Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
उत्पत्ति 30

30 याकोबापासून आपल्याला मुले होत नाहीत हे पाहिल्यावर राहेल आपली बहीण लेआ हिचा मत्सर करु लागली; तेव्हा राहेल याकोबला म्हणाली, “मला मुले देणारी करा नाही तर मी मरेन.”

याकोब राहेलीवर रागावला; तो म्हणाला, “तुला पुत्रवती करायला मी काय देव आहे? देवानेच तुला मुले होऊ नयेत असे करुन ठेवले आहे.”

मग राहेल म्हणाली, “तुम्ही माझी दासी बिल्हा उपपत्नी म्हणून घ्या; तुम्ही तिच्याजवळ निजा; मग ती माझ्या मांडीवर बाळंत होईल व तिजपासून मला मूल मिळेल; तिच्यामुळे मग मलाही मुलगा होईल आणि मी आई होईन.”

तेव्हा राहेलीने बिल्हा आपला नवरा याकोब ह्याला उपपत्नी म्हणून दिली; आणि याकोब तिजपाशी गेला; तेव्हा बिल्हा याकोबापासून गरोदर राहिली व तिला मुलगा झाला.

राहेल म्हणाली, “देवाने माझी प्रार्थना ऐकली आहे. त्याने मला मुलगा देण्याचे ठरवले;” म्हणून तिने त्याचे नाव दान ठेवले.

बिल्हा पुन्हा गर्भवती झाली व तिला याकोबापासून दुसरा मुलगा झाला; राहेल म्हणाली, “मी माझ्या बहिणीशी जिद्दीने स्पर्धा करुन कठीन लढा दिला आहे व जय मिळवला आहे.” तेव्हा तिने त्याचे नाव नफताली ठेवले.

लेआने असे पाहिले की, आता आपल्याला आणखी मुले होणार नाहीत; तेव्हा तिने आपली दासी जिल्पा हीला आपला नवरा याकोब याला उपपत्नी म्हणून दिली. 10 नंतर जिल्पाला मुलगा झाला; 11 तेव्हा लेआ म्हणाली, “मी कितीतरी भाग्यवान आहे;” तेव्हा तिने त्याचे नाव गाद ठेवले. 12 जिल्पाला आणखी एक मुलगा झाला; 13 तेव्हा लेआ म्हणाली, “आता मला खूप आनंद झाला आहे! इतर स्त्रिया मला धन्य म्हणतील” मग तिने त्याचे नाव आशेर ठेवले.

14 गव्हाच्या हंगामाच्या दिवसात रुबेन शेतात गेला असता त्याला काही विशेष प्रकारची फुले सांपडली [a] त्याने ती फुले आपली आई लेआ हिच्याकडे आणून दिली; परंतु राहेल लेआला म्हणाली, “तुझा मुलगा रुबेन याने आणलेल्या पुत्रदात्रीच्या फुलातून काही फुले कृपा करुन मला दे.”

15 लेआने उत्तर दिले, “अगोदरच तू माझा नवरा घेतलास तर घेतलास, आणि आता माझ्या मुलाने आणलेली पुत्रदात्रीची फुलेही तू माझ्याकडून घेण्याचा प्रयत्न करतेस काय?”

परंतु राहेल म्हणाली, “जर तुझ्या मुलाने आणलेली पुत्रदात्रीची फुले मला देशील तर त्यांच्या मोबदल्यात आज रात्री तुला याकोबापाशी निजावयाला मिळेल.”

16 याकोब शेतावरुन त्या रात्री घरी आला; लेआने त्याला पाहिले व ती त्याला भेटावयास बाहेर गेली; व ती म्हणाली, “आज रात्री तुम्ही माझ्याजवळ निजणार आहात कारण माझ्या मुलाने आणलेली पुत्रदात्रीची फुले राहेलीस देऊन मी त्यांचा मोबदला भरुन दिला आहे.” तेव्हा याकोब त्या रात्रीं लेआपाशी निजला.

17 तेव्हा देवाने लेआची कूस फलदायी केली व ती पुन्हा गर्भवती होऊन तिला पाचवा मुलगा झाला; 18 लेआ म्हणाली, “देवाने माझ्या कृत्याचे मला बक्षीस दिले आहे कारण मी माझी दासी माझ्या नवऱ्याला दिली.” तेव्हा लेआने आपल्या मुलाचे नाव इस्साखार ठेवले.

19 लेआ पुन्हा गरोदर राहिली व तिला सहावा मुलगा झाला. 20 ती म्हणाली, “देवाने मला उत्तम देणगी दिली आहे; आता मात्र माझा नवरा प्रेमाने माझा स्वीकार करील कारण मी त्याला सहा मुलगे दिले आहेत;” म्हणून लेआने त्याचे नाव जबुलून ठेवले.

21 त्यानंतर लेआला एक मुलगी झाली; तिने तिचे नाव दीना ठेवले.

22 मग देवाने राहेलीची प्रार्थना ऐकली; देवाने तिला मुल होणे शक्य केले; 23 म्हणून राहेल गर्भवती झाली व तिला मुलगा झाला; 24 राहेल म्हणाली, “देवाने माझी लाजीरवाणी स्थिती दूर करुन मला मुलगा दिला आहे.” म्हणून राहेलीने त्याचे नाव योसेफ ठेवले.

याकोब लाबानास फसवितो

25 मग योसेफाच्या जन्मानंतर याकोब लाबानाला म्हणाला, “आता मला माझ्या स्वतःच्या घरी जाऊ द्या. 26 मला माझ्या बायका व माझी मुले द्या; मी कष्टाने तुमची सेवाचाकरी करुन ती मिळवली आहेस, मी चौदा वर्षे तुमची चांगली सेवा केली आहे हे तुम्ही जाणता.”

27 लाबान म्हणाला, “थांब, तुझी इच्छा असेल तर मला थोडे बोलू दे. परमेश्वराने केवळ तुझ्यामुळे मला आशीर्वादित केले आहे हे मी जाणतो. 28 तर मी तुला काय वेतन देऊ हे मला सांग म्हणजे ते मी तुला देईन.”

29 याकोबाने उत्तर दिले, “मी अतिशय कष्टाने तुमची सेवाचाकारी केली आहे हे तुम्ही जाणता; आजपर्यंत मी काळजी घेतल्यामुळे तुमचे कळप वाढले आहेत व ते चांगले पोसलेले आहेत; 30 मी जेव्हा तुमच्याकडे आलो तेव्हा तुम्हापाशी फार थोडी शेरडेमेंढरे होती; परंतु आता तुम्हापाशी किती तरी कळप आहेत; ज्या ज्या वेळी मी तुमच्यासाठी काही केले त्या प्रत्येक वेळी परमेश्वराने तुम्हाला आशीर्वादित केले आहे. आता मात्र मी स्वतःसाठी काही करण्याची व माझ्यासाठी घर बांधण्याची वेळ आली आहे.”

31 लाबानेने विचारले, “तर मग मी तुला काय देऊ?”

याकोबाने उत्तर दिले, “तुम्ही मला काही द्यावे असे मला नको आहे. मला फक्त मी केलेल्या सेवाचाकरीचा मोबदला पाहिजे; एकढी एकच गोष्ट करा, म्हणजे मग मी पूर्वीप्रमाणे आपले कळप चारीन व सांभाळीन; 32 परंतु आजच मला तुमच्या सगळ्या कळपात जाऊ द्या म्हणजे त्यांच्यात फिरुन त्यातील मेंढरापैकी ठिबकेदार व पट्टे असलेली मेंढरे व बकरे आणि काळ्या रंगाची मेंढरे तसेच शेरडांपैकी ठिबकेदार व पट्टे असलेली शेरडे मी बाजूला करीन; हेच माझे वेतन असेल. 33 त्यानंतर कधीही तुम्ही पाहाल तर मी प्रामाणिक आहे किंवा नाही हे सहज तुम्हाला दिसेल, तुम्ही कधीही येवून माझे कळप पाहू शकात; जर त्यात तुम्हाला ठिबकेदार व पट्टे नसलेली शेरडे व काळी नसलेली मेंढरे आढळली तर ती मी चोरली असे तुम्हाला समजेल.”

34 लाबानाने उत्तर दिले, “ठीक आहे, हे मी मान्य करतो; तू म्हणतोस तसे आपण करु;” 35 परंतु त्याच दिवशी लाबानाने ठिबकेदार व बांडे एडके तसेच ठिबकेदार व बांड्या शेळ्या आणि मेंढरापैकी काळी मेंढरे कळपातून काढून लपवली; गुपचूप ती आपल्या मुलांच्या हवाली केली व त्यांवर लक्ष ठेवून त्यांना सांभाळण्यास सांगितले; 36 तेव्हा त्याच्या मुलांनी ती ठिबकेदार व पट्टे असलेली सर्व जनावरे घेऊन मजला करीत तीन दिवसांच्या अंतरावरील दुसऱ्या जागी नेली; याकोब मात्र मागे राहून उरलेली म्हणजे ठिबके पट्टे व काळी नसलेली जनावरे सांभाळीत राहिला.

37 मग याकोबाने हिवर व बदाम या झाडांच्या हिरव्या कोवळ्या फांद्या कापून घेतल्या; त्याने त्यांच्या साली, त्याचे आतील पांढरे पट्टे दिसेपर्यंत त्या सोलून काढल्या; 38 त्याने त्या पांढऱ्या काळ्या किंवा पांढरे फोक कळपांच्या समोर पाणी पिण्याच्या पन्हाळात व कुंड्यात ठेवले जेव्हा शेळ्या मेंढ्या पाणी पिण्यास तेथे येत तेव्हा त्यांच्यावर त्याचे नर उडत व त्या फळत 39 तेव्हा त्यांना ठिबकेदार, पांढऱ्या पट्टयांची किंवा काळी करडे कोकरे होत असत.

40 याकोब कळपातील इतर जनावरातून ठिबकेदार, पांढऱ्या पट्टयांची व काळी करडे कोंकरे लाबानाच्या कळपापासून वेगळी करुन ठेवत असे. 41 जेव्हा जेव्हा कळपातील चांगली पोसलेली जनावरे फळत असत तेव्हा तेव्हा याकोब त्या पांढऱ्या फांद्या त्यांच्या नजरे समोर ठेवी आणि मग ती जनावरे त्या फांद्या समोर फळत; 42 परंतु जेव्हा दुर्बल, अशक्त जनावरे फळत तेव्हा याकोब त्यांच्या नजरे समोर त्या झाडांच्या फांद्या ठेवत नसे; म्हणून मग अशक्त नरमाद्यापासून झालेली करडी कोंकरे लाबानाची होत; आणि सशक्त नरमाद्यापासून झालेली करडी कोंकरे याकोबाची होत; 43 अशा प्रकारे याकोब अतिशय श्रीमंत झाला; त्याच्यापाशी शेरडेमेंढरे, उंट, गाढवे व दासदासी हे सर्व भरपूर होते.

मार्क 1

येशू खिस्ताचे येणे(A)

देवाचा पुत्र [a] येशू ख्रिस्त याच्या शुभवर्तमानाची सुरूवात. यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात असे लिहिले आहे:

“ऐका! मी माझ्या दूताला तुझ्याकडे पाठवीत आहे
    तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील. (B)

“तेथे रानात एक व्यक्ति ओरडून सांगत होती:
‘प्रभूसाठी मार्ग तयार करा,
    त्याच्यासाठी वाटा सरळ करा.’” (C)

मग बाप्तिस्मा करणारा योहान आला व रानात लोकांचे बाप्तिस्मे करू लागला. लोकांना त्याने सांगीतले की, जर त्यांना त्यांची अंतःकरणे बदलायची असतील तर त्यांनी पश्चात्तापाचा बाप्तिस्मा घ्यायला पाहिजे. मग त्यांच्या पापांची क्षमा केली जाईल. यहूदीया व यरूशलेम येथील सर्व लोक योहानाकडे आले, त्यांनी आपली पापे कबूल केल्यावर त्याने त्यांचा यार्देन नदीत बाप्तिस्मा केला.

योहान उंटाच्या केसांपासून केलेली वस्त्रे वापरीत असे. त्याच्या कंबरेला कातड्याचा पट्टा होता आणि तो टोळ व रानमध खात असे.

योहानाने लोकांना हा संदेश दिला: “माझ्यापेक्षाही महान असा कोणी एक येत आहे, तो माझ्यानंतर येत आहे. मी त्याच्या वहाणांचा बंद सोडण्याच्यादेखील पात्रतेचा नाही. मी तुमचा पाण्याने बाप्तिस्मा करतो पण तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करील.”

येशूचा बाप्तिस्मा(D)

त्यावेळी येशू गालीलातील नासरेथहून जेथे योहान होता त्या ठिकाणी आला. यार्देन नदीत योहानाने येशूचा बाप्तिस्मा केला. 10 येशू पाण्यातून वर येत असता त्याने आकाश उघडलेले पाहिले. आणि पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतरासारखा आला. 11 आकाशातून वाणी झाली. ती म्हणाली, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्यावर मी प्रेम करतो. तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.”

परीक्षा होण्यासाठी येशू दूर जातो(E)

12 नंतर आत्म्याने येशूला एकट्याला रानात पाठविले. 13 येशू रानात चाळीस दिवस होता. तो तेथे हिंस्त्र प्राण्यांबरोबर होता. तो तेथे असता सैतान त्याला मोह पाडून त्याची परीक्षा बघत होता. पण दूत येऊन त्याची सेवा करीत होते.

येशू गालीलात त्याच्या कामाचा प्रारंभ करतो(F)

14 यानंतर, योहानाला तुरुंगात टाकण्यात आले. येशू गालीलास गेला व देवाकडून आलेली सुवार्ता त्याने सांगितली. 15 येशू म्हणाला, “आता योग्य वेळ आली आहे. देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा.”

येशू काही शिष्य निवडतो(G)

16 येशू गालीलाच्या सरोवराजवळून जात होता तेव्हा त्याने शिमोन [b] व शिमोनाचा भाऊ अंद्रिया याला सरोवरात जाळे टाकताना पाहिले कारण ते मासे धरणारे होते. 17 येशू त्यांना म्हणाला, “माझ्या मागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.” 18 मग ते लगेचच जाळी सोडून त्याच्यामागे चालू लागले.

19 आणि तो थोडा पुढे गेल्यावर त्याला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे दिसले. ते त्यांच्या नावेत होते व आपली जाळी तयार करीत होते. 20 त्याने लगेच त्यांना हाक मारली. मग त्यांनी आपले वडील जब्दी व नोकरचाकर यांना नावेत सोडले आणि ते त्याच्या मागे गेले.

दुष्ट आत्मा असलेल्या मनुष्याला येशू बरे करतो(H)

21 येशू व त्याचे शिष्य कफर्णहूमास गेले. लगेच येणाऱ्या शब्बाथ दिवशी येशू सभास्थानात गेला आणि लोकांना त्याने शिकविले. 22 त्याच्या शिकवणुकीने ते चकित झाले, कारण येशू नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे शिकवीत नव्हता, तर त्याला अधिकार असल्यासारखा शिकवीत होता. 23 त्यांच्या सभास्थानात एक भूतबाधा झालेला मनुष्य होता, तो एकदम मोठ्याने ओरडला, 24 आणि म्हणाला, “नासरेथच्या येशू, तुला आमच्याकडून काय पाहिजे? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे, देवाचा पवित्र असा तू आहेस.”

25 परंतु येशूने त्याला अधिकारवाणीने म्हटले, “शांत राहा व याच्यातून नीघ.” 26 नंतर अशुद्ध आत्म्याने त्याला पिळले व तो मोठ्याने ओरडून त्याच्यातून बाहेर गेला.

27 आणि लोक आश्चर्यचकित झाले, व एकमेकांस विचारू लागले, “येथे काय चालले आहे? हा मनुष्य काही तरी नवीन शिकवीत आहे. आणि तो अधिकाराने शिकवीत आहे. तो दुष्ट आत्म्यांना आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकातात!” 28 मग येशूविषयीची बातमी ताबडतोब गालीलाच्या सर्व प्रदेशात पसरली.

येशू पुष्कळ लोकांना बरे करतो(I)

29 येशू व त्याच्या शिष्यांनी सभास्थान सोडले आणि लागलीच ते योहान व याकोब यांच्याबरोबर शिमोन व अंद्रिया यांच्या घरी गेले. 30 शिमोनाची सासू तापाने बिछान्यावर पडली होती. तेव्हा त्यांनी ताबडतोब येशूला तिच्याविषयी सांगितले. 31 तो तिच्याकडे गेला आणि तिला हाताला धरून त्याने उठविले. आणि तिचा ताप निघून गेला व ती त्याची सेवा करू लागली.

32 संध्याकाळ झाली आणि सूर्य अस्ताला गेल्यावर त्यांनी सर्व आजारी लोकांस आणि भुतांनी पछाडलेल्या लोकांस त्याच्याकडे आणले. 33 तेव्हा सर्व शहर घरापाशी दारापुढे जमा झाले. 34 त्याने निरनिराळ्या रोगांनी आजारी असलेल्यांना बरे केले व अनेक लोकांतून भुते काढली. पण त्याने भुतांना बोलू दिले नाही कारण ती त्याला ओळखत होती.

येशू लोकांना सुवार्ता सांगण्याची तयारी करतो(J)

35 अगदी पहाटेच अंधार असतानाच त्याने घर सोडले आणि तो एकांत स्थळी गेला. तेथे त्याने प्रार्थना केली. 36 शिमोन व त्याच्यासोबत असलेले येशूचा शोध करीत होते, 37 आणि जेव्हा त्यांना तो सापडला तेव्हा ते त्याला म्हणाले, “सर्वजण तुमचा शोध करीत आहेत.”

38 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “आपण जवळपासच्या ठिकाणी जाऊ या, म्हणजे मला तेथे देखील उपदेश करणे शक्य होईल. कारण त्या कारणासाठीच मी बाहेर पडलो आहे.” 39 मग तो सर्व गालीलातून, त्यांच्या सभास्थातून उपदेश करीत आणि भुते काढीत फिरला.

येशू एका आजारी मनुष्याला बरे करतो(K)

40 एक कुष्ठरोगी येशूकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याने स्वतःला बरे करण्याची विनंति केली. तो येशूला म्हणाला, “जर तुमची इच्छा असेल तर तुम्हामध्ये मला शुद्ध करण्याचे सामर्थ आहे.”

41 येशूला त्याची दया आली. मग त्याने हात लांब केला आणि त्याला स्पर्श केला व त्याला म्हणाला, “मला तुला बरे करावयाचे आहे. तुझा कुष्टरोग बरा होवो.” 42 आणि लगेच त्याचे कुष्ठ गेले व तो शूद्ध झाला.

43 येशूने त्याला सक्त ताकीद दिली व लगेच जाण्यास सांगितले. येशू त्याला म्हणाला, 44 “पाहा, याविषयी कोणाला काहीही सांगू नकोस, परंतु जा आणि स्वतःला याजकाला दाखव. व स्वतःच्या शुद्धीकरणासाठी मोशेच्या आज्ञेप्रमाणे अर्पण कर. हे यासाठी कर की, तू शुद्ध झाला आहेस याची त्या सर्वांना साक्ष पटावी.” 45 परंतु तो मनुष्य गेला व त्याने मोकळेपणाने सांगण्यास सुरुवात केली व ही बातमी पसरविली. याचा परिणाम असा झाला की, येशूला उघडपणे शहरात जाता येईना. म्हणून तो एकांतवासात राहिला. आणि चोहोबाजूंनी लोक त्याच्याकडे आले.

एस्तेर 6

मर्दखयचा सन्मान

त्याच दिवशी रात्री राजाला झोप येईना. म्हणून त्याने एका सेवकाला कालवृत्तांत आणायला सांगून वाचून दाखवायला सांगितला. (एखाद्या राजाच्या कारकिर्दीतील सगळ्या घडामोडी या राजांच्या इतिहासग्रंथात नोंदवलेल्या असतात.) सेवकाने तो वृत्तांत राजाला वाचून दाखवला. राजा अहश्वेरोशला ठार करण्याच्या कटाबद्दलचा मजकूर त्याने वाचला. राजद्वारावर पहारा करणाऱ्या बिग्थान आणि तेरेश या राजाच्या दोन सेवकांनी राजाचा वध करायचा कट रचला होता पण मर्दखयला या कटाचा सुगावा लागला आणि त्याने ही बातमी एकाला दिली. त्याची ती हकीकत होती.

त्यावर राजाने विचारले, “त्याबद्दल मर्दखयचा सन्मान कसा केला गेला? त्याला काय इनाम दिले?”

तेव्हा सेवक राजाला म्हणाले, “मर्दखयसाठी काहीच केले गेले नाही”

हामान तेव्हा नुकताच राजमहालाबाहेरच्या आवारात शिरत होता. आपण उभारायला सांगितलेल्या वधस्तंभावर मर्दखयला फाशी द्यायला त्याला राजाला सांगायचे होते. राजाला त्याची चाहूल लागली. राजा म्हणाला, “आत्ता चौकात कोण आले?” राजाचे सेवक म्हणाले, “हामान चौकात थांबला आहे”

तेव्हा राजा म्हणाला, “त्याला आत घेऊन या”

हामान आत आला तेव्हा राजाने त्याला विचारले, “हामान, राजाला एखाद्याचा सन्मान करायचा असेल तर त्याच्यासाठी काय करावे?”

हामानने मनातल्या मानात विचार केला, “राजाला सन्मान करावासा वाटेल असा माझ्याखेरीज दुसरा कोण असणार? माझेच गौरव करण्याबद्दल राजा बोलत आहे हे नक्की.”

तेव्हा हामान राजाला म्हणाला, “राजाला ज्याचा सन्मान करायचा आहे त्याच्यासाठी हे करावे, राजाने स्वतः परिधान केलेले राजवस्त्र नोकरांमार्फत आणावे. राजा ज्या घोड्यावर बसतो तो घोडाही आणावा. राजाच्या मस्तकी ठेवतात तो राजमुगुट आणावा. मग राजाच्या एखाद्या महत्वाच्या अधिकाऱ्याच्या हाती राजवस्त्र आणि घोडा या गोष्टी सोपवाव्यात. राजाला ज्याचा सन्मान करायचा आहे त्याच्या अंगावर या अधिकाऱ्याने ती वस्त्रे घालावीत आणि त्याला घोड्यावर बसवून नगरातील रस्त्यांवर फिरवावे. या अधिकाऱ्याने त्या व्यक्तीला पुढे घेऊन नेताना घोषित करावे की ‘राजाला ज्याचा सन्मान करायचा असतो त्याच्यासाठी असे केले जाते.’”

10 “मग जा पटकन” राजा हामानला म्हणाला. “वस्त्र आणि घोडा घेऊन ये आणि तू सुचवलेस त्याप्रमाणे सगळे यहुदी मर्दखय साठी कर. मर्दखय राजद्वाराजवळच बसलेला आहे. तुझ्या सुचनेप्रमाणे सर्व काही कर.”

11 तेव्हा हामानने वस्त्र आणि घोडा आणाला. मर्दखयला ते वस्त्र घालून त्याला घोड्यावर पुढे बसवून नगरातील रस्त्यांवर फिरवले. मर्दखय पुढे चालून त्याने ललकारी दिली, “राजा एखाद्याच्या सन्मानार्थ असे करतो.”

12 एवढे झाल्यावर मर्दखय राजद्वाराशी परतला. पण हामान घाईघाईने घरी परतला. शरमिंदेपणाने खाजील होऊन त्याने आपले तोंड झाकून घेतले. 13 आपली बायको जेरेश आणि आपले सगळे मित्र यांना त्याने जे जे झाले ते सगळे सांगितले, हामानची बायको आणि त्याला सल्ला देणारे मित्र त्याला म्हणाले, “मर्दखय यहुदी असेल तर तुझी जीत होणे शक्य नाही. तुझ्या अधःपाताला सुरुवात झाली आहे. तुझा विनाश होईल हे नक्की.”

14 हे सगळे हामानशी बोलत असतानाच राजाचे खोजे हामानच्या घराकडे आले. एस्तेरने आयोजित केलेल्या मेजवानीला निघायची त्यांनी त्याला घाई केली.

रोमकरांस 1

प्रेषित होण्यासाठी पाचारण केलेला; देवाची सुवार्ता सांगण्यासाठी वेगळा केलेला ख्रिस्त येशूचा सेवक पौल याजकडून. देवाच्या संदेष्ट्यांच्या द्वारे पवित्र शास्त्रात पूर्वी सांगितलेली होती, 3-4 ती ही सुवार्ता देवाचा पुत्र प्रभु येशू ख्रिस्त जो देहाने एक मनुष्य म्हणून दाविदाच्या वंशात जन्माला आला याच्याविषयी आहे.पण पवित्रतेच्या आत्म्याच्याद्वारे तो मरणातून पुन्हा जिवंत झाला त्यामुळे त्याच्या सामर्थ्यासह “देवाचा पुत्र” असा गणला गेला.

त्या आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे आम्हांला कृपा आणि प्रेषित पद मिळाले आहे. अशासाठी की जे यहूदी नाहीत त्यांच्यामध्ये त्याच्या नावांकरिता विश्वासाच्या आज्ञापालनामुळे जो आज्ञाधारकपणा निर्माण होतो तो निर्माण करावा. तुम्हीही त्या यहूदी नसलेल्यांमध्ये आणि देवाकडून येशू ख्रिस्ताचे अनुयायी होण्यासाठी बोलाविलेले आहात.

ज्या लोकांवर देवाने प्रेम केले आहे व त्याचे पवित्र जन होण्यासाठी बोलाविलेले असे जे लोक रोममध्ये आहेत त्या सर्वांना मी लिहित आहे.

आपला पिता व प्रभु येशू ख्रिस्त यांजकडून तुम्हांस कृपा व शांति असो.

आभाराची प्रार्थना

सुरुवातीलाच तुम्हां सर्वांसाठी येशू ख्रिस्ताद्वारे मी देवाचे आभार मानतो, कारण तुमचा विश्वास जगात सगळीकडे जाहीर होत आहे. देव माझा साक्षी आहे, ज्याची सेवा मी आत्म्याने त्याच्या पुत्राची सुवार्ता सांगून करतो. मी तुमची नेहमी आठवण करतो. 10 माझ्या प्रार्थनेत मी नेहमी मागतो, जर देवाची इच्छा असेल तर शेवटी मला तुम्हांला भेटता येणे शक्य व्हावे. 11 मला तुम्हांला भेटण्याची फार इच्छा आहे. यासाठी की काही आध्यात्मिक दानांविषयी तुम्हांबरोबर सहभागी व्हावे आणि तुम्ही बलवान व्हावे. 12 म्हणजे जोपर्यंत मी तुमच्यामध्ये आहे तोपर्यंत आपण एकमेकांना विश्वासामध्ये मदत करु. माझ्या विश्वासामुळे तुम्हांला व तुमच्या विश्वासामुळे मला फायदा होईल.

13 बंधूनो, पुष्कळ वेळा तुम्हांला भेट देण्याची मला इच्छा झाली. यासाठी की, जसे मला यहूदीतरांमध्ये मिळाले, तसे तुमच्यामध्येसुद्धा फळ मिळावे. परंतु आतापर्यंत मला तुमच्यापर्यंत येण्यास अडथळे आले हे तुम्हांला माहीत असावे.

14 मी सर्व लोकांची-ग्रीक आणि ग्रीक नसलेले, शहाणे आणि मूर्ख-सेवा केली पाहिजे. 15 त्यासाठीच तुम्ही जे रोममध्ये आहात त्या तुम्हांला सुद्धा सुवार्ता सांगण्याची माझी फार इच्छा आहे.

16 मला सुवार्तेची लाज वाटत नाही. कारण देवाचे सामर्थ्य जो कोणी विश्वास ठेवतो त्या सर्वासाठी तारण आहे. प्रथम यहूद्यांकारिता आणि नंतर ग्रीकांसाठी. 17 कारण सुवार्तेमध्ये देवाचे नितिमत्व ते विश्वासापासून विश्वास असे प्रगट झाले आहे. पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, “नितिमान विश्वासाद्वारे वाचेल.”

सर्व लोकांनी चुका केल्या आहेत

18 लोकांनी केलेल्या प्रत्येक अनितीच्या कृत्यांमुळे व जे आपल्या अनीतीने सत्य दाबून ठेवतात, त्यांच्यामुळे स्वर्गातून देवाचा क्रोध प्रगट होतो. 19 हे असे होत आहे कारण देवाविषयीचे ज्ञान त्यांच्यात दिसून येते व देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे.

20 जगाच्या निर्मितीपासून देवाचे अदृश्य गुण, त्याचे सनातन सामर्थ्य व त्याचे देवपण हे देवाने ज्या गोष्टी निर्माण केल्या त्यावरुन प्रगट होतात. आणि जर तुम्हांला हे कळत नाही, तर ह्याचे तुम्हांला कसलेच समर्थन करता येणार नाही.

21 कारण जरी त्यांना देव माहीत होता तरी त्यांनी देव म्हणून त्याचा आदर केला नाही, किंवा त्याचे आभार मानले नाहीत, उलट ते आपल्या विचारात निष्फळ झाले आणि मूर्ख अंतःकरणे अंधकारमय झाली. 22 जरी गर्वाने त्यांनी स्वतःला शहाणे समजले तरी ते मूर्ख ठरले. 23 आणि अविनाशी देवाचे गौरव याची मर्त्य मानव, पक्षी, चार पायाचे प्राणी, सरपटणारे प्राणी यांच्यासारख्या दिसणाऱ्या प्रतिमांशी अदलाबदल केली.

24 यासाठी देवाने त्यांना त्यांच्या मनातील वाईट वासनांच्या व वैषयिक अशुद्धतेमुळे सोडून दिले आणि त्यांनी एकमेकांच्या देहाचा अनादर करावा यासाठी त्यांस मोकळीक दिली. 25 त्यांनी देवाच्या खरेपणाशी लबाडीची अदलाबदल केली व निर्माणकर्त्याऐवजी जे निर्मिलेले त्याची उपासना केली. निर्माणकर्ता सर्वकाळ धन्यवादित आहे. आमेन.

26 तेव्हा त्याची त्यांना शिक्षा मिळावी म्हणून देवाने नाईलाजाने त्यांना त्यांच्यावर सोडून दिले. त्यांना लाजिरवाण्या वासनांच्या स्वाधीन केले. त्यांच्या स्त्रियांनी स्त्रियांशी अनैसर्गिक संबंध ठेवले. 27 तसेच पुरुषांनी स्त्रियांबरोबर नैसर्गिक संबंध ठेवणे बाजूला ठेवले व ते एकमेकाविषयी वासनेने पेटून निघाले. पुरुषांनी पुरुषांशी अनुचित कर्म केले आणि आपल्या ह्या निर्लज्ज कृत्यांमुळे त्यांना त्यांच्यामध्ये हे फळ मिळाले.

28 आणि जेव्हापासून त्यांनी देवाला ओळखण्याचे नाकारले, तेव्हापासून देवाने त्यांना अशुद्ध मनाच्या हवाली केले व ज्या अयोग्य गोष्टी त्यांनी करु नयेत त्या करण्यास मोकळीक दिली. 29 ते सर्व प्रकारची अनीति, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा, हेवा, खून, भांडणे, कपट, कुबुद्धि यांनी भरलेले असून दुसऱ्याविषयी नेहमी वाईट विचार करतात. 30 ते चहाडखोर, दुसऱ्याची निंदा करणारे, देवाचा तिटकारा करणारे, उद्धट, बढाया मारणारे, वाईट मार्ग शोधून काढणारे, आईवडिलांची आज्ञा न मानणारे; तसेच 31 मूर्ख, दिलेले वचन मोडणारे, कुटुंबियांबद्दल वात्सल्य नसणारे, दुष्ट असे आहेत. 32 देवाच्या नितिमत्वाचा जो नियम सांगतो की, जे लोक असे वागतात ते मरणास योग्य आहेत असे जरी त्यांना माहीत होते तरी ते त्या गोष्टी करतात इतकेच नव्हे तर जे असे करतात त्यांना मान्यताही देतात.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center