Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 इतिहास 26

यहूदाचा राजा उज्जीया

26 अमस्याचा मुलगा उज्जीया याला यहूदाच्या लोकांनी गादीवर बसवले. उज्जीया तेव्हा सोळा वर्षांचा होता. उज्जीयाने एलोथ नगर पुन्हा बांधून काढले आणि यहूदाच्या स्वाधीन केले. अमस्याच्या मृत्यूनंतरची ही घटना.

उज्जीया सोळा वर्षांचा असताना राजा झाला. पुढे त्याने यरुशलेमवर 52 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यखिल्या. ती यरुशलेमची होती. उज्जीयाचे वर्तन परमेश्वराच्या दृष्टीने योग्य असे होते. आपले वडील अमस्या यांच्याप्रमाणे त्याने देवाचे अनुसरण केले. जखऱ्याच्या हयातीत त्याने देवाचे अनुसरण केले. आदरपूर्वक परमेश्वराला मानणे त्याला जखऱ्याने शिकवले. तो असे वागत असे तोपर्यंत परमेश्वर देवाने त्याचे कल्याण केले.

उज्जीयाने पलिष्ट्यांबरोबर युध्द केले. गथ, यब्ने व अश्दोदचे कोट पाडून टाकले. अश्दोद जवळ व पलिष्ट्यांच्या वस्तीत इतरत्र उज्जीयाने नगरे वसवली. पलिष्टे, गुरबालमधले अरब आणि मऊनी यांच्याशी झालेल्या लढायांमध्ये परमेश्वराने उज्जीयाला साहाय्य केले. अम्मोनी लोक उज्जीयाला कर देत असत. उज्जीयाचे सामर्थ्य इतके वाढले की त्याची कीर्ती मिसरच्या सीमेपर्यंत पोहोंचली.

यरुशलेममध्ये कोपऱ्यातली वेस, खोऱ्याची वेस आणि कोट वळसा घेतो तेथे उज्जीयाने बुरुज बांधून तटबंदीला बळकटी आणली. 10 वाळवंटातही त्याने बुरुज बांधले. अनेक विहिरी खणल्या. डोंगराळ भागात आणि सपाटीवर त्याची बरीच गुरेढोरे होती. तसेच तेथील सुपीक भागात शेतकरी होते. द्राक्षबागांच्या निगराणीसाठी देखील त्याची माणसे होती. उज्जीयाला शेतीची आवड होती.

11 उज्जीयाच्या सैन्यात चांगले लढवय्ये होते. ईयेल हा चिटणीस आणि मासेया हा कारभारी हे दोघे त्यांची गटागटात विभागणी करत. हनन्या या एका सेनानायकच्या हाताखाली हे दोघेजण होते. ईयेल आणि मासेया यांनी केलेल्या गणतीप्रमाणे सैन्य टोळी टोळीने लढाईवर जाई. 12 सैन्यात एकंदर 2,600 प्रमुख लढवय्ये नेतृत्व करीत. 13 शत्रूवर तुटून पडणाऱ्या 307,500 वीरांच्या सैन्याचे ते प्रमुख होते. राजाच्या बाजूने ते शत्रूवर चालून जात. 14 या सर्व सेनेला उज्जीयाने ढाली, भाले, शिरस्त्राणे, चिलखते, धनुष्य आणि गोफणगुंडे अशी शस्त्रास्त्रे दिली. 15 काही हुशार कारागिरांनी शोधून काढलेली यंत्रेही उज्जीयाने यरुशलेममध्ये बनवून घेतली. ती त्याने बुरुजांवर आणि तटाच्या कोंपऱ्यांवर बसवली. ही यंत्रे बाण व मोठ्या दगडांचा मारा करीत असत. उज्जीया फार प्रसिध्द झाला. उज्जीयाचे नाव त्यामुळे सर्वदूर पसरले. त्याची कुमक वाढली आणि तो बलवान झाला.

16 पण सामर्थ्य वाढल्यावर तो गर्विष्ठ झाला आणि त्यामुळे त्याचा नाश ओढवला. परमेश्वरावर त्याची निष्ठा राहिली नाही. धूप जाळण्यासाठी असलेल्या वेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला. 17 तेव्हा याजक अजऱ्या आणि आणखी ऐंशी शूर याजक त्याच्यापाठोपाठ तिथे गेले. 18 त्यांनी उज्जीयाची चूक दाखवून दिली. ते त्याला म्हणाले, “उज्जीया, परमेश्वराला धूप जाळणे हे तुझे काम नव्हे. तू ते करु नयेस. अहरोनचे वंशज आणि याजक यांचेच ते काम आहे. धूप जाळण्याच्या या पवित्र कामासाठी ते नेमलेले आहेत. तेव्हा या पवित्र गाभाऱ्यातून तू बाहेर ये. परमेश्वराच्या आज्ञेचे तू उल्लंघन केले आहेस. परमेश्वर देवाकडून तुझे गौरव होणार नाही.”

19 पण उज्जीयाला या बोलण्याचा राग आला. त्याच्या हाती धूपपात्र होते. याजकांवर तो संतापला असताना पाहता पाहता त्याच्या कपाळावर कोड उठले. परमेश्वराच्या मंदिरात धूप जाळण्याच्या वेदीच्या जवळ याजकांसमक्षच हे घडले. 20 मुख्य याजक अजऱ्या आणि इतर याजक उज्जीयाकडे बघतच राहिले. त्याच्या कपाळावरचे कोड त्यांनी पाहिले. त्याबरोबर त्यांनी उज्जीयाला तातडीने मंदिराबाहेर घालवले. परमेश्वराने शासन केल्यामुळे उज्जीयाही लगेचच चालता झाला. 21 राजा उज्जीया कुष्ठरोगी झाला. मंदिरात त्याला मज्जाव होता. तो एका स्वतंत्र घरात राहू लागला. त्याचा मुलगा योथाम हा राजघराण्याचा कारभारी बनला आणि लोकांचे शासन करु लागला.

22 उज्जीयाची इतर सर्व कृत्ये आमोजाचा मुलगा यशया संदेष्टा याने अथपासून इतीपर्यंत लिहिलेली आहेत. 23 उज्जीया मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांजवळ त्याचे दफन झाले. राजांसाठी असलेल्या दफनभूमीच्या शेजारच्या जागेत त्याला पुरले. कारण “तो कुष्ठरोगी होता.” उज्जीयाच्या नंतर त्याचा मुलगा योथाम राजा झाला.

प्रकटीकरण 13

दोन प्राणी

13 मग मी एक श्र्वापद समुद्रातून वर येताना पाहिले. त्याला दहा शिंगे आणि सात डोकी होती. त्याच्या शिंगांवर दहा मुकुट होते आणि प्रत्येक डोक्यावर देवनिंदाव्यंजक नाव लिहिले होते. हा पशू चित्त्यासारखा दिसत होता. त्याचे पाय अस्वलाच्या पायासारखे होते. त्याला सिंहाच्या तोंडासारखे तोंड होते. त्या प्रचंड सापाने त्या प्राण्याला त्याची शक्ति, त्याचे सिंहासन आणि मोठा अधिकार दिला.

त्या प्राण्याच्या डोक्यांपैकी एक डोके जबर जखमी झालेले दिसत होते. पण ती जखम बरी झाली. जगातील सर्व लोक चकित झाले आणि ते सर्व त्या श्र्वापदाच्या मागे गेले. लोकांनी त्या प्रचंड सापाची उपासना केली कारण त्याने त्याची शक्ति त्या श्र्वापदाला दिली होती. लोकांनी त्या प्राण्याची उपासना केली. त्यांनी विचारले, “या प्राण्याइतका सामर्थ्यशाली कोण आहे? त्याच्याविरुद्ध कोण लढाई करु शकेल?”

त्या श्र्वापदाला मोठ्या अवास्तव गोष्टी बोलण्याची मुभा देण्यात आली व देवाविरुद्ध अनेक दुर्भाषणयुक्त गोष्टी तो बोलला. त्या प्राण्याला बेचाळीस महिने त्याचे सामर्थ्य वापरण्यास सांगण्यात आले. त्या प्राण्याने देवाविरुद्ध वाईट गोष्टी बोलण्यासाठी तोंड उघडले. त्या प्राण्याने देवाच्या नावाविरुद्धसुद्धा वाईट गोष्टी बोलण्यास कमी केले नाही. व देव राहतो त्या ठिकाणाबद्दल सुध्दा वाईट गोष्टी तो बोलला. व जे सर्व स्वर्गात राहतात त्यांच्याविषयी वाईट गोष्टी बोलल्या. देवाच्या पवित्र लोकांविरुद्ध युद्ध करण्यास व त्यांना पराभूत करण्यास त्या प्राण्याला शक्ति देण्यात आली. त्या प्राण्याला प्रत्येक वंश, जमात, भाषा आणि राष्ट्रांतील लोकांवर अधिकार देण्यात आला आहे. आणि जगाच्या निर्मितीपासून ज्यांची नावे वधलेल्या कोकऱ्याच्या जीनवाच्या पुस्तकात लिहिली नाहीत, ते सर्व त्या पशूची भक्ति करतील.

ज्याला कान आहेत तो ऐको.

10 जर एखादा मनुष्य दुसऱ्यास कैदी बनवतो तर
    तो मनुष्यही कैदी बनविण्यात येतो.
जर एखादा मनुष्य तलवारीने मरतो तर
    त्या मनुष्याला तलवारीनेच मारण्यात येते.

याचा अर्थ असा की देवाच्या पवित्र लोकांनी धीर व विश्वास धरला पाहिजे.

पृथ्वीतून येणारे श्वापद

11 मग मी एक दुसरे श्र्वापद पृथ्वीतून वर येताना पाहिले. त्याला कोकऱ्यासारखी दोन शिंगे होती. पण ते प्रचंड सापासारखे बोलत होते. 12 हा प्राणी पहिल्या प्राण्यासमोर उभा राहतो व पहिल्या प्राण्याकडे जी शक्ति होती तीच तो वापरतो. पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांनी पहिल्या प्राण्याची उपासना करावी यासाठी तो आपली शक्ति वापरतो. पहिला प्राणी असा होता की त्याला प्राणघातक अशी जखम होती जी बरी झाली होती. 13 हे दुसरे श्र्वापद मोठी चिन्हे करते. लोक पाहत असताना तो स्वर्गातून पृथ्वीवर अग्नीसुद्धा येईल असे करतो 14 आणि त्याला पहिल्या श्वापदासमोर चिन्हे करण्याचा अधिकार दिला होता म्हणून ते म्हणजे जे श्र्वापद जखमी होऊनही वाचले, त्याची मूर्ति बनवून त्याची भक्ति करावी अशी पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना आज्ञा करतो. 15 दुसऱ्या प्राण्याला पहिल्या प्राण्याच्या मूर्तीला जीवन देण्यासाठी शक्ति देण्यात आली. मग ती मूर्ती बोलेल व जे लोक तिची भक्ति करीत नाहीत त्यांना ठार मारण्याची आज्ञा देईल. 16 दुसऱ्या प्राण्याने सर्व लोकांना-लहान मोठ्या, श्रीमंत आणि गरीब, स्वतंत्र व दास-बळजबरी केली की, त्यांनी त्यांच्या उजव्या हातावर किंवा कपळावर चिन्ह करुन घ्यावे. 17 यासाठी की, चिन्ह असल्याशिवाय कोणीही व्यक्तीने विकू नये किंवा विकत घेऊ नये. हे चिन्ह म्हणजे त्या प्राण्याचे नाव किंवा त्याच्या नावाची संख्या आहे. 18 ज्या माणसाला समजबुद्धी आहे, त्याने त्या प्राण्याच्या संख्येचा अर्थ शोधावा. ही संख्या मनुष्यांची संख्या आहे. त्यांची संख्या आहे 666.

जखऱ्या 9

इतर राष्ट्रांच्या विरोधात न्याय

देवाचा संदेश. एक शोकसंदेश हद्राख देश आणि त्या देशाची राजधानी दिमिष्क यांच्याबद्दल परमेश्वराचा संदेश: “इस्राएलमधील वंशांनाच फक्त देवाचे ज्ञान आहे असे नाही. प्रत्येकजण त्याच्याकडे मदतीची अपेक्षा करतो. हद्राखच्या सीमेवर हमाथ आहे. सोर व सीदोन हीही सीमेवर आहेत. (येथील लोक बुध्दिवान आहेत.) आणि त्यांच्या विरुध्द हा संदेश आहे. सोरची बांधणी किल्लयाप्रमाणे आहे. तेथील लोकांनी प्रचांड चांदीचा साठा केला आहे. त्याच्याकडे धुळीसारखी चांदी व मातीसारखे सोने आहे. पण परमेश्वर, आमचा प्रभू ते सर्व घेईल. तो त्या नगराच्या शक्तिशाली आरमाराचा नाश करील आणि ते नगर आगीत भस्मसात करील.

“हे सर्व अष्कलोनचे लोक पाहतील आणि भयभीत होतील. गज्जाचे लोक भीतीने थरथर कापतील आणि एक्रोनचे लोक हे सर्व बघून आपल्या सर्व आशा सोडून देतील. राज्यामध्ये राजा राहणार नाही. अश्दोदच्या लोकांना आपले खरे जन्मदाते कोण ह्याचा पत्ता लागणार नाही. गर्विष्ठ पलिष्ट्यांचा मी पूर्णपणे नाश करीन. ते, यापुढे, रक्ताने माखलेले ताजे मांस वा निषिध्द अन्न खाणार नाहीत. वाचलेले, थोडेफार पलिष्टे माझ्या लोकांत सामील होतील आणि यहूदातील आणखी एक घराणे म्हणून राहतील. एक्रोनचे लोक यबूश्यासारखेच माझ्या माणसांत मिसळून जातील. मी माझ्या देशाचे रक्षण करीन. माझ्या देशातून मी शत्रू-सैन्याला जाऊ देणार नाही. शत्रूंकडून माझ्या लोकांना इजा पोहचवू देणार नाही. कारण माझ्या लोकांनी पूर्वी किती यातना भोगल्या आहेत ते मी स्वतः पाहिले आहे.”

भावी राजा

सियोन, आनंदोत्सव कर!
    यरुशलेमवासीयांनो, आनंदाने जल्लोश करा!
पाहा! तुमचा राजा तुमच्याकडे येत आहे.
    तो विजयी व चांगला राजा आहे. पण तो विनम्र आहे.
    एका गाढवीच्या शिंगरावर, तो स्वार झाला आहे.
10 राजा म्हणतो, “मी एफ्राईममधील रथांचा
    आणि यरुशलेममधील घोडदळाचा नाश केला.
    युध्दात वापरलेले धनुष्य-बाण मोडून टाकले.”

राजा शांतीची वार्ता राष्ट्रांना देईल.
    तो राजा समुद्राच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत
    व पृथ्वीवर सर्वदूरपर्यंत राज्य करील.

परमेश्वर त्याच्या माणसांना वाचवील

11 यरुशलेम, तुझ्या करारारवर शिक्कामोर्तब करण्यासाठी आम्ही रक्त वापरले.
    म्हणून मी जमिनीतील खळग्यात बंदिस्त असलेल्या तुझ्या लोकांना मुक्त करतो. [a]
12 कैद्यांनो, घरी जा!
    आता तुमच्याकडे आशा करण्यासारखे काहीतरी आहे.
मी तुमच्याकडे येत आहे.
    हे मी आता तुम्हाला सांगतो:
13 यहूदा, मी तुझा धनुष्यासारखा उपयोग करीन.
    एफ्राईमचा उपयोग मी बाणांसारखा करीन.
इस्राएल, ग्रीसशी लढण्यासाठी मी
    तुमचा उपयोग दणकट तलवारीसारखा करीन.
14 परमेश्वर त्यांना दर्शन देईल
    आणि विजेप्रमाणे आपले बाण सोडील.
परमेश्वराने, माझ्या प्रभुने,
    तुतारी फुंकताच वाळवंटातील वाळूच्या वादळाप्रमाणे सैन्य हल्ला करील.
15 सर्व शक्तिमान परमेश्वर आपल्या सैन्याचे रक्षण करील.
    दगड व गोफणीचा उपयोग करुन ते शत्रूचा पराभव करतील.
ते त्यांच्या शत्रू-सैन्याचे रक्त सांडतील.
    मद्याप्रमाणे शत्रूच्या रक्ताचे पाट वाहतील.
    ते रक्त, वेदीच्या कोपऱ्यांवर शिंपडलेल्या रक्ताप्रमाणे असेल.
16 त्यावेळी, मेंढपाळ जसे
    आपल्या मेंढ्यांचे रक्षण करतो,
    तसे परमेश्वर देव आपल्या लोकांचे रक्षण करील.
आपले लोक त्याला मूल्यवान वाटतील.
    ते त्याला त्याच्या जमिनीवर चमकणाऱ्या रत्नांप्रमाणे वाटतील.
17 सर्व काही चांगले आणि सुंदर होईल.
    सर्वत्र आश्चर्यकारक पीक येईल.
पण हे पीक फक्त अन्नधान्य
    व मद्य देणारे नसेल तर तरुण-तरुणींचे असेल.

योहान 12

येशू आपल्या मित्रांबरोबर बेथानी येथे(A)

12 मग येशू वल्हांडण सणाच्या अगोदर सहा दिवस असताना बेथानीस आला. येशूने ज्याला मेलेल्यातून उठविले होते तो लाजर तेथे होता. म्हणून तेथे त्यांनी त्याच्यासाठी संध्याकाळचे भोजन आयोजित केले. मार्था जेवण वाढत होती आणि लाजर त्यांच्याबरोबर जेवायला बसला होता. तेव्हा मरीयेने अर्धा किलो शुद्ध जटामांसीचे मोलवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या पायावर ओतले व आपल्या केसाने त्याचे पाय पुसले व सर्व घर त्या सुवासाने भरले.

पण त्याच्या शिष्यांपैकी एक, यहूदा इस्कर्योत ज्याने नंतर त्याचा विश्वासघात केला होता, त्याने विरोध केला. म्हणून तो म्हणाला, “हे सुगंधी द्रव्य विकून आलेले पैसे गरिबांना का देण्यात आले नाहीत? ते तेल चांदीच्या तीनशे रुपयाच्या किमतीचे होते.” गरिबांचा कळवळा आला म्हणून त्याने असे म्हटले नाही, तर तो चोर होता आणि त्याच्याजवळ पेटी होती व तिच्यात जे पैसे टाकण्यात येत, ते तो चोरून घेई म्हणून तो असे म्हणाला.

“तिला एकटे सोडा,” येशूने उत्तर दिले, “मला पुरण्याच्या दिवसासाठी ते तेल राखून ठेवण्यात आले. तुमच्यात गरीब नेहमीच असतील, पण मी तुमच्यात नेहमी असणार नाही.”

लाजराविरुद्ध कट

मग तो तेथे आहे हे यहूदीयांतील बऱ्याच जणांना कळले. तेव्हा फक्त येशूसाठीच नव्हे तर ज्याला त्याने मेलेल्यातून उठविले होते त्या लाजराला पाहावे म्हणून ते आले. 10 तेव्हा मुख्य याजकांनी लाजराला मारण्याचा कट केला. 11 कारण त्याच्यामुळे पुष्कळ लोक येशूकडे जात होते व त्याच्यावर विश्वास ठेवीत होते.

येशू यरुशलेमात प्रवेश करतो(B)

12 दुसऱ्या दिवशी सणासाठी आलेल्या मोठ्या जमावाने ऐकले की येशू यरुशलेमकडे येत आहे. 13 त्यांनी खजुरीच्या झाडाच्या फांद्या घेतल्या आणि त्याला भेटण्यास गेले. ते ओरडून जयघोष करीत होते.

“‘होसान्ना!’
    ‘प्रभूच्या नावाने येणारा धन्यावदित असो!’ (C)

इस्राएलचा राजा धन्यवादित असो!”

14 येशूला एक शिंगरु दिसले त्यावर तो बसला. आणि संदेष्ट्यांनी लिहिल्याप्रमाणे हे झाले. ते असे:

15 “सीयोनेच्या कन्ये, भिऊ नको;
    पहा, तुझा राजा येत आहे;
    गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे.” (D)

16 सुरवातीला शिष्यांना या गोष्टी समजल्या नाहीत पण येशूचे गौरव झाल्यावर त्यांना जाणीव झाली की, त्याच्याविषयी या गोष्टी लिहिल्या होत्या आणि त्यांनी या गोष्टी त्याच्यासाठी केल्या.

17 मग जो जमाव त्याने लाजरला कबरेतून आणलेले व मरणातून उठविलेले पाहत होता तो जमाव सातत्याने त्याच्याविषयी सांगत होता. 18 पुष्कळ लोक त्याला जाऊन भेटले कारण त्याने तो चमत्कार केला होते हे त्यांनी ऐकले होते. 19 म्हणून परुशी एकमेकांस म्हणाले, “पहा, याच्यापुढे आपले काही चालत नाही. सगळे जग त्याच्यामागे चालले आहे!”

येशू जीवन आणि मरण याविषयी बोलतो

20 आता सणाच्या वेळी उपासनेसाठी जे लोक वर गेले होते त्यांच्यात काही ग्रीक होते. 21 ते फिलिप्पाकडे आले, जो गालीलातील बेथसैदा येथील होता, त्यांनी विनंति केली, “महाराज, येशूला पाहावे अशी आमची इच्छा आहे.” 22 फिलिप्प अंद्रियाकडे हे सांगण्यास गेला; नंतर अंद्रिया व फिलिप्प यांनी येशूला सांगितले.

23 येशू त्यांना म्हणाला, “मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. 24 मी तुम्हांला खरे सांगतो, गव्हाचा दाणा भूमीत पडून मेला नाही, तर एकटाच राहतो, पण तो मेला तर पुष्कळ फळ देतो. 25 जो आपल्या जिवावर प्रीति करतो तो त्याला गमावेल पण जो या जगात आपल्या जिवाचा द्वेष करतो तो त्याला अनंतकाळाच्या जीवनासाठी राखील. 26 जो कोणी माझी सेवा करतो त्याने मला अनुसरले पाहिजे. जेथे मी असेन तेथे माझे सेवकही असतील. जो माझी सेवा करतो त्याचा सन्मान माझा पिता करील.”

येशू त्याच्या मरणाविषयी बोलतो

27 “माझे अंतःकरण व्याकूळ झाले आहे. आणि मी आता काय सांगू? ‘पित्या माझी या घटकेपासून सुटका कर?’ केवळ याच कारणासाठी या वेळेला मी आलो. 28 पित्या, तुझे गौरव कर!”

तेव्हा आकाशातून वाणी झाली की, “मी त्याचे गौरव केले आहे व पुन्हाही त्याचे गौरव करीन.”

29 जो जमाव तेथे होता त्याने हे ऐकले व म्हटले, “गडगडाट झाला.”

दुसरे म्हणाले, “देवदूत त्याच्याशी बोलला.”

30 येशू म्हणाला, “हा आवाज तुमच्यासाठी होता. माझ्यासाठी नव्हे. 31 या जगाचा न्याय होण्याची आता वेळ आली आहे. या जगाच्या राजकुमारला हाकलून देण्यात येईल. 32 परंतु मी, जेव्हा पृथ्वीपासून वर उचलला जाईन, तेव्हा मी सर्व लोकांना माझ्याकडे ओढीन.” 33 त्याने हे यासाठी म्हटले की कोणत्या प्रकारच्या मरणाने तो मरणार आहे हे त्याला दाखवायचे होते.

34 जमाव म्हणाला, “ख्रिस्त सर्वकाळ राहतो असे आम्ही नियमशास्त्रातून ऐकले आहे, तर मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे असे तुम्ही का म्हणता? मनुष्याचा पुत्र कोण आहे?”

35 मग येशू त्यांना म्हणाला. “आणखी थोडा वेळ प्रकाश तुमच्यामध्ये असणार आहे. तुमच्यामध्ये प्रकाश आहे तोपर्यंत तुम्ही चाला. यासाठी की अंधाराने तुमच्यावर मात करु नये. कारण जो अंधारात चालतो त्याला आपण कोठे जातो हे कळत नाही. 36 तुम्ही प्रकाशाची मुले व्हावे म्हणून तुम्हांला प्रकाश आहे तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवा.” येशू या गोष्टी बोलला, मग तो निघून गेला. आणि त्यांच्यापासून गुप्त राहिला.

यहूदी येशूवर विश्वास ठेवण्याचे नाकारतात

37 येशूने इतके चमत्कार त्यांच्यासमोर केलेले असतानाही ते त्याच्यावर विश्वास ठेवीनात. 38 यासाठी की, यशया संदेष्ट्याचे वचन पूर्ण व्हावे:

“प्रभु, आमच्या संदेशावर कोणी विश्वास ठेवला आहे.
    आणि प्रभूचा हस्तप्रताप कोणास प्रगट झाला आहे?” (E)

39 या कारणासाठी त्यांनी विश्वास ठेवला नाही, जसे यशया एके ठिकाणी म्हणतो,

40 “त्यांनी डोळ्यांनी पाहू नये,
    व अंतःकरणाने समजू नये,
फिरू नये व मी त्यांना बरे करू नये म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले
    आणि त्यांचे अंतःकरण कठीण केले आहे.” (F)

41 यशया असे म्हणाला, कारण त्याने त्याचे गौरव पाहिले आणि तो त्याच्याविषयी बोलला.

42 तरीही अधिकाऱ्यातील पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण आपणांस सभास्थानाच्या बाहेर घालवू नये म्हणून परुश्यांमुळे त्यांनी हे पत्करले नाही. 43 कारण त्यांना देवाच्या गौरवापेक्षा मनुष्याकडील गौरव अधिक आवडले.

येशूची शिकवण लोकांचा न्याय करील

44 तेव्हा येशू मोठ्याने बोलला, “जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावर विश्वास ठेवतो असे नाही, तर ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो. 45 आणि जो मला पाहतो, तो ज्याने मला पाठविले त्याला पाहतो. 46 मी प्रकाश असा जगात आलो आहे. यासाठी की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधारात राहू नये.

47 “आणि जो कोणी माझी वचने ऐकून पाळीत नाही, त्याचा न्याय मी ठरवीत नाही. कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी आलो नाही, तर जगाच्या तारणासाठी आलो आहे. 48 जो माझा स्वीकार करीत नाही व माझ्या वचनाप्रमाणे वागत नाही त्याचा न्याय करणारा कोणी एक आहे, जे वचन मी बोललो तेच शेवटच्या दिवशी त्याचा न्याय करील. 49 कारण मी स्वतःहून बोललो असे नाही तर मी काय सांगावे व काय बोलावे याविषयी ज्या पित्याने मला पाठविले, त्यानेच मला आज्ञा केली आहे. 50 आणि त्याची आज्ञा अनंतकाळचे जीवन आहे. हे मला ठाऊक आहे, म्हणून जे काही मी बोलतो ते जसे पित्याने मला सांगितले तसेच बोलतो.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center