M’Cheyne Bible Reading Plan
उरलेल्या बन्यामीन पुरुषांच्या लग्नाचा प्रश्न
21 आपल्यापैकी कोणीही बन्यामीनांना आपल्या मुली द्यायच्या नाहीत अशी इस्राएल लोकांनी मिस्पा येथे प्रतिज्ञा केली होती.
2 इस्राएल लोक मग बेथेल येथे गेले. संध्याकाळपर्यंत ते तिथे परमेश्वरासमोर बसून राहिले. दु:खाने ते मोठमोठ्याने ओरडत होते. 3 ते म्हणाले, “परमेश्वरा. तूच आमचा इस्राएलांचा परमेश्वर आहेस. आमच्यावर हे भयंकर संकट का ओढवावे? आज आमच्यातला एक वंश का बरे नष्ट व्हावा?”
4 दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी एक वेदी बांधली आणि यज्ञार्पणे, शांति अर्पणे केली. 5 या मेळाव्याला हजर नाही असा इस्राएलांपैकी कुठला वंश आहे का अशी चौकशी त्यांनी सुरु केली. मिस्पा येथे या मेळाव्याला जे कोणी येणार नाहीत अशांचा वध केला जाईल अशी गंभीर प्रतिज्ञा त्यांनी केली होती म्हणून त्यांनी कसोशीने हा शोध सुरु केला.
6 आपल्या बन्यामीन बांधवांबद्दल त्यांना पुन्हा एकदा वाईट वाटले. ते म्हणाले, “इस्राएलांचा एक वंश आज जवळपास नष्ट झाला आहे. 7 बन्यामीनांना आपल्या मुली द्यायच्या नाहीत अशी आपण परमेश्वरासमोर प्रतिज्ञा केली आहे. मग उरलेल्या बन्यामीन पुरुषांची लग्रे व्हायची कशी?”
8 पुढे ते म्हणाले, “मिस्पा येथे आज इस्राएलाच्या कोणत्या वंशाची गैरहजेरी आहे? येथे जमलेल्यात एक कोणीतरी दिसत नाहीत एवढे खरे!” मग त्यांच्या लक्षात आले की याबेश-गिलाद या शहरातून कोणीही आलेले नाही. 9 त्यांनी सर्वांची मोजदाद करुन याबेश-गिलाद मधून कोणीही न आल्याची खात्री करुन घेतली. 10 आणि इस्राएल लोकांनी बाराहजारांचे सैन्य याबेश-गिलादवर पाठवले. त्यांनी सैन्याला हुकूम केला, “तेथे जा आणि प्रत्येकाला तलवारीने कापून काढा अगदी बायका मुलांना सुध्दा सोडू नका. 11 हे तुम्ही केलेच पाहिजे. त्यांच्यातील कोणीही पुरुष शिल्लक राहता कामा नये आणि अविवाहित कुमारिका वगळता सर्व स्त्रियांनाही ठार करा.” सैनिकांनी या आदेशाची अमलबजावणी केली. 12 या बाराहजार सैनिकांना याबेश-गिलादमध्ये चारशे तरुण कुमारिका आढळल्या त्यांना त्यांनी कनानातील शिलो येथील छावणीत आणले.
13 मग इस्राएल लोकांनी रिम्मोन खडकाजवळ राहात असलेल्या बन्यामीन लोकांना निरोप पाठवून शांतीचा संदेश दिला. 14 त्यामुळे ते इस्राएलमध्ये परत आले. इस्राएल लोकांनी याबेश-गिलादमधील मुलींशी त्यांची लग्ने लावून दिली. पण तरीही मुली कमीच पडल्या.
15 इतर वंशांपासून परमेश्वराने त्यांना अशाप्रकारे वेगळे केले म्हणून इस्राएल लोकांना या बन्यामीनांविषयी फारच वाईट वाटले. 16 इस्राएलच्या वडिलधाऱ्यांना वाटले, “बन्यामीनांच्या सर्व स्त्रिया तर मारल्या गेल्या मग आता या मागे राहिलेल्या काही बन्यामीनांची लग्ने व्हायची कशी? 17 त्यांचा वंश पुढे चालू राहिला पाहिजे. त्यांचे संसार पुढे चालू राहिले नाहीत तर हा इस्राएल लोकांचा वंशच खुंटेल. 18 पण आपण तर आपल्या मुलींची लग्ने त्यांच्याशी लावून देऊ शकत नाही ‘जो कोणी आपली मुलगी बन्यामीनाला देईल तो शापित असो’ अशी आपण शपथ वाहिली आहे. 19 यातून एक मार्ग आहे. शिलो नगरात दरवर्षी परमेश्वराचा उत्सव असतो. तो आता आलाच आहे.” (शिलोह हे नगर बेथेलच्या उत्तरेला, बेथेलहून शखेमकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पूर्वेला आणि लबोनाच्या दक्षिणेला वसलेले आहे.)
20 तेव्हा आपल्याला सुचलेली युक्ती वडिलधाऱ्यांनी बन्यामीन लोकांना सांगितली. ते म्हणाले, “तुम्ही द्राक्षमळ्यात लपून बसा. 21 या उत्सवात शिलोहच्या तरुण मुली नृत्य करायला येतील. तिकडे लक्ष ठेवा त्या आल्या की बाहेर पडा आणि यातील एकेकीला पळवा मग आपल्या प्रांतात जाऊन त्यांच्याशी लग्न करा. 22 यामुलींचे बाप किंवा भाऊ आमच्याकडे तक्रारी घेऊन येतील पण आम्ही म्हणू. ‘बन्यामीनांविषयी सहानुभूती बाळगा. करु द्या त्यांना लग्न. त्यांनी मुली नेल्या खऱ्या पण युध्द तर केले नाही आपल्याशी. शिवाय यात आपली शपथ मोडायचे पापही लागत नाही. कारण मुलींना त्यांनी आपणहून नेले. आम्ही मुली देणार नाही अशी तुमची प्रतिज्ञा होती. तिला धक्कालागलेला नाही. तुम्ही कोठे आपल्या मुलींची त्यांच्याशी लग्ने लावून दिलीत? बन्यामीनांनीच त्यांना तुमच्यातून उचलून नेले. तेव्हा तुमची शपथ मोडलेली नाही.’”
23 बन्यामीनांनी तात्काळ तसे केले. मुलींचे नृत्य चाललेले असताना प्रत्येकाने स्वतःसाठी एकेक मुलगी घेतली आणि आपल्या प्रांतात परतले. त्यांच्याशी लग्न केले. आपल्या प्रदेशात त्यांनी नगरे वसवली आणि तेथे ते राहू लागले. 24 मग इस्राएल लोकही आपापल्या प्रदेशात, कुळात, घरोघरी परतले.
25 त्या काळी त्यांच्यावर कोणी राजा राज्य करत नव्हता. त्यामुळे ज्याला जे योग्य वाटेल ते तो करी.
पौल कैसराची भेट घेऊ इच्छितो
25 मग त्या प्रांतात फेस्त आला. आणि तीन दिवसांनी तो कैसरीयाहून वर यरुशलेमला गेला. 2 मुख्य याजकांनी आणि यहूदी पुढाऱ्यांनी फेस्तच्या पुढे पौलावरील आरोप सादर केले. 3 आणि पौलाला यरुशलेमला पाठवून द्यावे, अशी त्याला विनंति केली. पौलाला वाटेत ठार मारण्याचा ते कट करीत होते. 4 फेस्तने उत्तर दिले, “पौल कैसरीया येथे बंदिवासात आहे आणि मी स्वतः लवकरच कैसरीयाला जाणार आहे. 5 तुमच्यातील काही पुढाऱ्यांनी माझ्याबरोबर तिकडे खाली यावे, आणि जर त्या मनुष्याने काही चूक केली असेल तर त्याच्यावर दोषारोप ठेवावा.”
6 त्यांच्याबरोबर आठ ते दहा दिवस घालविल्यानंतर फेस्त खाली कैसरीयाला परत गेला. दुसऱ्या दिवशी फेस्त न्यायालयात बसला आणि त्याने आपल्यासमोर पौलाला हजर करण्याचा आदेश दिला. 7 जेव्हा पौल तेथे हजर झाला, तेव्हा यरुशलेमहून तेथे आलेले यहूदी लोकही पौलाच्या सभोवती उभे राहिले, त्यांनी त्याच्यावर पुष्कळ गंभीर आरोप ठेवले, परंतु ते आरोप यहूदी लोक सिद्ध करु शकले नाहीत. 8 पौल आपला बचाव करण्यासाठी असे म्हणाला, “मी यहूदी लोकांच्या नियमशास्त्राच्या, मंदिराच्या किंवा कैसराच्या विरुद्ध काही गुन्हा केलेला नाही.”
9 फेस्तला यहूदी लोकांना खूष करायचे होते म्हणून तो पौलाला म्हणाला, “यरुशलेम येथे जाऊन माइयासमोर तुझी चौकशी व्हावी अशी तुझी इच्छा आहे काय?”
10 पौल म्हणाला, “मी आता कैसराच्या न्यायासनासमोर उभा असून त्याच्यासमोर माझा न्यायनिवाडा व्हावा, अशी माझी इच्छा आहे. मी यहूदी लोकांचा काहीही अपराध केलेला नाही, हे आपणांस चांगले माहीत आहे. 11 मी जर काही गुन्हा केला असेल तर मला मरणदंड झाला पाहिजे. आणि त्यापासून सुटका व्हावी असा प्रयत्न मी करणार नाही. परंतु जे आरोप हे लोक माझ्यावर करीत आहेत, ते खरे नसतील तर मला कोणी यांच्या हाती देऊ शकणार नाही, मी आपले गाऱ्हाणे कैसरासमोर मांडू इच्छितो.”
12 यावर फेस्तने आपल्या सभेशी सल्लामसलत केली. मग त्याने पौलाला सांगितले, “तू कैसरापुढे आपला न्यायनिवाडा व्हावा अशी इच्छा दाखविली आहे, म्हणून तुला कैसरासमोर पाठविण्यात येईल.”
हेरोद अग्रिप्पासमोर पौल
13 काही दिवसांनंतर फेस्ताचे स्वागत करण्याच्या हेतूने राजा अग्रिप्पा [a] आणि बर्णीका [b] कैसरीयाला येऊन त्याला भेटले. 14 ती दोघे तेथे बरेच दिवस राहिल्यावर फेस्तने पौलाचे प्रकरण राजाला समजावून सांगितले. तो म्हणाला, “फेलिक्सने तुरुंगात ठेवलेला एक कैदी येथे आहे. 15 जेव्हा मी यरुशलेम येथे होतो, तेव्हा यहूदी लोकांचा मुख्य याजक आणि वडीलजन यांनी त्याच्याविरुद्ध फिर्याद केली. आणि त्याला दोषी ठरवावे अशी मागणी केली. 16 वादी व प्रतिवादी यांना एकमेकांसमोर आणल्याशिवाय आणि आरोपीला आपला बचाव करण्याची संधि मिळेपर्यंत, त्याला इतरांकडे सोपविण्याची रोमी लोकांची रीत नाही. असे मी यहूदी लोकांना सांगितले.
17 “म्हणून ते जेव्हा माझ्याबरोबर येथे आले, तेव्हा मी उशीर न करता दुसऱ्याच दिवशी न्यायासनावर बसलो, आणि त्या मनुष्याला समोर आणण्याची आज्ञा केली. 18 त्याच्यावर आरोप करणारे जेव्हा त्याच्याविरुद्ध बोलण्यास उभे राहिले, तेव्हा माझ्या अपेक्षेप्रमाणे कसल्याही गुन्ह्याबाबत त्यांनी त्याच्यावर आरोप केले नाहीत. 19 उलट आपल्या धर्माविषयी आणि कोणा एका मनुष्याविषयी ज्याचे नाव येशू आहे, त्याच्यावरुन यहूदी लोकांनी त्या माणसाशी वाद केला. येशू हा जरी मेलेला असला, तरी पौलाचा असा दावा आहे की, येशू जिवंत आहे. 20 या प्रश्नाची चौकशी कशी करावी हे मला समजेना. तेव्हा त्या यहूदी मनुष्याविरुद्ध यहूदी लोकांचे जे आरोप आहेत, त्याबाबत त्याला यरुशलेम येथे नेऊन त्याचा न्याय केला जावा अशी त्याची इच्छा आहे काय, असे मी त्याला विचारले. 21 सम्राटाकडून आपल्या न्यायनिवाडा होईपर्यंत आपण कैदेत राहू असे जेव्हा पौल म्हणाला, तेव्हा मी आज्ञा केली की, कैसराकडे पाठविणे शक्य होईपर्यंत त्याला तुरुंगातच ठेवावे.”
22 यावर अग्रिप्पा फेस्तला म्हणाला, “मला स्वतःला या मनुष्याचे म्हणणे ऐकावेसे वाटते.”
फेस्तने त्याला उत्तर दिले, “उद्या त्याचे म्हणणे तुम्ही ऐकू शकाल.”
23 म्हणून दुसल्या दिवशी अग्रिप्पा आणि बर्णीका मोठ्या थाटामाटात आले, व लष्करी सरदार व शहरातील मुख्य नागरिकांसह दरबारात प्रवेश केला. तेव्हा फेस्तच्या आज्ञेनुसार पौलाला तेथे आणण्यात आले.
24 मग फेस्त म्हणाला, “राजे अग्रिप्पा महाराज आणि आमच्याबरोबर येथे उपस्थित असलेले सर्वजण, या मनुष्याला पाहा! याच्याच विषयी यरुशलेम व कैसरिया येथील सर्व यहूदी लोकांनी माइयाकडे अर्ज दिलेला आहे. याला जिवंत राहू देऊ नये, असा आकांत ते करतात. 25 परंतु याला मरणदंड द्यावा असे याने काहीही केले नाही, असे मला आढळून आले. आणि त्याने स्वतःच आपणांला सम्राटाकडून (कैसराकडून) न्याय मिळावा अशी मागणी केली, म्हणून मी त्याला कैसरासमोर न्यायासाठी पाठविण्याचे ठरविले आहे. 26 परंतु सम्राटाला याच्याविषयी निशिचत असे कळवावे, असे माइयाकडे काही नाही, म्हणून मी याला तुमच्यापुढे आणि विशेषतः राजा अग्रिप्पापुढे आणून उभे केले आहे. ते अशाकरिता की, या चौकशीनंतर मला या मनुष्याविषयी काहीतरी लिहिता यावे. 27 शेवटी एखाद्या कैद्याला कसलाही आरोप न ठेवता कैसराकडे पाठविणे मला योग्य वाटत नाही!”
रेखाबी घराण्याचे उत्तम उदाहरण
35 यहोयाकीम यहूदावर राज्य करीत असताना, यिर्मयाला देवाचा संदेश आला. यहोयाकीम हा योशीया राजाचा मुलगा होता. परमेश्वराकडून आलेला संदेश असा होता. 2 “यिर्मया, रेखाब्यांकडे जा त्यांना देवाच्या मंदिरातील एका बाजूच्या खोलीत बोलाव. त्यांना पिण्यास मद्य दे.”
3 म्हणून मी (यिर्मया) याजनाकडे गेलो. याजना हा यिर्मयाचा [a] मुलगा होता आणि यिर्मया हबसिन्याचा मुलगा होता. मी याजनाच्या सर्व भावांना व मुलांना आणि 4 रेखाबी कुटुंबीयांना एकत्र केले आणि त्यांना परमेश्वराच्या मंदिरात आणले. आम्ही सर्व हानानच्या मुलांच्या खोलीत गेलो. हानान हा इग्दल्याचा मुलगा होता व तो “देवाचा माणूस” होता. ही खोली यहूदाच्या राजपुत्रांच्या खोली शेजारी होती. द्वारपाळ मासेया याच्या खोलीच्या वर ही खोली होती. मंदिराचा द्वारपाळ मासेया हा शल्लूमचा मुलगा होता. 5 नंतर मी (यिर्मयाने) त्या रेखाबे कुटुंबीयांसमोर मद्य भरलेले वाडगे व पेले ठेवले. मी म्हणालो, “थोडे मद्य प्या”
6 पण ते म्हणाले, “आम्ही कधीच मद्य पीत नाही कारण आमचे पूर्वज रेखाब यांचा मुलगा योनादाब यांनी आम्हाला तशी आज्ञा दिली आहे ‘तुम्ही आणि तुमच्या वंशजांनी कधीही दारु घेऊ नये असे त्यांनी सांगितले आहे. 7 शिवाय त्यांनी असेही सांगितले आहे की तुम्ही कधीही घरे बांधू नका. बी पेरु नका वा द्राक्षमळे लावू नका. ह्यातील कोणतीच गोष्ट तुम्ही कधीही करु नका. तुम्ही फक्त तंबूतच राहिले पाहिजे. तुम्ही असे केलेत तरच स्थलांतर करीत तुम्ही ज्या जागी आला आहात, तेथे दीर्घ काळ राहाल.’ 8 आमचे पूर्वज योनादाब यांनी घालून दिलेले निर्बंध आम्ही रेखाबे घराण्यातील लोक पाळत आलो आहोत. आम्ही कधीच मद्य घेत नाही. आमच्या बायका वा मुलेमुलीही मद्य घेत नाहीत. 9 आम्ही आम्हाला राहण्यासाठी घरे बांधीत नाही. आमची स्वतःच्या मालकीची शेते वा द्राक्षमळे नाहीत. आम्ही कधीही शेती करीत नाही. 10 आम्ही फक्त तंबूत राहत आलो आणि आमचे पूर्वज योनादाब यांनी सांगितल्याप्रमाणे वागत आलो. 11 पण बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने यहूदावर हल्ला केल्यावर. आम्हाला यरुशलेमला जावेच लागले. आम्ही एकमेकांना म्हणालो, ‘चला, आपण यरुशलेमला गेलेच पाहिजे. तरच खास्द्यांच्या आणि अराम्यांच्या सैन्यापासून आपला बचाव होईल.’ म्हणून आम्ही यरुशलेममध्ये राहिलो.”
12 मग यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. 13 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “यहूदातील व यरुशलेममधील लोकांना हा संदेश ऐकव. तुम्ही लोकांनी धडा शिकावा व माझ्या संदेशाचे पालन करावे.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. 14 “रेखाबचा मुलगा योनादाब याने आपल्या मुलांना मद्य ‘पिऊ नका’ असे सांगितले आणि त्यांनी त्याचे ऐकले. आजपर्यंत त्यांच्या वंशजांनी आपल्या पूर्वजांच्या आज्ञेचे पालन केले. त्यांनी मद्य घेतले नाही. पण मी परमेश्वराने स्वतः तुम्हाला पुन्हा पुन्हा संदेश दिले, तरी यहूदाच्या लोकांनो, तुम्ही माझे ऐकले नाही. 15 इस्राएल आणि यहूदा येथील लोकांकडे मी माझे सेवक-संदेष्टे पाठविले. मी त्यांना तुमच्याकडे पुन्हा पुन्हा पाठविले. ते संदेष्टे म्हणाले ‘इस्राएल आणि यहूदा येथील प्रत्येक माणसाने दुष्कृत्ये करणे बंद करावे. तुम्ही चांगलेच असले पाहिजे. दुसऱ्या दैवतांना अनुसरु नका. त्यांची पूजा वा सेवा करु नका. तुम्ही माझे ऐकलेत, तर तुमच्या पूर्वजांना व तुम्हाला दिलेल्या देशात तुम्ही राहाल.’ पण तुम्ही माझ्या संदेशाकडे लक्ष दिले नाही. 16 योनादाबच्या वंशजांनी त्यांच्या पूर्वजांनी दिलेल्या आज्ञा पाळल्या. पण यहूदाच्या लोकांनी माझेही ऐकले नाही.”
17 म्हणून सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “मी सांगतो, यहूदाचे आणि यरुशलेमचे वाईट होईल. लवकरच मी त्यांचे वाईट करीन. मी त्या लोकांशी बोललो, पण त्यांनी ऐकण्याचे नाकारले. मी त्यांना हाका मारल्या, पण त्यांनी ओ दिली नाही.”
18 नंतर यिर्मया रेखाब कुटुंबीयांना म्हणाला, “सर्वशक्तिमान परमेश्वर इस्राएलचा देव असे म्हणतो ‘तुम्ही तुमचे पूर्वज योनादाब ह्यांच्या आज्ञा पाळल्यात. त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे वागलात, त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट केलीत. 19 म्हणून सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, रेखाबचा मुलगा योनादाब याच्या वंशजांपैकी एक नेहमीच माझ्या सेवेत राहील.’”
दावीदाने परमेश्वरापाशी गायलेले स्तोत्र हे स्तोत्र बन्यामीनी कुटुंबातील कुशाचा मुलगा शौल याच्या संबंधी आहे.
7 परमेश्वरा, माझ्या देवा, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
माझा पाठलाग करणाऱ्या लोकांपासून मला वाचव मला सोडव.
2 तू जर मला मदत केली नाहीस तर सिंहाच्या तावडीत सापडलेल्या एखाद्या प्राण्यासारखी माझी अवस्था होईल
मला दूर नेले जाईल आणि कुणीही मला वाचवू शकणार नाही.
3 परमेश्वर देवा मी काहीही चूक केलेली नाही.
मी चूक केली नसल्याबद्दल खात्रीपूर्वक सांगतो.
4 मी माझ्या मित्रांशी दुष्टावा केला नाही
आणि मी मित्रांच्या शत्रूंना मदतही केली नाही.
5 जर हे खरे नसेल तर मला शिक्षा कर.
शत्रू माझा पाठलाग करो, मला पकडो व मला मारो.
त्याला माझे जीवन जमिनीत तुडवूदे आणिमाझा जीव मातीत ढकलू दे.
6 परमेश्वरा ऊठ, आणि तुझा क्रोध दाखव माझा शत्रू रागावलेला आहे
म्हणून तू त्याच्या पुढे उभा राहा आणि त्याच्या विरुध्द् लढ.
परमेश्वरा ऊठ आणि न्यायाची मागणी कर.
7 परमेश्वरा लोकांचा निवाडा कर.
सगळे देश तुझ्याभोवती गोळा कर आणि लोकांचा निवाडा कर.
8 परमेश्वरा, माझा निवाडा कर.
मी बरोबर आहे हे
सिध्द् कर मी निरपराध आहे हे सिध्द् कर.
9 वाईटांना शिक्षा कर आणि चांगल्यांना मदत कर.
देवा तू चांगला आहेस आणि तू लोकांच्या ह्रदयात डोकावून बघू शकतोस.
10 ज्याचे ह्रदय सच्चे आहे अशांना देव मदत करतो
म्हणून तो माझे रक्षण करेल.
11 देव चांगला न्यायाधीश आहे
आणि तो त्याचा क्रोध केव्हाही व्यक्त करु शकतो.
12-13 देवाने एकदा निर्णय घेतल्यानंतर
तो त्याचे मन बदलत नाही.
देवाकडे लोकांना शिक्षा करायची शक्ती आहे. [a]
14 काही लोक सतत वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखत असतात.
ते गुप्त योजना आखतात आणि खोटे बोलतात.
15 ते दुसऱ्यांना जाळ्यात पकडतात आणि त्यांना इजा करतात.
परंतु ते स्वत:च्याच जाळ्यात अडकतील आणि त्याना कुठली तरी इजा होईल.
16 त्यांना योग्य अशी शिक्षा मिळेल.
ते इतरांशी फार निर्दयपणे वागले.
त्यांनाही योग्य अशीच शिक्षा मिळेल.
17 मी परमेश्वराची स्तुती करतो, कारण तो चांगला आहे
मी त्या सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नावाची स्तुती करतो.
प्रमुख गायकासाठी गित्तीथ सुरावर [b] बसवलेले दावीदाचे स्तोत्र.
8 परमेश्वरा, माझ्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील नावात सर्वात चांगले आहे, थोर आहे.
तुझ्या नावाने तुला स्वर्गात गौरव प्राप्त करुन दिला आहे.
2 मुला बाळांच्या मुखातून तुझे गुणगान ऐकू
येते तुझ्या शंत्रूना गप्प बसवण्यासाठी तू हे सारे करतोस.
3 परमेश्वरा, तू तुझ्या हातांनी निर्माण केलेल्या आकाशाकडे मी बघतो तू केलेल्या चंद्र आणि ताऱ्यांकडे मी बघतो.
आणि मला आश्चर्य वाटते.
4 लोक तुला इतके महत्वाचे का वाटतात?
तू त्यांची आठवण तरी का ठेवतोस?
लोक [c] तुझ्यासाठी इतके महत्वाचे का आहेत?
तू त्यांची दखल तरी का घेतोस?
5 परंतु लोक तुला महत्वाचे वाटतात.
तू त्यांना जवळ जवळ देवच बनवलेस आणि तू लोकांना गौरवाचे आणि मानाचे मुकुट चढवितोस.
6 तू लोकांना तू निर्माण केलेल्या
सर्व गोष्टींचे अधिपत्य दिलेस.
7 लोक मेंढ्या, गाय, बैल आणि रानातले वन्य पशू यांच्यावर राज्य करतात.
8 ते आकाशातल्या पक्ष्यांवर
आणि सागरात पोहणाऱ्या माशावर राज्य करतात.
9 परमेश्वरा, आमच्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील सर्व नावात अतिशय चांगले आहे, अद्भुत आहे.
2006 by World Bible Translation Center