M’Cheyne Bible Reading Plan
माणसे दुष्ट होतात
6 पृथ्वीवरील मनुष्यांची संख्या वाढतच राहिली आणि त्यांना मुली झाल्या; 2 त्या मुली सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले, म्हणून आपल्या आवडी निवडी प्रमाणे त्यांनी त्यांच्याशी लग्न केले.
3 या स्त्रीयांनी मुलांना जन्म दिला, त्या काळी व त्यानंतर पृथ्वीवर नेफिलिम लोक राहात होते. ते फार नामांकित होते. ते प्राचीन काळापासूनचे महावीर होते.
4 नंतर परमेश्वर म्हणाला, “मनुष्य हा देहधारी आहे, तो भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची सत्ता त्यांच्या ठायी सर्वकाळ राहणार नाही; म्हणून मी माझ्या आत्म्याला त्याच्यापासून सतत-त्रास होऊ देणार नाही; तर मी त्यांस एकशेंवीस वर्षांचेच आयुष्य देईन.”
5 परमेश्वराने पाहिले की पृथ्वीवरील लोक दुष्ट आहेत; त्यांचे विचार नेहमी वाईट असतात. 6 म्हणून पृथ्वीवर मनुष्य निर्माण केल्याबद्दल परमेश्वरला वाईट वाटले; 7 आणि तो मनात फार दु:खी झाला; तेव्हा तो म्हणाला, “मी उत्पन्न केलेल्या मानवास पृथ्वीतलावरुन नष्ट करीन; तसेच माणसे, पशू, सरपटणारे प्राणी, व आकाशातील पक्षी या सर्वांचा मी नाश करीन कारण या सर्वांना उत्पन्न केल्याचे मला दु:ख होत आहे.”
8 परंतु परमेश्वराला आनंद देणारा एक माणूस पृथ्वीवर होता तो म्हणजे नोहा.
नोहा आणि जलप्रलय
9 ही नोहाच्या घराण्याची कहाणी आहे. नोहा आयुष्यभर त्या पिढीतला नीतिमान माणूस होता. तो नेहमी देवाच्या आज्ञांप्रमाणे चालला 10 नोहाला शेम, हाम व याफेथ नावाचे तीन मुलगे होते.
11 देवाने पृथ्वीकडे पाहिले तेव्हा माणसांनी ती भ्रष्ट केली आहे असे त्याला आढळले. 12 जिकडे तिकडे हिसांचार चालू होते; लोक वाईट व क्रूर झाले होते; त्यांनी पृथ्वीवर आपल्या जीवनाचा नाश करुन घेतला होता.
13 म्हणून देव नोहाला म्हणाला, “मनुष्यांनी सर्व पृथ्वी संतापांने व हिंसेने भरुन टाकली आहे; म्हणून मी उत्पन्न केलेल्या सर्व प्राण्यांचा नाश करीन; त्यांचा पृथ्वी तलावरुन नायनाट करीन 14 तेव्हा आपणासाठी सायप्रस म्हणजे गोफेर झाडाच्या लाकडाचे एक तारु कर; त्यात खोल्या कर आणि त्याला सर्वत्र म्हणजे आतून व बाहेरुन डांबर लाव.”
15 देव म्हणाला, “तारवाचे मोजमाप मी सांगतो त्याप्रमाणे असावे. ते 300 क्यूबिट लांब, 50 क्यूबिट रुंद, आणि 30 क्यूबिट उंच असावे; 16 तारवाला छतापासून सुमारे 18 इंचावर एक खिडकी कर; तारवाच्या एका बाजूस दार ठेव; तसेच तारवाला वरचा, मधला व खालचा असे तीन मजले कर.
17 “मी सांगतो ते समजून घे. मी पृथ्वीवर जलप्रलय आणीन. मी पृथ्वीवरील सर्वलोक आणि सर्व सजीव प्राण्यांना नष्ट करीन. 18 मी तुझ्याशी एक विशेष करार करतो; तू आपले मुलगे, आपली बायको व आपल्या सुना यांस घेऊन तारवात जा. 19 तसेच पृथ्वीवरील प्रत्येक जातीतील सजीव प्राण्यापैकी एक नरमादीची जोडी तू तारवात ने, त्यांना तुझ्याबरोबर तारवात जिवंत ठेव. 20 पक्षी, पशू आणि भूमीवर रांगणारे प्राणी या पैकी प्रत्येकाच्या जातीतून नरमादी असे दोनदोन तुझ्याबरोबर तरवात ने; त्यांना तुझ्याबरोबर तारवात जिवंत ठेव. 21 तसेच तुला व त्यांना लागणारे पृथ्वीवरील सर्व प्रकारचे अन्न तारवात साठवून ठेव.”
22 देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे नोहाने सर्व काही केले.
दान देण्याविषयी येशूची शिकवण
6 “जेव्हा तुम्ही चांगली कृत्ये करता तेव्हा ती गाजावाजा न करता करा. लोकांच्या नजरेत भरावी म्हणून जर तुम्ही सत्कृत्ये करणार असाल तर लक्षात ठेवा, तुमच्या स्वर्गातील पित्याकडून तुम्हाला तुमचे प्रतिफळ मिळणार नाही.
2 “जेव्हा तुम्ही गरिबांना देता तेव्हा त्याचा गाजावाजा करू नका. मी खरे तेच सांगतो. ढोंगी लोक तसेच करतात. दान देण्यापूर्वी कर्णा फुंकून लोकांचे लक्ष वेधून घेतात. सभास्थानात व रस्त्यावर ते जाहीरपणे अशी कामे करतात, कारण इतर लोकांनी त्यांना मोठेपणा द्यावा अशी त्यांची इच्छा असते. मी तुम्हांस सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. 3 म्हणून जेव्हा तुम्ही गरिबाला द्याल, तेव्हा गुपचूप द्या. तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू नये. 4 दान गुप्त असावे, कारण तुमच्या पित्याला ते कळते व तो त्याचे फळ देतो.
प्रार्थनेविषयी येशूची शिकवण(A)
5 “जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यांसारखे होऊ नका. कारण आपण लोकांस दिसावे म्हणून सभास्थानांमध्ये व रस्त्याच्या कोपऱ्यांवर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हांला खरे सांगतो की, त्यांना आपले प्रतिफळ मिळाले आहे. 6 पण तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा आतल्या खोलीत जा, दार लावून घ्या. व जो तुमचा पिता गुप्त आहे त्याची प्रार्थना करा. मग तुमचा पिता, ज्याला कोणी पाहू शकत नाही तो तुम्हांला प्रतिफळ देईल.
7 “आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ज्यांना देव माहीत नाही अशासारखे होऊ नका. ते निरर्थक बडबड करतात. कारण आपण फार बोलल्याने आपले म्हणणे ऐकले जाईल असे त्यांना वाटते. 8 त्यांच्यासारखे होऊ नका. तुम्हाला कशाची गरज आहे हे तुम्ही सांगण्यापूर्वी तुमच्या पित्याला ठाऊक असते. 9 म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थना करता. तेव्हा तुम्ही अशी प्रार्थना करावी.
‘हे आमच्या स्वर्गातील पित्या,
तुझे नाव पवित्र मानले जावो.
10 तुझे राज्य येवो,
जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.
11 आमची रोजची भाकर आज आम्हांला दे.
12 जसे आमच्याविरूद्ध केलेल्या वाईटाची आम्ही क्षमा करतो
तसे आम्ही केलेल्या पापांची आम्हाला क्षमा कर,
13 आम्हांला परीक्षेत आणू नकोस
तर आम्हांला त्या दुष्टापासून सोडीव.’
14 कारण जर तुम्ही इतरांच्या चुकांची क्षमा कराल तर तुमचा स्वर्गातील पिताही तुम्हांला क्षमा करील; 15 पण जर तुम्ही इतरांच्या चुकांची क्षमा करणार नाही, तर तुमचा पिताही तुम्हांला क्षमा करणार नाही.
उपासाविषयी येशूची शिकवण
16 “जेव्हा तुम्ही उपास करता तेव्हा तुम्ही ढोंग्यांसारखे चेहरा उदास करू नका. कारण आपण उपास करीत आहोत हे लोकांना दिसावे म्हणून ते आपली मुखे उदास करतात. मी तुम्हांला खरे सांगतो. त्यांना त्यांचे प्रतिफळ मिळाले आहे. 17 तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा आपल्या डोक्याला तेल लावा आणि आपले तोंड धुवा. 18 यासाठी की, तुम्ही उपास करता हे लोकांना दिसू नये तर तुमच्या गुप्त पित्याला दिसावे. मग तुमचा गुप्त पिता तुम्हांला प्रतिफळ देईल.
पैशापेक्षा देव अधिक महत्त्वाचा आहे(B)
19 “येथे पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवू नका. येथे कसर व जंग लागून तिचा नाश होईल. आणि चोर घर फोडून ती चोरून नेतील. 20 म्हणून स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा. 21 जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.
22 “डोळा शरीराचा दिवा आहे. म्हणून जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुमचे सर्व शरीर प्रकाशमय होईल. 23 पण जर तुमचे डोळे वाईट असतील, तर तुमचे सर्व शरीर पापाने अंधकारमय होईल. जर तुम्हाठायी असणारा अंधकार वास्तविक अंधकार आहे, तर खरोखरचा अंधार कितीतरी अंधकारमय असेल.
24 “कोणालाही दोन धन्यांची चाकरी एकावेळी करणे शक्य नाही. तो एकाचा तिरस्कार करील तर दुसऱ्याशी निष्ठा राखील. किंवा तो एका धन्याचे ऐकेल व दुसऱ्याचे ऐकणार नाही. तसेच तुम्हांला देवाची आणि पैशाची (धनाची) सेवा एकाच वेळी करता येणार नाही.
देवाच्या राज्याला प्रथमस्थान द्या(C)
25 “म्हणून मी तुम्हांला सांगतो की, काय खावे आणि काय प्यावे अशी आपल्या जीवाविषयी, किंवा काय पांघरावे अशी आपल्या शरीराविषयी चिंता करू नका. जीव अन्नापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे आणि शरीर वस्त्रापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. 26 आकाशातील पाखरांकडे पाहा. ती पेरीत नाहीत वा कापणी करीत नाहीत किंवा गोदामात साठवूनही ठेवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गातील पिता त्यांना खावयास देतो आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक मौल्यवान आहात, हे तुम्हांला माहीत आहे. 27 आणि चिंता करुन आपले आयुष्य थोडे देखील वाढवणे कोणाला शक्य आहे का?
28 “आणि तुम्ही वस्त्राविषयी का काळजी करता? रानातील फुले पाहा, ती कशी वाढतात? ती कष्ट करीत नाहीत, आणि ती कातीतही नाहीत, 29 तरी मी तुम्हांला सांगतो की, शलमोन राजादेखील त्याच्या भर ऐश्र्वर्याच्या काळात यांतील एखाद्या प्रमाणेही सजू शकला नव्हता. 30 तर अहो अल्पविश्वासी लोकांनो, आज आहे तर उद्या भट्टीत पडते, अशा रानफुलांना जर देव असा पोशाख घालतो तर त्याहीपेक्षा विशेष असा पोशाख तुम्हांला घालणार नाही काय?
31 “चिंता करू नका आणि असे म्हणू नका की, ‘आम्ही काय खावे?’ किंवा ‘आम्ही काय प्यावे?’ किंवा ‘आम्ही काय पांघरावे?’ 32 सर्व लोक ज्यांना देव माहीत नाही, ते सुध्दा या गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करतात, काळजी करू नका. कारण तुमच्या स्वर्गातील पित्याला तुम्हांला या गोष्टींची गरज आहे हे माहीत आहे. 33 तर पहिल्यांदा तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टीही तुम्हांला मिळतील. 34 म्हणून उद्याची चिंता करू नका. कारण प्रत्येक दिवस काही ना काही चिंता घेऊनच उगवतो. म्हणून उद्याची चिंता उद्यासाठी दूर ठेवा.
दारयावेशचा आदेश
6 तेव्हा राजा दारयावेशने आपल्या आधीच्या राजांच्या कागदपत्रांचा दफ्तरखान्यात शोध घेण्याचा आदेश दिला. बाबेलच्या जामदराखान्यातच ही कागदपत्रे ठेवलेली होती. 2 मेदी प्रांतातील अखमथा किल्ल्यात (राजवाड्यात) एक गुंडाळी सापडली. तिच्यावर पुढीलप्रमाणे मजकूर लिहिलेला होता:
अधिकृत टिपण: 3 कोरेश राजाच्या कारकीर्दीच्या पहिल्या वर्षी यरुशलेममधील मंदिराच्या बाबतीत राजाने असा आदेश दिला की, देवाचे मंदिर पुन्हा बांधले जावे.
तेथे यज्ञ अर्पण करता यावेत. मंदिराचा पाया बांधून काढावा. मंदिराची उंची 90 फूट आणि रुंदी 90 फूट असावी. 4 भोवतालच्या भिंतीत मोठ्या पाषाणांचे तीन थर आणि मोठ्या लाकडाचा एक थर असावा. मंदिराच्या बांधकामाचा खर्च राजाच्या तिजोरीतून केला जावा. 5 मंदिरातील सोन्यारुप्याच्या वस्तू पुन्हा आपापल्या जागी ठेवल्या जाव्यात. नबुखद्नेस्सरने त्या यरुशलेमच्या मंदिरातून हलवून बाबेलला आणल्या होत्या. त्यांची पुन्हा मंदिरात स्थापना व्हावी.
6 तेव्हा आता मी दारयावेश,
फरात नदीच्या पश्र्चिमेकडील प्रांताचा अधिकारी ततनइ, शथर बोजनई आणि त्यांचे त्या प्रांतातील इतर कारभारी यांना असा आदेश देतो की त्यांनी यरुशलेममधून दूर जावे. 7 कामगारांना त्रास देऊ नये. देवाच्या प्रार्थनास्थळाच्या कामात व्यत्यय आणू नये. यहुदी अधिकारी आणि यहूदी वडीलधारी मंडळी यांना हे मंदिर पूर्वी होते त्याचठिकाणी पुन्हा बांधू द्यावे.
8 आता माझा आदेश असा आहे: देवाच्या मंदिराचे बांधकाम करणाऱ्या यहूदी वडीलजनांसाठी असे करा. मंदिराच्या बांधकामाचा पूर्ण खर्च राजाच्या खजिन्यातून दिला जावा. हा पैसा फरात नदीच्या पश्र्चिमेकडील प्रांतांमधून येणाऱ्या करातून जमा होईल. या गोष्टी विनाविलंब करा म्हणजे कामाला खीळ बसणार नाही. 9 त्या लोकांना लागेल ते द्या. स्वर्गातील देवाच्या होमार्पणासाठी त्यांना गोऱ्हे, मेंढे, कोकरे हत्यादी ज्या गोष्टी लागतील त्या द्या. यरुशलेममधील याजकांनी गहू, मीठ, द्राक्षारस तेल वगैरे मागीतल्यास त्यांना त्या वस्तू तात्काळ आणि रोजच्या रोज पुरवा. 10 स्वर्गातील देवाला प्रसन्न करणारे होम या यहूदी याजकांनी अर्पण करावे आणि त्यांनी माझ्यासाठी व माझ्या मुलासाठी देवाकडे प्रार्थना करावी म्हणून त्यांना जे जे लागेल ते सर्व द्या.
11 माझी आणखी एक आज्ञा: माझ्या आज्ञेत कोणी फेरफार केल्यास त्याच्या घराचे लाकूड काढून ते त्याच्या शरीरात घुसवावे आणि त्याच्या घराची राखरांगोळी करुन केवळ दगडांच्या ढिगाऱ्यात त्याचे रुपांतर करावे.
12 परमेश्वराने यरुशलेममध्ये आपले नाव चिरंतन केले आहे. तेव्हा मला वाटते की या आज्ञेत बदल करणाऱ्या व्यक्तीचा मग ती व्यक्ती राजा असो की आणखी कोणी, देव त्यांचा नि:पात करील. कोणी त्याच्या यरुशलेममधील या मंदिराचा विध्वंस करायचा प्रयत्न केल्यासही देव त्याचा नाश करील.
मी, दारयावेश, हा हुकूम करीत आहे. त्याची तात्काळ आणि पूर्ण अंमलबजावणी व्हावी.
मंदिराच्या बांधकामाची समाप्ती आणि प्रतिष्ठापना
13 फरात नदीच्या पश्चिमेकडील प्रांताचा अधिकारी ततनइ, शथर-बोजनइ आणि त्यांचे सोबती यांनी मग राजा दारयावेशच्या हुकुमाचे पालन केले. त्यांनी ही आज्ञा कसोशीने आणि ताबडतोब पाळली. 14 यहुदी वडीलधाऱ्या मंडळींचे मंदिराचे काम चालूच राहिले. हाग्गय हा संदेष्टा आणि इद्दोचा मुलगा जखऱ्या यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे त्यात त्यांना यश आले. इस्राएलच्या देवाच्या आज्ञेप्रमाणे आणि पारसचे राजे कोरेश, दारयावेश व अर्तहशश्त यांच्या आदेशानुसार यांनी मंदिर बांधून पुरे केले. 15 हे मंदिर राजा दारयावेशच्या कारकिर्दीच्या सहाव्या वर्षी अदार [a] महिन्याच्या तृतीयेला पुरे झाले.
16 इस्राएल लोकांनी या मंदिराची प्रतिष्ठापना मोठ्या आनंदाने साजरी केली. बदिवासातून सुटून परत आलेले याजक, लेवी आणि इतर सर्व जण या उत्सवात सहभागी झाले.
17 प्रतिष्ठापनेच्या वेळी त्यांनी शंभर बैल, दोनशे मेंढे, चारशे कोकरे होमात अर्पण केले. तसेच इस्राएलच्या पापार्पणासाठी बारा बकरेही अर्पण केले. इस्राएलींच्या बारा घराण्यासाठी प्रत्येकी एक असे ते होते. 18 यरुशलेममधील या मंदिराच्या सेवेसाठी त्यांनी मोशेच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे, याजकांची आणि लेव्यांची त्यांच्या-त्यांच्या वर्गानुसार योजना केली.
वल्हांडण
19 बंदिवासातून परत आलेल्या लोकांनी पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी वल्हांडण सण पाळला. 20 वल्हांडण सण साजरा करण्यासाठी याजक आणि लेवी यांनी शुचिर्भूत होऊन स्वतःला शुध्द केले. कैदेतून सुटून आलेले आपले भाऊबंद याजक आणि ते स्वतः या सर्व यहुद्यांसाठी लेवींनी वल्हांडणाच्या कोकराचा बळी दिला. 21 बंदिवासातून परतून आलेल्या समस्त इस्राएल लोकांनी वल्हांडणाचे भोजन केले. त्या देशाच्या मूर्तिपूजक लोकांच्या अशुध्दतेपासून दूर व्हावे म्हणून इतरांनीही शुचिर्भूत होऊन त्या भोजनाचा आस्वाद घेतला. इस्राएलचा परमेश्वर याला मदतीसाठी शरण जाता यावे म्हणून त्यांनी हे शुध्दीकरण केले. 22 बेखमीर भाकरींचा सण त्यांनी मोठ्या उत्साहाने सात दिवस साजरा केला. परमेश्वराने अश्शूरच्या राजाचे मनपरिवर्तन केले होते त्यामुळे त्या राजाने त्यांना मंदिराच्या बांधकामात मदत केली. अशा तऱ्हेने परमेश्वराने लोकांना सुखी केले.
विशेष कामासाठी सात जणांची निवड केली जाते
6 अधिकाधिक लोक येशूचे अनुयायी होत होते. पण याचवेळी ग्रीक बोलणाऱ्या अनुयायांचा यहूदी अनुयायांशी वाद झाला. ते म्हणाले की, अनुयायांना मिळणारा जो रोजचा अन्नाचा वाटा असतो, तो त्यांच्या विधवांना मिळण्याविषयी दुर्लक्ष होते. 2 बारा प्रेषितांनी सर्व अनुयायांना एकत्र बोलाविले.
प्रेषित त्यांना म्हणाले, “देवाचे वचन शिकविण्याचे आमचे काम थांबलेले आहे. हे चांगले नाही! लोकांना काही खाण्यासाठी देणे यापेक्षा देवाचे वचन सातत्याने शिकविणे हे आमच्यासाठी अधिक चांगले. 3 म्हणून बंधूनो, तुमचे स्वतःचे सात लोक निवडा. लोकांनी त्यांना हे चांगले आहेत असे म्हटले पाहिजे. ते ज्ञानाने व आत्म्याने पूर्ण भरलेले असावेत. आणि त्यांना ही सेवा करण्यास आपण देऊ. 4 मग आपण संपूर्ण वेळ प्रार्थना करण्यात व देवाचे वचन शिकविण्यात घालवू शकतो.”
5 बंधुवर्गातील सगळ्यांना ही कल्पना आवडली. मग त्यांनी या सात जणांची निवड केली: स्तेफन (मोठा विश्वास व पवित्र आत्म्याने पूर्ण भरलेला मनुष्य, फिलिप्प), [a] प्रखर, नीकनोर, तिम्मोन, पार्मिना आणि निकलाव (अंतुखियाकर जो यहूदी झाला होता). 6 नंतर त्यांनी या सात जणांना प्रेषितांसमोर उभे केले. प्रेषितांनी त्यांच्यावर हात ठेवले व प्रार्थना केली.
7 देवाचे वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत जात होते. यरुशलेममधील अनुयायांचा गट मोठा होत होता. एकढेच नव्हे तर एका मोठ्या यहूदी याजकवर्गाने विश्वास ठेवला व आज्ञा पाळल्या.
स्तेफनाविरुद्ध यहूदी लोक
8 स्तेफन (सात लोकांपैकी एक) यास मोठा आशीर्वाद मिळाला. देवाने त्याला लोकांसमोर अद्भूत चमत्कार करण्याचे सामर्ध्य दिले होते. 9 परंतु काही यहूदी आले आणि त्यांनी स्तेफनाबरोबर वाद घातला. हे यहूदी सभास्थानातून [b] आले होते. त्याला लिबर्तीनांसाठी सभास्थान असे म्हणत. (हे सभास्थान कुरेने, आणि अलेक्सांद्र येथील यहूदी लोकांसाठी सुद्धा होते). किलीकिया व आशियातील यहूदीसुद्धा त्यांच्याबरोबर होते. ते सर्व आले आणि स्तेफानबरोबर वाद घालू लागले. 10 परंतु ज्या ज्ञानाने व आत्म्याच्या प्रेरणेने स्तेफन बोलत होता त्यापुढे यहूदी लोकांचा टिकाव लागेना.
11 तेव्हा त्यांनी काही लोकांना पैसे दिले व असे बोलायला शिकविले की, “आम्ही स्तेफनाला मोशे व देव यांच्यावरुध्द दुर्भाषण करताना म्हणजे वाईट गोष्टी बोलताना ऐकले.” 12 त्यामुळे लोकसमुदाय, यहूदी वडीलजन आणि परुशी लोक भडकले. ते इतके चिडले की, त्यांनी येऊन स्तेफनाला धरले. आणि त्याला यहूदी लोकांच्या (पुढाऱ्यांच्या) सभेत नेले.
13 आणि त्यांनी तेथे खोटे साक्षीदार आणले, ते म्हणाले, “हा मनुष्य (स्तेफन) पवित्र मंदिराविषयी नेहमी वाईट बोलतो. आणि तो मोशेच्या नियमशास्त्राविषयी नेहमी वाईट बोलतो. 14 आम्ही त्याला असे बोलताना ऐकले आहे की, नासरेथचा येशू ही जागा नष्ट करील आणि मोशेने घालून दिलेल्या चालीरीती बदलून टाकील.” 15 धर्मसभेत बसलेल्या सर्व सभासदांनी स्तेफनाकडे न्याहाळून पाहिले. तेव्हा त्याचा चेहरा देवदूताच्या चेहऱ्यासारखा दिसत होता.
2006 by World Bible Translation Center