M’Cheyne Bible Reading Plan
रहबामचे अविचारी वर्तन
10 रहबाम शखेम येथे गेला कारण त्याला राजा करण्यासाठी सर्व इस्राएल लोक तेथे गेले होते. 2 यावेळी यराबाम मिसरमध्ये होता कारण त्याने राजा शलमोनापुढून पळ काढला होता. यराबाम हा नबाटाचा मुलगा. रहबाम राजा होणार हे त्याने ऐकले म्हणून तो मिसरहून आला.
3 तेव्हा इस्राएल लोकांनी यराबामलाही आपल्याबरोबर येण्यास सांगितले. अशा तऱ्हेने यराबाम आणि सर्व इस्राएल लोक रहबामकडे आले. त्याला ते म्हणाले, “रहबाम, 4 तुमच्या वडिलांनी आमचे आयुष्य फार जिकिरीचे केले होते. त्यांनी जणू आमच्या मानेवर जू ठेवले होते. ते आता हलके करा म्हणजे आम्ही तुमच्या आज्ञेत राहू.”
5 यावर रहबाम त्यांना म्हणाला, “तुम्ही तीन दिवसांनी परत या.” तेव्हा लोक निघून गेले.
6 राजा रहबामने मग आपल्या वडिलांच्या पदरी असणाऱ्या वडिलधाऱ्या मंडळींशी चर्चा केली. रहबाम त्यांना म्हणाला, “मी या लोकांशी काय बोलावे? मला या बाबतीत तुमचा सल्ला हवा आहे.”
7 तेव्हा ती वयोवृध्द मंडळी रहबामला म्हणाली, “तू या लोकांशी प्रेमाने वागलास, त्यांना संतुष्ट केलेस आणि त्यांच्याशी गोड बोललास तर ते चिरकाल तुझी सेवा करतील.”
8 पण रहबामने त्यांचा हा सल्ला मानला नाही. तो मग आपल्या पदरी असलेल्या आणि आपल्या बरोबर लहानाचे मोठे झालेल्या तरुण मंडळींशी बोलला. 9 रहबाम त्यांना म्हणाला, “तुम्ही मला काय सल्ला द्याल? आपण लोकांना काय सांगावे? त्यांना आपले ओझे हलके करुन हवे आहे. माझ्या वडिलांनी त्यांच्या मानेवर ठेवलेले जूं आता त्यांना मी हलके करायला हवे आहे.”
10 तेव्हा त्याच्या पिढीची ती तरुण मुले रहबामला म्हणाली, “तुमच्याकडे आलेल्या लोकांना तुम्ही असे सांगावे. लोक तुम्हाला म्हणाले की, ‘मानेवर जूं ठेवल्याप्रमाणे तुमच्या वडिलांनी आम्हाला कठोर जिणे जगायला लावले. तुम्ही आता ते हलके करावे असे आम्हाला वाटते.’ पण रहबाम, तुम्ही त्यांना असे सांगावे, ‘माझी करंगळी माझ्या वडीलांच्या कमरेपेक्षा जाड असेल. 11 माझ्या वडिलांनी तुमच्यावर फार ओझे लादले ना! मी तर ते अधिकच भारी करणार आहे. माझ्या वडलांनी तुम्हाला चाबकांचे फटकारे मारले. मी त्या चाबकांना धातूची अणकुचीदार टोके लावून शासन करीन.’”
12 यराबाम आणि सर्व लोक तीन दिवसांनी रहबामकडे आले. राजा रहबामने त्यांना तसेच सांगितले होते. 13 रहबाम त्यांच्याशी यावेळी अविचारीपणाने बोलला. मोठ्यांचा सल्ला त्याने मानला नाही. 14 तरुणांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे तो बोलला. तो लोकांना म्हणाला, “माझ्या वडीलांनी तुमच्यावर फार ओझे लादले ते मी अधिकच भारी करीन. त्यांनी तुम्हाला चाबकाने शासन केले असेल पण मी टोकदार धातूची टोके जोडलेल्या चांबकांनी शासन करीन.” 15 राजा रहबामने लोकांचे ऐकून घेतले नाही. तो असे बोलला कारण हा बदल परमेश्वरानेच घडवून आणला होता. अहीया मार्फत परमेश्वर यराबामशी जे बोलला होता ते प्रत्यक्षात यावे म्हणूनच त्याने अशी वेळ येऊ दिली. अहीया हा शिलोनी लोकांपैकी होता आणि यराबाम नबाटाचा मुलगा होता.
16 राजा रहबामने आपल्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले हे इस्राएल लोकांच्या लक्षात आले. ते राजाला म्हणाले,
“आम्ही काय दावीदाच्या घराण्यातले आहोत का?
मुळीच नाही! इशायच्या जमिनीत आमचा वाटा आहे का?
नाही! तेव्हा इस्राएल लोकांनो, आपण आपले आपापल्या घरी जाऊ
या दावीदाच्या मुलाला आपल्या घरच्यांवरच राज्य करु द्या.”
सर्व इस्राएल लोक मग घरोघर गेले. 17 पण यहूदाच्या नगरांमध्ये राहाणारे काही इस्राएल लोक होते. रहबाम त्यांच्यावर राज्य करत राहिला.
18 हदोराम हा वेठबिगारांवरचा मुकादम होता. रहबामने त्याला इस्राएल लोकांकडे पाठवले. पण इस्राएल लोकांनी त्याच्यावर दगडफेक करुन त्याला मरेपर्यंत मारले. इकडे रहबामने रथाचा आश्रय घेतला आणि त्वरेने पळ काढला. तो यरुशलेमला पळून गेला. 19 तेव्हापासून आजतागायत इस्राएलचे दावीदाच्या घराण्याशी वैर आहे.
योहान या पुस्तकाविषयी सांगतो
1 हे येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे. ज्या गोष्टी लवकरच घडणे आवश्यक आहे, ते आपल्या सेवकांना दाखविण्यासाठी देवाने येशूला हे देवापासून प्राप्त झाले ख्रिस्ताने त्याच्या देवदूताला पाठवून या सर्व गोष्टी योहानाला दाखविण्यास सांगितले. 2 योहानाने जे काही पाहिले त्या सर्व गोष्टींविषयी साक्ष दिली की येशू ख्रिस्ताने हे त्याला सांगितले; देवाकडून आलेला हा संदेश आहे. 3 जी व्यक्ती देवाकडून आलेल्या या संदेशाचे शब्द उघडपणे वाचते ती धन्य आहे. आणि जे लोक हा संदेश ऐकतात आणि त्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी पाळतात ते धन्य आहेत. कारण आता जास्त वेळ उरला नाही.
योहान येशूचा संदेश मंडळ्यांना कळवितो
4 योहानाकडून,
आशिया [a] प्रांतातील सात मंडळ्यांना:
जो आहे, जो होता व जो येणार आहे त्या एकापासून (देवापासून): आणि त्याच्या सिंहासनासमोरील सात आत्म्यांकडून तुम्हांस कृपा व शांति असो. 5 आणि येशू ख्रिस्त विश्वासू साक्षी आहे, जो मेलेल्यांमधून उठविले गेलेल्यांमध्ये पहिला आहे.
पृथ्वीवरील राजांचा तो सत्ताधीश आहे. आणि जो येशू आमच्यावर प्रेम करतो, ज्या येशूने आम्हाला आमच्या पापांपासून त्याच्या रक्ताने मुक्त केले; 6 ज्याने आम्हांला राज्य आणि देवपित्याची सेवा करणारे याजक बनविले त्या येशूला गौरव व सामर्थ्य अनंतकाळपर्यंत असोत! आमेन.
7 पहा, येशू ढगांसह येत आहे! प्रत्येक व्यक्ति त्याला पाहील, ज्यांनी त्याला भोसकले ते सुद्धा त्याला पाहतील. पृथ्वीवरील सर्व लोक त्याच्यामुळे आक्रोश करतील, होय, असेच होईल! आमेन.
8 प्रभु देव म्हणातो, “मी अल्फा आणि ओमेगा [b] आहे. मी जो आहे, जो होतो आणि जो येत आहे. मी सर्वसमर्थ आहे.”
9 मी योहान आहे, आणि मी तुमचा बंधु आहे. आपण ख्रिस्तामध्ये एकत्र आहोत आणि आपण या गोष्टींमध्ये वाटेकरी आहोत. दु:खसहनात, राज्यात, धीराने सहन करण्यात, येशूच्या सत्यात आणि देवाच्या संदेशात मी विश्वासू होतो त्यामुळे मी पात्म [c] नावाच्या बेटावर होतो. 10 प्रभूच्या दिवशी आत्म्याने माझा ताबा घेतला. माझ्या मागे मी एक मोठा आवाज ऐकला. तो आवाज कर्ण्यासारखा ऐकू आला. 11 तो आवाज म्हणाला, “तू या सर्व गोष्टी पाहतोस त्या तू पुस्तकात लिही, आणि सात मंडळ्यांना पाठव: इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया आणि लावदिकीया.”
12 माझ्याबरोबर कोण बोलत आहे हे पाहण्यासाठी मी मागे वळलो, जेव्हा मी मागे वळालो, तेव्हा मी सोन्याच्या सात दीपसमया पाहिल्या. 13 मी कोणाला तरी दीपस्तंभामध्ये पाहिले जो “मनुष्याच्या पुत्रासारखा” होता. त्याने लांब पायघोळ झगा घातला होता. त्याने सोन्याचा पट्टा छातीवर बांधला होता. 14 त्याचे डोके आणि केस बरफासारख्यापांढऱ्या लोकरीप्रमाणे शुभ्र होते. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. 15 त्याचे पाय भट्टीत गरम झाल्यानंतर चमकणाऱ्या पितळासारखे होते. त्याचा आवाज पुराचे पाणी जसा आवाज करते तसा होता. 16 त्याच्या उजव्या हातात सात तारे होते. त्याच्या तोंडातून दोन्ही बाजूंनी तीक्ष्ण धार असणारी तरवार निघाली. तो दिवसाच्या मध्यान्ही अतिशय प्रखर तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखा दिसत होता.
17 जेव्हा मी त्याला पाहिले, तेव्हा मी मेलेल्या माणसा सारखा त्याच्या पायजवळ पडलो त्याने त्याचा उजवा हात माझ्यावर ठेवला आणि म्हणाला, “घाबरु नको! मी पहिला आणि शेवटला आहे. मी जिवंत आहे, 18 मी मेलो होतो, पण पाहा; मी अनंतकाळासाठी जिवंत आहे! आणि माझ्या जवळ मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या आहेत. 19 म्हणून ज्या गोष्टी तू पाहतोस त्या लिही. ज्या गोष्टी आता घडत आहेत त्या लिही. आणि ज्या गोष्टी नंतर घडणार आहेत त्याही लिही. 20 जे सात तारे तू माइया हातात पाहिलेस आणि ज्यात सात सोन्याच्या दीपसमया तू पाहिल्यास त्यांचा गुपित अर्थ हा आहे: सात दीपसमया या सात मंडळ्या आहेत. आणि सात तारे हे सात मंडळ्यांचे देवदूत आहेत.
देव लोकांना त्यांचे आचरण बदलण्यास सांगतो
2 निर्लज्ज लोकांनो, 2 मलूल होऊन सुकून जाणाऱ्या फुलाप्रमाणे तुमचे जीवन होण्याआधीचे तुमचे आचार बदला. दिवसाच्या उष्णतेने, फूल कोमेजून वाळून जाते. परमेश्वराने आपला क्रोध प्रकट करताच, तुमचीही स्थिती तशीच होईल. म्हणून परमेश्वराचा क्रोधाचा दिवस तुमच्यावर येण्यापूर्वीच तुमचे आचरण बदला. 3 सर्व दीन लोकांनो, परमेश्वराला शरण या! त्याचे विधिनियम पाळा. सत्कृत्य करायला शिका. नम्र होण्यास शिका. मग कदचित् परमेश्वर जेव्हा क्रोध प्रकट करील, तेव्हा तुम्ही सुरक्षित राहाल.
इस्राएलच्या शेजाऱ्यांना परमेश्वर शिक्षा करील
4 गज्जात कोणीही शिल्लक शहणार नाही. अष्कलोनचा नाश होईल दुपारी, अश्दोदमधील लोकांना, बळजबरीने बाहेर काढले जाईल, एक्रोन ओसाड होईल. [a] 5 पलिष्ट्यांनो, समुद्राकाठी राहणाऱ्या लोकांनो, परमेश्वराचा हा संदेश तुमच्यासाठी आहे. कनान मधील या फिलिस्ताईनच्या भूमीचा नाश होईल ते देश निर्जन होतील. 6 तुमची समुद्राकाठची जमीन मेंढ्यांसाठी व मेंढपाळासाठी मोकळी राने होतील. 7 त्यानंतर ती भूमी यहूदातील जिवंत राहिलेल्या लोकांच्या मालकीची होईल. यहूदातील ह्या लोकांची परमेश्वर आठवण ठेवील. आता ते परदेशांत कैदेत आहेत. पण परमेश्वर आठवण ठेवील. आता ते परदेशांत कैदेत आहेत. पण परमेश्वर त्यांना परत आणील. मग यहूदातील लोक, आपल्या मेंढ्यांना त्या कुरणांत चरु देतील. संध्याकाळी, ते अष्कलोनमधील रिकाम्या घरात आडवे होतील.
8 परमेश्वर म्हणतो, “यवाबच्या व अम्मोनच्या लोकांनी काय केले, ते मला माहीत आहे त्यांनी माझ्या माणसांना ओशाळवणे केले. माझ्या माणसांची जमीन काबीज करुन त्यांनी स्वतःच्या देशाचा विस्तार केला. 9 म्हणून, मी जिवंत आहे याची मला जेवढी खात्री आहे तेवढ्याच ठामपणाने मी वचन देतो की, सदोम व गमोरा यांच्यासारखाच मवाब व अमोन यांचा नाश होईल. मी सर्वशक्तिमान परमेश्वर आहे, मी इस्राएलचा देव आहे त्या देशांचा संपूर्ण कायमचा नाश होईल, असे मी वचन देतो. त्यांच्या देशांच्या जमिनीवर काटेकुटे माजतील. मृत समुद्रातील मिठाने व्यापलेल्या जमिनीप्रमाणे ते देश होतील. माझ्या माणसांतील जिवंत राहिलेली माणसे ती भूमी आणि त्या भूमीवर उरलेले सर्व काही घेतील.”
10 मवाब व अमोन येथील लोकांची अशी स्थिती होण्याचे कारण ते गर्विष्ठ होते. आणि सर्वशक्तिमान परमेश्वराच्या माणसांच्या बाबतीत त्यांनी क्रूरपणाने कृती केली. त्यांनी परमेश्वराच्या माणसांना कमीपणाने वागवले हेच होय. 11 ते लोक परमेश्वराला घाबरतील. का? कारम परमेश्वर त्यांच्या दैवतांचा नाश करील. मग दूरदूरच्या प्रदेशांतील सर्व लोक परमेश्वराची उपासना करु लागतील. 12 म्हणजे कूशींनो, (इथियोपियातील लोकांनो,) तुम्हीसुध्दा, बंर का? परमेश्वराची तलवार तुमच्या लोकांनाही मारील. 13 नंतर परमेश्वर उत्तरेकडे वळेल, अश्शूरला शिक्षा करील. तो निनवेचा नाश करील. ते शहर म्हणजे ओसाड, रुक्ष वाळवंट होईल. 14 तेथे फक्त मेंढ्या व वन्याप्राणी राहतील. शिल्लक राहिलेल्या खांबांवर घुबडे व कावळे बसतील. त्यांचा आवाज खिडक्यांतून ऐकू येईल. कावळे बसतील. त्यांचा आवाज खिडक्यांतून ऐकू येईल. कावळे दारांच्या पायऱ्यांवर बसतील. त्या रिकाम्या घरांत काळे पक्षी जाऊन बसतील. 15 आता निनवेला फार गर्व झाला आहे. आता ती खरोखरच सुखी आहे. आता तेथील लोकांना, आपण अगदी सुरक्षित आहोत असे वाटते. त्यांना निनवे जगातील सर्वात महत्वाची वाटते. पण तिचा नाश होईल ती ओसाड होईल. तेथे फक्त वन्यपशूच विसाव्याला जातील. तिचा अतिशय वाईटरीतीने नाश झालेला पासून वाटसरु तेथून जाताना चुकचुकतील, निराशेने माना हलवतील.
येशू मरणातून उठला आहे(A)
24 आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्या स्त्रिया अगदी पहाटेस कबरेकडे आल्या, आणि त्यांनी स्वतः तयार केलेले मसाले आणले. 2 त्यांना दगड कबरेवरुन लोटलेला आढळला. 3 त्या आत गेल्या, परंतु त्यांना प्रभु येशूचे शरीर सापडले नाही. 4 यामुळे त्या अवाक् झाल्या असतानाच, अचानक लखलखीत कपडे घातलेले दोन पुरुष त्यांच्या बाजूला उभे राहिले. 5 अतिशय भयभीत होऊन त्यांनी आपले चेहरे जमिनीकडे वळविले. ते दोन पुरुष त्यांना म्हणाले, “जो जिवंत आहे त्याचा शोध तुम्ही मेलेल्यांमध्ये का करता? 6 तो येथे नाही; तो उठला आहे! तो गलीलात असताना त्याने तुम्हांला काय सांगितले याची आठवण करा. 7 तो असे म्हणाला की, मनुष्याच्या पुत्राला धरुन पापी लोकांच्या हाती द्यावे, त्याला वधस्तंभावर खिळावे आणि तिसऱ्या दिवशी त्याने उठावे.” 8 नंतर स्त्रियांना येशूच्या शब्दाची आठवण झाली.
9 त्या कबरेपासून परतल्या आणि त्यांनी या सर्व गोष्टींचे वर्तमान अकरा प्रेषितांना व इतर सर्वांना सांगितले. 10 त्या स्त्रिया मरीया मग्दालिया, योहान्न, आणि याकोबाची आई मरीया ह्या होत्या. त्या आणि इतर स्त्रियांसुद्धा ज्या त्यांच्याबरोबर होत्या, प्रेषितांना या गोष्टी सांगत होत्या. 11 पण प्रेषितांना त्यांचे सांगणे मूर्खपणाचे वाटले. आणि त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. 12 पण पेत्र उठला आणि कबरेकडे पळाला. त्याने खाली वाकून पाहिले पण त्याला तागाच्या गुंडाळण्याच्या वस्त्राशिवाय काही आढळले नाही. जे घडले त्याविषयी तो स्वतःशीच आश्चर्य करीत दूर गेला.
अम्माऊसच्या वाटेवर(B)
13 त्याच दिवशी त्यांच्यातील दोघे शिष्य यरुशलेमापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. 14 ते एकमेकांशी या घडलेल्या सर्व गोष्टीविषयी बोलत होते. 15 ते बोलत असताना आणि या गोष्टींची चर्चा करीत असताना येशू स्वतः आला आणि त्यांच्याबरोबर चालू लागला. 16 पण त्यांचे डोळे त्याला ओळखण्यापासून बंद करण्यात आले होते. 17 येशू त्यांना म्हणाला, “चालत असताना तुम्ही एकमेकांबरोबर बोलत आहात त्या गोष्टी कोणत्या आहेत?”
चालता चालता ते थांबले. ते अतिशय दु:खी दिसले. 18 त्यांच्यातील एकजण ज्याचे नाव क्लयपा होते, तो त्याला म्हणाला, “ह्या दिवसांमध्ये घडलेल्या गोष्टी माहीत नसलेले असे यरुशलेमात राहणारे तुम्ही एकटेच आहात काय?”
19 येशू त्यांना म्हणाला, “तुमच्या मते कोणत्या गोष्टी?”
ते त्याला म्हणाले, “नासरेथकर येशूविषयीच्या सर्व गोष्टी. हाच तो मनुष्य जो आपल्या कृत्यांनी आणि शब्दांनी देवासमोर आणि मनुष्यांसमोर एक महान संदेष्टा झाला. 20 आणि आम्ही चर्चा करीत होतो की, कसे आमच्या प्रमुख याजकांनी आणि अधिकाऱ्यांनी त्याला मरणदंड भोगण्यासाठी स्वाधीन केले. आणि त्यांनी त्याला वधस्तंभी खिळले. 21 आम्ही अशी आशा केली होती की, तोच एक आहे जो इस्राएलाची मुक्तता करील.
“आणि या सगळ्याशिवाय हे सर्व घडून गेलेल्या गोष्टीला आज तीन दिवस झालेत. 22 आणि आमच्या परिवारातील काही स्त्रियांनी आम्हांला थक्क केले आहे: आज अगदी पहाटे त्या कबरेकडे गेल्या, परंतु त्यांना त्याचे शरीर सापडले नाही. 23 त्यांनी येऊन आम्हांला सांगितले की, त्यांना देवदूतांचा दृष्टांत घडला आणि देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे. 24 तेव्हा आमच्यातील काही कबरेकडे गेले, आणि स्त्रियांनी जसे सांगितले होते, तसेच त्यांना आढळले, पण त्यांनी त्याला पाहिले नाही.”
25 मग येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यास तुम्ही अति मूर्ख आणि मंद आहात. 26 ख्रिस्तासाठी या सर्व गोष्टी सहन करणे आणि त्याच्या गौरवात जाणे आवश्यक नव्हते काय?” 27 आणि म्हणून त्याने मोशेपासून सुरुवात करुन आणि सर्व संदेष्ट्यापर्यंत सांगून, पवित्र शास्त्रात त्याच्याविषयी काय लिहिले आहे ते सर्व त्याने त्यांना स्पष्ट करुन सांगितले.
28 ज्या खेड्याकडे ते जात होते, त्याच्याजवळ ते आले आणि येशूने असा बहाणा केला की, जणू काय तो पुढे जाणार आहे. 29 परंतु जास्त आग्रह करुन ते म्हणाले, “आमच्या बरोबर राहा. कारण जवळजवळ संध्याकाळ झालीच आहे. आणि दिवसही जवळजवळ मावळला आहे.” मग तो त्यांच्याबरोबर राहावयास आत गेला.
30 जेव्हा तो त्यांच्याबोरबर जेवायला मेजासभोवती बसला, त्याने भाकर घेतली आणि उपकार मानले. नंतर त्याने ती मोडली व ती त्यांना तो देऊ लागला. 31 तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्याला ओळखले. पण तो त्यांच्यातून अदृश्य झाला. 32 मग ते एकमेकांना म्हणू लागले, “तो वाटेवर आपणाशी बोलत असताना व पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्ट करुन सांगत असताना आपली अंतःकरणे आतल्या आत उकळत नव्हती काय?”
33 मग ते लगेच उठले, व यरुशलेमेस परत गेले. तेव्हा त्यांना अकरा प्रेषित व त्यांच्याबरोबर असलेले इतर एकत्र जमलेले आढळले. 34 प्रेषित आणि इतरजण म्हणाले, “खरोखर प्रभु उठला आहे! आणि शिमोनाला दिसला आहे.”
35 नंतर त्या दोन शिष्यांनी वाटेत काय घडले ते त्याला सांगितले आणि तो भाकर मोडत असताना त्यांनी त्याला कसे ओळखले ते सांगितले.
येशू त्याच्या अनुयायांना दर्शन देतो(C)
36 ते या गोष्टी त्यांना सांगत असतानाच येशू त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्यांस म्हणाला, “तुम्हांस शांति असो.”
37 ते दचकले आणि भयभीत झाले. त्यांना असे वाटले की, ते भूत पाहत आहेत. 38 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही असे अस्वस्थ का झालात? तुमच्या मनात शंका का निर्माण झाल्या? 39 माझे हात व पाय पाहा. तुम्हाला मी दिसतो तोच मी आहे. मला स्पर्श करा आणि पाहा की, मला आहे तसे हाडमांस भुताला नसते.”
40 असे बोलून त्याने त्यांस आपले हातपाय दाखवले. तरीही त्यांच्या आनंदामुळे त्यांना ते खरे वाटेना. 41 ते आश्चर्यचकित झाले तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “येथे तुमच्याजवळ खाण्यासाठी काय आहे?” 42 खरे त्यांनी त्याला भाजलेला माशाचा तुकडा दिला. 43 त्याने तो घेतला व त्यांच्यासमोर खाल्ला.
44 तो त्यांना म्हणाला, “ह्याच त्या गोष्टी ज्या मी तुम्हांबरोबर असताना सांगितल्या होत्या की, मोशेचे नियमशास्त्र, भविष्यवादी आणि स्तोत्रे ह्यात माझ्याविषयी जे सांगितले आहे ते सर्व पूर्ण झालेच पाहिजे.”
45 नंतर पवित्र शास्त्र समजण्यासाठी त्याने त्यांची मने उघडली. 46 मग तो त्यांना म्हणाला, “असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दु:ख भोगावे आणि मेलेल्यांतून तिसऱ्या दिवशी उठावे. 47 आणि यरुशलेमापासून सुरुवात करुन सर्व राष्ट्रांस माझ्या पित्याने जे वचन दिले आहे ते पाठवीन. पापक्षमेसाठी पश्चात्तापाची घोषणा करावी. 48 या गोष्टींचे तुम्ही साक्षी आहात. 49 आता मी तुम्हांला माझ्या पित्याने जे वचन दिले आहे ते पाठविन. परंतु जोपर्यंत तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने भरले जात नाही तोपर्यंत तुम्ही या शहरातच राहा.”
येशू परत स्वर्गात जातो(D)
50 नंतर तो त्यांना बाहेर दूरवर बेथानीपर्यंत घेऊन गेला आणि त्याने हात वर करुन आशीर्वाद दिला. 51 तो त्यांना आशीर्वाद देत असतानाच तो त्यांना सोडून गेला. आणि त्याला स्वर्गात घेण्यात आले. 52 नंतर त्यांनी त्याची उपासना केली व ते मोठ्या आनंदाने यरुशलेमाला परतले. 53 आणि देवाची सतत स्तुति करीत ते मंदिरात राहिले.
2006 by World Bible Translation Center