M’Cheyne Bible Reading Plan
शौल आपल्या वडीलांच्या गाढवांच्या शोधात
9 अबीएलचा मुलगा कीश हा बन्यामीन घराण्यातील एक ख्यातनाम गृहस्थ होता. अबीएलचे वडील सरोर, सरोरचे वडील बखोरथ आणि बखोरथचे वडील अफीया अशी ही परंपरा होती. 2 कीशाला शौल नावाचा मुलगा होता. हा देखणा आणि तरुण असून देखणेपणात आणि उंचीच्या बाबतीत इस्राएलात त्याच्याशी बरोबरी करणारे कोणीही नव्हते. प्रत्येक इस्राएल मनुष्य त्याच्या खांद्याला लागे.
3 एकदा कीशाची गाढवे वाट चुकली. तेव्हा कीश शौलाला म्हणाला, “नोकारांपैकी कोणाला तरी बरोबर घेऊन गाढवांचा शोध घे.” 4 शौल त्याप्रमाणे आपल्या वडीलांच्या गाढवांच्या शोधार्थ निघाला. एफ्राईमचा डोंगराळ प्रदेश, शलीशाच्या भोवतालचा प्रांत पालथा घातला तरी त्याला आणि त्याच्या नोकराला गाढवे सापडेनात. तेव्हा ते शालीम प्रांतात गेले. पण तिथेही शोध लागला नाही. म्हणून पुढे ते बन्यामीन प्रदेशातून हिंडले. पण गाढवे मिळाली नाहीतच.
5 शेवटी ते दोघे सूफ या नगराशी आले. तेव्हा शौल आपल्या नोकराला म्हणाला, “आता आपण परतीच्या वाटेला लागलेले बरे. कारण गाढवांचा विचार सोडून देऊन वडील आता आपल्याच चिंतेत पडतील.”
6 पण नोकर म्हणाला, “या गावात एक परमेश्वराचा माणूस संदेष्टा आहे. लोक त्याला मानतात. तो बोललेले खरे ठरते. तेव्हा आपण या गावात जाऊ. कदाचित् तो आपल्याला पुढचा मार्ग दाखवील.”
7 शौल म्हणाला, “तर मग आपण जाऊच या पण त्याला द्यायचे काय? त्याला देण्यासारखे तर आपल्याजवळ काहीच नाही. आपल्याजवळचे फराळाचे सुध्दा संपले. मग त्याला काय देणार?”
8 तेव्हा पुन्हा नोकाराने सांगितले, “माझ्याकडे थोडे पैसे [a] आहेत तेच आपण त्या परमेश्वराच्या माणसाला देऊ. मग तो आपल्याला पुढची वाट दाखवेल.”
9-11 शौंल नोकराला म्हणाला, “ठीक आहे, चल जाऊ.” आणि ते तिकडे निघाले. चढूण जात असताना वाटेत त्यांना पाण्याला चाललेल्या काही तरुण मुली भेटल्या. त्यांना त्यांनी संदेष्ट्याचा पत्ता विचारला.
12 तेव्हा त्या म्हणाल्या, “तो आत्ताच पुढे गेला आहे. लवकर पुढे जा. तो आजच या गावी आला आहे कारण लोक उच्च स्थानी शांत्यर्पण करणार आहेत. 13 पुढे गेल्यावर तुम्हाला तो दिसेल. घाई केलीत तर भोजनासाठी तो भक्ती स्थळापाशी पोचायच्या अगादेर तुम्ही त्याला भेटू शकाल. तो यज्ञाला आशीर्वाद देतो म्हणून तो तिथे पोहोंचे पर्यंत लोक जेवायला सुरुवात करत नाहीत. म्हणून लौकर जा.” पूर्वी कोणी असे परमेश्वराला प्रश्न विचारायला निघाले, “चला, संदेष्ट्याकडे जाऊ” असे म्हणत असत. कारण तेव्हा परमेश्वराच्या माणसाला संदेष्टा म्हणत.
14 तेव्हा शौल आणि त्याचा नोकर वर नगराच्या दिशेने जाऊ लागले. नगरात शिरतात तो त्यांना शमुवेल त्यांच्या दिशेने येताना दिसला. तो त्या यज्ञाच्या ठिकाणी जायला निघालाच होता.
15 आदल्या दिवशी परमेश्वराने शमुवेलला सांगितले होते, 16 “उद्या यावेळी मी तुझ्याकडे बन्यामीन घराण्यातील एकाला पाठवीन. त्याला तू अभिषेकपूर्वक इस्राएलवर राजा म्हणून नेम. पलिष्ट्यांपासून तो माझ्या लोकांना वाचवील. लोकांचे गाऱ्हाणे माझ्याकडे आले आहे. ते मी ऐकून घेतले आहे.”
17 शौल शमुवेलच्या दृष्टीस पडताक्षणीच परमेश्वर म्हणाला, “हाच तो मी सांगितलेला माणूस. तो माझ्या लोकांवर राज्य करील.”
18 शौलने शमुवेलला वेशीजवळ गाठले आणि तो म्हणाला, “संदेष्ट्यांचे घर कोठे आहे ते कृपा करुन मला सांगाल का?”
19 शमुवेल म्हणाला, “मीच तो, तू पुढे हो आणि भक्तीच्या ठिकाणी जा. तुम्ही दोघेजण आज माझ्याबरोबर भोजन करा. उद्या सकाळी मी तुझी रवानगी करीन. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन. 20 आणि तीन दिवसांपूर्वी हरवलेल्या त्या गाढवांची काळजी करु नकोस. ती सापडली आहेत. आता इस्राएलला तुझी गरज आहे. इस्राएलला तू आणि तुमच्या घराण्यातील सर्व हवे आहात.”
21 शौल म्हणाला, “मी बन्यामीन घराण्यातला आहे. आमचे घराणे इस्राएल मधले सर्वात लहान घराणे आहे आणि बन्यामीन घराण्यात आमचे कुटुंब सगळ्यात छोटे आहे. मग इस्राएलला मी कशासाठी हवा आहे बरे?”
22 शमुवेलने मग त्यांना आणि त्याच्या नोकराला भोजनाच्या ठिकाणी नेले. तेथे तीस एक लोकांना भोजनासाठी आणि यज्ञात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. शमुवेलने या दोघांना पंगतीतल्या मानाच्या ठिकाणी बसवले. 23 शमुवेल आचाऱ्याला म्हणाला, “मांसाचा मी तुला राखून ठेवायला सांगितलेला वाटा आण.”
24 आचाऱ्याने मांडीचा भाग आणून शौलाच्या पुढे ठेवला. शमुवेल म्हणाला, “तुझ्यासाठी मी हा राखून ठेवला आहे. या विशेष प्रसंगासाठी मी तो ठेवला होता. तो तू खा.” तेव्हा शौल शमुवेलच्या पंगतीला बसून जेवला.
25 भोजन आटोपल्यावर ते उपासना स्थळाहून खाली नगरात आले. शमुवेलाने शौलासाठी घराच्या गच्चीत बिछाना घातला. शौल तेथे झोपला.
26 दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे शमुवेलाने शौलाला जोरात हाक मारुन उठवले. तो म्हणाला, “ऊठ आता मी तुझी रवानगी करतो.” शौल उठला आणि शमुवेल बरोबर घराच्या बाहेर पडला.
27 शौल त्याचा नोकर आणि शमुवेल गावाच्या सीमेपाशी आले. तेव्हा शमुवेल शौलाला म्हणाला, “तुझ्या नोकराला पुढे व्हायला सांग तुझ्यासाठी परमेश्वराचा संदेश आहे.” तेव्हा नोकर पुढे चालू लागला.
विवाहावरुन उदाहरण
7 बंधूनो, तुम्हांस माहीत नाही काय? कारण नियमशास्त्र माहीत असलेल्या लोकांबरोबर मी बोलत आहे की, जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे, तोपर्यंत नियमशास्त्र त्याच्यावर सता चालविते. 2 कारण लग्न झालेली स्त्री जोपर्यंत तिचा पती जिवंत आहे तोपर्यंत ती नियमशास्त्राने त्याला बांधलेली असते, पण जर तिचा नवरा मेला तर ती पतीविषयीच्या नियमातून मोकळी होते. 3 म्हणून पती जिवंत असताना ती दुसन्याची झाली, तर तिला व्यभिचारिणी असे म्हणतील. पण जर तिचा पती मरण पावला तर ती लग्नाच्या नियमातून मुक्त होते आणि जरी ती दुसऱ्या पुरुषाची पत्नी झाली तरी ती व्यभिचारिणी होत नाही.
4 माझ्या बंधूनो, अशाच प्रकारे नियमशास्त्राप्रमाणे तुम्हांलाही ख्रिस्ताच्या शरीराद्वारे ठार मारण्यात आले यासाठी की तुम्ही दुसऱ्या पुरुषाचे, जो मेलेल्यातून उठविला गेला होता त्याचे व्हावे, यासाठी की देवाच्या सेवेसाठी आमचा वापर व्हावा. 5 कारण जेव्हा आम्ही आमच्या पापी मानवी स्वभावाप्रमाणे जगत होतो तेव्हा पापी वासना नियमशास्त्राच्या द्वारे मरणाला फळ देण्यासाठी आपल्या अवयवामध्ये कार्य करीत होत्या. 6 ज्या नियमशास्त्रामध्ये आम्ही कैदी झालो होतो त्यात आम्ही मेलेलो असल्याने आता आम्ही नियमशास्त्रापासून मुक्त आहोत तेव्हा आता आम्ही देव, आमचा प्रभु याची पवित्र शास्त्राच्या जुनेपणाप्रमाणे नव्हे तर आत्म्याच्या नवेपणाप्रमाणे सेवा करतो.
पापाविरुद्धची लढाई
7 तर मग आता आपण काय म्हणतो? नियमशास्त्र पाप आहे असे आम्ही म्हणावे काय? खात्रीने नाही! कारण नियमशास्त्रावाचून पाप काय आहे हे मला समजले नसते. खरोखर “लोभ धरु नको” असे नियमशास्त्राने सांगितले नसते तर लोभ म्हणजे काय हे मला माहीत झाले नसते. [a] 8 परंतु पापाने संधी साधली आणि मजमध्ये सर्व प्रकारचा लोभ भरला. कारण नियमशास्त्राशिवाय पाप मृतवत आहे. 9 एके काळी मी नियाशास्त्राशिवाय जगत होतो, परंतु जेव्हा नियमशास्त्र आले तेव्हा पाप संजीवित झाले. 10 आणि मी मरण पावलो, जी आज्ञा जीवन आणण्यासाठी योजण्यात आली होती तिचा परिणाम माझ्यासाठी मरण असा झाला. 11 कारण पापाने संधी साधली आणि त्या आज्ञेयोगे मला फसविले व तिच्याद्वारे ठार केले.
12 म्हणून आम्ही असा निष्कर्ष काढतो की, नियमशास्त्र पवित्र आहे आणि आज्ञा पवित्र, नीतिमान आणि उत्तम आहेत. 13 याचा अर्थ असा आहे का, की जे उत्तम होते ते माझ्यासाठी मरण होते काय? खात्रीने नाही! परंतु पाप हे पाप म्हणून ओळखले जावे म्हणून त्याने जे उत्तम त्याद्वारे मजमध्ये मरण निर्माण केले. यासाठी की, पाप त्या आज्ञेमुळे कमालीचे पापिष्ठ व्हावे.
मनुष्याच्या मनातील लढा
14 कारण आम्हांला माहीत आहे की, नियमशास्त्र आत्मिक आणि मी दैहिक मनुष्य आहे. मी गुलाम म्हणून पापांत शरणागत राहावे म्हणून विकलेला असा आहे. 15 मी काय करतो हे मला माहीत नाही कारण काय करायचे हे मला माहीत नाही. कारण ज्या गोष्टींचा मी द्वेष करतो, त्याच गोष्टी मी करतो. 16 आणि ज्या गोष्टी मला कराव्याशा वाटत नाही त्याच करतो तर नियमशास्त्र उत्तम आहे हे मान्य करतो. 17 परंतु खरे तर मी त्या करतो असे नव्हे तर माझ्या ठायी वसत असलेले पाप त्या गोष्टी करते. 18 होय, मला माहीत आहे की, जे चांगले आहे ते माझ्यामध्ये वसत नाही. 19 चांगले करण्याची माझ्या ठायी इच्छा आहे, परंतु तसे मी करीत नाही, त्याऐवजी जे फार वाईट व जे मला करावेसे वाटत नाही तेच करतो. 20 आणि ज्याअर्थी, ज्या गोष्टी मला कराव्याशा वाटत नाहीत त्या मी करतो, तेव्हा खरे तर त्या गोष्टी मी करतो असे नाही तर माझ्याठायी असणारे पाप त्या गोष्टी करते.
21 तर माझ्यामध्ये मला हा नियम आढळतो की, माझ्यातील मनुष्याला चांगले करावेसे वाटते पण वाईट ही एकच गोष्ट माझ्याबरोबर आहे. 22 माझ्या आत असलेला मनुष्य देवाच्या नियमशास्त्रामुळे आनंद करतो. 23 परंतु माझ्या अवयवात मला निराळाच नियम कार्य करताना दिसतो. तो माझ्या मनावर अमल करणाऱ्या नियमाबरोबर लढतो, आणि पापाने मजवर लादलेल्या नियमाचा, जो माझ्या शरीरात कार्य करतो, त्याचा कैदी करतो. 24 मी अत्यंत दु:खी मनुष्य आहे! मरणाधीन असलेल्या शरीरापासून मला कोण सोडवील? 25 परंतु आमचा प्रभु येशू ख्रिस्त याच्याद्वारे देवाचे आभार मानतो.
तर मग माझ्या मनाने मी देवाच्या नियमाचा गुलाम आहे. पण माझ्या पापी स्वभावाने मी पापाने माझ्यावर लादलेल्या नियमाचा गुलाम आहे.
राष्ट्रांसाठी परमेश्वराचा संदेश
46 यिर्मया या संदेष्ट्याला जो संदेश मिळाला, तो वेगवेगळ्या राष्ट्रांसाठी होता.
मिसरसाठी संदेश
2 हा संदेश मिसर देशासाठी आहे. फारो नखो ह्याच्या सैन्याविषयी हा संदेश आहे. नखो मिसरचा राजा होता. कर्कमीश शहराजवळ त्याच्या सैन्याचा पराभव झाला. कर्कंमीश फरात नदीच्या काठी आहे. योशीयाचा मुलगा योहयाकीम यहूदाचा राजा असताना त्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने फारो नखोच्या सैन्याचा कर्कमीश येथे पराभव केला. परमेश्वराचा मिसरला पुढीलप्रमाणे संदेश आहे:
3 “तुमच्या लहान मोठ्या ढाली तयार ठेवा.
लढण्यासाठी कूच करा
4 घोडे तयार ठेवा. सैनिकांनो,
घोड्यावर स्वार व्हा,
युद्धासाठी आपापल्या जागा धरा.
शिरस्त्राण घाला.
भाल्यांना धार करा.
चिलखत घाला.
5 हे मी काय पाहतो?
ते सैन्य भयभीत झाले आहे,
सैनिक दूर पळून जात आहेत
त्यांच्या शूर वीरांचा पराभव झाला आहे.
ते घाईने पळून जात आहेत.
ते मागे वळून पाहत नाहीत.
सगळीकडे धोका आहे.”
परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
6 “चपळ लोक दूर पळून जाऊ शकणार नाहीत.
बलवान सैनिक निसटू शकणार नाहीत.
ते सगळे अडखळून पडतील.
हे सगळे फरात नदीच्या उत्तरेस घडेल.
7 नील नदीप्रमाणे हा कोण येत आहे?
त्या मोठ्या, वेगवान नदीप्रमाणे कोण बरे येत आहे?
8 उसळणाऱ्या नील नदीप्रमाणे मिसर येत आहे.
प्रचंड, वेगवान नदीप्रमाणे तो येत आहे.
मिसर म्हणतो, ‘मी येऊन पृथ्वीला व्यापून टाकीन.
मी शहरे व त्यात राहणाऱ्या लोकांचा नाश करीन.’
9 घोडेस्वारांनो, चढाई करा.
सारथ्यांनो, रथ वेगाने हाका.
शूर सैनिकांनो, कूच करा.
कूश व फूट येथील सैनिकांनो, ढाली सांभाळा.
लूदच्या सैनिकांनो, धनुष्याचा उपयोग करा.
10 “पण त्या वेळी, आमच्या प्रभूचा, सर्वशक्तिमान परमेश्वराचाच जय होईल.
तो त्यांना योग्य ती शिक्षा करील.
परमेश्वराच्या शत्रूंना योग्य अशीच शिक्षा मिळेल.
सर्वनाश होईपर्यंत तलवार वार करील.
तलवारीला लागलेली रक्ताची तहान
भागेपर्यंत ती लोकांना ठार करील.
आमच्या प्रभूला, सर्वशक्तिमान परमेश्वराला बळी मिळावा म्हणून असे घडेल.
हा बळी म्हणजे फरात नदीच्या काठी उत्तरेच्या प्रदेशात असलेले मिसरचे सैन्य होय.
11 “मिसर, गिलादला जा आणि काही औषध मिळव.
तू खूप औषधे मिळवशील,
पण त्याचा उपयोग होणार नाही तू बरा होणार नाहीस.
12 इतर राष्ट्रे तुझा आक्रोश ऐकतील.
सर्व पृथ्वीवर तो ऐकू जाईल.
एक ‘शूर योद्धा’ दुसऱ्या ‘शूर योध्द्याला’ भिडेल.
आणि दोघेही ‘शूर योद्धे’ बरोबरच खाली पडतील.”
13 परमेश्वराने यिर्मया या संदेष्ट्याला जो संदेश दिला, तो मिसरवर स्वारी करुन येणाऱ्या बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरबद्दल होता.
14 “मिसरमध्ये ह्या संदेशाची घोषणा कर.
मिग्दोल, नोफ व तहपन्हेस येथे जाहीर कर
‘युद्धाला तयार व्हा.
का? कारण तुमच्या भोवतालचे लोक तलवारीने मारले जात आहेत.’
15 मिसर, तुझे बलवान सैनिक मारले जातील.
ते उभेच राहू शकणार नाहीत
कारण परमेश्वरच त्यांना खाली पाडेल.
16 ते पुन्हा पुन्हा धडपडतील.
ते एकमेकावर पडतील
ते म्हणतील, ‘उठा! आपण माघारी, आपल्या लोकांमध्ये जाऊ
या आपण माय भूमीला परत जाऊ.
या आपला शत्रू आपला पराभव करीत आहे.
आपण दूर गेलेच पाहिजे.’
17 त्यांच्या मायभूमीत, ते सैनिक म्हणतील,
‘मिसरचा राजा फारो म्हणजे नुसताच गाजावाजा आहे.
त्याच्या वैभवाचा काळ संपला आहे.’”
18 हा राजाकडून आलेला संदेश आहे.
तो राजा म्हणजे सर्वशक्तिमान परमेश्वरच होय.
“मी शपथपूर्वक वचन देतो
की सामर्थ्यवान नेता येईल.
तो ताबोर आणि समुद्राजवळील कर्मेल पर्वताप्रमाणे महान असेल.
19 मिसरच्या लोकांनो, गाशा गुंडाळा कैदेस तयार व्हा.
का? कारण नोफचा नाश होऊन ते निर्जन होईल.
त्या शहरांचा नाश केला जाईल.
ती निर्जन होतील.
20 “मिसर सुंदर गायीप्रमाणे आहे.
पण उत्तरेकडून एक गोमाशी तिला त्रास देण्यास येत आहे.
21 मिसरच्या सैन्यातील भाडोत्री सैनिक हे लठ्ठ वासराप्रमाणे आहेत.
ते पाठ फिरवून पळून जातील.
ते चढाईला समर्थपणे तोंड देणार नाहीत
त्यांच्या नाशाची वेळ येत आहे.
त्यांना लवकरच शिक्षा होईल.
22 मिसर, फूत्कारणाऱ्या
व निसटून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या सापाप्रमाणे आहे.
शत्रू जवळ जवळ येत आहे
आणि मिसरचे सैन्य पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहे.
शत्रू मिसरवर कुऱ्हाडीने हल्ला करतील.
ते लाकूडतोड्यां प्रमाणे असतील.”
23 परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो:
“ते मिसरचे जंगल (सैन्य) तोडून टाकतील
जंगलात (सैन्यात) खूप झाडे (सैनिक) आहेत.
पण ती सर्व तोडली जातील.
टोळापेक्षा तेथे जास्त सैनिक आहेत.
कोणीही मोजू शकणार नाही एवढे सैनिक येथे आहेत.
24 मिसरची स्थिती लज्जास्पद होईल.
उत्तरेचा शत्रू तिचा पराभव करील.”
25 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “लवकरच मी नोच्या आमोन देवतेला शिक्षा करीन. मी फारो, मिसर आणि तिचे दैवत यांनाही शिक्षा करीन. मी मिसरच्या राजाला सजा देईन आणि फारोवर अवलंबून असलेल्या लोकांना शिक्षा करीन. 26 मी ह्या सर्व लोकांचा त्यांच्या शत्रूंच्या हातून पराभव करीन. त्या शत्रूंची त्यांना मारण्याची इच्छा आहे. मी त्या लोकांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व त्याचे सेवक ह्यांच्या हवाली करीन.”
“फार पूर्वी, मिसरला, शांतता होती. ह्या संकटकाळानंतरही मिसरला शांतता नांदेल.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
उत्तर इस्राएलला संदेश
27 “याकोबा, माझ्या सेवका, घाबरु नकोस.
इस्राएला, भिऊ नकोस.
दुरच्या ठिकाणाहून मी तुला वाचवीन.
निरनिराळ्या देशांत कैदी म्हणून नेलेल्या तुझ्या मुलांचे मी रक्षण करीन.
याकोबाला पुन्हा शांतता व संरक्षण लाभेल.
कोणीही त्याला भीती दाखविणार नाही.”
28 परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो,
“याकोबा, माझ्या सेवका घाबरु नकोस.
मी तुझ्या पाठीशी आहे
मी तुला खूप निरनिराळ्या ठिकाणी पाठविले
पण मी तुझा संपूर्ण नाश करणार नाही.
इतर राष्ट्रांचा मात्र मी नाश करीन.
तुझ्या दुष्कृत्यांबद्दल तुला शिक्षा झालीच पाहिजे.
म्हणून तुझ्या शिक्षेतून मी तुला सूट देणार नाही.
मी तुला शिस्त लावीन हे खरे! पण ती न्याय्यपणाने लावीन.”
प्रमुख गायकासाठी “पहाटेचे हरिण” या सुरांवर बसवलेले दावीदाचे स्तोत्र.
22 माझ्या देवा, माझ्या देवा तू मला का सोडून गेलास?
तू इतका दूर आहेस की मला मदत करु शकणार नाहीस.
तू इतका दूर आहेस की मी मदतीसाठी मारलेल्या हाका तुला ऐकू येणार नाहीत.
2 माझ्या देवा, मी तुला दिवसा हाक मारली
परंतु तू उत्तर दिले नाहीस
आणि मी रात्रीही तुला हाका मारणे चालूच ठेवले.
3 देवा, पवित्र असा केवळ तूच आहेस
तू राजा म्हणून बसतोस तूच इस्राएलची प्रशांसा आहेस.
4 आमच्या पूर्वजांनी तुझ्यावर विश्वास ठेवला.
होय देवा, त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्यांना वाचवलेस.
5 देवा आमच्या पूर्वजांनी तुला मदतीसाठी बोलावले आणि त्यांची शत्रूंपासून सुटका झाली.
त्यांनी तुझ्यावर विश्वास टाकला पण त्यांची निराशा झाली नाही.
6 म्हणून मी कीटक आहे का?
मी मनुष्य नाही का?
लोकांना माझी लाज वाटते, लोक माझा तिरस्कार करतात.
7 माझ्याकडे जो बघतो तो माझा उपहास करतो.
ते त्यांचे डोके हलवतात आणि जीभ बाहेर काढून मला वेडावून दाखवतात.
8 ते मला म्हणतात “तू परमेश्वराला तुला मदत करायला सांग.
कदाचित् तो तुला मदत करेल.
तू जर त्याला इतका आवडत असशील तर कदाचित् तो तुझी सुटका करेल.”
9 देवा, हे सत्य आहे की मी ज्याच्यावर अवलंबून राहावे असा फक्त तूच आहेस.
मी जन्मल्यापासून तू माझी काळजी घेत आला आहेस.
मी माझ्या आईचे दूध पीत होतो तेव्हापासून तू मला आश्वासन दिले आहेस.
आणि माझे सांत्वन केले आहेस.
10 मी जन्माला आलो त्या दिवसापासून तू माझा देव आहेस
मी माझ्या आईच्या शरीरातून बाहेर आलो तेव्हापासून तू मला तुझ्या छत्राखाली आणले आहेस.
11 तेव्हा देवा मला सोडू नकोस, संकटे जवळ आली आहेत
आणि मला मदत करायला कोणीही नाही.
12 माझ्याभोवती लोक आहेत
ते बळकट बैलासारखे माझ्या चहू बाजूला आहेत.
13 प्राण्यांवर गुरगुर करणाऱ्या व त्यांना फाडणाऱ्या
सिंहासारखे त्यांचे तोंड उघडे आहे.
14 माझी शक्ती जमिनीवर सांडलेल्या
पाण्यासारखी नाहीशी झाली आहे,
माझी हाडे वेगवेगळी झाली आहेत
माझे धैर्यही नाहीसे झाले आहे.
15 फुटलेल्या खापरा प्रमाणे माझे तोंड सुकले आहे.
माझी जीभ टाळूला चिकटली आहे.
तू मला “मृत्यूच्या धुळीत” ठेवले आहेस.
16 “कुत्री” माझ्या भोवती आहेत
मला दुष्टांच्या घोळक्यांनी सापळ्यात पकडले आहे
सिंहाप्रमाणे त्यांनी माझ्या हातापायाला जखमा केल्या आहेत. [a]
17 मला माझी हाडे दिसू शकतात.
लोक माझ्याकडे टक लावून पाहतात
आणि पाहातच राहतात.
18 ते माझे कपडे त्यांच्यात वाटून टाकतात
आणि माझ्या लांब झग्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या [b] टाकल्या आहेत.
19 परमेश्वरा, मला सोडून जाऊ नकोस
तूच माझी शक्ती हो, लवकर ये आणि मला मदत कर.
20 परमेश्वरा माझे आयुष्य तलवारी पासून वाचव
माझे मौल्यवान आयुष्य त्या कुत्र्यांपासून वाचव.
21 सिंहाच्या जबड्यापासून माझे रक्षण कर.
बैलाच्या शिंगापासून माझे रक्षण कर. [c]
22 परमेश्वरा, मी माझ्या भावांना तुझ्याबद्दल सांगेन.
सभेत मी तुझे गुणगान गाईन.
23 जे लोक परमेश्वराची उपासना करतात त्यांनी त्याची स्तुतीही करावी.
इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराला मान द्या.
इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराची भीती बाळगा आणि त्याचा आदर करा.
24 का? कारण परमेश्वर संकटात सापडलेल्या गरीब लोकांना मदत करतो.
परमेश्वराला त्यांची लाज वाटत नाही.
परमेश्वर त्यांचा तिरस्कार करत नाही.
जर लोकांनी परमेश्वराला मदतीसाठी बोलावले तर तो त्यांच्यापासून लपून बसणार नाही.
25 परमेश्वरा, मोठ्या सभेतले माझे गुणगान तुझ्यापासूनच आले.
त्या सगळ्या भक्तांसमोर मी ज्या ज्या गोष्टींचे वचन दिले त्या सर्व मी करीन.
26 गरीब लोक खातील आणि समाधानी राहातील.
जे लोक परमेश्वराला शोधत आले, त्यांनी त्याची स्तुती करावी.
तुमचे ह्रदय सदैव आनंदी राहो.
27 दूरदूरच्या परदेशातील लोकांना परमेश्वराची आठवण येवो.
आणि ते परमेश्वराकडे परत येवोत.
सगळ्या परक्या देशांतील लोक परमेश्वराची उपासना करोत.
28 का? कारण परमेश्वरच राजा आहे
तो सगळ्या देशांवर राज्य करतो.
29 बलवान व निरोगी लोक भोजन करुन
देवापुढे नतमस्तक झाले आहेत.
तसं पाहिलं तर जे सर्व लोक मरणार आहेत
व जे आधीच मेलेले आहेत ते सर्वजण देवापुढे नतमस्तक होतील.
30 आणि भविष्यात आपले वंशज परमेश्वराची सेवा करतील.
लोक त्याच्याविषयी सर्वकाळ सांगत राहातील.
31 परमेश्वराने खरोखरच ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत
त्या विषयी प्रत्येक पिढी पुढच्या पिढीला सांगेल.
2006 by World Bible Translation Center