M’Cheyne Bible Reading Plan
पहिले कुटुंब
4 आदाम आणि त्याची बायको हव्वा यांचा लैगिक संबंध आला; हव्वा गर्भवती होऊन तिने एका बाळाला जन्म दिला. त्या मुलाचे नाव काइन असे ठेवले. तेव्हा हव्वा म्हणाली, “परमेश्वराच्या सहाय्याने मला पुरुषसंतान लाभले आहे.”
2 त्यानंतर हव्वेने आणखी एका बाळाला जन्म दिला. हा मुलगा म्हणजे काइनाचा भाऊ हाबेल होता. हाबेल मेंढपाळ झाला; काइन शेतकरी झाला.
पहिला खून
3 काही काळानंतर हंगामाचे वेळी काइनाने परमेश्वराला आदराने दान देण्यासाठी आपल्या शेतातील उत्पन्नातून काही अर्पण आणले. 4 हाबेलानेही आपल्या कळपातील काही मेंढरे देवाला अर्पण म्हणून आणली. त्याने मेंढरांचे सर्वात उत्तम भाग आणले.
परमेश्वराने हाबेलाचे अर्पण स्वीकारले. 5 परतुं काइन आणि त्याचे अर्पण स्वीकारले नाही. यामुळे काइन फार दु:खी झाला व त्याला फार राग आला 6 परमेश्वराने काइनाला विचारले, “तू का रागावलास? तुझा चेहरा दु:खी का दिसत आहे? 7 तू जर चांगल्या गोष्टी करशील तर तुझे माझे संबंध चांगले राहतील, मग मी तुझा स्वीकार करीन; परंतु तू जर वाईट रीतीने चालशील तर ते पाप तुझ्यात राहील व ते पाप तुझ्यावर सत्ता चालवू पाहील; पण तू त्या पापावर सत्ता चालवली पाहिजेस.”
8 काइन आपला भाऊ हाबेल यास म्हणाला, “चल, आपण जरा शेतात जाऊ या.” तेव्हा काइनाने हाबेलाला बाहेर शेतात नेले. तेव्हा काइनाने आपला भाऊ हाबेल यावर हल्ला केला व त्याला ठार मारले.
9 काही वेळाने परमेश्वर काइनास म्हणाला, “तुझा भाऊ हाबेल कोठे आहे?”
काइनाने उत्तर दिले, “मला माहीत नाही; माझ्या भावावर नजर ठेवणे व त्याची काळजी घेणे हे माझे काम आहे काय?”
10 नंतर परमेश्वर म्हणाला, “तू हे काय केलेस? 11 तू तुझ्या भावाला ठार केलेस. त्याचे रक्त मला जमिनीतून हाका मारीत आहे; त्याचे रक्त तुझ्या हातातून घेण्यास भूमीने आपले तोंड उघडले आहे. ह्याच कारणाने तू शापित आहेस. भूमी तुला नकारेल. 12 पूर्वी तू जमिनीची मशागत केलीस आणि तिने तुला चांगले पीक दिले. पण आता तू मशागत करशील तरी ती भूमी तुला पीक देणार नाही. तू पृथ्वीवर एका ठिकाणी घर करुन राहणार नाहीस तर तू भटकत राहशील व परागंदा होशील.”
13 मग काइन म्हणाला, “ही शिक्षा मी सहन करु शकणार नाही इतकी भारी आहे. 14 पहा तू मला ह्या माझ्या भूमिवरुन दूर पाठवीत आहेस, मी तुला पाहू शकणार नाही किंवा तुझ्या जवळ मला येता येणार नाही; मला घरदार असणार नाही. या पृथ्वीवर तू मला ठिकठिकाणी भटकणे व परागंदा होणे लादले आहेस. मी जर कोणाच्या हाती सापडेन तर तो मला ठार मारुन टाकेल.”
15 मग परमेश्वर काइनास म्हणाला, “मी असे घडू देणार नाही. कारण तुला जर कोणी ठार मारील तर त्याला मी कितीतरी अधिक पटीने शिक्षा देईन.” मग काइनाला कोणी मारु नये म्हणून परमेश्वराने त्याच्यावर एक विशिष्ठ खूण केली.
काइनाचे घराणे
16 काइन परमेश्वरा समोरुन निघून गेला आणि एदेनाच्या पूर्वेस नोद देशात जाऊन राहिला.
17 काइन आपल्या पत्नीजवळ जाऊन निजला तेव्हा ती गर्भवती होऊन तीने हनोख नावाच्या मुलाला जन्म दिला; काइनाने एक नगर बांधले तेव्हा त्याने त्या नगराला आपल्या मुलाचेच हनोख हे नाव दिले.
18 हनोखाला हराद नावाचा मुलगा झाला; हरादाला महूयाएल झालां महूयाएलास मथुशाएल झाला; आणि मथुशाएलास लामेख झाला.
19 लामेखाने दोन बायका केल्या. पहिलीचे नाव आदा व दुसरीचे नाव सिल्ला. 20 आदाने याबालास जन्म दिला; तो तंबूत राहाणाऱ्या व गुरेढोरे पाळणाऱ्या लोकांचा मूळ पुरुष झाला. 21 आदाला आणखी एक मुलगा झाला. (त्याचे नाव युबाल; हा याबालाचा भाऊ); युबाल तंतुवाद्दे, व वायुवाद्दे म्हणजे वीणा व बासरी वाजविणाऱ्या कलावंताचा मूळ पुरुष झाला. 22 सिल्ला हिला तुबल-काइन झाला; तो तांब्याची व लोखंडाची कामे करणाऱ्या लोकांचा मूळ पुरुष झाला. तुबल काइनास नामा नावाची बहीण होती.
23 लामेख आपल्या बायकांना म्हणाला,
“आदा आणि सिल्ला माझी वाणी ऐका;
लामेखाच्या बायकांनो, मी ज्या गोष्टी बोलतो तिकडे कान द्या;
एका माणसाने मला जखमी केले, तेव्हा मी त्याला ठार मारले,
एका तरुणाने मला मारले म्हणून मी त्याला ठार केले.
24 काइनाला मारणाऱ्याला खूप खूप शिक्षा होईल
तर मग मला मारणाऱ्याला त्याहीपेक्षा आधिकात अधिक शिक्षा होईल.”
25 आदाम पुन्हा पत्नीजवळ गेला. आणि तिला मुलगा झाला. त्यांनी त्याचे नाव शेथ असे ठेवले हव्वा म्हणाली, “काइनाने हाबेलास ठार केले म्हणून देवाने मला दुसरा मुलगा दिला.” 26 शेथलाही मुलगा झाला, त्याचे नाव त्याने अनोश ठेवले; त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करु लागले.
येशूची परीक्षा(A)
4 मग पवित्र आत्म्याने येशूला रानात नेले. मोहात पाडून सैतानाने त्याची परीक्षा घ्यावी म्हणून त्याला तेथे नेण्यात आले. 2 चाळीस दिवस आणि चाळीस रात्री येशूने काहीच खाल्ले नाही. त्यानंतर त्याला खूप भूक लागली. 3 तेव्हा सैतान येशूची परीक्षा घेण्यासाठी त्याच्याकडे आला व म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या दगडांना भाकरी होण्याची आज्ञा दे.”
4 येशूने उत्तर दिले, “असे लिहिले आहे की,
‘मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही
तर देवाच्या तोंडून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल.’” (B)
5 मग सैतानाने त्याला पवित्र नगरात (यरुशलेमात) नेले. सैतानाने येशूला मंदिराच्या कंगोऱ्यावर उभे केले. 6 आणि त्याला म्हटले, “जर तू देवाचा पूत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असे लिहिले आहे की,
‘देव त्याच्या दूतांना तुझ्यासाठी आज्ञा करील
आणि तुझे पाय खडकावर आपटू नयेत म्हणून
ते तुला हातांवर झेलतील.’” (C)
7 येशूने त्याला उत्तर दिले, “असे सुद्धा लिहिले आहे की,
‘देव जो तुझा प्रभु याची परीक्षा पाहू नको.’” (D)
8 मग सैतानाने येशूला एका खूप उंच पर्वतावर नेले. त्याने येशूला जगातील राज्ये अणि त्यांतील सर्व वैभव दाखविले. 9 सैतान म्हणाला, “जर तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सारे तुला देईन.”
10 तेव्हा येशू त्याला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापासून दूर हो! कारण असे लिहिले आहे की,
‘देव जो तुझा प्रभु त्याचीच उपासना कर
आणि केवळ त्याचीच सेवा कर.’” (E)
11 मग सैतान येशूला सोडून निघून गेला आणि देवदूत येऊन त्याची देखभाल करू लागले.
येशू गालीलात त्याच्या कामाचा प्रारंभ करतो(F)
12 नंतर योहानाला तुरूंगात टाकले आहे हे ऐकून येशू गालीलास परतला. 13 परंतू तो नासरेथ येथे राहिला नाही, तर गालील सरोवराजवळील कफर्णहूम नगरात जाऊन राहिला. जबुलून व नफताली ह्या प्रदेशांना लागुनच कफर्णहूम नगर आहे. 14 यशया ह्या संदेष्ट्याने पूर्वी जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे यासाठी हे झाले. यशयाने वर्तविलेले भविष्य असे होते:
15 “जबुलून आणि नफताली प्रांत
समुद्राकडे येणारे मार्ग, यार्देन नदीपलीकडचा प्रदेश
व यहूदीतरांचा गालील यांमधील.
16 अंधारात वावरणाऱ्या लोकांनी
मोठा प्रकाश पाहिला.
मरणाचे सावट असलेल्या प्रदेशात
राहणाऱ्या लोकांसाठी प्रकाश अवतरला.” (G)
17 त्यावेळेपासून येशू उपदेश करू लागला व म्हणू लागला की, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”
येशू काही शिष्य निवडतो(H)
18 नंतर तो गालीलच्या सरोवराजवळून जात असता त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया या दोघांना पाहिले. ते कोळी होते. ते जाळे टाकून मासे धरीत होते. 19 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.” 20 मग ते मागेपुढे न पाहता लगेच जाळे टाकून देऊन ते त्याच्या मागे चालू लागले.
21 तेथून पुढे चालत जात असता त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान यांना त्यांचे वडील जब्दी याच्याबरोबर नावेत आपली जाळी नीट करताना पाहिले. आणि त्याने त्यांना बोलावले. 22 तेव्हा ते आपली नाव व आपले वडील यांना सोडून त्याच्या मागे गेले.
येशू लोकांना शिकवितो आणि बरे करतो(I)
23 येशू गालील प्रांतात सगळीकडे गेला, येशूने सभास्थानात जाऊन शिकविले व स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली. येशूने लोकांचे सर्व रोग व दुखणी बरी केली. 24 येशूविषयीची बातमी सर्व सूरीया देशभर पसरली; मग जे दुखणेकरी होते, ज्यांना नाना प्रकारचे रोग व आजार होते, ज्यांना भूतबाधा झाली होती, जे फेफरेकरी व पक्षाघाती होते अशा सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले आणी त्याने त्यांना बरे केले. 25 मग गालील व दकापलीस, यरुशलेम व यहूदीया येथून व यार्देनेच्या पलीकडून आलेल्या लोकांचे मोठे समुदाय त्याच्यामागे चालले.
मंदिराच्या बांधकामाला विरोध
4 त्या भागातील बरेच लोक यहूदा आणि बन्यामीन यांचे विरोधक होते. बंदिवासातून आलेले लोक परमेश्वरासाठी मंदिर बांधत आहेत हे या विरोधकांना कळले तेव्हा ते जरुब्बाबेल आणि घराण्यांचे प्रमुख यांच्याकडे येऊन म्हणाले, “आम्हालाही तुमच्या बांधकामात मदत करु द्या. तुमच्याप्रमाणेच आम्हीही या देवाला मदतीसाठी विनवितो. अश्शूरचा राजा एसर हद्दोन याने आम्हाला इकडे आणल्यापासून तुमच्या या देवासाठी आम्ही होमार्पण करीत आलो आहोत.”
3 पण जरुब्बाबेल, येशूवा आणि इस्राएलची इतर वडीलधारी मंडळी त्यांना म्हणाली, “आमच्या या मंदिराच्या बांधकामात तुमची मदत चालणार नाही. प्रभूचे, इस्राएलच्या परमेश्वराचे मंदिर फक्त आम्हीच बांधू शकतो. पारसाचा राजा कोरेश याची तशी आज्ञा आहे.”
4 याचा त्या लोकांना फार राग आला. त्यांनी मग, यहुद्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांना नाऊमेद करुन मंदिर बांधण्यापासून परावृत्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 5 यहूद्यांचा मंदिर बांधावयाचा संकल्प सिध्दीला जाऊ नये म्हणून विरोधकांनी पैसे चारुन मंत्र्यांना फितवले. त्या मंत्र्यांनी यहूद्यांचा मंदिर बांधण्याचा बेत बंद पाडण्यासाठी सतत कारस्थाने केली. पारसाच्या कोरेश राजाची कारकीर्द संपून दारयावेश राजा सत्तेवर येईपर्यंत असेच चालले.
6 त्या विरोधकांनी यहुद्यांना थांबवण्यासाठी पारसाच्या राजाला सुध्दा पत्र लिहिले; ज्यावेळी अहश्वेरोश पारसाचा राजा झाला त्यावेळी त्यांनी हे पत्र लिहिले.
यरुशलेमच्या बांधकामाला विरोध
7 पुढे अर्तहशश्त पारसाचा राजा झाल्यावर पुन्हा या विरोधकांपैकी काहींनी यहूद्यांविरुध्द कागाळ्यांचे आणखी एक पत्र त्याला लिहिले. बिश्लाम, मिथ्रदाथ, ताबेल व त्यांचे साथी यांनी हे पत्र लिहिले. हे पत्र अरामी भाषेत व अरामी लिपीत लिहिले होते.
8 यानंतर मुख्य मंत्री रहूम आणि लेखक शिमशय यांनी यरुशलेम येथील लोकांविरुध्द अर्तहशश्त राजाला पत्र पाठवले. पत्राचा मजकूर असा होता:
9 मुख्य अधिकारी रहूम चिटणीस शिमशय आणि टर्पली, अफर्शी, अर्खवी, बाबेली, सुसा येथील एलामी, यांच्यावरील महत्वाचे अधिकारी यांच्याकडून 10 शिवाय, आसनपर या थोर आणि बलाढ्य राजाने शोमरोन आणि फरात नदीच्या पश्र्चिम प्रदेशात आणून वसवलेले लोक यांच्याकडून.
11 राजा अर्तहशश्त यास,
फरात नदीच्या पश्रिमेकडील प्रदेशात राहणारे आम्ही तुमचे सेवक.
12 राजा अर्तहशश्त यास आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की तुम्ही पाठवून दिलेले यहूदी कैदी येथे पोचले आहेत. ते आता पुन्हा नव्याने नगर बांधत आहेत. यरुशलेम हे वाईट शहर आहे इथल्या लोकांनी नेहमीच इतर राजांविरुध्द उठाव केला आहे. आता हे यहुदी पाया घालणे, तटबंदीची भिंत बांधणे अशी कामे [a] करत आहेत.
13 राजा अर्तहशश्त, यरुशलेमभोवतीचा हा कोट पुरा झाला की हे लोक तुमच्या सन्मानार्थ कर, जकात वगैरे भरणे थांबवतील व त्यामुळे तुमचा मोठा तोटा होईल हे तुमच्या ध्यानी यावे.
14 राजाच्या बाबतीत आमचे म्हणून एक कर्तव्य आहे; वरील गोष्टी घडू नयेत असे आम्हाला वाटते म्हणून माहितीखातर आम्ही हे पत्र लिहीत आहोत.
15 राजा अर्तहशश्त, तुमच्या आधी जे राजे होऊन गेले त्यांच्या कामकाजाचे वृत्तांत तुम्ही पहावा असे आम्ही सुचवू इच्छितो. त्या बखरीवरुन तुमच्या लक्षात येईल की यरुशलेमने इतर राजाविरुध्द उठाव करुन त्यांना नेहमीच जेरीला आणले आहे पूर्वापार हे चालत आलेले आहे, म्हणून यरुशलेम धुळीला मिळाले.
16 राजा अर्तहशश्त, आम्ही सांगू इच्छितो की हे नगर आणि त्याभोवतीचा कोट बांधून पुरा झाला की फरात नदीच्या पश्रिमेकडील भागावरचा तुमचा अंमल संपुष्टात येईल.
17 यावर राजा अर्तहशश्तने पुढील उत्तर पाठविले:
मुख्य राजमंत्री रहूम, लेखक शिमशय आणि शोमरोन व फरात नदीच्या पश्र्चिमेला राहणारे त्यांच्याबरोबरचे लोक यांस:
18 तुम्ही पाठवलेल्या पत्राचा अनुवाद करुन मला वाचून दाखवण्यात आला. 19 माझ्या आधीच्या राजांच्या कारभाराचे वृत्तांत काढून पाहायचा मी आदेश दिला. त्यावरुन असे लक्षात आले की यरुशलेमला राजाच्या विरुध्द बंड करणाऱ्यांचा मोठा इतिहास आहे. फितुरीचे आणि बंडाचे प्रकार तेथे सतत घडत आले आहेत. 20 यरुशलेम आणि फरात नदीच्या पश्र्चिम प्रदेशावर राज्य करणारे पराक्रमी राजे होऊन गेले. त्या राजांना लोक कर, जकात व खंडणी देत असत.
21 आता तुम्ही त्या लोकांना काम थांबवायचा हुकूम दिला पाहिजे. मी आज्ञा देईपर्यंत या नगराचे बांधकाम होता कामा नये. 22 माझा हुकूम पाळला जात आहे याची खात्री करुन घ्या. आपण यरुशलेम येथील बांधकाम चालू राहू देता कामा नये. ते चालू राहिले तर यरुशलेमकडून येणाऱ्या पैशाचा ओघ थांबेल.
23 राजा अर्तहशश्तने पाठवलेल्या या पत्राची प्रत राजमंत्री रहूम, लेखक शिमशय आणि त्यांच्या बरोबरचे लोक यांना वाचून दाखवण्यात आली. त्या बरोबर ते सर्वजण ताबडतोब यरुशलेममधील यहूद्यांकडे गेले आणि त्यांनी सक्तीने बांधकाम थांबविले.
राजा दारयावेशला ततनइचे पत्र
24 त्यामुळे यरुशलेममधील मंदिराचे काम स्थगित झाले. पारसाचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षापर्यंत ते तसेच राहिले.
पेत्र व योहान यहूदी धर्मसभेपुढे
4 पेत्र व योहान लोकांशी बोलत असताना, काही लोक त्यांच्याकडे आले. त्यातील काही यहूदी याजक, मंदिराचे रक्षण करणाऱ्या शिपायांचा कप्तान व काही सदूकी लोक होते. 2 ते चिडले होते. कारण दोन प्रेषित लोकांना शिकवीत होते. पेत्र व योहान लोकांना शिकवीत होते की, येशूच्या सामर्थ्याने मेलेली माणसे पुन्हा उठतील. 3 यहूदी पुढाऱ्यानी व नियमास्त्र शिक्षकांनी पेत्र व योहानाला धरले व तुरुंगात टाकले. अगोदरच रात्र झाली होती, म्हणून त्यांनी पेत्र व योहान यांना दुसऱ्या दिवसापर्यंत तुरुंगात ठेवले. 4 परंतु पेत्र व योहान यांचा संदेश ऐकणाऱ्या पुष्कळ लोकांनी, त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवला. विश्वासणाऱ्यांच्या गटामध्ये सुमारे पाच हजार लोक होते.
5 दुसऱ्या दिवशी यहूदी लोकांचे पुढारी, वडीलजन, व नियमशास्त्र शिकविणारे शिक्षक यरुशलेममध्ये एकत्र जमले. 6 हन्ना (प्रमख याजक), केफा, योहान आणि अलेक्यांद्र हे तेथे होते. तसेच प्रमुख याजकाच्या घरातील प्रत्येक जण हजर होता. 7 त्यांनी पेत्र व योहान यांना सर्वांसमोर उभे राहण्यास सांगितले, यहूदी पुढाऱ्यांनी पुष्कळ वेळ त्यांना विचारले. “या लंगड्या माणसाला तुम्ही कसे बरे केले? कोणत्या शक्तीचा उपयोग तुम्ही केला? कोणाच्या अधिकाराने हे तुम्ही केले?”
8 मग पेत्र पवित्र आत्म्याने भरला गेला. तो त्यांना म्हणाला, “अहो पुढाऱ्यांनो आणि वडीलधारी लोकांनो; 9 या लंगड्या माणासाच्या बाबतीत जी चांगली गोष्ट झाली त्याबद्दल तुम्ही आम्हांला प्रश्न विचारीत आहात काय? तुम्ही आम्हांला विचारीत आहात का की याला कोणी बरे केले? 10 तुम्ही सर्वांनी आणि यहूदी लोकांनी समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे, ती ही की, नासरेथच्या येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने हा मनुष्य बरा झाला! तुम्ही येशूला वधस्तंभावर खिळले. देवाने त्याला मरणातून उठविले. हा मनुष्य लंगडा होता, पण आता तो चांगला झाला आहे. आणि येशूच्या सामर्थ्यामुळे तुमच्यासमोर उभा राहू शकत आहे!
11 ‘तुम्ही बांधणारांनी जो दगड नापसंत केला,
जो पुढे कोनशिल झाला तोच हा येशू होय.’ (A)
12 येशू हा एकमेव आहे जो लोकांना तारु शकेल. त्याचे नाव हेच सामर्थ्य फक्त जगामध्ये आहे जे लोकांना तारण्यासाठी दिले आहे, आमचे तारण येशूद्वारे झालेच पाहिजे!”
13 यहूदी लोकांना समजले की, पेत्र व योहान यांचे खास प्रशिक्षण किंवा शिक्षण झालेले नाही. पण पुढाऱ्यांनी हे सुद्धा पाहिले की, पेत्र व योहान बोलायला घाबरत नव्हते. म्हणून पुढारी आश्चर्यचकित झाले. मग त्यांना उमगले की, पेत्र व योहान येशूबरोबर होते. 14 त्यांनी पाहिले की, तो लंगडा मनुष्य तेथे दोन प्रेषितांसह उभा आहे. त्यांनी पाहिले की, तो मनुष्य बरा झालेला आहे. म्हणून ते प्रेषितांविरुद्ध काही बोलू शकत नव्हते.
15 यहूदी पुढारी त्यांना म्हणाले की, त्यांनी सभा सोडून जावे. मग पुढारी काय करायला हवे याविषयी एकमेकांमध्ये विचारविनिमय करु लागले. 16 ते म्हणाले, “या मनुष्यांचे आपण काय करावे? यरुशलेममधील प्रत्येक व्यक्ति हे जाणतो की, त्यांनी एक महान चमत्कार केला आहे, हे स्पष्ट आहे. आपण असे म्हणू शकत नाही की ते खरे नाही. 17 परंतु आपण त्यांना त्या माणसाविषेयी (येशूविषयी) सांगण्यास (प्रतिबंध करु) घाबरुन सोडू. मग ही समस्या लोकांमध्ये पसरणार नाही.”
18 मग यहूदी पुढाऱ्यांनी पेत्र व योहान यांना परत आत बोलाविले. त्यांनी प्रेषितांना सांगितले की, येशूच्या नावाने काही करु नका व शिकवू नका. 19 पण पेत्र व योहान यांनी त्यांना उत्तर दिले, “तुम्हांला कोणते बरोबर वाटते? देव काय इच्छितो? आम्ही तुमची की देवाची आज्ञा पाळायची? 20 आम्ही शांत बसू शकत नाही. आम्ही ज्या गोष्टी पाहिल्या आणि ऐकल्या त्या आम्हांला सांगितल्याच पाहिजेत.”
21-22 प्रेषितांना शिक्षा करण्याचा मार्ग त्यांना सापडेना; कारण जे काही घडले होते त्याविषयी लोक देवाची स्तुति करीत होते. (हा चमत्कार देवाकडून घडला होता. शिवाय जो बरा झाला होता, तो चाळीस वर्षांहून अधिक वयाचा होता.) म्हणून यहूदी पुढाऱ्यांनी प्रेषितांना पुन्हा ताकीद दिली व त्यांना सोडून दिले.
पेत्र व योहान विश्वासणाऱ्यांकडे परततात
23 पेत्र व योहान यांची सुटका झाल्यावर ते त्यांच्या स्वतःच्या बंधुवर्गाकडे परत गेले. त्यांनी प्रमुख याजक व प्रमुख वडील यहूदी पुढारी जे बोलले ते सर्व त्यांनी बंधुवर्गांस सांगितले. 24 जेव्हा विश्वासणाऱ्यांनी हे ऐकले, तेव्हा त्या सर्वांनी एक मनाने देवाला प्रार्थना केली. ते म्हणाले, “सर्वसमर्थ प्रभु, तूच आकाश, जमीन, समुद्र व जगातील सर्वांचा निर्माणकर्ता आहेस. 25 आमचा पिता दावीद हा तुझा सेवक होता. पवित्र आत्म्याच्या सहाय्याने त्याने हे शब्द लिहिले:
‘राष्ट्रे का ओरडत आहेत?
लोक (देवाविरुद्ध) का व्यर्थ कट रचित आहेत?
26 ‘या भूतलावरील राजे लढाईसाठी सज्ज झाले
आणि प्रभु परमेश्वर व त्याचा ख्रिस्त यांच्याविरुद्ध एकवट झाले आहेत.’ (B)
27 या गोष्टी खरोखर घडल्या, जेव्हा हेरोद. [a] पंत पिलात, यहूदीतर राष्ट्रे व यहूदी लोक हे सर्व जण येशूविरुद्ध ‘एकत्र आले.’ 28 त्यांनी तुझी योजना प्रत्यक्षात आणली, हे सर्व तुइया सामर्थ्याने व तुइया इच्छेने घडले. 29 आणि आता प्रभु, ते काय म्हणत आहेत ते ऐक. ते आम्हांला भेडसावण्याचा प्रयत्न करीन आहेत! प्रभु, आम्ही तुझे सेवक आहोत, तुला आम्ही जे बोलावे असे वाटते ते न भीता बोलण्यासाठी आम्हांला मदत कर. 30 तुझे सामर्थ्य दाखवून आम्ही धीट बनण्यासाठी आम्हांला मदत कर; आजारी लोकांना बरे कर, पुरावे दे आणि चमत्कार कर, जे येशू जो तुझा पवित्र सेवक याच्या सामर्थ्यांने घडतील.”
31 विश्वासणाऱ्यांनी प्रार्थना केल्यावर, ज्या ठिकाणी ते एकत्र जमले होते ती जागा हादरली, ते सर्व पवित्र आत्म्याने भरले गेले. व ते न भीता देवाचा संदेश सांगत गेले.
विश्वासणाऱ्यांचा सहभाग
32 विश्वासणाऱ्यांचा हा परिवार एक मनाने व ऐक्याने राहत असे. ते एकचित्त होते. परिवारामधील कोणीही आपल्या मालमत्तेवर स्वतंत्र अधिकार सांगत नसे. उलट प्रत्येक गोष्ट ते वाटून घेत. 33 मोठ्या सामर्थ्याने प्रेषित लोकांना प्रभु येशू मेलेल्यांतून उठला याविषयी साक्ष देत. आणि त्या विश्वासणाऱ्यांवर देवाचा मोठा आशीर्वाद होता. 34 त्यांना आवश्यकता भासे ते सर्व त्यांना मिळत असे. प्रत्येक जण ज्याची स्वतःची शेत (जमीन) होती किंवा घर होती, त्यांनी ते पैशासाठी विकले व विकून आलेले पैसे त्यांनी प्रेषितांच्या हवाली केले. 35 आणि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या गरजेनुसार पुरवठा केला जात असे.
36 एका विश्वासणाऱ्याचे नाव होते योसेफ. प्रेषित त्याला बर्णबा म्हणत. (याचा अर्थ, “जो इतरांना मदत करतो तो मनुष्य.”) तो लेवी वंशातला होता. आणि कुप्र बेटावर जन्मलेला होता. 37 योसेफाचे स्वतःचे शेत होते, ते त्याने विकले व पैसे त्याने प्रेषितांकडे दिले.
2006 by World Bible Translation Center