Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
अनुवाद 33-34

मोशेचे आशीर्वाद

33 देवाचा भक्त मोशे याने इस्राएल लोकांना आपल्या मृत्युपूर्वी असा आशीर्वाद दिला, मोशे म्हणाला.

“परमेश्वर सीनाय येथून आला.
    उषःकालच्या प्रकाशाप्रमाणे
    तो सेईर वरुन आला,
पारान डोंगरावरुन तो प्रकाशला. दहाहजार देवदूतांसमवेत तो आला
    देवाचे समर्थ सैनिक [a] त्याच्याबरोबर होते.
परमेश्वराचे आपल्या लोकांवर खरंच फार प्रेम आहे.
    त्याची पवित्र प्रजा त्याच्या हातात आहे.
ते लोक त्याच्या पायाशी बसून
    त्याच्याकडून शिकवण घेतात.
मोशेने आम्हाला नियमशास्त्र दिले.
    ती शिकवण याकोबच्या लोकांची ठेव आहे.
इस्राएलचे सर्व लोक
    आणि त्यांचे प्रमुख आले
    तेव्हा परमेश्वर यशुरुनचा राजा झाला.

रऊबेनला आशीर्वाद

“रऊबेनचे लोक मोजकेच असले तरी ते जगोत,
    त्यांना मरण न येवो.”

यहूदासाठी आशीर्वाद

मोशेने यहूदाला हा आशीर्वाद दिला:

“परमेश्वरा, यहूदा तुझ्याकडे मदत मागेल तेव्हा त्याचे ऐक.
    त्याच्या लोकांची व त्यांची गाठभेट करुन दे.
त्याला शक्तिशाली कर आणि
    शत्रूला पराभूत करण्यात त्याला साहाय्यकारी हो.”

लेवींना आशीर्वाद

लेवींविषयी मोशे असे म्हणाला,

“लेवी तुझा खरा अनुयायी आहे.
    तो थुम्मीम व उरीम बाळगतो.
मस्सा येथे तू लेवींची कसोटी पाहिलीस.
    मरीबाच्या झऱ्याजवळ, ते तुझेच आहेत याची तू कसोटी करुन घेतलीस.
हे परमेश्वरा, आपल्या कुटुंबियांपेक्षाही त्यांनी तुला आपले मानले.
    आपल्या आईवडीलांची कदर केली नाही.
भाऊबंदांना ओळख दाखवली नाही.
    पोटच्या पोरांची पर्वा केली नाही.
पण तुझ्या आज्ञांचे पालन केले.
    तुझा पवित्र करार पाळला.
10 ते तुझे विधी याकोबाला,
    नियमशास्त्र इस्राएलला शिकवतील.
तुझ्यापुढे धूप जाळतील.
    तुझ्या वेदीवर होमबली अर्पण करतील.

11 “परमेश्वरा, जे जे लेवींचे आहे त्याला आशीर्वाद दे.
    ते जे करतील त्याचा स्वीकार कर.
त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा संहार कर.
    त्यांच्या शत्रूंना पार नेस्तनाबूत करुन टाक.”

बन्यामीनला आशीर्वाद

12 बन्यामीन विषयी मोशे म्हणाला,

“बन्यामीन परमेश्वराला प्रिय आहे.
    तो परमेश्वरापाशी सुरक्षित राहील.
देव त्याचे सदोदित रक्षण करील.
    आणि परमेश्वराचे वास्तव्य त्याच्या प्रदेशात राहील.” [b]

योसेफला आशीर्वाद

13 योसेफा विषयी तो म्हणाला,

“योसेफच्या भूमीवर परमेश्वराची कृपादृष्टी असो.
    परमेश्वरा, त्यांच्या देशात आकाशातून पावसाचा वर्षाव कर
    आणि त्यांच्या भूमीतून मुबलक पाणी दे.
14 सूर्यामुळे उत्कृष्ट फलित त्यांच्या पदरात पडो.
    आणि प्रत्येक महिना आपली उत्कृष्ट फळे त्याला देवो.
15 टेकड्या आणि पुरातन पर्वत यांच्यातील
    अमूल्य जिन्नसे त्यांना मिळोत.
16 धरतीचा उत्तमातील उत्तम ठेवा योसेफाला मिळो.
    योसेफाची आपल्या भाऊबंदापासून ताटातूट झाली होती.
    तेव्हा जळत्या झुडुपांतून, परमेश्वराचा दुवा त्याला मिळो.
17 योसेफ माजलेल्या बैलासारखा आहे.
    त्याचे दोन पुत्र बैलाच्या शिंगांप्रमाणे आहेत.
ते लोकांवर चढाई करुन
    त्यांना पृथ्वीच्या सीमेपर्यंत ढकलतील.
असे मनश्शेचे हजारो
    आणि एफ्राइमचे लाखो आहेत.”

जबुलून आणि इस्साखार यांना आशीर्वाद

18 मोशे जबुलूनबद्दल म्हणाला,

“जबुलूना, बाहेर जाल तेव्हा आनंद करा.
    इस्साखारा आपल्या डेऱ्यात आनंदाने राहा.
19 ते लोकांना आपल्या डोंगरावर बोलावतील.
    तेथे ते योग्य यज्ञ करतील.
समुद्रातील धन आणि वाळूतील
    खजिना हस्तगत करतील.”

गादला आशीर्वाद

20 गादविषयी मोशे म्हणाला,

“गादाचा विस्तार करणारा देव धन्य होय.
    गाद सिंहासारखा आहे. तो आधी दबा धरुन बसतो.
    आणि सावजावर हल्ला करुन त्याच्या चिंधड्या करतो.
21 स्वतःसाठी तो उत्तम भाग ठेवतो.
    राजाचा वाटा स्वतःला घेतो.
लोकांचे प्रमुख त्याच्याकडे येतात.
    जे परमेश्वराच्या दृष्टीने न्यायाने, ते तो करतो.
    इस्राएलच्या लोकांसाठी जे उचित तेच करतो.”

दानला आशीर्वाद

22 दान विषयी मोशे म्हणाला,

“दान म्हणजे सिंहाचा छावा.
    तो बाशान मधून झेप घेतो.”

नफतालीला आशीर्वाद

23 नफताली विषयी मोशेने सांगितले,

“नफताली, तुला सर्व चांगल्या गोष्टी,भरभरुन मिळतील.
    तुझ्यावर परमेश्वराचा आशीर्वाद राहील.
    गालील तलावाजवळचा प्रदेश तुला मिळेल.”

आशेरला आशीर्वाद

24 आशेर विषयी मोशने असे सांगीतले,

“आशेरला सर्वात अधिक आशीर्वाद मिळोत.
    तो आपल्या बांधावांना प्रिय होवो.
    त्याचे पाय तेलाने माखलेले राहोत.
25 तुमच्या दरवाजांचे अडसर लोखंडाचे व पितळेचे असोत.
    तुमचे सामर्थ्य आयुष्यभर राहो.”

मोशे देवाची स्तुती करतो

26 “हे यशुरुन! देवासारखा कोणी नाही.
    तुझ्या साहाय्यासाठी, मेघांवर आरुढ होऊन
    तो आपल्या प्रतापाने आकाशातून तुझ्या मदतीला येतो.
27 देव सनातन आहे.
    तो तुझे आश्रयस्थान आहे.
देवाचे सामर्थ्य सर्वकाळ चालते!
    तो तुझे रक्षण करतो.
तुझ्या शत्रूंना तो तुझ्या प्रदेशातून हुसकावून लावेल.
    ‘शत्रूंना नष्ट कर’ असे तो म्हणतो.
28 म्हणून इस्राएल सुरक्षित राहील.
    याकोबची विहीर त्यांच्या मालकीची आहे.
धान्याने व द्राक्षारसाने संपन्न अशी भूमी त्यांना मिळेल.
    त्या प्रदेशावर भरपूर पाऊस पडेल.
29 इस्राएला, तू आशीर्वादीत आहेस.
    इतर कोणतेही राष्ट्र तुझ्यासारखे नाही.
परमेश्वराने तुला वाचवले आहे.
    भक्कम ढालीप्रमाणे तो तुझे रक्षण करतो.
    परमेश्वर म्हणजे तळपती तलवार.
शत्रूंना तुझी दहशत वाटेल.
    त्यांची पवित्र स्थाने तू तुडवशील!”

मोशेचा मृत्यू

34 मवाबातील यार्देन खोऱ्यातून पिसग पर्वताच्या माथ्यावरील नबो नामक शिखरावर मोशे चढून गेला. यरीहो समोरील यार्देन पलीकडचा हा भाग. परमेश्वराने मोशेला गिलादपासून दानपर्यंत सर्व प्रदेश दाखवला. नफताली, एफ्राईम व मनश्शेचा सर्व प्रदेश दाखवला. पश्चिमेकडल्या भूमध्य समुद्रापर्यंतचा यहूदाचा सर्व प्रदेश दाखवला. तसेच नेगेव आणि सोअरा पासून यरीहो या खजुराच्या झाडांच्या नगरापर्यंतचे खोरे हे ही दाखवले. परमेश्वर मोशेला म्हणाला, “अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना कबूल केलेला हाच तो प्रदेश. त्यांच्या वंशजांना तो द्यायचे मी त्यांना वचन दिले आहे. तुला मी तो पाहू दिला पण तू तेथे जाणार नाहीस.”

मग परमेश्वराचा सेवक मोशे त्या मवाबाच्या प्रदेशात मरण पावला. असे घडणार हे परमेश्वराने त्याला सांगितले होतेच. मवाबात मोशेचे परमेश्वराने दफन केले. बेथ-पौरासमोरच्या खोऱ्यात हा भाग आला. पण मोशेची कबर नेमकी कोठे आहे हे आजतागायत कोणाला कळलेले नाही. मोशे वारला तेव्हा एकशेवीस वर्षाचा होता. तेव्हाही त्याची तब्बेत ठणठणीत होती व दृष्टी चांगली होती. इस्राएल लोकांनी त्याच्यासाठी तीस दिवस शोक केला. त्या काळात ते मवाबातील यार्देन खोऱ्यात राहिले.

नवा नेता यहोशवा

मोशेने यहोशवावर आपले हात ठेवून त्याला नवा नेता म्हणून नेमले होते. त्यामुळे नूनचा पुत्र यहोशवा याला ज्ञानाचा आत्मा प्राप्त झाला होता. म्हणून इस्राएल लोक त्याच्या आज्ञेत वागू लागले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी आचरण ठेवले.

10 इस्राएलला मोशे सारखा दुसरा संदेष्टा मिळाला नाही. परमेश्वराला मोशेचा प्रत्यक्ष परिचय होता. 11 मिसरमध्ये महान चमत्कार करुन दाखवायला परमेश्वराने मोशेला पाठवले. मिसरमध्ये फारो, त्याचे सेवक व सर्व लोकांनी हे चमत्कार पाहिले. 12 मोशेने करुन दाखवले तसे चमत्कार व आश्चर्यकारक गोष्टी दुसऱ्या कोणा संदेष्ट्याने करुन दाखवल्या नाहीत. इस्राएलच्या सर्व लोकांनी त्याची ही कृत्ये पाहिली.

स्तोत्रसंहिता 119:145-176

कोफ

145 मी अगदी मनापासून तुला बोलावतो परमेश्वरा,
    मला उत्तर दे मी तुझ्या आज्ञा पाळीन.
146 परमेश्वरा, मी तुला बोलावतो माझा उध्दार कर
    आणि मी तुझा करार पाळीन.
147 तुझी प्रार्थना करण्यासाठी मी सकाळी लवकर उठतो.
    तू ज्या गोष्टी सांगतोस त्यावर मी विश्वास ठेवतो.
148 तुझ्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी
    रात्रभर मी जागा राहिलो.
149 तुझ्या सगळ्या प्रेमासकट माझ्याकडे लक्ष दे परमेश्वरा,
    ज्या गोष्टी योग्य आहेत असे तू सांगतोस त्या कर आणि मला जगू दे.
150 लोक माझ्याविरुध्द वाईट योजना आखीत आहेत
    ते लोक तुझ्या शिकवणुकी प्रमाणे वागत नाहीत.
151 परमेश्वरा, तू माझ्या खूप जवळ आहेस आणि
    तुझ्या सगळ्या आज्ञांवर विश्वास ठेवणे शक्य आहे.
152 मी खूप पूर्वी तुझ्या करारावरुन शिकलो की
    तुझी शिकवण सदैव राहाणार आहे.

रेश

153 परमेश्वरा, माझे दु:ख बघ आणि माझी सुटका कर.
    मी तुझी शिकवण विसरलो नाही.
154 परमेश्वरा, माझ्यासाठी माझी लढाई लढ.
    तू वचन दिल्याप्रमाणे मला जगू दे.
155 दुष्ट लोक जिंकणार नाहीत कारण
    ते तुझे नियम पाळत नाहीत.
156 परमेश्वरा, तू खूप दयाळू आहेस.
    तू ज्या गोष्टी योग्य आहेत असे सांगतोस त्या कर आणि मला जगू दे.
157 मला दु:ख देण्याचा प्रयत्न करणारे अनेक शत्रू मला आहेत
    पण मी तुझ्या कराराप्रमाणे वागणे सोडले नाही.
158 मी त्या विश्वासघातक्यांना बघतो. परमेश्वरा,
    ते तुझा शब्द पाळत नाहीत आणि मी त्यांचा तिरस्कार करतो.
159 बघ, मी तुझ्या आज्ञा पाळण्याचा आटोकाट प्रयत्न करतो.
    परमेश्वरा, तुझ्या सगळ्या प्रेमासकट मला जगू दे.
160 परमेश्वरा, अगदी सुरुवाती पासून तुझे सर्व शब्द विश्वसनीय होते
    आणि तुझे चांगले नियम सदैव राहातील.

शीन

161 शक्तिमान पुढाऱ्यांनी माझ्यावर विनाकारण हल्ला केला.
    पण मी फक्त तुझ्या नियमांना भितो आणि मान देतो.
162 परमेश्वरा, तुझा शब्द मला आनंदी करतो,
    नुकताच एखादा खजिना सापडलेल्या माणसासारखा मी आनंदित होतो.
163 मला खोटे आवडत नाही.
    मला त्याचा वीट आहे पण परमेश्वरा, मला तुझी शिकवण आवडते.
164 मी दिवसातून सात वेळा तुझ्या चांगल्या
    नियमांसाठी मी तुझी स्तुती करतो.
165 जे लोक तुझ्या शिकवणुकीवर प्रेम करतात त्यांना खरी शांती लाभेल.
    कुठलीही गोष्ट त्यांचा अधपात घडवणार नाही.
166 परमेश्वरा, तू माझा उध्दार करावास म्हणून मी वाट बघत आहे.
    मी तुझ्या आज्ञा पाळल्या आहेत.
167 मी तुझ्या कराराप्रमाणे वागलो, परमेश्वरा,
    मला तुझे नियम खूप आवडतात.
168 मी तुझा करार आणि तुझ्या आज्ञा पाळल्या.
    परमेश्वरा, मी जे काही केले ते सर्व तुला माहीत आहे.

ताव

169 परमेश्वरा, माझे आनंदी गाणे ऐक.
    तू कबूल केल्याप्रमाणे मला शहाणा कर.
170 परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक.
    वचन दिल्याप्रमाणे माझा उध्दार कर.
171 तू मला तुझे नियम शिकवलेस म्हणून
    मी एकदम गुणगान गायला सुरुवात केली.
172 तुझ्या शब्दाला उत्तर देण्यासाठी मला मदत कर आणि मला माझे गाणे म्हणून दे.
    परमेश्वरा, तुझे नियम चांगले आहेत.
173 परमेश्वरा, मला मदत करण्यासाठी माझ्यापर्यंत
    पोहोच कारण मी तुझ्या आज्ञांप्रमाणे वागणे पसंत केले.
174 परमेश्वरा, तू माझा उध्दार करावास असे मला वाटते.
    पण तुझी शिकवण मला आनंद देते.
175 परमेश्वरा, मला जगू दे
    आणि तुझे गुणगात करु दे. तुझ्या निर्णयाला मला मदत करु दे.
176 मी हरवलेल्या मेंढीप्रमाणे रस्ता चुकलो.
    परमेश्वरा, मला शोधायला ये.
मी तुझा सेवक आहे
    आणि मी तुझ्या आज्ञा विसरलो नाही.

यशया 60

देव येत आहे

60 “यरूशलेम, माझ्या ज्योती, ऊठ.
    तुझा प्रकाश (देव) येत आहे.
    परमेश्वराची प्रभा तुझ्यावर फाकेल.
आता अंधाराने जग व्यापले आहे
    आणि लोक अंधारात आहेत.
पण परमेश्वराचा प्रकाश तुझ्यावर पडेल,
    त्याची प्रभा तुझ्यावर पसरेल.
राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे (देवाकडे) येतील.
    राजे तुझ्या तेजस्वी प्रकाशाकडे येतील.
तुझ्या सभोवती पाहा! बघ,
    लोक तुझ्या भोवती जमून तुझ्याकडे येत आहेत.
ती तुझी दूरवरून येणारी मुले आहेत
    आणि त्याच्याबरोबर, तुझ्या मुलीही येत आहेत.

“हे भविष्यात घडून येईल.
    त्यावेळी तू तुझ्या लोकांना पाहशील.
तुझा चेहरा मग आनंदाने उजळेल.
    प्रथम तू घाबरशील.
पण नंतर तुझ्या भावना अनावर होतील.
    समुद्रापलीकडील सर्व संपत्ती तुझ्यापुढे ठेवली जाईल.
    राष्ट्रांचे सर्व धन तुला मिळेल.
मिद्यान आणि एफा येथील उंटाचे कळप
    तुझी भूमी ओलांडतील.
शेबातून उंटांची रीघ लागेल.
    ते सोने आणि सुंगधी द्रव्ये आणतील.
    लोक परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गातील.
लोक केदारमधील सर्व मेंढ्या गोळा करून तुला देतील.
    नबायोथचे मेंढे ते तुझ्याकडे आणतील.
तू ती जनावरे माझ्या वेदीवर अर्पण करशील
    आणि मी त्यांचा स्वीकार करीन.
मी माझे सुंदर मंदिर आणखी सुंदर करीन.
लोकांकडे पाहा! आकाशात वेगाने ढग सरकावेत
    त्याप्रमाणे ते घाईने तुझ्याकडे येत आहेत
    ते जणू घरट्याकडे उडत येणारे पारवे आहेत.
दूरचे देश माझी वाट पाहत आहेत मोठी मालवाहू जहाजे प्रवासास सज्ज आहेत.
    दूरच्या देशातून तुझ्या मुलांना आणण्याकरिता ती जहाजे तयार आहेत.
परमेश्वराचा तुझ्या देवाचा,
    इस्राएलच्या पवित्र देवाचा, सन्मान करण्यासाठी
ती मुले आपल्याबरोबर चांदी-सोने आणतील.
    परमेश्वर तुझ्यासाठी आश्चर्यकारक गोष्टी करतो.
10 दुसऱ्या देशातील मुले तुझी तटबंदी पुन्हा बांधतील,
    राजे तुझी सेवा करतील

“मी जेव्हा रागावलो तेव्हा मी तुला फटकावले.
    पण आता तुझ्यावर दया करण्याची माझी इच्छा आहे.
    म्हणून मी तुझे दु:ख हलके करीन.
11 तुझे दरवाजे सदोदित उघडे राहतील.
    दिवस असो वा रात्र ते कधीही बंद होणार नाहीत.
राष्ट्रे आणि राजे,
    त्यांची संपत्ती तुझ्याकडे आणतील.
12 जे राष्ट्र अथवा जे राज्य तुझी सेवा करीत नाही
    त्याचा नाश होईल.
13 लबानोनमधील मौल्यवान चिजा तुला दिल्या जातील.
    लोक सुरू देवदारू आणि भद्रदारू तुला आणून देतील.
माझे पवित्र स्थान सुंदर करण्यासाठी
    या झाडांच्या लाकडाचा उपयोग केला जाईल.
ही जागा म्हणजे जणू काही माझ्या सिंहासनासमोरील चौरंग आहे
    आणि मी त्याला फार महत्व देईन.
14 पूर्वीच्या काळी ज्या लोकांनी तुला दुखावले,
    तेच आता तुझ्यापुढे नमतील. पूर्वी ज्यांनी
तुझा तिरस्कार केला तेच आता
    तुझ्या पायाशी वाकतील.
तेच लोक तुला ‘परमेश्वराची नगरी,’
    ‘इस्राएलच्या पवित्र देवाचे सियोन म्हणून संबोधतील.’”

नवे इस्राएल शांतीची भूमी

15 “तुला पुन्हा कधीही एकटे सोडले जाणार नाही.
    पुन्हा कधीही तुझा तिरस्कार केला जाणार नाही.
तुला पुन्हा कधीही ओस पाडले जाणार नाही.
    मी तुला चिरकालासाठी मोठी करीन.
    तू चिरंतन सुखी होशील.
16 राष्ट्रे तुला पाहिजे ती प्रत्येक गोष्ट देतील.
    हे म्हणजे मुलाने आईचे स्तनपान करावे तसे असेल.
पण तू राजांच्या संपत्तीचे ‘पान’ करशील.
    मग तुला समजेल की तो मी आहे,
जो तुला वाचवितो, तो परमेश्वर मी आहे.
    तुला कळेल की याकोबाचा महान देव तुझे रक्षण करतो.

17 “आता तुझ्याजवळ तांबे आहे,
    मी तुला सोने आणीन.
आता तुझ्याजवळ लोखंड आहे,
    मी तुला चांदी आणून देईन.
मी तुझ्याजवळील लाकडाचे तांबे करीन.
    तुझ्या खडकांचे लोखंड करीन.
मी तुझ्या शिक्षेचे रूपांतर शांतीत करीन.
    आता लोक तुला दुखावतात,
पण तेच तुझ्यासाठी
    चांगल्या गोष्टी करतील.
18 तुझ्या देशात पुन्हा कधीही हिंसेची वार्ता ऐकू येणार नाही.
    लोक तुझ्या देशावर पुन्हा कधीही चढाई करणार नाहीत.
आणि तुला लुटणार नाहीत.
    तू तुझ्या वेशीला ‘तारण’ आणि तुझ्या दरवाजांना ‘स्तुती’ अशी नावे देशील.

19 “या पुढे तुला रात्रंदिवस चंद्र सूर्य नव्हे
    तर परमेश्वर प्रकाश देईल.
परमेश्वर तुझा चिरकालाचा प्रकाश होईल.
    तुझा देवच तुझे वैभव असेल.
20 तुझा ‘सूर्य’ कधी मावळणार नाही
    आणि ‘चंद्राचा’ क्षय होणार नाही.
कारण परमेश्वर तुझा अक्षय प्रकाश असेल.
    तुझा दु:खाचा काळ संपेल.

21 “तुझे सर्व लोक सज्जन असतील.
    त्यांना कायमची भूमी मिळेल.
मी त्या लोकांना निर्माण केले.
    मी माझ्या स्वतःच्या हातांनी
    तयार केलेली ती सुंदर रोपटी आहेत.
22 सर्वात लहान कुटुंबाचा मोठा समूह होईल.
    सर्वांत लहान कुटुंबाचे मोठे बलवान राष्ट्र होईल.
योग्य वेळी मी, परमेश्वर, त्वरेने येईन.
    मी ह्या गोष्टी घडवून आणीन.”

मत्तय 8

येशू एका आजरी माणसाला बरे करतो(A)

येशू डोंगरावरून खाली आला. पुष्कळ लोक त्याच्यामागे चालत होते. तेव्हा एक कुष्ठरोग झालेला मनुष्य त्याच्याकडे येऊन वाकून त्याच्या पाया पडून म्हणाला, “प्रभु, तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला शुद्ध करण्यास समर्थ आहात.”

मग येशूने आपला हात पुढे करुन त्याला स्पर्श केला व म्हटले, “तू शुद्ध व्हावेस अशी माझी इच्छा आहे,” आणि ताबडतोब तो कुष्ठरोगी बरा झाला. “हे जे घडले ते कुणाला सांगू नकोस, तर जाऊन स्वतःला याजकांना दाखव आणि तू कुष्ठरोगमुक्त झालास ह्याचे प्रमाण म्हणून मोशेने ठरवून दिलेले अर्पण वाहून टाक. ह्यामुळे तू शुद्ध झाल्याचे लोकांना कळेल.”

येशू सेनाधिकाऱ्याच्या नोकराला बरे करतो(B)

येशू कफर्णहूम शहरास गेला. जेव्हा त्याने शहरात प्रवेश केला, तेव्हा एक सेनाधिकारी त्याच्याकडे आला आणि विनंती करू लागला की, “प्रभु, माझा नोकर पक्षाघाताने खूपच त्रासलेला आहे व तो माझ्या घरात पडून आहे.”

येशू त्याला म्हणाला, “मी येऊन त्याला बरे करीन.”

तेव्हा सेनाधिकारी म्हणाला, “प्रभु, आपण माझ्या घरी यावे इतकी माझी योग्यता नाही. आपण फक्त शब्द बोला म्हणजे माझा नोकर बरा होईल. कारण मी स्वतः दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करतो आणि माझ्या हाताखाली देखील अनेक शिपाई आहेत. मी एखाद्याला जा म्हणतो आणि तो जातो आणि दुसऱ्याला ये म्हटल्यावर तो येतो. मी माझ्या नोकराला अमूक कर असे सांगतो आणि तो ते करतो.”

10 येशूने जेव्हा हे ऐकले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले आणि जे त्याच्यामागुन चालत होते. त्यांना तो म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, इस्राएलात इतका मोठा विश्वास असलेला एकही मनुष्य मला आढळला नाही. 11 मी तुम्हांला सांगतो, पुष्कळ जण पूर्वेकडून आणी पश्चिमेकडून येतील आणि अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्यासह स्वर्गाच्या राज्यात मेजासभोवती मेजवानीसाठी बसतील. 12 परंतु जे खरे वारस आहेत. ते बाहेरच्या अंधरात टाकले जातील. तेथे रडणे व दात खाणे चालेल.”

13 मग येशू सेनाधिकाऱ्याला म्हणाला, “जा, तू जसा विश्वास धरलास तसे होईल.” आणि त्याच क्षणी त्याचा नोकर बरा झाला.

येशू अनेकांना बरे करतो(C)

14 मग येशू पेत्राच्या घरी आला. तेथे पेत्राची सासू तापाने आजारी पडली आहे, असे येशूने पहिले. 15 त्याने तिच्या हाताला स्पर्श केला तेव्हा तिचा ताप निघाला. मग ती उठून त्याची सेवा करू लागली.

16 त्या संध्याकाळी लोकांनी भूतबाधा झालेल्या पुष्कळ लोकांना त्याच्याकडे आणले येशूने शब्द बोलून ती भुते घालविली व सर्व प्रकारच्या रोग्यांना बरे केले 17 यशया संदेष्ट्यांच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. यशयाने असे म्हटले होते:

“त्याने आमच्या व्याधी स्वतःवर घेतल्या,
    त्याने आमचे रोग वाहिले.” (D)

येशूला अनुसरणे(E)

18 आपल्या भोवती खूप लोक आहेत हे येशूने पाहिले तेव्हा त्याने त्यांना सरोवराच्या पलीकडे जाण्याची आज्ञा केली. 19 मग एक नियमशास्त्राचा शिक्षक त्याच्याकडे आला आणि म्हणाला, “गुरुजी, आपण जेथे जाल तेथे मी आपल्या मागे येईन.”

20 येशू त्याला म्हणाला, “कोल्ह्यांना राहायला बिळे आणि आकाशातील पाखरांना घरटी आहेत. परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके सुद्धा टेकावयास जागा नाही.”

21 मग येशूच्या शिष्यांपैकी आणखी एक जण येशूला म्हणाला, “प्रभु, पहिल्यांदा मला जाऊ द्या व माझ्या वडिलांना पुरून येऊ द्या.”

22 पण येशू त्याला म्हणाला, “तू माझ्या मागे ये. जे मेलेले आहेत त्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरू दे.”

येशू वादळ थांबवितो(F)

23 मग येशू नावेत गेल्यावर त्याच्यामागून त्याचे शिष्य नावेत गेले. 24 अचानक, समुद्रात इतके मोठे वादळ झाले की, नाव लाटांमध्ये पूर्णपणे गुरफटून गेली. आणि येशू तर नावेत झोपला होता. 25 तेव्हा शिष्य त्याच्याकडे गेले आणि त्यांनी त्याला जागे केले व म्हटले, “प्रभु, आम्हांला वाचवा, आपण बुडत आहोत.”

26 येशूने उत्तर दिले, “तुम्ही विश्वासात किती उणे आहात रे? तुम्ही का घाबरता?” मग त्याने उठून वारा व लाटा यांना अधिकारवाणीने शांत होण्यास सांगितले. वारा थांबला. समुद्र अगदी शांत झाला.

27 तेव्हा लोकांना मोठे आश्चर्य वाटले, ते म्हणाले, “हा कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे? वारा व समुद्र देखील त्याचे ऐकतात.”

येशू दोन माणसांमधून भूते काढतो(G)

28 मग येशू समुद्राच्या पलीकडे असलेल्या गरदेकरांच्या देशात आला, तेव्हा दोन भूतबाधा झालेली माणसे स्मशानातून येशूकडे आली. ही माणसे स्मशानातील कबरांध्ये राहत होती. ती फार भेसूर होती, त्यामुळे कोणीही त्यांच्या वाटेला जात नसे. 29 ती दोघे येशूकडे आली व म्हणाली, “देवाच्या पुत्रा, तुला आमच्याकडून काय पाहिजे? नेमलेल्या वेळेपूर्वीच तू आम्हांला शिक्षा करायला आलास काय?”

30 त्या ठिकाणापासून थोड्या अंतरावर डुकरांचा एक कळप चरत होता. 31 ती भुते त्याला विनंती करू लागली, ती म्हणाली, “जर तू आम्हाला ह्यांच्यामधून काढून टाकणार असशील तर आम्हांला त्या डुकरांच्या कळपात जाऊ दे.”

32 तेव्हा तो त्यांना म्हणाला, “जा.” मग ती त्यांच्यामधून निघून डुकरांमध्ये गेली. तेव्हा तो संपूर्ण कळप कड्यावरून खाली धावत जाऊन पाण्यात बुडाला. 33 मग त्यांना चारणारे पळाले व त्यांनी नगरात जाऊन सर्वांना हे वर्तमान, तसेच भूतबाधा झालेल्यांचे काय झाले तेही सांगितले. 34 तेव्हा सर्व शहर येशूला भेटायला निघाले; आणि जेव्हा त्यांनी त्याला पाहिले तेव्हा येशूने त्यांच्या प्रदेशातून निघून जावे अशी विनंती त्यांनी त्याला केली.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center