M’Cheyne Bible Reading Plan
होशेचे इस्राएलवर राज्य
17 एलाचा मुलगा होशे हा शोमरोनमधून इस्राएलवर राज्य करु लागला. तेव्हा यहूदावर आहाजच्या सत्तेचे ते बारावे वर्ष होते. होशेने नऊ वर्षे राज्य केले. 2 परमेश्वराने ज्या कृत्यांचा निषेध केला होता तीच कृत्ये होशेने केली. पण या पूर्वीच्या इस्राएलांच्या राजांइतकी होशेची कारकीर्द वाईट नव्हती.
3 अश्शूरचा राजा शल्मनेसर होशेवर चाल करुन आला. तेव्हा होशे शल्मनेसरचा मांडलीक बनला. त्याला होशेने आपले रक्षण करावे म्हणून कर दिला.
4 पण होशेचे आपल्याविरुध्द कटकारस्थान चालू आहे हे अश्शूरच्या या राजाच्या लक्षात आले, कारण होशेने मिसरचा राजा सो याच्याकडे आपले दूत पाठवले होते. तसेच दरवर्षीप्रमाणे त्या वर्षी होशेने करही भरला नव्हता. तेव्हा अश्शूरच्या राजाने त्याला अटक करुन कैदेत टाकले.
5 मग अश्शूरचा राजा इस्राएलमधून चाल करत शोमरोनमध्ये येऊन ठेपला. त्याने शोमरोनशी तीन वर्षे लढा दिला. 6 होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूरच्या राजाने शोमरोन हस्तगत केले. इस्राएल लोकांना त्याने कैद करुन अश्शूरला नेले. त्यांना त्याने हलहा येथे तसेच गोजानमधील हाबोर नदीजवळ आणि मेदीलोकांच्या नगरात ठेवले.
7 परमेश्वर देवाच्या इच्छेविरुध्द इस्राएल लोकांनी पापे केली होती. म्हणून असे घडले. मिसरचा राजा फारो याच्या जाचातून परमेश्वराने इस्राएल लोकांची सुटका केली होती. तरी इस्राएली लोकांनी इतर दैवतांचे भजनपूजन सुरु केले. 8 इतर लोकांचे ते अनुकरण करु लागले. त्या लोकांना परमेश्वराने इस्राएलीखातर तेथून हुसकावून लावले होते. शिवाय देवाऐवजी इस्राएल लोकांनी राजाची सत्ता पत्करली. 9 इस्राएल लोकांनी परमेश्वर देवाविरुध्द ज्या गोष्टी चोरुन केल्या त्या निषिध्द होत्या.
लहान गावापासून मोठ्या शहरापर्यंत सर्व ठिकाणी त्यांनी उंचस्थानावरील पुजास्थळे बांधली. 10 प्रत्येक टेकडीवर आणि हिरव्यागार झाडाखाली त्यांनी स्मृतिस्तंभ आणि अशेराचे खांब उभारले. 11 या सर्व ठिकाणी ते धूप जाळत. इस्राएली लोकांनी तेथे येण्याआधी परमेश्वराने ज्या राष्ट्रांना त्या भूमीतून घालवून दिले होते त्यांच्यासारखेच वर्तन इस्राएल लोकांनी केले. त्या नीच कृत्यांनी परमेश्वर क्रुध्द झाला. 12 त्यांनी मूर्तीपूजा आरंभली. “ती कधीही करु नये” म्हणून परमेश्वराने त्यांना बजावले होते.
13 इस्राएल आणि यहूदा यांना समज देण्यासाठी परमेश्वराने सर्व संदेष्टे आणि द्रष्टे यांचा उपयोग केला. त्यांच्यामार्फत लोकांना सांगितले, “या गैरकृत्यांपासून मागे फिरा. माझ्या आज्ञा आणि नियम पाळा. तुमच्या पूर्वजांना जे नियम मी घालून दिले त्यांचे पालन करा. ते नियमशास्त्र मी माझे सेवक असलेले संदेष्टे यांच्यामार्फत तुम्हांला सांगितले आहे.”
14 पण लोकांनी या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. आपल्या पूर्वजांसारखाच आडमुठेपणा त्यांनी केला. त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्यावर त्यांचा विश्वास नव्हता. 15 या लोकांनी परमेश्वराने पूर्वजांशी केलेले करार आणि नियम धुडकावून लावले. परमेश्वराने बजावून सांगितले तिकडे दुर्लक्ष केले. क्षुद्र दैवतांच्या नादी लागून त्यांनी काहीच साधले नाही. आपल्या भोवतालच्या राष्ट्रांचे त्यांनी अनुकरण चालवले. परमेश्वराने इस्राएल लोकांना जे करु नका म्हणून सांगितले होते तेच ही राष्ट्रे करत होती.
16 परमेश्वर देवाच्या आज्ञा पाळणे इस्राएल लोकांनी अजिबातच थांबवले. त्यांनी वासरांच्या दोन सुवर्णमूर्ती केल्या, अशेराचे खांब उभारले, आकाशातील सर्व ताऱ्यांची आणि बालदेवतेची त्यांनी पूजा केली. 17 आपल्या पोटच्या मुलामुलींचा अग्नित बळी दिला. भविष्याचे कुतूहल शमवण्यासाठी जादूटोणा आणि मंत्रतंत्र यांचा अवलंब केला. परमेश्वराने ज्या कृत्यांचा धिक्कार केला तेच करण्यापायी स्वतःलाही विकले आणि परमेश्वराचा कोप ओढवून घेतला. 18 या गोष्टींनी परमेश्वर क्रुध्द झाला आणि त्याने यहूदाचे घराणे वगळता सर्व इस्राएलांना नामशेष करुन टाकले.
यहूदा लोकांचेही अपराध
19 पण यहूदातील लोकांनीही परमेश्वराच्या आज्ञा मानल्या नाहीत. त्यांनी इस्राएल लोकांचा कित्ता गिरवला.
20 परमेश्वराने सर्व इस्राएल लोकांचा धिक्कार केला. त्यांना संकटात लोटले. इतरांकरवी त्यांचा नाश केला आणि अखेर इतरत्र हाकलून दृष्टीआड केले. 21 दावीदाच्या घराण्यापासून परमेश्वराने इस्राएल लोकांना तोडले. तेव्हा इस्राएल लोकांना नबाटचा मुलगा यराबामयाला राजा केले. यराबामने लोकांना परमेश्वरापासून आणखी दूर ओढले यराबामने त्यांना मोठ्या पातकाचे धनी केले. 22 यराबामच्या पावलांवर पाऊल ठेवून इस्राएल लोकांनी पापे केली. 23 परमेश्वराने त्यांना नजरेआड करीपर्यंत त्यांनी पापे करणे सोडले नाही. परमेश्वराने असे होणार हे भाकीत वर्तवले होतेच. ते सांगायला त्याने संदेष्ट्यांनाही पाठवले होते. तेव्हा इस्राएल लोकांची त्यांच्या प्रदेशातून अश्शूरमध्ये हकालपट्टी करण्यात आली. आजतागायत ते तिथेच आहेत.
शोमरोनी लोकांची सुरुवात
24 अश्शूरच्या राजाने इस्राएल लोकांना शोमरोनमधून बाहेर काढले. त्यानंतर या राजाने बाबेल, कूथा, अव्वा, हामाथ आणि सफरवाईम येथून लोक आणून शोमरोनमध्ये त्यांना वसवले. या लोकांनी शोमरोनचा ताबा घेतला आणि त्या भोवतालच्या गावांमध्ये ते राहू लागले. 25 या लोकांनी त्या प्रदेशात राहू लागल्यावर परमेश्वराचा मान राखला नाही. तेव्हा त्यांच्यावर हल्ला करायला परमेश्वराने त्यांच्यावर सिंह सोडले. या सिंहांनी काहीजणांचा बळी घेतला. 26 काही लोक अश्शूरच्या राजाला म्हणाले, “तू ज्या लोकांना शोमरोनमध्ये आणून ठेवलेस त्यांना या देशातील परमेश्वराचे नियम माहित नाहीत. म्हणून परमेश्वराने त्यांच्यावर सिंह सोडले. या लोकांना त्या परमेश्वराच्या नियमांचे ज्ञान नसल्यामुळे ते लोक मारले गेले.”
27 तेव्हा अश्शूरच्या राजाने आज्ञा दिली, “शोमरोनमधून काही याजकांना तुम्ही आणले आहे. तरी अटक करुन आणलेल्यांपैकी एका याजकाला तिथे पाठवा. त्याला तिथे राहू द्या. तो मग लोकांना परमेश्वराचे नियमशास्त्र शिकवेल.”
28 तेव्हा, अश्शूरांनी शोमरोनमधून नेलेल्या याजकांपैकी एकजण बेथेल येथे राहायला आला. त्याने लोकांना परमेश्वराचा मान कसा राखावा ते शिकवले.
29 पण या लोकांनी स्वतःच्या दैवतांच्या मूर्ती बनवल्या आणि शोमरोन मधील लोकांनी बांधलेल्या उंचस्थानावरील पुजास्थळामध्ये त्या ठेवल्या. सर्वत्र त्यांनी असेच केले. 30 बाबेलमधल्या लोकांनी सुक्कोथ बनोथ ही दैवते केली. कूथातील लोकांनी नेरगल केला. हमाथमधील लोकांनी अशीमा केली, 31 अव्वी या लोकांनी निभज आणि तर्ताक केले. सफरावीम लोकांनी आपले दैवत अद्रम्मेलेक आणि अनम्मेलेक यांच्याप्रीत्यर्थ आपल्या मुलांचा बळी दिला.
32 पण तरी त्यांनी परमेश्वराविषयी आदर बाळगला. उंचस्थानातील पुजास्थळांसाठी त्यांनी आपल्यातूनच याजक निवडले. तिथे हे याजक यज्ञ करीत. 33 परमेश्वराविषयी आदर बाळगून ते आपापल्या दैवतांचीही पूजा करीत. आपल्या पूर्वीच्या राष्ट्रांत ते करीत तसेच इथेही करीत.
34 आजही हे लोक पूर्वीप्रमाणेच वागतात. ते परमेश्वराला मानत नाहीत. इस्राएलांचे नियमशास्त्र ते पाळत नाहीत. याकोबचे वंशज म्हणजे इस्राएल यांना परमेश्वराने ज्या आज्ञा दिल्या त्या ते मानत नाहीत. 35 परमेश्वराने इस्राएल लोकांशी करार केला होता. त्यात परमेश्वर म्हणाला होता, “इतर दैवतांची पूजा सेवा तुम्ही करता कामा नये त्यांच्यासाठी यज्ञ करता कामा नयेत. 36 फक्त परमेश्वर देवालाच मानले पाहिजे त्यानेच तुम्हाला मिसरमधून बाहेर काढले तुमच्या रक्षणासाठी परमेश्वराने आपले सामर्थ्य पणाला लावले. तेव्हा परमेश्वराची उपासना करा आणि त्याच्यासाठी यज्ञ करा. 37 त्याने तुम्हाला ज्या आज्ञा, नियम, करार, शिकवण लिहून दिली ती तुम्ही पाळलीच पाहिजे. त्या सर्वांचे तुम्ही सर्व वेळ पालन केले पाहिजे इतर देवीदेवतांच्या नादी लागता कामा नये. 38 मी तुमच्याशी केलेल्या कराराचा विसर पडू देऊ नका. इतर दैवतांच्या भजनी लागू नका. 39 फक्त परमेश्वर देवालाच भजा. तरच तो तुम्हाला सर्व संकटांतून सोडवील.”
40 पण इस्राएल लोकांनी हे ऐकले नाही. ते पूर्वीप्रमाणेच वागत राहिले. 41 आता ती इतर राष्ट्रे परमेश्वराचा आदर ठेवतात पण स्वतःच्या देवतांच्या मूर्तीचीही पूजा करतात. त्यांची मुले बाळे, नातवंडे आपल्या पूर्वजांचेच अनुकरण करत राहिली. ती आजतागायत तशीच वागत आहेत.
जगण्याचा योग्य मार्ग
3 सत्ताधीश, आणि अधिकारी यांच्या अधीन राहण्या विषयी व त्यांच्या आज्ञा पाळण्याविषयी व प्रत्येक चांगले काम करण्यास तयार राहण्याविषयी, 2 कोणाचीही निंदा न करण्याविषयी, भांडण टाळण्याविषयी आणि सर्व माणसांना मोठी नम्रता दाखविण्याविषयी त्यांना सतत आठवण करून देत राहा.
3 मी हे सांगतो कारण आपणसुद्धा एके काळी मूर्ख, आज्ञा न पाळणारे आणि बहकलेले असे होतो. आम्ही सर्व प्रकारच्या वासनांची व विलासाची गुलामाप्रमाणे सेवा करणारे होतो. आम्ही दुष्टतेचे व हेव्यादाव्याचे जीवन जगत होतो. इतर लोक आमचा द्वेष करीत. आणि आम्ही एकमेकांचा द्वेष करीत होतो. 4 पण जेव्हा आमच्या तारणाऱ्या देवाची कृपा व प्रीति मानवाप्रती प्रकट झाली, तेव्हा 5 त्याने आम्हाला तारले. देवाकडून निर्दोष म्हणवून घेण्यासाठी आम्ही केलेल्या कोणत्याही कृत्यांनी नव्हे तर त्याच्या दयेमुळे आम्ही तारले गेलो आणि ते आमच्याकडे नव्या जन्माच्या स्नानाद्वारे आम्ही नवीन जन्म पावलो आणि पवित्र आत्म्याद्वारे प्राप्त झालेले नवीकरण यांनी तारले गेलो. 6 देवाने तो पवित्र आत्मा आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या द्वारे विपुलपणे आम्हावर ओतला. 7 यासाठी की, आता देवाकडून त्याच्या कृपेमध्ये आम्ही निर्दोष घोषित केले जावे. अनंतकाळच्या जीवनाच्या आशेने आम्ही त्याचे वारस व्हावे. 8 ही शिकवण विश्वसनीय आहे.
आणि यावर जोर द्यावा असे मला वाटते. यासाठी की, ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे, त्यांनी चांगली कृत्ये करण्याविषयी काळजी घ्यावी. या गोष्टी लोकांसाठी चांगल्या व हिताच्या आहेत.
9 परंतु मूर्खपणाचे वाद, वंशावळीसंबंधी चर्चा, भांडणे, नियमशास्त्राविषयीचा झगडा टाळ. करण ते निष्फळ व निरर्थक असे आहेत. 10 एकदोन वेळा बोध करून, फूट पाडणाऱ्या व्यक्तीला टाळा. 11 कारण तुला माहीत आहे की, असा मनुष्य वाइटाकडे वाहवत गेला आहे व तो पाप करीत आहे व त्याने स्वतःलाच दोषी ठरविले आहे.
लक्षात ठेवण्यासाठी काही गोष्टी
12 जेव्हा मी अर्तमाला किंवा तुखिकाला तुझ्याकडे पाठवीन तेव्हा मला भेटण्यासाठी निकपलिसास येण्याचा तू होईल तितका प्रयत्न कर. कारण तेथे हिवाऴा घालविण्याचे मी ठरविले आहे. 13 जेना वकील व अपुल्लो यांना त्यांच्या प्रवासासाठी ज्याची गरज भासेल ती पुरविण्यासाठी तू सर्वतोपरी प्रयत्न कर. यासाठी की, त्यांना कशाचीही कमतरता भासू नये. 14 आपल्या लोकांनी चांगली कृत्ये करण्याविषयी शिकले पाहिजे यासाठी की तातडीच्या गरजा भागविल्या जाव्यात, म्हणजे ते निष्फळ ठरणार नाहीत.
15 माझ्याबरोबरचे सर्वजण तुला सलाम सांगतात. विश्वासामध्ये आम्हावर प्रेम करणाऱ्या सर्वांना सलाम सांग.
देवाची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.
इस्राएलच्या संपत्तीने त्याला मूर्तिपूजेकडे नेले
10 इस्राएल बहरलेल्या द्राक्षवेलीप्रमाणे आहे.
त्याला परमेश्वराकडून पुष्कळ गोष्टी मिळत गेल्या
पण त्याने दैवांच्या मानासाठी खूपखूप वेद्या बांधल्या.
त्याची भूमी अधिकाधिक चांगली होत गेली,
तेव्हा त्याने अधिक चांगले स्तंभ दैवतांच्या मानासाठी उभे केले.
2 इस्राएलाच्या लोकांनी परमेश्वराला फसविण्याचा प्रयत्न केला.
पण आता त्यांनी त्यांचा अपराध कबूल केलाच पाहिजे.
परमेश्वर त्यांच्या वेद्या मोडेल.
तो त्यांच्या स्मारक स्तंभांचा नाश करील.
इस्राएलींचे दुष्ट निर्णय
3 आता इस्राएल लोक म्हणतात, “आम्हाला राजा नाही आम्ही परमेश्वराला मानत नाही. त्याचा राजा आमच्यासाठी काही करू शकत नाही.”
4 ते वचने देतात पण ते फक्त खोटो बोलत असतात. ते आपला शब्द पाळत नाहीत. ते दुसऱ्या देशांबरोबर करार करतात. परमेश्वराला ते करार आवडत नाहीत. न्यायाधीश नांगरलेल्या शेतात वाढणाऱ्या विषारी तणाप्रमाणे आहेत
5 शोमरोनमधील लोक बेथ: आवेन येथील वासरांची पूजा करतात. ते लोक अक्षरश: रडतील. ते याजकही खरोखरी रडतील. का? कारण त्यांची सुंदर मूर्ती नाहीशी झाली. ती दूर नेली गेली. 6 ती मूर्ती अशशूरच्या महान राजाला भेट म्हणून नेली गेली तो, एफ्राईमची लज्जास्पद मूर्ती ठेवील. इस्राएलला आपल्या मूर्तीची लाज वाटेल. 7 शोमरोनच्या दैवतांचा नाश केला जाईल पाण्यावर तरंगणाऱ्या लाकडाच्या तुकड्याप्रमाणे त्यांची दशा होईल.
8 इस्राएलाने पाप केले आणि उच्चस्थाने बांधली. आवेन मधील उच्चस्थानांचा नाश केला जाईल त्यांच्या वेदीवर काटेकुटे व तण वाढतील मग ते पर्वतांना म्हणतील, “आम्हाला झाका” आणि टेकड्यांना म्हणतील, “आमच्यावर पडा.”
इस्राएलला पापाची किंमत मोजावी लागेल
9 इस्राएल, गिबाच्या काळापासून तू पाप केले आहेस ते लोक तेथे पाप करीतच राहिले. गिबातील ते दुष्ट युध्दात खरोखरी पकडले जातील. 10 मी त्यांना शिक्षा करण्यासाठी येईन सैन्ये त्यांच्या विरोधात गोळा होतील. ती इस्राएलींच्या दोन्ही पापाबंद्दल त्यांना शिक्षा करतील.
11 एफ्राईम शिकविलेल्या तरुन कालवडीप्रमाणे आहे. तिला खळ्यातील धान्यावरुन चालायला आवडते. मी तिच्या गळ्यात चांगले जोखड अडकवीन. एफ्राईमला दोराने बांधीन मग यहूदा नांगरणी करील याकोब स्वतः ढेकळे फोडील.
12 जर तुम्ही चांगुलपणा पेरलात, तर तुम्हाला खऱ्या प्रेमाचे पीक मिळेल तुमचे शेंत नांगरा तुम्हाला परमेश्वरासह पीक मिळेल. तो येईल आणि पावसाप्रमाणे तुमच्यावर चांगुलपणाचा वर्षाव करायला लावील.
13 पण तुम्ही पाप पेरले, म्हणून तुम्हाला अडचणींचे पीक मिळाले तुम्हाला तुमच्या खोटेपणाचे फळ मिळाले. का? कारण तुम्ही तुमच्या शक्तीवर आणि तुमच्या सैनिकांवर विश्वास ठेवला. 14 म्हणून तुमच्या सैन्याला रणशिंग ऐकू येईल तुमच्या सर्व गढ्यांचा नाश होईल. तो नाश, शल्मनाने जसा बेथ-आर्बेलचा नाश केला, तसा असेल त्या यूध्दाच्या वेळी, आया मलांबरोबर ठार मारल्या गेल्या. 15 आणि हे सर्व तुझ्याबाबतीत बेथेल येथे घडेल. का? कारण तुम्ही खूप पापे केली. तो दिवस उजाडताच इस्राएलच्या राजाचा संपूर्ण नाश होईल.
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र
129 “मला आयुष्यभर खूप शत्रू होते.”
इस्राएल, आम्हाला त्या शंत्रूंबद्दल सांग.
2 मला आयुष्यभर खूप शत्रू होते
पण ते कधीही विजयी झाले नाहीत.
3 माझ्या पाठीत खोल जखमा होईपर्यंत त्यांनी मला मारले.
मला खूप मोठ्या आणि खोल जखमा झाल्या.
4 पण परमेश्वराने दोर कापले
आणि मला त्या दुष्टांपासून सोडवले.
5 जे लोक सियोनचा तिरस्कार करीत होते, त्यांचा पराभव झाला.
त्यांनी लढणे थांबवले आणि ते पळून गेले.
6 ते लोक छपरावरच्या गवतासारखे होते.
ते गवत वाढण्या आधीच मरुन जाते.
7 ते गवत कामगाराला मूठ भरही मिळू शकत नाही.
धान्याचा ढीग करण्याइतकेही ते नसते.
8 त्यांच्या जवळून जाणारे लोक, “परमेश्वर तुला आशीर्वाद देवो” असे म्हणणार नाहीत.
लोक त्यांचे स्वागत करुन, “आम्ही परमेश्वराच्या नावाने तुम्हाला आशीर्वाद देतो” असे म्हणणार नाहीत.
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र
130 परमेश्वरा, मी खूप मोठ्या संकटात आहे
म्हणून मी तुला मदतीसाठी हाक मारीत आहे.
2 माझ्या प्रभु, माझ्याकडे लक्ष दे.
माझ्या मदतीच्या हाकेला ओ दे.
3 परमेश्वरा, तू जर लोकांना खरोखरच त्यांच्यासगळ्या
पापांबद्दल शिक्षा केलीस तर कुणीही माणूस जिवंत राहाणार नाही.
4 परमेश्वरा, तुझ्या माणसांना क्षमा कर.
म्हणजे मग तुझी उपासना करण्यासाठी लोक असतील.
5 मी मदतीसाठी परमेश्वराची वाट पाहतो आहे.
माझा आत्मा त्याची वाट बघत आहे.
परमेश्वर जे सांगतो त्यावर माझा विश्वास आहे.
6 मी माझ्या प्रभुची वाट बघत आहे.
मी सकाळ होण्याची खूप वाट पाहात असलेल्या रक्षकांसारखा आहे.
7 इस्राएल, परमेश्वरावर विश्वास ठेव.
केवळ परमेश्वराजवळच खरे प्रेम मिळते.
परमेश्वर पुन्हा पुन्हा आपला उध्दार करतो आणि
8 परमेश्वर इस्राएलला त्याच्या सर्व पापांबद्दल क्षमा करील.
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र
131 परमेश्वरा, मी गर्विष्ठ नाही.
मी कुणीतरी मोठा आहे असे मी वागत नाही.
मी खूप भव्य असे काही करायचा प्रयत्न करत नाही.
मी माझ्या आवाक्या बाहेरच्या गोष्टींची चिंता कधीच करत नाही.
2 मी अगदी अविचल आहे.
माझा आत्मा शांत आहे.
माझा आत्मा आईच्या कुशीत समाधान पावलेल्या
बाळासारखा अविचल आणि शांत आहे.
3 इस्राएल, परमेश्वरावर विश्वास ठेव.
त्याच्यावर आता आणि सदैव विश्वास ठेवत राहा.
2006 by World Bible Translation Center