Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
उत्पत्ति 20

अब्राहाम गरारास जातो

20 अब्राहामाने ते ठिकाण सोडले व तो नेगेबकडे म्हणजे यहूदा प्रांताच्या दक्षिणेकडील वाळवंटाच्या भागाकडे प्रवास करीत गेला, आणि कादेश व शूर यांच्या दरम्यान असलेल्या गरार नगरात त्याने वस्ती केली; गरारात असताना अब्राहामाने सारा आपली बहीण असल्याचे लोकांना सांगितले. गराराचा राजा अबीमलेख याने हे ऐकले. त्याला सारा हवी होती म्हणून त्याने काही माणसे पाठवून तिला राजवाड्यात आणले. परंतु रात्री देव अबीमलेखाच्या स्वप्नात येऊन म्हणाला, “तू आता नक्की मरशील कारण तू आणलेली स्त्री विवाहित आहे.”

अबीमलेखाने अद्याप साराला स्पर्श केला नव्हता. तेव्हा अबीमलेख म्हणाला, “प्रभु, मी दोषी नाही, मग एका निरपराध माणसाला तू मारुन टाकणार काय? कारण अब्राहामाने स्वतः मला सांगितले की, ‘ही स्त्री माझी बहीण आहे,’ आणि त्या स्त्रीने ही सांगितले की, ‘हा माझा भाऊ आहे,’ तेव्हा मी निरपराधी आहे; मी काय करीत होतो हे मला कळले नाही.”

मग देव अबीमलेखाला स्वप्नात म्हणाला, “होय! मला माहीत की तू निरपराधी आहेस आणि तसेच तू काय करत होता हे तुला कळले नाहीं; म्हणूनच मी तुला वाचविले आणि माझ्या विरुद्ध तू पाप करु नयेस म्हणून मी तुला आवरले; आणि मीच तुला साराला स्पर्श करु दिला नाही. तेव्हा आता तू अब्राहामाची बायको त्याची त्याला परत दे; अब्राहाम माझ्या वतीने बोलणारा संदेष्टा आहे; तो तुझ्यासाठी प्रार्थना करील व तू वाचशील; परंतु तू सारेला अब्राहामाकडे परत पाठवले नाहीस तर मग मी सांगतो की तू आणि तुझ्या बरोबर तुझे सर्व कुटुंबीय खात्रीने मराल.”

दुसऱ्या दिवशी पहाटे अबीमलेखाने आपल्या सर्व सेवकांना बोलावून त्याने स्वप्नात पाहिलेल्या सर्वगोष्टी त्यांना सांगितल्या; ते सर्वजण फार घाबरले. मग अबीमलेखाने अब्राहामास बोलावून आणले व म्हटले, “तू हे असे आम्हाला का केलेस? मी तुझे काय वाईट केले? मी तुझ्याविरुद्व काय गैर वागलो? तू असे खोटे का बोललास की ती तुझी बहीण आहे? तू माझ्या राज्यावर मोठे संकट आणलेस; तू माझ्याशी अशा गोष्टी करायच्या नव्हत्या. 10 तुला कशाची भीती वाटली? अशा रीतीने तू माझ्याशी का वागलास?”

11 मग अब्राहाम म्हणाला, “मला भीती वाटली येथील कोणीही लोक देवाचे भय धरीत नाहीत असे मला वाटले आणि म्हणून माझी बायको सारा मिळविण्यासाठी कोणीही मला ठार मारील असे मला वाटले. 12 ती माझी बायको आहे हे खरे आहे, तरी पण ती माझी नात्याने बहीण लागते हे ही तितकेच खरे आहे; कारण ती माझ्या बापाची मुलगी आहे पण माझ्या आईची ती मुलगी नाही. 13 देवाने मला माझ्या बापाच्या घरापासून दूर नेले आणि बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी भटकायला लावले; आणि असे झाले तेव्हा मी साराला सांगितले, ‘माझ्यासाठी एवढे कर की आपण जिकडे जाऊ तिकडे तू माझी बहीण आहेस असे लोकांना सांग.’”

14 हे समजल्यावर अबीमलेखाने अब्राहामाला सारा परत दिली; तसेच त्याने त्याला मेंढरे, बैल व दास दासीही दिल्या. 15 अबीमलेख म्हणाला, “तुझ्या अवती भोवती चौफेर नजर टाक; हा सर्व माझा देश आहे; तुला पाहिजे तेथे तू राहा.”

16 अबीमलेख सारेला म्हणाला, “तुझा भाऊ अब्राहाम याला मी एक हजार चांदीची नाणी दिली आहेत; यासाठी की तेणेकडून, ह्या ज्या गोष्टी घडल्या त्या सर्वाबद्दल मला दु:ख होत आहे, हे इतरास समजावे आणि माझा न्यायीपणा व निरपरधीपणा व तुझी शुद्धता सर्व लोकांना कळावीत.”

17-18 परमेश्वराने अबीमलेखाच्या कुटुंबातील सर्व स्त्रियांची गर्भाशये त्यांना मुले होऊ नयेत म्हणून बंद केली होती; देवाने हे केले कारण अबीमलेखाने अब्राहामाची बायको सारा हिला त्याच्या घरी नेले होते; परंतु अब्राहामाने देवाची प्रार्थना केली आणि देवाने अबीमलेख, त्याची बायको आणि त्याच्या दासी यांना मुले न होण्याच्या दोषापासून बरे केले.

मत्तय 19

येशू घटस्फोटाविषयी शिकवतो(A)

19 येशूने या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर तो गालीलातून निघून गेला. आणि यार्देन नदीच्या दुसऱ्या किनाऱ्याकडील यहूदा प्रांतात गेला. तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे गेला आणि तेथील अनेक आजरी लोकांना येशूने बरे केले.

काही परूशी येशूकडे आले. येशूने चुकीचे काही बोलावे असा प्रयत्न त्यांनी चालविला. त्यांनी येशूला विचारले, कोणत्याही कारणास्तव एखाद्या मनुष्याने आपल्या पत्नीला सोडचिठ्ठी द्यावी काय?

येशूने उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असे लिहिलेले तुमच्या वाचनात निश्चितच आले असेल की, जेव्हा देवाने जग उत्पन्न केले, [a] आणि देव म्हणाला, ‘म्हणून पुरूष आपल्या आईवडिलांना सोडिल व आपल्या पत्नीला जडून राहील. ती दोघे एकदेह होतील.’a म्हणून दोन व्यक्ति या दोन नाहीत तर एक आहेत. देवाने त्या दोघांना एकत्र जोडले आहे. म्हणून कोणाही व्यक्तिने त्यांना वेगळे करू नये.”

परुश्यांनी विचारले, “असे जर आहे, तर मग पुरूषाने सोडचिठ्टी लिहून देण्याची आणि आपल्या पत्नीला सोडून देण्याची मोकळीक देणारी आज्ञा मोशेने का दिली?”

येशूने उत्तर दिले, “तुम्ही दावाची शिकवण मानण्यास नकार दिल्याने तुमच्या पत्नींना सोडून देण्याची मोकळीक दिली. पण सुरुवातीला सोडचिठ्ठी देण्याची मोकळीक नव्हती. मी तुम्हांसा सांगतो, जो मनुष्य आपली पत्नी सोडून देतो आणि दुसरीशी लग्न करतो तो व्यभिचार करतो. आपल्या पत्नीला सोडचिठ्ठी देण्याचे एकच कारण आहे, ते म्हणजे पहिल्या पत्नीने परपुरुषांशी व्यभिचार करणे होय.”

10 मग त्याचे शिष्य त्याला म्हणाले, “जर पती व पत्नीमधील परिस्थिति अशी असेल तर मग लग्न न करणे जास्त योग्य ठरेल.”

11 येशूने उत्तर दिले, “लग्नाविषयीची अशी शिकवण स्वीकारणे प्रत्येक मनुष्याला शक्य होणार नाही. परंतू काही जणांना देवाने ही शिकवण ग्रहण करण्यास संमति दिली आहे. 12 काही लोकांची लग्न न करण्याची कारणे निराळी असू शकतील. जन्मापासूनच काही माणसे अशी असतात की, ती मुलांना जन्म देऊ शकत नाहीत. इतर काही माणसांनी काही जणांना तसे बनविलेले असते तर आणखी काही माणसांनी स्वर्गाच्या राज्याकरिता लग्न करने सोडून दिले आहे, परंतू ज्याला लग्न करणे शक्य होईल, त्या मनुष्याने लग्नाविषयी ही शिकवण मान्य करावी.”

येशू बालकांचे स्वागत करतो(B)

13 नंतर येशूने आपल्या मुलांवर हात ठेवून प्रार्थना करावी यासाठी काही लोकांनी आपली मुले त्याच्याकडे आणली. येशूच्या शिष्यांनी त्यांना पाहिल्यावर ते बालकांना घेऊन येशूकडे येण्यास मना करू लागले. 14 परंतु येशू म्हणाला, “लहान मुलांना मजकडे येऊ द्या, त्यांना मना करू नका, कारण स्वर्गाचे राज्य या लहान मुलांसारख्या लोकांचेच आहे.” 15 मुलांवर हात ठेवल्यावर येशू तेथून निघून गेला.

एक श्रीमंत मनुष्य येशूला अनुसरण्याचे नाकारतो(C)

16 एक मनुष्य येशूकडे आला आणि त्याने विचारले, “गुरूजी अनंतकाळचे जीवन मिळावे म्हणून मी कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत?”

17 येशूने उत्तर दिले, “काय चांगले आहे असे मला का विचारतोस? फक्त देव एकच चांगला आहे पण जर तुला अनंतकाळचे जीवन पाहिजे तर सर्व आज्ञा पाळ.”

18 त्याने विचारले, “कोणत्या आज्ञा?”

येशूने उत्तर दिले, “‘खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको. 19 आपल्या आईवडिलांना मान दे’b आणि ‘जशी स्वतःवर प्रीति करतोस तशी इतंरावर प्रीति कर.’” [b]

20 तो तरुण म्हणाला, “या सर्व आज्ञा मी पाळत आलो आहे. मी आणखी काय करावे?”

21 येशूने उत्तर दिले, “तुला जर परिपूर्ण व्हायचे असेल तर जा आणि तुझे जे काही आहे ते विकून टाक. आणि ते पैसे गरीबांना वाटून दे. म्हणजे स्वर्गात तुला मोठा ठेवा मळेल. मग ये आणि माझ्यामागे चालू लाग.”

22 पण जेव्हा त्या तरूणाने हे ऐकले, तेव्हा त्याला फार दु:ख झाले. कारण तो खूप श्रीमंत होता, म्हणून तो येशूला सोडून निघून गेला.

23 तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी तुम्हाला खरे सांगतो, धनवान माणासाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणे फार कठीण जाईल. 24 मी तुम्हांला सांगतो की, धनवानाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नेढ्यातून जाणे जास्त सोपे आहे.”

25 जेव्हा शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार आश्चर्यचकित झाले. त्यांनी येशूला विचारले, “मग कोणाचे तारण होईल?”

26 येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले आणि तो म्हणाला, “मनुष्यांना हे अशक्य आहे, पण देवासाठी सर्व गोष्टी शक्य आहेत.”

27 पेत्र येशूला म्हणाला, “पाहा, आम्ही सर्व काही सोडले आणि तुमच्या मागे आलो आहोत; मग आम्हांला काय मिळेल.?”

28 येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, नव्या युगात जेव्हा मनुष्याचा पुत्र त्याच्या गौरवी सिंहासनावर बसेल तेव्हा तुम्ही जे सर्व माझ्यामागे आलात ते सर्व बारा आसनांवर बसाल आणि इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय कराल. 29 ज्याने ज्याने माझ्या मागे येण्याकरिता आपले घर, भाऊ, बहीण, आईवडील, मुले, शेतीवाडी सोडली असेल तर त्याला त्यापेक्षा कितीतरी जास्तपटीने लाभ होईल व त्याला अनंतकाळचे जीवन मिळेल. 30 पण पुष्कळसे जे आता पहिले आहेत ते शेवटचे होतील आणि जे शेवटचे आहेत ते पहिले होतील.

नहेम्या 9

इस्राएलींचा पापाचा कबुलीजबाब

त्याच महिन्याच्या चोविसाव्या दिवशी सर्व इस्राएल लोक उपवासासाठी एकत्र जमले. आपल्याला शोक झाला आहे हे सूचित करणारे कपडे त्यांनी घातले होते. तसेच आपली विमनस्कता दाखवण्यासाठी त्यांनी केसात राख घालून घेतली होती. मूळ इस्राएली लोक परकी लोकांमध्ये न मिसळता वेगळा गट करून उभे होते. इस्राएलींनी मंदिरात उभे राहून आपल्या तसेच आपल्या पूर्वजांच्या पापांची कबुली दिली. तीन तास तिथे उभे राहून त्यांनी परमेश्वर देवाच्या नियमशास्त्राच्या ग्रंथाचे वाचन केले. पुढे आणखी तीन तास त्यांनी आपल्या पातकांचे कबुलीजबाब दिले आणि खाली वाकून परमेश्वराची उपासना केली.

मग लेवी जिन्यावर उभे राहिले. या लेवींची नावे पुढीलप्रमाणे: येशूवा, बानी, कदमीएल, शबन्या, बुन्नी, शेरेब्या बानी, आणि कनानी. त्यांनी खूप मोठयाने परमेश्वर देवाचा धावा केला. मग पुढील हे लेवी पुन्हा बोलले: येशुवा, बानी, कदमीएल, बानी, हशबन्या, शेरेब्या, होदीया, शबन्या आणि पथह्या. ते म्हणाले, “उभे राहा आणि आपला परमेश्वर देव याचे स्तवन करा. देवाचे अस्तित्व पहिल्यापासून आहे आणि परमेश्वर चिरकाल राहील.

“लोक तुझ्या वैभवशाली नावाचे स्तवन करोत.
    तुझे नाम स्तुती आणि आशीर्वाद यांच्या पलीकडे उंचावले जावो.
तू देव आहेस.
    परमेश्वरा, तूच फक्त देव आहेस.
आकाश तू निर्माण केलेस.
    स्वर्ग आणि त्यातील सगळे काही तू केलेस.
ही पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही
    तू निर्माण केलेले आहेस.
सर्व समुद्र आणि त्यांच्यातील सगळ्याचा तूच निर्माता आहेस!
    तू सगळयात जीव ओतलेस.
स्वर्गातील देवदूत तुला वाकून अभिवादन करतात
    व तुझी उपासना करतात.
हे परमेश्वरा, तूच देव आहेस.
    तू अब्रामाची निवड केलीस.
बाबेलमधील (खास्द्यातील) ऊर नगरातून त्याला
    तू बाहेर काढून त्याला अब्राहाम असे नाव दिलेस.
तो तुझ्याशी प्रामाणिक आणि निष्ठावान आहे
    असे पाहून त्याच्याशी तू करार केलास.
कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, यबूसी
    आणि गिर्गाशी यांचा देश त्याला द्यायचे वचन दिलेस.
अब्राहामाच्या वंशजांना हा भूभाग द्यायचे तू वचन दिलेस
    आणि तू ते पाळलेस. कारण, तू भला आहेस.
मिसरमधील आमच्या पूर्वजांच्या यातना तू पाहिल्यास.
    आणि त्यांनी तांबड्या समुद्राजवळ मदतीसाठी केलेला धावा तू ऐकलास.
10 फारोला तू चमत्कार दाखवलेस.
    त्याचे अधिकारी आणि त्याची प्रजा यांच्यासाठी आश्चर्यकारक कृत्ये केलीस.
आमच्या त्या पूर्वजांपेक्षा आपण चांगले आहोत असे मिसरचे लोक समजत होते,
    हे तू जाणून होतास.
पण तुझी थोरवी तू सिध्द करून दाखवलीस.
    अजूनही त्यांना त्या गोष्टीचे स्मरण आहे.
11 त्यांच्या डोळयादेखत तू तांबडा समुद्र दुभंगून दाखवलास.
    आणि ते कोरड्या जमिनीरुन चालत गेले.
मिसरचे सैन्य त्यांचा पाठलाग करत होते
    पण तू त्या शत्रूला समुद्रात फेकून दिलेस
    आणि ते समुद्रात दगड बुडावा तसे बुडुन गेले.
12 दिवसा तू त्यांना (आमच्या पूर्वजांना) मेघस्तंभाने मार्गदर्शन केलेस
    आणि रात्री तू अग्निस्तंभ वापरलास.
अशा प्रकारे त्यांचा मार्ग प्रकाशमान करत
    तू त्यांना वाट दाखवलीस.
13 मग तू सीनाय पर्वतावर उतरलास,
    त्यांच्याशी आकाशातून बोललास,
तू त्यांना चांगले नियम घालून दिलेस,
    त्यांना खरी शिकवण दिलीस.
    चांगले नियम आणि आज्ञा तू त्यांना घालून दिल्यास.
14 शब्बाथ या तुझ्या विश्रांतीच्या खास दिवसाचा त्यांना परिचय करून दिलास.
    तुझा सेवक मोशे याच्या हस्ते तू त्यांना आज्ञा,
    नियम आणि धर्मशास्त्र दिलेस.
15 ते भुकेले होते म्हणून
    तू त्यांना आकाशातून अन्न दिलेस.
ते तहानलेले होते,
    म्हणून त्यांना खडकातून पाणी दिलेस.
आणि तू त्यांना म्हणालास,
    ‘या, ही जमीन घ्या’,
आपल्या शक्तिसामर्थ्याने त्यांच्यासाठी
    तू जमीन संपादन केलीस.
16 पण आमचे पूर्वज उन्मत्त झाले.
    अहंमन्य बनले, आणि त्यांनी तुझ्या आज्ञांचे पालन करायचे नाकारले.
17 ते ऐकेनात तू जी आश्चर्यकारक कृत्ये
    त्यांच्यासमोर केलीस ती ते विसरले.
ते हट्टी झाले.
    त्यांच्या बंडखोरपणामुळे त्यांनी मिसरला परत जायचे ठरवले आणि पुन्हा गुलाम होण्यासाठी.

“पण तू क्षमाशील देव आहेस.
    तू दयाळू आणि कृपाळू आहेस.
तू सहनशील व प्रेमळ आहेस
म्हणून तू त्यांना सोडले नाहीस.
18 त्यांनी सोन्याच्या वासरांच्या मूर्ती केल्या आणि
    ‘आम्हाला मिसर मधून सोडवणारे हेच ते देव’ असे ते म्हणाले.
    तरी तू त्यांचा त्याग केला नाहीस.
19 तू कृपावंत आहेस.
    म्हणूनच तू त्यांना वाळवंटात सोडून दिले नाहीस.
दिवसा तू त्यांच्यावरुन मेघस्तंभ
    काढून घेतला नाहीस.
तू त्यांना मार्ग दाखवत राहिलास.
रात्रीही तू त्यांच्यावरचा अग्निस्तंभ
    काढून टाकला नाहीस
त्यांच्या पुढचा मार्ग उजळत
    तू त्यांना वाट दाखवत राहिलास.
20 त्यांना शहाणपण येण्यासाठी तू त्यांना आपला सदात्मा दिलास.
    अन्न म्हणून त्यांना मान्ना दिलास.
    त्यांना तहान लागलेली असताना त्यांना पाणी दिलेस.
21 चाळीस वर्षे तू त्यांची काळजी वाहिलीस.
    वाळवंटात त्यांच्या सर्व गरजा भागल्या.
त्यांचे कपडे जीर्ण झाले नाहीत
    त्यांच्या पावलांना सूज आली नाही की दुखापत झाली नाही.
22 हे परमेश्वरा, त्यांना तू राज्ये आणि राष्ट्रे दिलीस.
    फार लोकवस्ती नसलेली लांबलांबची ठिकाणे दिलीस.
हेशबोनच्या राजाचा म्हणजे सिहोनचा प्रांत त्यांना मिळाला.
    बाशानचा राजा ओग याचा भूभाग त्यांना मिळाला.
23 त्यांच्या वंशजांची संख्या
    तू आकाशातील तारकाप्रमाणे विपुल केलीस.
त्यांच्या पूर्वजांना कबूल केलेल्या प्रदेशापर्यंत
    त्यांना तू नेऊन पोचवलेस.
    त्यांनी पुढे जाऊन तो प्रदेश ताब्यात घेतला.
24 या वंशजांनी तो प्रदेश घेतला.
तेथे राहणाऱ्या कनान्यांचा त्यांनी पराभव केला.
    तूच त्यांच्या हातून हा पराभव करवलास.
हे देश, तिथले लोक आणि राजे यांच्याशी
    तू त्यांना मन मानेल तसे वागू दिलेस
25 त्यांनी मजबूत नगरांचा कब्जा घेतला.
    सुपीक प्रदेश त्यांनी मिळवला,
उत्तम वस्तूनी भरलेली घरे
    त्यांना मिळाली खोदलेल्या विहिरी
त्यांना आयत्या मिळाल्या.
    द्राक्षमळे, जैतूनाची झाडे आणि पुष्कळशी फळझाडे त्यांना मिळाली,
खाऊन पिऊन ते तृप्त झाले, पुष्ट झाले.
    तू त्यांना दिलेल्या मनोहारी गोष्टीचा
त्यांनी उपभोग घेतला.
26 आणि मग ते तुझ्यावर उलटले.
    तुझ्या शिकवणीचा त्यांनी त्याग केला,
    त्यांनी तुझ्या संदेष्ट्यांचा वध केला.
या संदेष्ट्यांनी लोकांना सावध केले होते.
    त्यांना ते परत तुझ्या मार्गावर आणू पाहात होते.
    पण आमच्या पूर्वजांनी मात्र तुझ्याविरुद्ध भयंकर दुराचरण केले.
27 म्हणून तू त्यांना शत्रूच्या ताब्यात जाऊ दिलेस.
    शत्रूने त्यांना फार हैराण केले.
अडचणीत सापडल्यावर आमच्या पूर्वजांनी मदतीसाठी तुला आवाहन केले
    आणि स्वर्गातून तू त्यांचा धावा ऐकलास.
तू फार कनवाळू आहेस.
    म्हणून त्यांच्या रक्षणार्थ तू लोकांना पाठवलेस.
    आणि या लोकांनी त्यांची शत्रू पासून सुटका केली.
28 मग निवांतपणा लाभल्यावर आमच्या पूर्वजांनी पुन्हा ती
    दुष्कृत्ये करायला सुरुवात केली.
तेव्हा तू शत्रू कडून त्यांचा पाडाव करवलास
    आणि शासन करवलेस.
त्यांनी मदतीसाठी तुझा धावा केला.
    तो तू स्वर्गातून ऐकलास आणि त्यांच्या मदतीला गेलास किती बरे
तू कनवाळू आहेस!
    असे अनेकदा घडले.
29 तू त्यांना बजावलेस.
तू त्यांना तुझ्या शिकवणीकडे परतायला सांगितलेस.
    पण ते फार अहंमन्य झाले होते.
    तुझ्या आज्ञा ऐकायचे त्यांनी नाकारले.
तुझ्या नियमाप्रमाणे आचरण करणारा खरेखुरे जीवन जगतो.
    पण आमच्या पूर्वजांनी तुझ्या नियमाचा भंग केला.
ते दुराग्रही झाले होते.
    त्यांनी तुझ्याकडे पाठ फिरवली
    त्यांनी तुझे ऐकायचे नाकारले.

30 “आमच्या पूर्वजांच्या बाबतीत तू खूप सहनशीलता दाखवलीस.
    अनेक वर्षे तू त्यांना गैरवर्तन करु दिलेस.
आपल्या आत्म्याने तू त्यांना बजावलेस.
    त्यांना समज द्यायला संदेष्टे पाठवलेस
पण आमच्या पूर्वजांनी ऐकले नाही.
    तेव्हा त्यांना तू इतर देशातल्या लोकांच्या हवाली केलेस.

31 “पण तू किती दयाळू आहेस.
    तू त्यांचा समूळ संहार केला नाहीस.
त्यांचा तू त्याग केला नाहीस. देवा,
    तू किती कृपाळू आणि दयाळू आहेस.
32 हे देवा, तू महान देव आहेस.
    दरारा उत्पन्न करणारा आणि पराक्रमी योध्दा आहेस
तू निष्ठा बाळगणारा आहेस.
    तू करार पाळतोस आमच्यावर
अनेक आपत्ती आल्या
    आणि आमच्या अडचणींना
तू महत्व देतोस आम्ही सर्वजण,
    आमचे राजे आणि नेते,
    आमचे याजक आणि संदेष्टे
या सर्वांवर अरिष्ट आले.
    अश्शूर राजाच्या काळापासून आजतागायत भयानक गोष्टी ओढवल्या.
33 पण देवा, आमच्या बाबतीत जे घडले त्या सगळया गोष्टींच्या बाबतीत तुझे खरे होते.
    तुझे बरोबर होते आणि आम्ही चुकत होतो
34 आमचे राजे, नेते, याजक आणि पूर्वज यांनी तुझे नियमशास्त्र पाळले नाही.
    तुझ्या आज्ञा ऐकल्या नाहीत.
    तू दिलेल्या खबरदारीच्या सूचनाकंडे त्यांनी दुर्लक्ष केले.
35 स्वतःच्या राज्यात राहात असताना देखील आमच्या पूर्वजांनी तुझी सेवा केली नाही.
    त्यांनी दुष्कृत्ये करायचे थांबवले नाही.
    तू त्यांना बहाल केलेल्या अनेक उत्तमोत्तम गोष्टींचा त्यांनी उपभोग घेतला.
सुपीक जमीन आणि विशाल प्रदेश याचा त्यांनी उपभोग घेतला.
    पण तरीही स्वतःच्या वाईट कृत्यांना त्यांनी आळा घातला नाही.
36 आणि आता आम्ही गुलाम झालो आहोत.
या भूमीत, आमच्या पूर्वजांनी इथली फळे चाखावी
    आणि इथे पिकणाऱ्या चांगल्या गोष्टींचा
    आस्वाद घ्यावा म्हणून तू त्यांना दिलेल्या
    या भूमीत आम्ही गुलाम आहोत.
37 या जमिनीत मुबलक पीक येते पण आम्ही पाप केले,
    त्यामुळे तू आमच्यावर नेमलेल्या राजांच्या पदरीच हे पीक जाते.
या राजांचे आमच्यावर आणि आमच्या गुराढोरांवर नियंत्रण आहे.
    ते मन मानेल तसे वागतात.
    आम्ही मोठ्या संकटात आहोत.

38 “या सगळया गोष्टींमुळे आम्ही करार करत आहोत. तो बदलता येणार नाही. तो आम्ही लेखी करत आहोत. आमचे अधिकारी, लेवी, याजक हे या करारावर स्वाक्षऱ्या करून त्यावर शिक्कामोर्तब करत आहेत.”

प्रेषितांचीं कृत्यें 19

इफिस येथे पौल

19 तेव्हा असे झाले की, अपुल्लो करिंथ येथे असताना पौल निरनिराळ्या भागातून प्रवास करीत इफिस येथे आला, तेथे त्याला येशूचे काही अनुयायी आढळले. पौलाने त्यांना विचारले, “जेव्हा तुम्ही विश्वास ठेवला, तेव्हा तुम्हांला पवित्र आत्मा मिळाला काय?”

ते अनुयायी त्याला म्हणाले, “पवित्र आत्मा आहे हे सुद्धा आम्ही ऐकलेले नाही!”

तो म्हणाला, “मग कसला बाप्तिस्मा तुम्ही घेतला?”

ते म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा.”

पौल म्हणाला, “योहानाचा बाप्तिस्मा पश्चात्तापाचा होता. त्याने लोकांना सांगितले की, त्याच्यानंतर जो येत आहे, त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवावा. तो येणारा म्हणजे येशू होय.”

जेव्हा त्यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांनी प्रभु येशूच्या नावात बाप्तिस्मा घेतला. आणि जेव्हा पौलाने त्याचे हात त्यांच्यावर ठेवले, तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले व भविष्य सांगू लागले. या गटात सर्व मिळून बारा पुरुष होते.

पौल यहूदी सभास्थानात जात असे व तीन महिने धैर्याने बोलत असे, देवाच्या राज्याविषयी चर्चा करीत व यहूदी लोकांचे मन वळवीत असे. परंतु त्यांच्यातील काही कठीण मनाचे झाले. व त्यांनी विश्वास ठेवण्यास नकार दिला, आणि देवाच्या मार्गाविषयी वाईट बोलले. मग पौल त्यांच्यातून निघून गेला व शिष्यांनाही त्यांच्यातून वेगळे केले. आणि तुरन्नाच्या शाळेत दररोच त्यांच्याशी चर्चा केली. 10 हे असे दोन वर्षे चालले, याचा परिणाम असा झाला की, आशियात राहत असलेल्या सर्व यहूदी व यहूदीतर लोकांपर्यंत प्रभु येशूचे वचन पोहोंचले.

11 देवाने पौलाच्या हातून असामान्य चमत्कार घडविले. 12 पौलाने वापरलेले रुमाल आणि कपडेही काही लोक नेत असत. लोक या गोष्टी आजारी लोकांवर ठेवीत असत. जेव्हा ते असे करीत तेव्हा आजारी लोक बरे होत आणि दुष्ट आत्मे त्यांना सोडून जात.

13-14 काही यहूदी सुद्धा सगळीकडे प्रवास करीत असत व लोकांमधून दुष्ट आत्मे घालवीत असत. ते दुष्ट आत्म्याने पछाडलेल्या व्यक्तिमधून प्रभु येशूच्या नावाने ते आत्मे घालवीत असत. ते म्हणत, “पौल ज्या येशूच्या नावाने घोषणा करतो त्या नावाने मी तुला आज्ञा करतो.” स्किवा नावाच्या यहूदी मुख्य याजकाचे सात पुत्र असे करीत होते.

15 परंतु एकदा एक अशुद्ध आत्मा त्यांना म्हणाला, “मी येशूला ओळखतो, पौल मला माहीत आहे, पण तुम्ही कोण आहात?”

16 मग ज्याला दुष्ट आत्मा लागला होता त्या मनुष्याने त्यांच्यावर उडी मारली. त्याने त्यांच्यावर सरशी केली व त्यांना पराभूत केले. तेव्हा ते दोघे उघडे व जखमी होऊन घरातून पळाले.

17 इफिस येथे राहणाऱ्या सर्व यहूदी व यहूदीतर लोकांना हे समजले. तेव्हा सर्वांना भीति वाटली, आणि लोक प्रभु येशूच्या नावाचा अधिकच आदर करु लागले. 18 पुष्कळसे विश्वासणारे पापकबुली देऊ लागले व ज्या वाईट गोष्टी त्यांनी केल्या होत्या, त्या सांगू लागले. 19 काही विश्वासणान्यांनी जादूची कामे केली होती. या विश्वासणान्यांनी आपली जादूची पुस्तके सर्व लोकांसमोर आणली आणि जाळली. त्या पुस्तकांची किंमत पन्नास हजार चांदीच्या नाण्यांइतकी भरली. 20 अशा रीतीने प्रभूच्या वचनाचा दूरवर प्रसार झाला व ते फार परिणामकारक ठरले.

Paul Plans a Trip

21 या गोष्टी घडल्यानंतर पौलाने मनात ठरविले की, मासेदोनिया व अखया या प्रांतांतून प्रवास करीत पुढे यरुशलेमला जायचे. तो म्हणाला, “मी तेथे गेल्यांनतर मला रोमदेखील पाहिलेच पाहिजे.” 22 म्हणून त्याचे दोन मदतनीस तीमथ्य व एरास्त यांना त्याने मासेदोनियाला पाठवून दिले. आणि त्याने आणखी काही काळ आशियात घालविला.

इफिस येथे दंगा

23 याकाळामध्येत्यामार्गाविषयी (ख्रिस्ती चळवळीविषयी) मोठा गोंधळ उडला. 24 देमेत्रिय नावाचा एक मनुष्य होता. तो सोनार होता. तो अर्तमी देवीचे देव्हारे बनवीत असे. जे कारागीर होते त्यांना यामुळे खूप पैसे मिळत.

25 त्या सर्वांना व या धंद्याशी संबंध असलेल्या सर्वांना त्याने एकत्र केले, आणि तो म्हणाला, “लोकहो, तुम्हांला माहीत आहे की, या धंद्यापासून आपल्याला चांगला पैसा मिळतो. 26 पण पहा तो पौल नावाचा मनुष्य काय करीत आहे! तो काय म्हणत आहे ते ऐका! पौलाने पुष्कळ लोकांना प्रभावित केले आहे व बदलले आहे. त्याने हे इफिसमध्ये व सगळ्या आशियामध्ये केले आहे, तो म्हणतो, माणसांच्या हातून बनविलेले देव खरे देव नाहीत. 27 यामुळे केवळ आपल्या धंद्याची बदनामी होण्याची भीति नसून अर्तमी या महान देवीच्या मंदिराचे महत्व नाहीसे होईल व तिचे मोठेपण नाहीसे होण्याची भीति आहे. ही अशी देवी आहे की, जिची पूजा सर्व आशियात व जगात केली जाते.”

28 जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार रागावले, आणि मोठ्याने ओरडून म्हणू लागले, “इफिसकरांची अर्तमी थोर आहे!” 29 शहरातील लोकांमध्ये गोंधळ उडाला. आणि लोकांनी गायस व अरीस्तार्ख या पौलाबरोबर सोबती म्हणून प्रवास करणाऱ्या मासेदिनियाच्या रहिवाश्यांना पकडून नाट्यगृहात नेले. 30 पौल लोकांच्या पुढे जाऊ इच्छीत होता पण येशूचे अनुयायी त्याला असे करु देईनात 31 पौलाचे काही मित्र जे प्रांताधिकारी होते, त्यांनी निरोप पाठवून त्याने नाट्यगुहात जाऊ नये अशी कळकळीची विनंति केली.

32 एकत्र जमलेल्या जमावातून काही लोक एक घोषणा करु लागले तर दुसरे लोक इतर घोषणा करु लागले. त्यामुळे सगळा जमाव अगदी गोंधळून गेला. आणि त्यातील पुष्कळ जणांना माहीत नव्हते की, आपण या नाय्यभवनात एकत्र का आलोत. 33 यहूदी लोकांनी अलेक्सांद्र नावाच्या एका मनुष्याला ढकलीत नेऊन सर्वांच्या समोर उभे केले. तो आपल्या हातांनी खुणावून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करु लागला. 34 पण जेव्हा लोकांना समजले की, तो एक यहूदी आहे, तेव्हा जवळ जवळ दोन तास सातत्याने ते एका आवाजात ओरडत राहिले, “इफिसकरंची अर्तमी देवी थोर आहे!”

35 शहराचा लेखनिक लोकांना शांत करीत म्हणाला, “इफिसच्या लोकांनो, थोर अर्तमी देवीचे व स्वर्गातून पडलेल्या पवित्र दगडाचे इफिस हे रक्षणकर्ते आहे. हे ज्याला माहीत नाही असा एक तरी माणूस जगात आहे काय? 36 ज्याअर्थी या गोष्टी नाकारता येत नाहीत त्याअर्थी तुम्ही शांत राहिलेच पाहिजे. उतावळेपणा करु नये.

37 “तुम्ही या दोघांना (गायस व अरिस्तार्ख) येथे घेऊन आलात. वस्तुतःत्यांनी मंदिरातील कशाचीही चोरी केली नाही किंवा आपल्या देवीची निंदा केलेली नाही. 38 जर देमेत्रिय व त्याच्याबरोबर असलेल्या कारागिरांच्या काही तक्रारी असतील, तर त्यासाठी न्यायालये उघडी आहेत. तेथे ते एकमेकांवर आरोप करु शकतात!

39 “परंतु जर तुम्हांला एखाद्या गोष्टीची चौकशी करायची असेल तर नियमित सभेत त्यासंबंधी विचार केला जाईल. 40 आज येथे जे काही घडलेले आहे, त्याबद्दल योग्य ते कारण आपणांस सांगता येणार नाही, त्यामुळे आपणच ही दंगल सुरु केली असा आरोप आपल्यावर केला जाण्याची भीति आहे.” 41 असे सांगून झाल्यानंतर त्याने जमावाला जाण्यास सांगितले.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center