M’Cheyne Bible Reading Plan
गल्याथचे इस्राएलला आव्हान
17 पलिष्ट्यांनी आपापल्या सैन्यांची जमवाजमव केली आणि ते यहूदामधील सोखो येथ जमले. सोखो आणि अजेका यांच्यामध्ये अफसऱ्दम्मीन येथे त्यांनी छावणी दिली.
2 शौल आणि इस्राएलचे सैन्यही एकत्र आले. त्यांचा तळ एलाच्या खोऱ्यात होता. पलिष्ट्यांशी लढायला शौलचे सैन्य सज्ज झाले. 3 खोऱ्याच्या दुतर्फा असलेल्या टेकड्यांवर ही दोन्ही सैन्ये समोरामसोर ठाकली होती.
4 पलिष्ट्यांकडे गल्याथ नावाचा कुशल योध्दा होता. तो गथ येथील होता. त्याची उंची नऊ फुटापेक्षा [a] जास्त होती. पलिष्ट्यांच्या छावणीतून तो बाहेर आला. 5 पितळी शिरस्त्राण आणि खवल्या खवल्यांचे चिलखत त्याने परिधान केले होते. हे चिलखतही पितळी असून त्याचे वजन जवजवळ एकशेपंचवीस पौंड होते. 6 त्याच्या पायांवरही पितळी कवच असून पाठीवर पितळी बरची होती. 7 त्या बरचीचा लाकडी भाग विणकरच्या दांडक्याएवढा होता. आणि बरचीचं पातं पंधरा पौंड वजनाचं होतं एक ढाल वाहणारा सेवक गल्याथच्या समोर चालला होता.
8 गल्याथ रोज बाहेर पडे आणि इस्राएली सैनिकांना ओरडून आव्हान देई. तो म्हणे, “तुम्ही येथे येऊन युध्दासाठी का उभे आहात? तुम्ही शौलाचे सेवक आहात. मी पलिष्टी आहे. तुमच्यापैकी एकाला निवडा आणि माझ्याकडे पाठवा. 9 त्याने मला मारले तर आम्ही पलिष्टी तुमचे दास बनू. पण मी त्याला मारले तर मी जिंकलो आणि मग तुम्ही आमचे दास व्हाल. तुम्हाला आमची चाकरी करावी लागेल.”
10 तो असेही म्हणे, “आज मी इस्राएल सैन्याला तुच्छ लेखतो. तुम्ही एकाला तरी पाठवा आणि आम्हाला लढू द्या.”
11 गल्याथची हे आव्हान ऐकून शौल व त्याचे सैन्य यांच्यात घबराट निर्माण झाली.
दावीद आघाडीवर जातो
12 यहूदातील बेथलहेम येथील इफ्राथ वंशामधल्या इशायचा दावीद हा मुलगा. इशायला एकंदर आठ मुलगे होते. शौलच्या कारकीर्दीत इशाय एक वयस्क गृहस्थ होता. 13 इशायचे तीन मोठे मलुगे शौलबरोबर युध्दाला गेले होते. पाहिला अलीयाब, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शम्मा. 14 दावीद सगळ्यात धाकटा होता. मोठी तीन मुलं शौलच्या सैन्यात असली तरी 15 दावीद अनेकदा बेथलहेमला आपल्या वडिलांची मेंढरं राखायला शौलकडून येत जात असे.
16 इकडे हा पलिष्टी गल्याथ रोज सकाळ संध्याकाळ इस्राएल सैन्यासमोर उभे राहून आव्हात देत होता. हा त्याचा क्रम चाळीस दिवस चालला होता.
17 एक दिवस इशाय दावीदला म्हणाला, “आपल्या भावांसाठी एवढं टोपलंभर शिजवलेले धान्य आणि हे दहा पावाच्या लाद्या छावणीवर घेऊन जा. 18 तसंच, तुझ्या भावांच्या छावणीवरच्या हजारी अधिकाऱ्याला या पनीरच्या दहा वड्या दे. भावांची खुशाली विचार. ते सुखरुप आहेत याची पावती म्हणून माझ्यासाठी काहीतरी खूण आण. 19 तुझे भाऊ शौल आणि इतर इस्राएली सैनिक यांच्या बरोबर एलाच्या खोऱ्यात आहेत. पलिष्ट्यांबरोबर त्यांची लढाई आहे.”
20 दुसऱ्या दिवशी दावीदाने आपली मेंढरे दुसऱ्या एका मेंढपाळाच्या हाती सोपवली आणि तो इशायच्या म्हणण्याप्रमाणे सर्व सामान घेऊन निघाला. दावीद आपली गाडी घेऊन तळाशी पोचला तेव्हा सर्व सैनिक रणगर्जना करत आपापल्या युध्दव्यूहातल्या जागांवर चालले होते. 21 इस्राएलचे सैन्य आणि पलिष्टी समोरासमोर उभे होते.
22 आपले सामान रसदीच्या राखणदारावर सोपवून दावीद सैन्याकडे धावला. भावांचा शोध घेऊन. 23 त्याने त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. तेवढ्यात पलिष्ट्यांचा गथ येथील झूंजार सैनिक गल्याथ आपल्या सैन्यातून बाहेर येऊन नेहमी प्रमाणे इस्राएलला आव्हान देऊ लागला. ते सर्व दावीदाने ऐकले.
24 गल्याथला पाहून इस्राएल सैनिकांनी भीतीने पळ काढला. 25 त्यातला एक इस्राएली म्हणाला, “बघितलंस त्याला? पाहून घे. हा गल्याथ पुन्हा पुन्हा येऊन इस्राएलची निर्भत्सना करतो. जो कोणी त्याला ठार करील त्याला शौल राजा भरपूर द्रव्य देईल. आपल्या मुलीचे त्याच्याशी लग्न लावून देईल. शिवाय इस्राएलमध्ये त्याचे घराणे स्वतंत्र करील.”
26 दावीदाने आपल्या आसपासच्या लोकांना विचारले, “काय म्हणाला तो? या पलिष्ट्याला ठार करुन इस्राएलवरचा कलंक पुसून टाकणाऱ्याला इनाम काय आहे? आणि हा गल्याथ तरी एवढा कोण? बोलूनचालून परका. [b] एक पलिष्टी आमच्या जीवंत परमेश्वराच्या सैन्याविरुद्ध बोलतो म्हणजे काय?”
27 तेव्हा इस्राएली सैनिकांनी पुन्हा एकदा दावीदला इनाम काय ते सांगितले. 28 अलीयाबने दावीदला सैनिकांशी बोलत असताना पाहिले. त्याला दावीदचा राग आला. अलीयाबने दावीदला रागाने विचारले, “तू इथे का आलास? आणि वाळवंटात आपळी मेंढरे कोणापाशी सोडून आलास? मला माहीत आहे तू इथे का आलास ते! तुला जे करायला सांगितले ते करायला नको. नुसती लढाई बघत बसायला आलास.”
29 दावीद म्हणाला, “माझं काय चुकलं? मी फक्त बोलत होतो.” 30 दावीदाने मग इतरांनाही तेच विचारले. पूर्वीसारखीच उत्तरे त्याला मिळाली.
31 काहींनी दावीदला बोलताना ऐकले. त्यांनी त्याला शौल कडे नेले आणि दावीदचे शब्द त्याच्या कानावर घातले. 32 दावीद शौलाला म्हणाला, “गल्याथच्या बोलण्याने लोकांनी खचून जाता कामा नये. मी तुमच्या सेवेला हजर आहे. त्या पलिष्ट्याचा मी सामना करतो.”
33 शौल त्याला म्हणाला, “तू त्याला युध्दात पुढे पडू शकणार नाहीस. तू साधा सैनिकसुध्दा नाहीस. [c] गल्याथ तर लहानपणापासून लढाईवर जातो आहे.”
34 पण दावीद म्हणाला, “मी माझ्या वडिलांची शेरडे-मेंढरे राखतो. एकदा एक सिंह आणि अस्वल येऊन कळपातील कोकरु उचलून घेऊन गेले. 35 मी त्यांचा पाठलाग केला. त्यांच्यावर हल्ला करुन कोकराला त्याच्या तोंडातून सोडवले. त्या हिंस्त्र पशूंनी माझ्यावर झेप घेतली पण त्याच्या जबडयाखाली धरुन त्याला आपटून मी ठार केले. 36 सिंह आणि अस्वल दोघांना मी मारले. त्या परक्या गल्याथचीही मी तशीच गत करीन. आपल्या जीवंत परमेश्वराच्या सैन्याची टर उडवतो. त्याला मृत्यूला सामोरे जायलाच पाहिजे. 37 परमेश्वराने मला सिंह आणि अस्वल यांच्या तावडीतून सोडवले. तो मला या पलिष्ट्यांच्या हातूनही सोडवील.”
तेव्हा शौल दावीदला म्हणाला, “ठीक तर! देव तुझे रक्षण करो.” 38 शौलाने आपली स्वतःची वस्त्रे दावीदला दिली. पितळी शिरस्त्राण आणि चिलखत त्याच्या अंगावर चढवले. 39 दावीदाने मग तलवार लावली आणि तो चालून पाहू लागला. पण त्याला हालचाल जमेना कारण त्याला अशा अवजड गोष्टींची सवय नव्हती.
तेव्हा तो म्हणाला, “हे सर्व चढवून मला लढता येणार नाही. याची मला सवय नाही.” आणि त्याने ते सगळे उतरवले. 40 एल काठी तेवढी हातात घेऊन तो वाहत्या झऱ्यातले गुळगुळीत गोटे शोधायला बाहेर पडला. आपल्या धनगरी बटव्यात त्याने पाच गोटे घेतले आणि हातात गोफण घेऊन तो गल्याथाच्या समाचाराला निघाला.
दावीद गल्याथला ठार करतो
41 गल्याथ हळू हळू पावले टाकत दावीद कडे येऊ लागला. गल्याथचा मदतनीस ढाल धरुन त्याच्या पुढे चालला होता. 42 दावीदकडे बघून गल्याथला हसू फुटले. हा देखणा, तांबूस वर्णाचा तरुण सैनिक नव्हे हे त्याच्या लक्षात आले. 43 तो दावीदला म्हणाला, “ही काठी कशाला? कुत्र्याला हाकलतात तसे मला हाकलणार आहेस की काय?” मग गल्याथने आपल्या दैवतांची नावे घेऊन दावीदला शिव्याशाप द्यायला सुरुवात केली. 44 दावीदला तो म्हणाला, “जवळ ये आज पक्ष्यांना आणि वन्य, प्राण्यांना तुझे मांस खाऊ घालतो.”
45 यावर दावीद त्या पलिष्टी गल्याथला म्हणाला, “तुझी तलवार, भाला-बरची यांच्या बळावर तू माझ्याकडे आला आहेस. पण मी मात्र इस्राएलच्या सैन्याच्या सर्व शक्तिमान परमेश्वराचे नाव घेऊन तुला सामोरा येत आहे. तू त्याला दूषणे दिली होतीस. 46 आज आमचा देव तुझा पराभव करील. मी तुला ठार करीन. तुझे मुंडके छाटीन आणि धड पशुपक्ष्यांना खायला टाकीन. सगळ्या पलिष्ट्यांची आम्ही अशीच अवस्था करुन टाकू. मग इस्राएलमधील परमेश्वराचे अस्तित्व सगळ्या जगाला कळेल. 47 लोकांचे रक्षण करायला परमेश्वराला तलवार, भाल्यांची गरज नसते हे इथे जमलेल्या सगळ्यांना कळून चुकेल. हे परमेश्वराचे युध्द आहे. तुम्हा पलिष्ट्यांच्या पराभव करायला देव आमचा पाठिराखा आहे.”
48 गल्याथ तेव्हा दावीदवर हल्ला करायला सरसावला. संथपणे तो जवळ जवळ सरकू लागला. तेव्हा दावीद चपळपणे त्याला सामोरा गेला.
49 थैलीतून एक दगड काढून गोफणीत घातला आणि गोफण फिरवली. त्याबरोबर गल्याथच्या दोन डोळ्यांच्या बरोबर मध्यभागी त्या दगडाचा नेम लागला. कपाळात दगड घुसला आणि गल्याथ जमिनीवर पालथा पडला.
50 अशा प्रकारे निवळ गोफण धोंड्याच्या साहाय्याने त्याने पलिष्ट्याला ठार केले. दावीदकडे तलवार नव्हती. 51 चपळाईने तो गल्याथच्या बाजूला जाऊन उभा राहिला. गल्याथचीच तलवार म्यानातून काढून त्याने त्याचे शिर धडावेगळे केले. पलिष्ट्याचा वध शेवटी असा झाला.
आपला खंदा वीर गतप्राण झाल्याचे पाहताच इतर पलिष्टे पळून गेले. 52 तेव्हा यहूदा आणि इस्राएलच्या सैनिकांनी गर्जना करत त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. गथच्या वेशीपर्यंत तसेच एक्रोनाच्या दिंडीदरवाजापर्यंत ते पाठलाग करत गेले. अनेक पलिष्ट्यांना त्यांनी ठार केले. शारईमच्या वाटेवर थेट गथ आणि एक्रोनपर्यंत त्यांचे मृतदेह विखुरलेले होते. 53 या पाठलागानंतर इस्राएल लोक पलिष्ट्यांच्या छावणीवर आले आणि छावणी लुटली.
54 दावीदाने या पलिष्ट्याचे शिर यरुशलेमला आणले आणि त्याची शस्त्रास्त्रे आपल्या तंबूत ठेवली.
शौलाला दावीदची धास्ती
55 शौलाने दावीदाला गल्याथाशी लढायला जाताना पाहिले आणि आबनेर या आपल्या सेनापतीला विचारले, “हा तरुण कोणाचा मुलगा?”
आबनेर म्हणाला, “मला काहीच कल्यना नाही, धनी.”
56 शौल राजा म्हणाला, “याच्या वडीलांचा ठावाठिकाणा शोधून काढा.”
57 गल्याथाला ठार करुन परत आल्यावर दावीदाला आबनेर ने शौलकडे नेले. गल्याथाचे मुंडके अजूनही दावीदाच्या हातातच होते.
58 शौलने त्याला विचारले, “तरुण मुला तुझे वडील कोण आहेत?”
दाविद म्हणाला, “बेथलहेम येथील आपला दास इशाय यांचा मी मुलगा.”
15 आपण जे आत्मिकरीत्या सशक्त आहोत त्या आपण आपणाला सुखी न करता अशक्तांच्या दुर्बलतेचा भार वाहिला पाहिजे. 2 आपल्यापैकी प्रत्येकाने त्याच्या शेजाऱ्याला त्यांच्याकरिता व त्यांची उन्रती व्हावी या हेतूने सुखी करावे. 3 ख्रिस्ताने सुद्धा स्वतःला सुखी केले नाही. याउलट पवित्र शास्त्रात लिहिले आहे. “तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेली निंदा माझ्यावर आली आहे.” [a] 4 आता पवित्र शास्त्रत पूर्वी जे लिहिले होते ते आपल्या शिक्षणाकरिता लिहिले होते यासाठी की, शास्त्रापासून मिळणारे उतेजन आणि धीर यांची आपण आशा धरावी म्हणून शिकवितो. 5 आणि देव जो धीराचा आणि उतेजनाचा उगम आहे, तो तुम्ही ख्रिस्त येशूच्या उदाहरणाप्रमाणे एकमेकांबरोबर एकमताने राहावे असे करावे. 6 म्हणजे तुम्ही सर्व जण एक मुखाने देव जो आपला प्रभु येशू ख्रिस्ताचा पिता याला गौरव द्यावे. 7 म्हणून ख्रिस्ताने देवाच्य गौरवासाठी तुम्हाल स्वीकारले. तसे तुम्ही एकमेकांचा स्वीकार व स्वागत करा. 8 मी तुम्हांस सांगतो देवाच्या सत्यतेसाठी ख्रिस्त सुंती लोकांचा, यहूदी लोकांचा सेवक झाला यासाठी की पूर्वजांना दिलेली वचने निश्चित व्हावीत. 9 यासाठी की यहूदीतर लोक देवाने त्यांच्यावर दाखविलेल्या दयेबद्दल गौरव करतील, पवित्र शास्त्रात लिहिले आहे:
“म्हणून विदेशी लोकांमध्ये मी तुझे उपकार मानीन.
आणि तुझ्या नावाची स्तुति करीन.” (A)
10 आणि पुन्हा शाश्त्र असे म्हणते,
“विदेशी लोकांनो, देवाच्या निवडलेल्या लोकांबरोबर आनंद करा.” (B)
11 आणि पुन्हा शास्त्र असे म्हणते
“अहो सर्व विदेशी लोकांनो, प्रभूचे स्तवन करा
आणि सर्व लोक त्याची स्तुति करोत.” (C)
12 यशयासुद्धा असे म्हणतो,
“इशायाचे मूळ प्रगट होईल,
ते राष्ट्रावर राज्य करावयास उत्पन्र होईल.
ती राष्ट्रे त्याच्यावर आपला विश्वास ठेवतील.” (D)
13 देव जो सर्व आशेचा उगम, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हांला तो आनंदाने व शांतीने भरो, यासाठी की, तुम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आशेत विपुल व्हावे.
पौल त्याच्या कामाविषयी बोलतो
14 माझ्या बंधूंनो, मी तुम्हांविषयी निश्चित आहे की, तुम्ही चांगुलपणाने, ज्ञानाने पूर्ण भरलेले व एकमेकांस बोध करावयास समर्थ आहात. 15 परंतु तुम्हांला धीटपणे काही गोष्टींची आठवण देण्यासाठी लिहिले आहे. मी हे देवाने दिलेल्या देणगीमुळे असे केले. 16 ते हे की, विदेशी लोकांची सेवा करण्यासाठी मी ख्रिस्त येशूचा सेवक व्हावे व देवाच्या सुवार्तेचे याजकपण करावे, अशासाठी परराष्ट्रीय हे देवाला मान्य, पवित्र आत्म्याचे समर्पित असे व्हावे.
17 तर मग मी जो आता ख्रिस्त येशूमध्ये आहे तो देवाशी संबंधित असलेल्या गोष्टींत अभिमान बाळगतो. 18 कारण माझ्या शब्दांनी आणि कृत्यांनी विदेशी लोकांनी आज्ञापालन करावे अशा ज्या गोष्टी ख्रिस्ताने माझ्या करवी घडविल्या नाहीत, त्या सांगणयाचे धैर्य मी करणार नाही. 19 अदभुते, चमत्काराच्या व देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने मी यरुशलेमेपासून इल्लूरिकमाच्या सभोवती ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्याचे पूर्ण केले आहे. 20 जेथे ख्रिस्ताचे नाव सांगितले जात नाही अशा ठिकाणी सुवार्ता सांगण्याची माझी आकांक्षा आहे. यासाठी की मी दुसऱ्याच्या पायावर बांधु नये. 21 परंतु असे लिहिले आहे,
“ज्यांना त्याचे वर्तमान आले नाही ते ऐकतील
आणि ऐकले नाही ते समजतील.” (E)
Paul’s Plan to Visit Rome
22 या कारणांमुळे मला तुमच्याकडे येण्यास पुष्कळ वेळा अडथळा झाला.
23 परंतु ज्या अर्थी मला या प्रांतात एकही ठिकाण राहीले नाही, व पुष्कळ वर्षांपासून तुम्हांला भेटण्याची माझी इच्छा आहे. 24 जेव्हा मी स्पेनला जाईल तेव्हा तुम्हांला भेटण्याचा विचार करीत आहे व तुमच्याविषयी माझे मन भरल्यावर माझ्या त्या प्रवासात तुम्ही मला मदत कराल अशी आशा आहे.
25 पण मी यरुशलेमातील संतांच्या सेवेसाठी जात आहे. 26 कारण मासेदोनिया आणि अखिया येथील मंडळ्यांनी यरुशलेमेतील गरीब संत जनांना मदत करण्याचे ठरविले आहे. 27 ते त्यांचे ऋणी आहेत. व त्यांनी हे करण्याचे ठरविले आहे, कारण जर यहूदीतरांना इस्राएलाच्या आशीर्वादात भागी मिळाली आहे, तर त्यांनी त्यांच्या ऐहिक गरजा भागवून त्यांची सेवा करावी. 28 मग हे काम संपवून त्याचे फळ सुरक्षितपणे त्याच्या हाती सोपविल्यावर जेव्हा मी स्पेनला जाण्यासाठी निघेन, तेव्हा मी त्या मार्गाने जात असता तुमच्या शहरातून जाईन. 29 आणि मला माहीत आहे की, मी जेव्हा तुमच्याकडे येईन तेव्हा ख्रिस्ताच्या पूर्ण आशीर्वादाने भरलेला असा येईन.
30 बंधूंनो, आपल्या प्रभु येशू ख्रिस्तामुळे आणि आत्म्याकडून जे प्रेम आपणांकडे येते त्यामुळे माझ्या वतीने, माझ्याबरोबर देवाजवळ आग्रहाने प्रार्थना करण्याची विनंति करतो. 31 यासाठी की यहूदीयात जे अविश्वासू आहेत त्यांच्यापासून माझी सुटका व्हावी आणि यरुशलेमेतील मंडळीतील माझी सेवा संताना मान्या व्हावी. 32 यासाठी की, देवाच्या इच्छेने मी तुम्हांकडे आनंदाने यावे आणि तुम्हांबरोबर ताजेतवाने व्हावे. 33 शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.
देवाने यरुशलेमचा नाश केला
2 परमेश्वराने सियोनकन्येला कसे अभ्राच्छादित केले आहे पाहा!
त्याने इस्राएलचे वौभन धुळीला मिळविले.
कोपाच्या दिवशी, इस्राएल आपले पायाखालचे आसन आहे.
ह्याची परमेश्वराने आठवण ठेवली नाही.
2 परमेश्वराने अजिबात दया न
दाखविता याकोबच्या घरांचा नाश केला.
संतापाच्या भरात त्याने
यहूदाकन्येच्या गडांचा नाश केला.
देवाने यहूदाचे राज्य व राज्यकर्ते धुळीला मिळविले.
त्याने यहूदाच्या राज्याचा विध्वंस केला.
3 परमेश्वर रागावला आणि त्याने इस्राएलाची
सर्व शक्ती नष्ट केली.
शत्रू येताच त्याने आपला उजवा हात इस्राएलापासून काढून घेतला.
सर्वत्र पेट घेणाऱ्या ज्वालेप्रमाणे तो याकोबमध्ये पेटला.
4 शत्रूप्रमाणे परमेश्वराने धनुष्याला बाण लावला.
त्याने स्वतःची तलवार उजव्या हातात धरली.
यहूदाचा शत्रू असल्याप्रमाणे देवाने यहूदातील देखण्या पुरुषांना ठार केले.
सियोनच्या तंबूवर परमेश्वराने आपला राग ओकला.
5 परमेश्वर शत्रूप्रमाणे वागला.
त्याने इस्राएल गिळले.
त्याने तेथील सर्व राजवाडे, गड गिळंकृत केली.
यहूदाच्या कन्येमधे त्याने मृतासाठी खूप शोक आक्रंदन निर्माण केले.
6 बाग उपटून टाकावी,
तसा परमेश्वराने आपला स्वतःचा तंबू उखडला.
त्याची उपासना करण्यासाठी लोक जेथे जमत,
ती जागा त्याने नष्ट केली.
परमेश्वराने सण [a] व शब्बाथ दिवस हग्रंचा विसर पाडला आहे.
परमेश्वर रागावला व त्याने राजा व याजक यांना दूर लोटले.
7 परमेश्वर आपली वेदी व
उपासनेचे पवित्रस्थान नापसंत केले.
यरुशलेमच्या राजवाड्याच्या भिंती
त्याने शत्रूला जमीनदोस्त करु दिल्या.
परमेश्वराच्या मंदिरात शत्रूने जयघोष केला.
पर्वणीचा दिवस असल्याप्रमाणे त्यांनी गोंगाट केला.
8 सियोनकन्येची तटबंदी नष्ट
करण्याचा परमेश्वराने बेत केला.
तट कोठे फोडायचा हे दाखविण्यासाठी ओळंब्याने त्याने खूण केली.
नाश थांबविण्यासाठी त्यांने स्वतःने काही केले नाही.
म्हणून त्याने सर्व तटांना शोक करण्यास भाग पाडले.
त्या सर्व ओस पडल्या.
9 यरुशलेमची द्वारे जमीनदोस्त झाली आहेत.
परमेश्वराने द्वारांचे अडसर मोडूनतोडून नष्ट केले.
तिचे राजे व राजपुत्र इतर राष्ट्रांत आहेत.
तेथे त्यांना परमेश्वराविषयक शिकवण मिळत नाही.
यरुशलेमच्या संदेष्ठ्यांनासुध्दा परमेश्वराकडून दृष्टान्त मिळत नाहीत.
10 सियोनेची वडिल धारी मंडळी अगदी मूकपणे धुळीत बसते.
ते डोक्यात माती भरून घेतात.
ते गोणपाटाचे कपडे घालतात.
यरुशलेमच्या तरुणी दु:खाने मान खाली घालून बसतात.
11 रडून रडून माझे डोळे थकले आहेत.
माझे अंतःकरण अस्वस्थ झाले आहे.
माझे हृदय जमिनीवर टाकल्याप्रमाणे तळमळत आहे.
कारण माझ्या लोकांचा नाश झाला आहे.
मुले आणि तान्ही मूर्छित पडत आहेत.
सार्वजनिक चौकांत ती मूर्छित पडत आहेत.
12 ती मुले त्यांच्या आयांना म्हणतात,
“भाकर आणि द्राक्षारस कोठे आहे?”
मरतानाही ते हाच प्रश्न विचारतात, आणि आपल्या आईच्या मांडीवरच प्राण सोडतात
13 सियोनच्या कुमारी कन्ये, मी तुझी तुलना कोणाशी करू शकतो?
कशाबरोबर मी तुझी तुलना करू हे सियोनच्या कुमारी कन्ये?
मी तुझे सांत्वन कसे करू?
तुझा नाश समुद्राप्रमाणे प्रचंड आहे.
तुला कोणी बरे करु शकेल
असे मला वाटत नाही.
14 तुझ्या संदेष्ट्यांनी तुझ्यासाठी दृष्टान्त पाहिले.
पण त्यांचे दृष्टान्त म्हणजे निरर्थक व मुर्खपणाचे होते.
तुझ्या पापाबद्दल
त्यांनी उपदेश केला नाही.
त्यांनी स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला नाही.
पण त्यांनी खोटे संदेश देऊन तुला मूर्ख बनविले.
15 रस्त्यावरून जाणारे
तुला पाहून हादरतात व हळहळतात.
यरुशलेमच्या कन्येकडे बघून
ते चुकचुकतात. ते विचारतात,
“लोक जिला ‘सौंदर्यपूर्ण नगरी’
अथवा ‘पृथ्वीवरचा आनंद म्हणतात,
ती नगरी हीच का?’”
16 तुझे सर्व शत्रू तुला हसतात.
ते तुझ्याकडे पाहून फूत्कार टाकतात आणि दातओठ खातात
ते म्हणतात, “आम्ही त्यांना गिळले आहे.
आम्ही खरोखरच ह्या दिवसाची वाट पाहात होतो.
अखेर तो उजाडला.”
17 देवाने ठरविल्याप्रमाणे केले.
तो जे करीन म्हणाला होता, तसेच त्याने केले.
फार पूर्वी त्याने जी आज्ञा केली होती.
ती त्याने पूर्ण केली.
त्याने नाश केला व त्याला दया आली नाही.
तुझ्याबाबतीत जे घडले, ते पाहून तुझ्या शत्रूंना आनंद झाला.
हा आनंद त्यांना देवाने मिळवून दिला.
देवाने तुझ्या शत्रूंना सामर्थ्यशाली बनविले.
18 मनापासून परमेश्वराचा धावा करा.
सियोनकन्येच्या तटबंदी,
तू रात्रंदिवस झऱ्याप्रमाणे अश्रू ढाळ,
थांबू नकोस!
तुझे डोळे कोरडे पडू देऊ नकोस.
19 ऊठ! रात्री आक्रोश कर.
रात्रीच्या प्रत्येक प्रहराच्या आरंभाला रड.
आपण पाणी ओततो.
तसे मन मोकळे कर.
परमेश्वरापुढे मन मोकळे कर.
परमेश्वरापुढे हात जोड.
तुज्या मुलांच्या प्राणरक्षणासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना कर.
कारण तुझी मुले उपासमारीने मूर्छित पडत आहेत.
नगराच्या रस्त्या-रस्त्यावर ती बेशुध्द होऊन पडत आहेत.
20 परमेश्वरा, माझ्याकडे बघ!
तू अशा रीतीने जिला वागविलेस ती कोण आहे ते तरी पाहा!
मला तुला एक प्रश्न विचारू दे: स्त्रियांनी पोटच्या मुलांना, खावे काय?
ज्या मुलांची त्यांनी काळजी काळजी घेतली त्यांना स्त्रियांनी खावे काय?
परमेश्वराच्या मंदिरात धर्मगुरु व संदेष्टे मारले जावेत का?
21 नगरीच्या रस्त्यांवर तरुण तरुणी आणि वृध्द पडले आहेत.
माझ्या तरुण तलवारीने मृत्यू पावल्या आहेत.
परमेश्वरा, तू कोपलास त्या दिवशी,
अजिबात दया न दाखविता तू त्यांना मारलेस!
22 तू माझ्या सर्व बाजूंनी दहशत निर्माण केलीस.
मेजवानीला एखाद्याला आमंत्रण द्यावे त्याप्रमाणे तू दहशतीला आमंत्रण दिलेस.
परमेश्वराच्या कोपाच्या दिवशी कोणीही सुटला नाही.
मी ज्यांना जन्म दिला व ज्यांचे लालनपासन केले.
त्यांना माझ्या शत्रूने ठार केले.
33 चांगले लोकहो! परमेश्वरापाशी आंनद व्यक्त करा.
न्यायी लोकांनो त्याची स्तुती करा.
2 वीणा वाजवून परमेश्वराचे स्तवन करा.
दहा तारांच्या वीणेवर परमेश्वराचे गुणगान गा.
3 त्याच्यासाठी नवे गाणे गा.
आनंदी होउन चांगल्या रीतीने वाजवा.
4 देवाचा शब्द खरा असतो तो जे काही करतो
त्यावर तुम्ही विसंबून राहू शकता.
5 देवाला चांगलुपणा आणि न्यायी वृत्ती आवडते.
परमेश्वराने पृथ्वी त्याच्या प्रेमाने भरुन टाकली.
6 परमेश्वराने आज्ञा केली आणि जगाची निर्मिती झाली
देवाच्या तोंडातल्या श्वासाने पृथ्वीवरील सर्व गोष्टी निर्माण झाल्या.
7 देवाने समुद्रातील पाणी एका ठिकाणी आणले.
तो समुद्राला त्याच्या जागेवर ठेवतो.
8 पृथ्वीवरील प्रत्येकाने परमेश्वराची भीती बाळगली पाहिजे
आणि त्याला मान दिला पाहिजे या जगात राहणाऱ्या प्रत्येकाने त्याला भ्यायला पाहिजे.
9 का? देव फक्त आज्ञा करतो आणि त्याप्रमाणे गोष्टी घडतात.
आणि त्याने जर “थांब” म्हटले तर ती गोष्ट थांबते.
10 राष्ट्रांचा उपदेश कवडी मोलाचा आहे
तो त्यांच्या सगळ्या योजनांचा नाश करु शकतो.
11 परंतु परमेश्वराचा उपदेश सदैव चांगला असतो
त्याच्या योजना पिढ्यानपिढ्या चांगल्या असतात.
12 ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते लोक सुखी आहेत.
देवाने त्यांची विशेष माणसं म्हणून निवड केली.
13 परमेश्वराने स्वर्गातून खाली पाहिले.
त्याला सर्व लोक दिसले.
14 त्याने त्याच्या सिंहासनावरुन
पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांकडे पाहिले.
15 देवाने प्रत्येकाचे मन निर्माण केले.
प्रत्येक जण काय विचार करतो ते देवाला माहीत असते.
16 राजा त्याच्या स्वःतच्या सामर्थ्याने सुरक्षित राहू शकत नाही.
शूर सैनिक त्याच्या स्वःतच्या शक्तीमुळे सुरक्षित राहू शकत नाही.
17 घोडे युध्दात विजय मिळवू शकत नाहीत.
त्यांची शक्ती तुम्हाला पळून जायला मदत करु शकत नाही.
18 परमेश्वर त्याच्या भक्तांवर नजर ठेवतो आणि त्यांची काळजी घेतो.
जे लोक त्याची भक्ती करतात त्यांचे तो रक्षण करतो.
19 देव त्यांना मरणापासून वाचवतो ते भुकेले असतील
तेव्हा त्यांना तो शक्ती देतो.
20 म्हणून आपण परमेश्वरासाठी थांबू.
तो आपली मदत आणि ढाल आहे.
21 देव आपल्याला आनंदी करतो.
आम्ही त्याच्या पवित्र नावावर खरोखरच विश्वास ठेवतो.
22 परमेश्वरा, आम्ही मनापासून तुझी उपासना करतो
म्हणून तू तुझे महान प्रेम आम्हाला दाखव.
2006 by World Bible Translation Center