे सार हेच आहे.

स्वर्गाकडे जाणारा मार्ग आणि नरकाकडे जाणारा मार्ग(C)

13 “अरूंद दरवाजाने आत जा. कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रूंद आहे, व मार्ग पसरट आहे. आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. 14 पण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरूंद व मार्ग अडचणीचा आहे, आणि फारच थोडयांना तो सापडतो.

लोक काय काय करतात ते पाहा(D)

15 “खोट्या संदेष्ट्याविषयी सावध असा. ते गरीब मेंढराचे रूप घेऊन तुमच्याकडे येतात. पण प्रत्यक्षात ते क्रूर लांडग्यांसारखे आहेत. 16 त्यांच्या करणीवरून तुम्ही त्यांस ओळखाल. ज्याप्रमाणे काटेरी झाडाला द्राक्षे लागत नाहीत, किंवा रिंगणीच्या झाडाला अंजिरे येत नाहीत, त्याचप्रमाणे वाइटाला चांगले फळ येत नाही. 17 प्रत्येक चांगले झाड चांगली फळे देते, पण वाईट झाड वाईट फळे देते. 18 चांगल्या झाडाला वाईट फळे येणार नाहीत, आणि वाईट झाडाला चांगली फळे येणार नाहीत. 19 जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडण्यात येते व अग्नीत टाकले जाते. 20 म्हणून अशा धोकेबाज लोकांना तुम्ही त्यांच्या फळांवरून ओळखाल.

21 “जो कोणी मला वरवर प्रभु, प्रभु म्हणतो, तो प्रत्येक जण स्वर्गाच्या राज्यात जाईलच असे नाही तर माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागेल तोच स्वर्गाच्या राज्यात जाईल. 22 त्या दिवशी मला अनेक जण म्हणतील, ‘हे प्रभु, आम्ही तुझ्या नावाने भूते काढली व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले.’ 23 तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मी तुम्हांला ओळखत नाही. अहो दुराचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून चालते व्हा.

शहाणा मनुष्य व मूर्ख मनुष्य(E)

24 “जो कोणी माझ्या सांगण्याप्रमाणे आचारण करतो तो शहाण्या माणसासारखा आहे, अशा सुज्ञ माणसाने आपले घर खडकावर बांधले. 25 मग जोराचा पाऊस झाला आणि पूर आला. जोराचा वारा आला. वादळात घर सापडले, पण ते पडले नाही. कारण त्याचा पाया खडकावर बांधला होता.

26 “जो कोणी माझे हे शब्द ऐकून त्याप्रमाणे आचरण करीत नाही तो कोणा एका मूर्ख माणासासारखा आहे, त्याने आपले घर वाळूवर बांधले. 27 मग जोराचा पाऊस आला आणि पूर आला. जोराचा वारा सुटला. वादळवाऱ्यात ते घर सापडले आणि कोसळून पडले.”

28 जेव्हा ह्या बोधकथा सांगण्याचे येशूने संपविले तेव्हा लोकांचा समुदाय त्याच्या शिकवण्याने थक्क झाला. 29 कारण येशू त्यांना त्यांच्या धर्मशिक्षकांप्रमाणे नव्हे, तर अधिकारवाणीने शिकवीत होता.

एज्रा 7

एज्राचे यरुशलेममध्ये आगमन

या घडामोडी नंतर, [a] पारसचा राजा अर्तहशश्त याच्या कारकीर्दीत एज्रा बाबेलहून यरुशलेमला आला. एज्रा हा सरायाचा मुलगा, सराया अजऱ्याचा, अजऱ्या हिल्कीयाचा मुलगा. हिल्कीया शल्लूमचा, शल्लूम सादोकाचा, सादोक अहीटूबचा, अहीटूब अमऱ्याचा मुलगा, अमऱ्या अजऱ्याचा. आणि अजऱ्या मरोयाथचा मुलगा. मरोयाथ जरह्याचा, जरह्या उज्जीचा, आणि उज्जी हा बुक्कीचा मुलगा. बुक्की अबीशूवाचा, अबीशूवा फिनहासचा, व फिनहास एलाजारचा आणि एलाजार हा प्रमुख याजक अहरोन याचा मुलगा होय.

एज्रा बाबेलहून यरुशलेमला आला. एज्रा अध्यापक होता. मोशेच्या नियमशास्त्रात तो चांगला पारंगत होता. इस्राएलचा देव परमेश्वर याने हे मोशेचे नियमशास्त्र दिले. एज्राला परमेश्वराची साथ असल्यामुळे राजा अर्तहशश्तने त्याला हवे ते सर्व देऊ केले. एज्राबरोबर बरेच इस्राएली लोक आले. त्यांच्यात याजक होते, लेवी होते, गायक, द्वारपाल आणि मंदिराचे सेवेकरी होते. राजा अर्तहशश्तच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी हे सर्व यरुशलेमला आले. अर्तहशश्तच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षातल्या पाचव्या महिन्यात एज्रा यरुशलेममध्ये आला पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेला एज्रा आणि मंडळींनी बाबेल सोडले आणि पाचव्या महिन्याच्या प्रतिपदेला ते यरुशलेमला पोचले. एज्रावर परमेश्वर देवाचा वरदहस्त होता. 10 एज्राने परमेश्वराच्या नियमशास्त्राचे सर्व वेळ मनःपूर्वक अध्ययन आणि पालन केले. त्याला (परमेश्वराचे) हे आदेश आणि नियम इस्राएल लोकांनी शिकवायचे होते, तसेच त्यांच्याकडून तसे आचरण करुन घ्यायचे होते.

राजा अर्तहशश्तचे एज्राला पत्र

11 एज्रा याजक आणि अध्यापक होता. इस्राएलला परमेश्वराने दिलेल्या आज्ञा आणि नियम यांचे त्याला चांगले ज्ञान होते त्याला राजा अर्तहशश्तने जे पत्र लिहिले त्याची ही प्रतः

12 [b] राजा अर्तहशश्त कडून,

याजक आणि स्वर्गातील देवाच्या नियमशास्त्राचा अध्यापक एज्रा यास:

अभिवादन!

13 माझा आदेश असा आहे: माझ्या राज्यातील ज्या कोणाला एज्रा बरोबर यरुशलेमला जायचे असेल तो जाऊ शकतो. मग ती व्यक्ती कोणीही असो, याजक अथवा इस्राएलचा लेवी.

14 एज्रा, मी आणि माझे सात मंत्री तुला पाठवत आहोत. तू यहूदा आणि यरुशलेमला जावेस. देवाचे नियमशास्त्र तुझ्याकडे आहेच. त्याचे पालन लोक कसे काय करत आहेत ते तू पाहावेस.

15 इस्राएलच्या देवाला मी आणि माझे मंत्री सोने-चांदी पाठवत आहोत. ते तू तुझ्याबरोबर न्यावेस. देव यरुशलेममध्ये आहे. 16 सर्व बाबेलभर फिरुन तू लोकांकडून तसेच याजक व लेवी यांच्याकडून देणग्या गोळा कराव्यास. स्वखूशीने दिलेल्या त्या वस्तू यरुशलेममधील त्यांच्या देवाच्या मंदिरासाठी आहेत.

17 या पैशातून तू बैल, मेंढरे, कोकरे घे. तसेच त्या सोबतची धान्यार्पणे आणि पेयार्पणेही विकत घे. मग ती यरुशलेममधील तुमच्या देवाच्या मंदिरातील वेदीवर अर्पण कर. 18 यातून उरेल त्या सोन्यारुप्याचा विनियोग तू आणि तुझे भाऊबंद, देवाला रुचेल त्या मार्गाने हवा तसा करा. 19 तुमच्या परमेश्वराच्या मंदिरातील उपासनेसाठी या सर्व गोष्टी आहेत, त्या तिकडे घेऊन जा. 20 मंदिरासाठी आणखीही काही गोष्टी तुम्हाला लागत असतील तर त्याही तुम्ही घ्या. त्यासाठी राजाच्या खजिन्यातून पैशाची उचल करा.

21 आता, मी, राजा अर्तहशश्त, असा आदेश काढतो की फरात नदीच्या पश्र्चिमेकडील भागातले जे खजिनदार आहेत त्यांनी एज्राला हवे ते पुरवावे. कारण एज्रा हा स्वर्गातील देवाच्या नियमशास्त्राचा अध्यापक आणि याजक आहे. याची अंमलबजावणी पूर्णत्वाने आणि ताबडतोब करावी. 22 एज्राला द्यायच्या गोष्टी पुढीलप्रमाणे: चांदी 3 3/4 टन, गहू 600 बुशेल, द्राक्षारस 600 गॅलन, जैतुनाचे तेल 600 गॅलन, एज्राला पाहिजे तितके मीठ. 23 एज्राला जे जे मिळावे असा स्वर्गातील देवाचा आदेश आहे ते ते सर्व त्याला विनाबिलंब आणि पुरेपूर द्यावे. हे सर्व स्वर्गातील परमेश्वराच्या मंदिरासाठी आहे. देवाचा माझ्या राज्यावर किंवा माझ्या मुलांवर कोप व्हायला नको.

24 एज्रा, मंदिरातील याजक, लेवी, गायक, द्वारपाल, मंदिरातील सेवेकरी, किंवा मंदिरातील कामाशी संबंधित इतर कोणी यांना कर द्यायला लावणे नियमाविरुध्द आहे. हे तुम्ही लोकांनी समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे. त्यांनी कोणताही कर, खंडणी, जकात भरायची नाही. 25 तुझे देवाविषयीचे ज्ञान वापरुन तू धार्मिक आणि नागरी क्षेत्रात न्यायाधीश नेमावेस. तसा अधिकार मी तुला देतो. फरात नदीच्या पश्र्चिमेकडील भागातल्या लोकांचे ते न्यायाधीश होतील. देवाचे नियमशास्त्र जाणणाऱ्या सर्वांवर ते नागरी आणि धार्मिक न्यायाधीश नियुक्त करतील. आणि ज्यांना देवाच्या आज्ञा माहीत नाहीत अशांना ते त्या शिकवतील. 26 जो कोणी तुमच्या देवाच्या आज्ञा किंवा राजाचे आदेश पाळणार नाही त्याला शासन झाले पाहिजे. त्याला मृत्युदंड द्यायचा की हद्दपार करायचे की द्रव्यदंड करायचे की कैदेत टाकायचे ते त्याने केलेल्या गुन्ह्याच्या स्वरुपावर अवलंबून राहील.

एज्राचे स्तोत्र

27 आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याला धन्यवाद! यरुशलेममधील परमेश्वराच्या मंदिराचा जीर्णोध्दार करावा अशी इच्छा परमेश्वरानेच राजाच्या मनात निर्माण केली. 28 राजा, त्याचे मंत्री आणि अधिकारी यांच्या डोळ्या देखतच परमेश्वराने माझ्यावर कृपा केली. परमेश्वराचा पाठिबा लाभल्यामुळे मला धैर्य आले. इस्राएलातील पुढारी मंडळींना बरोबर घेऊन मी यरुशलेमला निघालो.

प्रेषितांचीं कृत्यें 7

स्तेफनाचे भाषण

प्रमुख याजक स्तेफनाला म्हणाला, “हे सर्व खरे आहे काय?” स्तेफनाने उत्तर दिले, “माझ्या यहूदी वडीलजनांनो आणि बंधूंनो, माझे ऐका. आपला पिता (पूर्वज) अब्राहाम मेसोपोटेमिया येथे असताना आपल्या गौरवी देवाने त्याला दर्शन दिले. हे तो हारान येथे राहण्यापूर्वी घडले होते. देव अब्राहामाला म्हणाला, ‘तुझा देश व तुझे नातेवाईक सोड. आणि मी दाखवीन त्या देशात जा!’ [a]

“म्हणून अब्राहामाने आपले वतन खास्द्यांचा देश सोडला आणि तो हारान येथे राहू लागला. अब्राहामाच्या वडिलांच्या मृत्यूनंतर देवाने त्याला या ठिकाणी पाठविले, जेथे आता तुम्ही राहत आहात. परंतु देवाने अब्राहामाला या जमिनीतील काही दिले नाही. देवाने यातील एक पाऊल ठेवण्या इतकी सुध्दा जमीन त्याला दिली नाही. परंतु देवाने त्याला अभिवचन दिले की भविष्यात तो त्याला ही जमीन देईल. व त्याच्या मुलांनाही देईल. अब्राहामाला संतान होण्यापूर्वी हे घडले.

“देव त्याला म्हणाला, ‘तुझी संतती उपरी होईल. ते दुसऱ्या देशात राहतील. तेथील लोक तुइयावंशजांना गुलाम बनवितील आणि त्यांना चारशे वर्षे वाईट रीतीने वागवतील. परंतु जो देश त्यांना गुलाम बनवील त्यांना मी शिक्षा देईन.’ [b] देव असे सुद्धा म्हणाला, ‘त्या गोष्टी घडल्यानंतर, तुझे लोक त्या देशातून बाहेर येतील. मग तुझे लोक या ठिकाणी माझी उपासना करतील.’ [c]

“देवाने अब्राहामाशी करार केला, या कराराचे चिन्ह होते सुंता. आणि म्हणून जेव्हा अब्राहामाला मुलगा झाला, तेव्हा अब्राहामाने आपल्या मुलाची, तो आठ दिवसांचा असताना, सुंता केली. त्याच्या मुलाचे नाव इसहाक होते. इसहाकानेसुद्धा आपला मुलगा याकोब याची सुंता केली. व याकोबाने आपल्या मुलांची सुंता केली, हे पुत्र नंतर बारा (पूर्वज) वडील झाले.

“या वडिलांना (पूर्वजांना) योसेफाचा मत्सर वाटला. त्यांनी योसेफाला इजिप्तमध्ये एक गुलाम म्हणून विकले, परंतु योसेफाबरोबर देव होता. 10 योसेफावर तेथे खूप संकटे आली पण देवाने त्याला सर्व संकटांतून सोडविले, देवाने योसेफाला ज्ञान व शहाणपण दिले. त्यामुळे इजिप्तचा राजा, फारो, याची मर्जी योसेफाला संपादन करता आली. फारोने योसेफाला इजिप्त देशावर व त्याच्या घरावर अधिपती म्हणून नेमले. 11 मग सर्व इजिप्त व कनान देशावर दुष्काळ पडला. आणि लोकांच्या दु:खाला अंत राहिला नाही. आमच्या पूर्वजांना अन्नधान्य मिळेनासे झाले.

12 “जेव्हा याकोबाने ऐकले की, इजिप्त देशामध्ये धान्य आहे, त्याने आपल्या पूर्वजांना तिथे पाठविले, ही पहिली वेळ होती. 13 ते दुसऱ्या वेळी आले तेव्हा योसेफाने आपली ओळख त्यांना करुन दिली. आणि फारो राजाला योसेफाच्या कुटुंबाची माहिती झाली. 14 मग योसेफाने काही लोकांना आपल्या वडिलांना, आणि त्याच्या कुटुंबातील पंच्याहतर लोकांना इजिप्त येथे बोलावण्यासाठी पाठविले. 15 मग याकोब इजिप्त देशात गेला आणि तो व आपले पूर्वज तेथेच मरण पावले. 16 नंतर त्यांचे मृतदेह शेखेमला नेण्यात आले व तेथेच त्यांना पुरण्यात आले. अब्राहामाने शेखेम येथे हामोराच्या पुत्रांना पुरेपूर मोबदला देऊन विकत घेतलेल्या कबरीत त्यांना पुरण्यात आले.

17 “देवाने अब्राहामाला दिलेले वचन पुरे होण्याची वेळ जसजशी जवळ येऊ लागली, तसतशी इजिप्त देशातील आपल्या लोकांची संख्या वाढू लागली. 18 शेवटी, ज्या राजाला योसेफाची माहिती नव्हती, असा राजा इजिप्तवर राज्य करु लागला. 19 त्या (नवीन) राजाने फार हुशारीने आपल्या लोकांचा फायदा घेतला. तो आपल्या लोकांशी फार निर्दयतेने वागू लागला, तो त्यांच्या बालकांना घराबाहेर टाकून देण्यास भाग पाडू लागला. ती बालके जिवंत राहू नयेत हा त्याचा हेतु होता.

20 “त्या काळात मोशेचा जन्म झाला. आणि तो (देवाच्या नजरेत) फार सुंदर बालक होता. तीन महिन्यांपर्यंत त्याच्या वडिलांच्या घरात वाढला. 21 आणि जेव्हा त्याला घराबाहेर ठेवण्यात आले तेव्हा फारोच्या कन्येने त्याला घेतले. तिने त्याला आपल्या मुलासारख वाढवल. 22 इजिप्तच्या लोकांनी त्याला सर्व प्रकारच्या ज्ञानात सुशिक्षित केले. तसेच तो बोलण्यात व कृतीत भारदस्त झाला.

23 “जेव्हा तो चाळीस वर्षांचा झाला, त्याने विचार केला की, आपले बांधव, जे यहूदी लोक त्यांना जाऊन भेटावे, 24 आणि जेव्हा त्याने आपल्या इस्राएली बांधवांपैकी एकाला वाईट वागविले जाताना पाहिले, तेव्हा त्याने त्या इजिप्तच्या रहिवाश्याला मारले, व आपल्या बांधवाची सुटका केली; छळ केला जाणाऱ्या यहूदी मनुष्याच्या वतीने त्याने बदला घेतला. 25 देव त्याच्या हातून यहूदी लोकांची सुटका करीत आहे, हे यहूदी लोकांना कळेल असे मोशेला वाटले, परंतु त्यांना ते कळले नाही.

26 “दुसऱ्या दिवशी दोन यहूदी माणसे भांडण करताना मोशेने पाहिली, ते पाहून मोशे त्यांच्यात मध्यस्थी करु लागला. तो त्यांना म्हणाला, ‘पुरुषांनो, तुम्ही एकमेकांचे भाऊ आहात, तुम्ही एकमेकांशी का भांडत आहात?’ 27 परंतु जो मनुष्य आपल्या शेजाऱ्याशी वाईट रीतीने वागत होता, त्याने मोशेला एका बाजूला सारुन म्हटले, ‘आमच्यावर अधिकार गाजवायला आणि आमचा न्यायनिवाडा करायला तुला कोणी नेमिले? 28 काल तू त्या इजिप्तच्या माणसाला ठार मारलेस; तसाच माझाही जीव घेण्याचे तुइया मनात आहे का?’ [d] 29 जेव्हा मोशेने त्याला हे बोलताना ऐकले, तेव्हा तो इजिप्त सोडून पळून गेला. आणि मिद्यान्यांच्या देशात उपरी म्हणून राहू लागला आणि तेथेच त्याला दोन मुलगे झाले.

30 “चाळीस वर्षांनंतर मोशे सीनाय पर्वताजवळच्या वाळवंटात होता. एका जळणाऱ्या झुडपांत मोशेला देवदूताचे दर्शन झाले. 31 जेव्हा मोशेने हे पाहिले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. नीट पाहता यावे म्हणून तो त्या जळत्या झुडपाजवळ गेला. मोशेने एक वाणी ऐकली, तो आवाज प्रभूचा होता. 32 प्रभु म्हणाला, ‘मी तुझ्या वाडवडिलांचा देव आहे-अब्राहाम, इसहाक, याकोब यांचा देव आहे.’ मोशे भीतीने थरथर कापू लागला. डोळे वर करुन पाहण्याचे धाडस त्याला होईना.

33 “देव त्याला म्हणाला, ‘तुझ्या पायातील वहाणा काढ! कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती जागा पवित्र आहे. 34 माझ्या लोकांचा इजिप्त देशात होणारा छळ मी पाहिला आहे. आणि त्यांचे विव्हळ्णे माझ्या कानी आले आहे. म्हणून त्यांची सुटका करण्यास मी खाली आलो आहे. आता ये, मी तुला परत इजिप्त देशाला पाठवीत आहे.’ [e]

35 “मोशे हाच तो मनुष्य होता, ज्याला यहूदी लोकांनी नाकारले. ‘तुला कोणी आमच्यावर अधिकार गाजवायला आणि न्याय करायला निवडले आहे काय?’ असे ते त्याला म्हणाले. मोशे हाच मनुष्य आहे की ज्याला देवाने शासनकर्ता व तारणारा म्हणून पाठविले. देवाने मोशेला देवदूताच्या मदतीने पाठविले. याच देवदूताला मोशेने जळत्या झुडपात पाहिले होते. 36 म्हणून मोशेने लोकांना बाहेर काढले. त्याने सामर्थ्यशाली कृत्ये व चमत्कार केले. मोशेने ह्या गोष्टी इजिप्तमध्ये, तांबड्या समुद्राजवळ, आणि वाळवंटात चाळीस वर्षे केल्या.

37 “हा तोच मोशे आहे, ज्याने यहूदी लोकांना असे म्हटले: ‘देव तुम्हाला एक भविष्यवादी देईल. तो भविष्यवादी तुमच्याच लोकांमधून येईल. तो माइयासारखाच भविष्यवादी असेल’ 38 जो अरण्यात यहूद्दांबरोबर होता, सीनाय पर्वतावर आपणाबरोबर बोलणाऱ्या देवदूताबरोबर व आपल्या वाडवडीलांबरोबर होता ज्याला आम्हास देण्यासठी जीवनदायी वचने मिळाली होती, तोच हा मोशे होय,

39 “परंतु आपले वाडवडील त्याचे ऐकायला तयार नव्हते. त्यांनी त्याचे ऐकले नाही. आणि त्यांनी त्याला नाकारले. त्यांची मने इजिप्त देशाकडे परत ओढ घेऊ लागली. 40 आपले वाडवडील अहरोनाला म्हणाले, ‘आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी तयार कर. कारण इजिप्त देशातून काढून आम्हांला बाहेर घेऊन येणारा हा मोशे, त्याचे काय झाले हे आम्हांला माहीत नाही’. 41 त्यांनी याच काळात वासरासारखी दिसणारी एक मूर्ती तयार केली आणि त्या मूर्तीला अर्पणे सादर केली. आपल्या हातांनी घडविलेल्या या मूर्तीपुढे त्यांनी आनंदोत्सव साजरा केला! 42 पण देवाने त्या लोकांकडे पाठ फिरविली आणि आकाशातील समूहांची (तारे, नक्षत्र, अशा खोट्या देवांची) भक्ति करीत राहण्यासाठी मोकळे सोडले. कारण भविष्याद्यांच्या पुस्तकात असे लिहिले आहे:

‘देव म्हणतो, अहो यहूदी लोकांनो, तुम्ही वधलेल्या पशूंची अर्पणे मला आणली नाहीत,
    रानातील चाळीस वर्षांत.
43 तुम्ही तुमच्याबरोबर मोलेखासाठी तंबू (उपासनेचे स्थळ)
    आणि तुमचा देव रेफान यासाठी तान्यांच्या मूर्ती नेल्यात
या मूर्ती तुम्ही केल्या यासाठी की तुम्हांला उपासना करता यावी
    म्हणून मी तुम्हांला दूर बाबेलोनपलीकडे पाठवीन.’ (A)

44 “अरण्यात आपल्या वाडवडिलांच्या बरोबर साक्षीदाखल देवाचा तंबू होता. देवाने तो जसा बनविण्यास सांगितले त्याप्रमाणे व देवाने दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे मोशेने तो बनविला. 45 नंतर यहोशवाने आपल्या वाडवडिलांचे नेतृत्व करुन इतर देशांच्या जमिनी काबिज केल्या. ती राष्टे परमेश्वराने आमच्या पुढून घालविली. जेव्हा आपले लोक या नवीन प्रदेशात गेले तेव्हा हाच तंबू त्यांनी सोबत नेला. आमच्या लोकांना हा तंबू त्यांच्या वाडवडिलांकडून मिळाला व आपल्या पूर्वजांनी दावीदाच्या काळापर्यंत तो ठेवला. 46 दावीद देवाच्या मर्जीचा असल्याने, याकोबाच्या देवासाठी मंदीर बांधण्याची इच्छा त्याने दर्शविली. 47 परंतु देवाचे मंदिर शलमोनाने बांधले.

48 “कारण सर्वेच्च देव मनुष्यांनी त्यांच्या हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही. भविष्यवादी असे लिहितातः

49 ‘प्रभु म्हणतो, स्वर्ग माझे सिंहासन आहे.
    पृथ्वी ही माझे पाय ठेवण्याचे आसन आहे.
तुम्ही माइयासाठी कसले घर बांधू शकता?
    मला विश्रांती घेण्यासाठी दुसऱ्या ठिकाणाची गरज नाही.
50 माझ्या हातांनी या सर्व गोष्टी केल्या नाहीत काय?’” (B)

51 “तुम्ही जे ताठ मानेचे लोक आहात त्या तुमची मने व कान विदेशी लोकांसारखी असून तुम्ही नेहमीच पवित्र आत्म्याला आपल्या पूर्वजांप्रमाणेच नाकारीत आला आहात. 52 तुमच्या वाडवडिलांनी छळ केला नाही, असा कोणी एखादा भविष्यवादी होऊन गेला काय? एक धार्मिक (ख्रिस्त) येणार अशी घोषणा करणाऱ्यांचा त्यांनी वध केला. आणि आता तर तुम्ही त्याचा ही (ख्रिस्ताचा) विश्वासघात व खून केलात. 53 तुम्हीच लोक आहात, ज्यांना नियमशास्त्र मिळाले. देवाने हे नियमशास्त्र देवदूतांकरवी दिले. परंतु तुम्ही ते पाळीत नाही!”

स्तेफनाचा वध होतो

54 यहूदी लोकांनी स्तेफनाला हे बोलताला ऐकले व त्यांना फार राग आला, ते त्याच्याविरुद्ध दातओठ खाऊ लागले. 55 परंतु स्तेफन पवित्र आत्म्याने भरलेला होता. त्याने आपली नजर वर स्वर्गाकडे लावली. देवाचा गौरव त्याने पाहिला. त्याने येशूला देवाच्या उजवीकडे उभे असलेले पाहिले. 56 तो म्हणाला, “पहा! स्वर्ग उघडलेला मला दिसत आहे. व मी मनुष्याच्या पुत्राला देवाच्या उजवीकडे उभा असलेला पाहत आहे!”

57 स्तेफनाचे हे शब्द ऐकून यहूदी मोठ्याने ओरडले. त्यांनी आपले कान स्वतःच्या हातांनी झाकून घेतले. नंतर ते सर्व मिळून स्तेफनावर धावून गेले. 58 त्यानी स्तेफनाला धरुन ओढीत शहराच्या बाहेर नेले व त्याला दगडमार करु लागले. जे साक्षी होते, त्यांनी आपले कपडे शौल नावाच्या एका तरुण मनुष्यापाशी ठेवले होते. 59 ते स्तेफनावर दगडमार करीत असताना तो मोठ्याने प्रार्थना करीत म्हणाला, “हे प्रभु येशू, माइया आत्म्याचा स्वीकार कर!” 60 नंतर स्तेफनाने आपले गुडघे टेकले व मोठ्याने ओरडून म्हणाला, “प्रभु, यांचे हे करणे त्यांच्या माथी पाप असे मानू नको!” असे बोलून त्याने प्राण सोडला.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center