Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 शमुवेल 20

योनाथान आणि दावीद यांच्या मधला करार

20 दावीद रामा येथील शिबिरापासून दूर पळून गेला. योनाथानकडे येऊन तो म्हणाला, “माझं काय चुकल? माझा अपराध तरी काय? तुझे वडील का माझ्या जिवावर उठले आहेत?”

योनाथान म्हणाला, “हे काय भलतेच? ते कशाला तुझ्या जिवावर उठतील? मला सांगितल्या शिवाय ते कधीच कुठली गोष्ट करत नाहीत. कोणतीही महत्वाची किंवा क्षुल्लक गोष्ट असो, ते ती मला सांगतातच. मग तुझा वध करायची बाब ते कशी माझ्यापासून लपवून ठेवतील? तेव्हा हे काही खरं नव्हे!”

तेव्हा दावीद म्हणाला, “आपण मित्र आहोत ही गोष्ट तुझे वडील चांगली जाणून आहेत. ते स्वतःशी म्हणाले, ‘योनाथानला हे कळता कामा नये. त्याला कळले तर तो हे दावीदला सांगेल.’ पण परमेश्वराची आणि तुझ्या जीविताची शपथ घेवून सांगतो, मृत्यू माझ्याभोवती घोटाळतो आहे.”

योनाथान मग दावीदाला म्हणाला, “तू काय म्हणशील ते करायला मी तयार आहे.”

मग दावीद म्हणाला, “उद्या अमावस्ये निमित्त मेजवानी आहे. तेव्हा राजाच्या पंक्तीला मी असायला हवे. पण संध्याकाळपर्यंत मी शेतात लपून बसतो मी नसल्याचे तुझ्या वडीलांच्या लक्षात आले तर त्यांना सांग, ‘दावीदला बेथलहेमला तातडीने जायचे होते. त्याच्या सगळ्या कुटुंबाचा मासिक यज्ञ तेथे आहे. त्यात हजर राहायला जाण्यासाठी त्याने माझी परवानगी मागितली.’ तुझ्या वडीलांनी हे सहजगत्या मान्य केले तर मला काही धोका नाही. पण ते संतापले तर मात्र माझ्या जिवाला धोका आहे हे तू ओळख. योनाथान, माझ्यावर कृपा कर. मी तुझा दास आहे. परमेश्वराच्या साक्षीने तू माझ्याशी करार केला आहेस. मी अपराधी आढळल्यास खुशाल तू माझा वध कर. पण मला तुझ्या वडीलांकडे नेऊ नको.”

यावर योनाथान म्हणाला, “अस घडणार नाही. ते तुझ्या वाईटावर आहेत असं माझ्या लक्षात आलं तर मी तूला तसं सांगीन.”

10 दावीद म्हणाला, “तुझ्याशी ते कठोरपणे वागले तर मला कोण खबर देईल?”

11 तेव्हा योनाथानने सुचवले, “चल आपण शेताकडे जाऊ.” आणि ते दोघे ही शेतात गेले.

12 तिथे योनाथान दावीदला म्हणाला, “देव जो, इस्राएलचा परमेश्वर या समोर मी तुला वचन देतो. माझ्या वडीलांच्या तुझ्याबद्दल काय भल्याबुऱ्या भावना आहेत ते मी जाणून घेईन. मग तीन दिवसात तुला तसं इथे याच शेतात कळवीन. 13 त्यांच्याकडून तुला काही घातपात होणार असेल तर तुला त्याची कल्पना देईन. तुला सुखरुप निसटू देईन. माझ्याहातून यात हयगय झाल्यास परमेश्वर मला त्याची शिक्षा देवो. माझ्या वडीलांना परमेश्वराची साथ आहे तशीच तुला मिळो. 14 मी हयात असेपर्यंत तुझा माझ्यावर लोभ असू दे. मी गेल्यावरही 15 माझ्या कुटुंबावरील तुझ्या लोभात खंड न पडो. परमेश्वर तुझ्या वैऱ्यांचा पृथ्वीतलावरुन नि:पात करील. 16 मग त्या वेळी योनाथानच्या कुटुंबाला दावीदपासून वेगळे व्हावे लागले तरी बेहत्तर. देव दावीदाच्या शत्रूंना शासन करो.” मग योनाथानने दावीदाच्या घराण्याशी करार केला.

17 योनाथानने मग दावीदला परस्परांवरील प्रेमाच्या आणाभाका परत घ्यायला लावल्या. दावीदावर त्याचे स्वतः इतकेच प्रेम होते म्हणून त्या प्रेमापोटी त्याने असे केले.

18 योनाथान दावीदला म्हणाला, “उद्या अमावास्येची मेजवानी आहे. पंक्तीतील तुझे आसन रिकामे असेल त्यामुळे तुझी अनुपस्थिती माझ्या वडीलांच्या लक्षात येईल. 19 या सगळ्यांला सुरुवात झाली तेव्हा तू जिथे लपला होतास त्याच ठिकाणी तू तिसऱ्या दिवशी थांब. त्या टेकडी जवळ माझी वाट पाहा. 20 तिसऱ्या दिवशी मी तिथे येईन आणि नेमबजी चालली आहे असे भासवीन. काही बाण मी मारीन. 21 आणि हाताखालच्या मुलाला बाण शोधून आणायला पाठवीन. सर्वकाही ठीक असेल तर त्या मुलाला मी म्हणेन, ‘तू खूप लांब गेलास बाण माझ्या जवळ आहेत. तर ये व तो घे.’ जर मी असा म्हणालो तर तू खुशाल बाहेर ये मग, परमेश्वराच्या जीविताची शपथ, तुझ्या सुरक्षिततेची हमी माझ्यावर, कोणताही धोका तेव्हा नसेल. 22 पण काही धोका असल्यास मी म्हणेन, ‘बाण आणखी पुढे आहेत. जा, जाऊन आण.’ तसे मी म्हटले तर मात्र तू निघून जा. प्रत्यक्ष परमेश्वरच तुला लांब पाठवत आहे असे समज. 23 आपल्या दोघांमधला हा करार लक्षात ठेव. परमेश्वर याला साक्ष आहे.”

24 त्यानंतर दावीद शेतात लपून बसला.

मेजवानीच्या प्रसंगी शौलचा दृष्टिकोण

अमावास्येच्या मेजवानीची वेळ झाली आणि राजा भोजनासाठी बसला. 25 भिंती जवळच्या आपल्या नेहमीच्या आसनावर राजा बसला. त्याच्या समोर योनाथान होता. आबनेर शौलजवळ होता. दावीदाचे आसन मात्र रिकामे होते. 26 त्यादिवशी शौल काहीच बोलला नाही. त्याला वाटले, “काही कारणाने आज तो शुचिर्भूत नसेल.”

27 दुसऱ्या दिवशी पुन्हा दावीदाचे आसन रिकामेच राहिले. तेव्हा मात्र शौल योनाथानला म्हणाला, “इशायचा मुलगा या प्रंसगी दिसत नाही. कालही नव्हता, आजही नाही. असे का?”

28 योनाथानने सांगितले, “त्याने माझ्याजवळ बेथलहेमला जायची परवानगी मागितली. 29 तो म्हणाला, ‘मला जायला हवे. बेथलहेमला आमच्या कुटुंबात यज्ञ आहे. माझ्या भावाने मला यायची आज्ञा केली आहे. आपल्या मैत्रीला स्मरुन तू मला भावांना भेटायला जायची परवानगी दे.’ दावीद आज राजाच्या पंक्तीला नाही याचे हे कारण आहे.”

30 शौल योनाथानवर संतापला. तो म्हणाला, “अरे दासीपुत्रा, तू माझी अवज्ञा करतोस? आणि तू तिच्यासारखाच निपजलास. तू दावीदाच्या बाजूचा आहेस हे मला माहीत आहे. तू तुला आणि तुझ्या आईला लाज आणली आहेस. 31 हा इशायचा मुलगा जिवंत असेपर्यंत तू राज्यावर येणार नाहीस. आत्ताच्या आत्ता दावीदला आणून हजर कर. त्याला मेलेच पाहिजे.”

32 योनाथान आपल्या वडीलांना म्हणाला, “त्याने काय केले? का म्हणून त्याने मेले पाहिजे?”

33 यावर शौलाने योनाथानवर आपला भाला फेकला आणि त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. तेव्हा, दावीदाला मारायचा आपल्या वडीलांनी निश्चय केला आहे हे योनाथानच्या लक्षात आले. 34 संतापाने तो पंक्तीतून चालता झाला. त्या रागात त्याने अन्नाला स्पर्शसुध्दा केला नाही. शौलाने आपल्याला शरमिंदे केले आणि दावीदाला मारायचे ठरवले म्हणून त्याला फार राग आला.

दावीद आणि योनाथान निरोप घेतात

35 दुसऱ्या दिवशी सकाळी योनाथान शेतावर आला. ठरल्याप्रमाणे दावीदला भेटायला तो आला. आपल्याबरोबर त्याने मदतनीस मुलालापण आणले. 36 त्याला तो म्हणाला, “धावत पुढे हो. मी बाण मारतो तो आण.” मुलगा धावत जायला लागल्यावर योनाथानने त्याच्या डोक्यावरुन बाण मारले. 37 बाण पडले त्या ठिकाणी तो मुलगा पोचल्यावर योनाथान म्हणाला, “बाण आणखी पुढेच आहेत.” 38 मग तो म्हणाला, “जा धावत जा, लौकर आणि नुसता उभा राहू नको.” मुलाने मग बाण उचलून गोळा करुन आणले. 39 काय चालले आहे याची त्या मुलाला अजिबात कल्पना नव्हती. फक्त योनाथान आणि दावीदला ते कळत होते. 40 योनाथानने धनुष्यबाण त्या मुलाकडे दिले आणि त्याला तो म्हणाला, “आता तू गावात परत जा.”

41 मुलगा दिसेनासा झाल्यावर दावीद डोंगराच्या पलीकडे लपला होता तिथून बाहेर आला. त्याने योनाथानला तीनदा वाकून अभिवादन केले. मग त्यांनी परस्परांचे मुके घेतले. दोघेही रडू लागले. पण दावीदाचा आक्रोश योनाथानपेक्षा जास्त होता.

42 योनाथान दावीदला म्हणाला, “शांत चित्ताने जा. परमेश्वराची शपथ घेऊन आपण मैत्रीच्या आणाशपथा घेतल्या आहेत. आपण आणि आपले वंशज यांना परमेश्वर, चिरंतन साक्षी आहे.”

1 करिंथकरांस 2

ख्रिस्ताविषयीचा वधस्तंभावरील संदेश

म्हणून बंधूनो, जेव्हा मी तुमच्याकडे आलो, तेव्हा मी देवाचे रहस्यमय सत्य मानवी ज्ञानाने किंवा वक्तृत्वकलेने सांगण्यासाठी आलो नाही. कारण तुमच्यामध्ये असताना फक्त येशू ख्रिस्त आणि तोही वधस्तंभावर खिळलेला याशिवाय कशाचेही ज्ञान असू नये असा मी निश्र्च्य केला आहे. तेव्हा मी तुमच्याकडे अशक्तपणाने, भीतियुक्त असा व थर थर कापत आलो आहे. माझे भाषण व संदेश हे मन वळविणाऱ्या मानवी ज्ञानाद्वारे दिलेले नव्हते, ते आत्मा आणि सामर्थ्य यांचा पुरावा असलेले होते. यासाठी की, तुमचा विश्वास मानवी ज्ञानावर नव्हे तर देवाच्या सामर्थ्यवर असावा.

देवाचे ज्ञान

परंतु जे प्रौढ आहेत त्यांना आम्ही ज्ञान देतो. या युगाच्या अधिकाऱ्यांना नव्हे, ज्यांचा शेवट करण्यासाठी आणण्यात येत आहे. त्याऐवजी, जे लपविलेले आहे, आणि हे युग सुरु होण्यापूर्वी देवाने आमच्या गौरवासाठी नेमले होते ते देवाचे रहस्यमय ज्ञान देतो. जे या युगाच्या कोणाही सत्ताधीशाला माहीत नव्हते, कारण जर त्यांना कळले असते, तर त्यांनी गौरवी प्रभूला वधस्तंभावर खिळले नसते. परंतु ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते,

“डोळ्यांनी पाहिले नाही,
    कानांनी ऐकले नाही,
आणि मनुष्याच्या अंतःकरणाने जे उपजविले नाही,
    ते देवाने त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी तयार केले आहे.” (A)

10 परंतु देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपणांस प्रकट केले आहे.

कारण आत्मा हा प्रत्येक गोष्टीचा शौध घेतो, एवढेच नव्हे तर तो देवाच्या सखोलतेच्या गुप्ततेचाही शोध घेतो. 11 कारण मनुष्याच्या आत्म्याशिवाय त्या मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा दुसरा कोण मनुष्य आहे? याप्रमाणेच देवाच्या आत्म्याशिवाय देवाचे विचार कोणीच ओळखू शकत नाही. 12 परंतु आम्हांला जगाचा आत्मा मिळाला नाही, तर देवापासूनचा आत्मा मिळाला आहे. यासाठी की, देवाने ज्या गोष्टी फुकट दिल्या आहेत त्यांचे आम्हांला ज्ञान व्हावे.

13 मानवी ज्ञानाने शिकविलेल्या शब्दांनी आम्ही या गोष्टी सांगत नाही, तर आत्म्याने शिकविलेल्या शब्दांनी, आध्यात्मिक शब्द उपयोगात आणून आध्यात्मिक गोष्टींचे स्पष्टीकरण करतो. 14 स्वाभाविक मनुष्य देवाच्या आत्म्याने प्रगट झालेल्या गोष्टी ग्रहण करीत नाही. कारण त्या त्याला मूर्खपणाच्या आहेत. आणि त्या त्याला समजत नाहीत, कारण त्यांची आध्यात्मिक रितीने पारख केली जाते. 15 परंतु आध्यात्मिक मनुष्य सर्व गोष्ट पारखू शकतो कारण त्याची पारख करणे कोणालाही शक्य नसते, 16 कारण पवित्र शास्त्र म्हणते,

“प्रभूचे मन कोण जाणतो?
    जो त्याला शिकवू शकेल?” (B)

परंतु आमच्या ठायी ख्रिस्ताचे मन आहे.

विलापगीत 5

परमेश्वराकडे प्रार्थना

परमेश्वरा, आमचे काय झाले ते लक्षात ठेव.
    आमच्या अप्रतिष्ठेकडे नजर टाक.
आमचा देश परक्यांच्या हातात गेला आहे.
    आमची घरे परदेशीयांना दिली गेली आहेत.
आम्ही अनाथ झालो.
    आम्हाला वडील नाहीत.
    आमच्या आयांची स्थिती विधवांसारखी झाली आहे.
आम्हाला पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते.
    आम्ही वापरत असलेल्या लाकडाला पैसे मोजावे लागतात.
आमच्या मानेवर सक्तीने जोखड ठेवले जाते.
    आम्ही दमून जातो.
    पण आम्हाला विश्रांती नाही.
पोटभर भाकरी मिळविण्यासाठी आम्ही मिसर
    व अश्शूर यांच्याबरोबर करार केला.
आमच्या पूर्वजांनी तुझ्याविरुध्द पाप केले.
    आता ते नाहीत.
    पण त्यांच्या पापाची फळे आता आम्ही भोगत आहोत.
गुलाम आमचे राज्यकर्ते झाले.
    त्यांच्यापासून आम्हाला कोणीही वाचवू शकत नाही.
अन्नासाठी आम्ही जीवाची बाजी लावतो.
    वाळवंटात तलवारधारी माणसे असतात.
10 आमची कातडी भट्टीप्रमाणे तापली आहेत.
    भुकेमुळे आम्हाला ताप चढला आहे.
11 शत्रूंनी सियोनमधील स्त्रियांवर बलात्कार केला.
    यहुदातील गावांमधील स्त्रियांवर त्यांनी बलात्कार केले.
12 शत्रूंने आमच्या राजपुत्रांना फाशी दिली.
    त्याने आमच्यातील वृध्दांचा मान ठेवला नाही.
13 आमच्या तरुणांना शत्रूने गिरणीत धान्य दळायला लावले.
    ते तरुण लाकडाच्या ढिगाऱ्याखाली अडखळले.
14 वृध्द आता नगरीच्या द्वारांत बसत नाहीत.
    तरुण गायनवादन करीत नाहीत.
15 आमच्या नृत्याचे रूपांतर आता मृतांच्या शोकात झाले आहे.
    आमच्या हृदयात आनंदाचा अंशही नाही.
16 आम्ही पाप केल्यामुळे आमच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला आहे.
    आणि वाईट गोष्टी घडल्या.
17 ह्या सर्व गोष्टीमुळे आमचे मन खचले आहे.
    आम्हाला डोळ्यांनी स्पष्टपणे दिसत नाही.
18 सियोनचे डोंगर ओसाड झाले आहेत.
    सियोनच्या डोंगरावर कोल्हे वावरतात.
19 पण परमेश्वरा, तुझी सत्ता चिरंतन आहे.
    तुझे राजसिंहासन चिरकाल राहील.
20 परमेश्वर आम्हाला कायमचा विसरला आहेस असे दिसते.
    तू आम्हाला दीर्घकाल सोडून गेला आहेस.
21 परमेश्वरा, आम्हाला तुझ्याकडे परत ने.
    आम्ही आनंदाने तुझ्याकडे येऊ.
    आमचे जीवन पूर्वीसारखे कर.
22 तू आमच्यावर खूप रागावला होतास!
    तू आमचा पूर्णपणे त्याग केलास का?

स्तोत्रसंहिता 36

प्रमुख वादकासाठी परमेश्वराचा सेवक दावीद याचे स्तोत्र.

36 वाईट माणूस जेव्हा असे म्हणतो, “मी देवाला भिणार नाही,
    त्याला मान देणार नाही” तेव्हा तो फार वाईट गोष्ट करतो.
तो माणूस स्वतशीच खोटे बोलतो
    त्याला स्वत:च्या चुका दिसत नाहीत म्हणून
    तो क्षमेची याचना करीत नाही.
त्याचे शब्द खोटे असतात त्यांना कवडीची किंमत असते
    तो शहाणा होत नाही किंवा सत्कृत्य करायला शिकत नाही.
सर्व रात्रभर तो चुकीच्या किंवा वाईट गोष्टींच्या योजना आखतो.
    तो उठल्यावर काहीही चांगले करीत नाही.
    परंतु तो काही वाईट करायला नकारही देत नाही.

परमेश्वरा, तुझे खरे प्रेम आकाशापेक्षाही उत्तुंग आहे.
    तुझी इमानदारी ढगांपेक्षा उंच आहे.
परमेश्वरा तुझा चांगुलपणा सर्वात उंचपर्वतापेक्षाही उंच आहे
    तुझा न्यायीपणा सर्वात खोल, समुद्रापेक्षाही खोल आहे.
परमेश्वरा तू मनुष्याला आणि प्राण्यांना वाचवतोस.
तुझा प्रेमळ दयाळूपणा सगळ्यांत किंमती आहे.
    माणसे आणि देवदूत तुझ्याकडे संरक्षणासाठी येतात.
परमेश्वरा तुझ्या घरातल्या चांगल्या वस्तूंमुळे त्यांना नवा जोम येतो.
    तू त्यांना तुझ्या अद्भुत नदीतून मनसोक्त पिऊ देतोस.
परमेश्वरा जीवनाचे कारंजे तुझ्यातून उडते.
    तुझा प्रकाश आम्हाला प्रकाश दाखवतो.
10 परमेश्वरा जे तुला खरोखरच ओळखतात त्यांच्यावर प्रेम करणे तू चालूच ठेव.
    जे लोक तुझ्याशी प्रामाणिक आहेत त्यांच्यासाठी तुझा चांगुलपणा असू दे. [a]
11 परमेश्वरा गर्विष्ठ लोकांना मला सापळ्यात अडकवू देऊ नकोस.
    वाईट लोकांना मला पकडू देऊ नकोस.

12 त्याच्या थडग्यावर “इथे वाईट लोक पडले,
    त्यांना चिरडण्यात आले,
    ते आता पुन्हा कधीही उभे राहू शकणार नाहीत.
    असे लिहून ठेव.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center