Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 शमुवेल 16

शमुवेल बेथलहेमला जातो

16 परमेश्वर शमुवेलला म्हणाला, “शौलसाठी तू किती दिवस शोक करत बसणार आहेस? राजा म्हणून मी त्याला झिडकारले तरी तू त्याच्याबद्दल वाईट वाटून घेत आहेस? आपल्या शिंगात तेल भरुन घे आणि बेथलहेमला जायला नीघ. तुला मी इशाय नावाच्या माणसाकडे पाठवतो. इशाय बेथलहेमला राहतो. त्याच्या एका मुलाची मी राजा म्हणून निवड केली आहे.”

तेव्हा शमुवेल म्हणाला, “मी कसा जाऊ? ही गोष्ट शौलाने ऐकली तर तो माझा जीव घ्यायचा प्रयत्न करील.”

परमेश्वर त्यावर त्याला म्हणाला, “तू बेथलहेमला जायला नीघ, बरोबर एक वासरु घे. ‘मी परमेश्वराला यज्ञ करायला चाललो आहे’ असे म्हण. इशायला यज्ञासाठी बोलाव. मग मी काय करायचे ते सांगीन. मी सांगेन त्या व्यक्तीला अभिषेक कर.”

शमुवेलने मग परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे केले. तो बेथलहेम येथे आला. तेव्हा तेथील वडीलधाऱ्यांना धास्ती वाटली. ते शमुवेलला भेटले. “आपली ही सलोख्याचीच भेट आहे ना”, असे त्यांनी शमुवेलला विचारले.

शमुवेल म्हणाला, “होय, मी स्नेहभावाने आलो आहे. मला परमेश्वरासाठी यज्ञ करायचा आहे. तयारीला लागा आणि माझ्याबरोबर यज्ञासाठी या.” शमुवेलने इशायला व त्याच्या मुलांना तयार केले. त्यांनाही यज्ञात आमंत्रित करुन त्यात भाग घ्यायला सांगितले.

इशाय आणि त्याची मुले आली तेव्हा शमुवेलने अलियाबला पाहिले. शमुवेलला वाटले, “हाच तो परमेश्वराने निवडलेला माणूस!”

तेव्हा परमेश्वर शमुवेलला म्हणाला, “अलियाब उंचापुरा आणि देखणा आहे. पण रुपावर जाऊ नको. परमेश्वराची नजर माणसांसारखी नसते. तुम्ही बाह्यरुपाला भाळता पण परमेश्वर अंतरंग पाहतो. अलियाब ही योग्य व्यक्ती नव्हे.”

मग इशायने आपला दुसरा मुलगा अबीनादाब याला बोलावले. तो शमुवेल समोरुन गेला. शमुवेल म्हणाला, “हीही परमेश्वराची निवड नव्हे.”

मग इशायने शम्माला शमुवेलच्या समोर यायला सांगितले. तेव्हाही शमुवेल म्हणाला, “हाही तो नव्हे.”

10 इशायने आपल्या सातही मुलांना शमुवेल पुढे हजर केले. पण शमुवेल म्हणाला, “यापैकी कोणालाही परमेश्वराने निवडलेले नाही.”

11 त्याने पुढे इशायला विचारले, “इथे तुझी सगळी मुलं हजर आहेत ना?”

इशाय म्हणाला, “नाही आणखी एक आहे सगळ्यात धाकटा तो रानात मेंढरे राखायला गेला आहे.”

शमुवेल म्हणाला, “त्याला बोलावणे पाठवून इथे आण. तो येईपर्यंत आपण जेवायला सुरुवात करयाची नाही.”

12 इशायने मग कोणालातरी पाठवून आपल्या धाकट्या मुलाला यायला सांगितले. तो अतिशय देखणा, तांबूस वर्णाचा तरुण होता.

परमेश्वर आता शमुवेलला म्हणाला, “ऊठ आणि याला अभिषेक कर. हाच तो.”

13 शमुवेलने आपले तेलाने भरलेले शिंग उचलले आणि इशायच्या या धाकट्या मुलावर सर्व भावंडांसमोर त्या खास तेलाने अभिषेक केला. तेथून पुढे दावीदवर परमेश्वराच्या आत्म्याचा जोरदार संचार होऊ लागला. एवढे झाल्यावर शमुवेल रामा येथे परतला.

शौलाला दुष्ट आत्म्याचा त्रास

14 इकडे परमेश्वराच्या आत्म्याने शौलाची साथ सोडली. परमेश्वराने पाठवलेला एक दुरात्मा त्याला त्रस्त करु लागला. 15 शौलचे नोकर त्याला म्हणाले “हा परमेश्वराकडचा दुरात्मा तुम्हाला त्रास देत आहे. 16 आम्हाला आज्ञा द्या आम्ही कोणी चांगला वीणा वाजवणारा शोधतो. तुम्ही त्या दुरात्म्याने त्रस्त व्हाल तेव्हा हा वादक वीणा वाजवेल. म्हणजे तो दुष्ट आत्मा तुम्हाला सोडून जाईल आणि तुम्हाला बरे वाटेल.”

17 तेव्हा शौल आपल्या सेवकांना म्हणाला, “शोधा तर असा कुणीतरी आणि त्याला माझ्याकडे आणा.”

18 यावर एक चाकर म्हणाला, “इशाय नावाचा एक माणूस बेथलहेम येथे राहतो. त्याचा मुलगा मला माहीत आहे. त्याला वीणा वाजवता येते. तो चांगला लढवय्या सुध्दा आहे. तो तरतरीत, देखणा असून परमेश्वराची त्याला साथ आहे.”

19 तेव्हा शौलाने इशायकडे संदेश पाठवला. निरोप्यांनी इशायला सांगितले, “तुला दावीद म्हणून मुलगा आहे. तुझी मेंढरे तो राखतो. त्याला माझ्याकडे पाठव.”

20 तेव्हा इशायने शौलासाठी काही भेटवस्तू घेतल्या. एक गाढव. थोडी भाकरी, द्राक्षारसाचा एक बुधला आणि एक करडू या वस्तू दावीदजवळ देऊन त्याला शौलकडे पाठवले. 21 दावीद शौलकडे गेला आणि त्याच्या समोर उभा राहिला. शौलला तो फारच आवडला. दावीद त्याचा शस्त्रवाहक बनला.

22 शौलने इशायला निरोप पाठवला, “दावीदला माझा सेवक म्हणून इथेच राहू दे. त्याच्यावर माझा फार लोभ आहे.”

23 मग जेव्हा जेव्हा शौल दुरात्म्या मुळे हैराण होई तेव्हा तेव्हा दावीद वीणावादन करी. त्यामुळे दुरात्मा पळून जाऊन शौलला दिलासा मिळे.

रोमकरांस 14

इतर लोकांवर टीका करु नका

14 जो विश्वासात दुर्बल आहे त्याचा स्वीकार करा. पण मतभेदावरुन भांडणाच्या हेतूने नव्हे. एखाद्याचा विश्वास असा असतो की, तो सर्व गोष्टी खाऊ शकतो, परंतु दुर्बल मनुष्य भाजीच खातो. जो कोणत्याही प्रकारचे अन्र खातो त्याने जो काही विशिष्ट गोष्टी खात नाही, त्याला तुच्छ मानू नये. आणि जो काही विशिष्ट गोष्टी खातो त्याने त्याला दोष देऊ नये कारण देवाने त्याचा स्वीकार केला आहे. दुसऱ्याच्या नोकराला दोष लावणारा तू कोण आहेस? त्याच्या मालकाच्या दृष्टीने तो स्थिर राहील किंवा त्याचे पतन झाले असताही स्थिर राहील. कारण त्याला स्थिर करण्यास मालक समर्थ आहे.

एखादा मनुष्य एक दिवस दुसऱ्या दिवसापेक्षा अधिक मानतो परंतु दुसरा मनुष्य प्रत्येक दिवस सारखाच मानतो. प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खात्री करुन घ्यावी. जो विशेष दिवस पाळतो तो प्रभूचा मान राखण्यासाठी पाळतो आणि जो कोणत्याही प्रकारचे अन्र खातो तो प्रभूचा मान राखण्यासाठी खातो. विशिष्ट प्रकारचे अन्र खात नाही तो प्रभूचा मान ठेवण्यासाठी खात नाही. तो सुद्धा देवाचे आभार मानतो.

कारण कोणीही स्वतःसाठी जगत नाही, किंवा मरत नाही, जर आपण जगतो तर प्रभुचे लोक म्हणून जगतो आणि मरतो तर प्रभूचे लोक म्हणून मरतो. म्हणून जर आपण जगतो किंवा मरतो तर आपण प्रभूचे आहोत. ख्रिस्त मेला आणि जिवंत झाला यासाठी की त्याने जे आता मेलेले आहेत आणि जे अजूनही जिवंत आहेत त्या दोघांचा प्रभु व्हावे.

10 तेव्हा तू आपल्या बलवान भावाला दोष का लावतो? किंवा जो अशक्त आहे त्या भावाला तुच्छ का मानतोस? कारण आपण सर्व जण देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत. 11 असे लिहिले आहे की,

“प्रभु म्हणतो खात्रीने मी जिंवत आहे
    ‘प्रत्येक गुडघा माझ्यासमोर टेकला जाईल
    आणि प्रत्येक जीभ देवाचे उपकार मानील.’” (A)

12 म्हणून प्रत्येक जण आपापल्यासंबंधी देवाला हिशेब देईल.

इतरांना पाप करु देऊ नका

13 म्हणून आपण एकमेकांचा न्याय करण्याचे थांबवू या. तुम्ही असा निश्चय करावा की, तुम्ही आपल्या भावाच्या मार्गात पाप करण्यासाठी मोह किंवा अडखळण ठेवणार नाही. 14 मला माहीत आहे आणि मी जो प्रभु येशूमध्ये आहे त्या माझी खात्री झाली आहे की, जो पदार्थ खाण्यास अशुद्ध आहे असे समजतो त्याशिवाय कोणताही पदार्थ मूळचा अशुद्ध नाही. त्याच्यासाठी ते अशुद्ध आहे.

15 जर खाण्यामुळे तुझा भाऊ दु:खी झाला आहे तर तू प्रीतीने वागत नाहीस. ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्याचा तुझ्या अन्राने नाश करु नकोस. 16 म्हणून तुम्हांसाठी जे चांगले आहे त्याची निंदा होऊ नये. 17 खाणे पिणे यात देवाचे राज्या नाही. परंतु नीतिमत्व, शांति आणि आनंद, जो पवित्र आत्म्यात आहे त्यामध्ये आहे. 18 जो कोणी अशा प्रकारे जगून ख्रिस्ताची सेवा करतो तो देवाला आनंद देणारा आणि सर्व लोकांनी पसंत केलेला असा आहे.

19 तर मग आपण शांतीला आणि एकमेकांच्या वाढीला मदत करणाऱ्या गोष्टींच्या मागे लागावे. 20 तुम्ही खाता त्या अन्रामुळे देवाच्या कार्याचा नाश करु नका. सर्व गोष्टी शुद्ध आहेत. असंतोषाने खाणे मनुष्यासाठी चुकीचे आहे. 21 मांस न खाणे, द्राक्षारस न पिणे, तुझा भाऊ न अडखळेल असे करणे चांगले आहे.

22 तुझा जो विश्वास आहे तो देवासमोर तुझ्या ठायी असू दे. ज्याला योग्य आहे असे वाटते व त्यामुळे जो स्वतःचा द्वेष करीत नाही तो धन्य. 23 जर तो पुढे जाऊन आपण हे टाळावे असा विश्वास ठेवूनखातो तो देवासमोर दोषी ठरतो. कारण त्याची कृति विश्वासावर आधारित नाही, ते पाप आहे.

विलापगीत 1

यरुशलेम तिच्या नाशाबद्दल रडते

एके काळी काळी यरुशलेम लोकांनी गजबजलेली नगरी होती.
    पण आता ती अगदी ओसाड झाली आहे.
यरुशलेम जगातील मोठ्या नगरांमधील एक होती.
    पण आता ती वधवेप्रमाणे झाली आहे.
एके काळी ती नगरांमधील राजकुमारी होती.
    पण आता तिला दासी केले गेले आहे.
रात्री ती खूप दु:काने रडतेतिच्या गालांवर अश्रु ओघळतात.
    पण तिचे सांत्वन करणारे नाही.
खूप राष्ट्रांशी तिची मैत्री होती.
    पण आता तिचे दु:ख हलके करणारे कोणीही नाही.
तिच्या सर्व मित्रांनी तिच्याकडे पाठ फिरविली.
    तिचे मित्रच तिचे शत्रू झाले.
यहूदाने फार सोसले.
    नंतर यहूदाला कैद करून परमुलुखांत नेले गेले.
यहूदा इतर राष्ट्रंमध्ये जगते,
    पण तिला आराम मिळाला नाही.
तिचा पाठलाग करणाऱ्यांनी तिला पकडले.
    अरूंद दरीत त्यांनी तिला गाठले.
सियोनचे रस्ते दु:खी आहेतकारण आता पूर्वकाळासाठी
    कोणीही कधीही सियोनकडे येत नाही.
सियोनची सर्व दारे नष्ट केली गेली.
    तिचे याजक उसासे टाकतात.
तिच्या तरुणींना पकडून नेले आहे
    ह्य सर्वामुळे ती दु:खी कष्टी झाली आहे.
यरुशलेमच्या शत्रूंची जीत झाली आहे.
    त्यांना यश मिळाले आहे.
परमेश्वराने तिला शिक्षा केली म्हणून असे झाले.
    त्याने यरुशलेमच्या पापांबद्दल तिला शिक्षा केली.
तिची मुले दूर निघून गेली.
    त्यांचे शत्रू त्यांना पकडून घेऊन गेले.
सियोनकन्येचे सौंदर्य सरले.
    तिचे राजपुत्र हरणांसारखे झाले.
    चरण्यासाठी कुरण नसणाऱ्या हरणांसारखे ते झाले.
    ते हतबल होऊन पळाले.
    त्यांचा पाठलाग करणाऱ्यांपासून ते लांब पळाले.
यरुशलेम मागचा विचार करते.
यरुशलेमला ती दुखावली गेल्याची व बेघर झाल्याची आठवण आहे.
    पूर्वी तिच्याजवळ असलेल्या चांगल्या गोष्टींचे तिला स्मरण आहे.
तिच्या लोकांना शत्रूने पकडल्याचे तिला स्मरते तिला मदत करणारे
    कोणीही नव्हते हेही तिला आठवते.
तिचे शत्रू तिला पाहताच हसले.
    कारण तिचा नाश झाला
यरुशलेमने फार पाप केले.
    तिच्या पापांमुळेच ती भग्नावशेष उरली.
    लोकांनी पाहून चुकचुकावे असेच ते रूप होय.
पूर्वी लोकांनी तिचा आदर केला.
    पण आता तेच तिचा तिरस्कार करतात.
    त्यानी तिची निर्भर्त्सना केली
म्हमून ते आता तिची घृणा करतात.
    यरुशलेम आता कण्हत आहे.
ती तोंड फिरविते.
यरुशलेमची वस्त्रे मळीन झाली.
    तिच्यावर बितणाऱ्या गोष्टींची तिला कल्पना नव्हती.
तिचे पतन विस्मयकारक होते.
    तिचे सांत्वन करणारे कोणीही नव्हते.
“हे परमेश्वरा” ती म्हणते, “माझी दशा काय झाली आहे पाहा!
    माझा शत्रू त्याच्या मोठेपणाचा कसा तोरा मिळवितो आहे ते पाहा!”

10 शत्रूने हात लाबंवून तिच्या
    सर्व चांगल्या गोष्टी घेतल्या.
खरे तर, तिने परकीय राष्टांना तिच्या मंदिरात जाताना पाहिले.
    पण परमेश्वरा, तू तर म्हणालास की ते आपल्या समूहात येऊ शकणार नाहीत.
11 यरुशलेममधील सर्व लोक उसासे टाकत आहेत.
    ते अन्न शोधत आहेत.
    तो अन्नाच्या बदल्यात त्यांच्याजवळच्या चांगल्या वस्तू देऊन टाकत आहेत.
    जगण्यासाठी ते असे करीत आहेत.
यरुशलेम म्हणते, “परमेश्वरा, माझ्याकडे जरा पाहा!
    लोक माझा तिरस्कार कसा करतात ते बघ तरी!
12 रस्त्यावर जाणाऱ्या-येणाऱ्यांनो, तुम्हाला काहीच वाटत नाही असे दिसते!
    पण जरा माझ्याकडे निरखून पाहा.
माझ्या वेदनेप्रमाणे आणखी दुसऱ्या कोणाच्या विदना आहेत का?
    माझ्या वाठ्याला आलेल्या यातनांप्रमाणे दुसऱ्या काही यातना आहेत का?
परमेश्वराने शिक्षा म्हणून मला दिलेल्या विदनेप्रमाणे दुसऱ्या वेदना आहेत का?
    त्याच्या कोपाच्या दिवशी त्याने मला शिक्षा केली आहे.
13 परमेश्वराने वरून ज्वाला पाठविली,
    ती माझ्या हाडात भिनली.
त्याने माझ्या पायात फास अडकविला.
    आणि मला गरगर फिरविले.
त्याने मला ओसाड बनविले.
    मला दिवसभर बरे वाटत नसते.

14 “माझी पापे परमेश्वराने आपल्या स्वतःच्या
    हाताने जोखडाप्रमाणे जखडली आहेत.
परमेश्वराचे जोखड माझ्या मानेवर आहे.
    परमेश्वराने मला दुर्बळ केले.
ज्यांच्या समोर मी उभी राहू शकणार नाही,
    अशांच्या हाती परमश्वराने मला दिले आहे.
15 माझ्या शूर सैनिकांना परमेश्वराने दूर लोटले.
मग माझ्या विरुध्द लढण्यासाठी व माझ्या
    तरुण सैनिकांना मारण्यासाठी परमेश्वराने काही लोक आणले.
देवाने द्राक्षकुंडातील द्राक्षे तुडविली.
    ते द्राक्षकुंड यरुशलेमच्या कुमारी कन्येचे आहे.

16 “हग्र सगळयाबद्दल मी आक्रोश करते.
    माझ्या डोळयांतून अश्रू पाण्याप्रमाणे वाहात आहेत.
सांत्वन करायला माझ्याजवळ कोणी नाही.
    माझे दु:ख हलके करणारा कोणीही नाही.
माझी मुले ओसाड भूमीप्रमाणे झाली आहेत,
    कारण शत्रूचा विजय झाला आहे.”

17 सियोनने मदतीसाठी हात पसरले.
    तिला मदत करणारे कोणीही नव्हते.
परमेश्वराने याकोबाच्या शत्रूंना हुकूम केला आहे.
    परमेश्वराने याकोबच्या शत्रूंना नगराला वेढा देण्याची आज्ञा दिली.
यरुशलेम तिच्या शत्रूंमध्ये अपवित्र आहे.

18 आता यरुशलेम म्हणते, “मी परमेश्वराचे ऐकण्याचे नाकारले.
    म्हणून परमेश्वर जे करीत आहे.
ते योग्यच होय.
    तेव्हा सर्व लोकांनो, ऐका!
माझ्या यातना पाहा!
    माझे तरुण तरुणी कैदी झाले आहेत.
19 मी माझ्या प्रियकरांना हाका मारल्या पण त्यांनी मला फसविले.
    माझे पुजारी आणि वृध्द नगरीत वारले.
ते स्वतःसाठी अन्न शोधीत होते.
    त्यांना जगायचे होते.

20 “परमेश्वरा, माझ्याकडे पाहा!
    मी दु:खी झाले आहे.
माझे अंतःकरण अस्वस्थ झाले आहे
    माझ्या मनात खळबळ उडाली आहे.
असे होण्याचे कारण माझा हट्टी स्वभाव रस्त्यांवर
    माझी मुले तलवारीने मारण्यात आली.
तर घरा घरांत प्रत्यक्ष मृत्यू होता.

21 “माझे ऐका मी उसासे टाकीत आहे.
    माझे सांत्वन करणारा कोणीही नाही.
माझा त्रासाबद्दल माझ्या शत्रूंना कळले आहे.
    त्यांना आनंद झाला आहे.
    तू माझे असे केल्यामुळे ते आनंदित झाले आहेत.
तू म्हणालास की शिक्षेची वेळ येईल.
    व तू माझ्या शत्रूंना शिक्षा करशील.
आता म्हटल्याप्रमाणे कर.
    माझ्याप्रमाणेच त्यांची स्थिती होऊ दे.

22 “माझे शत्रू किती दुष्ट आहेत ते पाहा!
    मग माझ्या पापांमुळे तू माझ्याशी
    जसे वागलास तसाच तू त्यांच्याशी वागू शकशील.
तू असे कर कारण मी पुन्हा पुन्हा उसासत आहे.
    माझे हृदय म्लान झाले आहे म्हणून तरी असेच कर.”

स्तोत्रसंहिता 32

दावीदाचे एक स्तोत्र.

32 ज्याच्या अपराधांची क्षमा केली गेली
    आहे तो अत्यंत सुखी आहे
    ज्याचे अपराध पुसले गेले आहेत तो फार सुखी आहे.
परमेश्वर ज्याला निरपराध म्हणतो तो सुखी आहे.
    जो स्वत:चे गुप्त अपराध लपवीत नाही तो सुखी आहे.

देवा, मी पुन्हा पुन्हा तुझी प्रार्थना केली
    परंतु माझ्या गुप्त अपराधांची वाच्यता केली नाही
    प्रत्येक प्रार्थनेच्या वेळी मी क्षीण होत गेलो.
देवा, रात्रंदिवस तू माझे आयुष्य अधिक बिकट करीत गेलास,
    मी उष्ण उन्हाळी दिवसांतील जमिनीसारखा शुष्क होत गेलो.

परंतु नंतर मी परमेश्वरा पुढे माझे अपराध कबूल करण्याचा निर्णय घेतला.
    परमेश्वरा, मी तुला माझे अपराध सांगितले.
    आणि तू मला माझ्या सर्व अपराधांबद्दल क्षमा केलीस.
याच कारणासाठी देवा तुझ्या सर्व भक्तांनी तुझी प्रार्थना करायला हवी.
    संकटे जेव्हा महापुरासारखी येतात तेव्हा ती तुझ्या भक्तांपर्यंत नक्कीच जाणार नाहीत.
देवा, तू माझी लपण्याची जागा आहेस.
    तू माझे माझ्या संकटांपासून रक्षण करतोस
तू माझ्या भोवती कडे करतोस आणि माझे रक्षण करतोस
    म्हणून मी तू मला कसे वाचवलेस त्याचे गाणे गातो.
परमेश्वर म्हणतो, “मी तुला आयुष्य कसे जगायचे
    या विषयी मार्गदर्शन करीन.
    मी तुझे रक्षण करीन आणि तुझा मार्गदर्शक होईन.
म्हणून घोड्यासारखा वा गाढवासारखा मूर्ख होऊ नकोस, त्या प्राण्यांना आवरण्यासाठी लगाम वापरायलाच हवा.
    या गोष्टीशिवाय ते प्राणी तुमच्या जवळ येणार नाहीत.”

10 वाईट लोकांना खूप दु:ख भोगावे लागेल,
    परंतु जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांच्या भोवती देवाच्या खऱ्या प्रेमाचे कडे आहे.
11 चांगल्या लोकांनो! परमेश्वराच्या ठायी आपला आनंद व सुख व्यक्त करा.
    शुध्द मनाच्या सर्व लोकांनो आनंदी व्हा!

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center