Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 शमुवेल 13

शौलाची पहिली चूक

13 आता शौलाला राजा होऊन वर्ष झाले होते. इस्राएलवरील त्याच्या सत्तेला दोन वर्षे झाल्यावर [a] त्याने इस्राएलमधून तीन हजार माणसे निवडली. त्यापैकी दोन हजार मिखमाश येथे त्याच्या बरोबर बेथेलच्या डोंगराळ प्रदेशात राहिली. हजार जण योनाथान बरोबर बन्यामीनमधील गिबा येथे राहिले. सैन्यातील इतर सर्वांना त्याने घरोघरी पाठवले.

गिबा येथील छावणीतील पलिष्ट्यांच्या योनाथानने पराभव केला. ते पलिष्ट्यांच्या सेनापतीच्या कानावर गेले. ते म्हणाले, “इब्री लोकांनी बंड केले आहे.”

शौल म्हणाला, “नेमके काय घडले ते इब्रींना ऐकू द्या” आणि त्याने आपल्या लोकांना इस्राएलभर रणशिंग फुंकून ही बातमी सांगायला सांगितली. सर्व इस्राएलांच्या हे कानावर आले. त्यांना वाटले, “शौलने पलिष्ट्यांच्या नेत्याला मारले. तेव्हा पलिष्ट्यांना आता इस्राएलांबद्दल द्वेष वाटतो.”

सर्व इस्राएलांना गिलगाल येथे शौलजवळ एकत्र जमायचा निरोप गेला. इस्राएलांशी सामना करायला पलिष्टे ही सिध्द झाले. पलिष्ट्यांचा सेनासागर किनाऱ्यावर जेवढे वाळूचे कण असतील तेवढे सैनिक त्यांच्याकडे होते. सेनासागर विशाल होता. त्यांच्याकडे तीन हजार रथ [b] आणि सहा हजारांचे घोडदळ होते. त्यांनी बेथ-ओवनच्या पूर्वेला मिखमाश येथे तळ दिला.

आता आपण संकटात सापडले आहोत, पुरते पलिष्ट्यांच्या कचाट्यांत सापडलो आहोत हे इस्राएलांच्या लक्षात आले. ते गुहांमध्ये आणि खडकांच्या कपारीत लपून बसले. विवर, विहिरी यात त्यांनी आश्रय घेतला. काही तर यार्देन नदी पलीकडे गाद, गिलाद या प्रांतात पळाले. शौल या वेळी गिलगाल येथेच होता. त्याच्या सैन्याचा भीतीने थरकाप उडाला होता.

शमुवेलने गिलगाल येथे भेटतो असे शौलाला सांगितले होते. त्याप्रमाणे शौलाने सात दिवस त्याची वाट पाहिली. पण शमुवेल पोचला नाही. तेव्हा सैन्य शौलला सोडून जायला लागले. तेव्हा शौल म्हणाला, “होमार्पणे आणि शांत्यर्पणे आणून द्या.” ती आणल्यावर शौलाने यज्ञार्पणे केली. 10 त्याचे हे आटोपते आहे तोच शमुवेल तेथे पोचला. शौल त्याला भेटायला पुढे झाला.

11 शमुवेलने विचारले, “तू काय केलेस?”

शौल म्हणाला, “माझे सैन्य पांगले. तुम्हीही दिलेल्या वेळेत आला नाहीत. पलिष्ट्यांची सेना मिखमाश येथे जमली. 12 तेव्हा मी विचार केला, पलिष्टी इथे गिलगाल मध्ये येऊन माझ्यावर हल्ला करतील आणि मी तर अजून परमेश्वराला मदतीचे आवाहनही केले नाही. तेव्हा मी हे होमार्पण करण्याचे घाडस केले आहे.”

13 शमुवेल म्हणाला, “तुझा हा मूर्खपणा आहे. परमेश्वर तुझा देव याची आज्ञा तू पाळली नाहीस. त्याचे म्हणणे ऐकले असतेस तर इस्राएलवर तुझ्या वंशाचे राज्य निरंतर राहिले असते. 14 पण आता तुझे राज्य सतत राहाणार नाही. परमेश्वराला त्याचा शब्द मानणारा माणूस हवा आहे आणि तसा तो मिळाला आहे. तो आता नवा नेता बनेल. तू परमेश्वराची अवज्ञा केलीस म्हणून त्याने नवीन अधिपती नेमला आहे.” आणि शमुवेल गिलगाल सोडून चालता झाला.

मिखमाश येथे युद्ध

15 शौल आपल्या उर्वरित सैन्यासह गिलगाल सोडून बन्यामीन मधील गिबा येथे गेला. त्याने बरोबरची माणसे मोजली. ती जवळपास सहाशे भरली. 16 आपला मुलगा योनाथान आणि हे सैन्य यांसह तो गिबा येथे राहिला. मिखमाश येथे पलिष्ट्यांचा तळ होता. 17 त्यांनी त्या भागातील इस्राएल रहिवाश्यांना धडा शिकवायचे ठरवले आणि निवडक सैन्याने हल्ला सुरु केला. पलिष्ट्यांच्या सैन्याच्या तीन तुकडया होत्या. पहिली तुकडी उत्तरेला अफ्राच्या वाटेने शुवाल जवळ गेली. 18 दुसरी बेथ-होरोनच्या वाटेने आग्न्नेय दिशेला गेली आणि तिसरी टोळी वाळवंटाच्या दिशेला असलेल्या सबोईम दरी कडील वाटेने गेली.

19 इस्राएलमध्ये लोहार नव्हते. त्यामुळे त्यांना लोखंडाच्या वस्तू करता येत नसत. पलिष्ट्यांनीही त्यांना ही विद्या शिकवली नाही कारण ते लोखंडी भाले, तलवारी करतील ही त्यांना धास्ती होती. 20 पलिष्टी फक्त त्यांना धार लावून देत असत. तेव्हा इस्राएलांना फाळ, कुदळी, कुऱ्हाडी यांना धार लावायची असेल तेव्हा ते पलिष्ट्यांकडे जात. 21 फाळ आणि कुदळीला धार लावण्यासाठी पलिष्टी लोहार 1/3 औंस रुपे घेत तर कुऱ्हाडी, दाताळे, अरी, पराण्या यांना धार लावायचा आकार 1/6 औंस रुपे एवढा होता. 22 अशाप्रकारे युद्धाच्या दिवशी शौलच्या सैन्यातील एकाच्याही जवळ तलवार किंवा भाला नव्हता. शौल आणि त्याचा मुलगा योनाथान यांच्याजवळ तेवढी लोखंडी हत्यारे होती.

23 पलिष्टी सैन्याच्या एका तुकडीने मिखमाशची खिंड रोखून धरली होती.

रोमकरांस 11

देव त्याच्या लोकांना विसरला नाही

11 तर मग मी म्हणतो, “देवाने आपल्या लोकांना सोडून दिले आहे काय?” खात्रीने नाही! कारण मीही इस्राएली आहे. अब्राहामापासूनचा, बन्यामिन वंशातला. देवाला ज्यांचे पूर्वज्ञान होते त्या इस्राएली लोकांना त्याने सोडून दिले नाही. एलियासंबंधी पवित्र शास्त्र काय म्हणते ते तुम्हांस ठाऊक नाही काय? तो देवाजवळ इस्राएल लोकांविरुद्ध अशी विनंति करतो की, “हे प्रभु, त्यांनी तुझ्या भविष्यवाद्यांना ठार मारले आहे. त्यांनी तुझ्या वेद्या पाडून टाकल्या आहेत, तुझ्या संदेष्ट्यां पैकी मीच एकटा राहिलो आहे. आणि ते माझाही जीव घ्यावयास पाहतात.q परंतु त्याला देवाचे काय उत्तर मिळाले? देव म्हणतो. “ज्यांनी बालापुढे गुडघे टेकले नाहीत अशी सात हजार माणसे मी आपणासाठी राखून ठेवली आहेत.”r

त्याच प्रमाणे हल्ली देवाच्या कृपेच्या निवडीप्रमाणे काही शिल्लक राहिले आहेत. आणि जर तो देवाच्या कृपेचा परिणाम असेल तर तो लोकांच्या कर्माचा नाही. तर देवाची कृपा ही कृपाच राहत नाही.

तर मग काय? इस्राएल लोक जे मिळविण्याचा प्रयत्न करीत होते ते त्यांना मिळाले नाही. परंतु जे निवडलेले त्यांना मिळाले आणि बाकीचे कठीण झाले. पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे:

“देवाने त्यांना बधीरपणाचा आत्मा,” (A)

“पाहू न शकणारे डोळे ऐकू
    न शकणारे कान दिले
आणि आजपर्यंत हे असे चालूच आहे.” (B)

दाविद म्हणतो,

“त्यांचे मेज त्यांस सापळा आणि फास होवो.
    त्यांचे पतन होवो आणि त्यांना अपराधाबद्दल शिक्षा व प्रायश्चित मिळो.
10 दिसू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होवोत.
    आणि त्यांच्या कष्टाच्या ओझ्याखाली तू सर्वकाळ त्यांच्या पाठी वाकीव.” (C)

11 म्हणून मी असे म्हणतो, यहूद्यांचा नाश व्हावा म्हणून ते अडखळले नाहीत काय? खात्रीने नाही! त्यांच्या चुकीमुळे विदेशी लोकांना तारण प्राप्त व्हावे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये ईर्षा उत्पन्र व्हवी म्हणून असे झाले. 12 परंतु त्यांनी केलेल्या चुकीचा अर्थ जगास विपुलता आणि आमचा बोध उपदेश न ऐकल्याने त्यांच्या संख्येत झालेला न्हास याचा अर्थ यहूदीतरास विपुलता तर आमचा बोध स्वीकारल्याने त्यांचा समावेश झाल्यास किती तरी अधिक विपुलता येईल.

13 तर तुम्ही जे यहूदी नाही त्यांना मी निश्चितपणे सांगतो कारण मी यहूदीतरांसाठी प्रेषित आहे. मी माझ्या सेवेला मान देतो. 14 या आशेने की, माझ्या हाडामांसातल्यांना ईष्योवान करुन त्यांच्यातील काही जणांचे तारण करावे. 15 जर देवाने त्यांच्या केलेल्या अव्हेराचा परिणाम जगासाठी समेट झाला. तर देवाकडून स्वीकार याचा अर्थ मेलेल्यांतून जिवंत होणे, नाही का? 16 जर प्रथम भाग पवित्र आहे, तर संपूर्ण पिठाचा गोळा पवित्र आहे. जर झाडाचे मूळ पवित्र आहे तर फांद्यासुद्धा पवित्र आहेत.

17 परंतु काही डहाळ्या तोडून टाकण्यात आल्या आणि तुम्ही रानटी जैतून असता कलम करुन लावले गेलात व जैतूनाच्या पौष्टिक मुळाचे भागीदार झालात. 18 तर तुम्ही त्या तोडलेल्या फांद्यांहून मोठे आहात अशी बढाई मारु नका. लक्षात ठेवा, तुम्ही मुळाला आधार देत नाही, तर मूळ तुमचे पोषण करते. 19 आता तुम्ही म्हणाल, “होय, आमचे कलम व्हावे यासाठीच फांद्या तोडल्या होत्या.” 20 त्या त्यांच्या अविश्वासामुळे तोडून टाकण्यात आल्या हे खरे आहे परंतु तुम्ही तुमच्या विश्वासामुळे स्थिर आहात. यास्तव अभिमान बाळगू नका. तर भीति बाळगा. 21 कारण देवाने जर मूळ फांद्याही राखल्या नाहीत तर तो तुम्हांलाही राखणार नाही.

22 अशा प्रकारे तुम्ही देवाचा दयाळूपणा आणि कठोरताही पाहा. जे पतन पावले आहेत त्यांच्याविषयी कठोरता परंतु देवाचा तुमच्याविषयीचा दयाळूपणा, जर तुम्ही त्याच्या दयेत राहिला नाहीत तर तुम्हांला झाडापासून छाटून टाकले जाईल. 23 आणि इस्राएल त्याच्या अविश्वासात राहीले नाही तर तेही कलम पुन्हा लावण्यात येईल. कारण देव त्यांना कलम म्हणून लावण्यास समर्थ आहे. 24 म्हणून तुम्ही जे निसर्गत; रानटी जैतुनांची फांदी म्हणून तोडले गेलात आणि निसर्गक्रम सोडून मशागत केलेल्या जैतुनाच्या झाडास कलम असे लावले गेलात तर किती सहजपणे मशागत केलेल्या जैतुनांच्या फांद्या त्या मूळच्या झाडात कलम केल्या जातील!

25 परंतु बंधूनो, तुम्ही आपल्या शहाणपणावर अवलंबून या रहस्याविषयी अजाण असावे असे मला वाटत नाही. इस्राएली लोकांत अंशतः कठीणपणा आला आहे आणि तो देवाच्या कुटुंबात विदेशी लोकांचा भरणा पूर्ण होईपर्यंत राहणार आहे. 26 आणि नंतर इस्राएलाचे राष्ट्र म्हणून तारण होईल, असे लिहीले आहे,

“मुक्त करणारा सीयोनातून येईल,
    तो याकोबाच्या घराण्यातून त्यांची सर्व अभक्ती दूर करील.
27 जेव्हा मी त्यांच्या पातकांची क्षमा करीन.
    तेव्हा त्यांच्याशी मी हा करार करीन.” (D)

28 जेथ पर्यंत सुवार्तेचा संबंध आहे ते तुमच्यामुळे शत्रू आहेत परंतु देवाच्या निवडीमुळे त्याने पूर्वजांना दिलेल्या वचनाप्रमाणे देव त्यांच्यावर प्रेम करतो. 29 कारण देवाने ज्यांना बोलाविले आहे आणि तो जे देतो त्याच्याविषयी कधीही आपले मत बदलत नाही. 30 कारण जसे तुम्ही पूर्वी देवाची आज्ञा पाळत नव्हता, परंतु आता तुम्हांला त्यांच्या आज्ञाभंगामुळे देवाची दया मिळाली आहे. 31 त्याचप्रमाणे तेही आता आज्ञा मोडणारे झाले आहेत, यासाठी की त्यांना आता देवाची कृपा मिळावी. 32 कारण देवाने सर्व लोकांना आज्ञाभंगाच्या तरुंगात कोंडले आहे, यासाठी की, त्याने त्यांच्यावर दया करावी.

देवाचे गौरव

33 देवाच्या बूद्धीची आणि ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे. त्याच्या निर्णय आणि त्याच्या मार्गाचा माग काढणे कठीण आहे. 34 पवित्र शास्त्र सांगते.

“प्रभूचे मन कोणाला माहीत आहे
    किंवा त्याचा सल्लागार कोण असेल?” (E)

35 “प्रथम कोणी काही त्याला दिले
    का यासाठी की त्याची परतफेड देवाने करावी?” (F)

36 कारण सर्व गोष्टी त्याने निर्माण केल्या आणि त्याच्या द्वारे अस्तित्वात आहेत. त्याला युगानुयुग गौरव असो, आमेन.

यिर्मया 50

बाबेलबद्दल संदेश

50 बाबेल व खास्दी ह्यांच्यासाठी परमेश्वराने पुढील संदेश दिला हा संदेश देवाने यिर्मयामार्फत दिला.

“सर्व राष्ट्रांत घोषणा कर!
    झेंडा उंच उभारुन संदेश दे.
माझा सगळा संदेश दे आणि सांग
    ‘बाबेल काबीज केला जाईल.
    बेल दैवताची फजिती होईल.
    मरदोख घाबरुन जाईल.
बाबेलच्या मूर्तींची विटंबना केली जाईल.
    त्या भयभीत होतील.’
उत्तरेकडचे राष्ट्र बाबेलवर चढाई करील.
    ते राष्ट्र बाबेलचे ओसाड वाळवंट करील.
तेथे कोणीही राहणार नाही.
    माणसे व प्राणी, दोघेही, तेथून पळ काढतील”
परमेश्वर म्हणतो, “त्या वेळी
    इस्राएलचे व यहूदाचे लोक एकत्र येतील.
ते एकत्र येऊन रडतील,
    आणि एकत्रितपणेच त्यांच्या परमेश्वर देवाचा शोध घेतील.
ते सियोनची वाट विचारतील,
    व ते त्या दिशेने चालायला सुरवात करतील.
लोक म्हणतील, ‘चला, आपण स्वतः परमेश्वराला जाऊन
    मिळू या, अखंड राहणारा एक करार करु या.
    आपण कधीही विसरणार नाही असा करार करु या.’

“माझे लोक चुकलेल्या मेंढराप्रमाणे आहेत.
    त्यांच्या मेंढपाळांनी (नेत्यांनी) त्यांना चुकीच्या मार्गाने नेले.
त्यांना डोंगर टेकड्यांतून भटकायला लावले.
    ते त्यांच्या विश्रांतीची जागा विसरले.
ज्यांना माझे लोक सापडले, त्यांनी त्यांना दुखवले,
    आणि ते शत्रू म्हणाले,
‘आम्ही काहीही चूक केली नाही.’
    त्या लोकांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले.
परमेश्वरच खरा त्यांचे विश्रांतिस्थान होता.
    त्यांच्या वडिलांनी परमेश्वर देवावरच विश्वास ठेवला.

“बाबेलपासून दूर पळा खास्द्यांची भूमी
    सोडा कळपाच्या पुढे चालणाऱ्या एडक्याप्रमाणे व्हा.
मी उत्तरेकडून खूप राष्ट्रांना एकत्र आणीन.
ते बाबेलविरुद्ध लढायला सज्ज होतील.
उत्तरेकडचे लोक बाबेल काबीज करतील.
ते बाबेलवर बाणांचा वर्षाव करतील.
ते बाण, युद्धावरुन रिकाम्या हाताने कधीच
    न परतणाऱ्या, सैनिकांप्रमाणे असतील.
10 शत्रू खास्द्यांची सर्व संपत्ती घेतील.
    सैनिक त्यांना पाहिजे ते लुटून नेतील.”
परमेश्वरानेच ह्या गोष्टी सांगितल्या.

11 “बाबेल, तू आनंदी व उल्हसित आहेस
    तू माझी भूमी घेतलीस.
धान्यात शिरलेल्या गायीप्रमाणे तू नाचतेस.
    तू आनंदाने घोड्याप्रमाणे खिंकाळतेस.
12 आता तुझी आई खजील होईल.
    तुला जन्म देणारी ओशाळवाणी होईल.
बाबेल सर्व राष्ट्रांत क्षुद्र ठरेल.
    ती म्हणजे ओसाड, निर्जन वाळवंट होईल.
13 परमेश्वर आपला क्रोध प्रकट करील,
    म्हणून तेथे कोणीही राहणार नाही.
    बाबेल संपूर्ण निर्जन होईल.
बाबेल जवळून जाणारा प्रत्येकजण भयभीत होईल.
    बाबेलचा असा वाईट रीतीने नाश झालेला पाहून ते हळहळतील.

14 “बाबेलविरुद्ध लढण्यास सज्ज व्हा.
    धनुर्धाऱ्यांनो बाबेलवर बाणांचा वर्षाव करा.
    त्यात कमतरता करु नका.
बाबेलने परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे.
15 बाबेलला वेढा घातलेल्या
    सैनिकांनो जयघोष करा.
बाबेलने शरणागती पत्करली आहे.
    तिची तटबंदी व बुरुज पाडले आहेत.
परमेश्वर त्यांना योग्य
    तीच शिक्षा करीत आहे.
तिच्या लायकीप्रमाणे,
    तुम्ही राष्ट्रांनी तिला शिक्षा द्यावी.
तिने जसे इतर राष्ट्रांशी वर्तन, केले, तसेच तिच्याशी करा.
16 बाबेलमधील लोकांना धान्य पेरु देऊ नका.
    त्यांना पीक काढू देऊ नका.
बाबेलच्या सैनिकांनी खूप कैद्यांना त्यांच्या शहरात आणले.
पण आता शत्रू सैनिक आले आहेत,
    त्यामुळे कैदी आपापल्या घरी परत जात आहेत.
ते आपल्या देशांकडे धाव घेत आहेत.

17 “सर्व देशभर पसरलेल्या मेंढ्यांच्या
    कळपाप्रमाणे इस्राएल आहे.
सिंहाने पाठलाग करुन दूर पळवून लावलेल्या मेंढराप्रमाणे इस्राएल आहे.
त्यांच्यावर प्रथम हल्ला करणारा
    सिंह म्हणजे अश्शूरचा राजा
आणि त्याची हाडे मोडणारा अखेरचा सिंह
    म्हणजे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर होय.”
18 म्हणून सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो,
“मी लवकरच बाबेलच्या राजाला व त्याच्या देशाला शिक्षा करीन.
    अश्शुरच्या राजाला केली तशीच बाबेलच्या राजाला मी शिक्षा करीन.

19 “मी इस्राएलला त्याच्या भूमीत परत आणीन.
    कर्मेलच्या डोंगरावर व बाशानच्या भूमीत
    वाढलेले धान्य तो खाईल व तृप्त होईल.
    एफ्राईम व गिलाद येथील टेकड्यांवर तो चरेल.”
20 परमेश्वर म्हणतो, “त्या वेळी, लोक, इस्राएलचे अपराध शोधण्याचे कसून प्रयत्न करतील.
    पण अपराध असणारच नाही.
लोक यहूदाची पापे शोधण्याचे प्रयत्न करतील.
    पण त्यांना एकही पाप सापडणार नाही.
का? कारण मी इस्राएलमधील व यहूदातील काही वाचलेल्या लोकांचे रक्षण करीन
आणि त्यांनी पाप केले असले तरी त्यांना क्षमा करीन.”

21 परमेश्वर म्हणतो, “मराथाईमवर हल्ला करा.
    पकोडच्या लोकांवर चढाई करा.
    त्यांच्यावर हल्ला करा.
    त्यांना ठार करा.
    त्यांचा संपूर्ण नाश करा.
    माझ्या आज्ञेप्रमाणे करा.

22 “युध्दाचा खणखणाट सर्व देशात ऐकू जाऊ शकेल.
    तो मोठ्या नाशाचा आवाज असेल.
23 बाबेलला
    ‘सर्व जगाचा हातोडा’ असे म्हटले गेले.
पण आता ‘हातोड्याचे’ तुकडे तुकडे झाले आहेत
    इतर राष्ट्रापेक्षा बाबेलचा सर्वाधिक नाश झाला आहे.
24 बाबेल, मी तुझ्यासाठी सापळा रचला,
    आणि तुला समजण्याआधीच तू पकडला गेलास.
तू परमेश्वराविरुद्ध लढलास,
    म्हणून तू सापडलास व पकडला गेलास.
25 परमेश्वराने आपले कोठार उघडले आहे.
    त्यांच्या क्रोधाची हत्यारे परमेश्वराने बाहेर आणली आहेत.
खास्द्यांच्या देशात सर्वशक्तिमान परमेश्वर देवाला
    काम करायचे असल्याने त्याने ती हत्यारे बाहेर काढली आहेत.

26 “दूरवरुन बाबेलवर चालून या.
    तिची धान्याची कोठारे फोडा.
बाबेलचा संपूर्ण नाश करा.
    कोणालाही जिवंत सोडू नका.
धान्याच्या राशीप्रमाणे प्रेतांच्या राशी घाला.
27 बाबेलमधल्या सर्व तरुण बैलांना (पुरुषांना) ठार करा.
    त्यांची कत्तल होऊ द्या.
त्यांच्या पराभवाची वेळ आली आहे.
    त्यांचे फार वाईट होईल.
    ही त्यांच्या शिक्षेची वेळ आहे.
28 लोक बाबेलमधून बाहेर धावत आहेत.
    ते त्या देशातून सुटका करुन घेत आहेत.
    ते सियोनला येत आहेत.
परमेश्वराच्या कृत्याबद्दल ते प्रत्येकाला सांगत आहेत.
    बाबेलला योग्य अशी शिक्षा परमेश्वर करीत असल्याबद्दल ते सांगत आहेत.
    बाबेलने परमेश्वराचे मंदिर उद्ध्वस्त केले म्हणून आता परमेश्वर बाबेलचा नाश करीत आहे.

29 “धनुर्धाऱ्यांना बोलवा.
    त्यांना बाबेलवर हल्ला करायला सांगा.
त्यांना शहराला वेढा घालायला सांगा.
    कोणालाही पळू देऊ नका.
तिने केलेल्या दुष्कृत्यांची परतफेड करा.
    तिने इतर राष्ट्रांशी जसे वर्तन केले, तसेच तिच्याशी करा.
बाबेलने परमेश्वराला मान दिला नाही.
    इस्राएलच्या पवित्र परमेश्वराशी तिने उध्दटपणा केला.
    म्हणून बाबेलला शिक्षा करा.
30 बाबेलच्या तरुणांना रस्त्यांत ठार केले जाईल.
    त्याच दिवशी तिचे सर्व सैनिक मरतील.”
परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.

31 “बाबेल, तू फार गर्विष्ठ आहेस,
    आणि मी तुझ्या विरुद्ध आहे”
    आमचा प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या गोष्टी सांगतो.
“मी तुझ्या विरुद्ध आहे,
    आणि तुझी शिक्षेची वेळ आली आहे.
32 गर्विष्ठ बाबेल अडखळून पडेल
    आणि तिला उठायला कोणीही मदत करणार नाही.
तिच्यातील गावांत मी आग लावीन.
    ती आग तिच्याभोवतालच्या प्रत्येकाला भस्मसात करील.”

33 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो,
“इस्राएल व यहूदा येथील लोक गुलाम झाले आहेत.
    शत्रूने त्यांना पकडून नेले व तो इस्राएलला सोडणार नाही.
34 पण परमेश्वर त्या लोकांना परत आणेल.
    त्याचे नाव आहे ‘सर्वशक्तिमान परमेश्वर देव’
तो समर्थपणे त्या लोकांचे रक्षण करील.
    त्यामुळे त्या देशाला विश्रांती मिळू शकेल.
पण बाबेलच्या लोकांना विश्रांती मिळणार नाही.”

35 देव म्हणतो,
“तलवारी, बाबेलवासीयांना ठार कर.
बाबेलमधील राजाच्या अधिकाऱ्यांना
    व ज्ञानी लोकांना ठार कर.
36 तलवारी, बाबेलच्या याजकांना आणि खोट्या संदेष्ट्यांना ठार मार,
    ते मूर्ख माणसांसारखे होतील.
बाबेलच्या सैनिकांना ठार मार,
    ते सैनिक भीतीने गर्भगळीत झाले आहेत.
37 तलवारी, बाबेलचे घोडे व रथ नष्ट कर.
दुसऱ्या देशांतून आणलेल्या भाडोत्री सैनिकांना मार.
    ते सैनिक अतिशय घाबरलेल्या स्त्रियांप्रमाणे भयभीत होतील.
तलवारी, बाबेलच्या संपत्तीचा नाश कर.
    ती संपत्ती लुटली जाईल.
38 तलवारी, बाबेलच्या पाण्याला झळ पोहोचव,
    तेथील सर्व पाणी सुकून जाईल.
बाबेलमध्ये पुष्कळ मूर्ती आहेत
    त्या मूर्ती बाबेलचे लोक मूर्ख असल्याचे दर्शवितात
    म्हणून त्या लोकांचे वाटोळे होईल.
39 पुन्हा कधीही बाबेलमध्ये मनुष्यवस्ती होणार नाही.
जंगली, कुत्रे, शहामृग, आणि वाळवंटातील इतर प्राणी तेथे राहतील.
    पण कोणीही मनुष्यप्राणी तेथे पुन्हा कधीही राहणार नाही.
40 देवाने सदोम, गमोरा आणि त्या भोवतालच्या गावांचा संपूर्ण नाश केला.
    ती ठिकाणे आता निर्जन झाली आहेत.
त्याचप्रमाणे, बाबेलमध्येही कोणी राहणार नाही,
    आणि तेथे कोणीही वस्ती करायला जाणार नाही.”

41 “पाहा! उत्तरेकडून लोक येत आहेत.
    ते एका शक्तिशाली राष्ट्रांतून येत आहेत.
सर्व जगातील पुष्कळ राजे एकत्र येत आहेत.
42 त्यांच्या सैन्यांजवळ धनुष्यबाण व भाले आहेत.
    ते सैनिक क्रूर आहेत.
    त्यांच्याजवळ दया नाही.
ते घोड्यांवर स्वार होऊन येतात.
    त्या घोड्यांच्या टापांचा आवाज समुद्राच्या गर्जनेप्रमाणे असतो.
ते आपापल्या जागा घेऊन लढाईसाठी उभे ठाकतात.
    बाबेल नगरावर हल्ला करण्यासाठी ते सज्ज आहेत.
43 बाबेलच्या राजाने ह्या सैन्याबद्दल ऐकले,
    आणि तो फारच घाबरला.
भीतीने त्याचे हातपाय गळून गेले.
    प्रसूती होणाऱ्या स्त्रीप्रमाणे त्याला कष्ट झाले.”

44 परमेश्वर म्हणतो, “कधीतरी, यार्देन नदीजवळच्या दाट झुडुपांतून सिंह येईल,
    व तो शेतांतील गोठ्यांमध्ये जाईल.
    मग सर्व गुरे दूर पळून जातील.
मी त्या सिंहासारखाच असेन.
    बाबेलच्या भूमीपासूनच मी बाबेलला हुसकून लावीन.
ह्यासाठी मी कोणाची निवड करावी बरे?
    कोणीही माझ्यासारखा नाही.
    मला आव्हान देणाराही कोणी नाही.
    म्हणून मीच हे करीन.
मला पळवून लावण्यास कोणीही मेंढपाळ येणार नाही.
    मी बाबेलच्या लोकांचा पाठलाग करीन.”

45 बाबेलसाठी परमेश्वराने काय
    बेत केला आहे तो ऐका.
खास्द्यांसाठी परमेश्वराने काय
    करायचे निश्र्चित केले आहे ते ऐका.
“बाबेलच्या कळपातील (लोकांतील) लहान मुलांना शत्रू फरपटत नेईल.
    मग बाबेलच्या कुरणांचा संपूर्ण नाश होईल.
    ह्या घटनेमुळे बाबेलला धक्का बसेल.
46 बाबेल पडेल,
    आणि त्यामुळे पृथ्वी हादरेल
राष्ट्रांतील लोक बाबेलचा आक्रोश ऐकतील.”

स्तोत्रसंहिता 28-29

दावीदाचे स्तोत्र.

28 परमेश्वरा, तू माझा खडक आहेस.
    मी तुला मदतीसाठी बोलवीत आहे.
    माझ्या प्रार्थनेला तुझे कान बंद करु नकोस.
तू जर माझ्या मदतीच्या हाकेला उत्तर दिले नाहीस
    तर मी थडग्यातल्या मेलेल्या माणसासारखा आहे असे लोकांना वाटेल.
परमेश्वरा, मी माझे बाहू उभारुन तुझ्या पवित्र जागेकडे तोंड करुन प्रार्थना करतो.
    मी तुला साद घालीन त्यावेळी
    माझे ऐक माझ्यावर दया दाखव.
परमेश्वरा, मी वाईट कृत्ये करणाऱ्या
    दुष्ट लोकांसारखा आहे असे मला वाटत नाही.
ते लोक त्यांच्या शेजाऱ्यांना “शांती” या शब्दाने अभिवादन करतात.
    परंतु मनात मात्र ते शेजाऱ्यांचे वाईटच चिंतीत असतात.
परमेश्वरा, ते लोक दुसऱ्यांचे वाईट करतात
    म्हणून त्यांचे वाईट होऊ दे.
    त्यांना त्यांच्या कर्माप्रमाणे शिक्षा कर.
वाईट लोकांना परमेश्वराची चांगली कृत्ये कळत नाहीत.
    नाही, त्यांना ते कळू शकत नाही.
    ते फक्त नाश करण्याचा प्रयत्न करतात.

परमेश्वराची स्तुती कर.
    त्याने माझी दयेसाठी केलेली प्रार्थना ऐकली.
परमेश्वर माझी शक्ती आहे. तो माझी ढाल आहे.
    मी त्याच्यावर विश्वास ठेवला व त्याने मला मदत केली.
मी खूप आनंदी आहे
    आणि मी त्याची स्तुती करणारी गाणी गातो.
परमेश्वर त्याने निवडलेल्या लोकांचे रक्षण करतो.
    परमेश्वर त्याला वाचवतो.
    परमेश्वर त्याची शक्ती आहे.

देवा, तुझ्या लोकांना वाचव
    जे तुझे आहेत त्यांना आशीर्वाद दे.
    त्यांना वाट दाखव व त्यांना सदैव क्षमा कर, त्यांना उचलून घे.

दावीदाचे स्तोत्र.

29 देवाच्या मुलांनो, परमेश्वराची स्तुती करा.
    त्याच्या गौरवाची व सामर्थ्याची स्तुती करा.
परमेश्वाराची स्तुती करा आणि त्याच्या नावाचा आदर करा.
    तुमच्या खास कपड्यात त्याची उपासना करा.
परमेश्वर समुद्रासमोर त्याचा आवाज चढवतो
    गौरवशाली देवाचा आवाज समुद्रावरील मेघ गर्जनेसारखा वाटतो.
परमेश्वराच्या आवाजातून त्याची शक्ती कळते.
    त्याचा आवाज त्याचे गौरव दाखवते.
परमेश्वराच्या आवाजामुळे खूप मोठा देवदारुवृक्ष तुकडे तुकडे होऊन पडतो.
    परमेश्वर लबोनानच्या देवदार वृक्षाचे तुकडे करतो.
परमेश्वर लबोनानचा थरकाप उडवतो, तो छोट्या वासराप्रमाणे नाचत आहे असे वाटते.
    सिर्योन थरथरतो तो छोट्या करड्या प्रमाणे उड्या मारत आहे असे वाटते.
परमेश्वराचा आवाज विजेच्या चकचकाटासहित आघात करतो.
परमेश्वराचा आवाज वाळवंटाला कंपित करतो
    कादेशचे वाळवंट परमेश्वराच्या आवाजाने हादरते.
परमेश्वराच्या आवाजाने हरणाला भीती वाटते तो जंगलांचा नाश करतो.
    परंतु त्याच्या राजवाड्यात लोक त्याच्या महानतेची स्तुती करतात.

10 महापुराच्यावेळी परमेश्वर राजा होता
    आणि परमेश्वरच राजा राहणार आहे.
11 परमेश्वर त्याच्या लोकांचे रक्षण करो.
    परमेश्वर त्याच्या माणसांना आशीर्वाद देवो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center