M’Cheyne Bible Reading Plan
यार्देन नदीकाठचा चमत्कार
3 दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून यहोशवा सर्व इस्राएल लोकांसह अकाशियाहून (अथवा शिट्टिमाहून) निघून यार्देन नदीपर्येत आला. नदी पार करण्यापूर्वी त्यांनी तेथे मुक्काम केला. 2 तीन दिवसांनंतर अधिकारी छावणीतून फिरले. 3 त्यांनी लोकांना आज्ञा दिल्या. ते म्हणाले, “लेवी याजक तुमच्या परमेश्वर देवाच्या कराराचा कोश वाहून नेताना तुम्हाला दिसतील तेव्हा त्यांच्या पाठोपाठ जा. 4 पण फार जवळून जाऊ नका. त्यांच्या पासून सुमारे एक हजार यार्ड अंतर ठेवा. या पूर्वी कधी या वाटेने तुम्ही गेला नाहीत. तेव्हा ती कळावी म्हणून त्यांच्या मागून जा.”
5 मग यहोशवा लोकांना म्हणाला, “शुचिर्भूत आणि पवित्र व्हा कारण उद्या परमेश्वर तुमच्यामार्फत अद्भुत गोष्टी करणार आहे.”
6 मग याजकांना यहोशवाने कराराचा कोश घेऊन सर्वांच्या आधी जायला सांगितले. तेव्हा याजकांनी कोश उचलला व ते सर्वांपुढे चालत निघाले.
7 परमेश्वर तेव्हा यहोशवाला म्हणाला, “आज मी सर्व इस्राएल लोकांच्या दृष्टीने तुझी थोरवी वाढविण्यास सुरूवात करीन. म्हणजे मग मोशेला मी साथ दिली तशीच तुलाही देणार आहे हे लोकांना कळेल. 8 याजक कराराचा कोश वाहून नेतील. त्यांना सांग यार्देन नदीच्या किनाऱ्यापर्यंत जा आणि प्रवाहात थांबा.”
9 यहोशवा मग इस्राएल लोकांना म्हणाला, “इकडे या आणि आपल्या परमेश्वराची वचने लक्षपूर्वक ऐका. 10 देव आपल्या संगती आहे याची ती साक्ष होय. तो कनानी, हिती, हिव्वी, परिज्जी, गिर्गाशी अमोरी व यबूसी या आपल्या शत्रूंचा खात्रीने पराभव करील. त्यांना त्या प्रदेशातून हुसकावून लावील. 11 तुम्ही यार्देन पार करत असताना या परमेश्वराच्या कराराचा कोश तुमच्या समोर असेल. 12 आता, प्रत्येक कुळातील एक याप्रमाणे इस्राएल लोकांच्या बारा कुळातून बारा जणांची निवड करा. 13 याजक परमेश्वराच्या कराराचा कोश वाहतील. परमेश्वर म्हणजे साऱ्या विश्वाचा मालक होय. यार्देन नदीतून तुमच्यापुढे तो कोश नेतील. जेव्हा त्यांच्या टाचा नदीच्या प्रवाहाला स्पर्श करतील तेव्हा प्रवाह वाहायचा थांबेल. पाणी आहे त्याठिकाणी थांबून मागच्या मागे धरणाप्रमाणे अडवले जाईल.”
14 कराराचा कोश वाहणारे याजक निघाले आणि नदी पार करून जाण्यासाठी सर्व लोकांनी मुक्काम हलवला. त्या लोकांनी यार्देन नदी पार करायला सुरूवात केली. 15 (सुगीच्या दिवसात यार्देन दुथडी भरून वाहात असते त्याप्रमाणे तिचा प्रवाह फुगलेला होता.) कोश वाहणारे याजक नदीकाठी आले. त्यांनी पाण्यात पाऊल टाकले. 16 आणि लगेच पाणी वाहायचे थांबले. पाण्याची जणू भिंत होऊन ते मागे अडवले गेले. थेट आदाम (सारातान जवळचे एक नगर) नगरापर्यंत पाणी सर्वदूर साठून राहिले. यरीहोजवळ लोकांनी नदी पार केली. 17 तेथील जमीन कोरडी झाली. याजक परमेश्वराच्या कराराचा कोश घेऊन नदीच्या मध्यावर आले व थांबले. सर्व इस्राएल लोक कोरड्या जमिनीवरून यार्देन पलीकडे निघून जाईपर्यंत ते तिथेच थांबले.
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र
126 परमेश्वर जेव्हा आपली परत सुटका करील
तेव्हा ते स्वप्नासारखे असेल.
2 आपण हसत आनंदाचे गाणे गात असू.
इतर देशांतील लोक म्हणतील,
“इस्राएलाच्या लोकांसाठी परमेश्वराने फार चांगली गोष्ट केली.”
3 होय, परमेश्वराने जर आपल्यासाठी ती चांगली गोष्ट केली
तर आपण खूप आनंदी होऊ.
4 परमेश्वरा, वाळवंटातले झरे पुन्हा पाण्याने भरुन वहायला लागतात.
तसं आम्हाला पुन्हा मुक्त कर.
5 एखादा माणूस बी पेरते वेळी दु:खी असू शकेल.
पण तो जेव्हा पीक गोळा करतो तेव्हा तो आनंदी असतो.
6 तो जेव्हा बी शेतात नेतो तेव्हा तो दु:खी होईल.
पण तो जेव्हा धान्य घरी आणतो तेव्हा आनंदी असतो.
शलमोनाचे वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र.
127 जर परमेश्वर घर बांधीत नसेल
तर ते बांधणारे लोक त्यांचा वेळ व्यर्थ घालवीत आहेत.
जर परमेश्वर शहरावर नजर ठेवीत नसेल
तर पहारेकरी त्यांचा वेळ वाया घालवीत आहेत.
2 भाकरी मिळव्यासाठी लवकर उठणे आणि
रात्री उशीरापर्यंत जागणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे.
देव ज्या लोकांवर प्रेम करतो
त्यांची तो ते झोपेत असताना देखील काळजी घेतो.
3 मुले म्हणजे परमेश्वराने दिलेले नजराणे आहेत.
आईच्या शरीरातून मिळालेले ते फळ आहे.
4 तरुण माणसाची मुले सैनिकाच्या
भात्यातील बाणांसारखी आहेत.
5 जो माणूस त्याचा भाता मुलांनी भरुन टाकेल तो सुखी होईल.
त्या माणसाचा कधीही पराभव होणार नाही त्याची मुले सार्वजानिक ठिकाणी [a] त्याच्या शत्रूंविरुध्द त्याचे रक्षण करतील.
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र
128 परमेश्वराचे सर्व भक्त सुखी आहेत.
ते देवाच्या इच्छे प्रमाणे जगतात.
2 तू ज्या गोष्टींसाठी काम करतोस
त्या गोष्टींचा तू उपभोग घेशील, तू आनंदी राहाशील आणि तुझ्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतील.
3 घरी तुझी बायको सुफलीत द्राक्षवेलीसारखी असेल.
मेजाभोवती तुझी मुले तू लावलेल्या जैतूनाच्या झाडांसारखी असतील.
4 परमेश्वर अशा रीतीने त्याच्या भक्तांना आशीर्वाद देईल.
5 परमेश्वर तुला सियोनवरुन आशीर्वाद देवो.
परमेश्वराच्या आशीर्वादाचा तू यरुशलेम मध्ये जन्मभर आनंद उपभोगावा अशी आशा करतो.
6 आणि तू तुझी नातवंडे पाही पर्यंत जगशील अशी मी आशा करतो.
इस्राएलमध्ये शांती नांदू दे.
परमेश्वर त्याच्या लोकांना न्याय देतो
63 अदोमाहून हा कोण येत आहे?
तो बस्राहून येतो.
त्याची वस्त्रे लालभडक आहेत.
तो त्या वस्त्रांत अत्यंत सुंदर दिसत आहे.
तो त्याच्या सामर्थ्यामुळे ताठ मानेने चालत आहे.
तो म्हणतो, “माझ्याजवळ तुम्हाला वाचवायचे सामर्थ्य आहे
आणि मी सत्य बोलतो”
2 “तुझी वस्त्रे लालभडक का?
ती, द्राक्षांचा रस काढण्यासाठी द्राक्षावरून चालणाऱ्या माणसांच्या कपड्यासारखी आहेत.”
3 तो उत्तरतो, “मी स्वतःच द्राक्षकुंडावरून
चाललो मला कोणी मदत केली नाही.
मी रागावलो होतो आणि मी द्राक्षे तुडविली.
तो रस माझ्या वस्त्रांवर उडाला.
म्हणून माझी वस्त्रे आता मळीन झाली आहेत.
4 मी लोकांना शिक्षा करण्यासाठी वेळ निश्चित केली.
आता लोकांना वाचविण्याची आणि त्यांना संरक्षण देण्याची वेळ माझ्यावर आली आहे.
5 मी सभोवर पाहिले पण मला मदत करण्यासाठी कोणीही नव्हते.
कोणीही मला मदत केली नाही म्हणून मला आश्चर्य वाटले.
म्हणून मी माझ्या लोकांना वाचविण्यासाठी माझे स्वतःचे सामर्थ्य वापरले.
माझ्या स्वतःच्या रागाची मला मदत झाली.
6 मी रागावलो होतो तेव्हा मी लोकांना पायाखाली तुडविले.
मी वेडा झालो होतो तेव्हा त्यांना शिक्षा केली.
मी त्यांचे रक्त जमिनीवर ओतले.”
परमेश्वराला त्याच्या लोकांबद्दल करूणा वाटत होती
7 परमेश्वर कृपाळू आहे ह्याचे मी स्मरण ठेवीन.
परमेश्वराची स्तुती करण्याचे स्मरण मी ठेवीन.
इस्राएलच्या घराण्याला परमेश्वराने खूप चांगल्या गोष्टी दिल्या.
परमेश्वर आमच्यावर कृपा करीत आला आहे.
परमेश्वराने आमच्यावर दया केली.
8 परमेश्वर म्हणाला, “ही माझी माणसे आहेत.
ही मुले खोटे बोलत नाहीत.”
म्हणून त्यांना परमेश्वराने वाचविले.
9 लोकांपुढे अनेक संकटे होती.
पण परमेश्वर त्यांच्याविरूध्द् नव्हता.
परमेश्वराला त्यांच्याबद्दल प्रेम आणि सहानुभूती वाटत होती.
म्हणूनच त्याने त्यांचे रक्षण केले,
त्याने त्याचा खास देवदूत त्यांचे रक्षण करण्यासाठी पाठविला.
त्याने त्यांना उचलले व नेले आणि सर्वकाळ तो त्यांची काळजी घेईल.
10 पण लोक परमेश्वराच्याविरूध्द् उलटले.
त्यांनी पवित्र आत्माला दु:ख दिले
म्हणून परमेश्वर त्यांचा शत्रू
झाला मग परमेश्वर त्यांच्याविरूध्द् लढला.
11 पण पूर्वी काय घडले याची परमेश्वराला अजून आठवण आहे.
मोशे आणि त्याची माणसे त्याला आठवतात.
त्यांना समुद्रपार करणारा तोच एकमेव परमेश्वर आहे.
परमेश्वराने त्याच्या मेंढपाळांना (संदेष्ट्यांना) कळप (माणसे) वळवायला लावले.
पण मोशेला आपला आत्मा देणारा तो परमेश्वर आता कोठे आहे?
12 परमेश्वराने मोशेला उजव्या हाताने पुढे नेले.
परमेश्वराने आपल्या विलक्षण सामर्थ्याचा
उपयोग मोशेला पुढे नेण्यासाठी केला.
लोकांना समुद्रातून पलीकडे जाता यावे म्हणून परमेश्वराने पाणी दुभंगविले.
असे चमत्कार घडवून देवाने आपली कीर्ती वाढविली.
13 परमेश्वराने खोल समुद्रातून लोकांना पलीकडे नेले.
घोडा जसा वाळवंट पार करतो,
त्याप्रमाणे लोक न पडता पार झाले.
14 ज्याप्रमाणे गाय शेतातून चालताना पडत नाही,
त्याप्रमाणे लोक समुद्र ओलांडताना पडले नाहीत.
देवाच्या आत्म्याने लोकांना विश्रांतिस्थानाला नेले.
सर्व काळ लोक सुरक्षित राहिले.
परमेश्वरा, ह्याप्रमाणे तू लोकांना पुढे नेलेस.
तू लोकांना मार्गदर्शन केलेस
आणि तुझ्या नावाभोवती अद्भुततेचे वलय निर्माण केलेस.
देवाने त्याच्या लोकांना मदत करावी म्हणून देवाची प्रार्थना
15 परमेश्वरा, स्वर्गातून खाली पाहा.
आता काय घडत आहे ते पाहा.
तुझ्या स्वर्गातील महान आणि पवित्र घरातून खाली आमच्याकडे बघ.
आमच्याबद्दलचे तुझे ते आत्यंतिक प्रेम कोठे आहे?
तुझ्या अंतःकरणातून येणारी तुझी ती सामर्थ्यशाली कृत्ये कोठे आहेत?
माझ्याकरिता असलेली तुझी दया कोठे आहे?
तुझे कृपा युक्त प्रेम तू माझ्यापासून का लपवून ठेवीत आहेस?
16 हे बघ! तू आमचा पिता आहेस.
अब्राहामला आम्ही माहीत नाही.
इस्राएल (याकोब) आम्हाला ओळखत नाही.
परमेश्वरा, तूच आमचा पिता आहेस.
आम्हाला नेहमी वाचविणारा तूच एक आहेस.
17 परमेश्वरा, तू आम्हाला तुझ्यापासून दूर का ढकलीत आहेस?
तुला अनुसरणे तू आम्हाला कठीण का करीत आहेस?
परमेश्वरा, आमच्याकडे परत ये.
आम्ही तुझे सेवक आहोत.
आमच्याकडे ये आणि आम्हाला मदत कर.
आमची कुटुंबे तुझ्या मालकीची आहेत.
18 तुझी पवित्र माणसे स्वतःच्या देशात अगदी थोडा काळ राहिली.
नंतर आमच्या शत्रूंनी तुझे पवित्र मंदिर पायाखाली तुडविले.
19 काही लोक तुला अनुसरत नाहीत.
ते तुझे नाव धारण करीत नाहीत.
आम्ही त्या माणसांसारखे होतो.
येशू आणि बाप्तिस्मा करणारा योहान(A)
11 येशूने त्याच्या बारा शिष्यांना ह्या गोष्टी सांगण्याचे संपविल्यावर तो तेथून निघाला आणि गालील प्रांतातील गावांमध्ये फिरून शिकवू आणि उपदेश करू लागला.
2 बाप्तिस्मा करणारा योहान तुरूंगात होता. त्याने ख्रिस्त करीत असलेल्या गोष्टीविषयी ऐकले. तेव्हा योहानाने काही शिष्यांना येशूकडे पाठविले. 3 आणि त्याला विचारले, “जो येणार होता, तो तूच आहेस? किंवा आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?”
4 येशूने उत्तर दिले, “जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा. 5 आंधळे पाहू शकतात. पांगळे चालताल. कुष्ठरोगी शुद्ध केले जातात, बहिरे ऐकतात, मेलेले उठविले जातात व गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते. 6 धन्य तो पुरूष जो माझ्यामुळे अडखळत नाही.”
7 मग ते जात असता येशू योहानाविषयी लोकांशी बोलू लागला, “तुम्ही वैराण प्रदेशात काय पाहायला गेला होता? वाऱ्याने हलविलेला बोरू काय? 8 तुम्ही काय पाहायला गेला होता? तलम वस्त्र घातलेल्या माणसाला पाहायला गेला होता काय? तलम वस्त्र घालणारे राजांच्या राजवाड्यात असतात. 9 तर मग तुम्ही बाहेर कशाला गेला होतात? संदेष्ट्याला पाहायला काय? होय. मी तुम्हांला सांगतो, आणि संदेष्ट्यांपेक्षा अधिक असा योहान होता. 10 त्याच्याविषयी असे लिहिण्यात आले आहे:
‘पाहा, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवितो
तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील.’ (B)
11 “मी तुम्हांला खरे सांगतो की, स्त्रीयांपासून जन्मलेल्यांमध्ये बाप्तिस्मा करणारा योहान याच्यापेक्षा मोठा असा कोणी झाला नाही, तरीही स्वर्गाच्या राज्यात जो अगदी लहान आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे. 12 बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या काळापासून आतापर्यंत लोक स्वर्गाच्या राज्याचा स्वीकार व प्रसार प्रभावीपणे करीत आहेत. 13 कारण योहानापर्यत सर्व संदेष्टे व नियमशास्त्र यांनी संदेश दिले. 14 आणि जर तुम्ही ते स्वीकारण्यास तयार असाल तर येणारा एलीया तो हाच आहे. 15 ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.
16 “या पिढीला मी कोणती उपमा देऊ? जी बाजारात बसून आपल्या सोबत्यांना हाक मारतात त्यांच्यासारखी ही पिढी आहे. ती म्हणतात,
17 ‘आम्ही तुमच्यासाठी संगीत वाजविले
तरी तुम्ही नाचला नाहीत
आम्ही विलाप केला
तरी तुम्ही ऊर बडवून घेतले नाही.’
18 योहान काही न खाता व पिता आला, पण ते म्हणतात ‘त्याला भूत लागले आहे.’ 19 इतरांप्रमाणेच मनुष्याचा पुत्र खात पीत आला. लोक म्हणतात, ‘पाहा हा किती खातो? किती पितो? जकातदार व पापी लोकांचा मित्र’, परन्तु ज्ञानाची योग्यता त्याच्याद्वारे घडणाऱ्या योग्य गोष्टीमुळे ठरते.”
जे विश्वास ठेवीत नाहीत त्यांच्यापासून येशू लोकांना सावध करतो(C)
20 तेव्हा ज्या नगरांमध्ये त्याने सर्वात जास्त चमत्कार केले होते त्या नगरांतील लोकांनी पश्चात्ताप केला नाही, म्हणून येशूने त्यांना दोष दिला. 21 “हे खोराजिना, तुझा धिक्कार असो, हे बेथसैदा तुझा धिक्कार असो, कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये करण्यात आली ती जर सोर व सिदोन यांच्यामध्ये केली असती तर त्यांनी त्वरेने पूर्वीच गोणपाट नेसून व अंगाला राख फासून पश्चात्ताप केला असता. 22 पण मी तुम्हांला सांगतो की, न्यायाच्या दिवशी सोर व सिदोन यांना तुमच्यापेक्षा अधिक सोपे जाईल.
23 “आणि तु कफर्णहूमा, तू आकाशापर्यंत उंच होशील काय? तू नरकापर्यंत खाली जाशील, कारण जे चमत्कार तुझ्यामध्ये करण्यात आले ते जर सदोमात करण्यात आले असते तर ते शहर आतापर्यत टिकले असते. 24 पण मी तुम्हांस सांगतो की, न्यायाच्या दिवशी तुमच्यापेक्षा सदोम नगराला सोपे जाईल.”
येशू त्याच्या लोकांना विश्रांति देतो(D)
25 मग येशू म्हणाला, “हे पित्या, आकाशाच्या व पृथ्वीच्या प्रभु मी तुझे उपकार मानतो. कारण तू या गोष्टी ज्ञानी व बुद्धिमान लोकांपासून गुप्त ठेवून बालकांना प्रकट केल्या 26 होय पित्या, तू हे केलेस, कारण खरोखर तुला असेच करायचे होते.
27 “माझ्या पित्याने मला सर्व काही दिले आहे. आणि पित्यावाचून कोणी पुत्राला ओळखीत नाही, आणि पुत्रावाचून ज्याला प्रगट करायची पुत्राची इच्छा आहे त्याच्याशिवाय कोणीही पित्याला ओळखीत नाही.
28 “जे थकलेले व ओझ्याने लादलेले असे सर्व तुम्ही मजकडे या आणि मी तुम्हांला विश्रांति देईन. 29 माझे जू आपणांवर घ्या, माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या आत्म्यास विश्रांति मिळेल. 30 कारण माझे जू सोपे आहे आणि माझे ओझे हलके आहे.”
2006 by World Bible Translation Center