M’Cheyne Bible Reading Plan
यरीहो मध्ये हेर
2 नूनाचा मुलगा यहोशवा आणि सर्व लोक यांचा तळ शिट्टीम (अकेशिया) येथे होता. तेव्हा कोणाच्याही नकळत यहोशवारे दोन हेर पाठवले. “तुम्ही जाऊन तो देश व विशेषतः यरीहो पाहून या.” असे सांगून त्याने त्या दोन हेरांना पाठवले.
त्या प्रमाणे ती माणसे यरीहोला गेली. रहाब नावाच्या एका वेश्येच्या घरी ते जाऊन राहिले.
2 यरीहोच्या राजाला कोणीतरी सांगितले की, आज रात्री इस्राएलमधून काही माणसे येथे आपल्या देशातील दुर्बलता शोधण्यासाठी व टेहेळणीसाठी आली आहेत.
3 तेव्हा राजाने रहाबला निरोप पाठवला “तुझ्याकडे वस्तीला आलेल्या त्या व्यक्तींना लपवू नकोस त्यांना बाहेर काढ. ते हेर म्हणून आलेले आहेत.”
4 तिने खरे तर त्या दोघांना लपवले होते. पण ती म्हणाली, “दोघेजण इथे आले होते खरे,पण कुठून आले हे मला माहीत नाही. 5 संध्याकाळी वेशीचे दरवाजे बंद व्हायच्या सुमाराला ते निघून गेले. लगेच पाठलाग केलात तर ते सापडू शकतील.” 6 (पण प्रत्यक्षात तिने त्यांना घराच्या छपरावर नेऊन अंबाडीच्या गंजीत लपवले होते.)
7 त्यांच्या मागावर गेलेली माणसे वेशीच्या बाहेर पडली आणि लोकांनी वेशीचे दरवाजे लावून घेतले. त्या दोघांचा तपास करत ही माणसे यार्देन नदीपर्यंत गेली आणि नदी ओलांडायच्या सर्व जागांचा तपास करू लागली.
8 इकडे हे दोन हेर झोपायची तयारी करत होते, पण रहाब वर जाऊन 9 त्यांना म्हणाली, “परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे हे मला माहीत आहे. तुमची आम्हांला भीती वाटते. या देशातील सर्व लोक घाबरून गेले आहेत. 10 कारण परमेश्वराने तुम्हाला कशी कशी मदत केली हे आम्ही ऐकले आहे. तुम्ही मिसरदेशामधून बाहेर पडताना त्याने तांबडचा समुद्राचे पाणी कसे आटवले हे आम्ही ऐकून आहोत. यार्देनच्या पूर्वेकडे असलेल्या त्या सीहोन आणि ओग या दोन अमोरी राजांचा नाश तुम्ही कसा केलात हे आमच्या कानावर आले. 11 हे सर्व ऐकून आम्ही फार घाबरून गेलो आहोत. आता तुमच्याशी लढण्याचे शौर्य आमच्या कोणातच नाही. कारण वर स्वर्गात आणि खाली पृथ्वीवर तुमच्या परमेश्वर देवाची सत्ता आहे. 12 तेव्हा तुम्ही मला एक वचव द्या. मी तुमच्यावर दया दाखवली आणि तुमच्या मदतीला आले. तेव्हा माझ्या कुटुंबाच्या बाबतीत तुम्ही दया दाखवा. तशी परमेश्वराची शपथ घ्या मला तसे वचन द्या. 13 माझे वडील, आई, बहीण, भावंडे आणी त्यांचे परिवार आम्हा सर्वांना तुम्ही जिवंत ठेवाल, जिवे मारणार नाही असे वचन द्या.”
14 याला ते तयार झाले. ते म्हणाले, “तुमच्या करता आम्ही प्राणही देऊ. कोणालाही आम्ही काय करत आहोत हे सांगू नका. परमेश्वराने आमचा देश आम्हाला दिला की आम्ही तुमच्याशी दयाळूपणाने वागू. आमच्यावर विश्वास ठेव.”
15 या स्त्रीचे घर तटबंदीच्या भिंतीतच बांधलेले होते. तेव्हा तिने दोराच्या साहाय्याने या दोघांना खिडकीतून खाली उतरवले. 16 मग ती म्हाणाली, “आता पश्चिमेला जाऊन टेकड्यांमध्ये तीन दिवस लपून राहा. म्हणजे राजांच्या तपास करणाऱ्या माणसांच्या हाती तुम्ही लागणार नाही ती माणसे परतली की तुम्ही आपल्या वाटेने जा.”
17 यावर ते म्हणाले, “आम्ही तुला वचन दिले आहे पण एक गोष्ट कर. नाहीतर दिलेला शब्द पाळायाची जबाबदारी आमच्यावर नाही. 18 आमच्या सुटकेसाठी तू हा लाल दोर वापरला आहेस. आम्ही येथे परत येऊ तेव्हा खिडकीला हाच लाल दोर बांधून ठेव. तसेच तुझे आई-वडील, भावंडे वगैरे सर्व कुटुंबिय यांना या घरी एकत्र बोलाव. 19 या घरात राहणाऱ्या सर्वांचे आम्ही रक्षण करू. त्यांच्यापैकी कोणालाही काही इजा झाल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर राहील. पण येथून कोणी बाहेर पडल्यास तो मारला जाऊ शकेल मग आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही. ती त्याचीच चूक असेल. 20 तुझ्याशी अम्ही हा करार करत आहोत. पण तू आम्ही काय करत आहोत हे कोणाला सांगितलेस तर आम्ही या करारातून मुक्त होऊ.”
21 यावर ती म्हणाली, “तुमच्या सांगण्याप्रमाणेच होईल.” मग तिने त्यांना निरोप दिला. ते बाहेर पडले त्यानंतर तिने तो लाल दोर खिडकीला बांधला.
22 ती माणसे बाहेर पडून टेकड्यांमध्ये गेली. तेथे त्यांनी तीन दिवस मुक्काम केला. त्यांचा तपास करणाऱ्यांनी सर्वत्र शोध केला. व तीन दिवसांनंतर तपास सोडून देऊन ते लोक नगरात परत आले. 23 मग हे दोन हेर टेकड्यांमधून बाहेर पडून नदी ओलांडून नूनाचा पुत्र यहोशवाकडे आले. आपल्याला समजलेले सर्व काही त्यांनी यहोशवाच्या कानावर घातले. 24 व ते म्हणाले, “परमेश्वराने हा प्रदेश खरोखरच आपल्याला दिला आहे. तेथील सर्वांची गाळण उडाली आहे.”
वर व मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र.
123 देवा, मी वर बघून तुझी प्रार्थना करतो.
तू स्वर्गात राजा म्हणून बसतोस.
2 गुलाम त्यांना लागणाऱ्या वस्तूंसाठी
मालकावर अवलंबून असतात.
3 त्याच प्रमाणे आपण परमेश्वरावर, आपल्या देवावर अवलंबून असतो.
आपल्यावर दया करावी म्हणून आपण देवाची वाट बघतो.
4 परमेश्वरा, आमच्याशी दयाळू राहा.
खूप काळापासून आमचा अपमान होत आला आहे म्हणून तू दयावंत हो.
५गर्विष्ठ लोकांनी आमचा खूप काळ अपमान केला.
ते इतर लोकांपेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटते.
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे दावीदाचे स्तोत्र.
124 परमेश्वर जर आपल्या बाजूला नसता तर आपले काय झाले असते?
इस्राएल, मला उत्तर दे.
2 लोकांनी आपल्यावर हल्ला केला
तेव्हा जर परमेश्वर आपल्या बाजूला नसता तर आपले काय झाले असते?
3 आपले शत्रू आपल्यावर जेव्हा रागावले असते
तेव्हा त्यांनी आपल्याला जिवंत गिळले असते.
4 आपल्या शत्रूंचे सैन्य महापुरासारखे आपल्या अंगावरुन गेले असते.
नदी प्रमाणे त्यांनी आपल्याला बुडवले असते.
5 गर्विष्ठ लोकांनी वर वर चढणाऱ्या पाण्याप्रमाणे
आपल्या तोंडापर्यंत येऊन आपल्याला बुडवले असते.
6 परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने आपल्या शत्रूंना
आपल्याला पकडू दिले नाही आणि ठार मारु दिले नाही.
7 जाळ्यात सापडलेल्या आणि
नंतर त्यातून सुटलेल्या पक्ष्याप्रमाणे आपण आहोत.
जाळे तुटले आणि आपण त्यातून सुटलो.
8 परमेश्वराकडून आपली मदत आली.
परमेश्वराने पृथ्वी आणि स्वर्ग निर्माण केला.
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र
125 जे लोक परमेश्वरावर विश्वास ठेवतात ते सियोन पर्वतासारखे आहेत.
ते कधीही थरथरणार नाहीत.
ते सदैव असतील.
2 यरुशलेमच्या सभोवती पर्वत आहेत आणि परमेश्वर त्याच्या माणसांभोवती आहे.
तो त्याच्या माणसांचे सदैव रक्षण करील.
3 दुष्ट लोक चांगल्या माणसांच्या जमिनीवर कधीही ताबा मिळवू शकणार नाहीत.
जर तसे घडले तर चांगले लोकही वाईट वागायला लागतील.
4 परमेश्वरा, तू चांगल्या लोकांशी चांगला राहा.
ज्या लोकांची मने शुध्द आहेत त्यांच्याशी तू चांगला राहा.
5 दुष्ट लोक वाईट गोष्टी करतात.
परमेश्वर त्या दुष्ट लोकांना शिक्षा करील.
इस्राएलमध्ये शांती नांदू दे.
नवी यरूशलेम चांगुलपणाने भरलेली नगरी
62 मी सियोनवर प्रेम करतो.
म्हणून मी तिच्यावतीने बोलेन.
मी यरूशलेमवर प्रेम करतो
म्हणून मी बोलायचे थांबणार नाही.
चांगुलपणा तेजस्वी प्रकाशाप्रमाणे चमकेपर्यंत
आणि तारण तेजस्वी ज्योतीप्रमाणे जळायला लागेपर्यंत मी बोलेन.
2 मग सगळी राष्ट्रे तुझा चांगुलपणा पाहतील.
सर्व राजे तुझी प्रतिष्ठा पाहतील
मग तुला नवे नाव मिळेल.
परमेश्वर स्वतःतुला नवे नाव ठेवील.
3 परमेश्वराला तुझा फार अभिमान वाटेल.
तू परमेश्वराच्या हातातील सुंदर मुकुटाप्रमाणे होशील.
4 “देवाने त्याग केलेली माणसे” असे तुम्हाला कधीही कोणी म्हणणार नाही.
तुमच्या भूमीला “देवाने नाश केलेली” असे कोणी केव्हाही म्हणणार नाही.
उलट, तुम्हाला “देवाची आवडती माणसे”
असे म्हणतील तुमच्या भूमीला ‘देवाची वधू’ म्हणतील.
का? कारण परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो
आणि तुमची भूमी त्याच्या मालकीची आहे.
5 एखादा तरूण एखाद्या स्त्रीवर प्रेम करतो.
मग तो तिच्याशी लग्न करतो व ती त्याची पत्नी होते.
त्याचप्रमाणे ही भूमी तुझ्या मुलांची होईल.
नवविवाहित माणूस खूप सुखी असतो,
तसाच देव तुझ्याबरोबर सुखी होईल.
देवत्याने दिलेली वचने पाळील
6 यरूशलेम, तुझ्या वेशीवर मी रखवालदार (संदेष्टा) ठेवतो.
ते रखवालदार गप्प बसणार नाहीत,
रांत्रदिवस ते प्रार्थना करीत राहतील.
रखवालदारांनो, तुम्ही देवाची प्रार्थना करीत राहिले पाहिजे
त्याच्या वचनाची आठवण तुम्ही त्याला करून दिली पाहिजे.
कधीही प्रार्थना करायचे थांबू नका.
7 पृथ्वीवरच्या सर्व लोकांनी स्तुती करण्याइतपत यरूशलेमला
परमेश्वर प्रशंसनीय करीपर्यंत तुम्ही त्याची प्रार्थना केली पाहिजे.
8 परमेश्वराने वचन दिले.
परमेश्वराचे सामर्थ्य हाच त्या वचनाचा पुरावा आहे,
व ते वचन पूर्ण करायला परमेश्वर आपले सामर्थ्य वापरील.
परमेश्वर म्हणतो, “तुमचे अन्न आणि तुम्ही बनविलेले मद्य
मी तुमच्या शत्रूंना पुन्हा देणार नाही, असे मी तुम्हाला वचन देतो.
9 जो अन्न मिळवतो, तोच ते खाईल आणि तो परमेश्वराची स्तुती करील द्राक्षे गोळा करणारा
त्या द्राक्षापासून निघणारे मद्य पिईल.
हे सर्व माझ्या पवित्र भूमीवर घडेल.”
10 दरवाजातून आत या लोकांसाठी रस्ता मोकळा करा.
रस्ता तयार करा.
रस्त्यावरील दगड बाजूला काढा.
लोकांकरिता निशाणी म्हणून ध्वज उंच उभारा.
11 ऐका! परमेश्वर दूरवरच्या
देशांशी बोलत आहे
“सियोनच्या लोकांना सांगा,
पाहा! तुमचा तारणारा येत आहे.
त्याचे बक्षिस त्याच्याजवळ आहे.
त्याचे कर्म त्याच्या समोर आहे.”
12 त्याच्या लोकांना “पवित्र लोक”,
“परमेश्वराने वाचविलेले लोक” असे म्हटले जाईल
व यरूशलेमला “देवाला हवी असणारी नगरी,”
“देव जिच्या बरोबर आहे ती नगरी” असे म्हटले जाईल.
येशू त्याच्या प्रेषितांना उपदेश करायला पाठवितो(A)
10 येशूने आपल्या बारा शिष्यांना आपल्याजवळ बोलाविले, आणि त्याने त्यांना भुते घालविण्याचा अधिकार दिला. तसेच प्रत्येक आजार व दुखणी बरे करण्याचा अधिकार दिला. 2 बारा प्रेषितांची नावे अशी आहेत.
पेत्र (ज्याला शिमोन म्हणत)
आणि त्याचा भाऊ अंद्रिया,
जब्दीचा मुलगा याकोब व
त्याचा भाऊ योहान,
3 फिलीप्प
व बर्थलमय,
थोमा
आणि जकातदार मत्तय,
अल्फीचा मुलगा योकोब
व तद्दय,
4 शिमोन कनानी व पुढे ज्याने
त्याचा विश्वासघात केला तो यहूदा इस्कार्योत.
5 या बाराजणांना पुढील सूचना देऊन पाठविण्यात आले. यहूदीतर लोकांमध्ये जाऊ नका व शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका. 6 तर त्याऐवजी इस्राएलच्या हरवलेल्या मेंढरांकडे जा. 7 तुम्ही जाल तेव्हा हा संदेश जाहीर करा. स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. 8 रोग्यांना बरे करा, मृतांना उठावा. कुष्ठरोग्यांना शुद्ध करा. भुते काढा, तुम्हांला फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या. 9 तुमच्या कमरेला सोने, चांदी किंवा तांबे घेऊ नका. 10 सोबत पिशवी घेऊ नका, तुमच्या प्रवासासाठी फक्त तुमचे अंगावरचे कपडे असू द्या व पायातील वहाण असू द्या. अधिकचे वस्त्र किंवा वहाणा घेऊ नका. काठी घेऊ नका, कारण काम करणाऱ्याच्या गरजा भागणे आवश्यक आहे.
11 “ज्या कोणत्याही नगरात किंवा खेड्यात तुम्ही जाल, तेथे कोण योग्य व्यक्ति आहे याचा शोध करा आणि तेथून निघेपर्यंत त्या व्यक्तीच्या घरी राहा. 12 त्या घरात प्रवेश करतेवेळे येथे शांति नांदो असे म्हणा. 13 जर ते घर खरोखर योग्य असेल तर तुमची शांति तेथे राहील पण जर ते घर योग्य नसेल तर तुमची शांति तुमच्याकडे परत येईल. 14 आणि जो कोणी तुम्हांला स्वीकारणार नाही किंवा तुमचे शब्द ऐकणार नाही तेव्हा त्याच्या घरातून किंवा नगरातून बाहेर पडताना तुम्ही आपल्या पायाची धूळ झटकून टाका. 15 मी तुम्हांला खरे सांगतो. न्यायाच्या दिवशी त्या नगारापेक्षा सदोम आणि गमोराला अधिक सोपे जाईल.
येशू छळाविषयी सावध करतो(B)
16 “लांडग्यांमध्ये जसे मेंढरास पाठवावे तसे मी तुम्हांस पाठवीत आहे, म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे सरळ स्वभावी असा. 17 माणसांविषयी सावध असा. कारण ते तुम्हांला न्यायसभेच्या स्वाधीन करतील आणि त्यांच्या सभास्थानांमध्ये ते तुम्हांला फटके मारतील. 18 माझ्यामुळे ते तुम्हांला राज्यपाल व राजे यांच्यासमोर आणतील. तुम्ही त्यांच्यापुढे व यहूदीतर लोकांसमोर माझ्याविषयी सांगाल. 19 जेव्हा तुम्हांला अटक करतील तेव्हा काय बोलावे किंवा कसे बोलावे याविषयी काळजी करू नका. त्यावेळेला तुम्ही काय बोलायचे ते सांगितले जाईल. 20 कारण बोलाणारे तुम्ही नसून तुमच्या पित्याचा आत्मा तुमच्याद्वारे बोलेल.
21 “भाऊ आपल्या भावाविरूद्ध व पिता आपल्या मुलाविरूद्ध उठेल आणि त्याला विश्र्वासघाताने मारण्यास सोपवून देईल. मुले आईवडिलांविरूद्ध उठून त्यांना जिवे मारण्यास देतील. 22 माझ्यामुळे सर्व तुमचा द्वेष करतील. पण शेवटपर्यत जो टिकेल तोच तरेल. 23 एका ठिकाणी जर तुम्हांला त्रास दिला जाईल, तर दुसरीकडे जा. मी तुम्हांला खरे सांगतो मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलच्या सर्व गावांमध्ये तुमचे असे फिरणे संपणार नाही.
24 “विद्यार्थी त्याच्या शिक्षकापेक्षा वरचढ नाही, किंवा नोकर मालकाच्या वरचढ नाही. 25 विद्यार्थी आपल्या शिक्षकासारखा व नोकर आपल्या मालकासारखा होणे, इतके पुरे. जर घराच्या धन्याला त्यांनी बालजबूल म्हटले तर घरातील इतर माणसांना ते किती वाईट नावे ठेवतील!”
लोकांचे नको तर देवाचे भय बाळगा(C)
26 “म्हणून त्यांना भिऊ नका, कारण उघडे होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. 27 जे मी तुम्हांला अंधारात सांगतो ते तुम्ही प्रकाशात बोला, आणि कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते तुम्ही छपरावरून गाजवा.
28 “जे शरीराला वधतात पण आत्म्याचा वध करू शकत नाहीत त्यांना भिऊ नका, तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मारू शकतो व नरकात टाकू शकतो त्याला भ्या. 29 दोन चिमण्या एका पैशाला विकत नाहीत का? तरीही तुमच्या पित्याच्या इच्छेशिवाय त्यातील एकही जमिनीवर पडणार नाही. 30 आणि तुमच्या डोक्यावरचे केससुद्धा त्याने मोजलेले आहेत. 31 म्हणून घाबरु नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही अधिक मौल्यवान आहात.
येशूची लाज बाळगू नका(D)
32 “जो कोणी मनुष्यांसमोर मला स्वीकारील त्याला मीसुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर स्वीकारीन. 33 पण जो कोणी मनुष्यांसमोर मला नाकारील त्याला मी सुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन.
लोक येशूविषयी सहमत होणार नाहीत(E)
34 “असे समजू नका की मी पृथ्वीवर शांती करायला आलो आहे. मी शांति स्थापित करायला आलो नाही तर तलवार चालवायला आलो आहे. 35 मी फूट पाडायला आलो आहे,
‘म्हणजे मुलाला त्याच्या पित्याविरुद्ध
आणि मुलीला तिच्या आईविरुद्ध
सुनेला तिच्या सासूविरुद्ध उभे करायला आलो आहे.
36 सारांश मनुष्याच्या घरचीच माणसे त्याचे शत्रू होतील.’ (F)
37 “जो माझ्यापेक्षा स्वतःच्या पित्यावर किंवा आईवर अधिक प्रीति करतो, तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर, मुलीवर अधिक प्रीति करतो, तो मला योग्य नाही. 38 जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येण्याचे नाकारतो, तो मला योग्य नाही. 39 जो आपला जीव मिळवितो तो त्याला गमावील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावतो तो त्याला मिळवील.
जे तुमचा आदर-सतकार करतात त्याना देव आशीर्वाद देतो(G)
40 “जी व्यक्ति तुम्हांला स्वीकारते ती व्यक्ति मला स्वीकारते आणि ज्या पित्याने मला पाठविले त्यालाही स्वीकारते. 41 जो कोणी संदेष्ट्यांचा स्वीकार त्याच्या संदेशाच्या सेवेमुळे करतो, त्याला संदेष्ट्याचे प्रतिफल मिळेल, आणि जो धार्मिकाचा स्वीकार त्याच्या धार्मिकतेसाठी करतो, त्याला धार्मिकाचे प्रतिफळ. 42 मी तुम्हांला खरे सांगतो की, जो कोणी शिष्यांच्या नावाने या लहानातील एकाला केवळ प्यालाभर थंड पाणी प्यायला देईल तो आपल्या प्रतिफळाला मुळीच मुकणार नाही.”
2006 by World Bible Translation Center