Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
उत्पत्ति 16

हागार दासी

16 अब्राम व त्याची बायको साराय यांना मुलबाळ नव्हते. साराय हिची हागार नावाची एक मिसरी म्हणजे मिसर देशाची एक दासी होती. साराय अब्रामाला म्हणाली, “परमेश्वराने मला मुले होण्यापासून रोखले आहे तेव्हा तुम्ही माझ्या दासीपाशी जा, तिच्यापोटी जन्मलेले मूल माझेच मूल आहे असे समजून मी ते स्वीकारीन.” अब्रामाने आपली बायको साराय हिचे म्हणणे मान्य केले.

कनान देशात अब्राम दहा वर्षे राहिल्यावर हे झाले आणि सारायने आपली मिसरी मोलकरीण हागार आपला नवरा अब्राम याला बायको म्हणून दिली.

हागार अब्रामापासून गरोदर राहिली; आपण गरोदर आहो हे पाहून आपण आपली मालकीण साराय हिच्यापेक्षा अधिक चांगल्या आहो असे हागारेला वाटू लागले व तिला गर्व झाला; परंतु साराय अब्रामाला म्हणाली, “माझी दासी हागार आता मला तुच्छ लेखते; त्या बद्दल मी तुम्हाला दोष देते, कारण मीच स्वतः तिला तुमची उपपत्नी होण्याचा मान दिला म्हणून ती गरोदर राहिली आणि आता ती माझ्यापेक्षा चांगली व विशेष आहे असे तिला वाटू लागले; परमेश्वर आपल्या दोघांचा न्याय करो.”

परंतु अब्राम सारायला म्हणाला, “तू हागारेची मालकीण आहेस, तुला काय पाहिजे तसे तू तिचे कर.” तेव्हा सारायने तिचा छळ केला म्हणून हागार पळून गेली.

हागारेचा मुलगा

शूर गांवाच्या वाटेवर वाळवंटातील एका पाण्याच्या झऱ्याजवळ हागार एका परमेश्वराच्या देवदूताला आढळलीं. देवदूत तिला म्हणाला, “सारायचे दासी हागारे, तू येथे का आलीस? तू कोठे जात आहेस?”

हागार म्हणाली, “माझी मालकीण साराय हिच्यापासून मी पळून जात आहे.”

परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, “साराय तुझी मालकीण आहे, तू तिच्याकडे घरी परत जा आणि तिच्या आज्ञेत राहा.” 10 परमेश्वराचा दूत आणखी म्हणाला, “तुझ्यापासून इतकी संतती होईल की ती मोजणे शक्य होणार नाहीं.”

11 परमेश्वराचा दूत पुढे आणखी म्हणाला,

“तू आता गरोदर आहेस
    आणि तुला मुलगा होईल
त्याचे नांव तू इश्माएल म्हणजे
    ‘परमेश्वर एकतो’ असे ठेव कारण प्रभूने तुझ्या दु:खविषयी ऐकले आहे; (तो तुझे सहाय्य करील.)
12 इश्माएल जंगली गाढवासारखा रानटी
    आणि स्वतंत्र असेल.
तो सर्वाविरुद्द व सर्व त्या विरुद्ध होतील;
    तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी
आपल्या भावांच्या जवळ तळ देत फिरेल,
    परंतु तो त्यांच्या विरुद्व असेल.”

13 परमेश्वर हागारेशी बोलला; हागारेने देवासाठी नवे नाव वापरायला सुरवात केली. ती म्हणाली, "तू मला पाहणारा देव आहेस, कारण मला समजते की या ठिकाणीही देव मला भेटतो व माझी काळजी करतो.” 14 तेव्हा तेथील विहिरीला बैर-लहाय-रोई [a] असे नांव पडले; ती विहीर कादेश व बेरेद यांच्या दरम्यान आहे.

15 हागारेला अब्रामापासून मुलगा झाला; अब्रामाने त्याचे नाव इश्माएल ठेवले. 16 त्या वेळी अब्राम शह्यांशी वर्षांचा होता.

मत्तय 15

देवाची आज्ञा आणि माणसांनी बनवलेले नियम(A)

15 तेव्हा यरूशलेमाहून काही परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक येशूकडे आले व म्हणाले, “तुमचे शिष्य पूर्वजांनी घालून दिलेले नियम का पाळत नाहीत? कारण तुमचे शिष्य जेवणापूर्वी हात धूत नाहीत.”

येशूने उत्तर दिले, “आणि तुम्ही तुमच्या परंपरा चालविण्यासाठी देवाची आज्ञा का मोडता? कारण देवाने सांगितले आहे की, ‘तुझ्या आईवडिलांचा मान राख’ [a] आणि जो कोणी आपल्या आईवडिलांबद्दल वाईट बोलतो, ‘त्याला जिवे मारावे.’ [b] पण तुम्ही म्हणता, जो कोणी पित्याला किंवा आईला म्हणेल की, तुला जे काही दिल्याने तुझा जो फायदा झाला असता, ते मी देवाला अर्पण केले आहे ते देवाचे नियम मोडीत आहेत. आपल्या वडिलांचा व आईचा सन्मान करू नये. याप्रकारे तुम्ही आपल्या अशा परंपरेने देवाचे वचन रद्द केले आहे. अहो ढोंग्यानो, तुम्हांविषयी यशया संदेष्ट्यांने योग्य सांगितले आहे. तो म्हणतो.

‘हे लोक, ओठांनी माझा सन्मान करतात
    पण त्यांचे ह्रदय माझ्यापासून दूर आहे.
आणि ते माणसाचे नियम आपली धर्मतत्त्वे म्हणून शिकवितात
    आणि व्यर्थच माझी उपासना करतात.’” (B)

10 तेव्हा लोकांना जवळ बोलावून त्याने म्हटले, “ऐका व समजून घ्या. 11 जे तोंडाद्वारे आत जाते ते माणसाला अशुद्ध करीत नाही, पण जे तोंडातून बाहेर निघते तेच माणसाला अशुद्ध करते.”

12 नंतर शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले, “परूश्यांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा ते रागावले हे आपणांला कळते काय?”

13 पण त्याने उत्तर देऊन म्हटले, “प्रत्येक रोपटे जे माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही ते उपटले जाईल. 14 त्यांना जाऊ द्या. ते आंधळे वाटाडे आहेत. जर एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवण्याचा प्रयत्न केला तर दोघेही खड्ड्यात पडतील.”

15 पेत्र म्हणाला, “आमच्यासाठी या बोधकथचे स्पष्टीकरण करा.”

16 “तुम्ही अजूनही बुद्धिमंदच आहेत काय?” येशूने त्यांना विचारले. 17 “जे काही तोंडात जाते ते सर्व पोटात जाते व मग बाहेर टाकले जाते. हे तुम्हांला अजून समजत नाही काय? 18 परंतु ज्या गोष्टी तोंडातून बाहेर निघतात त्या अंतःकरणातून येतात व त्याच माणसाला डागाळतात. 19 कारण वाईट विचार, खून, व्यभिचार, जारकर्मे, खोट्या साक्षी, निंदा ही अंतःकरणातून बाहेर निघतात. 20 माणसाला डागाळणाऱ्या याच गोष्टी आहेत न धुतलेल्या हाताने खाण्याने माणसाला विटाळ होत नाही.”

येशू यहूदी नसलेल्या स्त्रीला मदत करतो(C)

21 नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोनच्या भागात गेला. 22 तेव्हा एक कनानी स्त्री त्या भागातून येशूकडे आली. ती स्त्री ओरडून म्हणाली, “प्रभु, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भुताने पछाडली आहे.”

23 पण येशूने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही, तेव्हा त्याच्या शिष्यांनी येऊन त्याला विनंति केली, “तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागे ओरडत येत आहे.”

24 पण येशूने उत्तर दिले, “मला देवाने फक्त इस्राएलाच्या हरवलेल्या मेढरांकडे पाठविले आहे.”

25 मग ती स्त्री पुन्हा येशूकडे आली, ती येशूच्या पाया पडली व म्हणाली, “प्रभु, माझे साहाय्य करा.”

26 परंतु त्याने म्हटले, “मुलाची भाकर घेऊन कुत्र्यास टाकणे बरे नाही.”

27 ती स्त्री म्हणाली, “होय प्रभु, परंतु कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेले उष्टे चूर खातात.”

28 तेव्हा येशूने तिला म्हटले, “बाई, तुझा विश्वास मोठा आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे तुला होवो.” आणी तिची मुलगी बरी झाली.

येशू अनेकांना बरे करतो

29 नंतर येशू तेथून निघुन गालील सरोवराकडे गेला. येशू डोंगरावर गेला आणि तेथे बसला.

30 मग पुष्कळ लोक त्याच्याकडे आले, त्यांनी आपल्याबरोबर लुळे, पांगळे, आंधळे, बहिरे व इतर अनेक लोकांना आणले होते आणि त्यांनी त्या आजाऱ्यांना येशूच्या पायावर ठेवले. तेव्हा त्याने त्यांना बरे केले. 31 मुके बोलू लागले, लुळे सशक्त झाले. व्यंग असलेले चांगले झाले, लंगडे चालू लागले, आंधळे पाहू लागले. हे पाहून लोक थक्क झाले, आणि त्यांनी इस्राएलाच्या देवाचा गौरव केले.

येशू चार हजारांहून अधिकांना जेवू घालतो(D)

32 मग येशूने आपल्या शिष्यांस आपल्याजवळ बोलावून म्हटले, “मला लोकांचा कळवळा येतो. कारण ते आज तीन दिवस झाले माझ्याजवळ राहिले आहेत आणि त्यांच्याकडे खायला काही नाही, आणि त्यांना उपाशी पाठवावे अशी माझी इच्छा नाही. कारण ते वाटेत कदाचित मूर्च्छित होतील.”

33 शिष्य त्याला म्हणाले, “एवढ्या मोठ्या लोकसमुदायाला तृप्त करावे इतक्या भाकरी ह्या दूर रानात आमच्याजवळ कोठून असणार?”

34 तेव्हा येशू म्हाणाला, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?”

ते म्हणाले, “आमच्याकडे सात भाकरी आहेत व काही मासे आहेत.”

35 मग त्याने लोकांना जमिनीवर बसविण्याची आज्ञा केली. 36 मग त्या सात भाकरी व मासे घेऊन त्याने देवाचे उपकार मानले व त्या भाकरी मोडल्या व शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकांना दिल्या. 37 तेव्हा ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांनी भरलेल्या सात पाट्या गोळा केल्या. 38 आणि जेवणारे, स्त्रिया व लेकरे सोडून चार हजार पुरूष होते. 39 मग समुदायास निरोप दिल्यावर तो नावेत बसून मगदानाच्या हद्दीत गेला.

नहेम्या 5

नहेम्याची गरिबांना मदत

अनेक गरीब लोकांनी आपल्या यहुदी बांधवांविरुध्द तक्रार करायला सुरुवात केली. त्यांच्यापैकी काहीजण म्हणू लागले, “आम्हाला बरीच मुले बाळे आहेत. आम्हाला खायला मिळावे आणि आम्ही जिवंत राहावे यासाठी आम्हांला धान्य तर मिळाले पाहिजे.”

इतर काही म्हणत होते, “सेध्या दुष्काळ आहे. धान्यासाठी आम्हाला आमची शेंत, द्राक्षमळे आणि घरे गहाण टाकावी लागत आहेत.”

आणखी काही म्हणत, “आमची शेते आणि द्राक्षमळे यांच्यावर आम्हाला राजाचा कर लागत आहे. पण तो भरणे परवडत नसल्यामुळे आम्हाला पैसे उसने घ्यावे लागत आहेत. ते श्रीमंत लोक पाहा! आम्ही त्यांच्यासारखेच तर आहोत. त्यांच्या मुलांसारखीच आमची मुले आहेत. पण आम्हांला आमची मुले मुली गुलाम म्हणून विकावी लागली. काहींना तर आपल्या मुलींना गुलाम म्हणून विकणे भाग पडलेले आहे. आम्ही असहाय आहोत. आमची शेती आणि द्राक्षमळे तर गेलेच. ते आता इतर लोकांच्या मालकीचे आहेत.”

या तक्रारी ऐकल्या तेव्हा मला अतिशय संताप आला. पण मी स्वतःला शांत केले आणि मग श्रीमंत कुटुंबे आणि कारभारी यांच्याकडे गेलो. त्यांना म्हणालो, “तुम्ही लोकांना जी रक्कम कर्जाऊ देता तिच्यावर व्याज द्यायची तुम्ही या आपल्याच माणसांना बळजबरी करत आहात. ते तुम्ही थांबवले पाहिजे.” मग मी सर्व लोकांना एकत्र बोलावले. त्यांना मी म्हणालो, “आपले यहुदी बांधव इतर देशामध्ये गुलाम म्हणून विकले गेले होते. त्यांना पुन्हा विकत घेऊन मुक्त करण्याचे आपण सर्वतोपरी प्रयत्न केले. आणि आता पुन्हा तुम्ही त्यांना गुलामासारखे विकत आहा!”

ते श्रीमंत लोक आणि अधिकारी गप्प राहिले. त्यांना काही बोलायला जागा उरली नाही. तेव्हा मी त्यांच्याशी बोलत राहिलो. मी म्हणालो, “तुम्ही जे करत आहात ते बरोबर नाही. देवाविषयी भय आणि आदर बाळगावा हे तुम्ही जाणता. इतर लोकांसारखी लाजिरवाणी कृत्ये तुम्ही करु नयेत. 10 माझे लोक, माझे भाऊ आणि मी सुध्दा लोकांना पैसे आणि धान्य उधार देत आहोत. पण त्यावरचे व्याज त्यांना सक्तीने द्यायला लावणे थांबवले पाहिजे. 11 त्यांची शेती, द्राक्षमळे, जैतुनाचे मळे आणि घरे तुम्ही त्यांना आत्ताच्या आत्ता परत करा. त्यांना लावलेले व्याजही तुम्ही परत करा. त्यांना जे पैसे, धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल तुम्ही कर्जाऊ दिलेत त्यावर तुम्ही एक टक्का व्याज लावले आहे. ते तुम्ही त्यांना परत करा.”

12 यावर ते श्रीमंत लोक आणि अधिकारी म्हणाले, “आम्ही ते परत करु आणि आम्ही त्यांच्या कडून आधिक काही मागणार नाही. नहेम्या, आम्ही तुझ्या म्हणण्याबरहुकूम वागू.”

मग मी याजकांना बोलावून घेतले. श्रीमंत लोक आणि अधिकारी जे बोलले त्याप्रमाणे वागण्याचे मी त्यांना देवासमोर वचन द्यायला लावले. 13 मग मी माझ्या वस्त्रावरच्या चुण्या झटकत म्हणालो, “आपले वचन जो पाळत नाही त्या प्रत्येकाची गत देव अशीच करतो. देव त्यांना त्यांच्या घरातून झटकून टाकील. ज्यासाठी त्यांनी कामधंदा केला ते त्यांच्यापासून हिरावून घेतले जाईल. तो माणूस सर्वस्वाला मुकेल.”

माझे सांगून झाले. आणि सर्वजण त्याच्याशी सहमत झाले. ते सर्व म्हणाले, “आमेन!” मग त्यांनी परमेश्वराचे गुणगान केले. आपल्या वचनाप्रमाणे लोक वागले.

14 शिवाय, यहुद्यांच्या भूमीवर राज्यपाल म्हणून माझी नेमणूक असतानाच्या त्या काळात मी अथवा माझ्या भाऊबंदांनी राज्यपालाच्या दर्जाचे अन्न घेतले नाही. माझ्या अन्नासाठी लोकांवर कर भरायची सक्ती मी केली नाही, अर्तहशश्त राजाच्या कारकीर्दीच्या विसाव्या वर्षापासून बत्तिसाव्या वर्षापर्यंत [a] मी अधिकारी होतो. मी यहुदाचा बारा वर्षे अधिकारी होतो. 15 पण माझ्या आधी सत्तेवर असलेल्या राज्यपालांनी लोकांना त्रस्त केले. या अधिकाऱ्यांनी लोकांना प्रत्येकी एक पौंड चांदी बळजबरीने द्यायला लावली. लोकांना त्यांनी अन्न आणि द्राक्षारस द्यायला भाग पाडले. या राज्यपालांच्या हाताखालच्या प्रमुखांनीही लोकांवर सत्ता गाजवली आणि त्यांचे जिणे खडतर केले. पण मी देवाविषयी भय आणि आदर बाळगला. त्यामुळे अशा गोष्टी केल्या नाहीत. 16 यरुशलेमची तटबंदी उभारायला मी कष्ट घेतले. भिंतीचे काम करायला माझी सर्व माणसे एकत्र आली. आम्ही कोणाची जमीन बळकावली नाही!

17 शिवाय माझ्या मेजावर मी नेहमीच दीडशे यहूदींना अगत्याने जेवायला घालत असे. शिवाय आसपासच्या राष्टांतून आलेल्या लोकांनाही मी जेवू घालत असे. 18 मेजावर माझ्या पंक्तीला बसणाऱ्यांसाठी म्हणून रोजचे अन्नाचे प्रमाण पुढीलप्रमाणे असे: एक गाय, सहा निवडक मेंढरे आणि वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी शिवाय दहा दहा दिवसांच्या अंतराने सर्व प्रकारचे द्राक्षारस माझ्या मेजावर पुरवण्यात येत. तरीही, अधिकाऱ्यासाठी ज्या प्रकारच्या अन्नाची मुभा असते त्याची मागणी मी कधीही केली नाही. माझ्या अन्नाची किंमत म्हणून मी लोकांना कर भरायची सक्ती कधीही केली नाही. लोकांचे काम अतिशय कष्टाचे आहे हे मी जाणून होतो. 19 देवा, या लोकांकरीता मी जे भले केले ते ध्यानात असू दे.

प्रेषितांचीं कृत्यें 15

यरुशलेम येथील सभा

15 मग काही माणसे यहूदीया प्रांतातून अंत्युखियास आली. ती बंधुजनांना (यहूदीतर) शिक्षण देऊ लागली: “तुमची सुंता झालेली नसेल तर तुमचे तारण होणार नाही. मोशेने आम्हांला हे करायला शिकविले.” पौल व बर्णबा या शिक्षणाविरुद्ध होते. या विषयावर त्या लोकांशी पौलाने व बर्णबाने वाद घातला, म्हणून लोकांनी असे ठरविले की, पौल, बर्णबा व इतर काही जणांना यरुशलेमला पाठवायचे. हे लोक त्या ठिकाणी प्रेषित व वडीलजनांशी या विषयावर अधिक बोलण्यासाठी गेले.

मंडळीने त्यांना प्रवासास जाण्यासाठी मदत केली. हे लोक फेनीके व शोमरोन प्रांतातून जात असता यहूदीतर विदेशी लोक देवाकडे कसे वळले, याविषयी सविस्तर हकीगत त्यांनी तेथील बंधुवर्गाला सांगितली. त्यामुळे ते फार आनंदित झाले. ते जेव्हा यरुशलेमला पोहोंचले तेव्हा तेथील ख्रिस्ती मंडळी, प्रेषित आणि वडीलजन यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी पौल व बर्णबा यांनी आपल्या हातून देवाने जे काम करुन घेतले त्याविषयी सविस्तर सांगितले. परुशी गटातील काही विश्वासणारे उभे राहीले आणि म्हणाले, “यहूदीतर विश्वासणाऱ्यांची सुंता झालीच पाहिजे. तसेच आपण त्यांना मोशेचे नियम पाळण्याविषयी शिकविले पाहिजे!”

मग प्रेषित आणि वडीलजन या समस्येचा अभ्यास करण्यासाठी एकत्र जमले. त्यावर प्रदीर्घ चर्चा झाली. मग पेत्र उभा राहिला. आणि त्यांना म्हणाला, “माझ्या बंधूनो मला माहीत आहे, सुरुवातीला जे काही घडले, ते तुमच्या आठवणीत आहे. जे यहूदी नाहीत, त्या लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी तुमच्यामधून देवाने माझी निवड केली. यासाठी की, त्यांनीही विश्वास धरावा. देव सर्वांचे विचार जाणतो, आणि त्याने या यहूदीतर लोकांचा स्वीकार केला आहे. देवाने जसा आम्हांला पवित्र आत्मा दिला, तसाच त्यांनाही देऊन त्याने हे आम्हांस दाखवूत दिले. देवाच्या दृष्टीने ते लोक आपल्यापेक्षा वेगळे नाहीत. जेव्हा त्यांनी विश्वास ठेवला, तेव्हा त्याने त्यांची ह्रदये शुद्ध केली. 10 मग आता यहूदीतर लोकांच्या मानेवर जड जू तुम्ही का ठेवीत आहात? तुम्ही देवाला राग आणीत आहात काय? आपण व आपले वाडवडील (पूर्वज) हे ओझे वाहण्याइतके सशक्त नव्हतो. 11 आम्ही असा विश्वास धरतो की, आम्ही आणि हे लोक प्रभु येशूच्या कृपेमुळे तारले जाणार आहोत.”

12 मग सगळे लोक शांत झाले, ते पौल व बर्णबाचे बोलणे ऐकू लागले. पौलाने व बर्णबाने लोकांना सांगितले की, देवाने त्यांच्याद्वारे यहूदीतर लोकांमध्ये चमत्कार व अदभूत कृत्ये केली. 13 पौलाने व बर्णबाने आपले बोलणे संपविले. मग याकोब बोलला. तो म्हणाला, “माझ्या बंधूनो, माझे ऐका. 14 शिमोन (पेत्र) याने यहूदीतर लोकांना देवाने आपले प्रेम कसे दाखविले ते सांगितले. पहिल्यांदाच देवाने यहूदीतर लोकांना स्वीकारले. आणि त्यांना आपले लोक बनविले. 15 संदेष्टेयांच्या शब्दांनी सुद्धा याला सहमती दर्शविली:

16 ‘मी (देव) यानंतर परत येईन
    मी दाविदाचे घर पुन्हा बांधीन
    ते पडलेले आहे
त्याच्या घराचे पडलेले भाग मी पुन्हा बांधीन
    मी त्याचे घर नवे करीन
17 मग इतर सर्व लोक देवाचा शोध करतील
    सर्व यहूदीतर लोकसुद्धा माझे लोक आहेत असे मी मानतो.
प्रभु (देव) असे म्हणाला,
    व हे करणारा तोच आहे.’ (A)

18 ‘या सर्व गोष्टी सुरुवातीपासूनच माहीत आहेत.’

19 “म्हणून मला वाटते जे यहूदीतर बंधु देवाकडे वळले आहेत, त्याना आपण तसदी देऊ नये. 20 त्याऐवजी आपण त्यांना एक पत्र लिहू या. आपण त्यांना या गोष्टी सांगू:

मूर्तिपुढे ठेवलेले अन्न खाऊ नका.

    (त्यामुळे अन्न अशुद्ध होते)

कोणत्याही प्रकारचे अनैतिक पाप करु नका.

रक्त चाखू नका गुदमरुन मारलेले प्राणी खाऊ नका.

21 त्यांनी या गोष्टी करु नयेत, कारण अजूनसुद्धा प्रत्येक शहारात यहूदी लोक आहेत जे मोशेचे नियम शिकवितात. बऱ्याच वर्षांपासून दर शब्बाथ दिवशी सभास्थानातून मोशेचे नियम वाचण्यात येतात.”

यहूदीतर विश्वासणाऱ्यांना पत्र

22 प्रेषितांना, वडीलजनांना व सगळ्या मंडळीला वाटत होते की, पौल व बर्णबा यांच्याबरोबर आणखी काही माणसे अंत्युखियाला पाठवावीत, मंडळीने त्यांचे स्वतःजे काही लोक निवडलले. 23 त्यांनी यहूदा (बर्सब्बा) आणि सीला यांना निवडले. यरुशलेमधील बंधुवर्गामध्ये या माणसांचा आदर केला जात असे. मंडळीने या लोकांबरोबर हे पत्र पाठविले. पत्रात असे लिहिले होते की,

प्रेषित, वडीलजन आणि तुमचे बंधुजन

यांजकडून अंत्युखिया शहरातील तसेच सीरीया व किलकिया देशातील सर्व यहूदी नसलेल्या बांधवांस:

प्रिय बंधूनो,

24 आम्ही असे ऐकले की, आमच्यातील काही लोक तुमच्याकडे आले. ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्यामुळे तुम्हांला त्रास झाला व तुम्ही हताश झालात. परंतु आम्ही त्यांना हे करण्यास सांगितले नाही! 25 आम्ही सर्वांनी या गोष्टीला सहमती दर्शविली की, काही लेकांची निवड करुन त्यांना तुमच्याकडे पाठवावे. आमचे प्रिय मित्र पौल व बर्णबा यांच्यासह ते असतील. 26 बर्णबा व पौल यांनी आपल्या प्रभु येशू रिव्रस्ताच्या सेवेसाठी आपले जीवन दिले आहे. 27 म्हणून आम्ही यहूदा व सीला यांना त्यांच्याबरोबर पाठवत आहोत. ते सुद्धा तुम्हांला त्याच गोष्टी सांगतील. 28 पवित्र आत्म्याला असे वाटते की, तुमच्यावर आता आधिक ओझे असू नये. आणि आम्हांला ते मान्य आहे. तुम्ही फक्त पुढील गोष्टी कराव्यातः

29 कोणतेही अन्न जे मूर्तीला वाहिले आहे ते खाऊ नका

रक्त चाखू नका गुदमरुन मारलेले प्राणी खाऊ नका.

कोणत्याही प्रकारचे अनैतिक पाप करु नका.

जर तुम्ही या गोष्टींपासून दूर राहाल, तर तुम्ही चांगले कराल

आता आम्ही तुमचा निरोप घेतो कळावे.

30 मग पौल, बर्णबा, यहूदा व सीला यांनी यरुशलेम सोडले. ते अंत्युखियास गेले. अंत्युखियात त्यांनी विश्वासणाऱ्यांना एकत्र केले. आणि त्यांना ते पत्र दिले. 31 जेव्हा त्यांनी ते पत्र वाचले. ते आनंदित झाले. पत्राने त्यांचे समाधात झाले. 32 यहूदा व सीला हेसुद्धा संदेष्टे होते. त्यांनी विश्वासणाऱ्या बंधूंना विश्वासात भक्कम करण्यासाठी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. 33 यहूदा व सीला काही काळ तेथे राहिल्यानंतर ते निघून गेले. बंधूंकडून त्यांना शांतीचा आशीर्वाद मिळाला, ज्या यरुशलेममधील बंधूनी यहूदा व सीला यांना पाठवले होते, त्यांच्याकडे ते परत गेले. 34 [a]

35 पण पौल व बर्णबा अंत्युखियातच राहिले. त्यांनी व इतर पुष्कळ लोकांनी सुवार्ता सांगितली आणि प्रभूचा संदेश लोकांना शिकविला.

पौल व बर्णबा वेगळे होतात

36 काही दिवसांनंतर पौलाने बर्णबाला सांगितले, “आपण पुष्कळ गावात प्रभूचा संदेश दिला. आपण पुन्हा या गावांमध्ये तेथील बंधुभगिनींना भेट देण्यासाठी आणि त्यांचे कसे काय चालले आहे हे पाहण्यासाठी जायला हवे.”

37 बर्णबाला त्याच्यासोबत योहान (मार्क) यालाही घ्यायचे होते. 38 पण ज्याने पंफुलिया येथे त्याची साथ सोडली व आपले काम पूर्ण केले नाही, त्याला आपल्यासोबत घेऊ नये असे पौलाचे म्हणणे होते 39 पौल आणि बर्णबा यांच्यात यावरुन मोठा वाद झाला. ते विभक्त झाले व वेगळ्या मार्गांनी गेले. बर्णबा योहानासह कुप्र येथे समुद्रमार्गे गेला.

40 पौलाने सीलाला आपल्यासोबत नेण्यासाठी निवडले. अंत्युखियातील बांधवांनी, पौलाला देवाच्या कृपेवर सोपवले आणि मग त्यांना रवाना केले. 41 पौल, सीरीया व किलकीया भागातील मंडळ्यांना स्थैर्य देत गेला.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center